जावे त्याच्या वंशा (ललित लेख मालिका): १. बिगारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बिगारी

"अलिकडे जरा जास्तच थंड वाटतय.." तसे कॅलिफोर्निया मधे येवून फ़ार दिवस नाही झाले. तेव्हा इथेच राहणार्‍या लोकांनी असे म्हटले तेव्हा थंडी खरच जास्त वाटू लागली. पण पूर्वेकडील राज्यातून बरेच हिवाळे काढल्यावर ही थंडी म्हणजे कुणी हळूच फ़ुंकर मारावी तशी भासते पण बहुदा काही काळाने इथली हवा अंगी मुरली की मलाही ती बोचू लागेल. अर्थात चोवीस तास कन्डीशन्ड एयर मधे वावरणार्‍या इथल्या संस्कृतीत अशा हवा बदलाची माझी जाणीव अजूनही शिल्लक आहे हेच नवल!

भोवतालच्या जगाशी मिळत जुळत घेण हा स्वभाव धर्मच आपला. survival of fittest चं शास्त्र हे आपल्यालाही लागू होतच, अर्थात आपण जिवंत असतो तोपर्यंतच. मात्र कधी कधी अगदी हट्टाकट्टा किंव्वा वरकरणी एकदम सुदृढ मनुष्य सुद्धा अचानक हृदयविकाराने मरतो तेव्हा तोन्डात बोटे घालण्याखेरीज आपल्याला काही करता येत नाही. ह्या अशाच काही अनाकलनिय गोष्टी घडतात किव्वा मधूनच एखादी सुनामी येते तेव्हा रोजमराच्या जीवनातील बूडापासून टाळूपर्यंत गोठलेल्या काही शिरा पुन्हा तडतडतात, आणि डीफ्रॉस्ट केल्यागत सहज वितळतात. अनुभव सारे आपलेच असतात फक्त डीफ्रॉस्ट व्हायला काहीतरी निमित्त लागत इतकच.

जावे त्याच्या वंशा हे असेच काही अनुभव, इन्द्रीयांच्या कप्प्यात कुठेतरी आपणच सोयीस्कर गोठवून ठेवलेले, अन अगदी साधं निमित्त मिळालं तरी पुन्हा आपल्याच नकळत ओघळलेले. जाणीवा बोथट झाल्या तरी त्या शिल्लक असल्याची खूण! रेस्टॉरंट मधिल वेटर म्हणून काम करणारा तरूण मुलगा, किव्वा construction site वर खपणारा काळा निळा देह, पडद्यामागून ध्वनी व प्रकाश देणारा अदृष्य कलाकार, किव्वा अगदी रोज प्रत्त्येक बातमी वाहिनीवर पाहिलेल सुनामी च थैमान-सुन्न मृतदेहही किती भडभडून बोलतात याची जिवंत साक्ष.

निमीत्त काहिही असो पण शेवटी जाणीव शिल्लक आहे तोवर एखाद्या कुंचल्यातून किव्वा कवितेतून, छायाचित्रातून वा लेखातून हे अनुभव प्रकट होतच रहाणार, तुमचेही व माझेही. जावे त्याच्या वंशा हे असेच अनुभव, त्या त्या वंशात जवळून अनुभवलेले.

1. बिगारी

" साहेब तेव्हडं लिहून द्या की.. जास्त नाही फ़क्त चार ट्रक " .
" मल्लप्पा, जमणार न्हाई म्हटल ना. डोक खाऊ नकोस, चल ते घण उचल अन कामाला लाग " .
" साहेब तुम्ही न्हाई दिलत तर मोठे साहेब देतील, कशाला खोटी करताय तुम्हाला बी दोन येळच जास्त " !
नुकतच देशात सिव्हील इंजीनीयर झाल्यावर, साईट इंजीनीअर म्हणून एका नामांकीत कंपनीमधे काम बघत होतो. मल्लप्पा तिथलाच एक बिगार, वेठ बिगार, म्हणजे दुसर्‍या कंत्राट्दाराकडे (contractor) कायमचा कामाला. दगड, माती खणून ट्रक मधून भरायची हे त्याचं काम तर त्या कामाचं चलन बनवायच ही माझी असंख्य इतर कामांपैकी एक जबाबदारी. दिवसाला किती ट्रक भरले याचा हिशेब ठेवताना रोज मल्लप्पाचा व माझा हा वरील संवाद.

