तराफ

Submitted by कमलेश पाटील on 6 June, 2010 - 01:17

(तराफ हा उर्दु शब्द असुन त्याचा अर्थ धोका असा होतो)

खरंतर हा सगळा आज खरंतर अंथरुणातून उठावंस वाटतंच नव्हत़ं. उगाच कुठेतरी मनात हुरहुर लागली होती. सगळं नीट घडेल ना की काही अघटित घडेल. खरंतर हा सगळा विचार निर्णय घ्यायच्या आधी करायला हवा होता. एक मन म्हणतं तू सगळं घाईघाईत ठरवलंस तर एक म्हणतं तुझ्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. खरंच नाईलाजच होता की माझा. एकीकडे सगळा संसार वाऱ्यावर टाकून गेलेला माझा आयुष्याचा जोडीदार तर दुसरीकडे माझ्या येण्याची वाट बघणारा माझा श्रावण.

जोडीदार म्हटलं की आजकाल हसायलाच येतं. कसली जोडी अन कसलं काय. दोघांचाही रेल्वेचा रूळ झालाय. समांतर .तसं बघायला गेलं तर श्रावण अन माझासुद्धा नदीचा काठ झाला होता फरक फक्त एवढाच होता त्या वेड्याने त्याचा संसारच कोरडा केला आमच्या दोघांतलं अंतर कमी करण्यासाठी.

श्रावण, माझ्या आयुष्यातलं एक मोरपीस, मनावर फिरलं की गुदगुल्या करणारं. खरंतर चारचौघांसारखं नव्हतंच आमचं प्रेम. आता तुम्ही म्हणाल असं सगळ्यांनाच वाटतं. तर ते चूक ठरेल कारण वाटणं अन असणं यात फरक असतो ना. प्रेमात फक्त द्यायचं, घ्यायचं नाही हे मला त्याने शिकवलं. मी पण वेडी त्याच्याकडून प्रेमाचा क्षण अन क्षण वेचून घेतला अन जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा समाज, नीतिमत्ता अन आईवडील यांच निमित्त काढून पाठ फिरवली. चारचौघींसारखं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण नाईलाजाने मी दुसऱ्याशी लग्नाला उभी आहे असं म्हणत त्याच्याशी तराफ केला. माझं प्रेम खरंच होत त्याच्यावर पण हिंमत नव्हती ते सिद्ध करायची. समाजाशी भांडून माझं प्रेम मिळविण्यापेक्षा मी गळ्यात मंगळसूत्र बांधून आयत्या राजाची राणी होण्याचा सुखाचा मार्ग पत्करला. कारण संस्कारच होते ना माझ्यावर समाजाच्या विरुद्ध नाही चालायचं, आईबापाचं ऐकायचं अन नाकासमोर चालण्याचं. पण नाकासमोर चालता चालता माझे डोळे नेमके तिरक्यावाटेनी श्रावणवर खिळले अन आयुष्याच्या सगळ्या वाटाच वाकड्या झाल्या. नवरा म्हणून ज्याचा हात धरून घराचा उंबरठ्यावर पाऊल ठेवलं, तो नवराच मला एकदीवस उंबरठा ओलांडायला लावेल हे कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी पण किती स्वार्थी होते. हेच जेव्हा मी श्रावणबरोबर केलं तेव्हा समाजाचा नियम होता अन आता माझ्या नवऱ्याचं वागणं माझ्या व्याख्येत बसणारं नव्हतं.

तुम्ही म्हणाल काय ही समाज अन समाजाच्या व्याख्येत अडकून बसलीय. पण खरं सांगू का या समाजाच्या नियमांमुळेच माझ्या आयुष्याची पायमल्ली झालीय.

माझं अन श्रावणचं प्रेम बहरत असतानाच त्या एका वाईट सकाळी माझ्यासाठी घोरपडेंच्या सुनीलचं स्थळ सांगून आलं. मुलगा एका नामांकित परदेशी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता, देखणा होता, आर्थिक सुबत्ता होती अन महत्त्वाचं म्हणजे तो मला हुंड्याशिवाय स्वीकारणार होता. एका मध्यमवर्गीय आईबापासाठी खरं म्हणजे ही आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन डोळे अशी परिस्थिती होती अन मलाही सुनिलमध्ये नाकारण्यांसारखी एकही गोष्ट दिसली नाही. याचा अर्थ मला सुनील आवडला होता असं नाही. पण एका सर्वसामान्य लग्नाला उभ्या असलेल्या मुलीप्रमाणे मीही विचार केला.

