श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 23 June, 2010 - 05:18

श्रीनिवास - गट्टू? चला.. बाप्पापुढे बसा.. हा मारुती कसाय बघा.. लांबच्या लांब शेपटी.. ही उडी मारतो आकाशात... त्याला वाटले सूर्य म्हणजे सफरचंदच आहे.. रामाला आणि लक्ष्मणाला एकाचवेळेस खांद्यावर घेऊन उडायचा मारुती... म्हणा भीमरूपी?? .. भीमरूपी?? महारुद्रा.. म्हणा.. अरे?? ते पेन आहे.. ते का फेकलंस तिकडे??.. म्हणा भीमरूपी.. ही बघ मी कशी पूजा करतो.. शहाणी मुले सकाळी उठून आंघोळ करून बाप्पाला नमस्कार करून मग अभ्यास करतात बर का?? आं.. नाचायचं नाही इथे.. पाणी सांडेल..

गट्टू आता दोन वर्षांचा झाला होता. अनेक प्रश्न बोबड्या स्वरात विचारत होता. दोन वर्षे झाली तरी एक क्षण नव्हता जेव्हा रमाची आठवण डोळे भिजवायची नाही. पण गट्टूकडे पाहात पाहात, त्याच्याशी खेळण्यात कधी दोन वर्षे गेली समजलेच नाही.

वाड्यातील प्रत्येक माणूस गट्टूला आपलाच समजायचा. त्यामुळे प्रचंड आधार होता. या वर्षभरात अनेक घटना घडल्या. श्रीनिवासची आई गेली. कोणत्याही वयात आई निवर्तल्याचे दु:ख पोरकेपणाची जाणीव करून देतेच! मात्र गट्टूला तर जन्मापासूनच आई मिळाली नाही हे पाहून श्रीनिवासने दु:ख आवरते घेतले होते. उषा ताई येऊन जाऊन होती. सणासुदीपुरती यायची. तारा औरंगाबादहून नागपूरला शिफ्ट झाली होती आणि स्वतःच्या आईलाही घेऊन गेली होती.

समीर आता सीनियर केजीत जायला लागला होता. राजश्री ज्युनियर! मानेकाका आणि पवार मावशी रोज एकमेकांशी अन प्रत्येकाशीच भांडत होते.

पण गट्टू हा एक असा घटक होता ज्याच्यामुळे सगळे एक होत होते.

या वर्षभरात श्रीनिवासला एक बर्‍यापैकी इन्क्रिमेंट मिळाले. ऑफीसमधील सगळेच गट्टूची कौतुके ऐकून आनंदीत व्हायचे. कुणी ना कुणी गट्टूला सारखी खेळणी, खाऊ घेऊन यायचे.

मात्र रात्र झाली अन सगळा वाडा सामसूम झाला की श्रीला घर खायला उठायचे. गट्टूच्या झोपण्याचे शेड्युल व्यवस्थित झाले होते. वाड्यातील चौकात स्वतःची कौतुके करून घेतल्यानंतर अन भरपूर खेळल्यानंतर नऊलाच झोपून जायचा तो थेट सकाळी आठलाच उठायचा! त्यावेळेस घरातील आवश्यक ते सगळे काम करून व पूजा करून श्रीनिवास स्वतःच्या पोळ्या करत असायचा. अजूनही श्री ऑफीसला गेला की गट्टू मुख्यत्वे करून मावशींकडेच असायचा पण आता एकाच ठिकाणी बसण्याची आपल्याला आवश्यकताअही नाही आणि वाटेल तेथे जाण्याची क्षमताही आपल्यात आहे याचे त्याला भान आलेले असल्यामुळे फक्त जेवण्यापुरताच मावशींकडे असायचा! बाकी नुसता या घरातून त्या घरात!

