आज सकाळचा नाश्ता खाणे कमी अन हसणे जास्त असा झाला. अबू म्हणजे एनर्जाईझ करूनच पाठवायचा सगळ्यांना कामावर! पहिल्यांदा रमणने सकाळी सहा वाजताची बातमी दिली.
रमण - सुबह गधा आया था अंदर.. छे बजे.
अबू - भोत दिनो बाद मिले होंगे तुम भाय भाय
चाचा हसला नाही. पद्याने ऑम्लेट्स करताना वळून नीट पाहिले. पण ओठही हालले नाहीत चाचाचे!
रमण - दो चार रट्टे मारकर भगादिया...
अबू - सौतेला था क्या??
गाढव घुसलं होतं याच्याकडे कुणाच लक्षंच जात नव्हतं! अबू काय बोलतो हेच ऐकत बसले होते सगळे! पण बाकी कोणीही वाट्टेल त्याची थट्टा करायचे नाही. असे बोलणे हा अधिकार फक्त अबूचा आहे हे सगळ्यांना माहीत होतं!
तेवढ्यात बाळ्या म्हणाला:
बाळ्या - झरीनाचाचीके बस्तीसे आया रहेंगा.. उधर भोत हय गधे..
अबू - तू तो चेहराबी पयचानता हय ना हर एक का?
पद्या - यशवंत... आपको और एक ऑम्लेट??
अबू - वो नय खायेगा... (यशवंत बघतच बसला)
पद्या - कायको?
अबू - ज्यादा खाके ढेकरां देता इसलिये झगडा हुवा कल मिया बिवीमे..
सीमा तोंडाला पदर लावत हसत बसली. काजलही हसली.
यशवंत - डाल रे ऑम्लेट तू...
विकी - गधा अंदर कैसा आया लेकिन... कुंपण हय ना?
अबू - रातमे कुंपण गुंडाळके रखना पडता हय.. नय तो कुंपणच चोरी होएंगा..
आता साखरूही हसला.
चाचा - अरे पद्या? केवढ ऑम्लेट हय ये? दो अंडे का हय क्या??
अबू - नय... मुर्गेका हय...
आता यशवंतही फस्सकन हासला. नाश्ता करायचा का हसायचं?
तर मन्नूबाळ निरागस प्रश्न विचारून मोकळं झालं!
मन्नू - मुर्गाबी अंडा देता हय??
सीमा अन काजल जोरजोरात हसायला लागल्या. अजूनही चाचा हसत नव्हता.
यशवंत - गणपतभाई... तुम्ही हसत का नय??
पद्या - शर्त हय शर्त
यशवंत - शर्त?? काय शर्त?
पद्या - चाचा हसेल त्या दिवशी सगळ्यांचे पगार दहा टक्के वाढणार
यशवंत - अन तोपर्यंत??
या प्रश्नाला काही अर्थच नव्हता. एक तर यशवंत जागेचे भाडे चाचाला देत होता. यशवंतला ढाब्याचा पगार नव्हताच. तो ढाब्यावरचा कर्मचारी नव्हता. पण त्याला पंचायती किती! म्हणे तोपर्यंत!
अबू - तबतक चिवडा खानेका.. तेरे दुकानका...
बाळ्या - मै आल्यापासून तर काय चाचा हसला नय
दिपू - मय बी!
अबू - मय बी क्या मय बी? तू आया कल... बाळ्याने नय देखा मतलब तुनेबी नय देखा होएंगा..
दिपू - आपने देखा हय चाचाको हसते हुवे?
अबू - वो रातको कमरेमे जाकर दिनभर की यादां निकालके अकेला हसता हय...
अबू - क्या रे यशवंत? तेरेको शराबी जमाई नय मंगता??
यशवंत - नय...
अबू - और शादी के बाद शराबी बना तो??
यशवंत - रिव्हर्स मारनेका...
अबू - मतलब??
यशवंत - अपना लडकी वापस लेके आनेका..