तसं बघायला गेलं तर माझ्या स्वप्नांवरही श्रावणचाच अधिकार होता. खरंच असे अधिकार आपल्याला ठरवता आले असते तर सुख ते या पेक्षा काय असतं. माझ्यापुढे खरंतर यक्षप्रश्नच उभा होता. मी कोणत्या शब्दात घरी सांगायचं की माझं श्रावनवर प्रेम आहे. तरी मनाचा हिय्या करून मी एकदीवस घरच्यांना सांगितलंच. आभाळ कोसळावं असे सुतकी चेहरे करून सगळेजण माझ्याकडे बघत होते. प्रत्येकाच्या नजरा मला प्रश्न विचारितं होत्या. क्षणभराच्या शांततेनंतर बाबा गरजले माझ्या घरात हे चालणारं नाही. समाज तोंडाला काळं फासेल. आईने तर रडून रडून आकांत माजवला होता. पुन्हा समाजाच्या नावाखाली माझ्या अपेक्षांची पायमल्ली.

घरात माझं हे वादळ आल्यावर सुरवातीला गरजणारे बाबा नंतर खूप शांत झाले, अगदी हरून गेल्यासारखे. आपण लावलेल्या वेलीवरचं फूल आपण देवाला घालायचा विचार करत असतानाच त्या फुलाने आपलं सर्वस्व एखाद्या भुंग्याला अर्पण करावं. क्षणभर वाटलं द्यावं धुडकावून हे प्रेम अन घालावी सुनीलच्या गळ्यात माळ घालावी. घरच्या लोकांनी मला परोपरीने विनवलं, शपथा दिल्या, धमक्या दिल्या शेवटी तर माझ्या श्रावणच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट होईल अशीही धमकी दिली. सगळंच खरंतर अवघड होतं. श्रावणला भेटून हे सगळं सांगायचं पण माझी तर कटपुतळी झाली होती.

शेवटी मीच एक युक्ती काढली की मी लग्नाला तयार आहे पण मला एकदाच श्रावणला भेटू दे. घरच्यांनी थोडे आढेवेढे घेतले पण तेही नंतर तयार झाले. ठरल्याप्रमाणे मी श्रावणला भेटायला गेले. श्रावण माझी अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होता. काय बोलायचं हे क्षणभर मला कळेचना. तरीही मनाचा हिय्या करून मि श्रावणला माझ्या आयुश्यातून निघून जा असं सांगितलं. तो माझ्याकडे बघतच राहिला. मला म्हणाला "अमृता असं काय वेड्यासारखं बोलतेस". खरंच वेडीच होते मी. समाजाचे नियम पाळण्यासाठी, माझ्या श्रावणला वाचवण्यासाठी मी हा वेडेपणा करत होते. श्रावणने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आपण घरातून निघून जाऊन लग्न करू. मी तुला आयुष्यभर साथ देईन. पण त्या वेड्याला कुठे माहीत होतं की माझ्याबरोबरचं हे लग्न त्याला मृत्यूच्या हातात देणार होतं. खूप समजावलं मी श्रावणला. समाजाची, माझी शपथ देऊन समजावलं मी त्याला. पण तो ऐकायला तयारच नव्हता. शेवटी अगदी जड पावलांनी मी तेथून निघाले मागे माझ्या श्रावणचा भूतकाळ मागे टाकून.

हा हा म्हणता दिवस निघून गेले. लग्नाची तारीख उजाडली. सप्तपदी चालून अन गळ्यात एक काळ्या मण्यांच मंगळसूत्र घालून सुनीलची पत्नी झाले. समाजाच्या दृष्टीने एक चांगली मुलगी, सून सगळंकाही. पण माझा या भूमिकांमध्ये सहभाग कोठेच नव्हता. सारखी आपली श्रावणची काळजी. तो कसा असेल? काय करत असेल? लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस भरकन संपले. सुनील तसा स्वभावाने ठीक होता पण प्रत्येकवेळी मी त्याला श्रावणशी तोलायची अन तो प्रत्येकवेळी मला कमीच वाटायचा.