मल्लपा खर्‍या अर्थाने मातीत मुरलेला अन मी काही दहा वीस पुस्तकांच्या चाळणीतून शेवटी मिळावलेल्या पदवी प्रमाणपत्रात अडकलेला. अर्थात त्याचा वंश वेगळा, माझा वेगळा..पण अस खोट चलन लिहून द्यायच? माझ्यासाठी प्रश्ण तत्वाचा अन त्याच्या साठी घरातल्या तेलाचा किव्वा सणासूदीसाठीच्या वर कमाईचा.

माझ्या वडीलांइतकं वय असणार्‍या माणसावर तरी काय शिव्या घालून ओरडायचं? शेवटी मल्लप्पाच्या या रोजच्या तगाद्यावर मी वैतागून निघून जात असे. अन मग साईट ऑफीस मधे बसून एकटाच चरफ़डत असे. जमिनीवरून प्रथमच आकाशात झेपावणारी पतंग फ़डफ़डली नाही तरच नवल. बंद दारे व चार भिंतींच्या संस्कृतीतून अस वेगळ्या विश्वात जगताना माझी ही नवशिक्की फ़ड्फ़ड मला नविन होती आणि बोचतही होती. एरवी घरात धूळ आली तर कुरबूर करणारा मि अगदी शब्दशः मातीत खेळत होतो, तरी म्हणतात तसं अगदी पाळं मूळं खणायची वेळ आली नव्हती इतकच.

कामावर नवीनच रुजू झालो तेव्हा मल्लप्पा सारख्या इतर मजूर व बिगार्‍यांना " ओ बुवा " अशी हाक मारायचो तर बाया माणसांना " अहो बाई " ! माझे हे शुध्ध उच्चार त्यांना रुचले नसावेत बहुदा. हे कोण नविन बुकं शिकलेलं पोरगं आलय कामावर- असले भाव त्यांच्या चेहेर्‍यावर असत. एकदा आमच्या मोठ्या साहेबांनी मला धंद्याचे चार शब्द (थोडक्यात brainwashing) ऐकवल्यावर मी भित भीत "अरे भोस xxx" अशी खणाखणीत शिवी एका अंगाने काटक्या मजूराला प्रथम दिली. तेव्हापासून मला " जी " असे उत्तर देणार्‍या तमाम वीस तीस बाई माणसाच्या समूहाने " साहेब " म्हणायला सुरुवात केली. त्यावेळी तिथे भ च्या बाराखडीची पॉवर मलाही चांगलीच लक्षात आली.

मग मल्लप्पा सारख्याला मल्ल्या अन त्याच्या बायकोला " ए बाई " अशी एकेरी हाक आपसूक माझ्या तोंडातून येवू लागली. माझी तीच भाषा त्यांना जास्त जवळीची वाटत असावी किव्वा तसल्या अर्वाच्य सर्वनामाना त्यांच्या बिगारी शाळेत अधिक भाव असावा. एक मात्र खर की मल्ल्याची बिगारी भाषा बोलताना जिभेला पडलेले पीळ नंतर फ़ार मुश्किलीने सुटले होते. तब्बल एक वर्ष त्यांच्यातला एक साहेब म्हणून जगताना त्याच्या वंशातील पाहिलेलं सुख दु:ख अजूनही माझ्या कुठल्यातरी काळ्या निळ्या धमनीत असच गोठून राहीलय अन रस्त्यावर एखादा मजूर असाच उन्हात खपताना पाहिला की माझ्या नकळत काही धमन्या टरटरतात.