अबू - तो सीमाभाभी अबीतक यहा कैसी??
यशवंत - क्युं??
अबू - उनके अब्बाको ढेकरा देनेवाला जमाई नय मंगता था..
समीर - आप एकसाथ कितना ऑम्लेट खासकता हय अबू?
अबू - चोबीस...
समीर - चोबीस??
अबू - पद्या उतनाच बनाता.. तो क्या करेगा आदमी...
चाचा - आज झरीनाके बस्ती मे उत्सव हय... सगळ्यांनी जाऊन यायच दर्शनाला ... एकेक करके... रातमे फिर मटन हय..
पद्या - ढाबा?
अबू - सब गाड्या झरीनाकी बस्तीपेच लेजानेका.. ढाबा बंद..
चाचा - ढाबा चालूच हय.. दिपू भटारखाना देखेंगा... झिल्या गल्लेपे.. बाळ्या ऑर्डर लेंगा... और.. यशवंत... तू आना हय तो आ.. भाभीकोबी लेके आ.. बडा अच्छा उत्सव असतो... दुकान बंद रखनेका जरूरत नय.. रमण देखेंगा... ये काजलको अच्छा ससुराल मिलनेकी प्रार्थना कर..
अबू - मुर्गी काट..
चाचा - तेरेको दुसरा कुछ सुझताच नय क्या? मुर्गी काट क्या? उधर मटन हय..
अबू - मटनसे ससुराल अच्चा नय मिलता...मुर्गी दिया तो मिलता...
सीमा - सासर चांगल पायजे... कोंबडं बकरं काय?? केव्हाही देऊ देवीला...
अबू - देवी? कौन देवी?
सीमा- वो झरीनाके बस्तीकी देवी..
अबू - वो देवी नय हय... भुलोबा हय...
सीमा - भुलोबा मतलब?
अबू - मतलब जो जिंदगीमे कबी हसताच नय उसको भुलोबा कयते हय और सालमे एक बार उसका उरूस मनातेय...
ऑम्लेट्स थांबवून पद्यासुद्धा हसायला लागला. गणपतचाचा उठून निघून गेल्यावर सगळे आणखीनच हसले.
पण नाश्ता करताना एक मात्र झालं होतं! अबूच्या प्रत्येक विनोदाला काजल 'फक्त आपण आणि दिपूच इथे आहोत' अशा पद्धतीने हासत होती.. आणि.. दिपूला नाश्ता चढला होता.
काजल - मय नय आयेंगी...
हे वाक्य तर दिपूला साखरेत दूध पडल्यासारख वाटलं! ही जाणार नसेल तर आपण कशाला जायचंय? आणि... आपल्याला भटारखाना सांभाळायला इथेच ठेवणार आहेत. बाकी सगळे बाहेर ढाब्यावर! आत आपण एकटेच! ही मागच्या बाजूला! केव्हाही जाऊन बोलता येईल हिच्याशी!
व्वा! अशी सुवर्णसंधी येते का कधी? एकांत!
अभुतपुर्व वेगात दिपूच्या हालचाली सुरू झाल्या. आज त्याने विकीला कांदाही चिरू दिला नाही. अबू तर खोलीवरच निघून गेला होता. करायचंय काय तिथे थांबून? दिपू सगळीच कामं करायला लागलाय! पातेली उचलायला विकी मदत करतोच आहे. बसावं आपलं बाटली घेऊन!
