बाsssय... फॉर एव्हर!!!

Submitted by tilakshree on 15 March, 2008 - 04:34

आला दिवस घालवायचा कसा आणि कशासाठी; या रोजच्या रडगाण्यावर इसाबेलला इंटरनेटवर चॅटिंग आणि सर्फींगचा मार्ग सापडला होता. मात्र इथेही अनेकदा रोजच्या जगण्यात अनुभवाला येणारं पुरुषाचं वखवखलेपण; स्त्रीकडे केवळ मादी, भोगवस्तू म्हणून बघण्याची किळसवाणी वृत्तीच दिसून यायची. पण कधी तरी; कुणी तरी आपल्या भळभळणार्‍या जखमेवर सहानुभूतीची फुंकर घालेल या आशेने ती नित्य नेमाने 'चॅट-रूम'मधे 'लॉग-इन' करायची. कधी कुणी भेटायचाही सह्रदय! नियमाला अपवाद म्हणून!!!

रोजच्याप्रमाणेच ती आजही कॉम्प्युटरसमोर बसून होती. बाजूलाच वेब-कॅम होता. एवढ्यात जॉन कुठूनसा तरा-तरा आला. नेहेमीप्रमाणेच तणतणंतच! त्याच्या अंगात कोणतं भूत संचारलं होतं कोण जाणे! तिच्या टेबलजवळ येऊन त्याने तो वेब-कॅम उचलला. त्याची केबल धसकन ओढून काढली आणि त्याने तो वेब-कॅम मोठ्या त्वेषाने दाणकन जमिनीवर आदळ्ला. त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या. 'हक्काच्या' बायकोला 'हक्काने' घालण्याच्या शेलक्या शिव्यांची लाखोली वहात त्याने तिला कॉम्प्युटर बंद करायला लावला. ती त्याच्याकडे विषण्णपणाने आणि भयभीत नजरेने पहातंच राहिली. तांबरलेल्या विखारी नजरेचा जाळ तिच्यावर ओकून जॉन चालू लागला.

जॉन आणि इसाबेल हे पुढारलेल्या; व्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या आणि भौतिक सुखाची रेलचेल असणार्‍या प्रगत राष्ट्राचे 'स्वतंत्र' नागरिक! कधी तरी; कसं तरी त्यांच लग्न झालेलं. त्या दोघांमधला सांम्याचा एकमेव धागा म्हणजे त्यांचं अपंगत्व! तो ही अपंग आणि ती ही! केवळ एवढ्याच कारणासाठी त्यांच आयुष्य एकाच दावणीला बांधलेलं! अन्यथा त्या दोघांमधे, त्यांच्या मनोवृत्तीमधे, स्वभावामधे, आवडी-निवडींमधे, जीवनशैलीमधे कमालीचं अंतर! दोन ध्रुवां एवढं!! कधीच सांधून न येणारं!!!

इसाबेल ही तुलनेने गरीब, कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी. त्यातंच जन्मापासून तिच्या माथ्यावर अपंगत्वाचा शाप! त्यामुळे तिचा जन्म हा तिच्या आई-बापांच्या दृष्टीने त्यांच्यावर झालेला आघातंच ठरला. लहानपणापासूनच घरी-दारी होणारा दुस्वास तिच्या वाट्याला आलेला! ती मरत नाही म्हणून आई-बाप तिला जगवत होते. नाईलाज म्हणून! इतर धडधाकट भावंडं आणि आजूबाजूची समवयस्क मुलं यांच्यासाठी इसाचं अपंगत्व हा थट्टेचा विषय असायचा. अर्थात आजूबाजूला सगळीच मंडळी अशी निर्दय नव्हती. एरवी तिचा राग-राग करणार्‍या तिच्या आईलाही कधी कधी मायेचा उमाळा यायचा. अशावेळी ती तिला मिठीत घेऊन आसवं ढाळायची. गळा काढायची. नशिबाला बोल लावायची. तिच्या अन आपल्याही! शाळेतले बरेचसे शिक्षक, आजूबाजूचे काही शेजारी आणि काही मित्र-मैत्रिणी तिला नेहेमी सांभाळून घ्यायचे. तिला विशेष वागणूक मिळायची. मात्र ते ही तिला फार काळ सुखावणारं नव्ह्तं. कारण त्यातूनही अप्रत्यक्षपणे पण ठसठशीतपणे अधोरेखित व्हायचं ते तिचं अपंगत्व! सर्वसाधारण मुलांसारखं निष्पाप, खोडकर, निखळ बालपण तिच्या वाट्याला कधी आलंच नाही. तिची उपेक्षा व्हायची ती ही अपंगत्वामुळे आणि तिचे लाड व्हायचे ते ही अपंगत्वामुळेच! रोजच्या जगण्यामधे आपल्या वाट्याला येणारं विरोधाभासी वागणं इसाला सैरभैर करून टाकत होतं. या सगळ्यामुळे तिच्या वागण्या-जगण्यात कमालीचा फरक पडला. ज्या वयात तिने अल्लड, अवखळ असायला हवं त्या वयातंच तिला खूप समज आली; तशीच ती विलक्षण हळवीही बनली.