मल्लप्पा तसा अंगा पिंडाने मजबूत. त्याची बाई उलट अगदी काटक मात्र माझ्या हिशेबाच्या कागदावर तिची मातीची घमेली बहुदा जास्तच भरायची. मल्लपाची दोन्ही मूलेही रोज हजर असत. एकाला cement-concerete च्या घाण्यावर जुंपलेला तर एक आईच्या हाताशी असे, त्याचा एक पाय अर्धा दुमडलेला. मल्लप्पावर तरी ओरडणं शक्य होतं पण त्या बाया, बापड्या व पोरांशी नजर मिळवून कडक बोलणं तितकं सोपं नव्हतं, कदाचीत माझे संस्कार आडवे येत असावेत. किव्वा घमेली वाहणार्‍या व प्रसंगी दगड फोडणार्‍या त्या माऊलीच्या डोळ्यातील प्रश्ण, व मुलांच्या कोवळ्या शरीरावरील पीळ, याचा सामना करायची हिम्मत तेव्हा माझ्यात नव्हती. भर उन्हात अस साईट वर खपताना कामात कमी जास्त झाल तर मनाचा दगड करून त्यांच्यावर ओरडावं लागत असे. तापली घमेली डोक्यावर, त्यात ते अवजड दगड, अंगा अंगातून घाम गळलेला, फ़ाटक्या साड्यातून शरीर शिल्लक असल्याचा पुरावा, पाय दुमडल्या पोरावर नजर अन प्रत्त्येक पावलानिशी वाढणारा शिरातील तो ताण. माऊलीचं असं रूप इतकं जवळून पहायचं नव्हे तर पुन्हा तीच्यावर ओरडायचं ही माझ्या द्रुष्टीने काळ्या पाण्याची शिक्षा होती. मि भोगत होतो पोटासाठी, तिही सहन करत होती पोटासाठीच. एकाच जमिनीवर माणसा माणसातील केव्हडी ती विषमता!

हेही कमी म्हणून की काय तर दोन महिने एका नविन workshop expansion साठी चक्क जंगलतोडीची देखरेखही वाट्याला आलेली. अत्यन्त घनदाट झाडी. दलदल, कीडा, मुन्गी, डास, सर्वान्चे अधिराज्य अन कायम अन्धार. प्रत्त्येक झाडाचं सर्वेक्षण करून त्यावर क्रमांक टाकायचे. पुन्हा कुठली तोडायची, कुठली पुन्हा दुसरीकडे लावायची, कुठली फेकायची ते सर्व पहायचे. दगड फोड व प्रसन्गी वीटा माती वाहणार्‍या याच जमावातील अगदी शेम्बडी पोरे देखील कितीतरी झाडे सहज ओळखत असत अगदी त्यान्च्या अन्गणात असल्या सारखी. "साहेब त्या झाडाला हात लावू नका.." किंव्वा "ते पान तोडू नका, खाज येईल" वगैरे सूचना हेच लोक करत. इथे माझं पुस्तकी शिक्षण किती कुचकामी आहे याची प्रकर्शाने जाणीव झाली. तरी आम्ही साहेब लोक म्हणून आम्हाला वेगळे हात व पाय मोजे, वेगळे कडक बूट, वेगळा पेहेराव, अशी सर्व कामाची खास साधने होती पण प्रत्त्यक्ष काम करणार्‍य त्या मजूरांना मात्र उघड्या देहावर सर्व काटे, कीडे, झेलत व सहन करत राबावे लागत असे. कित्त्येक वेळा तर असहय्य होवून आम्ही पाला पाचोळा पेटवू, धूर करू, जेणे करून डासांसून संरक्षण मिळावे. अनेक झाडं मूळं तुटून पडताना अगदी जवळून पहातो तेव्हा मनात एक मूक उन्माद अन चलबीचल होत असे. त्या फ़ान्द्या मूळान्ची कहाणी आपल्या यान्त्रिक प्रगतीसाठी अशी क्षणात सम्पवताना मुम्बईतील कड्या कुलुपा मागची सुरक्षितता अधिक मोलाची भासत असे.