यशवंत अन बाळ्या खरेदीला शिरवाडला निघून गेले. भुलोबासाठी वस्त्र, पूजेचं साहित्य अन लहान सुरी आणायची प्रथा होती. उरुसाला आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमधून दोन तीनशे लोक यायचे. जो तो आपापले बोकड घेऊन यायचा. हे नुसते नवस फेडले जायचे. झरीनाच्या वस्तीत बोकड कापणारे दोन स्पेशालिस्ट होते. एका बाजूला हंडे लावून मटण शिजायचं! दुसरीकडे बाया बापड्या एकमेकींशी ओळखीपाळखी करून नात्यातल्या कुणाच कुणाबरोबर तरी ठरवता वगैरे येतंय का हे बघत बसायच्या. एकमेकींच्या दागिन्यांची, साड्यांची चौकशी व्हायची. पोरे खेळायची! भर रात्री खेळायची! लांबवर दारूचे ड्रम ठेवलेले असायचे. हातभट्टीच्या! दर्दी पिणारे तिथेच बसायचे. ऑकेजनली पिणारे तिथे जाऊन यायचे. अन नवीन प्यायला लागलेले लाजत लाजत कुणाची नजर नाहीयेना असे बघत हळूच जाऊन पिऊन यायचे. मग दोन अडीच वाजता शिवी गाळ, भांडणे यांना ऊत यायचा. हे व्हायचे नाही, मुद्दाम केले जायचे. एकमेकांना शिवीगाळ करून गचांड्या धरून मारामारी केल्यासारखे आविर्भाव करायची प्रथा होती. त्याचे कारण म्हणे असे होते की वर्षभरातील रुसवे फुगवे द्वेष सगळं भुलोबाच्या साक्षीने विसरून जायचं! एकदाच काय ते भांडायचं! मग लोक गळ्यात गळे घालत निघून जायचे.
काही वेळा भांडणे खरी व्हायची! काही वेळा म्हणजे ... काही वर्षी असं नाही.. दर वर्षी सर्व भांडणांपैकी निदान दोन तरी भांडणे खरी व्हायची! मग ती मिटवली जायची. सगळ्या बाया बापड्याही झुंजायच्या. पोरे ढकलाढकली करायची. आजवर दोन चार गंभीर मारामार्याही झाल्या होत्या. त्यामुळे दोन पोलिस ठेवलेले असायचे.
पहाटे कधी तरी चार साडे चारला सगळे निघून जायचे. आजूबाजूच्या गावातल्यांच्या ट्रॅक्स, बैलगाड्या असं सगळं रात्री नऊ सादे नऊ पर्यंत जमा व्हायचं! मात्र त्यातलं कुणीच ढाब्यावर यायचं नाही. कारण भुलोबाचा प्रसाद खायला जायचं असायचं! स्टॉल्स, टपर्या वगैरे सगळं झरीनाच्या वस्तीवा लागायचं! हायवेवर नाही.
आजवर दिपू दोन वेळा तेथे जाऊन आलेला होता. त्याला तो प्रकार भयंकर आवडला होता. त्यामुळे त्याचे नाव कट झाल्यावर तो नाराज झालेला असतानाच काजल येणार नाही कळल्यावर त्याला उड्या माराव्याशा वाटू लागल्या.
आजच सकाळी नाश्त्याआधी त्याने काजलला तिच्या घराच्या पायर्यांवर उभे राहून केस झटकताना पाहिले होते. नाहून आलेली काजल उन्हात चांदीसारखी चमकत होती. तिचे ते रूप बघून दिपू खलास झाला होता. त्याला आता प्रश्नच पडला. ही इतरांना कुणाला आवडत नसेल?
पण हा विचार लगेचच रद्द झाला. ज्या क्षणी काजलने सगळ्यांना भैय्या अशी हाक मारायला सुरुवात केली तेव्हापासून सगळेच मोकळे मोकळे वागू लागलेले होते. आणि दिपू तर अधिकच! कारण ती हाक त्याच्यासाठी नव्हती!
आपण रामरहीम ढाब्याचे जावई आहोत अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ लागली होती.
स्वतःच्या खोलीत जाऊन अब्दुलच्या दुकानात सापडलेल्या टीचभर आरशात स्वत:ला न्याहाळताना दिपूचा वेळ जरा जास्तच जायला लागला. हल्ली तो स्वतःचे कपडे धुताना जास्तच स्वच्छ धुवू लागला होता.
