आपली आवड

Submitted by मंजूडी on 15 December, 2007 - 02:40

ही माझी सगळ्यात पहिली कथा.
मी कधी कथा वगैरे लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मायबोलीवर आले, तिथल्या उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला लागले, मग आपणही काही लिहून पहावी अशी ऊर्मी निर्माण झाली. कॉम्प्युटरवर मराठी टाईप करण्याची मजा काही वेगळीच... मनात येईल त्याक्षणी लिहिता येतं, नको ते खोडता येतं, तिसरी ओळ पाचव्या ओळीच्या ठिकाणी आणि सातवी ओळ चौथ्या ओळीत सहजतेने नेता येते. खाडाखोडी शून्य. हस्ताक्षराची फिकीर बाळगायचं काही कारणच नाही. तर, या सगळ्या गोष्टींमुळे मला लिहिण्याची आवड निर्माण झाली. आणि तश्या दृष्टीने विचार करण्याची, परिस्थितीकडे बघण्याची सवय लागली. 'चांगलं लिहिते आहेस, अजून लिही' असं ढोसणारे, उत्तेजन देणारे मैत्र मला मायबोलीवरच लाभले.
मला लिहायला उद्युक्त करणार्‍या मायबोलीचे अनेक आभार!!

******************************************

कर्कश्य वाजणार्‍या मोबाईलच्या अलार्मने चित्राला जाग आली. मनाशी चरफडलीच ती. खरं म्हणजे उठल्यावर प्रसन्न वाटावं म्हणून तिच्या मोबाईलवर तिने मंजूळ बासरीची धून अलार्म टोन म्हणून सेट केली होती. पण आत्ता वाजला तो मोबाईल तिच्या नवर्‍याचा, अमितचा होता. तो गाढ झोपला होता, तिचा मोबाईल पलिकडे टिपॉयवर ठेऊन... नेहमीच तो अशी मोबाईलची बदलाबदली करून आपली आवड करत असे. त्याचं पांघरूण खसकन ओढून त्याला उठवायचा असूरी विचार तिच्या मनात आला पण नंतरचं भांडण निस्तरायला तिच्या घड्याळाला वेळ नव्हता. भराभर आन्हिक आटपून ती स्वयंपाकघरात आली आणि तिच्या लक्षात आलं की दूधवाला मुलगा आज येणार नाहीये. तिला खाली उतरणं भाग होतं. तिचे सासूबाई सासरेबूवा मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांच्या यायच्या रस्त्यावरच डेरी होती पण हातात पैश्यांची अडचण होते ह्या सबबीवर ते दूध आणणं टाळत असत.

तशी आजची डब्याची घाई नव्हती. शनिवार असल्याने सकाळचा पोटभरीचा नाश्ता, अर्थात ब्रंच केलं तरी चालत असे. तिने कालच रात्री इडल्या करण्यासाठी पीठ वाटून ठेवलं होतं. चटणीची तयारी करायला घेतली आणि लाईट गेले. अस्सा राग आला ना तिला. 'आपली आवड' दुसरं काय. हा तिचा अगदी आवडता शब्द होता. स्वत:च्या सोईप्रमाणे लोकं दुसर्‍याचं (खरं म्हणजे तिचंच) प्लॅनिंग बिघडवतात, त्यासाठी योजलेला हा खास शब्द होता. भारनियमनाची वेळ खरी दुपारची होती. पण वीज नियामक मंडळाला चित्राची भंबेरी उडवायची होती म्हणून त्यांनी सकाळीच लाईट घालवले. आता आंघोळीचं पाणी गॅसवर तापवावे लागेल आणि शिवाय चटणी नाही केली तर कोणीच त्या इडल्याना तोंड काय हातही लावणार नाही याची तिला खात्री होती. आता काय करावं या विचारात असतानाच तिचे सा.बा. - सा.बू. आले. त्यांचा चहा, कॉफी करताना तिला डोळ्यासमोर चटणीच दिसत होती. सांबार करता करता तिला अचानक आठवलं की फ्रिजमध्ये मिरचीचा ठेचा आहे. हुश्य!! हायसं वाटलं चित्राला. त्यात दही घालून खमंग फोडणी घातली आणि घड्याळात पाहिलं. तिला ऑफिससाठी निघायला फक्त १ तासच होता. 'मी लावते इडल्या, तू जा तुझं आवर' असं सा.बा. नी म्हणताचक्षणी ती आंघोळीला पळाली. पाणी फारसं कडक तापलं नव्हतंच. तशीच कुडकुडत आंघोळ उरकली तिने.

