कोसला

Submitted by टवणे सर on 20 June, 2010 - 01:22

बाई मृताचे धर्म : जिवतां प्रति : कैसे निरूपावे ॥

शंभरातील नव्व्याण्णंवास.. मराठीत क्वचितच एखाद्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच एव्हडी भन्नाट सुरु होते. पुढचे पान अजूनच जबरदस्त. वर लिहिलेली ओळ ह्याच पहिल्या पानावरची. कोसला. म्हणजे कोष.

कुठल्यातरी सांगवी नामक गावातला पांडुरंग सांगवीकर स्वत:ची कथा सांगायला सुर करतो. कथा घडते मुख्यत्वेकरुन ५९ ते ६३च्या पुण्यामध्ये. पण त्याआधी मॅट्रिकचा अभ्यास करताना उंदीर मारणारा पांडुरंग, घरातल्या आई-आजीचे पिचलेपण, त्यातून होणारी भांडणं, मुळची त्रास देण्याची वृत्ती, वडिलांची क्षुल्लक गोष्टीतली लांडी-लबाडी खोटारडेपणा आणि ह्यात तयार होत गेलेला संवेदनशील, भावनाप्रधान व वरुन घट्टपणा दाखवत मिरवणारा पांडुरंग आपल्यासमोर मोजक्या शब्दात उभा राहतो. तिथून पुण्यात आल्यावर पहिल्या वर्षात गावाकडचे बुजरेपण टाळत ’व्यक्तिमत्व’ घडवण्याच्या मागे जाणारा सांगवीकर, गॅदरिंगला कल्चरल सेक्रेटरी होउन पदरचे पैसे खर्च केलेला सेक्रेटरी, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत ’चमकण्याच्या’ मागे असलेला सांगवीकर, घरुन येणार्‍या पैश्यांची फारशी फिकीर नसलेला आणि आल्या-गेलेल्याला चहा-सिगरेटी पाजणारा सांगवीकर, मेस सेक्रेटरी असताना वर्षाच्या शेवटी जोरदार फटका बसलेला सांगवीकर इंटरच्या आणि ज्युनिअरच्या वर्षात वाहत जातो. मनू मेल्याचे दु:ख पचवण्याची क्षमता नसलेला, मानसिक षंढत्वाची जाणीव होणारा, पैश्याची काटकसर करताना आताच्या त्याच्यासारख्या पैसे खिशात न खुळखुळवणार्‍या मित्रांबरोबर राहूनही एकूणातच सर्वांपासून अलिप्त होत, दूर होत जाण्याचा प्रवास करणारा सांगवीकर आता दिसतो. आणि मग शेवटी एकूणच परिक्षेत पेपर सोडून शिक्षणाला रामराम ठोकून, गावी परत जातो. तिथे वडिलांच्या धंदा-कारभाराला शिव्या देत, थोडेफार त्यातलेच काम बघत, इतर अश्याच शहरात राहून शिकून गावी परतलेल्या कंपूत दिवसचे दिवस ढकलणारा, आता जे होइल ते होवो, सगळेच भंकस, मग का चिंता करा अश्या पराभूत तत्वज्ञानाशी येउन पोचलेला पांडुरंग. इतकीच खरेतर कोसलाची कथा.