शोभायला नको का? असल्या सुंदर पोरीला?
दुपारी सहज दाल घ्यायला म्हणून एक छोटे पातेले घेऊन काजल भटारखान्यात मागून आली. दिपूच्या जवळ उभे राहून दाल वाढून घेताना तिच्या केसांच्या सुगंधाने दिपूला रोमांच उठल्याची जाणीव झाली. पातेल भरून वाहेल इतकी दाल घातली त्याने. मग म्हणाला:
दिपू - तुम नय जारही ना रातको.. मै बी नय जा रहा...
काजल माना वेळावत मिश्कील उपरोधाने म्हणाली...
काजल - तू नय जा रहा.. ?? या चाचाने मना किया??
हे विचारून ती खळखळून हसताना दिपूला तिचा प्रचंड राग आला. ही हसते काय आपल्याला सारखी? आपल्याला काही अधिकारच नाहीये. चाचाने टाकले आपले ठरवून...
काजल - मै तो जा रही हय...
दिपू - कायको??? सकाळीच नाय म्हणलीस ना?
काजल - हां! लेकिन बाबा म्हणतात यायलाच हवं! चांगला वर मिळायचा मतलब मै खुद तो होनीच चाहिये ना...
मिश्कीलपणे पाठ फिरवून जीभ गालात घोळवत तिने उच्चारलेल्या या विधानातील एक शब्द दिपूला समजलाच नाही.
दिपू - वर? वर मतलब?
काजल - नवरा.. नवरामुलगा..
त्याच्याकडे तसेच खट्याळपणे पाहात तिने 'वर' या शब्दाचा अर्थ सांगीतला तेव्हा दिपूच्या हृदयाच्या चिंधड्या उडलेल्या होत्या.
सगळी दुपार उकाड्याची अन वैतागाची! चालली वर मिळवायला! त्या भुलोबाला उद्योगच नाही. समोर बोकड कापला की हे झाले वर द्यायला तयार! काय वर बिर मिळणार नाही हिला. येईल परत! असं कुठे असतंय होय? आणि.. मुख्य म्हणजे .. माझं काय? मी काय करायचं?
च्यायला! आपणच जाऊ भुलोबाला! आपणही वरीण मागू! बघू. मिळतीय का काजल! एवढे काही लहान नाही आता आपण! कालच पाहिलं आरशात तेव्हा ओठांच्या वर बर्यापैकी केस आल्यासारखे दिसले. वाढतील हळूहळू! दाढी काय.. नाहीतरी मुलींना आवडायचीच नाही.. न आलेलीच बरी! पण एक आपली.. म्हणजे.. इज्जत म्हणून तरी दाढी यायलाच हवी.. मग मस्तपैकी बाळ्याचं ब्लेड मागायच, साबण आहेच.. काजलच्या घराच्या दारासमोरच दाढी करत बसायचं.. यशवंतकाकालाही वाटायलाच पाहिजे.. चांगला तरुण वर आहे.. याला वरीण मिळायला हवी...
दिपू गेला चाचाकडे...
दिपू - चाचा.. मै जाता ना भुलोबाको.. सब खाना पयलेच पकाके तय्यार रखके जाता...
चाचा - अंहं!
चाचाला 'हं' अन 'अंहं' याच्याशिवाय उत्तरेच देता येत नाहीत बहुधा!
आता काय करायचं? अबू? अबू परवानगी देईल. पण ते चाचाला मान्य होईल का? पण अबू स्वतःच ढाबा नाही का बघू शकत?? पण तोच जाणार असेल भुलोबाला तर आपलं बोंबललंच सगळं!
अबूच्या खोलीत जाताना दिपूला दारूचा कोंडलेला वास जाणवला.
दिपू - अबू.. मेरेको भुलोबाको जानेका हय..
अबू - तो जा
दिपू - चाचा नय बोलता..
अबू - तो मत जा...
दिपू - आप बोलो ना चाचाको...
