वैभव जोशींचं 'मखमली मन'

Submitted by पल्ली on 23 April, 2010 - 01:06

मन उदास झालं होतं. मनात आलं, कुठलं तरी छान गाणं ऐकु. असंख्य गाणी आठवायला लागली. पण माहौल काही बदलत नव्हता. कुणाशी तरी बोलावं... पण कुणाशी? आणि बोलु तरी काय?? जरा हिंमत केली आणि वैभव जोशींना फोन लावला. वैभव म्हणजे 'गुरु माणुस'. पण माझी हिंमत वाया नाही गेली. एका संवेदनाशील, सच्च्या कविला शोभेल असं दिलखुलास बोलत वैभव जोशींनी माझा बराच ताण घालवला. कवि म्हणुन त्यांनी आपल्याला जिंकलंच आहे, माणुस म्हणुनही त्यांनी जिंकलं. दुसर्‍याच दिवशी त्यांच्या 'मन मखमल माझे' ह्या नव्या आल्बमचा उद्घाटन समारंभ होता, त्याला मला आपुलकीनं बोलावलं. असा आपलेपणा मायबोलीमुळे बर्‍याचदा अनुभवाला येतो.
पुण्यातल्या एफ्.सी. रोडवर टाटा डोकोमोच्या शोरूममध्ये संध्याकाळी ६ वाजता समारंभ होता. कलती संध्याकाळ असुनही उष्मा जाणवत होता. बरीच गर्दी दिसत होती. फोटोंमधून पाहिलेले वैभव जोशी समोर दिसले, खांबाला टेकुन अगदी 'कूल' उभे असलेले! दोन अगदी 'फ्रेंडली' चेहर्‍याच्या बायका दिसत होत्या. मग मी पुढे होउन पुणेरी धिटाईने त्यांच्याशी बोलले, 'मी पल्ली. मायबोलीकरीण. तुमच्यापैकी सौ. वैभव जोशी कोण?' दिपानं अगदी साधेपणानं उत्तर दिलं, 'मी. दीपा वैभव जोशी..'
दीपाच्या सोबत होत्या सौ. अमृता आशिष मुजुमदार. आता त्या गर्दीत मी नवखी नव्हते. दीपा आणि अमृताशी खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा सुरु झाल्या. आमचं हसणं खिदळणं ऐकुन वैभवचं आमच्याकडे लक्ष गेलं असावं. गर्दीतुन वाट काढत तो आमच्यापर्यंत आला. 'नमस्कार पल्ली.' पुन्हा तोच आपलेपणा. मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. एकलव्याला जसे अचानक द्रोणाचार्य दिसल्यावर झाले असेल तसे मला झाले. हा माझा आधुनिक गुरु माझा अंगठा मागणार नव्हता पण मी बावचळले होते.
एवढ्यात वैशाली सामंतांचं आगमन झालं. तमाम पब्लिक टाचा उंचावुन बघायला लागलं. सिल्कचा सौम्य लालसर ड्रेस घातलेल्या वैशालींच्या चेहर्‍यावर तेज दिसत होतं. पाठोपाठ काही वेळातच अजिंक्य देव आले. उंच, भारदस्त व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि खळाळतं हसु.... सगळ्या वातावरणांत ह्या दोघांच्या आगमनानं स्सॉलीड चैतन्य संचारलं. धडाधड कॅमेरे सज्ज झाले. मिडीयावाल्यांनी एव्हाना ह्या सगळ्यांना गराडा घातला होता. आता तो मंतरलेला क्षण! सी.डी.चं उद्घाटन.
गायिका वैशाली सामंत, संगीतकार आशिष मुजुमदार, गीतकार वैभव जोशी, ध्वनि मुद्रक ओंकार केळकर, शेमारुचे केतन मारू व कॉर्पोरेट डेव्हलपर क्रांती गाडा, टाटा इंडीकॉमचे शशांक पोरे, अश्या सगळ्यांच्या उपस्थितीत 'मन मखमल माझे' गाण्यांच्या सि.डी. चे उद्घाटन झाले.
पार्श्वभुमीवर सि.डी.तली गाणी वाजवली जात होती. वातावरण भारल्यागत झालं होतं. उपस्थितांच्या प्रश्नांना हसत खेळत उत्तरं दिली जात होती.
ह्या सगळ्या गर्दीच्या सगळ्यात मागे मी आणि दीपा उभ्या होतो. सोबत वैभवचा मुलगा अथर्व आणि माझी श्रावणी.
उद्घाटन झालं होतं. हळुहळु लोक जायला निघाले. वैशाली सामंतांच्या सेक्रेटरी मनिषा आणि मी अनौपचारिक गप्पांत रंगलो होतो. दीपाला काही कामानिमित्त जावं लागलं होतं. सि.डी. चं पोस्टर लक्ष वेधुन घेत होतं. सि.डी. तलं 'धूसर....' गाणं लागलं होतं. मन मस्त हलकं फुलकं झालं होतं. इतक्यात घामाघूम झालेला वैभव माझ्यासाठी एक सि.डी. घेउन आला. क्या ब्बात है! ह्याला म्हनतेत कलाकार मानुस.
घरी निघाले. कानात वैभवची गाणी रुंजत होती. एकेक मखमली शब्द मोरपीस होउन लहरत होता. आजूबाजूची गर्दी, गोंगाट मला विचलीत करु शकत नव्हते. अगदी शिणीमा श्टाईल! वैभवच्या शब्दांचं सामर्थ्य इतकं अचाट आहे. जे गर्दीतुन तुम्हाला दूर नेउ शकतात आणि एकटे असताना मेहफील सजवतात. एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या मनाची स्पंदनं इतकं अचुक टिपणं, इतक्या तरल हळुवार शब्दांत म्हणजे.... उफ्फ! अवघड आहे शब्दांत सांगणं...
गुरुपुष्यामृताची रात्र. आणि 'मन मखमल माझे' ची गाणी. सही काँबीनेशन. कॉफीचा कप घेतला, बाल्कनीत आले... आता एकेक शब्द मला ऐकायचा होता. कधी गाण्याच्या ओळी मला बोलवत. कधी वैशालीचा व्हर्सटाइल आवाज माझं लक्ष वेधुन घ्यायचा, तर कधी गाण्याचे सूर मला वेढुन घ्यायचे! एकंदरीत मस्त मराठी गाण्यांचा ताजा ताजा फुललेला, थंडगार सुगंधी गजरा माझ्या हाती लागला होता.
नशिल्या एखाद्या पावसाळी पहाटे हात पसरुन आळस झटकावा, केशरिया आभाळाचे रंग न्याहाळताना ओल्या दवात न्हाउन निघावं तसं 'हे कोवळे उन्हं ओले' ऐकताना झालं होतं. नुकत्याच आकाशात झेप घेतलेल्या पक्षासारखं चंचल असं हे गाणं. मनाला लहरत विहरत घेउन जाणारी उडउडती चाल. वैशालीनं इतकं स्टायलीश गायलंय की सगळा घाणेरडा मूड जाउन एकदम फ्रेश व्हायला झालं. अनवाणी पायानं ओल्या गवतावर चालताना पावसाचा पहिला थेंब अंगावर पडुन शहारा यावा तसं हे गाणं... प्रसन्न गाणं.