'मी आज येत नाहीये सोडायला, तू रीक्षाने जा स्टेशनला' असं अर्धवट झोपेत बडबडून तिला काहीच बोलायची संधी न देता अमित कूस बदलून पुन्हा झोपून गेला. त्याला दोन चापट्या मारायचा मोह तिने कसाबसा आवरला. त्याला आज सुट्टी आणि हाफ डेच असला तरी चित्राला आज ऑफिस होतं. घाईघाईत नाश्ता करता करता पेपर वाचून ती निघाली तेव्हा तिला ५ मिनीटे उशीरच झाला होता. रिक्षा मिळून ती स्टेशनला पोचली तेव्हा चांगलाच उशीर झाला होता. रेल्वेची काय कायमच आपली आवड असते असा विचार करत ती स्टेशनवर पोचली तेव्हा इंडीकेटर्स बंद पाडून रेल्वेने पहिली सलामी दिली होती.

'शी बाई, दिवसाची सुरुवाताच वैतागाने झाली की अख्खा दिवस वैतागात जातो' असं म्हणत म्हणत ती प्लॅटफॉर्म उतरली. धक्काबुक्की करत मिळेल त्या गाडीत चढली आणि एकदाची ऑफिसला पोचली.

तिच्या नशीबाने ऑफिसमधे कोणी आपली आवड केली नाही. काम करता करता ४ तास कसे भुर्रकन ऊडून गेले तिलाच कळले नाही. मधे एकदा अमितने फोन करून ऑफिसला नीट पोचलीस ना विचारले. तेवढाच कय तो डिस्टर्बन्स. त्या ५ मिनीटांच्या फोनमधेही तिने सकाळी मोबाईलची अदलाबदल केल्याबद्दल आणि स्टेशनला सोडायला न आल्याबद्दल जरा जास्तच स्पष्टपणे तिची नाराजी व्यक्त केली.

ऑफिसनंतर चित्राने आणि तिच्या मैत्रीणीने ऑफिसजवळच्या मोठ्या पार्लरमध्ये फेशियलसाठी जायचं ठरवलं होतं. पण कँटीनमध्ये जेवताना अमितचा फोन आला की नागपूरचे काका काकू आलेत तर तू लवकर घरी ये. तिचा पडलेला चेहरा पाहून मैत्रिण काय समजायचं ते समजली आणि पुढच्या शनिवारचं नक्की करून दोघीही आपल्या वाटेला लागल्या. पुन्हा एकदा ट्रेनच्या गोंधळातून ती घरी पोचली तेव्हा पाहुण्यांनी गजबजलेलं घर तिचीच वाट पाहत होतं.

पाहूण्यांची सरबराई करता करता चित्रा चांगलीच जेरीला आली होती. कारण प्रत्येकाची आपली आवड. कोणाला साखरेचा चहा, कोणाला बिनसाखरेचा, कोणाला कॉफी, कोणाला सरबत. सरळ बेडरूममधे जाऊन झोपावं असं वाटत होतं, पण काय करणार? प्रत्येकाची आपली आवड जपणं हेच तिचे संस्कार होते ना... तिच्या आवडीबद्दल तिला कोणीच विचारत नव्हतं. तिने आपलं थोडसं उरलेलं सरबत एका ग्लासमधे घेतलं आणि बाहेर जाऊन गप्पा मारायला बसली. तेवढ्यात काकूच्या नातवाने सरबताचा ग्लास फोडला.
"अगं लहानच आहे तो, काही कळत नही त्याला अजून" ही वर काकूंची सारवासारव.

"लहान काय चांगला ८ वर्षाचा घोडा झालाय. आणि काकू तिच्या रुखवतातला होता तो ग्लास, आता गेला ना सेट वाया" असं अमित म्हणाल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

'मी ह्या सगळ्यांना मावशीकडे सोडून येतो, आई बाबा पण त्यांच्याबरोबर जाताहेत. तू रात्रीचं काही करू नकोस, बाहेरच जाऊ जेवायला. मला यायला तास दीड तास तरी लागेल, तोपर्यंत तू छानशी झोप काढ.' असे अमितने तिला सांगताच तिचा चेहरा कृतज्ञतेने भरून आला. जरा जास्तच उत्साहाने तिने सगळ्याना 'बाय' केले.