अबू - कायको?? एक साल भुलोबाको नय गया तो काला पडजायेगा क्या??
अबू नशेतच होता. त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही. आणि परवानगी देऊ शकेल असे एकच व्यक्तीमत्व आता राहिले होते. प्रदीपदादा! पद्या!
दिपू - पद्यादादा
पद्या - क्या?
दिपू - मी जाऊ का?? भुलोबाला?
पद्या - नको...
दिपू - का?
पद्या - मागे ती काजल एकटीच थांबणार हय.. तिच्या सोबतीला कुणीतरी पाहिजे..
आं??? हे काय नवीनच??
दिपू - ती तर जाणार म्हणली की??
पद्या - अंहं! तिला नेणार नाहीयेत..
दिपू - का?
पद्या - तुला काय पंचायती? तिला ते बोकड बिकड देखके डर लगता हय.. जा कामपे.. चल्ल???
ढिंपाक ढिपांग.. ढिंपाक ढिपांग..
वर मिळवतीय वर... साध बोकड कापलेलं बघवत नाही अन वर मिळवायला चाललीय... मजाक करते आपला.. म्हणे मै तो जाउंगीच.. बघतोच आता.. अरे? पण आपण तिच्या सोबतीला आहोत.. आपल्याला सैनिकासारखं ताठ वागलं पाहिजे...
चार वाजता जेव्हा काजल सोललेल्या शेंगा घेऊन पुन्हा भटारखान्यात आली तेव्हा दिपूकडे मिश्कीलपणेच बघत होती.
दिपू - क्या??
काजल - शेंगा...
दिपू - तिथं ठेव.. अन हे बघ... घाबरू नको...
काजल - अँ??? म्हणजे?? मी कशाला घाबरतीय??
दिपू - आत्ता नय.. रात्री.. सगळे जातील तेव्हा.. मी हाये इथं.. काय डरनेका कारण नय...
जोरजोरात हसायला लागली काजल! क्षणभर तिचं ते मधूर हासणं पाहून दिपू बघतच बसला. काय हसते का काय? किती छान आवाज येतो हसण्याचा! काय दिसते.. गाल किती गुलाबी होतात...
दिपू - क्या हुवा.. कायको हसती??
काजल - मेरेको .. तेराच डर लगताय...
दिपू - कायको??
काजल - अकेला भटारखानेमे डर गया तो..??
दिपू - मै कायको डरेंगा?? मर्द डरता नय
काजल - कौन मर्द...???
दिपू - मैहीच... और कौन..???
अजूनच जोरात हसत काजल सुळ्ळकन निघून गेली.
भयंकर शरमला दिपू! च्यायला, आपण साधे पुरुषही समजले जात नाही अजून...
काय अर्थ आहे का याला???
आणि सव्वा चारला अलेल्या मालेगाव बसच्या ड्रायव्हरने ढाब्याला खडबडून जाग आणणारी बातमी दिली. मालेगावहून एका मॅरेज पार्टीच्या चार बसेस रात्री अकरा वाजता एकदम एकाचवेळी येणार होत्या. किमान दोनशे पब्लिक जेवणार होतं!
हे चांगलं की वाईट हेच चाचाला समजत नव्हतं! आजवर इतकं गिर्हाईक एकाचवेळी ढाब्यावर कधीच आलं नव्हतं! आता?? आता काय करायचं???
असले गंभीर प्रश्न असले की तो अबूकडे धावायचा. घोरत पडलेल्या अबूला हालवून हालवून जागं करून त्याने ही बातमी दिल्यावर जाग्या झालेल्या अबूतला पुर्वीचा अबू जागा झाला.
