गझलची तोंडओळख

Submitted by kaaryashaaLaa on 15 September, 2008 - 18:35

मित्रांनो,

कार्यशाळेबाबतीत तुम्ही दाखवलेल्या उत्साहामुळे आम्हालाही हुरूप आला आहे. गुरुवारपर्यंत आणखी 'दर्दी' आपल्यासोबत येतीलच.
तोवर नवीन मित्रमैत्रिणींना गझलची तोंडओळख करून द्यायला सुरुवात करू या का?
त्यानिमित्ताने आपलीही उजळणी होवून जाईल.

किंवा असं करू. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू.
काय आहे, काही गोष्टींची आपल्या मनात उगाच भीती बसलेली असते. एकतर कविता म्हणजे उत्स्फूर्त अभिव्यक्ती. तिला मात्रा / छंद / लघु / गुरू असल्या कोष्टकात कोंबून बसवायला नको वाटतं! प्रेम असेल, वंचना असेल, राग असेल, मनात आलं - म्हणून मोकळं झालं..

पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली..#

अजूनही आठवून मी मोहरून जातो.. किती किती लाघवी तुझा तो नकार होता!!#

बोलणे माझे जरा ऐकून घे तू.. मी खुळा नाही, तर्‍हेवाईक नाही!!#

अर्थ लागेलही पुढेमागे - चल प्रतिज्ञा तरी त्रिवार करू!*

मग आता जर मी तुम्हाला सांगितलं, की पहिली ओळ भुजंगप्रयातात आहे, दुसरी हिरण्यकेशी, तिसरी मंजुघोषा आणि चौथी स्त्रग्विणी वृत्तात आहे, तर त्यामुळे त्यांची मजा कमी होते का? उलट लयीत वाचलेल्या सुंदर सुंदर ओळी आपोआप लक्षातही राहतात ना?

सोपं असतं हो!
र्‍हस्व अक्षर हे लघु किंवा १ मात्रा. दीर्घ अक्षर गुरू किंवा २ मात्रा.
म्हणजे अ/इ/उ स्वर असणारी अक्षरं लघु तर आ/ई/ऊ/ए/ऐ/ओ/औ हे स्वर असणारी अक्षरं गुरू असतात.
वृत्त पाहताना लघु 'ल' असा तर गुरू 'गा' असा लिहीतात.

म्हणजे 'पहाटे' शब्दात प हा लघु आहे, तर हा आणि टे गुरू आहेत. म्हणून हा शब्द झाला 'ल गा गा'.
'बोलणे' झाला 'गा ल गा'

आता 'अर्थ' शब्द उच्चारून पहा. दोन्ही अक्षरं लघु खरी, पण उच्चार 'ल ल' च्या जवळचा आहे की 'गा ल' च्या?
नियम असं सांगतो की शब्दात लघु अक्षरानंतर जोडाक्षर आलं, तर त्या लघुचा गुरू होतो.
म्हणून 'अर्थ' हा 'गा ल' शब्द आहे.
तसंच अनुस्वार असलेलं अक्षर गुरू असतं. म्हणून वंदना हा शब्द 'गा ल गा' असा ऐकू येतो पहा.

खरं सांगू का? आपण कवी मंडळी शब्दांवर प्रेम करतोच. त्यांचा अर्थ जसा भावतो, तसाच त्यांच्या 'नादा'कडे जरा कान दिला ना, की अगदी सहज लक्षात येतं हे.
ही पायरी जितकी सोपी, तितकीच महत्त्वाची आहे. एकदा लघु गुरू समजले, म्हणजे वृत्त समजणं अगदी सोपं आहे!

पुढच्या पोस्ट मधे वृत्ताबद्दल बोलूच.
पण त्या आधी एक छोटीशी परीक्षा देऊ या?
आपलं पूर्ण नाव लिहून त्यातली लघु आणि गुरू अक्षरं ओळखायची.
कुठे अडलं तर आम्ही आहोतच मदतीला.

(टीपः
# या ओळी सुरेश भटांच्या आहेत.
* ही ओळ वैभव जोशींची आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे एकदा पुर्वी झालेले आहे की... रुतु येत होते...

----
उद्यापासून वृत्त शिकवणार?
लगागागाल गाल लललगाल (सू दीर्घ केला आहे )
----
मला वाटलं "द्या" चा आघात "उ"वर होतो म्हणून तो "गा" करायचा. आणि दोन "ल" एकत्र करुन "गा" कधी करायचा?
धन्यवाद सर Happy

नं दि नी दे सा ई
गा ल गा ल गा गा

बहुतेक!!!