पदोपदी आपल्या वैगुण्याकडे लक्ष वेधून त्याच्यावर प्रतिक्रिया देणार्‍या माणसांच्या घोळक्यात रहाणं तिला नकोसं व्हायला लागलं. त्यापेक्षा नजरेच्या आवाक्यात न मावणारं हिरवं गार शिवार; विविध रंगरुपांची उधळण करंत नजरबंदी करून टाकणारी पानं-फुलं; निळ्या आभाळात मुक्त कंठाने शीळ घालंत स्वछंद विहरणारे पक्षी यांची तिल भुरळ पडली. या मुक्त मोकळ्या निसर्गाचा तिला लळा लागला. आपला बहुतेक रिकामा वेळ ती या अनोख्या सवंगड्यांच्या सहवासात घालवू लागली. मर्यादित शब्द आणि शब्दांच्या मर्यादा ओलांडून अमर्याद निसर्गाच्या असीम सौंदर्याचं चपखल चित्र चितारणार्‍या निसर्ग कवितांची साद तिला भावली. निसर्ग आणि त्याचे गोडवे गाणारी कविता यांच्या सांन्निध्यात तिने एक आपलीच अशी अनोखी दुनिया साकारली. या दुनियेत तिच्या वैगुण्याकडे बोट दखवणारं कुणीच नव्हतं. केवळ 'आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा' हे एकमेव तत्व या दुनियेचं नियमन करंत होतं. इसा या दुनियेची राणी बनली.

जॉनची पार्श्वभूमी बरीच वेगळी होती. तो शहरात रहाणार्‍या; व्यापार उदीम करून बर्‍यापैकी पैसा गाठीशी असणार्‍या सधन कुटुंबात जन्माला आला. तो ही जन्माला येतानाच अपंगत्व घेऊन आलेला. पण इसाच्या वाट्याला आलेली उपेक्षा त्याच्या वाट्याला अभावानेच आली. एकतर तो मुलगा होता. दुसरं म्हणजे तो अपंग असला तरीही व्यापार, मिळकत सांभाळायला पाठचा भाऊ होता. सर्वात महत्वाचं म्हणजे जॉनच्या अपंगत्वाला आपण, आपली कर्म कारणीभूत आहोत अशी एक अपराधी भावना त्याच्या आई-बापाच्या मनात पक्की घर करून होती. या भावनेतून ते त्याची जरा जास्तच काळजी घेत. त्याच्या अपंगत्वाची कुणी अजाणतेपणाने जरी टवाळी केली तरी त्याची धडगत नसे. शाळेत त्याला अपंगत्वामुळे हेटाळणीला सामोरं जाऊ नये या साठी घरी येऊन शिकवणार्‍या खास शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. त्याचा शब्द तोंडातून बाहेर पडायचा अवकाश.. ती वस्तू त्याच्या समोर हजर होत असे. मात्र त्याला जन्मापासून मिळत गेलेल्या विशेष वागणुकीचा त्याच्या जडण-घडणीवर विपरित परिणाम झाला. तो कमालीचा हट्टी, दुराग्रही आणि उर्मट बनला. जसजशी समज वाढत गेली तसतसा त्याला आपल्या अपंगत्वाबद्दल आई-वडलांच्या मनात असलेल्या अपराधी भावनेचा सुगावा लागत गेला. तो अधिकंच स्वैराचारी बनला. आई-बापांना 'इमोशनली ब्लॅकमेल' करायला लागला. त्यांच्यावरही जुलूम जबरदस्ती करायला लागला. व्यसनी, जुगारी आणि बाहेरख्याली बनला. त्याचे वृद्ध आई वडील हे सगळं हताशपणे बघत राहिले. त्याला सुधारणं केव्हाच त्यांच्या आवाक्याबाहेर गेलं होतं. धाकटा भाऊही चाणाक्षपणे जॉनच्या व्यसनाला खत-पाणींच घालत होता. जॉन अपंग असल्यामुळे त्याला शासनाच्या सामाजिक सुरक्षितता विभागाकडून निर्वाह भत्ता मिळत असे. वर आणखी थोडीशी चिरीमिरी त्याच्या हातावर टेकवली की कुंटुबाच्या व्यापार, व्यवसायातून मिळणार्‍या भरपेट उत्पन्नाचा हाच धनी!