केवळ अर्ध्या तासात खूप काही घडामोडी घडल्या! पहिलं म्हणजे दिपूची भटारखान्यातून बाहेर रवानगी झाली. अख्खा भटारखाना अबूच्या हातात आला. शिरवाडहून जेमतेम पोचलेला बाळ्या जरा टेकतोय न टेकतोय तोच पुन्हा सुसाट वेगाने शिरवाडला खरेदीला गेला. यावेळेस त्याच्या बरोबर पद्या जातीने गेला होता. चाचाने रमणला पार्किंगच्या अन सगळ्याच सूचना दिल्या. गार्डनवर आज स्थानिक कुठलंच गिर्हाईक येऊ द्यायचं नाही असा फतवा अबूने काढला. अबू म्हणेल तेच होतं!
त्यादिवशी रात्री दहापर्यंतच दारू प्यायची परवानगी मिळेल असे गिर्हाईकांना सांगायला सुरुवात झाली. रमणने तर बाहेर पाटीच लावली. 'यहां दारू पीना मना है'!
यशवंत पिंपळगावला धावला. त्याला चिक्क्या अन खारेदाणे आणायचे होते. आज तो कोरडी भेळही ठेवायच्या विचारात होता.
विकी बासुंदी करायला अबूला मदत करत ह्ता. कसला अंदाजच येत नव्हता.
समीर, दादू, मन्नू, साखरू हे झिल्याच्या हाताखाली सध्याची गिर्हाईके उरकत होते. सगळ्यांच्या शिफ्ट्स आजच्यासाठी कॅन्सल होऊन सगळे जनरल शिफ्टला म्हणजे रात्री शेवटचं गिर्हाईक जाईपर्यंत थांबणार होते.
आत्ता काशीनाथ हवा होता!
प्रत्येकाच्या म्हणजे अगदी प्रत्येकाच्या मनात हा विचार एकदा तरी आलाच होता. अगदी.. अबूच्याही! त्याचे कारण निराळे होते. काशीनाथ भरपूर काम अजिबात न बोलता व स्वतंत्रपणे करू शकायचा. कुणाला त्याच्या मागे लागायची गरज नसायची!
आणि रात्रीचे आठ वाजले तसे चाचाने पद्या अन झिल्या सोडून सगळ्यांना भटारखान्यात मीटिंगला बोलवले. अगदी झरीनाचाची अन सीमा पण होते.
चाचा - दोसो पब्लिक आरहा! रातको ग्यारा बजे.. सगळे जेवणार हिते! मोठा कुटाणा होणार आहे.. कुणीही कुठेही जायचं नाही.. जे अबू सांगेल तेच ऐकायचं.. कितीही वाजले तरी चालेल... पण.. अशा मॅरेज पार्ट्या पुन्हा पुन्हा यहां आनेको मंगता.. तक्रार येता कामा नय.. सर्व्हिस एकदम फास्ट.. मै गल्लेपेच हय.. पद्या गार्डन देखेंगा.. झिल्या अंदर का हॉल.. विकी अबूके साथ भटारखाने मे.. सीमाभाभी आपबी अगर होसके तो थोडा देखना.. बुरा मत मानना.. पयली बारच ऐसा होरहा.. यशवंतला आज मदतीला साखरूने थांबायचं.. मन्नू, समीर, बाळ्या अन दादू.. बाळ्या मेन आहे.. बाळ्या गार्डन बघेल.. दादू अंदर देखेंगा..
मधेच झरीनाचाची बोलली.
झरीनाचाची - मतलब... भुलोबाको.. कोईबी नय आयेंगा क्या????
चाचाने तिच्याकदे पाहिले.
चाचा - तू जब नऊ बजे यहांसे जायेंगी तब दिपू और काजलबेटी को साथ मे लेके जा! ढाबेका प्रसाद भुलोबाके सामने रखके फिर इनको यहांपे किसीको छोडनेको बोल.. अंधेरी वाट आहे.. नीट घेऊन जा यांना...
अनंतकाळ न संपणारं वाळवंट अचानक संपावं अन समोर एखादी शुभ्र पाण्याची खाळळती नदी वाहात असावी..
किंवा...