पण ह्या सगळ्या स्थित्यंतरात कोसला ह्या कलाकृतीने किती एक गोष्टी वाचकाच्या समोर आणल्या आहेत. कोसलाची भाषाशैली. सुरुवातीला उदाहरणार्थ, वगैरेचा अतिरेक करुन तेव्हाच्या रुळलेल्या कादंबरीय भाषेला छेद देत कोसला सुरु होते. कोसलात कुठेही, 'आई म्हणाली, "..." - मग अवतरणचिन्हात संवाद वगैरे भानगड नाही. संपूर्ण गद्य सलग शैलीत लोकांमधील संवाद, पांडुरंगाची मानसिकता (पुस्तक प्रथमपुरुषी निवेदनशैलीत आहे) एकामागोमाग येत राहतात. पण वाचकाला कुठेही तुटकता येत नाही, गोंधळ उडत नाही. असे लिहिणे खरेच फार अवघड आहे. कोसलात कुठेही शिवीगाळ नाही, लैंगिक-कामुक वर्णने नाहीत, मध्यमवर्गीय कुटुंबातून ज्या श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा बोलताना पाळल्या जातात त्या मर्यादेत संपूर्ण पुस्तकभर भाषा आहे. पण कुठेही ती भाषा मिळमिळीत होत नाही. तसेच रुक्ष मन:स्थिती, वास्तवता दाखवण्यासाठी भडक शब्दांची साथ घेत नाही. तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब कोसलात पडत राहते, आजूबाजूला दिसत राहते. वेगवेगळ्या कुटुंबामधून, आर्थिक स्तरांतून आलेली मुले-मुली, त्यांची राहण्याची-वागण्याची पद्धती, पांडुरंगचा श्रीमंत-गरीब असणाची वर्षे, त्याचे बदलणारे मित्र आणि सिगारेटी कथानक पुढे नेत राहतात. डायरीच्या रुपातून एक आख्खे वर्ष समोर येते. भविष्यातल्या इतिहासकाराच्या नजरेतून आजच्या समजाची टर उडवली जाते. महारवाड्यातल्या वह्यातून जगण्याचं एक तत्त्वज्ञान बाहेर येतं.
पण ह्या सगळ्यातून एक समान धागा, सूत्र वा विचार येत राहतो तो पांडुरंगला पडलेल्या प्रश्नांचा - जगण्याचे प्रयोजन, असण्याचे प्रयोजन, असलोच तर मी असाच का वा दुसरा एखादा तसाच का - शोध, त्यांची न मिळणारे उत्तरे, उत्तरं न शोधता त्यापासून दूर दूर पळणारा पांडुरंग आणि मृत्युमुळे हे सुटेल काय ह्याची खोल मनात तळ करुन असलेली त्याची आशा हे कादंबरीत जागोजागी येत राहतात. ’भटकते भूत कोठे हिंडते?’ अश्या एका तिबेटी प्रार्थनेपासून ह्या प्रश्नाच्या मृगजळामागे पांडुरंगाचा प्रवास सुरु होतो. मनीच्या मृत्युंनंतर तो हे प्रश्न थेट विचारतो. पण तेव्हडेच. बाकी सगळीकडे अप्रत्यक्षपणे, माहिती असून तो प्रश्नांना सामोरा जात नाही. उत्तरं वांझोटीच असणार आहेत असा एक विश्वास त्याला आहे. आणि म्हणुनच त्याच्या हाइटन्ड मोमेन्ट्सनंतर तो भरार पाणी ओतून रिकामा होतो. उदाहरणार्थ, सांगवीकरच्या तिसर्‍या वर्षाच्या खोलीचे एक गहिरे चित्रण करुन, एका स्वप्नातून उभी केलेली हॉस्टेलच्या आयुष्यातली क्षणभंगुरता पण तरिही एकमेकांबरोबर व्यतीत केलेला प्रचंड वेळ ह्या सगळ्याचा अंत एका वहिवाल्याच्या वहीनं होतो:
क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती
आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती
अन्‌ आत्मा कुव्हीचा नाही कोणी सांगाती SS
पण ह्या इंटेन्स/तीव्र वातावरणात सुर्श्याचा एक जोक लगेच पुढे येतो: ’एकजण अचानक माझ्या खोलीवर टकटक करून बळजबरीनं आत आला. तो म्हणाला, एक्स्क्यूज मी. ही माझी पुर्वीची खोली. आहा. हीच खोली. काय ते दिवस. हीच ती खिडकी. हेच बाहेरचे झाड. असंच माझं टेबल खिडकीशी असायचं. आहा. हीच कॉट. अशीच माझीही होती. हेच माझं कपाट. ह्या कपाटात मी कपडे ठेवायचो. आहा, आणि ह्यात अशीच लपून बसलेली नागडी मुलगी.’ बदबदा पाणी ओतून पांडुरंग रिकामा.

पांडुरंगाची सगळ्याला क्षुल्लक ठरवण्याची वृत्तीच्या मागे मी का जगतोय वा काय अर्थ आहे का ह्याला हा धागा जास्त दिसतो. त्यातून तो सुरुवातीला गावाला, गावातल्यांना, त्यांच्या मानसिकतेला शिव्या देत शहरात रमून जायचा प्रयत्न करतो तर कादंबरीच्या शेवटाला शहराला शिव्या देत गावच बरा म्हणत येतो. नॉस्टॅल्जिया त्याला तो येवून देत नाही, पण खोल तळाशी कुठेतरी त्याला एक एक सोडून जाणारा मित्र, खोली, वर्षे अस्वस्थ करत जाते. शेवटाला तो सगळंच सोडून फक्त प्रवाहात तरंगणारी काडी व्हायला तयार होतो.

