ढाब्याच्या इतिहासात प्रथमच एका ढाब्याशी संबंधितही नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर ढाबा अर्धा दिवस बंद ठेवण्यात आला होता. अर्धा दिवस म्हणजे सकाळी चालू ठेवून दुपारी चारला बंद केला तो एकदम दुसर्याच दिवशी उघडणार होता.
सकाळी नऊ वाजता अब्दुलचे दफन करण्यात आले. झरीनाचाचीच्या वस्तीवर तो राहायला आल्यापासून सगळ्यांना एक बेवडा म्हणूनच माहीत होता. पण चाचीच्या मुलाला मात्र अंधुकपणे अब्दुलची कथा त्याच्या लडखडत्या बोलण्यातून समजली होती. मेहरुन्निसा हे नाव अब्दुलच्या बोलण्यात आलेले त्याने ऐकले होते.
अब्दुलचा देह डोळ्यांसमोरून कायमचा दूर जायच्या वेळेस सगळेच गलबलले होते. काही लहान पोरांना, जसे मन्नू, साखरू अन दिपू... रडूच आले होते. पण अब्दुलची ख्यातीच बेवडा अशी असल्यामुळे ते रडणे अब्दुलच्या विरहासाठी नसून एक मृत्यू डोळ्यासमोर पाहायला मिळाला यातून आलेले जास्ती होते.
मात्र झिल्या खराखुरा रडला होता. आणि चाची अन तिचा मुलगाही!
त्या दिवशी ढाबा बंद झाल्यावर सगळे पुन्हा नेहमीच्या जागी गोल करून बसले होते. पद्याने शिरवाडहून एक पाटी करून आणली होती. जी 'अब्दुल पंक्चर सेंटर' या आधीच्या पाटीच्या जागी लावायची होती. ती नवी पाटी एका कोपर्यात ठेवलेली होती.
सगळेच अपेक्षेने चाचाकडे बघत होते. चाचा बोलायला लागला.
चाचा - फार वाईट झाले. आपला दोस्त अब्दुल गेला. त्याला कुणी नव्हतेच. त्यामुळे आपणच त्याचे सगळे केले. सर्वांनाच वाईट वाटले. मौत तो आतीच हरेकको! लेकिन.. अब्दुल एकदम गेला. हा धक्का हळूहळू कमी होईल. पण आठवण म्हणून आपण अब्दुलचा फोटो आपल्या गल्यापाशी लावणार हय! आता प्रश्न फक्त इतकाच हय... त्याचे दुकान बंद करणे चुकीचे आहे... ढाब्यावर गाड्या येतात.. कुणी हवा भरून घेते... कुणी पंक्चर काढून घेते... दुकान तो चलानाच पडेंगा... आपल्यापैकी कुणालाच पंक्चरचे काम येत नय... म्हणजे सवय नय... परत.. ढाब्याचे काम हयच....त्यामुळे पद्या.. तू पिंपळगावला जाऊन कोई पंक्चरवाला मिलताय क्या देख...
इतकावेळ शांत असलेला दिपू म्हणाला...
दिपू - मै करता पंक्चरका काम... मेरेको आता...
प्रथम सगळे त्या लहान चमत्काराकडे अविश्वासाने बघत होते. आणि दहा मिनिटांच्या चर्चेनंतर...
एखादी गाडी पंक्चरसाठी आली तर दिपू तेवढ्यापुरता दुकानात जाईल, त्यावेळेस अबू अन विकी भटारखाना बघतील आणि एरवी दिपू भटारखान्यातच असेल... असा एक ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेतला गेला ... आणि श्री. दीपक अण्णू वाठारे यांचे ढाब्यावरील पहिले प्रमोशन झाले.
साडे पाच वाजता मात्र अब्दुलच्या दुकानावरील आधीची पाटी काढून तेथे 'मेहरुन्निसा टायर वर्क्स' अशी पाटी लावताना पद्या गलबलला.
आणि त्याचवेळेस दिपू काजलकडे टक लावून पाहात होता.
ही इतकी सुंदर मुलगी... गाते.. सगळ्यांना आधार देते... सांत्वन करते... फक्त... आपल्याकडे इतक्या.. कौतुकाने कशी काय बघते..
