श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 22 June, 2010 - 01:31

आईविना असलेल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला कुणाला शुद्ध आनंद मिळणार? पण तरीही उषाताई अन श्रीची आई, तारा अन तिचे पती, ताराच्या आई असे सगळे जण आलेले होते. दास्ताने वाडा निरागसपणे सजत आनंदीत होत होता. मात्र रमाच्या फोटोसमोर गेल्यावर प्रत्येकाला गलबलत होते.

गट्टू रांगून रांगून थकला आणि शेवटी एका खुर्चीच्या आधाराने उभा राहिला तेव्हा काही दिवसांपुर्वीची दुपारची वेळ होती. मावशी त्याला खेळवत होत्या आणि नेमके त्या वेळी मात्र कुणीच तिथे नव्हते दोघांशिवाय! आणि मावशींनी ते दृष्य पाहिले आणि जितका आनंद रमाला झाला असता कदाचित तितकाच आनंद त्यांनाही झाला. त्या अक्षरशः ओरडतच बाहेर आल्या.

"गट्टू उभा राहिलाय"

नुकतेच उभे वगैरे राहण्याचा अनुभव असलेली सीनियर राजश्रीसुद्धा पळाली. ही गर्दी उडाली मावशींच्या खोलीत!

"गट्टू उभा राहिला... आम्ही नाही पाहिला"

एकच गदारोळ! त्या बिचार्‍याला समजेना की माझी चूक काय झाली. तो काही उभा राहीना. मग त्याला उगीचच हाताने उभा कर्न एकदोनदा अलगद सोडून पाहिले पाचव्या वेळी महाराज गेले कित्येक वर्षे उभेच आहेत अशा थाटात उभे राहिले आणि टाळ्या वाजल्यावर आवाजाला घाबरून बुदूककन खाली बसले. हशा पिकला. पण सायंकाळी श्रीनिवास येईपर्यंत 'उभे राहणे ' या नव्या उपलब्धतेचा चटका लागलेले गट्टूराव बर्‍याचदा उभे राहिले आणि आपण ही क्रिया केल्याचा इतर जनतेला आनंद झालेला आहे इतके ते समजू लागले.

श्रीनिवासने पटकन गट्टूला उचलून आपल्या खोलीत नेले आणि रमाच्या फोटोसमोर त्याला कडेवर घेऊन तिच्या डोळ्यांकडे पाहात मनात म्हणाला..

"रमा.. आपला महेश उभा राहू लागला .. बघ.. एक वर्ष व्हायच्या आधीच उभा राहायला लागला.. आहेस तू आसपास?? बघतीयस ना?? मला नाही गं विशेष जमत त्याचं करायला.. काम पण असतंच रोजचं .. शेवटी .. आई ती.. आईच.. पण.. तरीही.. सगळ्या वाड्याने मिळून आम्हाला दोघांना इथपर्यंत आणलंय.. आता.. तू फक्त बघत राहा रमा.. आपल्या महेशला मी असा हुषार बनवतो... असा कर्तबगार बनवतो की बघ.. फक्त.. कुठूनतरी .. आमच्याकडे लक्ष दे गं रमा.. फक्त लक्ष ठेव.. "

मानेकाकांनी पाठीवर हात ठेवला ही जाणीव जशी झाली.. पटकन गट्टूला खाली ठेवून श्रीनिवास मानेकाकांना मिठी मारून मूकपणे स्फुंदला.. पवार मावशी पुन्हा खिन्न झाल्या होत्या.. त्या गट्टूला गोंजारून आपल्या खोलीत जायला निघाल्या.. माने काका पुन्हा सगळ्यांदेखत ओरडले..

मानेकाका - चाललीय बघा कशी.. जसा काही संबंधच नाही.. वर्ष होत आलं ही बाई गट्टूची आई करणार नाही इतकं करतीय?? आणि श्रीनिवास?? तू मला मिठी मारतोस?? पाया पड नालायका या माउलीच्या.. मी काय म्हणतो चितळे.. वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी.. मावशींचा सत्कार दास्ताने वाड्याने करावा असा मी प्रस्ताव मांडत आहे...

चितळे - दास्ताने वाड्याच्या वतीने मी या प्रस्तावाला अनुमोदन देत आहे..

प्रचंड टाळ्या वाजल्या..

हे संवाद चाललेले असताना श्रीनिवास मावशींसमोर जाऊन खालमानेने उभा होता...

मावशी - भरले याचे कान.. घातली खाली मान.. का रे? दाराला दार लागून आहे आणि तोंडातून शब्द फुटत नाही का रे भुता? आं?? हिरवी नऊवारी पाहिजे मला.. तुझ्या मुलाला तान्ह्याचा चालता केला याची.. म्हणजे मग उपकार फिटले.. हो की नाही माने?? सगळंच पैशात मोजतो हा माने.. याला हाकला पहिला वाड्यातून.. हा माझा प्रस्ताव आहे.. दे रे चितळे अनुमोदन आता...

मावशींचे बोलणे पूर्ण व्हायच्या कितीतरी आधी श्रीनिवासने चक्क त्यांच्या पाउलांवर डोके टेकलेले होते.. तरीही त्या बोलतच होत्या.. श्रीनिवासच्या गरम अश्रूंनी पावले भिजली तसे त्यांनी त्याला उठवले..

मावशी - पुरुषासारखा पुरुष अन रडतोस?? पाहता पाहता हे कार्ट नोकरीला लागेल अन सून आणेल.. तेव्हा मी नसेन हो?? पण.. आत्ता आहेच की मी.. रडायच कसलं?? मी.. मी आयुष्यात.... एकदाही.. नाही रडले श्रीनिवास..

बोलताना त्या इतक्या लगबगीत स्वतःच्या घरात निघून गेल्या की त्यांचे शेवटचे शब्द त्याम्नी आतून दार लावतानाच उच्चारले.

पंधरा दिवसांवर वर्षाचा वाढदिवस होता. कंपनीतले दहा जण, दोन्हीकडचे मिळून एकंदर दहा नातेवाईक आणि दास्ताने वाड्यातील पंचवीस जण अन आजूबाजूचे दैनंदिन ओळखीचे सहा जण असे एकंदर पन्नस, एक्कावन्न पान होते. कंत्राट दिले होते सान्यांना! पाने वाड्याच्या आतल्या चौकातच बसवली गेली. नुसता धिंगाणा चाललेला होता. गट्टू वाट्टेल तिथे फिरत होता. त्याला कुणीही उचलत होते. रमाचा चौकात ठेवलेला फोटो पाहून सगळेच गलबलत होते. गट्टूला अभूतपुर्व भेटी आल्या होत्या. आज तो राजपुत्राहून कमी दिसत नव्हता. श्रीनिवासनेही वाड्यातील सगळ्या मुलांना काही ना काही आणलेले होते. घाटे, निगडे, प्रमिला, मधूसूदन, चितळे आणि माने काकांना विशेष भेटी आणलेल्या होत्या. पवार मावशींना एक हिरवे नऊवारी आणि वर एक वळं आणलेलं होतं! सगळेच खुष होते.

पक्वान्नाचे जेवण जेवून सगळे वामकुक्षी घेत होते. उषाताई, आई, तारा, तिचे पती आणि ताराची आई हे गेल्या तीन दिवसांपासून येथेच आलेले असल्यामुळे आज संध्याकाळी निघणार होते.

ते निघताना ताराची आई पुन्हा दु:खी झाली. तिला तिच्या जावयाने धीर दिला. उषाताईने मागचा सगळा प्रसंग विसरून पवार मावशींना जवळ घेतले.

मावशी - नाटकं करू नका.. दोघीच राहताय.. मुलाकडे येऊन राहायला काय झालं?? तुमच्या घराण्यातल्या दिवट्यांना सांभाळण्याचा मी मक्ता घेतलाय का?? आं?? यांचे कुलदिपक फडफडणार आणि आम्ही इथे तडफडणार?? हे काय हे??

ताराचा पती ते वक्तव्य ऐकून हतबुद्ध झालेला असतानाच उषाताई मावशींना हसतमुखाने म्हणाली..

