"गर्दनच उडवलीया धाकल्या राजांनी ... वैनीसायबांची.....! त्येंच्यासाठी खायाला खिर करत व्हत्या वैनीसायेब, अचानक माणिकरावराजांनी कोपर्यातली इळी उचलली आन वैनीसायबांच्या मानंवरच घाव घातला की..........! वैनीसायेब जागच्या जागेवर ..............!"
सुभेदार वेगाने आतल्या खोलीत धावले.
त्यांच्या पत्नी, वाड्याच्या वैनीसाहेब रक्तबंबाळ अवस्थेत स्वयंपाकघरात पडल्या होत्या, त्यांची अर्धवट तुटलेली मान एका बाजुला लोंबत होती. आणि अकरा-बारा वर्षाचे माणिकराव त्यांच्या मृत कलेवराला मिठी मारुन टाहो फोडीत होते................
"माणिकराव...., राजा काय केलंसा हे?"
"मी काय केलं? मी पाहयलं तेव्हा आज्जी अशा हितं पडली व्हती. त्यांच्या मानेतून रगत येत व्हतं. त्ये बगिटलं आन मला भोवळच आली. आसं कसं झालं वो आबासाहेब? आज्जीला काय झालं?"
समोरचं अकरा वर्षाचं लेकरू निरागसपणे विचारत होतं, ते बघून सुभानरावांच्या काळजात तटकन तुटलं. एकीकडे बायको गमावलेली आणि दुसरीकडं हे निरागस लेकरू...
"मगापास्नं आसंच इच्यारत्याती धाकलं राजं. माज्या डोल्यासमुर त्येनीच..."
घाबरीघुबरी झालेली गंगी सांगत होती.
"गप ए, थोबाड बंद ठिव तुझं. पर काय झालया त्याला? लागीर तर न्हवं?"
सुभानराव स्वतःशीच पुटपुटले.
"मलाबी तसंच वाटतया, सरकार. आवो माज्या डोल्यासमोर धाकल्या राजांनी इळी...............!"
"चुप म्हणलं ना, थोबाड बंद कर तुझं...! यातलं कायबी भायेर कुणालाबी कळलं नाय पायजे. जा त्या शिरप्याला पाठवून द्ये आमच्याकडं. कोण आहे रे तिकडं?"
सुभेदार परत सदरेवर आले. शिरपा सदरेवर खालमानेनं हात जोडून उभा होता.
"शिरप्या, हितं काय झालं त्ये भायेर कुणालाबी कळायला नाय पायजेल. गुमान जावून त्या जगन्नाथ गुरवाला बलवून आणजा मागल्या दारानं. ह्ये कायतरी भयानक हाय. भायेरचं हाय. आन त्या गुरवाला सांगावा दिवून तसाच फुडं म्हारवड्यावर जा. ततं ती शांतू म्हारीण आसंल. तिला सांग आमी बलिवलय लगुलग म्हणुन. न्हायतर आसं करंनास का, तिला पाठीशी घालुनच घिवून ये. आमाला नाय वाटत, ह्ये एकट्या गुरवाच्यान व्हईल म्हुन. जा बिगीबिगी घिवुन ये शांतूला."
"सरकार... शांतू...?" शिरप्या क्षणभर घुटमळला आणि लगेच घोडीकडे पळाला. त्याला माहित होतं कि सुभेदारांनी असा आदेश दिलाय म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असणार. नाहीतर ज्या शांतूला गावाबाहेर काढलं तिलाच वाड्यावर आणण्याचा आदेश दिला नसता त्यांनी.
सुभेदारांचा अंदाज बरोबर ठरला, जगन्नाथाला काहीच बोध झाला नाही. तो नुसता भांबावल्यासारख्या वैनीसाहेबांच्या प्रेताकडे पाहतच राहीला.
"जोहार मायबाप्..जोहार...............!"