नजरानजर झाली. प्रसंग खरे तर दु:खद होता. पण दोघांनाही काय झाले ते समजले नाही. एका अनोख्या आकर्षणामधे आपण एकमेकांकडे पाहात आहोत याचे भान यायला एक दिड सेकंद गेला एवढेच! पण.. अचानक काजल कॉन्शस झाल्यासारखी वागायला लागली.
आणि.. दिपूची नजर... आता .... वारंवार तिच्याकडे वळू लागली...
सीमाने त्या रात्री साधे पिठले भाताचे जेवण केले होते. अबूही प्यायला नाही. कुणाला मूडच नव्हता. काल रात्रभरचे जागरण, आजचा दु:खद दिवस... सगळे साडे नऊलाच झोपून गेले.
फक्त.. दिपू जागा राहिलेला होता. काशीनाथ अन अंजनाच्या खोलीत एकटा राहणारा दिपू मनाशीच विचार करत होता.
काजल... काजल... काजल...
फक्त दोन दिवस... तेही वादळी वेगाने घटना घडलेले दोन दिवस... आणि त्यात ही मुलगी किती एकरूप होऊन गेली ढाब्याशी... तिच्या वागण्यात मुळी संकोचच नाही... अशी वागते जणू सगळ्यांना केव्हाचीच ओळखते... अबू अन चाचाला काका म्हणते.. पद्याला दादा म्हणते... सगळ्यांना.. अगदी मन्नू अन साखरू लहान असूनही त्यांनाही भैय्या म्हणून हाक मारते... विकी भैय्या.. समीरभैय्या... फक्त... दिपू मात्र दिपूभैय्या नाही... तो दिपूच... का?? असे का??
दिपू उठून बसला. उभा राहून त्याने खोलीची खिडकी उघडली. बाहेर पाहिले. यशवंतच्या खोलीत अजून उजेड होता. दारही उघडेच होते.
कितीतरी वेळ दिपू खिडकीतच उभा राहिला. काजल दिसते का ते पाहायला...
आणि बर्याच वेळाने उरलेले अन्न घराबाहेरच्या एका टोपलीत टाकण्यासाठी ती बाहेर आली. टोपली विरुद्ध दिशेला होती. टोपलीकडे जाताना काजलची दिपूकडे पाठ होती. कुठेही इकडेतिकडे न बघता सरळ त्या टोपलीत अन्न टाकून ती मागे फिरली. खाली बघत घराच्या दारात आली. आता ती दार लावणार आणि सगळे झोपून जाणार या कल्पनेने दिपू नाराज झाला होता. आजचे हे तिचे शेवटचेच दर्शन! आता बघू.. उद्या जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल....
आणि अकस्मात तो नाजूक प्रसंग घडला. दार लावताना जवळपास अर्धे दार लावले गेल्यानंतर काजलने ते पुन्हा उघडले आणि तिने हळूच झुकून बाहेर पाहिले.. दिपूच्या खिडकीकडे नाही... दिपू खिडकीत असेल याची तिला कल्पनाच नव्हती... तिने पाहिले भटारखान्याच्या दाराकडे.... एकच क्षण.. एकच क्षण पाहून तिने मनाशी काहीतरी विचार करत असल्याप्रमाणे जमीनीकडे बघत अलगद दार लावले...
काजलच्या खोलीत अंधार झाला तेव्हा दिपूच्या मनात लख्ख प्रकाश पडला होता.
काजलने ... भटारखान्याच्या दाराकडे ... आपल्यासाठी पाहिले असेल?? आपण दिसू म्हणून?? की.. उगाचच आपले... पण मग.. दार लावताना पुन्हा उघडून कसे बाहेर पाहिले.. आणि.. नेमके आपल्याच दाराकडे कसे?? की .. कसलातरी आवाजबिवाज आला म्हणून... पण.. मनातून तर वाटतंय की.. तिला कुणीतरी दिसण्याची अपेक्षा असावी.. काजल.. काजल... काजल..
संपूर्ण रात्र एकतर तिच्या विचारांमधे किंवा तिच्या स्वप्नांमधे गेली.
