पयलं नमन

Submitted by संघमित्रा on 14 September, 2008 - 02:59

"हाय गॅनी कसा आहेस रे? किती दिवसांनी दिसतोयस..." विशनं नेहमीच्या रुबाबदार स्टाईलमधे विश केलं.
"विश अरे किती तू स्वताःच्या व्यापात गुंतून गेलायस? मी जाताना बोल्लो नव्हतो का? चाल्लोय जरा म्हणून."
गॅनीचं ते मराठी ऐकून विशचे कान गढूळले.
" अरे काय हे गॅनी? कुठं जाऊन आलास? काय हे बोल्लो चाल्लो ऑं?"
" आयला.. आपलं.. अबे.. आपलं.. अरे विश. मी मस्त दहा दिवस फुल टू धमाल करून आलो. अरे ही बॉ.. आपलं मुंभायची भाषा आहे रे. जॅर्गनच खरं तर. कारण तिथं सगळाच व्यवहार आहे. पण धम्माल आली."
" ओह मुंबापुरीला गेला होतास होय? गौरी गंपतीसाठी. मज्जा असते बाबा एका माणसाची. "
" बघ विसरलेलास ना?
हा ब्रॅमी पसारा मांडून नामानिराळा. आणि विष्णूमहाराज आता तुम्हीच सगळं संभाळा."
"बाप रे! कविता की काय ही?" दोनोळी अशा अंगावर आल्यानं विश दचकला.
आणि त्यातलं सत्य समजून ब्रॅमी गालात हसत राहीला.
"अरे हो ही साहित्यातली लेटेश्ट फ्याशन आहे."
" बरंय गड्या तुझं. दहा दिवस नुसतं बसून रहायचं. काय काय खायचं प्यायचं. नाच बीच नाटकं बिटकं बघायची.
सांग की आम्हाला काय चालूय सध्या पृथ्वीवर?"
"वेल वेल वेल.. तसं बरंच काय काय चालूय. श्रीलंका वि. इंडया, नारायण वि. विलास, महाराष्ट्र वि. बिहार, सलमान वि. शाहरुख.."
"यवढं सगळं चालूय प्रुथ्वीवर?"
" नाही रे. हे फक्त मुंबईमधले टॉक ऑफ द टाऊन आहेत. तसे मग ऑलिंपिक, हिलरी वि. ओबामा, गुस्ताव.. असे बरेच आहेत."
"गॅनी बाकी ठीक आहे पण श्रिलंका वि. इंडया मुंबईत झालं असं नाही वाटत मला. "
गॅनी हसला. " अरे इंडयाची मॅच कुठही चालू दे. ती मुंबईतच चालल्यासारखी असते. आणि होऊन गेल्यावर पण बरेच दिवस चालते.जाऊ दे तिथं राहील्याशिवाय नाही कळायचं"
"भाव खाऊ नको पुढं बोल" ब्रॅमीनं डिवचलं.
" हं तर असं चालूय सगळीकडं" असं म्हणून गॅनी पोट पकडून हसायला लागला.
" अरे काय झालं? आम्हाला पण सांग की"
" काय नाय रे. या बंबय्यावरून आठवलं. तिकडं 'नालासोपार्‍याचा एंपरर' मंडळात एका पोरानं कीर्तनकाराची भूमिका केली होती.
आणि राम रावण युद्धाचं आख्यान लावलं होतं. त्यात लक्ष्मण बेशुद्ध पडल्यानंतरचं वर्णन करताना
हे कीर्तनकार म्हणाले "तर अशी सगळीकडं घुमशान चालू झाली महाराजा"
आणि काय गाणी, काय ढ्यान्स. विचारू नको. सगळं सूत्रसंचालन फिरंगीमधून. आरतीनंतर लगेच 'हे फ्रेंड्स नाव लेट्स स्टार्ट वुइथ अमिशाज डाण्स नंबर...' "
" अमिषा म्हणजे ती नटी? ती सार्वजनिक गणपतीत नृत्य करायला लागली? मराठी लोकांचा उत्सव श्रीमंत झाला म्हणायचा" ब्रॅमी उद्गारला.
" नाही रे ती अमिषा नाही. बीडीसी चाळ नंबर ७ मधली बारा वर्षांची अमिषा. काय नाचतात रे ही पोरं आजकालची. काही निरागसपणा राहीलाच नाही हल्ली"
गॅनी कौतुक करतोय का नावं ठेवतोय हे विश आणि ब्रॅमी ला कळेना.
" नाच या प्रकाराला एकूणच फार महत्व आलेय बर्का. नाचाचं महत्व सांगणारं एक गाणं पण सारखं लागत होतं तिथं.
म्हणे नवीन गाडी, देखणं रूप, लोकप्रियता, शिक्षण, अंगचे बाकी कलागुण कश्शाचा काही उपयोग नाही जोवर तुम्हाला नाचता येत नाही."
असं म्हणून गॅनी "दिर दिर ताना दिर दिर ताना दिर दिर ताना देरेना" गुणगुणू लागला.
"आणि हे नाचाचं महत्व ठसण्यासाठीच जणू गल्लोगल्ली किमान चार नाच तरी याच गाण्यावर होत होते माझ्यापुढं.
शिवाय कसले साल्सा, सांबा, जाईव्ह अन काय काय नावाचे क्लास पण हल्ली चालतात जोरात."
" बरं म्हणजे नाच सोडून दुसरं काही नाहीच झालं का यावेळी?" विशने जांभई दिली.
" अरे असं कसं? झालं ना. नेहमीचं सगळं झालंच. तुम्हाला ऑडियो हवाय का व्हिडियो?"
" नको बाबा फिरायचा कंटाळा आलाय. काय ते ऐकव इथंच"