’कोसला’ने एक पुस्तक म्हणुन मला स्वत:ला प्रचंड आनंद दिला आहे. पांडुरंग पलायनवादी आहे का? हो, आहे. निराशावादी आहे का? हो, आहे. तो रुढार्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे का? नाही. पण म्हणुन मला कोसला कमअस्सल वाटत नाही. अशी माणसेदेखील असतात, आहेत. कोसलातला पांडुरंग पराभूत होतो, निराश होतो, सत्यापासून पळून जातो म्हणुन कोसला दुय्यम वा अवाचनीय ठरत नाही. उलट एक अतिशय समृद्ध, सकस साहित्यकृतीचा अनुभव वाचकास नक्कीच देते. कोसलातील कित्येक प्रसंगांचे वर्णन अफाट आहे. कुठेही जडबंबाळ, बोजड, अलंकारीक भाषा नाही. वाक्य पण सगळी छोटी-छोटी तुकड्यात. पांडुरंगाला सुर्श्या पहिल्यांदा भेटणे आणि त्यांची दोस्ती होणे हे केवळ ’पण सुरेश सारखा माझ्या डोक्याकडे पहात होआ. शेवटी तो म्हणाला, तुमची बाटली फुटली वाटतं? हे थोरच आहे. मग आमची दोस्ती झाली.’ इतक्याच मोजक्या संवादातून उभे करतो. कोसलामधला विनोद पण सहसा न आढळणार्‍या पद्धतीचा आहे. तो होतो, घडवून आणला जात नाही आणि विनोद केल्यावर लेखक 'बघा मी कसा विनोद जुळवुन आणला' असे न करता मॅटर ऑफ फॅक्टली पुढे जातो. उदा. तांबेचे कविता करणे, त्याच्या जीवनात उद्दिष्ट्य असणे आणि महान नाटके लिहिणे: तांबेच्या नाटकातला एक प्रवेश -
प्रभाकर: (मागे सरुन) सुधा याचं उत्तर दे.
सुधा: अरे पण प्रभा, माझे वडिल माझ्याबरोबर होते, आणि तू हाक मारलीस.
प्रभाकर: (पुढे येत) असं होय? मला वाटलं तू मला माकड म्हणालीस ते मनापासूनच.
हे असले भयंकर लिहीत कोसला तुम्हाला बुडवून टाकते. मावशीच्या नवर्‍याने ’इतिहासच घे बीएला, इतिहासाच्या प्राध्यापकाला दरवर्षी नवीन वाचायला लागत नाही’ असे सांगणे, इचलकरंजीकर, रामप्पा, ते दोघे, सिगरेटी, मद्रास, चतुश्रुंगी-वेताळ टेकड्या, अजंठ्याची सहल सगळेच महान - ओघवते - प्रवाही. अजंठा तर केवळ महान. मनू मेल्यावरची पांडुरंगची तगमग, घरातल्या सर्वांवरचा राग, आपण काही करु न शकण्याचे, क्षुद्र असण्याची जाणीव, पलायनाचे मार्ग शोधणे हे सगळे पुन्हा-पुन्हा येते. तो एके संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार की गेली चार वर्षे राहिलेली ही जागा, इतक्या मित्रांसोबत काढलेला वेळ, कुणाचेच कुणी नाही. सगळेच इथे तात्पुरते. आपले काहीच नाही. आणि मग कादंबरीत क्वचितच येणारा थेट प्रश्न - ’मग सगळ्या आयुष्यात हेच - आपल्या कशालाच किंमत नाही’. आणि मग शेवटच्या पेपरात पाय लांब करुन दोनच प्रश्नांची उत्तरं लिहून बाहेर पडलेला सांगवीकर. मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.

भटकते भूत कोठे हिंडते?
पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपर्‍याकोपर्‍यांत विखुरले आहे आणि तुला
ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस
ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू
मार्गस्थ होशील.

तिबेटी प्रार्थना.
(कोसलातील दुसर्‍या पानावरुन).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कोसला" प्रकाशित झालेल्या तारखेपासून म्हणजे ४७ वर्षे म्हणजेच जवळजवळ अर्धशतक होत आले आणि आजही तितक्याच उत्साहाने, उत्कटतेने त्या कादंबरीवर लिहिले/बोलले/चर्चिले जाते यातच तिचे आगळेवेगळेपण ठासून दिसते. केवळ ही एकच कादंबरी लिहुन श्री.नेमाडे थांबले असते तरी मराठी शारदेच्या प्रांगणातील त्यांच्या नावाचा दिवा निमला नसता. विशीतील ज्या वाचकांनी त्या कादंबरीची पहिली आवृत्ती वाचली होती ती पिढी आता सत्तरीत आली आहे, पण "कोसला" म्हातारी व्हायला तयार नाहे. श्री.टण्या यांनी लेखात नेमक्या कोणत्या कारणास्तव कादंबरी डोक्यावर घेतली गेली आहे त्याचा उहापोह अतिशय तन्मयतेने केलेला आहेच, शिवाय त्यातील सौंदर्यस्थळेही उलगडून दाखविली आहे.

मराठी भाषेतील "सर्वोत्कृष्ट पुस्तके" या संदर्भातील विविध माध्यमांनी ज्या ज्या वेळी "सर्व्हे" घेतले आहेत, त्या त्या वेळी "कोसला"ला त्या यादीर अग्रस्थान मिळाले आहे. नायकाचे नाव गुलछ्बूच आणि बंगाली धाटणीचेच हवे असा एक विचित्र पायंडा त्या काळात पडला होता आणि त्या प्रथेला रोखठोक "पांडुरंग सांगवीकर" या अस्सल देशी मातीतील नायकाने सुरुंग लावला. "उदाहरणार्थ मी आज २५ वर्षाचा आहे....", "वगैरे सांगून झाले की..." "हे म्हणजे भलतेच...!" आदी वाक्यप्रयोगामुळे कादंबरीकार नेमाडे थेट वाचकाशी संवाद साधतात आणि जणु काही आपण त्याचे रूम पार्टनर असून मेस हिशोबाचा त्याला जो आर्थिक फटका बसला आहे त्यातून त्याला कसे वाचवायचे याची काळजी करीत आहोत असा भास होतो.