सकाळी जागा झालेला दिपू कालहून खूपच वेगळा होता. बाल्यावस्थेतील मन आता राहिलेले नव्हते. आता ओढ होती काजलला आपलेसे करण्याची! आणि.. तिचे होण्याची! उघड आहे... तिला इंप्रेस करणे हे आता दिपूचे एकमेव ध्येय असणार होते....
पहिल्यांदा दिपूने पटकन आंघोळ करून चाचाकडून किल्ली घेऊन अब्दुलच्या दुकानावर जाऊन सगळे दुकान शोधले. त्याला एक साबण, अब्दुलने कधीच न वापरलेले दोन शर्ट, एक जुनाट, जवळपास संपलेला पावडरचा डबा अन एक आरसा मिळाला. अब्दुलचा शर्ट घालताना त्याला वाईट वाटत होते. पण कुणी आपल्याला काही बोलणार नाही हे त्याला माहीत होते. एक तर दुकान तोच चालवणार होता आणि . भटारखानाही तोच चालवत होता... अब्दुलच्या वस्तूंसाठी भांडणे होण्याइतक्या वाईट मनाचे कुणीच नव्हते.
मेहरुन्निसा टायर वर्क्सच्या बाहेर पंधरा मिनिटांनी आलेला दिप्या आता स्वतःला दिप्या म्हणवून घ्यायला लाजणार होता. कारण टीचभर आरशात त्याने स्वतःचे जे रूप पाहिले होते... उजळ रंग.. चमकदार डोळे... भुरभुरीत छान उडणारे केस... रोज चिकन अन अंडी खाऊन अन भटारखान्यातला प्रचंड व्यायाम करून झालेले प्रमाणबद्ध शरीर.. किमान जितेंद्र तरी म्हणायला हरकत नाही आपल्याला असे त्याला वाटले...
आणि तो ढाब्यावर आला तेव्हा अबूबकर त्याच्याकडे पाहातच राहिला. नवा शर्ट, पायात अब्दुलचेच सँडल्स, पावडर वगैरे लावलेली, केस व्यवस्थित बसवलेले...
अबू - क्या बे?? बडा चिकना होगया तू तो..
आणि अजून काय व्हावे?? अबूने हा प्रश्न विचारण्याच्या जस्ट एक सेकंद आधी घराच्या दारातून काजलने नेमके तिथेच प्रकटावे??
काजलच काय... दिपूही लाजला...
काजलने अबूचाचाचा तो प्रश्न ऐकून मान वळवून दिपूकडे पाहिले अन अशी काही लाजली.. की दिपूच्या सर्वांगातून लहरी दौडल्या.
हेच तर नेमके व्हावे असे त्याला वाटत होते. पण नेमके तेच झाले तेव्हा त्याला काजलच्या उपस्थितीत अबूने हा प्रश्न विचारला यामुळे उलट लाजच वाटली.
अन सकाळच्या साडेआठच्या नाश्त्याला सगळे नेहमीप्रमाणे भटारखान्यात बसले अन पद्याने ऑम्लेट्स सुरू केली तेव्हा जो तो ऑम्लेटचा एक घास खाल्ला की दिपूची थट्टा करत होता.
आज क्या खास??
तेरेको पिक्चरमे काम मिलेगा दिप्या..
डाढी आयी क्या अबीतक??
अरे मूछबी नय आयी हय...
लेकिन आज इतना कायको चमकरहेला है दिप्या???
आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने दिपू काजलकडे अन काजल दिपूकडे पाहात होते... फक्त वेगवेगळ्या क्षणी... दिपूची स्तुती ऐकून काजल गालातल्या गालात हसत होती... हीच स्तुती विकीची किंवा मन्नूची झाली असती तर कदाचित तिनेही थट्टा करण्यात सहभाग घेतला असता... पण सगळे दिपूबद्दल काय काय म्हणतात हे ऐकण्याची तिला उत्सुकता होती.. आणि.. जे म्हणतात ते ऐकून ती मनातच सुखावत होती... लाजत होती..
शेवटी एकदा नजरानजर झाली. यशवंत अन अबू काहीतरी मोठमोठ्याने बोलत होते अन अबूचे मजेशीर बोलणे ऐकून सगळे हसत होते. दोघेही खो खो हसताना अचानक दिपू अन काजलचे एकमेकांकडे लक्ष गेले... आणि.. त्या हसण्याला एक वेगळीच खुमारी आली..