उन्हा तान्हातून या जमावाबरोबर घाम गाळताना खर तर मिही या कुटुम्बातलाच एक झालो होतो. फ़रक इतकाच की उन्हातून काळा पडलेला चेहेरा, मान, गळा, मनगटापुढील भाग यावर या कष्टाच्या राकट, माकट, पुराव्यान्ची पूटं चढली होती, बाकी देह मात्र माझ्या ब्राह्मणी वंशाच्या गोर्‍या रन्गाची लाज बाळगणारा, किंव्वा मी पान्ढर्‍या डगल्यातला व ते फ़ाटक्या डगल्यातील, हाच एक फ़रक. माझं तसं रूप बघून तर कधी कधी घरचे देखील अस्वस्थ होत असत. अरे अशाने चांगली गोरी मुलगी मिळणार नाही वगैरे, त्यांची ती काळजी. पण मी जे भोगत होतो अनुभवत होतो त्या सर्वापुढे ती किती शुल्लक, अनाठायी व स्वार्थी वाटत असे.

मल्ल्याच्या पाय दुमडलेल्या पोराची कहाणी ऐकून तर मला रात्रभर झोप लागली नव्हती. बिगार्‍याचं पोर म्हणून जन्माला आला म्हणून केवळ त्याला ती शिक्षाच होती जणू.

बरेच वेळा rock blasting काम चालायच. त्यात नियन्त्रीत स्फ़ोट करून अत्त्यंत खोल व प्रचन्ड शिळा व दगड फ़ोडायचे गरजेचे असे. स्फ़ोट करण्या आधी दगडातून व जमिनीतून drilling करून जागो जागी ती स्फोटके, जीलेटीन कान्ड्या (चार्ज) वगैरे भरायचे, त्यावर भली मोठी वाळूची पोती, पत्रे इत्यादी ठेवायचे जेणे करून धूळ व दगड इतरत्र उडणार नाहीत. मग स्फोट संपले की सर्व स्फोटके व चार्ज वापरले गेले आहे ना, अजून blasting आवश्यक आहे का वगैरे च सर्वेक्षण करायच काम आम्ही करत असू. अर्थातच, ते पत्रे, वाळूची पोती, दगड असे वीस वीस फ़ूट हवेत उडताना बघून एक भन्नाट thrill वाटायचे पण स्फोटानंतरचे सर्वेक्षण करताना अन्गावर अक्षरशः काटा यायचा. चुकून एखादा चार्ज शिल्लक असला अन नेमका आपल्या पायात फुटला तर...? अर्थातच यावर तोड म्हणून पहिले या मजूर लोकानी सर्वेक्षण करायचे मग आम्ही. एक पान्ढरा डगळा, hard hat व इतर पेहेराव केला म्हणून माझ्या जिवाला किम्मत जास्त, तर जन्मजात काळी कातडी मिळाली म्हणून त्या बिगार्‍याच्या जीवाची किम्मत जवळ जवळ शून्य.

अशाच एका सर्वेक्षणात चुकून एकदा मल्ल्याबरोबर त्याचं लहान पोर गेलं, अन न फुटलेल्या चार्जचा चुकून स्फोट होवून आपल्या पायाच्या पावलाचा भाग गमावून बसलं. त्यावर मल्ल्याला थातूर मातूर ऐकवून व हजार दोन रुपये देवून मोठ्या साहेबानी प्रकरण मिटवलं खरं पण त्या पोराच्या आयुष्याची वाटचाल मात्र कायमची खुन्टली अन दुमडणं व मुडपणं वाट्याला आलं.

