सैनिकाच्या गोष्टी - भाग १ [डॉक्टर श्रीधर वसंत कुरलपकर]

Submitted by शरद on 22 March, 2010 - 00:22

श्रीधर वसंत कुरलपकर! सॉरी, डॉक्टर श्रीधर वसंत कुरलपकर उर्फ डॉक्टर. मी त्याला फक्त डॉक्टर म्हणायचो. अत्यंत आनंदी, happy go lucky माणूस. तितकाच बुद्धीमान. आणि मनस्वीसुद्धा. त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. मी भेटलो तेव्हा त्याचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर महिन्याभरातच त्याचं पोस्टिंग सियाचीन मध्ये झालं होतं. मी सुद्धा तेथेच होतो. पण मी अर्जुन पोस्टवर आणि हा पिंपळ पोस्टवर होता. १९८८ चा जून महिना होता. अजून चांगलं आठवतंय मला. अर्जुन पोस्टचे महत्व कमी झाल्याने आणि पिंपळ पोस्टवरील अधिकार्‍याला अचानक रजेवर जावे लागल्याने माझी रवानगी पिंपळ पोस्टवर झाली होती.

त्याची माझी ओळख पिंपळ पोस्टवर झाली. पोस्ट म्हणजे काय? आता कसं सांगायचं? त्यासाठी आर्मीचे सगळे वापरात असणारे शब्द माहीत पाहिजेत. तरी थोडक्यात सांगतो. सीमेवर वेगवेगळ्या प्रकारची जमीन असते. कुठे वाळवंट असते, तर कुठे जंगल. कुठे नद्यांनी व्यापलेलं पठार असतं, तर कुठे हिमाच्छादित पर्वत. यातील पर्वतीय क्षेत्रात संपूर्ण सीमेवर सैन्य ठेवणे शक्य नसते. त्यामुळे राष्ट्रीय धोरण, आपली आणि दुष्मनाची कुवत, पर्वताची बनावट, खिंडी, येण्या-जाण्याचे मार्ग, नदी-नाले वगैरे सर्व गोष्टींचा विचार करून काही विशिष्ट डोंगरांवर सैन्य ठेवले जाते. त्या प्रत्येक ठिकाणाला पोस्ट म्हणतात. मग काही पोस्टवर सहा ते दहा जवान तर काही पोस्टवर तीस-चाळीस जवान असतात. असा चार - पाच पोस्टवर नियंत्रण ठेवून त्यांची लढाईसाठी एकत्र बांधणी करण्यासाठी कंपनी हेडक्वॉर्टर चे पोस्ट असते. कंपनी हेडक्वॉर्टर पोस्टमध्ये कंपनी कमांडर किंवा त्याचा लेफ्टनंट, डॉक्टर, तोफखान्याचा अधिकारी वगैरे दोन किंवा तीन अधिकारी असतात. शिवाय हेडक्वॉर्टरचे तीस पस्तीस जवान! तर तेव्हा माझी कंपनी कमांडर म्हणून नेमणूक झाली होती. डॉक्टर श्रीधर तिथे पूर्वीपासूनच होता.

आता आमच्या पोस्टविषयी थोडेसे सांगतो. म्हणजे सांगण्यासारखे बरेच आहे पण तरी आवरते घेण्याचा प्रयत्न करतो. आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा इतरत्र टी.व्ही. वर वगैरे सियाचीन विषयी वाचले असेल. भारत-पाक सीमेवर उत्तरेला टोकाला सियाचीन आहे. जर आपण काश्मीरचा नकाशा पाहिला तर तो पगडी सारखा दिसतो. डाव्या-उजव्या दोन्ही बाजूंना उंचवटे आणि मध्ये घळईसारखा दिसणारा भाग. त्यातील डोंगरातल्या घळईसारखा जो भाग दिसतो त्या ठिकाणी सियाचीन ग्लेशियर आहे. आता सर्वात उत्तरेला म्हणजे उंचवट्याचा भाग असायला हवा अशी शंका येणे साहजिक आहे. त्याचं समाधान करायचं झालं तर असे म्हणता येईल की आत्ता भारताच्या नकाशात जो प्रदेश आपण जम्मू-काश्मीर म्हणून दाखवतो; त्यातील फक्त एक तृतियांशच भाग आपल्याकडे आहे. बाकी भाग पाकिस्तानच्या ताब्यात (पी.ओ.के.) आणि चीनच्या ताब्यात (अक्साई चीन) आहे.

सियाचीनविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर तो सदैव बर्फाच्छादित प्रदेश आहे. उंची साधारणपणे १६ हजार फूट ते बावीस-तेवीस हजार फूट. १९६२ च्या युद्धाच्या वेळचं, जेव्हा चीनने अक्साई चीनचा प्रदेश बळकावला तेव्हाचं, कुण्या एका नेत्याचं वक्तव्य आठवतं: "ही अशी जागा आहे जिथे गवताचं पातंसुद्धा उगवत नाही. अशी जमीन ताब्यात असूनही काय उपयोग?" असो. या प्रदेशाच्या भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाबद्दल आपण आता बोलू नये. भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपारिक शत्रुत्व बाळगणारी राष्ट्रे या प्रदेशाच्या स्वामित्वासठी गेली कित्येक वर्षे भांडत आहेत एवढी गोष्ट आपल्याला पुरेशी आहे.

पिंपळ पोस्टला जाण्यासाठी बेस कॅम्पवरून साधारणत: बारा- तेरा तास चालत जावे लागते. अत्यंत दुर्गम असा रस्ता आहे. काही ठिकाणी दोर बांधले आहेत. त्यांना धरून उभे कडे चढून जावे लागते. सामान्यत: एका सैनिकाला किंवा कुण्या धडधाकट माणसाला ते सहज शक्य आहे. पण सामान्यत:! जेव्हा फक्त अंधार्‍या रात्रीच चालावे लागते (कारण शत्रूने जर दुर्बिनीतून पाहिले तर पुढच्याच क्षणी मशिनगनच्या फैरी सुरू झाल्याच म्हणून समजा.); जेव्हा प्राणवायू अत्यंत विरळ असतो; जेव्हा मुष्टीयोध्याच्या हातातील काथ्या-कापुस घालून फुगलेल्या ग्लोव्ह्ज् पेक्षा जास्त जाडीचे ग्लोव्ह्ज् घालून (थंडीपासून बोटे वाचवण्याकरिता) दोर पकडावा लागतो: जेव्हा वीस बावीस किलोचे वजन पाठीवर घेऊन जावे लागते; तेव्हा ही "सहज शक्य" गोष्ट अशक्यप्राय होऊन जाते. आणि तरी आमचे सैनिक हसतमुखाने या गोष्टी करत असतात.

तर असे रात्रभर चालून गेल्यावर पिंपळ पोस्ट लागते. पिंपळ पोस्ट तशी सुरक्षित आहे. म्हणजे शत्रू प्रत्यक्ष टेहळणी करू शकत नाही; त्यामुळे मशिनगनचा मारा होण्याचा धोका नाही. पण तरी तोफांच्या मार्‍यापासून सुटका कोण करणार? पण तोफांचा मार इतका अचूक असू शकत नाही. शिवाय उगीचच कुणी तोफांचा भडीमार करत नाही. तसे जबरदस्त कारण घडले - म्हणजे शत्रूने किंवा आपण प्रत्यक्ष हल्ला करायचे ठरवले तरच. आणि तसे प्रसंग कमीच येतात. पिंपळ पोस्ट कंपनी हेडक्वॉर्टर असल्याने तिच्या चारी - पाची बाजूंना इतर पोस्ट होत्या. एका बाजूला दुसरी कंपनी होती. त्यामुळे तशी सुरक्षित होती.