--------------
नंदिनी
--------------

नचिकेत आठवले म्हणे अभ्यास वृत्तांचा करा>>
यामधे गागालगा*३ कसं?
नचिकेत>>ललगाल होईल ना?

जामोप्या, लिवा की एखादी फक्कडशी गज़ल नायतर मार्गदर्शन करा आमच्या सारख्यांना. तेवढीच ज्ञानात भर आमच्या.

'म्ह' हे जोडाक्षर आहे तरी ते लघु आहे असे आहे होय..
नंदिनी.. दे ची मात्रा गुरु होईल...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

अश्विनी... नियम एकदम बरोबर आहे.. पण उद्या म्हणताना द्या चा आघात 'उ' वर होत नाही... पण तेच सद्ध्या म्हणले तर 'स' गुरू होतो...

अजून एक उदाहरण पुन्हा ... ह्यात न्हा चा आघात पु वर होत नाही म्हणून पु लघुच राहतो..

नियमाला अपवाद असतातच आणि अपवादाने नियम सिद्ध (ह्यात सि गुरू कारण त्यावर आघात होतो) होतो Happy

नंदिनी दे लघु का केला 'दे' पण गुरूच होईल ना!!

अनिलभाई, तुमच्या नावाच्या उच्चारानुसार (अनिल्भाई) ते 'ल गा गा गा' असं जास्त योग्य आहे. Happy नाहीतर 'ल ल ल गा गा' आहेच.

दोन लघु चा एक गुरु केलाय...कळ्या कळ्या. Happy

मजा येतेय. माझ्यासारख्या गद्य किंवा पद्य काहिही लिहू न शकणारीला पण प्रयत्न करावासा वाटतोय त्यासाठी हे धडे घ्यावेसे वाटतायत Happy

अश्विनी. खरोखर. काहीतरी चांगले शिकायला मिळतय यापेक्षा काहीतरी मनाला समाधान देणारं शिकायला मिळतं हे जास्त महत्वाचे.!!

ओके. नंदिनी देसाई
गालगागागागा. Happy
--------------
नंदिनी
--------------

नंदिनी, हे तुझ्या साठी.
---
अंतरपाट दूर होताच त्या मुहूर्त वेळे,
झुकलेल्या पापण्या लपवतील अवखळ डोळे
---
लललगाल गाल गागाल गा लगाल गागा,
ललगागा गालगा लललगाल लललल गागा
---
सर, हे सलग लललल बरोबर नाहीये ना? सांगा ना दोन "ल" चा एक "गा" कधी करायचा?
---
अश्विनी
गालगा लललललल Proud

भुजंगप्रयात
कथा देवदत्ता पुरी ती करा हो
जरा पद्मनाभास धाडा घरा हो
Happy

स्त्रग्विणी
काव्य ते पाडून आता वेगळा हो
देवदत्ता हाल झाले मोकळा हो
Happy

धन्यवाद Happy
chinnu ह्या अक्षरांनुसार उच्चार असल्यामुळे चिन्नु असेच लिहिते.

देवदत्त, मस्त! Happy
अश्विनी, 'अंतरपाट' चा उच्चार बघा बरं कसा होतो. अंतर्पाट हो ना? आणि अनुस्वार गुरू असतो ना? म्हणून हा शब्द 'गा ल ल गा ल' किंवा 'गा गा गा ल'.

प्राजक्ता म्हणजे 'गा गा गा' होईल ना?

अगदी बरोब्बर, प्राजक्ता! Happy

मित्रांनो, वृत्तांची माहिती नवीन धागा सुरू करून तिथे दिली आहे.

देवा Happy अश्विनी छान गं

सं दी प चि त्रे
गा गा ल ल गा
-------
बरोबर आहे का ?
--------------------------------
स मु द्र बि लो री ऐ ना
ल गा गा ल गा गा गा गा

सृ ष्टी ला पा च वा म्है ना
गा गा गा गा ल गा गा गा
--------
हे जमले का?

स मु द्र
लगागा की ललगा की लगाल?

संदीप, त्र हे जोडाक्षर आलं म्हणून 'चित्रे' हे 'गा गा'.