गळ्यात मंगळसूत्र बांधल्यावर, सुरवंटाचं जसं फुलपाखरू होतं तशी माझी बायको व्हावी अशी सुनिलची अपेक्षा होती. मी सुरवंटासारखा कोश पांघरला होता माझ्या श्रावणचा पण माझ्या मनाचं फुलपाखरू कधीच मेलं होतं. सुनीलसारखं सुंदर फूलही त्याला मोहवू शकत नव्हतं. नाईलाज, वंचना, झिडकारणं अशा विशेषणांवर माझा अन सुनीलचा संसार चालू होता. सुनीलचं त्याच्या प्रेमाला मी प्रतिसाद द्यावा म्हणून अपेक्षा ठेवणं अन माझं आपलं त्या गावीही मी नाही असं वागणं. सुनीलला थोड्याफार प्रमाणात माझ्या भूतकाळाची माहिती होती. पण त्याच्यादृष्टीने तो कलंकित होता. अन ते दाखवण्याची एकही संधी तो सोडत नव्हता अन वर साळसूदपणे मी कसं तुला स्वीकारलंय हे दाखवायला विसरत नव्हता. पण मी कुठे बाबा तुझ्या मागे लागले होते माझ्या आयुष्याचं लक्तर तुझ्या आयुष्याला जोडायला.

सगळ्याच गोष्टी अनपेक्षीतपणे अन नाईलाजाने करत आले मी. सुनीलबरोबर रात्री जागवताना कोणीतरी माझ्या नाईलाजाचा फायदा घेतंय असं वाटायचं अन वेड मन मात्र मी श्रावणची प्रतारणा करत्येय म्हणून आक्रोश करायचं आता तुम्ही म्हणाल इतकंच प्रेम होतं तर करायचं होतं घराबाहेर पडून श्रावणशी लग्न. पण एवढं जर धाडस माझ्यात असतं तर मी समाजच नसता का बदलला. दिवसेंदिवस सुनीलमधला अन माझ्यातला दुरावा वाढत चालला होता. तसाही तो माझ्याजवळ कधी नव्हताच. त्याला आपलं मी बायकोसारखं दिसावं, राहावं अन वागावं एवढंच वाटत होतं. माझं नशीब इतकंच की संसार फक्त आम्हा दोघांचा होता. तिसरं कोणी नव्हत माझ्या भावनांचे धिंडवडे पाहायला.

आतातर सुनीलला स्वतःचं मूल हवं होतं. ज्या माणसाचा सहवासही आवडत नाही त्या माणसाचं मूल पोटात वाढवायचं यापेक्षा मोठा नाईलाज तो काय असतो. लग्नाला चार वर्षे पूर्ण होत आली तरी मला मूल नाही म्हणून मलाही थोडी धाकधूकच होती. खरंतर या परिस्थितीत मला मूल न होणं हे माझ्यासाठी चांगलंच होतं पण मला कुठेतरी भीतीच वाटत होती. मी जरा स्वार्थीच होते की नाहीतरी. एकीकडे मला सुनीलचं मूल नको होतं अन दुसरीकडे मला माझं आई न होणंही सहन होणारं नव्हतं.

मग मला नक्की काय हवं होतं. तर माझ्या मनांतून उत्तर आलं 'तुला श्रावणच्या बाळाची आई व्हावंस वाटतंय. 'उत्तर ऐकून मी दचकूनच गेले. नाही नाही म्हणत स्वतः फसत सुनीलला फसवत गेले. मला आई व्हायला लागलेला विलंब आणि श्रावणच्या बाळाची आई व्हावंस वाटणं या दोन गोष्टींमुळे मी आम्हा दोघांची म्हणजे माझी अन सुनीलची वैद्यकीय तपासणी करून घ्यायचं ठरवली. तिचे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यावर कळणाऱ्या निष्कर्षाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते.

अन तो दिवस उजाडला. ठरल्या वेळेप्रमाणे मी डॉक्टरांकडे सुनीलबरोबर गेले. हा पहिलाच दिवस होता आम्ही दोघे बरोबर बाहेर पडलो होतो. डॉक्टरांनी सुरवातीलाच सांगितलं की मी जे काही सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐका. त्यांनी रिपोर्ट वाचायला सुरवात केली अन सांगितलं सुनील बाप होण्यास अपात्र आहे. मी लाज नसल्यासारखी मनातून आनंदी झाले होते कारण मला सुनीलवर सूड उगवण्याची संधी मिळणार होती. पण मला हेच लक्षात येत नव्हतं की मी सुद्धा आई बनू शकणार नव्हते.

खरंच सूडाने मी आंधळी झाले होते. मला माहितच नव्हतं पुढे काय वाढून ठेवलंय याची. त्या घटनेनंतर सुनील अगदी शांतच राहू लागला. अगदी मला न खिजवता. आम्ही दोघेही आपापल्या स्वतःच्या कोशात हरवलो होतो. खरंतर अशावेळी मी सुनीलला आधार द्यायला हवा होता पण प्रत्येकवेळी मला भूतकाळ आठवायचाऽन पुढे पडलेली पावलं मागे पडायची. त्यानंतर जवळजवळ महिन्याने सुनील थोडा स्थिर झाला. पण मला काय माहीत याच्या मनात काय चाललंय.