मी माझे रुटीन ठरवून घेतले होते. एका रात्री कंपनीच्या कुठल्यातरी एका पोस्टवर भेटीसाठी जायचे. तिथे एक दिवस थांबून दुसर्‍या रात्री परत निघायचे. त्यानंतर चे दोन दिवस आणि एक रात्र कंपनी हेडक्वॉर्टरमध्ये. परत दुसर्‍या पोस्टला भेट. जर कुणी जवान गोळी लागून किंवा अन्य कारणाने जखमी होऊन आला, कुठे अपघात झाला, कुठे शत्रूने हल्ला केला तर या रुटीन मध्ये योग्य तो बदल व्हायचा. डॉक्टर नेहमी हेडक्वॉर्टरमध्येच असायचा. कारण सुरक्षित हेलिकॉप्टर उतरण्याची जागा तिथेच होती. त्यामुळे कितीही अत्यवस्थ रुग्ण असला तरी त्याला घेऊन त्याच्या पोस्ट च्या जवानांना कंपनी हेडक्वॉर्टरमध्ये यावेच लागायचे. फक्त ज्या रुग्णाला हलविणे शक्यच नाही त्या रुग्णांना (शत्रुचा गोळीबार होईल ही शक्यता लक्षात घेऊन) हेलिकॉप्टर येऊन घेऊन खाली बेस कॅम्प वर किंवा मिलिटरी हॉस्पीटलमध्ये जाणार. अगदी क्वचितच डॉक्टरला पुढे जायला लागायचे. पण तरी जायला लागायचेच. आता डॉक्टर म्हणजे काही मिलिट्रीचे हट्टे-कट्टे जवान नव्हेत; पण तरी श्रीधर नेटाने आपला कार्यभाग सांभाळायचा. सगळ्या जवानांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. कारण त्यांचासाठी तो देवच म्हणायचा. अशा विरळ वातावरणाच्या प्रदेशात थोडीशी वैद्यकीय अडचण खूप तीव्र रूप धारण करते. मग ते पोटात दुखणे असो किंवा डोकेदुखी असो किंवा सर्दी-पडसे असो.

एकदा एका जवानाला तोफगोळ्याचा तुकडा लागला. प्रचंड रक्तस्त्राव होत होता. रात्रीची वेळ होती, हेलिकॉप्टर येऊ शकत नव्हते. डॉक्टरला बोलावणे गेले. डॉक्टरला बरोबर घेऊन मी रातोरात गेलो. अर्धी रात्र चालून मग त्या पोस्टवर पोचलो. नंतरची अर्धी रात्र डॉक्टरने ऑपरेशन करून तो तुकडा बाहेर काढला. कापसाचा मोठा गोळा बांधला तेव्हा कुठे रक्तस्त्राव कमी आला. पहाटे हेलिकॉप्टर येऊन त्या जवानाला घेऊन गेले. संध्याकाळी आम्ही कंपनी हेडक्वॉर्टर्कडे निघालो. डॉक्टर खूपच थकला होता. चालता चालता काय झाले कुणास ठाऊक. अचानक एका बर्फाच्या भेगेतून खाली पडला. आम्ही नायलॉन दोर कमरेला बांधून चालत होतो. अचानक सगळेच खाली कोसळलो. डॉक्टर बर्फाच्या भेगेतून खाली पडल्यामुळे सर्वांच्या अंगाला झटका बसला होता. परिस्थितीचा अंदाज घेऊन मग हळू हळू त्याला बाहेर काढले. गरम केले आणि पुढे चालू लागलो. केवळ दोर बांधला होता म्हणून डॉक्टर त्यादिवशी बचावला.

कंपनी हेडक्वॉर्टरमध्ये फायबर ग्लास ची एक दहा-बाय्-दहा ची कॅबिन होती. त्यातच आम्ही दोघे राहायचो. ज्या वेळी फार काम नसायचे त्यावेळी आम्ही मग पत्ते खेळायचो, गप्पा मारायचो. अशा गप्पांमधूनच माणसाला एकमेकांविषयी कळते नाही का? तो दिलखुलास गप्पा मारायचा. मी तसा स्वभावाने मितभाषी आहे; त्यामुळे ७०-८० टक्के ऐकण्याचं काम मी करायचो. शून्य डिग्री सेंटिग्रेड तापमानात स्लीपिंग बॅगमध्ये बसून गरम चहाचे घोट घेत घेत गप्पा मारायला मजा यायची. म्हणजे कॅबिनमध्ये बुखारी जळत असायची म्हणून शून्य डिग्री; नाहीतर बाहेरचे तपमान उणे २०-२५ डिग्री तरी असायचे. पण बुखारीसुद्धा सतत जाळता यायची नाही कारण मग प्राणवायूचा स्तर कमी व्हायचा.

डॉक्टर स्वतःविषयी खूप काही सांगायचा. त्याला पॅथॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे होते. तेच त्याचे स्वप्न होते. आर्मीमध्ये डॉक्टरना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर परत एक स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. त्यावेळी सिव्हिलमध्ये द्यावी लागायची नाही; आता सिव्हिलमध्ये सुद्धा स्पर्धा परिक्षेत पुन्हा उतरावे लागते म्हणे. तो मला सांगायचा, "रेश्मा (त्याची बायको) ची लॅबोरेटोरी आहे, मी एकदा पॅथॉलॉजीस्ट झालो म्हणजे मग मिलिट्रीची नोकरी सोडणार आणि आम्ही दोघे मिळून हा व्यवसाय चालवणार." मी अगदी तत्परतेने हो ला हो मिळवायचो. मला खरे तर रक्ताचे काही गट असतात आणि जर आपला गट निगेटिव्ह असेल तर तसे रक्त मिळायला जरा कठिण जाते, या पलिकडे पॅथॉलॉजीमधील काहीही ठाऊक नव्हते. दुसरे एक ठाऊक होते, ते म्हणजे माझा रक्तगट 'बी पॉझिटिव्ह' आहे; आणि म्हणूनच मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. या पठ्ठ्याचे आणखी एक फॅड होते. त्याचा असा दावा होता की स्टूल टेस्ट केली की जगातील सगळ्या आजारांचं निदान होऊ शकतं. मी चांगला धडधाकट होतो (म्हणजे अजूनही आहे) तरी मला सांगायचा की तू एकदा तरी स्टूल टेस्ट करून घे, म्हणजे आता तुला वाटतंय की तुला काही विकार नाही; पण जे अदृष्य विकार असतात, आणि एकदम विकोपाला गेल्यावरच कळतात, त्यांचे निदान एका झटक्यात होईल. मी आपला 'हो' म्हणालो, 'तुझ्याच लॅब मध्ये करून घेतो' म्हणालो, तेव्हा कुठे त्याने माझा पिच्छा सोडला.

पोस्ट ग्रॅजुएशनसाठी निवड व्हावी यासाठी तो खूप अभ्यास करायचा. दहा दहा किलोचे एक एक पुस्तक. मी असतो तर उशाला घेऊन झोपलो असतो व मग सर्व अभ्यास डोक्यात आपोआप गेला असता.

डॉक्टर रेखाचित्रे चांगली काढायचा. मग तो मला चित्रे दाखवायचा. मग प्रत्येक चित्राच्या जन्माची कहाणी सांगायचा. मला वाचनाची भयंकर आवड होती; पण त्यापलिकडे छंद नव्हता. म्हणजे गाणी ऐकायचा छंद होता पण तिकडे फक्त पाकिस्तानी रेडियो लागायचा. जास्तीत जास्त आकाशवाणी जालंधर केंद्र पंजाब. त्यावेळी कविता लिहिण्याचं वेड लागलं नव्हतं. म्हणजे कधी कधी लिहायचो, पण वेड नव्हतं. पण डॉक्टर ची चित्रे मला आवडायची. म्हणजे तो अगदीच काही पाब्लो पिकासो (चित्रकारांपैकी ते एकच नाव मला ठाऊक आहे; आणि दुसरे आपले ते देवी-देवतांची बीभत्स चित्रे काढणारे, ज्यांनी माधुरी दीक्षितवर चित्रपट काढला होता ते महाशय) नव्हता, पण त्याने कुत्रे काढले तर ते कुत्रेच आहे असे वाटायचे; नाहीतर मी कुत्रे काढले तर तो कुत्र्यासह इतर कुठलाही प्राणी वाटू शकतो - टाईम टाईम की बात है. असो. एकदा त्याने माझेही चित्र काढले होते आणि मी इमाने इतबारे त्याची तोंड दुखेस्तोवर स्तुती केली होती.

नंतर यथावकाश आमची बटालियन आपले ग्लेशियर टेन्यूअर संपवून बेस कॅम्पवर आली. सहसा सियाचेनमध्ये एका बटालियनचे टेन्यूअर सहा महिन्याचे असते (त्यापेक्षा जास्त काळ तिथे राहणे कुठल्याही माणसाला धोकादायक असते. कारण सहा महिन्यात वजन पंचवीस ते पस्तीस किलोने घटते. त्याची कारणे आहेत ती परत कधीतरी सांगतो) नंतर मग ती बटालियन बेस कॅम्पमध्ये रिझर्व बटालियनचे काम करते आणि दुसर्‍या येणार्‍या बटालियनला ट्रेनिंग देते. त्या काळात फारसा तनाव नसतो. तिथेसुद्धा डॉक्टर आणि मी एकाच कॅबिनमध्ये राहू लागलो. दोघेही पिंपळ पोस्टवरून आलो होतो, दोघेही मराठी होतो; त्यामुळे आमची चांगली गट्टी जमली होती.

बेस कॅम्पवर एक प्रसंग घडला ज्यामध्ये मला डॉक्टरची चांगली साथ मिळाली. वर लिहिल्याप्रमाणे पिंपळ पोस्टवर जायला अक्षरश: रोप क्लायंबिंग करत जावे लागते. पोस्टवरून खाली येतानासुद्धा तसेच. फरक फक्त एक होता; वर जाताना सर्व जवान नवीनच ट्रेनिंग घेऊन गेले होते, घाबरत होते, त्यामुळे सर्व नियम अगदी अगदी काटेकोरपणे पाळले जात होते. खाली येताना मात्र ते तिथले जाणकार झाले होते, भितीचा लवलेशही कुठे नव्हता, बेदरकार झाले होते, त्यामुळे काही नियम धाब्यावर बसवले जात होते. त्यातलाच एक नियम म्हणजे ग्लोव्हज घालणे. काही जवानांनी दोर पकडायला त्रास होतो म्हणून ते मोठ्ठे मोठ्ठे ग्लोव्ह्ज काढले, फक्त साधे लोकरीचे ग्लोव्हज हातात ठेवले. त्या ग्लोव्हजने थंडी (उणे २५ डिग्री सेंटिग्रेड) थोडीच थांबते? चालताना शरीर गरम असते म्हणून कुणाच्या लक्षात आले नाही; पण निसर्ग आपले काम करतच होता. दुसर्‍या दिवशी चाळीस जवान 'सिक परेड'साठी. प्रत्येकाच्या हाताची बोटे लाल झालेली. म्हणजे 'चिल ब्लेन ची पहिली अवस्था'. काहींच्या हातांची बोटे काळी पडली होती - म्हणजे चिल ब्लेन ची दुसरी अवस्था. तिसरी स्टेज म्हणजे फ्रॉस्ट बाईट आणि त्यानंतर गँगरीन - म्हणजे बोटे कापणे. या अनुभवांतून मी स्वत: पूर्वी गेलो असल्याने (ती कहाणी परत कधी तरी सांगतो) पहिल्या स्टेजपासून चौथ्या स्टेजपर्यंत जायला किती कमी वेळ (दोन ते तीन दिवस) लागतो ते मला ठाऊक होते. सर्वांना मी फिल्ड अ‍ॅम्बुलन्समध्ये पाठवले, कारण बटालियनमध्ये इतक्या लोकांचे उपचार शक्य नव्हते आणि आमचाकडे वेळ होता. दुसर्‍या दिवशी कमांडिंग ऑफिसरचा फोन - इतके जवान कसे काय फिल्ड अ‍ॅम्बुलन्सला पाठवले? मी जे सत्य होते ते सांगितले. डॉक्टरनेसुद्धा मला सपोर्ट केले. त्याचे काय असते - जितके जास्त सिक रिपोर्ट तितके बटालियनचे आणि पर्यायाने कमांडिंग ऑफिसरचे नाव खराब; असा एक (गैर?)समज आहे. माझ्या दृष्टीने माझ्या कुठल्या जवानाला बोट गमावण्याची पाळी येऊ नये हे जास्त महत्वाचे होते; पण मी आणि डॉक्टर आम्ही दोघांनीही कमांडिंग ऑफिसरची नाराजी ओढावून घेतली हे मात्र खरे!

तर असेच आमचे दिवस चालले होते. आणि शेवटी आमची बटालियन लडाख सोडून परत जायची वेळ आली. आणि डॉक्टरशी बाय बाय, सायोनारा म्हणायची वेळ आली. त्याचे काय असते, हे डॉक्टर लोक मिलिट्री हॉस्पिटल किंवा फिल्ड अ‍ॅम्बुलन्सच्या स्ट्रेन्थवर असतात आणि बटालियन ना फक्त तात्पुरते पुरवलेले असतात. त्यामुळे त्यांना तिथेच ठेवून बटालियन निघून जाते. ते मग मिलिट्री हॉस्पिटल किंवा फिल्ड अ‍ॅम्बुलन्समध्ये राहतात किंवा दुसर्‍या बटालियनला पुरवले जातात. आम्ही अर्थातच पत्रे पाठवून संपर्कात राहू असे ठरवले. घरचे पत्ते एकमेकांना अगोदरच दिले होतेच. आणि अर्थातच नंतर एकही पत्र पाठवले नाही ही गोष्टसुद्धा तितकीच खरी! अशी म्हणच आहे "The friendship of a soldier lasts till the station" एकदा स्टेशन सोडले की मग दोस्ती तिथेच संपते. ट्रेनमधील दोस्ती आणि मिलिट्रीमधील दोस्ती यात फारसा फरक नसतो. मात्र नंतर दहा-बारा वर्षांनी कुठे भेटले तर मधला काळ नव्हताच अशा पद्धतीने रमचे घोट घेत घेत गप्पा सुरू होतात. (म्हणजे मी दारू पीत नसल्याने चहाचे म्हणतो) तर आमची शेवटी ताटातूट झाली.

बर्‍याच वर्षांनंतर - म्हणजे १९९४ साली मी पुण्यात परत आलो. म्हणजे १९७९ साली एन. डी. ए. सोडल्यानंतर माझे पुण्यात पोस्टिंग झालेच नव्हते. महाराष्ट्रीयन असल्याने येऊन जाऊन होतो. पण दीर्घ काळ वास्तव्य नव्हते. १९९४ साली तो योग आला. पुण्यात 'इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी' मध्ये दीड वर्षांचा कोर्स करण्यासाठी माझी निवड झाली. जुन्या डायर्‍या चाळत असताना डॉक्टरचा पत्ता सापडला - "अजिंक्य अपार्ट्मेन्ट्स, पिंपरी". सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. एकदा वाटले की घरी जाऊन त्याला छान सरप्राईज द्यावे. मग लक्षात आले की तो कुठे पोस्टिंगवर असेल तर घरी जाऊन उपयोग नाही. म्हणून घरच्या पत्त्यावर पत्र व दिवाळीचे ग्रीटिंग कार्ड पाठवले. आणि ट्रेनिंगच्या गडबडीत विसरून गेलो.

महिन्या दीड महिन्याने एक आंतरदेशीय पत्र आले. डॉक्टरच्या वडिलांचे! मला वाटले, कदाचित त्याचा पत्ता कळवला असेल. पण पहिले वाक्य वाचले आणि हादरलो. पायाखालची जमीनच सरकली. "दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या; पण दुर्दैवाने श्रीधर या जगात नसल्याने त्याच्यापर्यंत पोचवता आल्या नाहीत." माझे पत्र वाचून त्यांनाही आश्चर्य वाटले होते. नंतर मग खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. सियाचेन - लडाख संपवून लगेचच श्रीधर पॅथॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रज्युएशन करण्यासाठी निवडला गेला होता. पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून करत होता. पिंपरीवरून रोज स्कूटरने जा-ये करायचा. एके दिवशी हायवेवर एका ट्रकने पाठीमागून धडक दिली आणि तो ट्रक पळून गेला. काही मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. "रेश्माचे आम्ही दुसरे लग्नसुद्धा लावून दिले; ती सुखात आहे."

बस्स. इतकीच आहे एका डॉक्टरची कहानी. जो सियाचीनमध्ये सर्व निसर्गाच्या कोपापासून आणि शत्रूच्या गोळ्यांपासून बचावला तो आयुष्याच्या एका रम्य वळणावर अपघातात गतप्राण व्हावा... ह्याला जीवन ऐसे नाव!

गुलमोहर: 

कधी काळी मी सैन्यात होतो. खूप बरे वाईट अनुभव गाठीशी आहेत. वाचकांसमोर आणावेत म्हणतो. आपले मार्गदर्शन उपयोगी ठरेल. अभिप्राय जरूर द्या. Happy

सुरक्षिततेसाठी व्यक्तींची आणि स्थळांची (पोस्ट) नावे बदलली आहेत.

स्नेहांकित,

शरद

शरद,
तुमचे अनुभव खूपच वेगळे आणि उत्कंठा वाढवणारे आहेत. जरा अजून फुलवा. तुमच लेखन अजूनही मस्त होइल. पुढच्या लेखनाची वाट पहात आहे.

चांगल लिहिल आहे. Happy
माझ्या काकांच पोस्टींग होत काश्मिरात. तेव्हा ते तिकडचे काहि किस्से सांगायचे ते आठवले.

डॉ. चि कहाणि खरच ह्रुदयस्पर्शि आहे. आणखिन असे तुमचे अनुभव आम्हाला शेयर करायला आवडतिल.

छान लिहिले आहेत.... लिहित राहा.... असे अजुन भरपूर अनुभव ऐकायला आवडतील....

<<परत कधीतरी.......>> सगळ्या परत कधीतरीची वाट पाहात आहोत.... Happy Happy

तुम्ही फार वेगळ्या आणि काळजाजवळच्या विषयाला हात घातलाय.... ज्या सैनिकांच्या जोरावर, भरवशावर आम्ही घरी आरामाची झोप घेतो त्या सैनिकाचे फील्डवरील आयुष्य कसे असते, काय अनुभव असतात हे तुम्ही आम्हाला सांगा. वाचायला नक्की आवडतील! Happy

तुम्ही फार वेगळ्या आणि काळजाजवळच्या विषयाला हात घातलाय.... ज्या सैनिकांच्या जोरावर, भरवशावर आम्ही घरी आरामाची झोप घेतो त्या सैनिकाचे फील्डवरील आयुष्य कसे असते, काय अनुभव असतात हे तुम्ही आम्हाला सांगा. वाचायला नक्की आवडतील! >>>> +१००

तुम्ही फार वेगळ्या आणि काळजाजवळच्या विषयाला हात घातलाय.... ज्या सैनिकांच्या जोरावर, भरवशावर आम्ही घरी आरामाची झोप घेतो त्या सैनिकाचे फील्डवरील आयुष्य कसे असते, काय अनुभव असतात हे तुम्ही आम्हाला सांगा. वाचायला नक्की आवडतील! >>>> +१००