हळू हळू माझा तसा प्रेमळ व थोडा आपुलकीचा स्वभाव पाहून अनेक मजूर माझ्या हाताखाली काम करायला मागत असत. प्रत्त्येकाची एक कहाणी, प्रत्त्येकाच एक कुटुंब, त्यात मीही रमत असे. जमेल तसे त्याना मदत करत असे. ढोर मेहेनत करणारी ती मल्ल्याची बायको अन पोरं. पण या उलट मल्लप्पा, कमी काम करून जास्त पैसे कसे लाटता येतील यातच त्याचं लक्ष. बायको पोरांना अस राबवून हा मनुष्य पुन्हा वर खोट चलन बनवा म्हणतो या विचाराने मग माझ्या जीवाची अधिक चरफ़ड होत असे. एकदा साईट ऑफिस मधे बोलावून घेतला. म्हटल, "मल्ल्या हराम्या, तुला काय लाज शरम आहे की नाही...?"
तशी ती लाल भेदक नजर रोखून म्हणला, "साहेब तुम्हा लोकासनी तरी कुठ असतीया लाज? आम्च काय चालायचच.."
आत मात्र हद्द झाली. मि पुढे त्यावर खेकसणार इतक्यातच तो म्हणला, तुम्हाला काय माहीत? तो तुमचा मोठा साहेब रोज चार ट्रक जास्त लिवून देतो पण फ़ुकट नाही साहेब, वसतीतील बाई बी घेवून जातोया...

त्याने पुढे काय संगितल ते मला ऐकूच आल नाही. खाडकन कुणीतरी मुस्कटात मारल्यागत बधिर झालो मी. मला "साहेब" या शब्दाची प्रथमच इतकी कीळस आली, मल्लप्पाच्या भेदक नजरेतून माझा साहेबी वंश पहाणं नकोसं वाटलं.

"जाऊद्या साहेब तुम्ही भले माणूस राहीलात, उगाच फ़ुटकळ बोलतोय मी.." त्याच्या या शब्दाने मी भानावर आलो.

माझ्या अवतीभोवती इतकं काही चालू असताना मला खबरही नव्हती. बंद दरवाजे व एयर कंडीशंड संस्कृतीत माझी इंद्रीये इतकी अचेतन झाली असतील ? रोज उन्हातान्हात खपणारी माऊली दिवे लागणी नंतर उरल सुरलं शरीर पुन्हा कुणा साहेबी जनावराच्या हाती कसं सोपवत असेल, अन इतक करूनही आपल्या पोरासाठी माया कुठून आणत असेल, अन त्याच साहेबाची थुन्की झेलताना या मल्ल्याला काहीच कस वाटत नसेल..? मल्लप्पाच्या त्या लाल कडक नजरेतून माझच रक्त ऊकळल्यागत भासत होतं.

"मल्ल्या उद्या वसतीवर येतो मी..", माझे शब्द ऐकताच मल्लप्पा खूष झाला.

तसं पाहिलं तर आमचा संबंध फ़क्त रोज सात ते पाच एव्हडाच. त्याखेरीज या लोकांच्यात कधी मिसळलो नाही पण माझी रोजची चरफड असही मला स्वस्थ बसू देत नव्हती. कसल्या तरी सणासूदीच्या निमित्ताने त्याच्या वसतीवर गेलो. ते जगच वेगळं अन त्या जगाचे नियमही आगळेच. बाई फ़क्त खपायला, वापरायला व भोगायला हाच तिथला नियम. दावणीला बान्धलेलं जनावर जणू. अन आपली बाई दुसर्‍याला पुरवूनही आपण तिला जपतो यातच यांचं पौरूषत्व!

" शाळेत वगैरे नाही का घालणार पोरांना..? " अस मि विचारल्यावर काय निरर्थक प्रश्ण विचारतोय अशा नजरेने बघत मल्लप्पा म्हणला, काय करायच बुकं शिकून आत्ताच कामाला लागला की मग पुढ कंट्रक (contract) घेईल, आमच्या सारखा बिगार नको रहायला.
रोज माझ्या समोर घाम गाळणार्‍या त्याच्या बाईने मायेने जेवण वाढल तेव्हा काळजात खोल तुटलं. तिची ती भाकरी व चटणी माझ्या नेहेमीच्या लंच पेक्षा अधिक चवदार असेलही पण गळी उतरणं अशक्य झाल. मात्र तीच्या एका प्रेमाने वाढलेल्या भाकरीने माझ्या डोक्यातील जातीय वादाच भंगार मोडीत काढलं.
म्हाद्या, टोणे, गोन्ड, प्रत्त्येक बिगार्‍याची हीच कथा अन माझ्या मोठ्या साहेबाचं नाव घेताच त्या वसतीतल्या बायांनी एक खसखशीत शिवी देत तोन्डातील दारू थुंकणं हे ही अगदी तीतकच दाहक.