मात्र आज तो सातलाच उठून बसला होता. आणि बोबड्या स्वरांमधे काही ना काही बडबड करत होता. बाबा पूजा करत आहेत हे पाहून तो विविध वस्तू हातात घ्यायला लागल्यावर श्रीला उठावेच लागले. गट्टूला उचलून एका लाकडी घोड्यावर बसवून श्री पुन्हा पूजा करायला बसला. आज देवांच्या आंघोळी जरा घाईघाईतच उरकायला लागणार होत्या. कारण महाराज काय काय धिंगाणा घालतील माहीत नव्हते. तेवढ्यात गट्टूचे लक्ष पुन्हा आईच्या फोटोकडे गेले. आजवर श्रीने त्याला सांगीतले होते की ही आई आहे आणि देवाघरी गेली आहे. बघू कधी येते ते! पण ते सांगतानाही श्रीचे शब्द फुटत नव्हते. काय बोलणार एवढ्याशा मुलाशी या विषयावर? त्याला आईची कमतरता वाड्यातील माणसांनी भासूनच दिली नाही हेच सुदैव म्हणायचं! पण तरी गट्टू दिवसातून एकदा तरी 'ही आईये, ही आईये' म्हणून जो येईल त्याचे लक्ष वेधून घ्यायचा. मग श्रीनिवास त्याच्या डोक्यातील तो विषय काढता यावा म्हणून त्याला इतर आकर्षणे दाखवायचा. पण आज गट्टूने पुन्हा निरखून पाहिले फोटोकडे!

गट्टू - आई कुठे गेलीय??
श्री - अं??

पाठी मागे वळून श्रीने बघत विचारले आणि गट्टू फोटोकडे टक लावून बघतोय पाहिल्यावर म्हणाला..

श्री - गट्टू... आजीकडे जा.. बघ आज काय खाऊ केलाय तिनी?? जा बघ बरं.. आणि मला येऊन सांग..
गट्टू - आई कुठे गेलीय बाबा??
श्री - आई बाप्पाला भेटायला गेलीय बेटा.. येईल हं! बघू कधी वेळ होतो तिला ते..
गट्टू - का गेली?
श्री - बाप्पाचे काम होते.. त्याला चांगली माणसे हवी असतात..म्हणून आईला नेले हं.. ?
गट्टू - तुम्ही नाही चांगले??

श्रीने एक निश्वास सोडला.

श्री - तिच्या इतका नाही चांगला बाळ मी.. आता जा बरं आजीकडे.. बघ काय खाऊ केलाय..
गट्टू - मी पण नाही चांगला??
श्री - आं.. असं नाही बोलायचं.. तू खूप खूप चांगला आणि गोड मुलगा आहेस.. पण छोटा आहेस..
गट्टू - तुमची आई?
श्री - माझी आई पण.. गेलीय देवाकडे..
गट्टू - आजीची??
श्री - आजीची पण..
गट्टू - आणि समीरची?
श्री - समीरची आहे.. प्रमिला काकू समीरची आई आहे..
गट्टू - तुमच्यापेक्षा मोठी आहे?
श्री - नाही.. लहान आहे
गट्टू - आणि मधू काका??
श्री - मधूकाका पण लहान आहे..
गट्टू - मग समीर कसा मोठा ?
श्री - बाप्पाने तुला उशीरा धाडलं इथे..
गट्टू - मग बाप्पाला कशाला आंघोळ घालताय??
श्री - बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवतो म्हणून.. बाप्पाची रोज प्रार्थना करायची असते..

देव्हार्‍यासमोर येऊन 'माझ्या आईचे काम झाले की लगेच तिला परत धाड' असे म्हणून गट्टू धावत पवार मावशींकडे 'खाऊ दे' म्हणत निघून गेला.

क्षणभर श्रीने हातातल्या गणपतीकडे पाहिले. मनातच म्हणाला..

'आई कशाला नेलीस माझ्या मुलाची?? का असं केलंस रे??'

गट्टूमुळे खर्च नाही म्हंटले तरी बराच वाढला होता. मुलांचा खर्च काय कमी असतो? औषधे, कपडे, वस्तू, खेळणी.. श्रीनिवासला किंचित ताण जाणवायला लागला होता. हातात फक्त नऊशे रुपये यायचे. रमा होती तेव्हा काही ना काही घरगुती कामे करून हातभार लावायची. कुणाचे शिवणच शिवून दे, कुणाला डबाच दे वगैरे! पण आता एकट्याच्या पगारात सगळे करूनही पुन्हा गट्टूला काहीही जाणवू द्यायचे नव्हते. त्यातच अनेक सण, पहिला वाढदिवस अशा अनेक निमित्तांनी साठवलेल्या पैशात बरीच घट झालेली होती. आत्ताचा बॅलन्स फक्त अडीच हजार होता आणि तोही इमर्जन्सीसाठी राखून ठेवलेला होता.

पण पैशाची कसली अडचण? इतके गुटगुटीत बालक ज्या घरात खेळत असते त्या घरातल्यांना असल्या अडचणी जाणवतील तरी का? श्रीनिवासलाही जाणवायच्या नाहीत.

आज उशीरा घराबाहेर पडावे लागले. सकाळपासून सारखा उशीरच होत होता. मावशींकडे घराची किल्ली द्यायला गेलेल्या श्रीनिवासने पाहिले. गट्टू मावशींच्या मांडीत बसून शिरा खात होता आणि मावशी अत्यंत कौतुकाने शिरा भरवत होत्या त्याला. बाबांना पाहिल्यावर लगेच उठला आणि दोन्ही हात पसरून म्हणाला..

गट्टू - म्मी.. अं... मी येणार..
श्री - अंहं! बाबा कामाला चाललेत.. आत्ता नाही.. आपण संध्याकाळी भूर जायचंय की नाही..

गट्टू रडू लागला. हे नेहमीचंच होतं! नेहमीच या प्रसंगाला सामोरे जावे लागायचे. घरातून पायच निघायचा नाही श्रीचा.. पण कसेतरी त्याचे मन रमवत रमवत त्याला फसवून जावे लागायचे. श्री गेल्यावर त्याने रडू नये याची जबाबदारी मावशी रोजच उचलायच्या! इतर सर्व जबाबदार्‍यांप्रमाणेच..

पण आज गट्टू चिकटलाच! सोडेचना..

श्री - अरे.. हे बघ.. मी ऑफिसला गेलो नाही तर साहेब ओरडतील की नाही?? चालेल का बाबांना ओरडलेले तुला?? आणि संध्याकाळी काय काय गंमत करणार आहोत आपण..

पण मनात येत होते... 'काय काय गंमत करायला आहे काय आपल्याकडे?' जेमतेम भागतंय! उगाच आपलं मूल लहान आहे म्हणून काहीतरी सांगायचं बिचार्‍याला..

उशीर झाल्यामुळे सप्रे रागावणार याची कल्पना आत्ताच आलेली होती त्याला. जवळपास पंधरा मिनिटांनी गट्टूचे कशामुळेतरी दुर्लक्ष झाल्यावर त्याच्या नकळत पटकन श्रीनिवास बाहेर पडला. आणि सटकला.

ऑफीसमधे शिरतानाच त्याने चेहरा खूप फायरिंग मिळाल्यासारखा केला होता. त्यातच त्याला आत बोलावल्याचा निरोप आला. सगळ्यांनाच समजले होते. आज पेंढारकरांना झाडणार! श्री निराश चेहर्‍याने आत गेला.

सप्रे - पेंढारकर, आय अल्सो अन्डरस्टेन्ड व्हॉट यू हॅव बीन थ्रू.. बट.. आय मस्ट से दॅट.. तुम्ही त्याचा कोणताही.. गैरफायदा घेणे योग्य नाही.. यू हॅव ऑलरेडी मेड ऑल द अ‍ॅरेंजमेंट्स टू टेक केअर ऑफ यूवर चाईल्ड.. आता तुम्ही ऑफीसला जरा सिरियसली घ्यायला पाहिजेत.. आय मीन... कामंच्या कामं राहिलेली असतात.. तीन दिवसांची एक्साईजची रेकॉर्ड्स राहिलेली आहेत.. रोज देशमानेंनी मदत करायची.. शेवटी काल मी त्यांना सांगीतलं.. उद्यापासून पेंढारकरांना स्वतःचे काम कंप्लीट करूदेत.. केव्हाही बघावे तेव्हा आपले आज ते अजून यायचेत, आज ते जरा लवकर गेले.. आय अल्सो हॅव टू चिल्ड्रेन,.. आय हॅव बीन थ्रू ऑल धिस.. आजपासून प्लीज एन्शुअर यू आर पंक्चूअल.. आर यू गेटिंग मी??

श्री - सर.. बरोबर आहे... जरा.. अ‍ॅक्चुअली .. सोडतच नव्हता आज..

सप्रे - नाही ते होणारच हो.. आय मीन धिस कान्ट बी एन एक्स्क्युज पेंढारकर.. तुम्ही 'दोन अडीच वर्षाचा मुलगा जाऊच देत नव्हता म्हणून येऊ शकलो नाही' असे लिहिणार आहात का रजेच्या अर्जावर?? तुमची एकही रजा मी रजा न धरताही तुमच्या सगळ्या रजा संपल्या आहेत.. काय करता काय तुम्ही घरी??

श्री - सॉरी सर.. मी.. असं होऊ देणार नाही आता..

सप्रेंनी 'काय चाललंय' अशा तर्‍हेने हात उडवले अन कामात लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे बघत हिरमुसलेला श्री उठून हळूहळू बाहेर आला. सगळेच त्याच्या चेहर्‍याकडे बघत होते. त्याने काही विशेष झाले नाही असा चेहरा केला आणि कामात लक्ष घातले. आज त्याने झपाट्याने सगळं उरलेलं काम उरकायचा निर्णय केलेला होता मनातच!

देशमाने - पेंढारकर, ते काहीही बोलोत, मुलाकडे लक्ष द्या, सप्रेसाहेबांना तुम्हाला बोलायची संधीच मिळणार नाही हे मी अन चिटणीस बघू...

देशमानेंकडे कृतज्ञ नजरेने बघून कसनुसं हासत श्रीने स्वतःला कामाला जुंपलं!

घरात लहान मूल असले की कामही फटाफट करतो म्हणे माणूस! कारण कधी एकदा घरी जातोय अन मुलाला बघतोय असे झालेले असते. त्यामुळे वेगात काम होते.

ही उक्ती सार्थ ठरवली आज श्रीने! संध्याकाळी निघताना मात्र सप्रेंच्या चेहर्‍यावर समाधानच होते. त्यामुळे श्रीच्याही! श्रीच्या चेहर्‍यावरून कुणीही सांगीतले असते. आज कळी खुलली आहे त्याची! कारण एकतर साहेब समाधानी होते. आता निदान उद्या सकाळपर्यंत त्यांना भेटावे लागणार नव्हते. आणि आता घरी जाऊन गट्टूला भेटायचे होते. त्याच्याशी खेळायचे होते. गप्पा मारायच्या होत्या. स्वैपाक करायचा होता. गट्टूला आवडणारी वालपापडीची भाजी कालच आणून ठेवली होती. आणि रात्री गट्टू झोपला की कितीतरी वेळ त्याच्या निरागस चेहर्‍याकडे बघत बसायचे होते अन मग रमाच्या फोटोकडे बघत झोपून जायचे होते. गट्टूला कुशीत घेऊन! व्वा! काय संध्याकाळ होती.

मोठ्या खुषीत येऊन श्रीने आज चक्क दोन मोठ्या कॅडबर्‍या घेतल्या गट्टूसाठी! रोज एखादी गोळी किंवा चॉकलेट न्यायचाच तसा तो! पण आज जरा जास्तच आनंद झाला होता कारण कामावर उद्या बोलणी खावी लागणार नव्हती.

बसमधून इकडे तिकडे पाहात शेवटी ओंकारेश्वरापाशी पोचल्यावर श्रीने उद्याच्या पूजेसाठी फुले आणि उद्या सकाळसाठी थोडी भाजी वगैरे घेतली. स्वाती नवीन मराठीपाशी राहात असल्याने ती 'उद्या भेटू' म्हणून निघून गेली. स्वाती कारखानीस! एक सीकेपी मुलगी, जिचे वय होते सत्तावीस! रमाच्याच वयाची! पण ती लग्नच करणार नव्हती. तिच्या वडिलांनी आणि आजीने आईचा केलेला छळ पाहून म्हणे तिने हा निर्णय घेतला होता. आईबरोबरच राहात होती. वडील केव्हाच गेले होते. आईचा आग्रह अजिबात मनावर न घेता लग्न न करता तशीच राहात होती ती! वागणे मोठे लाघवी!

वाड्याच्या दारात पाऊल टाकताना श्रीला कधी एकदा गट्टू दिसतोय असे झाले होते. त्याने मावशींच्या दाराकडे खालूनच पाहिले अन हाक मारली..

श्री - गट्टू...

मावशी बाहेर आल्या अन म्हणाल्या..

मावशी - हाका कसल्या मारतोस?? आधी चौकशी तर कर रत्न इथेच आहे का गेलय भरकटायला?
श्री - म्हणजे? कुठे गेला??
मावशी - त्या मध्यानी नेलाय त्याला समीर अन राजश्रीबरोबर..
श्री - कुठे??
मावशी - संभाजी बागेत.. राब राब राबणार मी अन बागेत जाणार हे..
श्री - कधी गेला?
मावशी - येण्यात असेल आत्ता.. दोन तास झाले..

आल्या आल्या गट्टू न दिसल्यामुळे खट्टू झालेला असला तरी श्रीनिवासला ही एक वेगळीच संधी वाटली. आजचा स्वैपाक आणि इतर कामे उरकून घ्यावीत म्हणजे तो आला की आज त्याच्याशी खेळता येईल.

आणि पाऊण तासांनी श्रीनिवासचे सगळे काम संपले तेव्हाच नेमका गट्टू, समीर आणि राजश्री यांच्याबरोबर, म्हणजे खरे तर मधूसूदन आणि प्रमिलाबरोबर परत आला आणि आला ती पहिली हाकच मारली.. "बाब्बा... हे बघा खारे दाणे"

त्याला उचलून त्याचे पापे घेताना त्याच्या हातातील खार्‍या दाण्यांचे श्री खूप कौतूक करत होता. त्यातच श्रीने प्रमिला आणि मधूसूदनकडे पाहून आभारदर्शक मान हलवली. तेही मनापासून मोकळेपणाने हासले.

श्री - काय काय खेळलात?
गट्टू - शिवाशिवी.. आणि बॉल..
श्री - हो?? मग आता दमले का महाराज?
गट्टू - न्ना.. मला रॅकेट हवी..
श्री - रॅकेट?? कसली रॅकेट??
गट्टू - ती .. फूल मारतात ती रॅकेट..
श्री - का??
गट्टू - हवी..
श्री - अरे पण..
गट्टू - ह... वी..
श्री - हे बघ.. आत्ताच आपण घोडा आणला की नाही लाकडाचा???
गट्टू - अं.. रॅकेट हवी..
श्री - अरे फूल अन रॅकेट खेळायला जागा तरी आहे का घरात??
गट्टू - बागेत खेळणार..
श्री - असं सारखं सारखं बागेत नसतं काही जायचं.. आता मोठा झालास की नाही तू??
गट्टू - अं.. आजी.. मला रॅकेट हवीय.. त्या समीरला कशी आणली त्यांनी.. दोन दोन..
श्री - समीरला?? कधी??
गट्टू - आधीच... आज खेळायला काढली.. काका काकू पण खेळले..
श्री - अरे.. समीरला घोडा नव्हता आणला.. घोडा फक्त तुला..च..
गट्टू - होता.. समीरचा घोडा वर माळ्यावर ठेवलाय त्यांच्या...
श्री - बर बघू हं.. पुढच्या महिन्या.
गट्टू - आत्ता..
श्री - अरे?? आत्ता मी दमून नाही का आ...
गट्टू - तुम्ही सारखेच दमता.. मला आत्ता रॅकेट..
श्री - हे बघ?? आज तुझी आवडीची भाजी केलीय..
गट्टू - मला नको.. मला रॅकेट..
श्री - वेडा मुलगा आहेस का?? असं नाही करायचं.. हट्ट केला की रागवतात बर का??
गट्टू - मला समीरसारखी रॅकेट हवी.. तो चिडवत होता.. तुझ्याकडे नाहीच्चे रॅकेट म्हणून .. मी म्हणालो आहे..
श्री - असं खोटं नसतं बोलायचं..
गट्टू - चला.. आणू ..
श्री - अरे?? थांब.. हे बघ.. आज तर मी तुझ्यासाठी दोन दोन कॅड..

गट्टूने त्या कॅडबर्‍या घेतल्या अन बाजूला फेकल्या. श्रीने डोळे वटारले तसा तो रडू लागला. मावशी त्याला उचलून घेऊन गेल्या.

पंधरा मिनीटांनी गट्टूचे रडणे थांबल्यावर हताश झालेला श्री मावशींकडे गेला. गट्टू त्याच्याकडे बघतच नव्हता.

मुलाला समज देण्याचे हे वय नव्हते. पण आईविना असलेला मुलगा होता तो. तसेच गरीब बापाचाही होता. त्याला कदाचित समज देणेच योग्य ठरले असते असे श्रीला वाटले..

श्री त्याच्यापुढे बसला. गट्टूने तोंड फिरवले तरी श्री बसून राहिला..

श्री - गट्टू.. रडू नको.. हे बघ.. मी काय सांगतो ते ऐकून घे.. हे बघ? सगळ्यांचे बाबा काम करतात की नाही.. कुणी मोठ्ठे काम करतो.. कुणी साधे.. मग प्रत्येकाला पगार मिळतो.. आणि त्या पगारातून आपण?? आपले घर चालवतो.. खाऊ आणतो.. भाजी आणतो.. हो की नाही?? कुणाकुणाला देव कमी पगार देतो.. कुणाकुणाला जास्त.. मला आत्ता कमी पगार आहे बरं?? त्यामुळे.. आपल्याला काही दिवस रॅकेट आणण्याची वाट पाहावी लागेल की नाही?? एवढे पैसे नाही आहेत आत्ता बाळ.. हो की नाही??

यावर अचानक गंभीर होत गट्टूने उच्चारलेले वाक्य जर वाड्याने ऐकले असते तर तासात कुणी ना कुणी रॅकेट आणली असती.. पण... नेमक्या त्याच वेळेला मावशीही काही कारणाने खाली गेलेल्या होत्या..

गट्टू - समीरकडे आहेच की रॅकेट.. आम्ही दोघे तीच खेळत जाऊ.. गम्मत केली मी.. कॅडबरी द्या की आता

गुलमोहर: 

बेफिकीर,
लगे रहो.
परिस्थीतीमुळे लहान वयात मोठी होणारी मुलं मी पाहिलीत.

होना! कसलं गोडंबं आहे ते पिल्लू!!! शहाणं ते....गट्टूबाळ! Happy आत्ताही डोळ्यातून पाणी यायचं काही राहिलं नाही....

All of the previous stories were grt but I like this the most - typical common peoples life. Can relate to it more better. You r a wonderful writer!!!

बेफिकीर

कादंबरी छान चाललीय. तुमचे लेखन अतिशय वैविध्यपूर्ण आणि रंजक असते.

ह्या भागातील संवादांबाबत मात्र एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की गट्टूच्या तोंडचे संवाद त्याच्या वयाला (दोन वर्षे) विसंगत वाटतात. हे संवाद ६/७ वर्षाच्या मुलाच्या तोंडी ठिक वाटले असते. विशेषतः शेवटचे संवाद खटकतात.

जे जाणवले ते लिहीले आहे, कृपया गैरसमज नसावा.

पुलेशु!

प्रिया

प्रियस,

लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. खरे तर आमच्याकडे सोसायटीतील एक अडीच वर्षांची मुलगी जवळपास रोज खेळायला येते. तीही बोबडेच बोलते. त्यावरून मला ते सुचायला हवे होते. उत्साहाच्या भरात झाले. मला मूलबाळ नसल्यामुळे कदाचित मी हे लेखन करताना अयशस्वी ठरू शकेन. माहीत नाही कथानक मला झेपेल की नाही. आपल्या सगळ्यांचे नुसतेच आभार मानत नाही तर आपल्याकडून चुका लक्षात आणून देण्याची अपेक्षाही आहे व आधारही अपेक्षित आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मला मूलबाळ नसल्यामुळे कदाचित मी हे लेखन करताना अयशस्वी ठरू शकेन.>> तुम्हाला बाळ नसलं म्हणुन काय झालं. तुमच्या कल्पनेतलं बाळ आमच्या सगळ्यांच्या मांडीवर येऊन खेळतय, हसवतय, रडवतय हे काय कमी आहे. त्याला तुम्ही निट वाढवा किमान आमच्यासाठी तरी.

बाकी तुमच्या निरक्षणापुढे आम्ही मुलं बाळं असलेली माणसही खुप लहान आहोत. आम्हाला आजही बाळाचे ते हाव भाव टिपता येत नाही जे तुम्ही टिपलात आण ईथे थेट हृदयात भीडेल अस उतरविलात.

बेफिकिर पुढचा भाग लवकर येऊ दया.