दिंडी दरवाज्यातून आवाज आला तसा सुभेदारांनी तिकडे पाहीलं. दिंडी दरवाज्यात शांतू महारीण उभी होती. सुभेदारांनी तिच्याकडे बघताच तिने तिथुनच जमीनीला डोकं टेकवून नमस्कार केला.
"शिरप्या, तिला आत घेवून ये."
"सरकार, माजी हिच जागा हाय. मी हितंच बरी हाय, आवो म्हार हाय म्या."
"शांतू, तुला गावाबाहेर काढली ती तु म्हार हायीस म्हुन नाय, तर तु ते चेटूक्-बिटूक करतीस म्हुन. महाराजांच्या राज्यात आमी फकस्त मान्साची जात मानतो, बाकी कुटलीबी न्हाय. आज तुला बलिवलय त्ये हितं तुजंच काम हाये म्हुन. आत ये आन बघ तुला काय कळतय का त्ये?"
सुभेदारांनी तिला जाणीव दिली तशी शांतू दबकत दबकतच वाड्याच्या दरवाज्यातून आत आली.
आत आली आणि.....
सहस्त्र इंगळ्या डसल्यासारख्या वेदना झाल्या तिला. मस्तकातुन कळ उठली. चेहरा वेडावाकडा झाला. सुभेदार आश्चर्याने तिच्या चेहर्यावर होणारे बदल बघत होते. तेवढ्यात माजघराचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि तणतणत माणिकराव बाहेर आले. त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि सुभेदार चरकलेच. माणिकरावांचा चेहरा विस्तवासारखा धगधगत होता.
"शांते, तु यामध्ये पडु नगं. मरायचं नसंल तर आली तशीच परत जा. फुकाट मरशील."
शांतु कमालीची घाबरली.
"सरकार, ह्ये लै मोटं हाय. माज्या ताकदीभायेरचं हाये. पर तुमी हक्कानं बलिवलं हाय तर मी अशी परत जानार न्हाय. आज हितंच आविष्य सपलं तरी चालंल पर ही शांतु आपली समदी ताकद लावल. माजं सामान त्येवडं उंबर्यापाशी ठिवलं हाये, तेवडं घिवून येते. "
असं म्हणुन शांतु मागे वळली आणि वळता वळता दारात येवुन उभ्या राहीलेल्या माणसाशी तिची टक्कर होता होता वाचली. पण त्याला तिचा पुसटसा स्पर्ष झालाच तशी ती घाबरली.
"मापी करा म्हाराज. चुकून लागला ढका. म्या मुद्दाम न्हायी शिवले तुमास्नी."
अंगणात एक सहा फुटी, काशाय वस्त्रे घातलेला संन्यासी उभा होता. अंगात कफनी, काखेत दंड, पायात खडावा, कपाळावर गंधाचा टिळा आणि ओठांवर प्रसन्न हास्य.
"आणि जर लावलाच असेल मुद्दाम हात तरी काय झालं माऊली. अहो, तुम्ही, मी सगळे त्या परमेश्वराचीच लेकरे आहोत. माऊलीच्या स्पर्शाचा लेकराला कसला आलाय त्रास? अहो प्रभु रामचंद्रानं जिथं कुठला भेद केला नाही तिथं तुम्ही आम्ही कोण लागुन गेलो? पण तुम्ही त्रस्त दिसता माऊली. काही समस्या?"
शांतुने वळुन सुभेदारांकडे पाहिलं. तोवर सुभेदार पुढे दारापर्यंत आले होते.
"कुटनं आले म्हणायचे म्हाराज. या आत या ना?"
"आम्ही सज्जनगडाचे रहिवासी. समर्थांचा आदेश आहे की महाराष्ट्री फिरत राहा, लोक जागृती करत राहा... माऊलींचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य. सदगुरू नेतील तिथे फिरत असतो. आज आपल्या ग्रामी यायचा आदेश झाला आणि पावले इकडे वळली, असो..., या क्षुद्र देहाला सदानंद रामदासी म्हणतात...! समर्थ रामदास स्वामींचे शिष्य श्री कल्याणस्वामींच्या शिष्यगणापैकी एक. आपण चिंतेत दिसता सुभेदार. अहो सगळी चिंता त्या रामरायावर सोडा आणि निर्धास्तपणे म्हणा...
"जय जय रघुवीर समर्थ!"
बोलता बोलता सदानंद रामदासी उंबरठा ओलांडून आत आले, आत येताच त्यांना ती जाणीव झाली.
"अच्छा म्हणजे असं आहे तर. म्हणुन आमची माऊली चिंतीत होती तर......, तरीच म्हणलं आज सकाळी सकाळी मारुतीरायानं दासाला या गावात यायची कशी बुद्धी दिली. जय जय रघूवीर समर्थ."
"खबरदार गोसावड्या, एक पाऊल पुढं आलास तर राख करुन टाकीन." माणिकराव ओरडले. सदानंद तसेच पुढे सरकले....
तसे माणिकरावांनी त्यांच्याकडे रोखुन पाहीले, सदानंदांच्या पायापासुन डोक्यापर्यंत एकच वेदनेची तिणिक उठली, तसे क्षणभर सदानंदही चमकले.
"मारुतीराया, हे काय आहे ? तुझ्या भक्ताला सुद्धा त्रास द्यायची ताकद कुणामध्ये आहे?"
"अरे हट क्षुद्र मानवा, तुझ्यासारखे क्षुद्र मांत्रिक माझ्यासाठी किड्या-किटकांसारखे आहेत. तुला चिरडायला मला एक क्षणही लागणार नाही. मध्ये पडु नकोस, नाहीतर संपवून टाकेन."
माणिकरावांनी किंवा त्यांच्या देहात जे काही होते त्याने डोळे बंद केले आणि तो काहीतरी पुटपुटायला लागला. सदानंदांच्या मस्तकातील वेदना वाढायला लागली. तसे त्यांनी मनोमन रामनामाचा जप सुरू केला. हळुहळू त्यांनी आपल्या मनाची द्वारे बंद करायला सुरूवात केली. समर्थांचे स्मरण केले आणि दिशाबंधने घातली. प्रभुच्या नावाची गंमत असते मोठी. त्याचे नाव श्रद्धेने उच्चाराल तर ते तुमच्या भोवती आपल्या सामर्थ्याचे कोट उभे करते पण श्रद्धा नसेल तरीही वाल्या कोळ्यासारख्या खलवृत्तीच्या मनात देखील ती निर्माण करते. त्याच्या मरा मरा तुन देखील रामनामाची निर्मीती होती. इथे तर सदानंद रामदासींचे अखंड जिवनच रामनामावर पोसलेले होते. जस जसा रामनामाचा घोष वाढायला लागला, तसतसे इतका वेळ मनोमन चाललेले रामनाम सदानंदांच्या तोंडुन उच्चरवाने बाहेर पडायला लागले. तसा माणिकराव अस्वस्थ व्हायला लागला. तसा तो प्रचंड शक्तिशाली होता. एकटे सदानंद रामदासी त्याचे काहीही बिघडवू शकत नव्हते. पण इथे त्याच्यावर दुहेरी वार व्हायला लागले होते. त्याच्या सदानंदांबरोबरच्या युद्धात त्याचे क्षणभर शांतूकडे दुर्लक्षच झाले होते. आणि ती संधी साधून शांतूने आपल्या थैलीतून दोन तीन लिंबे आणि एक कणकेची बाहुली बाहेर काढून त्याच्या माध्यमातून त्याच्यावर वार करायला सुरूवात केली होती. हा दुहेरी प्रकार त्याच्यासाठी नवीनच होता.
तसा तोही काहीशे वर्षाच्या निद्रेनंतर जागा झाला होता. अजुन त्याच्या शक्ती पुर्णपणे जागृतही झाल्या नव्हत्या तोवर एकाच वेळी अशा दोन्ही शक्तींशी लढायची त्याच्यावर वेळ आली होती. एका शक्तीशी एका वेळी लढणे एकवेळ सोपे होते त्याच्यासाठी, पण सदानंदांची 'धन' उर्जा आणि शांतुची 'ऋण' उर्जा एकत्रीत येवूनही वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच्यावर वार करत होत्या. शांतुकडुन असा प्रतिहल्ला होइल याची त्याने कल्पनाच केली नव्हती. आता त्याच्यापुढे एकच मार्ग होता. एकतर शेवटपर्यंत त्यांच्याशी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत राहणे अन्यथा तात्पुरता पराभव स्विकारुन पळ काढणे व सगळ्या शक्ती एकवटून पुन्हा परत येणे. सध्यातरी त्याने दुसरा पर्याय स्विकारला. पण जाता जाता त्याने आपला हिसका दाखवलाच.
रामनामाची अभेद्य भिंत तोडणे त्याच्या मर्यादेबाहेरचे होते पण शांतुची काळी विद्या तोडणे 'त्या' च्यासाठी सहज साध्य होते. त्याच्या सुदैवाने अजुनही तो गोसावी फक्त रामनामच घेत होता, त्या रामदाश्याने अजुनही 'त्या' च्यावर हल्ला चढवलेला नव्हता. त्यामुळे 'त्या' ने आपल्या अमर्यादित अमानवी शक्तीचा झोत शांतूवर सोडला....
तशी शांतू धडपडली, वेगाने मागे फेकली गेली. त्या हल्ल्याची जाणिव होताच सदानंद वेगाने तिच्याकडे धावले...
"माऊली, सावरा स्वतःला. भिंतीवर आदळलेल्या शांतूला त्यांनी सावरुन धरले. आपल्या हातातला अंगारा तिच्या कपाळाला चोळला...
"जय जय रघुवीर समर्थ......!"
शांतु, त्यांच्याकडे पाहातच राहीली. इतकावेळ आपल्या काळ्या जादुने मस्तकातली कळ थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती, पण सदानंदांनी लावलेल्या नसत्या अंगार्याने ती वेदना थंडावली. तीने सदानंदांकडे पाहात हात जोडले....
सदानंद हळूच हसले....
"आबासाहेब... आमचं डोकं लै दुखतया...."
माणिकराव डोकं दाबत रडत रडत म्हणले तसे त्यांच्या आतल्या 'त्या' ला आपली शक्ती क्षिणावत असल्याची जाणीव झाली. तसा 'त्या' ने पळ काढायला सुरूवात केली..
"मी जातोय रे गोसावड्या, पण परत येइन, नक्की येइन आणि जेव्हा येइन तेव्हा सर्व जग माझे असेल, तू गुलाम असशील माझा.....!"
"जा मित्रा, जा आम्ही तुझी वाट पाहू. मागच्या वेळीही तू असेच म्हणाला होतास, जेव्ह्या चैतन्यानंदांनी तूला बंदीस्त करण्यात यश मिळवले होते. त्यावेळीही तुझी शंभर पापे भरली नव्हती, अजुनही तुझा घडा पुर्णपणे भरलेला नाही. जा कधीही ये.. आम्ही रामदासी, प्रभु रामचंद्राचे दास, माझा राम समर्थ आहे माझं आणि या विश्वाचं रक्षण करायला. ये कधीही ये... आम्ही सज्ज असु तुझ्या स्वागताला. जय जय रघुवीर समर्थ !"
आपल्या हातातला अंगारा सदानंदांनी माणिकरावांच्या कपाळाला लावला आणि माणिकरावांची शुद्ध हरपली. सदानंदांनी सुभानरावांकडे बघत हात जोडले आणि सुभानरावांच्या प्रतिसादाची अपेक्षाही न करता रामनामाचा घोष करत तो रामदासी पुढच्या दाराकडे आपली भिक्षा मागायला निघाला...
सुभानरावांच्या मनातला प्रश्न त्यांच्या मनातच राहीला...
"अवो महाराज, हे चैतन्यानंद स्वामी कोण? आन माणिकरावास्नी हे काय झालं हुतं?"
पुढे जाता, जाता तसेच मागे न बघताच सदानंदांनी आपले दोन्ही हात वर केले आणि पुन्हा एकदा रामनामाचा घोष केला.
"जय जय रघुवीर समर्थ!"
जणु ते सांगु पाहत होते की कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान असणेच हिताचे असते.
"शिरप्या, या शांतूला तिच्या घराकडं सोडून ये बाबा. शांते उंद्याच्याला सदरंवर ये, कारभारी आमच्या खाजगीतनं शांतूला चोळी-बांगडी करा. आजपासनं आमची भन हाये ती."
ते शब्द ऐकले आणि कृतकृत्य झाल्याप्रमाणे शांतुने हात जोडले....
***********************************************************************************************************
"आणि तो आता पुन्हा आपल्या दुनियेत येवु पाहतोय, त्याला अडवायचय, या दुनियेत त्याला त्याचं साम्राज्य तयार करण्यापासुन रोखायचय." आण्णा त्या तिघांकडे म्हणजे विशाल, चाफा आणि कौतुक यांच्याकडे पाहात सांगत होते.
"आण्णा, आता आम्ही स्वतः हे अनुभवतोय म्हणुन विश्वास ठेवणं भाग आहे, नाहीतर जे काही तुम्ही सांगताय त्यावर विश्वास ठेवणं खरंच कठिण आहे. आणि सुभानरावांना पडला होता तोच प्रश्न मलाही थोड्या वेगळ्या प्रकारे पडलाय.... म्हणजे सुभानरावांचा किस्सा तर तुम्ही सांगितलात, पण हा "तो" म्हणजे नक्की काय आहे? कोण आहे? आणि त्या कुंतलानगरीच्या युवराजाचं काय झालं? चैतन्यानंदांनी 'त्या' च्याबरोबर कसा लढा दिला होता? हे सगळे प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहेत."
कौतुक एका श्वासातच एवढं सगळं बोलुन गेला. त्या दिवशी त्या हॉटेलात सन्मित्र उर्फ आण्णांची ओळख झाली. आण्णांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि प्रसन्न स्वभावाने भारले जावुन कुठल्यातरी निसटत्या क्षणी ते आण्णांच्या प्रभावात अडकले ते त्यांनाच कळाले नव्हते.
"कौतुकराव, सगळेच मी, काय सांगु. थोडं तुम्हीही काम करा. तुम्ही सगळी प्रतिभावंत मंडळी आहात. जरा आपल्या बुद्धीला चालना द्या, तुमच्या या मित्राचा खजिना वापरा... प्रभुराम साथीला आहेतच. मी परवा दिवशी संध्याकाळी इथेच भेटेन तुम्हाला. पुढच्या प्रवासाला निघण्यापुर्वी मलाही काही तयारी करायची आहे. परवा दिवशी येताना तुम्ही लोकही साधारण ४-५ दिवस पुरतील असे कपडे आणि सुट्टी घेवुनच या. जय जय रघुवीर समर्थ..." आण्णा वळून चालायला लागले.
"आण्णा, पण आपण कुठे जाणार आहोत? आणि आम्हाला काय शोधायचे आहे?" चाफा वैतागुन म्हणाला.
"त्याला माहित आहे तुम्हाला काय शोधायचय ते!"
आण्णांनी विशालकडे बोट दाखवले तसे चाफा आणि कौतूक दोघेही डोळे वटारून त्याच्याकडे पाहायला लागले.
"ए... उगाच डोळे वटारू नका. तुम्हाला तर माहीतच आहे मी या सगळ्या गुढ विद्येवर आधारीत कथा लिहीतो. त्यासाठी मी प्राचीन गुढविद्येवर, तसेच अनेक साधनांवर आधारीत अनेक पुस्तके जमा करुन ठेवली आहेत. माझा या सगळ्या प्रकारांचा बर्यापैकी अभ्यास आहे. यात अनेक प्रकारच्या उपासना विधींचे, वेगवेगळ्या दैवतांचे... मग त्यात सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही देवतांची माहिती देणारे ग्रंथ ही आहेत. जगातल्या अनेक भागातील अनेक अघोरपंथी, कापालिकादी जन जातींची माहिती असणारी पुस्तके माझ्याकडे आहेत. गेले काही दिवस मी त्यात शोधण्याचा प्रयत्न करतोय. जी लक्षणे आपण सद्ध्या अनुभवतोय, ती यापुर्वीच्या कुठल्या अघोरपंथीयांच्या देवताशी, अथवा धन्याशी जुळताहेत का ते?"
"म्हणजे विशल्या, काल जे आण्णा म्हणाले, कि यापुढे जे काही होणार आहेत त्यात तुमचा विशेषकरुन विशालची आवश्यकता पडणार आहे ती याच साठी का? 'त्या' शी लढा देताना सदानंद रामदासींना देखील आपल्या 'धन' उर्जाशक्तीबरोबर त्या शांतुच्या 'ऋण' उर्जाशक्तीचे सहाय्य घ्यावे लागले होते. याचा अर्थ तु हि विद्या जाणतोस?"
"मी थोडा मध्ये बोलु का... परत आण्णा मध्येच बोलले. उत्तम साधकाची लक्षणे काय... तर त्याला साधनामार्गाचे उत्तम ज्ञान असायला हवे, निष्ठा हवी... जी विशालकडे आहे. आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, माहिती आहे त्याला तर्काच्या निकषांवर घासुन योग्य ते निवडण्याची वृत्ती हवी ती कौतुकजवळ आहे, आणि या सर्वानंतर योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची, त्यावर अंमल करण्याची कुवत हवी ती चाफ्याकडे आहे. आजच्या नितीमत्ता घसरत चाललेल्या युगात या तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असण्याची शक्यता जवळजवळ नाहिशी झालेली आहे, म्हणुन तुम्हा तिघांचा एकत्रितरित्या विचार करण्यात आला असावा."
आण्णांच्या चेहर्यावर एक मिस्किल हास्य होते.
तसा विशल्या थोडा खुलला..., त्यांच्या वात्रट डोक्यात काहीतरी खुसखुसायला लागले होते....
"चाफ्या, तुला आठवते मागच्या वेळी तो प्रकार झाल्यावर मी तुला काय म्हणालो होतो...?"
"कधी?"
"मागच्या वेळी .. तू तुझी योजना उलगडून सांगितल्यावर........!"
"अं...., हो बरोबर, यापुढे असलं काही करणार असशील तर मोबाईल बदल. खरं सांगायचं तर मला त्याचा अर्थ कळला नव्हता."
विशल्या खुसखुसत हसायला लागला.
"अबे त्या वाक्याला तसाही काही अर्थ नव्हता. मी उगीचच तुला अजुन थोडा पिळायच्या दृष्टीने तसे म्हणलो होतो. मला माहीत होते तुझ्या डोक्यात "विशल्या असे का म्हणाला असेल?" या विचाराने किडे पडणार म्हणून."
"म्हणजे माझं ते संमोहन.... यशस्वी झालंच नव्हतं....." चाफा साशंक मनाने उदगारला.
"अर्थातच झालं होतं. निश्चितपणे यशस्वी झालं होतं, फक्त वेगळ्या माणसावर. तुझं ते पत्र पाहताच मला त्या द्र्व्याचं अस्तित्व जाणवलं होतं. तुझ्या शास्त्रीय भाषेत त्याला काही का नाव असो आमच्या शास्त्रात आम्ही त्याला मदनार्क म्हणतो. मोहात पाडणारा तो मदन, त्याप्रमाणेच माणसाला गुंगवणारं, एका वेगळ्याच दुनियेत नेणारा अर्क म्हणुन मदनार्क. कुठल्याही अघोरी साधनेत बळी जाणार्या सावजाला धुंद करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. तुला कदाचित कल्पनाही नसेल चाफ्या, पण मला थोड्याफार प्रमाणात टेलिपथी अवगत आहे. पण अजुनही मला कशाचा तरी आसरा, सहाय्य लागते एखाद्या व्यक्तीच्या मनात शिरण्यासाठी. आणि दुर्दैवाने अजुन माझी हि विद्या फारशी विकसीत झाली नसल्याने मी फारतर पाच मिनीटे एखाद्याच्या मनात राहू शकतो."
"म्हणजे तुला असे म्हणायचेय का? की मी... माझा मोबा..." चाफा वेड्यासारखा...
"नाही त्या मोबाईलचा काहीही संबंध नाही, चाफ्या. ते उगाचच तुला पिळण्यासाठी म्हणालो होतो मी. माध्यम होतं ते म्हणजे तुझा 'आवाज' ! अरे गेली कित्येक वर्षे मी या सगळ्याचा अभ्यास करतोय. अर्थात माझा त्यामागचा हेतु मात्र प्रामाणिक आहे, मला माझ्या लेखनाला आवश्यक, पोषक ते सर्व शिकुन घ्यायलाच हवे. पण त्याबरोबरच योगायोगाने या काही सिद्धी मला प्राप्त होत गेल्या. त्यातुनच थोड्याफार प्रमाणात मला ही दुसर्याच्या मनात शिरण्याची विद्या प्राप्त झाली आहे. त्या दिवशी तुझा फोन आला आणि तुझ्या आवाजाच्या माध्यमातुन मी तुझ्या मनात शिरलो. तिथली वादळं जाणवली आणि क्षणभर वाटलं की बदलून टाकावं सगळं. पण माझ्याही मनात कुठेतरी कौत्याला दिलेल्या त्रासाबद्दल एक गिल्ट काँप्लेक्स होताच. म्हणलं या निमित्ताने त्यालाही थोडं रिलॅक्सेशन मिळेल. असेही स्वतःहून तुमच्यासमोर हे सगळं (माझ्या प्लानबद्दल) सांगणं मला नसतंच जमलं. पण या निमित्ताने ते सांगता आलं, माझ्या अपराधीपणाच्या भावनेतुनही सुटका झाली. पण त्या पाच मिनीटात तुझं संमोहन मी बुमरँगसारखं तुझ्यावरच फिरवलं. काही काळ तु समजत राहीलास की तू मला संमोहित केलं आहेस. तुही खुश, मी पण खुश."
"च्यायला विशल्या, डेंजरस आहेस. कधी कळू दिलं नाहीस हे सगळं तुला येतं म्हणुन."
कौत्या खर्या खुर्या कौतुकाने उदगारला.
" बरं मग, तुझ्याकडची पुस्तके चाळताना तुला काही सापडले?"
चाफा आणि कौतुक दोघेही उत्सुकतेने पुढे आले.....
"रसातलं सरयु मुखं कुवलायही अर्फटाय कापाल... पुनरागमनायच...कलियुगं...कलियुगं....कलिसेवका".......
विशाल काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि दोघेही बावळटासारखे त्याच्याकडे पाहायला लागले. विशालने आपल्या बॅगेत हात घातला, त्याने आपल्याच नादात बॅगेतुन हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात एक दुधारी खंजीर होता.
"विशल्या.....! चाफ्या पकड त्याला, कौतूक चाफ्याला खुण करत विशालच्या हातातल्या दुधारी खंजीराकडे झेपावला......!
क्रमशः
विशाल कुलकर्णी.
क्रमशः आहे ना. आता वाचणारच
क्रमशः आहे ना. आता वाचणारच नाही मी हा भाग कट्टी फु.......>>>
मस्ती करतेय राव.
आताच वाचते. हा पण भाग जरा उशिराच आला. तरीहि लिहिल्याबद्दल धन्स.
मस्तच लिहील आहे.
पु.ले.शु.
मस्त रे...
मस्त रे...
तुझे क्रमशः संपले की मगच
तुझे क्रमशः संपले की मगच प्रतिसाद द्यायचा अस ठरवलं होतं. आता लवकर पुढचे भाग येऊ देत
मस्त मस्त चालू आहे... पटापट
मस्त मस्त चालू आहे... पटापट लिहा राव... नखे कुरतडून कुरतडून संपायला आली...
बापरे भिति वाट्ते
बापरे भिति वाट्ते
मस्त लिहिलय. पुढ्चा भाग लवकर
मस्त लिहिलय. पुढ्चा भाग लवकर टाक
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
भन्नाट ....रीअली सस्पेन्स
भन्नाट ....रीअली सस्पेन्स !!!....
पट्पट लिही
अजुन किती क्रमश: रे? आता नको
अजुन किती क्रमश: रे? आता नको अंत बघुस आमचा!
आता तर एकदम सुसाट सुटलीये कथा...लवकर पोस्ट पुढचा भाग प्लीज
शालिवाहन ला अनुमोदन, पटापट
शालिवाहन ला अनुमोदन, पटापट लिही
मस्त सस्पेन्स.
वी कु.. आप लीहीताही ग्रेट्च.
वी कु.. आप लीहीताही ग्रेट्च. खुप वेगळं वळण आहे. लवकर पुढ्चं लीहा.
चालु द्या !!
चालु द्या !!
विशल्या, तुला फोन करणंच योग्य
विशल्या, तुला फोन करणंच योग्य रे बाबा
ह्म्म्म. येऊद्या
ह्म्म्म. येऊद्या
वाट पाहुनी जीव दमला ...
वाट पाहुनी जीव दमला ...
पुढचा भाग कधि? लवकर टाका.
पुढचा भाग कधि?
लवकर टाका.
सस्पेंस ठेवण्यात तुम्हि खुपच
सस्पेंस ठेवण्यात तुम्हि खुपच तरबेज आहात. मस्तच.
भन्नाट रे विशाल. टी व्ही
भन्नाट रे विशाल. टी व्ही मालिका मस्त होईल या कथेवर.
पुढचा पुर्वनियोजीत भाग २०११
पुढचा पुर्वनियोजीत भाग २०११ ला का??
धन्यवाद. एक २-३ दिवसात टाकतोय
धन्यवाद. एक २-३ दिवसात टाकतोय पुढचा भाग. गेले महिनाभर मलेरियाने आजारी होतो त्यामुळे सगळंच लिखाण थांबलं होतं. क्षमस्व .
छान गूढ कथा
छान गूढ कथा
ह्याचा पुढील भाग कुठे आहे?
ह्याचा पुढील भाग कुठे आहे?
shevatacha bhaag kuthe
shevatacha bhaag kuthe ahe????
पुढचा भाग कधि? लवकर टाका.
पुढचा भाग कधि? लवकर टाका.
सुंदर पुढे काय असेल ह्याचा
सुंदर पुढे काय असेल ह्याचा थांगपत्ता लागत नाही कधी देताय पुढचा भाग
पुढच्या भागाचे काय झाले ..
पुढच्या भागाचे काय झाले .. काहि तरी लिन्क द्या ..
पुढचा भाग टाका आणि वर्तुळ
पुढचा भाग टाका आणि वर्तुळ कधी पुर्ण करणार? आपल्या वाचकांना असे ताटकळत ठेवणे बरे नव्हे
भिती वाटली
भिती वाटली
mala yachya pudhache bhaag
mala yachya pudhache bhaag milat nahiyet ...krupaya madat kara
Pages