उन्हाने अंगाची काहिली होत असताना सोसाट्याचा वारा सुटून पाऊस यावा...
किंवा..
किंवा काहीतरी असंच..
कुणाचंही लक्ष नसताना ज्या नजरेने दिपूने काजलकडे बघितलं..
काजलने मानच खाली घातली...
काय दिसते ही लाजल्यावर???
दिपू तिच्या त्या रुपाकडे बघतच बसला..
आणि मग क्षण दोन क्षणांनी तो तिच्याकडे बघत असतानाच तिने मान वर करून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं... आणि तो बावळटासारखा अजूनही तसाच पाहतोय हे पाहून... भटारखान्यातून पळूनच गेली...
तेव्हा स्टाफ चाचाला अनेक प्रश्न विचारून हैराण करत होता. कुणाचंतरी मात्र लक्ष होत दिपू अन काजलकडे...
रात्री नऊ कधी वाजतात अन कधी निघतो असे झालेले असताना झरीनाचाचीने हाक मारल्यावर दीपक अण्णू वाठारे मोठा जबाबदार चेहरा करून प्रकट झाले..
आणि.. पिवळ्या धमक पण तिला अतिशय शोभत असलेल्या ड्रेसमधे काजल आली तेव्हा आपली जबाबदारी वगैरे विसरून ते तिच्याचकडे बघत बसले.
अजून तिची मानह वर होत नव्हती...
आणि ...
झरीनाचाचीच्या मागून चालता चालता अंधार्या वाटेवरच्या खाचखळग्यांमुळे जबाबदार व सुजाण नागरीक दीपक अण्णू वाठारे यांचाच एकदा पाय घसरल्यामुळे त्यांना पटकन काजलच्या दंडाचा आधार घ्यायला लागला होता...
आणि.. मग हातात हात गुंफलेले... नि:शब्द चालणे.. शीतल झुळुकी.. ताजीतवानी हवा.. झरीनाचाचीची निरर्थक बडबड.. चांदण्याचा अंधुक प्रकाश...
लोणी.. लोणी जरा खरबरीत वाटेल असे हात वाटले दिपूला तिचे...
कुणी बोलतच नव्हतं....
बोटांच्या पकडींमधून दीपकराव आपले संदेश स्वतःच्याच नकळत स्पर्शाच्या माध्यमातून ट्रान्स्फर करत होते...
आणि अचानक उद्भवलेल्या या एकांतातील प्रसंगाने घामेजलेली गोरीपान मुलायम निमुळती बोटे.. ते संदेश रिसीव्ह करताना अधिकच दिपूच्या बोटांना बिलगत होती...
पहिला वहिला स्पर्श! दीर्घकाळचा.. आवडत्या व्यक्तीचा...
टहेर्याची नाजूक माशुका काजल मान खाली घालून अत्यंत लाजत पावले टाकत होती....
आणि महुरवाडीचे नवआशिक श्री. दीपक अण्णू वाठारे यांना स्वर्ग म्हणजे काय हे अंधारातच समजत होते..
नजरेने, शब्दांनी.. या सगळ्या माध्यमांनी व्यक्त व्हायच्या आधीच...
स्पर्शातून प्रेम व्यक्त झालेले होते..
अचानक अंधारातच नजरानजर झाली...
दिपू - .. काय? .. थांबायचंय का जरा वेळ??
खाली मान घालत मंद हासत हळूच पुटपुटत काजल म्हणाली..
काजल - अंहं... चालायचंय... असंच चालायचंय....
कधीही संपूच नये असा प्रवास चालू झाला होता.. पण.. पुढे काय काय होणार होते कुणास ठाऊक..
मात्र! त्याहीवेळेला दिपू अन काजलवर कुणाचतरी लक्ष मात्र होतं...
किती अजुन झटके बसणार आहेत
किती अजुन झटके बसणार आहेत कोणास ठाउक.
पण वेग अप्रतिम आहे...
असेच चालु राहु देत लिखाण.