संध्याकाळी मात्र काहीच प्रॉब्लेम न येता त्या दोघांचा कार्यक्रम नीटपणे पार पडला. 'तुला आवडतो म्हणून पिझ्झा खाऊया.' 'आईसक्रीम नको, कुल्फी खाऊया तुला आवडते म्हणून' असं म्हणत म्हणत अमितने तिला खुलवलं. सकाळचा राग ती अगदी विसरून गेली. तिला आवडते म्हणून अमितने आणलेली मराठी नाटकाची डीव्हीडी बघत, शेवटी 'आपली आवड' जपणारं कोणीतरी आहे ह्या समाधानात ती अगदी गाढ झोपून गेली.

गुलमोहर: 

भरी जिंदगी में है ही क्या????
त्याच उत्तर मिळाल ना. Happy
जमलय. लिहित रहा.

त्याचं पांघरूण खसकन ओढून त्याला उठवायचा असूरी विचार तिच्या मनात आला पण नंतरचं भांडण निस्तरायला तिच्या घड्याळाला वेळ नव्हता.>>>>>>> मस्त लिहिलय , अगदी...

मंजू, आपली आवड जमलय!!

>>>>स्वत:च्या सोईप्रमाणे लोक दुसर्‍याचं (खरं म्हणजे तिचंच) प्लॅनिंग बिघडवतात त्यासाठी योजलेला हा खास शब्द होता.>>>>>
सहीच आहे हे अगदी माझ्या घरातल्या सारख लिहील्यासारख वाटतय.नक्किच विचार करायला लागणार. दोघानी नोकरी करणार्या घरातल नेहेमीच चित्र ......
पण मन्जे हाच अनुभव एखादा पुरुष कसा लिहिल ग!!!! शेवट आम्हालाही कधी तरी आपली आवड सम्भाळावीच लागते ना!!!

छान खुलवलीये लघुकथा.. लिहित र्‍हावा अशाच.. Happy

कथा आगदी नेटकी, आणि बर्‍याच 'घर घर की कहानी ' मधली आहे. त्यामुळे नक्कीच आवडली लिखाण चालु ठेव फार चांगल लिहू शकशील आणखी. ( हा भो.सल्ला तर नाही ना ? )

ही तर माझीच गोष्ट आहे.... रोज सकाळी अगदी अस्सेच घडते माझ्या घरी. संध्याकाळ मात्र अशी होत नाही माझी. असो. कथा मस्तच जमली आहे. अभिनंदन!!!

Mala ajun Marathi typing jamat nahiye. Pan goshta atishay chhan ahe. Aapli Avad ha mala vatata tuzach avdicha shabda ahe. Pan ekdam zakas !!!!

काय मॅडम, तुम्हीसुध्दा????????? Happy Happy

लगे रहो, छान जमलीये. Happy नीटनेटकी सुबक झालीये Happy

प्रत्येक नोकरी करणार्‍या स्त्रीला कमीअधिकपणे येणारा हा अनुभव आहे. पण त्यातही कुणीतरी आपली आवड लक्षात ठेवलेली असल्यास त्याच स्त्रीला मग कोणतेही काम करताना जड जात नाही हेही तितकेच खरे आहे. स्त्रिया तशा अल्पसंतुष्ट असतात.घेण्यापेक्षा त्या देणे जास्त जाणतात.
खूपच नेमक्या शब्दात हा अनुभव आपण मांडलात. आवडला.

मन्जू, छान आटोपशीर झालीये गोष्टं. लिहीत रहा. चांगलं लिहिते आहेस. 'आपली आवड' ची व्याख्या तर एकदम आवडली... आपल्याला!

पल्लू, मराठीत टाईपता येत नाही हेच टाईपलयस की गं. प्रयत्नं कर जमेल हळू हळू.... पण लिहीत रहा.
****Mala ajun Marathi typing jamat nahiye. Pan goshta atishay chhan ahe. Aapli Avad ha mala vatata tuzach avdicha shabda ahe. Pan ekdam zakas !!!!**
malaa ajUn maraThee TAyapiMg jamat nAhiye. paN goShTa atishay ChAn Ahe. Apalee AvaD haa malA vATata tujhA aavaDeechA shabda Ahe. paN ekadam jhakAs!!!
(हा माझा थोडा आगाऊपणा झालाय. माफ कर पण..... रहावलं नाही)

शेवटी 'आपली आवड' जपणारं कोणीतरी आहे ह्या समाधानात >>>>>>>>
फारच touching केलायेस शेवट, आवडली.