त्याच कारणासाठी समुद्र 'ल गा ल'. Happy

नं द न कु ल क र्णी
गा ल ल ल ल ल गा

२ गुरूंमध्ये बरेचसे लघू Happy

अविकुमार
गगगलाग

अविनाश पेठकर
ललगाल गाललल

वाह वाह, मजा येतेय खुप
गाल गाल, लगा गागाल लल

चला, सुरुवात तर झाली!
लगा, ललगाल लल गागा

धन्यवाद हो कार्यकर्ते मंडळी....
गागागाल गा गालगागा गालगा

अविकुमार, 'धन्यवाद' > 'गा ल गा ल'.

धन्यवाद. Happy

सत्यजित माळवदे
गागालल गाललगा :

आयला आपल नाव पण व्रुतात नाही Sad

सत्यजित

सत्यजित माळवदे
गाललल गाललगा

त्य च्या आघाताने स गुरू झाला पण 'त्य' लघु आहे Happy

जोडाक्षर आले की बरेच जण गोंधळत आहेत...

१. जोडाक्षराचा आधीच्या अक्षरावर आघात होत असेल तर आधीचे अक्षर गुरू होईल
जसे सत्या, सुस्ती, अर्पण, व्यक्त ह्यात 'स', 'सु', 'अ', 'व्य' हे सारे गुरू होतील...

आणि प्रत्यक्ष जोडाक्षर जे आहे ते नेहमीच्या र्हस्व, दीर्घ नियमानुसारच चालेल

जसे वर सत्या आणि सुस्ती मधले 'त्या' व 'स्ती' गुरु
अर्पण आणि व्यक्त मधले 'प' 'त' लघुच राहतील...

जोडाक्षर आले की मात्रा मोजताना सुरुवातीला सोपा उपाय करा.. जोडाक्षराची फोड करून ते मांडा जसे सत्या -> सत्-या सत् च्या २ मात्रा आणि या च्या दोन मात्रा
अर्पण -> अर्-पण अर् च्या दोन 'प' ची एक 'ण' ची एक
व्यक्त -> व्यक्-त व्यक् च्या दोन आणि त ची एक

२. जर जोडाक्षराचा आधीच्या अक्षरावर आघात होत नसेल तर त्या अक्षराच्या मात्रा बदलणार नाहीत
जसे पुन्हा, तुझ्या, कळ्या, उद्या

पुन्हा चा उच्चार आपण कसा करतो? पुन्-हा असा करतो का नाही पु-न्हा असाच करतो म्हणून पु ची एक मात्रा न्हा च्या दोन

तसेच कळ्या -> कळ्-या नाही करत उच्चार क-ळ्या असाच करतो म्हणून क ची एक आणि ळ्या च्या दोन मात्रा

उद्या -> उद्-या नाही तर उ-द्या म्हणून उ ची एक आणि द्या च्या दोन

आता समजले. धन्यवाद सर, मी अजून नाव नोंदणी केली नाहीये कारण मी म्हणजे या क्षेत्रात आबडधोबड दगड आहे व तुम्हाला छिन्नी हातोडा घेऊन बसावे लागणार आहे Happy अशी पण शक्यता आहे की कंटाळून तुम्ही हा दगड मधेच टाकून द्याल Happy त्यामुळे एकलव्य व्हावं का असा विचार करतेय. चालेल का?

नलिनी फोपसे

ल ल गा गा ल गा

हें मन कैसे केवढें पाहों म्हणों तरी न सांपडे
गा लल गागा गालगा गागा गागा लगा ल गालगा

येर्‍हवीं राहाटावया थोडें त्रैलोक्य यया
गालगा गागागालगा गागा गागाल लगा

कभी खुदपे कभी हालातपे रोना आया
लगा ललगा लगा गागागा गागा गागा

बात निकली तो हरइक बातपे रोना आया
गाल ललगा गा गागा गागा गागा

??????????????????????

अश्विनी, प्रयत्न करायला काय हरकत आहे? Happy

नलिनी, जमलं. Happy

टण्या, हिंदी/उर्दू व्याकरणाचे नियम आणि आपले मराठीतले नियम यात थोडासा फरक पडतो. त्यामुळे शक्यतो यापुढे इथे मराठी उदाहरणंच पाहू.

तू उधृत केलेल्या ओळींच्या मात्रा अश्या पडतात :

१२ ११२ १२ २२१ २ २२ २२ = २५
२१ ११२ २ १११ २१ २ २२ २२ = २५
इथे 'हर इक' चा उच्चार 'हरिक' असा होतो, म्हणून मात्रा तश्या मोजल्या जातील.

मराठीत लिहीताना व्याकरणाची अशी तोडमोड शक्यतो करू नये या मताचे आम्ही आहोत.

Pages