पु.ले.शु.
अहा... मस्त मस्त मस्त....
अहा... मस्त मस्त मस्त.... आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटतंय!!!
apratim...................
apratim...................
व्हिलनची एंट्री झाली काय????
व्हिलनची एंट्री झाली काय????
मस्तच ...
मस्तच ...
अनंतकाळ न संपणारं वाळवंट
अनंतकाळ न संपणारं वाळवंट अचानक संपावं अन समोर एखादी शुभ्र पाण्याची खाळळती नदी वाहात असावी..
अप्रतिम !!!
बाकिचे भाग लवकर येउ द्या
व्हिलनची एंट्री झाली
व्हिलनची एंट्री झाली काय????
नक्कीच साखरु असणार
व्हिलनची एंट्री झाली
व्हिलनची एंट्री झाली काय????
न्हाय पद्या आहे तो
न्हाय पद्या आहे
न्हाय पद्या आहे तो>>>>
कशावरुन? त्याचा काय संबंध??? मला पण साखरुच वाटतो...
तो कोणीपण असो, पण इतक्या गोड प्रेमकथेला आता कोणाचंतरी गालबोट लागणार, हे नक्की....
दिपकराव तुमचे संकटे कमी होत
दिपकराव तुमचे संकटे कमी होत नाही वाटत ?.............. बेस्ट ऑफ लक ..................
नेहमीप्रमाणेच हा भाग पण मस्त
नेहमीप्रमाणेच हा भाग पण मस्त जमलाय, पु.ले.शु.!!!
हादेखील भाग अप्रतिम पुढे काय
हादेखील भाग अप्रतिम
पुढे काय होईल याची उत्सुकता लागली...
पुढे काय होईल याची उत्सुकता
पुढे काय होईल याची उत्सुकता लागली...मला पण
खुप छान लिहिता, अगदी तो ढाबा,
खुप छान लिहिता, अगदी तो ढाबा, तिथली माणसे इ.इ. वाचताना पुढे उभे रहाते अन रंगून जायला होते.. शिवाय रोज वाचायला मिळतय.. मी पण पुढच्या भागाची वाट पहातेय..:)
मस्त!!!! पुढे काय आता...कळुदे
मस्त!!!! पुढे काय आता...कळुदे लवकर
वेग अप्रतिम........... कथेचा,
वेग अप्रतिम........... कथेचा, कथा नायक नायिकेचा आणि लेखकाचाही... वाचकांच्या तोंडाला म्हणजे डोळ्यांना फेस आला भराभर वाचून... अहो मा. बो. वाचकांना सवय नाही अशा भन्नाट वेगाची... बेफिकीर, तुमीपण काशीनाथ आहात राव... म्हणजे म्हणजे... खबर्दार बाकी कोण कायतरीच अर्थ काढेल ते... हा... आपल्याला एवढंच सांगायचं होतं की तुमकोबी बोलनाईच नय पडता... अपनेआप अच्छा अच्छा भाग पटापट पोस्टता... और वोबी एकदम झकास...! पु. ले. शु....
आता पुधच्या भागाची वात पहायला
आता पुधच्या भागाची वात पहायला नका लावु. लवकर येउ दे.
ड्रीमगर्ल, आपला प्रतिसाद
ड्रीमगर्ल,
आपला प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले.
सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादांबद्दल व प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
आईची केमोथेरपी सुरू होत असल्यामुळे या पुढचा भाग १० मे या दिवशी लिहू शकेन असे वाटतंय!
ड्रीमगर्ल - आपल्याला तेवढाच रिलीफ!
-'बेफिकीर'!
बेफिकीर, तुमच्या आईच्या
बेफिकीर, तुमच्या आईच्या तब्येतीविषयी वाचून वाईट वाटलं... त्यांना केमोथेरपी सोसण्याचे बळ मिळो आणि त्या लवकरात लवकर बर्या होवोत हिच प्रार्थना.