गेल्या चार वर्षात असा नाश्ता त्या ढाब्यावर झाला नसावा.. दिपू नुसता फुलून आला होता... आणि कामाला सुरुवात झाली...
आज दिपूने सपाटाच लावला होता. एक्स्प्रेस वेगाने तो पदार्थ काउंटरवर पुरवत होता.
सकाळी अकरा वाजता काजल बाबांबरोबर मदत म्हणून दुकानात गेली. तिथून तिला काउंटर दिसत नसला तरी तिचे ढाब्याच्या आत लक्ष जातच होते. आणि तेवढ्यात रस्त्याच्या समोरच्या बाजूला एक जीप थांबली अन ड्रायव्हरने रमणकडे चौकशी केली. रमणने यशवंतला येऊन सांगीतले. पंक्चर काढायला गाडी आली आहे. यशवंतने काजलला हा निरोप दिपूला द्यायला आत धाडले.
काजल खरे तर मनातून खुष होती. पण चेहर्यावर न दाखवता ती काउंटरवर आली. आत दिपू अक्षरशं खिंड लढवल्यासारखा नाचत होता.
नेहमी दिसणारे झिल्या, दादू, साखरू हे न दिसता अचानक एक फुलासारखा चेहरा काउंटरवर आला आहे अन तो काजलचा आहे हे समजायला दिपूला एक क्षण पुरला. मग मात्र तो बेहद्द खुष झाला. हिला ऑर्डर्स वगैरे बघायचे काम दिले की काय? मग रोजच भरपूर बघता येईल हिला... अन बोलताही येईल.
काजल - बाहर गाडी आया... पंक्चर निकालके चाहिये...
मूठभर मांस चढले दीपकरावांच्या अंगावर! आपले महत्व फारच आहे हे त्याला समजले.
दिपू - दस मिन्ट रुकनेको बोलना उसको... आयाच मै.. क्या क्या करेंगा अकेला... ढाबाबी देखो... पंक्चरबी मैहीच...
काजलकडे लक्षच नाहीये असे दाखवत तो बडबडत होता. काय पण इंप्रेस करण्याची संधी मिळाली होती.
आणि काजलच्या ते लक्षात आले होते. दिपू शायनिंग मारतोय हे! ती पण खट्याळच होती.
काजल - नय नय.. तुमको सिर्फ बतारही मै.. शोएबभाईने निकालके दिया पंक्चर.. गयी गाडी...
सगळा उत्साहच संपला. च्यायला? मग हे सांगायला इथे कशाला आली?? पण शोएब कोण?
दिपू - शोएब कौन???
काजल - जिसको तुम झिल्या पुकारते...
दिपू - निकालदिया ना?? हां! अच्छा हुवा.. मैबी अबी भोत काममेच हय...
असे म्हणून दिपू आत वळला. ती गेली हे पाहून नाराज झालेल्या दिपूने एका पातेल्यात बचकभर तिखट उगाचच टाकले. नंतर विचार केला. साली ही भाजी कोल्हापुरी म्हणून जाईल आता. पण या झिल्याला पंक्चर कधीपासून काढता यायला लागलं??
काजल बाहेर आली. गाडीवाल्याला तिने सांगीतलं की पाच मिनिटात पंक्चरवाला येतोय. आणि दोन मिनिटांनी गल्यापाशी असलेल्या पद्याला जाऊन सांगीतलं की तो दिपू पंक्चर काढायला नाही म्हणतोय.
पद्या उचकला. तो भटारखान्यात आला. अबू नव्हताच. विकी कांदे चिरत होता. दीपक अण्णू वाठारे कडवट चेहरा करून भाजी परतत होते.
पद्या - अय दिप्या... पंक्चरको नय कायको बोलता बे?? तेरे जुबानपे दुकान रख्खा ना??
दिपू - पंक्चरको?? मै कब नय बोला? झिल्याने निकाला ना पंक्चर??
पद्या - झिल्या? वो गया शिरवाड! उसको किधर पंक्चर आता हय?? चल बाहर आ.. पंक्चर निकालके दे...
दिपू - मेरेको वो लडकी बोली... काजल.. झिल्या पंक्चर निकाला करके...