उषाताई - हक्काने सोडलय भाच्याला तुमच्या दारात.. म्हणत असाल तर येऊन राहते इथे.. पण आईला इथे करमत नाही.. तिची सगळी जुनी माणसं तिथे आहेत.. त्यामुळे त्यांच्यातच तिला राहायचं असतं.. आईसाठी मी तिथे राहते.. येऊ का दोघी??

मावशी - पाय ठेवलात वाड्यात तर बघा.. निघा आता.. गाडीची वेळ झाली..

हसत हसत उषाताई आईला घेऊन निघाली. सगळेच निघाले तसा श्रीनिवास पुन्हा हळवा झाला. तेव्हा मानेकाका म्हणाले..

मानेकाका - या रडक्यालाही घेऊन जा कर्‍हाडला.. पोरी बर्‍या असा रडत बसतो..

श्रीनिवास अन सगळेच हसायला लागले.

आजपासून 'श्रीनिवास पेंढारकर - एक बाप' या कथेला सुरुवात झालेली होती...

कारण आजपासून.. गट्टू उर्फ महेश श्रीनिवास पेंढारकर हे रात्रीचे स्वतःच्या घरी झोपायला लागणार होते.. फक्त दिवसा मावशींकडे.. आणि पवार मावशींची सक्त ताकीद होती.. रात्रीतून किमान एकदा तरी येऊन सांगायलाच पाहिजे.. बाळ व्यवस्थित झोपलंय की नाही ते..

त्या रात्री दिवसभराच्या दगदगीने श्रीनिवास अन वाड्यातील सगळेच नाहीत तर खुद्द गट्टूही दमला होता. पण तो अजूनही हुंदडत होताच. शेवटी त्याला उचलून श्रीनिवासने पाळण्यात झोपवले. अजून गट्टू टुकूटुकू बघत जागाच होता.

श्री - चला.. गाई करायची बर का गट्टू आता? खूप दमलो आपण.. काय काय खाऊ खाल्लास?

गट्टू - ग्गो..

श्री - गोळी खाल्लीस ना? सारख्या गोळ्या खाल्ल्या की?? दात होतात खराब.. हे आपलं घर बर का?? हे?? गट्टूचं घर.. आणि हे गट्टूचं पांघरूण.. हे गट्टूचं बदक.. कसं बघतंय बघ?? हां.. फेकायचं नाही... मग ते रडतं बर का? बघ.. किती छान आहे.. आणि हे काय आहे रे?? अरे व्वा?? हे बदकाचं बाळ.. गट्टूशी खेळतं की नाही.. आता पाळणा हलणार बर का?? आता आमचे गट्टू महाराज?? गाई करणार...

एक तास झाला श्रीनिवासची बडबड चालू होती. एक तासाने पाळण्याच्या झोक्यांमुळे गुंगी आलेला गट्टू झोपून गेला. श्रीनिवासने दार उघडून या घटनेची वर्दी द्यायला मावशींकडे जायचं ठरवलं अन बघतो तर मावशी बाहेरच...

श्रीनिवास - काय हो??
मावशी - झोपला का दाणगट??
श्रीनिवास - आत्ताच..
मावशी - मग तू काय फिरायला निघालायस का?
श्रीनिवास - छे? तुम्हाला सांगायला आलोय..
मावशी - मला काय सांगायचंय?? दोन वाजता उठेल परत.. तेव्हा कळव म्हणजे झालं..

श्रीनिवासने मान डोलावून दार लावून घेतलं! गट्टूकडे एकदा अन रमाच्या फोटोकडे एकदा नजर टाकून तो पलंगावर पडला. आज त्या घराला काय पण स्वरूप आलं होतं! शेजारी छोटासा गट्टू पाळण्यात निरागसपणे झोपलेला. एकीकडे रमाचा फोटो! आणि मधे श्रीनिवास पेंढारकर - एक बाप!

विचारात असतानाच कधीतरी नकळत झोप लागली ती आवाजानेच उघडली. पहिल्यांदा श्रीनिवास मनातच चिडला. पण हा आवाज आपल्या बाळाचा आहे म्हंटल्यावर पटकन उठला. दुधाची बाटली त्याच्या तोंडाला लावून अगदी हलका झोका देत लाडाने म्हणाला..