हळुवार गाण्यानंतरचं झिम्माड गाणं म्हणजे 'रिमझिम रिमझिम...' खिडकीतुन बाहेर पाऊस पडताना ओला रस्ता दिसावा तसे शब्द. वार्‍यासोबत हेलकावे खाणार्‍या पावसाच्या धारांचा शुभ्र झिरझिरीत पडदा तशी चाल. झोडपणार्‍या नाहीत पण चिंब भिजवणार्‍या पावसाचं रिमझिम रिमझिम गाणं. बासरीचा अप्रतीम वापर आणि इतर संगित संयोजन क्क्लास! मस्ट बी ऐकावं असं.
चिंब भिजल्यानंतर उबदार पांघरुणात शिरावं तसं मऊ मलमली गाणं...... 'ऋतु येत होते ऋतु जात होते, फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते...' ह्यातलं अखेरचं कडवं तर एकदम काळजात्..'करावी कशी पाठ दु:खाकडे मी, उभे हात जोडुन दारात होते....' वैभवजी, पुन्हा एकदा एवढंच म्हणावंसं वाटतं 'उफ्फ!' वैशालीनं इतका संयमी, आर्त आवाज लावलाय ना की.... थेटच... थोडा हळुवार चालीनं जाणारा हा हुंकार!
अशी छान ऊब आली असताना, बाहेर बेधुंद पाऊस असताना मोहरल्या शरिरावर मखमली स्पर्षाचा तरंग म्हणजे 'मन मखमल मखमल माझे.....' तिच्या रेशमी मनाचं नाजुक व्यक्त्-अव्यक्त. अगदी कळस गाणं झालंय.
'कोवळ्या उन्हा'चा ओला केशरी, 'रिमझिम रिमझिम' चा हळवा निळा, 'ऋतू' चा लालसर करडा, 'मन मखमल' चा सावळा जांभळा आणि मग 'स्पंदन' चा ऑफबीट पांढरा..... शुभ्र कॅनव्हासवर फिकटसर एखादा स्ट्रोक म्हणजे 'स्पंदन'. फिकटसर असूनही कॅनव्हासवरच्या ओरखड्यासारखं...
'दगा करुनी उभे नामानिराळे पाहिले......' जिव्हाळे ही गझल ऐकताना असं वाटलं की आपलाच एखादा अनुभव वैभव त्याच्या शब्दात मांडतोय. वैशालीनं आपण किती उत्तम प्रकारे गजल गाऊ शकतो हे दाखवुन दिलंय. पाठीमागे तबल्याचं सातत्य जिव्हारी पडणार्‍या घावांसारखं. पण लागोपाठ तीन गंभीर गाणी झाल्यानं माझा मूड पुन्हा उदास व्हायला लागलं होता. कशाला रे एवढं औदासिन्य? नको ना. प्लीज. पावसात भिजत होतो तेच छान होतं की! गंभीर गझला द्यायचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही हेच खरं. अर्थात हे सगळं माझं वैयक्तीक मत झालं. चु.भु.द्या.घ्या.
ओल्या पहाटेच्या कोवळ्या उन्हातुन अलगद सुरु झालेला हा सूरमयी प्रवास आता संध्याकाळच्या कातर उंबरठ्यावर आलाय. कधी कोवळं उन्हं तर कधी पावसाची ओंजळभर रिमझिम..... बदलता ऋतु कधी तर कधी बेधुंद गारवा. दुपारचं सूड उगवणारं उन, आणि नंतर काहूर भरली संध्याकाळ....
ह्या मखमली प्रवासात वैभवच्या शब्दांनी मला हिरव्याकंच ओल्या दवावर चालवलं. एकदा धाराधारांनी भिजलेल्या रानात नेलं. एकदा तर चक्क माझ्याच उंबरठ्यावर मला आणुन सोडलं! मन मखमल मखमल म्हणत एका सुंदरशा बंगल्याच्या टेरेसवर उभे असताना अबोल पदर वार्‍यासोबत कधी उडाला कळलंच नाही. 'स्पंदन' कवितेत एकाच वेळी उधाणलेल्या किनार्‍यावर, सावलीच्या झाडाखाली आणि लाजर्‍याबुजर्‍या आभाळाची भेट झाली.
हे जरा अति कौतुक होतंय का? होउ दे ना. कारण चांगल्या गोष्टीचं कौतुक नाही करायचं तर कुणाचं? उगीच टिका करणं माझा प्रांत नाही. आपण काय टिकाकार नाही. आपलं काम आहे चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाच्या नादी न लागणं. जेव्हा मनाला स्पर्शून एखादी कलाकृती जाते तेव्हा तोंडुन 'व्वाह' निघालीच पायजेल राव!
तर बॅक टु 'मन मखमल माझे..........'
संगीत संयोजक आशिष मुजुमदारांनी धुसर ची चाल मस्त सोडलीय. चाल बांधलीय म्हणायला कससंच वाटतं. ह्या गाण्यात वैशाली सामंतांनी कातर कातर, एकाकी, कुणीतरी दूर... अशा शब्दांचा अप्रतीम आर्त सूर लावलाय. त्यामुळे 'आयटम साँग' गाणारी वैशाली सामंत एका वेगळ्याच रुपात दिसते. अलवार चालींतुन आशिष मुजुमदारांनी आपल्याला 'सॉफ्ट' गाणी दिलीत. आजकालच्या दे दणादण गाण्यांच्या प्रकारात हरवलेले हळवे सूर 'मन मखमल माझे' मध्ये ऐकायला मिळतात. उगीच अवजड शब्द न लिहिता वैभव जोशींनी साधे सरळ शब्द योजल्यानं ही गाणी आपली वाटतात. वेगवेगळ्या मूडची गाणी वैशाली नं ताकदीनं पेलली आहेत. तिची कमिटमेंट आणि गाण्यातले विविधांगी पैलु पाहून मला तर ती 'लेडी अमिताभ' वाटली. अतिशयोक्ती नाही, जेनुइनली.
फिमेल ओरिएंटेड शब्द वैभवला कसे सुचतात हा प्रश्न मनात आला पण परत असंही वाटलं की हेच शब्द, ह्याच भावना एखाद्या पुरुषाच्याही असु शकतील. असा संवेदनाशीलतेचा मक्ता काही बायकांनाच दिलेला नाहीये. नाहीतर वैभवला तरी हे कसं सुचलं असतं?
मी काही कुणी संगितातली दर्दी नाही. नाहीतर आशिषच्या संगित रचना आणि जितेंद्रच्या संगित संयोजनावर भरभरुन बोलले असते. इतकं ते गोड आहे. कानाला आणि मनाला छान वाटलं हे नक्की.
एव्हाना माझा मूड पुन्हा नॉर्मल होउ घातला होता. डोळे हळुहळु मिटत होते. उन्हाळ्यातला तप्त दिवस संपुन अलगद रात्र झाली होती. उगीचच हवेत मंद सुगंध दरवळतोय असं वाटलं. कुठुन छान दरवळ येतोय कळेना. वैभवच्याच शब्दांत धुंदफुंद पारिजात.... अन मिठीत मोगरा................
जास्त चिकित्सा न करता वेगळ्या मूडमध्ये जायचं असेल तर आपली स्वतःची सि.डी. घेउन टाका बिनधास्त. पण ही गाणी ऐकल्यावर आपल्या कुणा प्रिय व्यक्तीची तीव्रतेनं आठवण आली तर तक्रार नाही चालणार, काय?
Man.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्ली, खूप छान लिहीले आहेस.
ही सी.डी घ्यायलाच पाहिजे.... Happy
वैभवजी हार्दिक अभिनंदन!!!

वैभवच्या शब्दांचं सामर्थ्य इतकं अचाट आहे. >>>!!!

सुंदर लिहिलयस....हा वृत्तांत आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

पल्ली, छान लिहिलं आहेस अगदी....आता सीडी ऐकायची उत्सुकता निर्माण केलीस! वैभव जोशींचे हार्दिक अभिनंदन! Happy

गुरुजी, मनापासून अभिनंदन!
'कोवळ्या उन्हा'चा ओला केशरी, 'रिमझिम रिमझिम' चा हळवा निळा, 'ऋतू' चा लालसर करडा, 'मन मखमल' चा सावळा जांभळा आणि मग 'स्पंदन' चा ऑफबीट पांढरा..... शुभ्र कॅनव्हासवर फिकटसर एखादा स्ट्रोक म्हणजे 'स्पंदन'. फिकटसर असूनही कॅनव्हासवरच्या ओरखड्यासारखं...

-खास पल्ली 'टच' Happy

आई गं..........कसलं कातिल लिहिलं आहेस गं पल्ले.....!!

वैभव जोशी हा शब्दप्रभू खरंच माणूस म्हणून पण तितकाच महान आहे. ह्याचा अनुभव वेगवेगळ्या मायबोलीकरांना वेगवेगळ्या प्रसंगातून जाणवला आहे. त्याच्या प्रतिभेसारखाच तो ही असामान्य आहे. तो किती छान लिहितो याला आता कुठलं विशेषणच उरलं नाहीये. वैशाली सामंत आणि त्याचं इतकं मस्त ट्युनिंग जमलंय ना.......!! त्याचे शब्द चांगले की तिचं गाणं चांगलं .....असं द्वंद्व सुरु आहे. आता तर सुरवात आहे....... अजून बरंच काही येणार आहे. वैभव , वैशाली तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा Happy !

पल्ले आज का दिन बना दिया यार तुने ...धन्यु Happy

सीडी नक्की घेणार ! याचं श्रेय जितकं वैभव जोशींच्या सुंदर गीतांचे, तितकंच तुझ्या वृत्तांताचे! मस्त लिहीलंयस!

सीडी नक्की घेणार ! याचं श्रेय जितकं वैभव जोशींच्या सुंदर गीतांचे, तितकंच तुझ्या वृत्तांताचे! मस्त लिहीलंयस!

पल्ली : सुंदर लिहीलयस... जियो !!!
वैभव जोशींच पण हार्दीक अभिनंदन.....पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!!
अन एक मागणी : वैशाली अफाटच गातात पण पुढच्या अल्बमला त्यांचेबरोबर एक पुरुष गायकही असावा... Happy

पल्ली : मस्त लिहिले आहेस...

वैभवचे हार्दिक अभिनंदन....
अल्बम मस्त झाला आहे अगदी... ह्यातले माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे .. धूसर धूसर...

र.च्या.क. - सोबतीचा करार प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत दीड वर्षात वैभवची सुमारे ६६ गाणी रेकॉर्ड झाली आहेत... वेगवेगळ्या १५-१६ संगितकारांबरोबर...
तो चांगले लिहितो हे माबोकर जाणतातच.. पण ही त्याची प्रगती म्हणजे इंडस्ट्रीने त्याच्या प्रतिभेला दिलेली पावतीच म्हणावी लागेल

पल्ले, खुपच सही लिहीलय! वैभव जोशींचे अभिनंदन! त्यांचे मा बो वरचे लिखाण्/काव्य कसे शोधता येइल? प्लीज कुणीतरी सांगा:)

वैभव आणि चमूचे अभिनंदन!!
पल्ली धन्यवाद. Happy
सीडी इकडे कशी मिळेल ते कळवा. माबोवर 'खरेदी' मध्ये येणार आहे का?

अरे! 'ऋतु येत होते ऋतु जात होते' आणि 'दगा करुनी उभे' हि दोन्ही गाणी वैभव जोशी यांच्याच 'सोबतीचा करार' या अल्बम मधली आहेत ना? तीच घेतलीत का पुन्हा रेकॉर्ड केलीत हे पहावं लागेल मात्र. अल्बम मायबोली खरेदी विभागात आला तर छानच होईल. यासाठी संबंधितांना माझी कळकळीची विनंती.

पल्ले, काय गोsssड लिहिलयस Happy
वैभवाला नक्की कायकाय आणि कसंकायबुवा सुचतं ह्या प्रश्नाचं उत्तर.....
प्रत्येकवेळी हाच आणि शेवटाचाच एकच अशा उत्कटतेनं झकीरचा प्रत्येक 'ना' कसाकाय्बुवा वाजतो....
पंडितजींना तीर्थं विठ्ठलं म्हणतानाचा सूर कसाकाय्बुवा सापडतो...
बिरजू महाराज राधा-कृष्णाचं परण सादर करतात तेव्हा एकाच गिरकीत अर्ध्यात कृष्णं आणि अर्ध्यात राधा कशी काय दाखवू शकतात बुवा...
ह्या आणि असल्या प्रश्नांच्या उत्तरांइतकच गहन किंवा सोप्पं आहे Happy

हा पठ्ठ्या समूळ सुंदर लिहितो!!!

पल्ली, मस्त लिहिलयस..वैभव जोशींच अभिनंदन.. आणी आता मला भारतातून कुणी येणार असेल तर ही सी डी मागवायचीच आहे...

Pages