दिपूचं हे वाक्य ऐकायला पद्या कुठे थांबला होता?
दिपू बाहेर आला. दुकानात काजल बसलेलीच नव्हती. त्याने इकडे तिकडे पाहिले. च्यायला, हिनेच थापा मारल्या पद्यादादाला! आता दिपू उचकला.
वीस मिनिटात होणार्या कामाला चाळीस मिनिटे लागली. कारण पंक्चरची सवय कुठे होती त्याला? अन एकदा चाक बाहेर काढून ठेवल्यावर जीपवाला डोक्याला हात लावून बसला होता. रमण मात्र दिपूची सगळी मदत करत होता.
घामाघूम होत दिप्याने शेवटी चाक बसवले. जीपवाल्याने विचारले.. "किती??"
पहिल्यांदाच... आयुष्यात पहिल्यांदाच दिपूला लक्षात आले होते...
मनीषाताईच्या घरी करायचो तसं नाही... कोणतंतरी महत्वाच काम स्वतःच्या जीवावर केल्यामुळे... आपल्याला आज हा प्रश्न विचारला जात आहे.. 'पैसे किती झाले?'
कुणास ठाऊक किती झाले?? एकदा वाटले रस्त्याच्या पलीकडे गल्ल्यावर पद्यादादा आहे त्यालाच देऊन टाका असे सांगावे.
पण एक विषारी प्रश्न दिप्याच्या मनात आला.
आपण चार वर्षे राम रहीम ढाब्यावर... फुकट राबायचो?? चाचा सांगतात... या वर्षी सगळ्यांचे पगार दहा टक्के वाढवले.. असे केले .. तसे केले.. पण मग .. आपला पगार???
"दस रुपया" - दिप्याने तोंडाला येईल ते उत्तर दिले.
"दिमाग खराब होगया क्या?? चालीस रुपया लेते है पंक्चरका.. मालूम नय तेरेको??"
गाडीचालकाने ज्ञान वाढवल्याबद्दल ओशाळे हसत दिप्याने हातात चाळीस रुपये घेतले अन ती गाडी खूप लांब जाईपर्यंत तिथेच थांबला. रमणही थांबला होता. दिप्याने गाडी गेली त्या दिशेने शुन्यात बघितल्यासरखा एक प्रश्न विचारला.
दिपू - रमणकाका...
रमण - क्या?
दिपू - मेरा .. ढाबेका.. पगार नय होता क्या??
रमण - क्युं?
दिपू - मेरेको कहां देते पगार चाचा?
रमण - तेरा पगार शिरवाडके पतपेढीमे जमा करते खुदके नामपर... मन्नू और साखरू का बी..
दिपू - क्युं??
रमण - तुम तीनो छोटे हो... अठरा साल के होनेके बाद तुम्हारेको मिलेगा अख्खा आजतकका पगार .. और आगे जो काम करोगे उसका बी... क्युं? ऐसा क्युं पुछता हय??
दिपू जागच्याकागी खिळून उभा राहिला. काही वेळाने त्याने हातातल्या दहाच्या चारपैकी दोन नोटा रमणपुढे केल्या...
रमण हसू लागला.
रमण - बेटा... मै काका न तुझा.. असं नाय करायचं.. तू छोटा हय करके मै आया तेरी मदत को..
छोटा! या शब्दाने दिपूला फार वाईट वाटलं होतं! काजलकडे बघणे ही आपली चूकच आहे असे त्याला वाटू लागले. आपल्याला अजून मोठेही समजत नाहीयेत..
अख्खा भटारखाना गेले कित्येक महिने ज्याच्या जीवावर जीव धरून होता आणि आज अब्दुल नसतानाही ज्याच्यामुळे पंक्चरचे काम थांबलेले नव्हते...
तो पंधरा वर्षांचा छोटा... अगदी छोटा दीपक अण्णू वाठारे पाय ओढत पुन्हा ढाब्याकडे चालला होता.
आणि याच्या निम्या वयाचा असताना मात्र त्याला खूप मोठा असल्याप्रमाणे घरातून काढून टाकलेले होते.
केवळ सात, आठ वर्षात दिपूने रामरहीम ढाब्यावर कमाल करून दाखवली होती... पण.. त्याच्या प्राक्तनात नको तेव्हा मोठे समजले जाणे अन नको तेव्हा छोटे समजले जाणे हेच असावे...
ढाब्यावर पोचायच्या क्षणी अचानक काजल झुळकन समोर आली.
काजल - दे इधर. हात दे.. मै बँडेज लगाती.. देख रही थी मय.. तेरेको पान्हा लगा ना?? देख अबीबी बहरहा खून.. कितना काम करता हय... कितना थकता हय.. और फिरबी.. कितना अच्छा रयता हय ढाबेपे.. हं.. अब इसको भिगाना मत पानीमे.. दो दिनमे भर आयेंगा... मी मुद्दाम प्रदीपदादाला सांगीतलं.. दीपक पंक्चर नाही काढणार म्हणतो म्हणून.. कारण मला पाहायचं होतं.. तू पंक्चर कसं काढतोस ते... तू इतका मोठा आहेस.. वाटतच नाय देखके.. सब आता तेरेको... एक दिन.. मेरेकोबी सिखा हां... पंक्चरका काम.... मय लडकी होके बी सब सिखेगी.. तू तो खाना कितना अच्छा बनाता हय.. कलकी दाल तुनेहीच बनायी ना.. घरपे सब लोग भोत खुष थे दाल खाके..
दिप्या..., दिपू..., दिपड्या..
सगळ्या नावांपेक्षा खूप म्हणजे खूपच चांगली हाक आपल्याला मारली जाऊ शकते.
दीपक!
किती मुलायम बोलणं! किती मुलायम स्पर्श! जखम सुद्धा फुलासारखी वाटायला लागलीय. सगळ्या अंगातून गोड शिरशिर्या येतायत.
आपण मोठे आहोत... खूप मोठे.. आपण किती काम करतो.. किती दमतो.. आपल्यालाच माहीत नसतं! आणि... आपल्याला पंक्चर काढताना हिला बघायचं होतं.. कौतुकाने.. आपण बनवलेली दालपण आवडली... यशवंतकाकांनापण... सीमाकाकूंनापण.. आणि.. इतका वेळ ही .. आपल्याला बघत होती?? कुठून?? ...
दिपूच्या हृदयात आयुष्यात पहिल्यांदाच आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला लागली.
बिनदिक्कत ढाब्याच्या गेटवर दिपूच्या हाताला बँडेडची पट्टी चिकटवताना काजलला बाबांची अन प्रदीपदादाची अजिबात भीती वाटली नव्हती. आणि त्यांनी तर ते पाहिलेही नवते. रमणनेही!
त्या दिवशीची दुपार टळटळीत असूनही शीतल वाटली दिपूला!
संध्याकाळ कधी झाली हेही समजले नव्हते. दुपारी साधारण अडीच पर्यंतच दिवसभराचे महत्वाचे काम संपायचे! मध्यरात्रीपर्यंत पुरतील इतके पदार्थ एकदा करून झाले की मग फक्त ऐनवेळी ऑर्डरप्रमाणे रस्सा गरम करून डिशमधे घालून डिश काउंटरवर ठेवायची एवढेच काम उरायचे. हे काम बहुतेकवेळा विकीच करायचा. पण दिपू स्वयंपाक करत असेल तेव्हा लुडबुड होऊ नये म्हणून दिपू पदार्थही काउंटरवर ठेवायचा. मग विकी बाकीचे सगळे करायचा. अबूबकर कॉमेंट्स पास करत जमेल तितकी मदत दिपूला अन विकीला करायचा. मुख्य म्हणजे श्रमाचे काम तो त्यांना पडूच द्यायचा नाही.
कायदेशीररीत्याही दिपू आता काम करू शकत होताच!
काशीनाथने इंट्रोड्युस केलेल्या शेव टोमॅटो भाजीची जादू मात्र आता हळूहळू कमी होऊ लागली होती. ढाब्याला नवसंजीवनी देणारे काहीतरी आवश्यक होते. ढाब्यावर कमाई पुर्वीइतकीच, किंबहुना जास्तच होत होती. पण लोकही तेचतेच खाऊन कंटाळणारच!
यशवंतच्या बायकोने केलेल्या शिर्याची आठवण ताजी होती. बासुंदी पुरी बरोबर आता शिरा पुरीही चालू करायचा अबूबकरचा विचार होता. आणि तो प्रस्ताव चाचाला रुचला होता. यशवंतला तर फारच! कारण त्यामुळे सीमाला महत्व मिळणार होते आणि मग सीमाचा दुसरीकडे जायचा विचार रद्द व्हायची शक्यता वाढणार होती. सकाळच्या काही गाड्या ढाब्यावर येऊ शकायच्या नाहीत कारण ढाबा मुळी सुरूच साडे नऊ दहाला व्हायचा. साडे सातला चहा, पोहे, उपमा ठेवायचीही एक कल्पना विचारात होती.
अब्दुलची आठवण आली नाही असा एक क्षण नव्हता. प्रत्येकजण गंभीर होता. ढाबा हे कमालीचे वर्दळीचे किंवा कमालीच्या शांततेचे ठिकाण असते. गाड्या आल्या तर श्वास घ्यायची फुरसत नाही. गाडी नसेल तर स्टाफच टेबलवर पाय ठेवून खुर्च्यांवर बसेल अशी अवस्था!
पण रामरहीम ढाबा बहुतेकदा गजबजलेला असायचाच!
रात्री नऊ वाजता बराचसा स्टाफ भटारखान्यात येऊन मुगाची खिचडी खाऊन गेला. त्यांच्यातील सकाळपासून राबणारे आपापल्या खोलीत झोपायला गेले. दुपारपासून कामाला लागलेले आता वेगवान सर्व्हिस देत ढाब्याचे रेप्युटेशन जिवंत ठेवत होते. दिपूही आता कंटाळला होता. त्याला घाई होती त्याच्या खोलीत जायची! कारण मग खिडकीतून काजलच्या घराकडे बघता येईल!
अबूबकरची परवानगी घेऊन दिपू थोडेसे जेवला अन खोलीत गेला. त्याच्या मनात विचार आला. आपण दुपारी किती चुकीचे विचार करत होतो. आपल्याला दिलेल्या खोलीसारखी, यशवंतकाका अन एक पद्या सोडला तर कुणाचीही खोली नाही. स्वतंत्र बाथरूम! भली मोठी प्रशस्त खोली.. चाचा चांगला आहे. आपल्याला आपला पगार अठराव्या वर्षी देणारच आहे. तीनच वर्षे राहिली आहेत.
दिपूने खसाखसा अंग घासून आंघोळ केली. स्वच्छ आवरून तो खिडकीपाशी आला. सीमाकाकू बाहेरच बसलेल्या होत्या. काजल कुठे होती कुणास ठाऊक!
मग दिपू बाहेर आला. भावी सासूबाईंवर काहीतरी इंप्रेशन मारता येईल का याचा विचार करू लागला.
दिपू - काकू.. बाहेर कशा काय एवढ्या रात्री?
काकू - अरे दिपू? काय म्हणतोयस? .. बस..
दिपू - नय... जानेका हय...
काकू - कुठे?
दिपू - असंच हायवेवर चक्कर मारायला.. दिवसभरात वेळच होत नय..
काकू खुसखुशीत हसल्या. एवढंसं पोरगं! मोठ चक्कर मारायला चाललंय रात्री! तेही हायवेवर...
दिपू - क्या हुवा?
काकू - तू रोज जाता है घुमने?
दिपू - आजसे चालू कररहा.. आपको दाल कैसा लगा कलका?
काकू - भोत बढिया. तू इतनीसी उमरमे कैसे बनालेता हय सब?
दिपू - इतनीसी? बीस एक साल का होएंगा मय..
काकू - हो का? मग आईला मिठी मारून रो कैसे रहा था कल?? बीस साल का लडका ऐसे रोएंगा?
खळखळून हसत काजल आतून बाहेर आली. डोळ्यात खट्याळ, मिश्कील भाव, हसण्यातून चांदणे सांडलेले, हसण्यामुळे चेहरा उजळलेला आणि दिपूकडे बघत तोंडावर हात दाबत अजूनच हसत होती..