सकाळच्याला सात वाजल्यापासून हातोडे, घमेली, फावडी, कुदळी चालवून या जमातीचं काळीजही पाषाणागत होत असेल का आणि या बाईला तरी काय म्हणावं? आई, बाई, ताई, की माई ? माझे अनेक न सुटलेले प्रश्ण पण त्यांच्या जगातील बोचरं उत्तर यांचं नाव बिगारी, बिगार्‍याची बिगारी. बिगार म्हणून जन्माला आलेलं पोर अन बिगार्‍याचं अर्ध नशीबही वाटून घेणारी त्याची अर्धांगिनी, म्हणजे बिगारी. तीच्या शापीत वंशाचं ते सत्त्य जवळून अनुभवलं की अजूनही India Shining ची धूळफेक डोळ्यात अधिकच बोचते.

अन याच पृथ्वीवरचं इथलं एक दुसरच जग-कॅलिफोर्निया. इथे काम बन्द पडतं कारण कुठल्यातरी स्थलान्तरीत पक्षान्चा नेस्टींग सिझन असल्याने त्या भागात काम करायला पर्यावरण विभागाची त्या काळापुरती बन्दी असते. वाटेत साप, वा तत्सम एखादा जन्गली प्राणी आडवा गेला तर call 911 अशी (हास्यास्पद) सूचना असते, दगड उचलून त्यावर भिरकावलेला जर कुणी पाहीलं तर त्या कितीही विषारी वा हिंस्त्र श्वापदापायी तुमची नोकरी गेलीच समजा. अब्जावधींची उलाढाल करताना अनेक प्रकारचे परवाने, कायदा, सुरक्षा, क्वॉलिटी चे नियम जपावे लागतात आणि करोडो बुडाले तरी चालतील पण कामावरील एकाही मजूराचे बोटही कापले जाता कामा नये या दृष्टीने पाळलेले नियम व संरक्षक तत्वे अन त्याला पुरक कायदे.

इथला मल्लप्पा त्याच्या मोठ्या थोरल्या पिकप ट्रक मधून येतो. स्टेक्स, ग्रिल बर्गर व वर सोडा पिऊन कामाला सुरूवात करतो. त्याच्या साठी सेफ्टी हॅट्स, संरक्षक चष्मे, ध्वनी व धूळ प्रदूषणापासून बचाव करणारी ऊपकरणे असं सर्व काही पुरवलं गेलेलं असतं. तुमच्या आमच्या पेक्षा तासाचे पैसे तो अधिक मिळवतो, इथल्या राजकारणातही सक्रीय सहभाग घेतो. आम्ही एक मेकाना नावाने हाक मारतो, कधी कधी त्याच्या Perrie Cardin/ Van Huesen brands पुढे माझे शर्टही फ़िके पडतात अन त्याची बिगारी कुठल्याश्या मॉल मधील विकेंड शॉपींग सेल साठी त्याला घेवून शुक्रवारी कामावरून लवकर पसारही होते.
*****************************************************
(मूळ प्रकाशनः २१ मार्च, २००५)

विषय: 
प्रकार: 

किती ताकदीचे लेखन. वेदना पोचली.

पण भेद वरवरचे नाही वाटले तुम्हाला? तिथल्या मल्लाप्पा आणि तिथल्याही साहेबांचे असेच द्वंद्व असणार ना..There are no absolutes. असे वाटुन गेले खरे.