मस्त जमलिये लघुकथा. बारकावे छान टिपलेत दैनंदिन जीवनातले.
बाकी प्रमोदला अनुमोदन स्त्रियांच्या अल्पसंतुष्टतेसाठी.

माणिक !

खुप खुप सुन्दर......... अश्या छोट्या छोट्या गोष्टी मुळेच तर आपल जीवन विनातक्रार सुरु असते ना..... अजुन काय लिहु...... मस्तच Happy

मस्त झालीय गोष्ट. छोटी आणि नेटकी. कमी नाही की जास्त नाही. फ्लो पण छान आहे.
आपली आवड. अगदी माझ्या शब्दसंग्रहात फिट बसेल असा शब्द आहे Happy

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. इतके प्रतिसाद, तेही positive मिळतील असं अजिबात वाटलं नव्हतं.

चाफ्फा आणि घारुअण्णा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'घर घर की कहानी' आहे म्हणूनच सर्वाना आवडेल असं वाटलं नव्हतं. कथा परत वाचल्यावर बर्‍याच त्रुटी जाणवल्या. कथा पोस्ट केल्यावर परत वाचायचं डेअरींगच नव्हतं. पुढची कथा लिहिली तर त्या नक्किच टाळण्याची काळजी घेईन. बाकी दाद, माणिक, पूनम, प्रमोदकाका, चाफ्फा ह्यासारख्यानी कथा वाचली आणि आवर्जून प्रतिसाद दिला ह्यातच मी भरून पावले.

झ आणि मोना च्यामारी, मला पण आश्चर्य वाटलं की कसं काय लिहू शकले कथा वगैरे. पल्लु मुद्दाम रजिस्ट्रेशन करून प्रतिसाद दिल्याबद्दल थेंकू. आता नेहमी इथे येत जा. लोपा, आयटे, सन्मे, प्राची, दिव्या, अनघा आणि अखी, मनापासून धन्यवाद.

प्राची, don't be so negative. आपकी भी शाम कभी ना कभी बन जायेगी!!!!

सुंदर कथा लिहिलिस. आपली आवड जोपासणार हि कोणीतरी आहे... छान शब्दबद्ध केलस. पुढची कथा हि लवकर येऊ दे.

खुप छान लिहिलयस मंजु.
माझा पण दिवस असाच सुरु होतो. प्राचीला अनुमोदन.

मी नक्कि प्रयत्न करेन. धन्यवाद. जमतय थोड, थोड.

माझेही मत आहे. न कम न ज्यादा अशी छान कुरकुरीत झाल्ये गोष्ट! Happy

आपली आवड जपणारं असं कोणी असेल ना तर बाकी सगळयांचे सोस पूरे करता येतात. चतकोरच आकाश हवं असतं, मोकळी भरारी घेण्यासाठी, मग उरलेला वेळ हुकूमाबर खेळ करताना कमी त्रास होतो!

मंजू,
काय गं माझ्या घरी डोकावली होतिस का कधी? हे अस्सच असतं सगळं...

प्राजु

वाह, एकदम छान जमलिय कथा. आपल्या रोजच्या जीवनात घडणार्या कथा मला तरी जास्तच भावतात. लिहित रहा.

सगळ्यांचेच प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद. पुढची कथा लिहीन की नाही माहीत नाही. पण सुचली आणि लिहिली तर अशी हळदी - कुंकू टाईप नाही लिहिणार हे नक्की. साच्यात न अडकता काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या प्रतिक्रिया प्रचंड प्रोत्साहनकारक आहेत.

मंजु, 'आपली आवड' खासच. माझी मावशी घरातल्यांच्या या वागणुकीला, 'फर्माइशी कार्यक्रम' म्हणते, ते आठवले. Happy

'आपली आवड' हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे! आपला अपेक्षाभंग झाल्यावर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हा उपाय चांगला आहे. बाकी नोकरी करणारी असो किंवा नसो, बहुतांश भारतीय स्त्रियांची कथा अगदी अशीच असते.

छान लिहिल हेस ग मन्जु
बारीकसारीक तपशील नीट आलेत Happy
नोकरी करणार्‍या स्त्रियान्ची काय गत होते, अन जर "आपली आवड" असणारी माणसच आजुबाजुला असतील तर काय तर्‍हा तर्‍हा होते, ते अगदी नेमके पणाने मान्डलय
गोष्टीचा शेवट गोडित केला ते बर झाल (नाहीतर त्या अमितला धरुन बुकलाव लागल अस्त):P

खुपच छान लिहिले आहेस ग
सकालि असनारा राग किति सहजपने निवलला.

Pages