कॉलेज वादविवाद कार्यक्रमाच्यावेळी वक्त्याची ओळख करुन देताना सेक्रेटरीची झालेली गंमत असो, वा पांडुरंग व त्याच्या मित्राने पोलिस स्टेशनमध्ये काढलेली रात्र असो, वा उंदीर मारणे एपिसोड असो... ही प्रत्येक ठिकाणे या सम हीच अशीच आहेत.

एका सुंदर लेखाबद्दल श्री.टण्या यांचे हार्दिक अभिनंदन.

(ताजा कलम : आजच्याच वर्तमानपत्रात श्री.भालचंद्र नेमाडे यांची सन १९७९ पासून जाहिरात होत असलेली "हिंदु" कादंबरी प्रकाशीत झाल्याची बातमी प्रसिध्द झाली आहे.... हाही एक योगायोगच !)

अ प्र ति म. तुला दाद द्यायला सुद्धा मज पामराकडे शब्द नाहीत टण्या.

कोसलाची आठवण निघाली की नंदनच्या साहित्यविषयक अनुदिनीतील कोसलावरचे प्रकरण वाचलेच पाहीजे. http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html

'पुढे काही होतच नाही राव या कादंब्रीत' ही टीका सतराशेछप्पन्न वेळा ऐकली आहे. कारण ती 'तुटलेपनाची कायनी' हाये राजा. कोसलामधील काहीही समजलं नाही, पण नुसतच विलक्षण अस्वस्थ वाटलं ना, तरी समजावं की आपल्याला त्यातील मर्म समजलं.
.... गोष्टीला साधारणपणे सुरवात, मध्य आणि अंत (तात्पर्यछाप) असावा हे संकेत होते. गोष्टीचे.. '''आणि ते सुखाने नांदू लागले''''' छाप अंत वाचले की वाचकांचा जीव भांड्यात पडतो. पण आयुष्य असे असते? सत्याच्या शोधात अनेक सत्य सापडु शकतात, ती दृष्टीकोनातून.
अशा प्रकारच्या साहित्यकृती महायुद्धानंतरच्या नरसंहारावर पोसल्या गेल्या. एक संपूर्ण पिढी, गावं आणि राष्ट्र निमाली. मूल्यांचे संकेत,भावविश्व, साधेपणा, भाबडेपणा अक्षरशः कोसळला. रक्ताच्या चिखलात गोडगोड गोष्टींची आणि शब्दांची सुकुमार पुष्पे विझली. त्यावेळेला मानवजमातीच्या मनात कदाचीत collectively "कशालाच काही अर्थ नाही" चा आक्रोश वाढला आणि त्यापुढील काळात वाढीस लागला. ह्या सर्वांचे प्रतिबिंब लेखनात आपसुक पडु लागले.

पांडुरंगाला चांगले दोन वेळ गिळायला तर मिळतय, बापाच्या पैशावर फुकाचे वांझोटे प्रश्न पडायला जातय काय? गिरणीत कामाला लावा, लैनीवर येईल.... असे म्हणणारे आमचे एक सांदिपनी होते. असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडल्यास, भाकरीसाठी वणवण करावी लागत नाही म्हणुनच केवळ तो संघर्ष खोटा ठरत नाही एवढेच मी म्हणेन. प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असतात.

कोसला म्हणजे पराभूतांचे बायबल अशीही टिका होते. असु दे हो. जेत्यांचे तेच ते दळण वाचुन कंटाळ नाही का आला?

(सॉरी- इथे मी आधी प्रस्तावनेबद्दल लिहीलं होतं. ते चुकीचं होतं बहुतेक. कोणाला जास्त माहिती असल्यास इथे लिहिणे कृपया. मला असं वाचल्याचं आठवत होतं की कोसल्याची प्रस्तावना पुलंने लिहीली होती.) कोसल्याबद्दल "पु ल देशपांडे" नावाच्या एका लेखकांने लिहीलेल्या blurb वरील मजकूर ('कोसला वाचल्यावर' दाद (मौज, १९९६) अप्रतिम होता हे नमुद करावेच लागेल. लेखक म्हणुन पुलंच्या मर्यादा काय असतात त्या असोत, पण अभिरुची अतिशय उत्तम होती हे वादातीत आहे. याच नेमाड्यांने त्यांना काहीही म्हणुन घेतले, तरी कोसल्याबाबत पुलंचे उपकार मराठी वाचकांवर आहेतच. Proud

देसाई- छान पोस्ट.

रच्याकने: ते "हिंदु" प्रकरण 'जेवढी हाईप तेवढे बकवास' अश्या मर्फिज लॉच्या पुष्ट्यर्थ नसावे म्हणजे मिळवली असे मला वाटते आहे. Proud

टण्या / देसाई धन्स Happy

टण्या, आता कोसला परत वाचून काढेन म्हणतो..