त्या दिवशी सकाळी त्याने मला विचारलं "तुझा अन श्रावणचा कधी शारीरिक संबंध आलाय का? " अचानक विचारलेल्या या विकृत प्रश्नाने मी बावरूनच गेले. या घाणेरड्या मानसाला काय कळणार आमचं प्रेम. पण मला याला काहीही स्पष्टीकरण द्यायचं नव्हत.. मी दुर्लक्ष करून माझ्या कामाला लागले. तरी दिवसभर त्याची हिच भुणभूण चालू होती. शेवटी वैतागून मी म्हटलं नाही. हे उत्तर ऐकून तो कसल्या तरी विचारत पडला अन म्हणाला "जर मी तुला तशी सं धी दिली तर". त्याच हे वाक्य ऐकून मी त्याच्या कानाखाली खाडकन वाजवून दिली. तेव्हा त्याचाही तोल सुटला अन मला म्हणाला " हो, तुला झोपावंच लागेल श्रावणबरोबर, अन वाढवावं लागेल त्याचं मूल" मला क्षणभर काही कळेचना श्रावणचं मूल मी वाढवावं इतका कनवाळूपणा याच्या मनात कसा काय भरला. तर तोच म्हणाला " जर तू हे मूल वाढवलंस तर मी समाजात नपुंसक ठरणार नाही. ते मूल मी माझं मूल म्हणून जगात दाखवेन. "पुन्हा समाज, समाजाचे नियम. हेच नियम पाळताना सुनीलने हा व्यभिचार करण्याची मला सूट दिली.

खरंतर या त्याच्या निर्णयामुळे मला आनंदच वाटायला हवा होता कारण तसंही मला कुठेतरी वाटतच होतं की मी श्रवणच्या बाळाची आई व्हावं. पण का कोणास ठाउक मला आज या गोष्टीची किळस वाटत होती. मी स्पष्टपणे सुनीलला या गोष्टीसाठी नकार दिला. तर हा बहाद्दर मला सरोगेट मदर सारखं सरोगेट फादरचं तत्त्वज्ञान सांगू लागला. जग किती सुधारलंय, विज्ञानाची कशी प्रगती झालीय हे सगळं समजावून सांगताना त्याला कळतच नव्हत या त्याच्या सुधारलेल्या जगातील माणसांच्या मनाची जळमटं अजून तशीच आहेत. म्हणूनतर आपल्या नाइलाजाने संसार करावा लागला, मला श्रावणला सोडावं लागलं अन तुझं पौरुष जपण्यासाठी तुला हा व्यभिचाराचा मार्ग धरावा लागला.

तरीही मी बधले नाही म्हणून तो मला म्हणाला " देव तुला तुझ्या प्रेमाची परीक्षा देण्याची संधी देतोय तरी तू त्याला नाकारतेस. मी एवढा उदार होवून तुला हे करायला लावतोय. माझ्यासारखा मोठ्या मनाचा नवरा तुला कोठे मिळणार नाही" सगळं ऐकून मला हसावं का रडावं हेच कळत नव्हत. हा मोठ्या मनाचा? मी खरं प्रेम करून सुद्धा या माणसानं माझ्या प्रेमाची खिल्ली उडवली आणि आता याचं पौरुष सिद्ध करायला याला माझ्याच प्रेमाचा आधार हवाय. वर मी किती उदार, मोठ्या मनाचा म्हणून याचीच मिजास. शेवटचा डाव त्याने माझ्यावरच उलटवला. मला म्हणाला " तुझ्यात जर काही दोष असता तर मी तुला अशी वाऱ्यावर सोडली असती का? तेव्हा आपण सरोगेट मदरचा मार्ग पत्करला आताच ना. " तेव्हा मी म्हणाले " असं जर घडलं असतं तर एक तर तू दुसरं लग्न केलं असतंस आणि मला आयुष्यभर खिजवत राहिला असतास माझ्यातल्या दोषाबद्दल. अन असं खिजवून घेण्यापेक्षा मी वाऱ्याबरोबर भरकटणं स्वीकारलं असतं.