दिपू वरमला. खूपच वरमला. हा मुद्दा काकूंनी आत्ता काढायला नको होता असे त्याला प्रामाणिकपणे वाटले. काजल आपल्यापेक्षा थोडीशीच पण मोठी आहे हे त्याला कालच माहीत झालेले होते.
निराश होऊन तो परत फिरला. काकूंना जाणवले. तो चिडलेला असावा.
काकू - अरे मैनेच गलती की! मा तो मा होती हय ना?? तू तो हयहीच बडा.. सब खाना पकाता हय
मधेच काजल बोलली
काजल - आई.. आज त्याने पंक्चरबी काढले.
काकूंनी डोळे मोठे करत आश्चर्य व्यक्त केलं! दीपकरावांची कळी जरा खुलली. उलटे वळले महाशय!
दिपू - इलेक्ट्रिकका काम बी आता हय..
काकू - तुला??? .. मग एक काम करना.. अंदरसे वायर लाके ये .. यहाँपर बल्ब लगाके देना..मै किताब पढती हूं तो इसके बाबाको दिया जलनेसे नींद नय आती.. इथे बसून वाचता येईल...
रात्री सव्वा दहा वाजता काजलच्या घराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या पायर्यांच्या बाजूला एक बल्ब लटकत होता.
आणि आपण भाव खाण्याच्या नादात काय चूक केली ते दिपूला समजले होते. आता काजल उरलेले अन्न टाकायला येईल तेव्हा दिपूच्या खोलीकडे बघणार नव्हती. अन त्यालाही सारखे खिडकीतून तिकडे बघता येणार नव्हते...
पण ती त्याची चूक काजलने सुधारली. पावणे अकराला, यशवंत आत जेवत असताना काजलने तिच्या घराच्या खिडकीतून पाहिले तेव्हा दिपू तिच्याचकडे पाहात होता अन ती दिपूकडे...
कुठल्यातरी अनामिक आनंदाने दोघांच्याही चेहर्यावर मंद हसू फुलले होते. बल्बची खरे तर गरज नव्हती. आकाशात.. आणि दोघांच्याही मनात.. आता भरपूर चांदणे जमा झालेले होते..
टहेर्याची माशुका काजल यशवंत बोरास्ते आणि महुरवाडीचे आशिक दीपक अण्णू वाठारे यांची प्रेमकहाणी .... 'हाफ राईस दाल मारके' ... आज सुरू झाली होती....
दिपक आनी काजल यानच्या
दिपक आनी काजल यानच्या प्रेमाने कथेमध्ये एक नवीन पना आला आहे . फारच सुन्दर .
छान वळणे येत आहेत कथेला ..
छान वळणे येत आहेत कथेला ..
तुमच्या स्पीड चं कौतुक बारंबार केल्याशिवाय राहवत नाही
मज्जा येत आहे वाचायला...येऊदे
मस्त चाललीय कथा हाच वेग
मस्त चाललीय कथा
हाच वेग कायम ठेव
सहिच आहे रोजची
सहिच आहे रोजची मेजवानी...कथेची! शुभेच्छा!!
दिपू आणि काजलच्या
दिपू आणि काजलच्या प्रेमकहाणीने ही कथा एकदम गोंडस-गोजिरी होऊन गेली आहे
आता हे प्रेम यशस्वी होईल का? असा प्रश्न पडलाय... कारण तुम्ही मागच्या भागात लिहिलेय ना, की त्यांना काय माहीती होते की ते इथे बरीच वर्ष राहणार आहेत आणि जातांना ढसाढसा रडणार आहेत....अशाच आशयाचं काहीतरी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पु.ले.शु.
लवकर सम्पवा बाबा. नाहितर वेग
लवकर सम्पवा बाबा.
नाहितर वेग तरी टिकुवुन ठेवा.
मस्त
पु.ले.शु.
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो पण यशवंत चे आडनाव मागच्या
अहो पण यशवंत चे आडनाव मागच्या भागात लाहिगुडे का काय्तरि बोअलला ना?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
दक्षिणा, मनापासून आभारी आहे.
दक्षिणा,
मनापासून आभारी आहे. घाईघाईत काही चुका होत गेल्या. आपण लक्षपुर्वक लिहिल्यामुळे माझ्या ध्यानात आले.
कृपया असेच लक्ष ठेवावेत.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!