श्री - काय गट्टू महाराज?? वाट्टेल तेव्हा काय उठता? आं? बापाला नोकरी असते दुसर्‍या दिवशी.. तुमच्यासारखं नाही.. वाटेल तेव्हा उठले, वाटेल तेव्हा झोपले.. दोन वाजलेत दोन रात्रीचे.. ही काय वेळ झाली उठण्याची?? .. समीरदादासुद्धा गाई करतोय.. राजश्रीताईसुद्धा गाई करतीय.. हे बघ.. बदकाचं पिल्लू पण झोपलंय.. आणि तुम्ही जागेच?? असं नाही काही वाटेल तेव्हा उठायचं??

पंधरा मिनीटे झाली तरी गट्टू झोपेना. इतक्या रात्री मावशींना उठवणे चांगले नाही म्हणून बराच वेळ श्रीनिवास त्याच्याशी बोलत त्याला झोका देत बसून राहिला. कधीतरी पहाटे सव्वातीनला गट्टू झोपला.

आज जरा जास्तच झोप लागली. सकाळी पावणेसहाच्या ऐवजी सव्वा सहाला जाग आली. खाडकन उठून पाहिले तर गट्टू झोपेतच होता. श्रीनिवासने हलकेच त्याच्या चेहर्‍यावरून प्रेमाने हात फिरवला. आणि दूध आले असेल म्हणून दार उघडले तर...

आपला बिछाना घालून रात्रभर पवार मावशी तिथे.. बसून होत्या.. एक क्षणही झोपलेल्या नव्हत्या....

मावशी - का रे भटुरड्या?? लाज नाही वाटत तंगड्या पसरून झोपायला? एका दिवसात मावशी दुरावली का?? आता पुन्हा दार वाजवून बघच माझं.. नाही हाकलून दिला तुला तर बघ.. राब राब राबले अन नाव माझे कापले?? घेऊन टाक तुझी तुला ती नऊवारी... सत्कार करतायत..

श्रीनिवास - अहो.. तुम्ही..

मावशी - तुम्ही काय तुम्ही? आत्ता उठेल बघ तो अर्ध्या तासात... आज मी आंघोळच घालणार नाही त्याला..

मावशींकडे थक्क होऊन बघत असलेल्या श्रीनिवासने आत येऊन दूध गॅसवर ठेवले. मावशींचा आणि स्वतःचा चहा ठेवला. आणि दहा मिनिटांनी चहा द्यायला मावशींकडे गेला तेव्हा त्या गट्टुच्या आंघोळीची तयारी करत होत्या.

श्रीनिवास - चहा घ्या.. किती करता तुम्ही?? का जागलात रात्रभर??
मावशी - कप इथे ठेवायचा अन कण्णी कापायची.. अक्कल शिकवलीस तर सात पिढ्यांचा उद्धार होईल...

मुकाटपणे परत आलेला श्रीनिवास बघतो तर पाळण्यातला गट्टू त्याच्याकडे बघून मिश्कील हसत होता.

श्रीनिवास - च्यायला.. मी बाप आहे का नाही कुणास ठाऊक?? यालाही ती मावशीच पाहिजे..

बापाचे हे लटक्या रागातील बोल ऐकून गट्टू पुन्हा हसायला लागला.

श्रीनिवास - आज संध्याकाळी येताना मी चॉकलेट आणणारच नाहीये.. सांग आजीलाच चॉकलेट द्यायला.. काय??

गट्टू - ह... ह..

श्रीनिवास - ह ह काय?? तुलाही तेच पाहिजे.. उठा.. चला स्नानाला महाराज.. उटणे घेऊन तयार आहेत सेवक.. ई.. ओ मावशी.. याने शू केलीय..

मावशी धावत आल्या..

मावशी - तू काय करायचास या वयात?? ई काय?? दे इकडे... आणि तू तुझं आवर.. मला व्यत्यय आणू नकोस.. चला गट्टू.. बाबांना टाटा करा... आता आपली भेट संध्याकाळी..
श्रीनिवास - का?? आत्ता ऑफीसला जाताना येऊन जाईन की तुमच्याकडे..
मावशी - अरे?.. याला ताप आलाय श्रीनिवास.. जा डॉक्टरना घेऊन ये..

श्रीनिवास गट्टूच्या अंगाला हात लावून डॉक्टरकदे धावला. खरे बापपण आता सुरू होत होते.

