वादळ

Submitted by सुनिल जोग on 19 June, 2010 - 04:54

आरशासमोर शीळ घालत भांग पाडण्याची सवय पीटरच्या इतकी अंगवळणी पडली होती की शीळ आधी की भांग आधी - केंव्हा कुठच्या गाण्याची शीळ वाजवायची हे सारं न ठरवताच सवयीनं आपोआप घडत असे. आज भांग पाडत असतांना केसात डोकावू लागणार्‍या तुरळक रुपेरी कडांकडे त्याचं नकळत लक्ष गेलं आणि त्याच्या स्पोर्टीव्ह मूडने वास्तवावर लँडिंग केलं.
'ज्यो' कोपर्‍यातून हे सारं न्याहळत होती. पीटरची रोजची सकाळी आठची धावपळ, त्याचं शीळ घालणं,केस सारखे करणं आणि शेवटी पर्फ्युमचा मंद स्प्रे झाला की त्याच्या नेकटायची नॉट ठीक ती रोजच्या सवयीनं करणार होती. मग त्याचा निरोप घेतला की तिच्या रोजच्या धावपळीचे रूटीन सुरु होणार होते. पीटरने नेहमीच्या सराईतपणाने पोर्च मधून गाडी बाहेर काढ्ली आणि ड्रायव्हींग करता करता त्याचं मन विचारात गुंतले.

अतिशय खड्तर कष्टातून शिक्षण्,नंतर नोकरी,नोकरीसाठी ठिकठिकाणांची पोस्टीग्ज ! सुरुवातीचे दिवस्,नातेवाईकांनी केलेली अवहेलना,पुण्यात स्थायिक होताना झालेली कुतरओढ -सारं सारं लखखपणांने नजरेसमोर उभं राहिले. नको असलेल्या तड्जोडी करीत आजवर प्रवास इथवर झाला होता.

आणि आज अचानक त्याला 'रीनि' ची आठ्वण झाली. तीस वर्षे होऊन गेली त्या घटनेला. कशी असेल ? कुठे असेल ? की माझ्या आठवणीने झुरत असेल. असंख्य विचारांनी डोक्यात कल्लोळ माजला.त्याने शांतपणाने सिगारेट काढली आणि एक मोठा झुरका मारल्यावर त्याचे डोके ताळ्यावर येऊ लागले.

पीटरचे स्मोकिंग रीनिला अजिबात आवड्त नसे. तिच्या सहवासात असतांना सिगारेट्चा साधा उल्लेखदेखील तिला खपत नसे. म्हणून त्याने स्मोकिंग सोडले होते. या आठ्वणीने त्याला आता हसू आलं त्याचाच सूड म्हणून तर आपण रेग्युलर स्मोकर झालो की काय असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने अभावितपणाने सिगारेट विझवली.

कॉलेज जीवन खड्तर होते.आर्थिक ओढातणीमुळे पुस्तके नाहीत मग लायब्ररीत स्ट्डी,बसचे पैसे वाचवायचे म्हणून सायकल वापरायची. त्यामुळे भुक आणि मग ती मारायची म्हणून चहा-सिगारेट किंवा शेंगदाणे ! परिस्थितीची चीड यायची. त्यामुळे आयुष्याला कडवट्पणा यायचा आणि मग पैसा कसा मिळवायचा या एकाच विषयावर मन केंद्रित व्हायचे. त्यामुळे सहाजिक्च अभ्यासाला चाट. कसंबसं पास व्हायचं. वर्गातील हुशार मुले, मित्र हळहळयाचे -'चांगला मुलगा वाया जाणार की काय ?' त्यांना काय माहीत पोटात काय जळत असायचं? भूक किती वाईट हे अनुभवाविणा कसं कळणार ? आणि त्या सर्वांना हे सारं कोण समजावणार ?

पण रीनि समोर आली के हे सारं वितळून जायचं. एक अनामिक थंड झुळुक शरीरावरून जायची आणि मनाला चंदनाचा लेप लावल्यासारखे वाटायचे.

आपल्या विचारांशी आणि परिस्थितीशी जुळणारी ही मुलगी आपल्याला फिट्ट शोभेल असा विचार त्याच्या मनात यायचा. पण हे सारं तिला कसं समजावणार ? ती होकार देईल का? समजा नकार दिला तर तो पचवणे शक्य आहे का? या विचारांनी त्याचं दुखरं मन माघार घेई. पण रीनिच्या नकळत तिच्याकडे चोरून पाहताना ती देखील आपल्याच कडे पाहत असल्याचा साक्षात्कार त्याला एक दिवस झाला. नजरांची देवाण घेवाण सुरू झाली. कॉलेजच्या 'अ‍ॅन्युअल डे' निमित्ताने त्याने सलगी वाढ्वली. तिनेदेखील प्रतिसाद दिला.
आता गाडी नेहमीच्या वळणावर येउन विवाहाच्या स्टेशनवर स्थिरावणार असं वाटत असतानाच आणि दोघांच्या घरातून अड्सर नसतानादेखील नियतीने आपला डाव साधला. एक श्रीमंत तरूणाकडून रीनिला मागणी आली आणि मग शांतपणाने विचार करून पीटरने माघार घेतली. कारण अद्याप त्याला आर्थिक स्थैर्य आलेलं नव्हतं. त्याने रीनिला त्या तरुणाशी विवाह करण्यास भाग पाड्ले. काळजाला असंख्य नाग डसले. देवदासाप्रमाणे दारु,स्मोकिंग झाले आणि तो फिनिक्स पक्षासारखा राखेतून उठला. पीटरने गोवा सोड्ले आणि तो पुण्यात स्थाईक झाला.

सुदैवाने पत्नी ' ज्यो' सुशील आणि संसारद्क्ष मिळाली आणि साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण झाली. पण... पण आता सुखाला जाग आली असली तरी भूतकाळ अस्वस्थ करू लागला. वयाची गाडी उताराला लागली की माणसाचं मन नोस्टॉल्जिक होते. बर्‍याच वर्षांनी रीनिची आठ्वण आज त्याला आली. अलीकडे ती वारंवार येत असे. कशी असेल ? कुठे असेल? असंख्य नाग वळवळत होते. तो अधुनमधून अस्वस्थ होत असे.

'ज्यो' च्या नजरेतून ही बाब सुटली नाही. पण तिच्यामागचं कारण तिला माहीत नव्हते.

बर्‍याच दिवसानी पीटरने आपल्या गावी जाण्याची इछा व्यक्त केली. कदाचित भूतकाळाची ओढ त्याला जाणवत असावी. त्याने डायनिंग टेबलावर ही घोषणा जाहीर केली तेंव्हा सर्वानाच आश्चर्य वाटले. पीटर एकटाच गोव्याला आठवडाभर जाणार होता. सर्वानाच हा बदल जाणवला. त्यानी आपआपसामधे नेत्रपलव्वी केली पण 'ज्यो' ने त्याना नजरेनेच दटावले.

पीटर फ्लाईट्ने गोव्यात पोचला. गावाकडे बर्‍याच वर्षानी परतल्यावर जुने घर पाहण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला. त्याचे अपार्ट्मेंट झाले होते. पूर्वीचे अरुंद रस्ते आता रुंद आणि गुळगुळीत झाले होते. त्याने लॉजवर चेकिन केले तसे मॅनेजरने ला विचारले - ' कुठुन आलात ? कुठे जाणार ?' आपल्याच गावात हे प्रश्न त्याला अनपेक्षित होते. इथे पहिला धक्का बसला. नव्या पिढीला त्याची ओळख नव्हती. जुने सखेसोबती पोटापाण्यासाठी विखुरले होते. जे काही होते त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. काही स्थानिक उपलब्ध होते पण ते त्याच्याशी मनोमिलन करुन घेण्यास फारसे उत्सुक नव्हते. काळ बराच पुढे गेला होता.

शेवटी एखाद्या मजनूप्रमाणे पीटरने गावाचा सारा परिसर पिंजुन काढला. रीनिचा ठावठिकाणा कुठे लागतो का या शोधात तो फिरला. शेवटी एक आशेचा किरण सापडला. त्याचा जुना शाळासोबती अँटनी चर्चमधे भेट्ला. त्याच्याकडे आडून आडून चवकशी केल्यावर रीनि पणजीतच संसारात रमल्याचे त्याल कळले. त्याने पणजीकडे प्रयाण केले आणि एक स्थानिक चर्च मधे तिचा दुरुनच ठाव घेतला. बर्‍याच वर्षानंतर काळजात तरूणाईची धडधड, हातापायाला कापरं आणि तळवे ओलसर अनुभवायला आले. आपण हा अनुभव किती वर्षे विसरलो होतो याची त्याला जाणीव झाली. या आठवणीने त्याला सुखद वाट्ले. त्याने पाठीमागच्या बाकावरून्च रीनिचे निरीक्षण केले. केसांवर रुपेरी कडा,देहात स्थूलता आणि सुस्थिती मधली संसाराची सारी लेणी तिच्या देहावर दिसत होती. दातांची ठेवण पुढे येउ पहात होती. शरीर बेढबपणाकडे झुकू लागले होते. तिला या स्थितीत पहावे लागेल अशी पुसट देखिल कल्पना तरुणपणात कधीही का आली नाही याचे त्याला कोडे पड्ले.तो चपापला. प्रार्थना संपल्यावर पीटर मुद्दामच रेंगाळला. रीनिच्या नजरेच्या टप्प्यात यायचे पण हे सारे अचानक घडले आहे असे भासवण्याचा त्याचा बेत होता. रीनि आपल्याच नादात पुढे चालली होती. तिचे अनावधानाने पीटरकडे लक्ष गेले पण पीटरच्या सुखवस्तुदेहातील बदलांमुळे तिने त्याला ओळखले नाही. पण प्रत्यक्ष नजरानजर झाल्यावर मात्र ती स्वतःच्या नकळत थबकली. पीटरदेखील दोन पावले पुढे आला.
" यू आर पीटर नो"? तिने प्रश्न केला
'ओ! या ! आर यू रीनि ?" पीटर
' व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज?"
" कसॉ ऑसॉत? बरा हाय ना रे तू?' रीनि
' तू कशी? सारे सुशेगात?" पीटर