मी बधतच नाही म्हटल्यावर त्याने शेवटी घटस्फोटाचा मार्ग सांगितला. वर धमकी दिली की त्याच नाकर्तेपण कोणाला सांगायचं नाही. अन मी जर सांगितला तर तो माझं प्रेम जगाला उघडं करून दाखवेल. हा त्याचा घाव अगदीच माझ्या वर्मी पडला. कारण याच्याशी घटस्फोट घेतला तर कारण काय सांगायचं. जर पटत नाही हे कारण सांगितलं तर चूक माझीच असणार म्हणून माहेरच्यांनी मला थारा दिला नसताऽन आता याच्याकडून नासवली जाऊन मला श्रावणशी पुन्हा नवा डाव खेळायची इच्छा नव्हती. माझी खरंतर इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. प्राप्य परिस्थितीत मला सुनीलचाच निर्णय योग्य वाटत होता. पण श्रावणचं काय? तो तयार होईल या निर्णयाला. मी त्याची प्रत्यक्षच भेट घ्यायची ठरवली.

ठरल्याप्रमाणे मी श्रावणला भेटले. त्याला घडलेली सर्व परिस्थिती सांगितली. क्षणभर तो अवाकच झाला. त्याला खरंतर हा त्याच्या प्रेमाचा अपमानच वाटत होता. माझी अगतिकता बघूनही त्याला खूपच वाईट वाटलं. मला तो म्हणाला तुझा काय निर्णय आहे . मी सुनीलच्या सांगण्याप्रमाणे करायला तयार आहे हे सांगितल्यावर तर त्याला धक्काच बसला. पण त्याला कळून चुकलं की माझा नाईलाज होता. माझ्या सुखासाठी अन् फक्त माझ्याच सुखासाठी तो हे अग्नीदीव्य करायला तयार झाला.

ठरलेल्या दिवशी आम्ही दोघेही एकमेकांशी शरीराने एक झालो. नियतीचे फासे सुनीलला अनुरूप असेच पडले. मी एका महीन्याच्या आतच गरोदर राहिले. त्यानंतर दिवस अगदीच भराभर गेले. का कोणास ठाऊक मला हे बाळ माझं वाटत होतं कदाचित ते माझ्या श्रावणचं होत म्हणून असेल. दिवस पूर्णं झाल्यावर मला एक छानसा मुलगा झाला.

पण इथेही नियतीचा डाव संपला नव्हता. बाळाचा चेहरा अगदी श्रावणसारखाच होता अन् नेमकं हेच सुनीलला खटकतं होतं. पण मी त्याच्या कडे दुर्लक्ष केलं म्हटलं थोड्या दिवसांनी सुनील हे सगळं विसरून जाईल. पण घडलं भलतंच. दिवसेंदिवस सुनील या बाळाचा तिरस्कारच करत होता.

अन् एक दिवस जे घडायला नको होतं तेच घडलं‌ सुनील कोणालाही न सांगता घर सोडून गेला. एक चिठ्ठी टाकून. त्यात लिहिलं होतं मला तुझ्या बाळाला बघितलं की माझ्या नाकारतेपणाची सतत जाणीव होते.अन् जाणवत राहतं की ते माझं बाळ नाही म्हणून. तेव्हा माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नकोस.

माझ्यातर पायाखालची जमीनच सरकली. आता पुढे काय? ज्याच्यासाठी स्वतःच्या चारित्र्याचे वाभाडे काढले तोच अस अर्ध्या रस्त्यातून पळून गेला. खरंतर चूक कोणाची या गोष्टीला आता अर्थच नव्हता प्रश्न होता की आता काय करायचं. मी सुनीलला शोधायचा खूप प्रयत्न केला पण सगळं निष्फळ ठरलं. खरंच आयुष्यात एवढी हतबल मी कधीच झाले नव्हते.माझ्याबरोबर आता माझ्या बाळाचीही जबाबदारी माझ्यावर होती.

पण नियती अजूनही माझ्याशी खेळायचं होतं̱. घरच्यांना हे सगळं सांगितल्यावर त्यांनी मला श्रावणशी लग्न करायचा सल्ला म्हणण्यापेक्षा धमकीच. आता मी श्रावणशी लग्न केल्यावर हा समाज आता त्यांच्या तोंडाला काळं फासणार नव्हता. मीही एका मंगळसूत्राचं संरक्षण पाहिजे म्हणून हा निर्णय स्वीकारला.ज्यामध्ये कोठेही आता प्रेमाचा लवलेश नव्हतं. कदाचित मी होईनही माझ्या श्रावणची अमृता पण आता उरला होता तो तराफ मी श्रावणशी केलेला अन् सुनीलने माझ्याशी केलेला.

गुलमोहर: