बाप.

Submitted by ट्यागो on 3 June, 2010 - 08:55

तू गेलायस वाटत नाही कधीच,
देवघराच्या तुळईला टेकून उभा हसतोस आजही,
पोरगं मोठ्ठ झालं म्हणत.
देवीच्या आरजात,
गुरवांच्या गोंगाटातही ऐकतो
तुझा स्वर...
"बाय, सोमजाय, महालक्ष्मी..." म्हणत
काळीज चिरत नेणारा..

आजही चार घास तुझ्या नावाचे काढते ती काकविळ भरून...
आणि मी निरखतो कावळे तुझ्या चेहर्‍याचा शोध घेत...
वेडा पाडा ही मुका भासतो,
तुझा रख-रखीत हात न फिरल्याने.

आणि ती...
ती तर टच्च हिरव्या शिरा जोपासते,
पांढर कपाळावर.
तिच्या आयुष्याची लालिमाच पुसलीये
बोटभर कुंकू नसण्याने...
उजळ माथ्याने फिरणारी ती
पांढरफटक कपाळ दाखवते,
खोल अर्थहीन डोळ्यांसोबत...
आटल्या विहारीसारख्या.

जड होऊन निरोप घेतो,
घराचा, दाराचा, कण-कण मातीचा...
मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...
दचकतो, क्षणभर...
रडू कोसळतं...
तिच्या मिठित शिरून लहान व्हावं वाटतं...
पण नाहीच;
एव्हाना तिचा थरथरता हात
पदर घेऊन पुसतो माझा कढ...
आणि मी वळतो,
तूच दिलेल्या पोटासाठी!!

मयूरेश चव्हाण, जेजुरी, पुणे.
३१.०५.१०, १९.३०.

गुलमोहर: 

मयुरेश,

खूपचं सुरेख उतरली आहे कविता.. एक एक शब्द खरा वाटतो अगदी. धन्यवाद!

टच्च हिरव्या शीरा >> खूप छान!

मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...>>>>काळीज भेदत गेल्या ह्या ओळी....

अप्रतीम कविता!!! शब्दच नाहीत प्रतिसादाला ..मस्त!

क्या बात है... अप्रतीम कविता... सत्यजीतला अनुमोदन!!!
लिखते रहो ऐसेही... शुभेच्छा !!!

Pages