मग गप्पा झाल्या. रीनिने त्याला पुढच्या दिवशी घरी चहाला बोलावले. घरी गेल्यावर पीटरने परिस्थितीचा अंदाज घेतला. एका सुखवस्तु संसाराचे छानदार चित्र, सभ्य नवरा,कुठेच काही खोट नाही. पीटरने स्नॅक्स घेतले आणि खुशालीच्या गप्पा मारून निरोप घेतला. भूतकाळाचा पुर्नरुच्चार न करण्याचा जणू दोघानी विडाच घेतला होता.

पीटर रुमवर परतला. पण तो मनात अस्वस्थ होता. रीनि खरंच सुखी असेल का? माझ्याशिवाय तिचा संसार सुखाचा असेल का? तिला माझी आठवण येत असेल का? तसं असेल तर तिने तसं बोलून का दाखवले नाही की ती खरंच मला विसरली असेल? विचारांचे असंख्य कावळे त्याला टोचा मारु लागले. त्याने एक लार्ज व्हिस्की पेग घेतला. डोके बधीर झाले तसे त्याला बरे वाटले.

तो सकाळी समुद्रावर गेला. अद्याप किनार्‍यावर फारशी वर्दळ नव्हती. वाळूत एकटाच रेघोट्या मारत बसला. आपले सुख,प्रतिष्ठा रीनिला दाखवण्यासाठी तर आपण येथवर आलो नाही ना असा एक कडवट विचार त्याच्या मनात आला. आणि म्हणूनच तिने आपली दखल घेतली नसावी म्हणून आपण खट्टू झालो असे त्याला वाटले.

आणि तसं जर नसेल तर आपल्याला कितिदा तिची आठवण येते? तिलादेखील माझ्यासारखेच वाट्त असेल का? की मी तिला विसरलो.

संध्याकाळी तो रीनिच्या घरी बुके घेउन गेला. तिने रीतिनुसार स्वागत केले. ड्रिंक्स दिली. निरोप घेताना पीटर म्हणाला " रीनि उद्याच्या फ्लाईटने मी परत जातोय!"
'हो का" म्हणत रीनिने आवरायला सुरुवात केली.
'पुण्याला या सारेजण" पीटर
'छे रे, एव्ह्ढ्या धावपळीत वेळ कुठे असतो" रीनि
तिने अगदी सहजपणाने विषय टाळला किंवा कदाचित तिच्या तो लक्षातदेखील आला नसावा. इतकी ती संसारात रमली होती. पीटर हिरमुसला. काळजात कुठेतरी सूक्ष्म कळ आली. तो पराभूत योद्यासारखा माघारी वळला.
प्लेनच्या खिड्कीतून त्याने बाहेर नजर टाकली. आकाश निरभ्र आणि शांत वाट्त होते. मनाला आल्हाददायक वाटले. वाट्ळ स्थिरावत होते. फ्लाईट लँड झाली. मनावरचे द्ड्पण दूर झाल्यासारखे तो घरी परतला. त्याच्या चेहर्‍यावरील हसरी छटा परत माघारी आली. मनावरचे दड्पण दूर झाल्याप्रमाणे तो घरी परतला. लाउंजमधल्या आरशात ती ओळखीची खूण पाहून तो खूश झाला. घरी आल्यावर 'ज्यो' नं हा बदल अचूक टिपला.
रात्री गळ्यात हात टाकत 'ज्यो' ने त्याला विचारले
'कसा आहेस पीटर?" 'रागावलास"
पीटर स्तब्ध झाला. एखाद्या लहान निरागस मुलाप्रमाणे तो तिच्या मिठीत विसावला.
सकाळ प्रसन्नपणे उगवली आणि दिवस पुढे सरकू लागले.

गुलमोहर: 

किती सुंदर कथा लिहीली आहे जोगसाहेब तुम्ही ? गोव्याची संस्कृती, पीटरच्या भावना, वाढत्या वयातले शारिरीक, मानसिक बदल याच यथार्थ चित्रण उभ केलय. तुम्ही याही पेक्षा उत्तम लिहु शकता. पुलेशु.

परफेक्ट!!! आपल्या वेळचे सवंगडीही आता प्रौढत्वाकडे झुकू लागलेले दिसले की माणूस आपोआप स्वतःचे प्रौढत्व स्वीकारतो.

मस्त