>पण भेद वरवरचे नाही वाटले तुम्हाला? तिथल्या मल्लाप्पा आणि तिथल्याही साहेबांचे असेच द्वंद्व असणार ना..There are no absolutes. असे वाटुन गेले खरे
रैना,
धन्यवाद!
शंका रास्त आहे... पण माझ्या तिथल्या १०+ वर्षाच्या अनुभवात तरी तसले द्वंद्व पाहीलेले नाही. मुळात वागणूक, सोयि सुविधा, सुरक्षा, सामाजिक प्रतिष्ठा ही तिकडे (अमेरीकेत) दोघांच्या बाबतीत सारखी आहे, किंवा भारताईतकी प्रचंड विषम नाही (बांधकाम व्यवसायात तरी) असे म्हणायला हरकत नाही. शिवाय दोघांच्या मुलभूत गरजा पुरवल्या जात आहेत कुठल्याही शोषणाशिवाय त्यामूळे भेदा भेद करायला वा द्वंद्व व्हायला फारसे कारण ऊरत नाही असा माझा अनुभव आहे. आपल्याकडे अजूनही साहेब अन बिगार यांना मिळणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा, सुविधा, सुरक्षा या बाबतीत प्रचंड विषमता आहे.. तसाच अनुभव गल्फ मधेही आला/येत आहे..

योग सुरेख मांडलं आहेस. तुझी तगमग पोचली. गल्फबद्दल अगदी पटलं. कामगारांच्या एसी नसलेल्या बसेस बघुन खरचं जीव कळवळतो. निदान इथल्या उन्हाळ्यात तरी एसी बसेस असाव्यात.
रमादानमध्ये १२ ते ४ काम नाही नियमसुद्धा काही वेळा उलट परीणाम करतो. त्या वेळात काम बंद असतं पण कामगारांना बसायला किंवा आराम करायला जागाच नसते. कस्ब्यात काम चालु होतं तर बिचारी माणसं पुलाखाली दाटीवाटीनं बसल्या बसल्या झोपायची.

सुंदर नाही म्हणवत कारण जे लिहिलं आहेस ते भयाण वास्तव आहे. पण खूप ताकदीचं लिहिलं आहेस - थेट काळजातच गेलं.

विलक्षण ताकदीने लिहीलयं.. आतुन पिळवटुन निघतं अगदी.. पण तात्पुरतं.. खरचं जाणिवा गोठल्यात आपल्या.. Sad

केवळ सत्य मांडले आहे लिखानातुन... (चांगले आणी वाईट असे काहिच नसते ह्या जगा मधे ह्यचा प्रत्यय परत एकदा वाचायला मिळाला Sad )

तो तुमचा मोठा साहेब रोज चार ट्रक जास्त लिवून देतो पण फ़ुकट नाही साहेब, वसतीतील बाई बी घेवून जातोया...>>>>>
मला खरोखर कळत नाही, की लोक इतक्या खालच्या पातळीला का जातात? प्रत्येक छोट्या favour ची किम्मत वसूल केलीच पाहिजे असे का वाटत असावे, विशेषतः ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याला?
आणि तेही अशाकडून ज्याच्याकडे देण्यासारखे काहीच नाही? आणि या देण्या-घेण्यात नेहमी बायकाच का सापडतात? अनेक प्रश्न पडतात..अतिशय चीड येते मला..... काय करावे कळत नाही Sad

adi_v (अर्थात आता गणू.),
प्लीज तुम्ही आता तुमचे लिखाण शुद्ध करायचा प्रयत्न करा नि नंतर प्रतिक्रिया लिहा..{संदर्भः तुमच्या इतर लेखांवरील अनेक प्रतिक्रियांतील लिखाण्-चुका अर्थात spelling mistakes)
आणि हो, नवीन आयडी ने चुकच लिहिले पाहिजे असा काही नियम नाहिये Happy

इतक्या serious subject मधे असा reply टाकणे ....

आणि अशुद्ध लिहिणे यातील काय बरे जास्त चुक ?

असो. प्रयत्न चालुच आहेत. शुद्ध लिहिता आले असते तर अशुद्ध लिहीले असते का हो ?

या blog वर हे थाबावे ही विनन्ती! माझ्याकडुन पुन्हा उत्तर नाहि येणार - निदान येथे तरी.

योग, चांगले लिहिले आहेस.. हे वास्तव आहेच.. आपण (म्हणजे माझ्यासारखे) पळून दूर जातो, काणाडोळा करतो.. होय रे, नाही रे मधली दरी भयाण वेगाने वाढतेच आहे..