'जेवढी हाईप तेवढे बकवास'<< वैसाच लग रहा है |

'जेवढी हाईप तेवढे बकवास'<< वैसाच लग रहा है |
>>>
चन्द्रकान्त पाटील,(हे तर नेमाड्यांचा डु आय असावे इतके.)राजन गवस ,रंगनाथ पठारे, इ.'नेमाडपंथी ' 'साहित्यिक' लेखण्यात शाइ भरून कधीचे तयार आहेत हा हिन्दूवर (किंवा 'हिन्दूसारखे') लिहायला. ! Proud

स्वतः नेमाड्यांनी नन्तर स्वतःलाच रिपीट केले.(त्याचीही काही सौंदर्यशास्त्रीय , मानसशास्त्रीय मीमांसा असेल :)).एखाद्या पॅरॉनॉइड बुवाच्या वेडगळ कृतींचाही भक्त अध्यात्मिक अर्थ लावत बसतात तसे Happy

बाकी निरर्र्थक लिखाणात काहीतरी अर्थ असलाच पाहिजे आणि ते मला कळले आहे ते दाखवण्यासाठी तो 'काढून' ही दाखवावा लागतो. परवाच नन्दिनीची एक कथा अर्धवटच तांत्रिक कारणाने प्रसिद्ध झाली होती मायबोलीवर. सामान्य लोक गोंधळले पण त्यातही एका 'जाणकारा'ने त्या अर्धवट कथेचा अर्थ काढून दाखवला की तिला असे म्हणायचे होते. शेवटी नन्दिनीने खुलासा केला की ती चुकून अर्धवटच आली आहे Proud

कोसला केवळ मांडणीची ट्रिक आहे आणि निम्मे पुस्तक वाचल्यावर भिरकावून देण्याचे आहे. त्यानन्तर नेमाड्यांनी काय लिहिले हे कोणाला माहीत तरी आहे काय?

स्वतः नेमाडे हे अत्यन्त असहिष्णू म्हणूनच खोटे लेखक आहेत....

९०

त्यानंतर नेमाड्यांनी बिढार, हूल, जरीला आणि झूल (हूल हे पुर्वी बिढारचाच भाग २ होते) ही चार पुस्तके चांगदेव पाटील नामक नायकाच्या प्रथमपुरुषी निवेदनात लिहिली.

बाकी tonaga तू कोसलावर >>>>कोसला केवळ मांडणीची ट्रिक आहे आणि निम्मे पुस्तक वाचल्यावर भिरकावून देण्याचे आहे. >> एव्हडेच लिहिलेस. बाकी सगळे हिंदू, नेमाडे आणि नेमाडपंथीय लेखकांवर. मी लिहिलेले 'कोसला'वर आहे. नेमाड्यांवर नाही.

@tonaga:

I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it.
Voltaire

टण्या, फार सुंदर व चपखल लिहिले आहेस.
घटनांचा एकरेषीय पट विणला की कादंबरी होते का? होत असेलही. रेलचेल घटनांचा त्रिमितीय पटसुद्धा विणता येतो त्यासही कादंबरी म्हणता येते. काही कादंबर्‍या वाचकाला लिखित शब्दापलिकडे घेऊन जातात. त्या पल्याडच्या प्रदेशात घेऊन जाताना या कादंबर्‍या सतत वाचकाच्या बरोबर असतातच. वाचकाला आपण कोणाचे तरी बोट धरुन जात आहोत याची जाणीव राहतेच राहते. कादंबरी संपते आणि आपणही हळूहळू आपल्या स्वतःच्या प्रदेशात परततो. या कादंबर्‍या मूव्हर्स असतात.
काही कादंबर्‍या वाचकाला स्वतः कुठेही नेत नाहीत. पण त्या वाचकाला इतक्या विलक्षण अस्वस्थ करून सोडतात की वाचकाला हलावेच लागते. अश्या कादंबर्‍या प्राइम मूव्हर्स असतात. कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे हे वाचकाने स्वतःच शोधायचे असते, पण मर्म हेच की शोधायला न जाण्याचे स्वातंत्र्य वाचकाचे राहत नाही. वाचकाला निघावेच लागते. कोसला अशीच एक बत्ती लावणारी कादंबरी होय.
बौद्धदर्शनानुसार ब्रह्मन-आत्मन यांचे अस्तित्व व त्यांचे शाश्वतपण नाकारले जाते. "क्रम संपता दोन्ही भाई भांडती हो भांडती, आत्मा कुव्हीचा नाही कोनी सांगाती हो SSS सांगाती". माणूस म्हणजे विविध संज्ञांची एकमेकांवर चढलेली पुटे. हे पापुद्रे दूर करत गेले तर शेवटी काय उरते? बुद्धाचे शून्य किंवा दुसर्‍या भाषेत भटकते भूत...... जे 'सघन' तर नाहीच आणि शाश्वतही नाही. असले काही वरकरणी नैराश्यवादी वाटेल. जगण्णे गाभाहीन असेल तर जगणे करून करायचे काय? पण हे पलायनवादी नव्हे. ते तसे का नाही ही खरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विकी क्रिस्टीना बार्सिलोनामध्ये मारिआ विकीला म्हणते, you have chronic dissatisfaction. आता आयुष्य व्यापून दशांगुळे उरणार्‍या chronic dissatisfaction चे प्रयोजन काय? म्हणजे परत पापुद्रे उलगडत जाणे. त्याशेवटी टण्या म्हणतो तसे वांझोट्या उत्तरांचे भटकते भूत मिळणार आहे हे माहितीच आहे. नसणे स्वीकारून कोसला असले मांडते आणि देवाचे अप्राप्य अन्न (कारण ते अस्तित्वातच नाही) शोधणार्‍या भूताला बोलावण्याची प्रार्थना वाचकाची प्रार्थना होते.

टण्या, रैना, अरभाट अप्रतिम!! कोसला-जय हो! पांडुरंगाची निवेदनशैली कमालीची सहज आहेच पण वेळोवेळी त्याच्या तोंडून जी भाष्ये येतात ती केवळ. कोसलाच्या हल्लीच्या आवृत्त्यांवरील (सांगविकराच्या होस्टेलच्या खोलीचे) मुखपृष्ठ करणारा नीतिन दादरावाला आमचा मित्र. त्याच्या तोंडून कोसलाची जन्मकथा आणि असेच काही कोसलासंदर्भातले किस्से ऐकणे हा एक आनंदानुभव असतो.

टण्या, रैना, अरभाट एवढं सुंदर व्यक्त केलंत तुम्ही की पुढे शब्द सापडत नाहीत. फक्त 'मम' एवढंच. मरण्यापूर्वी एकदा तरी वाचलीच पाहिजे ती म्हणजे - कोसला.
या पुस्तकातलं मला सगळ्यात आवडलेलं वाक्य म्हणजे आंधळ्या भिकार्‍याचं गाणं जेव्हा पांडुरंगाच्या खिशात दमडीही नसते..
"माझी आंधळ्याची हरवली (? चुकीचे असेल तर करेक्शन सांगा रे!) काठी , चुकून पडल्या दुबळ्यांच्या गाठी."
या एकाच वाक्यात आख्ख्या कोसल्याचे मर्म; अंधार्‍या गुहेत चाचपडताना कोपर्‍यात कुठेतरी मिणमिणती पणती अचानक दिसावी आणि हायसं वाटावं, तसं गवसतं.

कोसल्याबद्दल "पु ल देशपांडे" नावाच्या एका लेखकांने लिहीलेल्या blurb वरील मजकूर ('कोसला वाचल्यावर' दाद (मौज, १९९६) अप्रतिम होता हे नमुद करावेच लागेल. लेखक म्हणुन पुलंच्या मर्यादा काय असतात त्या असोत, पण अभिरुची अतिशय उत्तम होती हे वादातीत आहे. याच नेमाड्यांने त्यांना काहीही म्हणुन घेतले, तरी कोसल्याबाबत पुलंचे उपकार मराठी वाचकांवर आहेतच.>>>

रैना, तुला नक्की काय म्हणायचे आहे यामधून??? तेच मला समजले नाही.

मला स्वतःला कोसला आवडते आणि नाहीपण!! का ते सांगता येणार नाही, पण पांडुरंग सांगवीकर हा माणूस बरंच काही करणं शक्य अस्ताना काहीच करत नाही, असं सतत वाटत राहतं. बर्‍याच प्रसंगात त्याला परिस्थिती हरवत नाही, तो स्वत:च हार मानतो. तो पलायनवादी आहे, मात्र या पलायनाला तो कुठेतरी ग्लोरिफाय करायचा प्रयत्न करतो, जो मला आवडत नाही.

कोसलाची भाषाशैली मात्र खूप सहज आहे, आणि मला वाटतं हे सहज लिहिणंच फार कठीण आहे. कोसला वाचताना कित्येकदा थबकून "आरे!!" असे उद्गार निघतात.

अरभाट, मस्त लिहिले आहेस.

टण्या, मस्त! Happy

मी या पुस्तकाच्या प्रेमात पडले ती मुख्यतः शैलीसाठी. पांडुरंगाला जग जसं दिसतं, तसं(च्या तसं) तू म्हटल्याप्रमाणे 'मॅटर ऑफ फॅक्टली' सांगत तो पुढे जातो. जणू हे पांडुरंगाचं आयुष्यच नाही! जणू तो फक्त निरीक्षक आहे! उंदीर मारत असो, बहीणीच्या मृत्यूने व्यथित झालेला असो वा अभावित घडलेला विनोद सांगतांना असो. बहिणीचा मृत्यूदेखिल त्याला ती 'बहीण' म्हणून इतका लागतो की त्याचाच 'या सार्‍याला काय अर्थ' हा प्रश्न तो मृत्यू ठळकपणे अधोरेखित करतो म्हणून लागतो?

>> संध्याकाळी पावसात भिजून हॉस्टेलवर परतल्यावर पांडुरंगला झालेला साक्षात्कार ...... मी प्रत्येकवेळी हा भाग वाचताना शहारतो - घाबरतो. केवळ उरतो.
अगदी! मीही!!

या पुस्तकाला महायुद्धानंतरच्या बदललेल्या काळाची/मानसिकतेची पार्श्वभूमी आहे याबद्दल नेहमी बोललं जातं. पण पांडुरंग खरंच तत्कालीन पिढीचं प्रतिनिधित्व वगैरे करू पाहतो का? मला असं कधी वाटलेलं नाही. पांडुरंग कुठल्याही काळात जन्मला असता तरी असाच 'एलिअनेटेड'च असता बहुतेक. म्हणून तर तो स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आपल्यापर्यंत पोचतो.

कोसलाची भाषाशैली मात्र खूप सहज आहे,

मी या पुस्तकाच्या प्रेमात पडले ती मुख्यतः शैलीसाठी.
पांडुरंगाची निवेदनशैली कमालीची सहज आहेच
कोसला केवळ मांडणीची ट्रिक आहे आणि निम्मे पुस्तक वाचल्यावर भिरकावून देण्याचे आहे

>>>

शेवटचे वाक्य माझे आहे. पहिल्या तीन वाक्यात आणि त्यात गुणात्मक फरक आहे काय?

दुर्गुणात्मक फरक आहे. Proud

जोक्स अपार्ट,
पहिल्या तीनही वाक्यांत शैलीव्यतिरिक्तही पुस्तकात काही सापडल्याची सूचना आहे.

टण्या लै विचार बिचार करुन मस्त लिहले आहेस.

फक्त कोसला संबंधी लिहायचे तर मलाही कोसला आवडते. का? तर अरभाटाचे कारण तेच माझे. (अरभाट - जियो)
कोसला नक्कीच अस्वस्थ करते. का? तर नायक पलायनवादी/ निराशावादी आहेच, त्यामुळे माझ्यासारख्या अतिपॉझिटिव्ह असणार्‍या व्यक्तीला राग येतो पण असेही व्यक्ती आहेत ह्याचे दर्शन होते. समाजात कुंठा निर्मान करण्याचे कार्य पांडुरंग सदृष्य व्यक्ती निर्मान करतात त्यामुळे आपणही ह्याच समाजाचा एक भाग असल्यामुळे आहे हे असेच आहे, हे स्विकारावे लागणार, आणि असे पांडुरंग हा प्रत्यक्ष जिवनात भेटत राहतात, काहीच न करता हातावर हात धरुन बसणारे य व्यक्ती आजूबाजुला दिसतात आणि नेमले ह्यामूळे मला अस्वस्थ व्हायला झालं पण हे अस्वस्थ होणे हे अरभाट म्हणतो तसे कांदबरीचे यश आहे असे शेवटी म्हणावे लागेल.

पण नेमाडेपंथ बिंथ आपल्यालाही नामंजुर आहे. इथे टोणग्याशी मी सहमत आहे. चांगदेव चतुष्ट्य वर वेळोवेळी पार्ले, मी वाचलेले पुस्तक येथील चर्चेत हेच मांडले की त्यांचे सगळे नायक पलायनवादी आहेत. पलायनवाद एका पुस्तकात निट मांडल्यावर तेच ते उगाळत बसन्यात काय अर्थ आहे देव जाने. कधी कधी नेमाडे स्वतः पलायनवादी असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब पुस्तकात उतरते की काय अशी शंकाही वाचक म्हणून मनात येते. ते पलायनवादी, निराश नसतीलही, पण रिपिटेशन हे त्यांचा पुस्तकाचे गमक होय. हुल मध्ये आहे तेच जाती बदलल्या की झुल मध्ये तेच बिढार मध्ये. म्हणजे नक्की रिपीटेशन करुन काय साधायचे होते हे कळत नाही.

हे कोसला संदर्भात नाही ..

माझं वाचन फार नाही पण मला जेव्हढं वाचलंय त्यावरून हेच वाटत आलंय की एकाच लेखकाची जेव्हढी जास्त पुस्तकं वाचत जातो आपण तसतसं त्यात stereotyping आढळंत जातं .. नेमाडेंच्या बाबतीतही ते खरं असेल ..

मी भालचंद्र नेमाडेंचे फक्त कोसला हे एकच पुस्तक वाचले आहे. ईतर पुस्तके वाचली नाही कारण कोसला वाचूनचं गार झालो होतो अगदी. मलाही शैली खूप आवडली ह्या पुस्तकाची.

टण्या - छान मनापासून लिहिलसं आणि मनापासून मला आवडलं. बाकी चर्चा फार जड झाली आहे मात्र नेहमीप्रमाणे होते तशी Happy

टण्या, रैना धन्यवाद.
'कोसला' महानच. काचेच्या तुकड्यावर वाळूनं चित्र काढून ती निर्विकारपणे पुसणारे आणि नवं चित्र काढणारे लोक असतात ना, त्यांच्या जातीची त्यांची विलक्षण शैली. वर टण्यानं उल्लेख केला आहे, त्यांच्या अलिप्तपब्णे बदाबदा पाणी ओतण्याच्या निर्दयपणाचा.
पण नंदनकडून 'कॅचर इन दी राय' आणि 'कोसला'तली साम्यस्थळं कळली, पुढे पुस्तक मिळवून वाचलं, तेव्हा नेमाड्यांनी त्या पुस्तकाचा निदान उल्लेखतरी करायला हवा होता, ऋण वगैरे खड्ड्यात गेलं, अशी सूक्ष्म बोच वाटलीच. त्यानं पुस्तकाच्या गुणवत्तेत फार कमीजास्तचा फरक पडत नसला तरीही.

तरीच !!!

काचेच्या तुकड्यावर वाळूनं चित्र काढून ती निर्विकारपणे पुसणारे आणि नवं चित्र काढणारे लोक असतात ना, त्यांच्या जातीची त्यांची विलक्षण शैली>> मला हे वाक्य अजिबात कळलं नाही.. Happy

टोणगा, तरीचं म्हणजे काय.. स्पष्ट बोला पाहू....

सुरेख लेख. रैना आणि अरभाट यांच्या प्रतिक्रियांशीही सहमत आहे.

'कोसला'बद्दल ऐकून असलो तरी पहिली ओळख दहावीच्या पाठ्यपुस्तकात (बुद्धदर्शन नावाच्या धड्यातून) झाली. पुढचे-मागचे संदर्भ नसल्याने धडा तितकासा आवडला नाही. त्यानंतर १-२ वर्षांत 'कोसला' वाचायला घेतलं खरं, पण अर्धं वाचून सोडून दिलं. पुढच्या खेपेला मात्र वाचून झाल्यावर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'हे थोर आहे' अशी प्रतिक्रिया उमटली. त्याहीनंतर अचानक कधीतरी यातल्या लक्षात राहिलेल्या दोन वाक्यांचा -- 'तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं...तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली' आणि 'पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती. म्हणून हे फेरे - मर्द बापांपायी' --- यांच्यातला परस्परसंबंध लक्षात आला आणि शेवटच्या त्या दैनंदिनीतल्या (आणि एकंदरीतच कादंबरीतल्या) भाषिक प्रयोगांबद्दलचा आदर वाढला.

हे कदाचित नैसर्गिक असावं. कोसला, शाळा, टू किल अ मॉकिंगबर्ड, लंपन यासारखी Bildungsroman कॅटॅगरीत (वयात येतानाच्या वयातल्या (!) अनुभवांचे चित्रण करणार्‍या कादंबर्‍या) मोडणारी पुस्तकं कदाचित वाढत्या वयात 'ओळखीचे ते अनोळखी कुणी' सारखी वाटत असावीत. त्या त्या लेखकाच्या प्रतिभेबरोबरच आपणही असेच कधी काळी उदाहरणार्थ तंतोतंत मॅडसारखा थोर विचार करायचो, ह्या भावनेचा - अगदी छोटा का होईना - ही पुस्तकं आवडण्यात भाग असावा Happy

मी बारावीच्या सुट्टीत वाचली होती कोसला आणि अगदीच आवडली/ कळली/झेपली नव्हती. याक्षणांपर्यंत ते मत कायम होतं पण लेख आणि चर्चा वाचुन मात्र परत कोसला वाचाविशी वाटतेय.. कदाचित यावेळी कळेलही.. Happy

"हे कदाचित नैसर्गिक असावं. कोसला, शाळा, टू किल अ मॉकिंगबर्ड, लंपन यासारखी Bildungsroman कॅटॅगरीत (वयात येतानाच्या वयातल्या (!) अनुभवांचे चित्रण करणार्‍या कादंबर्‍या) मोडणारी पुस्तकं कदाचित वाढत्या वयात 'ओळखीचे ते अनोळखी कुणी' सारखी वाटत असावीत. त्या त्या लेखकाच्या प्रतिभेबरोबरच आपणही असेच कधी काळी उदाहरणार्थ तंतोतंत मॅडसारखा थोर विचार करायचो, ह्या भावनेचा - अगदी छोटा का होईना - ही पुस्तकं आवडण्यात भाग असा"

हेच टाळायला मी शाळा वाचणं टाळतोय. पण आता पिच्चर येतोय म्हटल्यावर वाचावी लागणार. बाकी कोसला मी फार कोर्‍या पाटीचा असताना वाचली...

'कोसला' आवडण्याचं कारण म्हणजे त्यातला वाया जाण्याचा फेज.
तो काळ फार विचित्र असतो, किंचित दिर्घही..
पण पोकळीसारखा.
पुन्हा मागे वळून पहावं तर अस्पष्ट आठवणारा.
तो ज्याला लख्ख आठवतो तो 'कोसला' लिहतो,
बाकीचे निव्वळ आवड-नावडण्याची कारणे..

(काल अचानक 'लख्ख' Proud झालेला विचार)

Pages