"दर वेळीच दोनशे एक्कावन्न देता राव. पुढं सरका की जरा."
"काचा बग मस्त आहेत बे दुकानाच्या. नवीन बशिवल्या न्हाय का परवाच? आपल्या पम्यानंच बशिवल्यात."
" दर वेळी तोच का अध्यक्ष?"
"अबे वो चुप रहता है ना. बोलता नही चबरचबर अपने बापू की तरह. ये करो वो मत करो."
"ओ वैनी झाली का जेवनं? चला आज चालू नवरा भोळी बायको हाय मंडपात"
"अरं ए तिच्या आयला, खाली ठिव की सतरंजीचं टोक. आपल्याला बसून बगायची कत्रिना. तू र्‍हा उबा खांबापाशी."
"अगं नाही पडत गंगावन. तू नाच बिन्धास"
"आज मंडपात एवढी कमी गर्दी? कविसम्मेलन आहे का काय?"
"अरे देवा यात कापरा ऐवजी खडीसाखर कुणी ठेवली?"
" सुंदर आहे नाही मूर्ती? प्रसन्न वाटतेय."
"काकी माईकपासून लांब उभ्या रहा ना जरा. गप्पांना माईक कशाला?"
"ऑंटी प्लीझ टेक द चेयर. अभी म्युझिक चालू होगा."
"शी लिटरली पुश्ड मी मॅन"
" आईल्ला वो छे मालेकी आंटी देख नेकलेस पहनके आयी है"
"शीतल तू चमच्यात लिंबाखाली चींगम ठेवलेलंस ना? सांगितलं मला प्राजूनं"
"कम ऑन आय कांट रन दॅट फास्ट. हूहूहू."
"ईईईईईईईईईईईईईई थर्माकोलचं मखर? इको फ्रेंडली नाही तुमचा गणपती? "
" कशातही पहिलं न येता यांच्या पोराला बक्षिस द्या म्हणे"
" या बॉक्सवर सौरव नाही सौरभ लिहीलंय. आम्हाला काही हाव नाहीये पण सौरभचंच आहे ते गिफ्ट."
" प्लीज वैभवला नका जोक सांगायला लाऊ"
" तू वाघ होणारेस फॅन्सी ड्रेसमधे? पण हे कपडे झेब्रासारखे दिसतायेत"
" मी आहे भाजीवाली... अं अं मी आणते भाजी ताजी. रोज रोज.. अं अं... आआआआआआआआआईईईईईईईईईईईई"
" आणि कमी सहभागामुळं पुरुषांची रनिंग कॉम्पिटीशन क्यान्सल करून स्लो बाईकींग कॉम्पिटीशन ठेवण्यात आली आहे"
" ऑर्केस्ट्रा आहे का यावेळी? वा वा मी पहिल्या रांगेत बसणार हो. दिसत नाही हल्ली नीट लांबचं."
" आंटी प्लीज जज बनोगे क्या स्किट कॉंपिटिशन के लिये?"
" ठक ठक.... ओ चला दहा वाजले माईक बंद.."
"ऑं बाप्पाला कुठं नेताय? नाही ऑंऑंऑंऑंऑंऑंऑंऑं.. नको विसर्जन...."
"श्या पेंडल कितना खाली लगता है यार.. नवरात्री कब है रे?"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलयस संघमित्रा... Happy

खूपच छान जमलंय....... Happy

देवबाप्पांची नावे मस्त आहेत ग सं.मि.
'गप्पांना माईक कशाला?' .. Happy

" आईल्ला वो छे मालेकी आंटी देख नेकलेस पहनके आयी है"
"अगं नाही पडत गंगावन. तू नाच बिन्धास"
" कशातही पहिलं न येता यांच्या पोराला बक्षिस द्या म्हणे" >>>> Rofl

मस्त कल्पना आहे Happy

अगदी मस्त टिपले आहेत सगळे उद्गार ...

>>आज मंडपात एवढी कमी गर्दी? कविसम्मेलन आहे का काय?
सन्मे! Lol

Back to top