वीस मिनिटांनी डॉक्टर आले. तोपर्यंत वाडा श्रीनिवासच्या खोलीत एकत्र झाला होता.

डॉ - इन्फेक्शन आहे.. आई कुठे आहे याची?
श्री - अंहं.. शी इज.. नो मोअर..
डॉ - ओह.. मग..
श्री - या मावशी बघतात..
डॉ - आत्ता हे चाटवा.. दुपारी पुन्हा घेऊन या

डॉक्टर निघून गेल्यावर श्रीनिवासने संजय नावाच्या मुलाला बसस्टॉपवर जाऊन कोपरकर काकांना 'आज पेंढारकर काका येणार नाहीत' असा निरोप द्यायला सांगीतले. तो धावला. मानेकाका म्हणाले..

मानेकाका - स्वतःच घर सोसलं नाही बहुतेक..

सगळेच हसले. श्रीनिवास किंचित काळजीतच होता अजून!

श्रीनिवास - मावशी... काही दिवस ताईला..

मावशी - छे.. मला काय धाड भरलीय.. तूही रजा घेऊ नकोस.. या वयात असलं होतंच..

बरेच दिवस मावशींचे कौतूक पाहात असलेल्या अन गट्टूवरचा स्वतचा हक्क गेल्यामुळे नाराज झालेल्या निगडेकाकू म्हणाल्या..

निगडेकाकू - ही अशी बोलतीय जशी काही पाच बाळंतपणे झालीयत.. आणा इकडे... मी सांभाळून बरा करते गट्टूला..

चितळे आजोबा आज पहिल्यांदाच ओरडले..

चितळे - निगडे बाई.. पवार मावशींनी स्वत:च्या मुलाचं केलं नसतं इतकं करतायत त्या.. असं बोलत जाऊ नका तुम्ही त्यांना..

आणि हताश स्वरात खिन्न झालेल्या पवार मावशी म्हणाल्या..

मावशी - म्हणतीय ते काही खोटं नाही.. माझं.. एकही बाळंतपण नाही होऊ शकलं..

चोवीस तास कर्णकर्कश्श आवाजात ओरडणार्‍या पवार मावशींना दास्ताने वाडा आज ...

गट्टूला निगडेकाकूंकडे सुपूर्द करत रडत स्वत:च्या घरी जाताना बघत होता...

गुलमोहर: 

अहो राव तुम्हि शप्पथ खाली आहेत का कि रोज आम्हाला रडवणार अशी.
आजही रडवलात.
खरच माझा आणि पवार काकुन्चा स्वभाव अगदी मिळता जुळता आहे.
आम्हाला मनातुनच रडता येत. कोणासमोर रडुन आम्ही त्रास व्यक्त करु शकत नाहेत.
मनातुन रडणार्‍या माणसाच प्रेम कधीच कोणी समजु शकत नाही हेच खरे.
लेख भन्नाट आहे.
पु.ले.शु.

<<अहो राव तुम्हि शप्पथ खाली आहेत का कि रोज आम्हाला रडवणार अशी.>> खरच..

पण सांगू का या रडण्यातही वेगळीच मजा आहे Happy

आजही रडवलंत.>> खरंय...
मनातुन रडणार्‍या माणसाच प्रेम कधीच कोणी समजु शकत नाही >> तृष्णा, जोडीदार हा प्राणी तेवढ्यासाठीच असतो बाई! समजून घेण्यासाठी ! Happy

पवार मावशींना पाहून /इमॅजिन करून जुन्या सिनेमातल्या ललिती पवार यांची मिसेस डीसा च्या भूमिकेची आठवण झाली Happy
बाकी कथानक एकदम मस्त.. तुमच्यामुळे कादंबरी वाचायची सवय लागली

मस्त मूड लागलाय कथेचा........ संपूच नय्रे असे वाटते अन प्रकरण संपून जाते... असो....

डॉ.कैलास

खुप छान लिहिलंय...
निगडेकाकूंनी पवारमावशींचा वीकपॉईंट पकडला तर... नाहीतर सगळ्यांना इतके बोलणार्‍या पवारमावशी अशा रडल्या नसत्या आज! Sad