असंच आयुष्य घरंगळंत असताना जॉन आणि इसाचं लग्न झालं. अर्थात त्यामुळे जॉनच्या आयुष्यात फार फरक पडला असं नाही. झालं फक्त एवढंच की जॉनच्या आमदानीत भर पडून ती दुप्पट झाली.स्वत:च्या निर्वाह भत्त्याबरोबर इसाच्या भत्त्याची रक्कमही त्याच्याच खिशात यायला लागली. शिवाय अडीनडीला 'आज्ञाधारक' भाऊ होताच! इसाने लग्नापूर्वी रंगवलेल्या माफक स्वप्नांचा मात्र थोड्याच दिवसात पार चुराडा झाला. दोन समदु:खी जीवांच सहजीवन किमान सुसह्य होईल या तिच्या अपेक्षेच्या ठिकर्‍या उडाल्या. रिकामटेकडा जॉन कधी दारूच्या गुत्त्यावर, जुगाराच्या अड्ड्यावर तर कधी कुंटणखान्याच्या माडीवर रमलेला असायचा. पुढारलेल्या देशात या तिन्ही 'सेवा-सुविधा' एकाच छपराखालीही मिळतात म्हणे!या सगळ्यातून वेळ मिळाला की तो घरी येऊन इसाला छळायचा. त्याचाही कधी चुकून कंटाळा आला; तर भावाकडे जाऊन धंदा-पाण्यावर नजर फिरवायचा; हिशोब-ठिशोब बघायचा; किंवा मित्राच्या गॅरेजमधे जाऊन 'टाईम पास' करायचा. इसाचं जगणं मात्र पूर्णपणे अर्थहीन, दिशाहीन, भावनिकदृष्ट्या एकलकोंडं, आर्थिकदृष्ट्या परावलंबी झालं होतं. निसर्गाच्या कुशीत साकारलेलं तिचं साम्राज्य, रंगीबेरंगी पानं-फुलं, पक्षी, गीत-संगीत हे सगळे तिचे सवंगडी हरवले आणि ती जणू नरकातंच येऊन पडली.
....रात्रभर रडून रडून सुजलेल्या आणि जडावलेल्या डोळ्यांनीच ती अंथरूणातून उठली. सगळं अंग ठणकत होतं. तोटात खड्डा पडला होता. तरीही ती उठली. रात्रीचा प्रसंग तिच्या नजरेसमोरून हटत नव्हता. स्वतःबद्दल, स्वतःच्या हतबलतेबद्दल विलक्षण तिरस्कार तिच्या मनात उसळून येत होता. खरंतर हा प्रसंग तिला नवीन नव्हता. नेहेमीप्रमाणेच जॉन घरात नसल्याचं निमित्त साधून त्याचा भाऊ घरात आला. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर पहाटेपर्यंत बलात्कार केला. तिच्या शरीराबरोबरंच काळजाचाही चोळामोळा करून चालताही झाला.यापूर्वीही अनेकदा त्याने हेच केलं होतं. तिच्यावर जेव्हा पहिल्यांदा हा प्रसंग आला; तेव्हा तिने जॉनला त्याबद्दल सांगितलं. मात्र जॉनने तिलाच खोटारडी ठरवून लाथा-बुक्क्यांनी झोडपून काढलं. तिच्या माहेरचे लोकही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. "जॉन पासून दूर जाण्यासाठी म्हणून तू त्याच्यावर आणि त्याच्या घरच्यांवर खोटा आळ घेत असणार! जॉन चांगला म्हणून तुला सांभाळतो तरी. एरवी तुला कुणी दारातही उभं केलं नसतं;" ही तिच्या जन्मदात्याची मुक्ताफळं! या अनुभवाची अनेकदा पुनरावृत्ती होत असताना ती आतून उद्ध्वस्त होत गेली. आर्थिक परावलंबित्व, शारीरिक अपंगत्व आणि निव्वळ भोगवस्तू इतकंच अस्तित्व; यामुळे खचलेल्या इसाचा कायद्यावरही विश्वास उरला नाही. पुरुषी अहंकार, त्यांचा स्त्रीकडे बघण्याचा अमानुष दृष्टीकोन, तिचं मनोशारीरिक शोषण करण्याची राक्षसी वृत्ती या दुर्गुणांना देश, काल, समाजवगैरेची कुंपणं पुरी पडत नसल्याचंच हे द्योतक!

काळीज करपून गेलेल्या इसाला जगाचा राग येणंही हळू हळू कमी होत गेलं. 'आपण ज्याच्यावर प्रेम करावं असं या जगात कोणी नाही. आपण ज्यावर रागवावं असंही जगात कोणी नाही. आपण रागवू शकतो ते केवळ स्वतःवरंच!' विलक्षण असहाय्यतेच्या गर्तेत ती कृत्रिम, यांत्रिक, भावनाशून्य जगण्याचा प्रयत्न करंत होती. निर्जीव बाहुलीसारखं! पण इतकं कोरडं आयुष्य जगण्याएवढी ती बथ्थड नव्हती किंवा आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थपणाने बघण्यासाठी स्थितप्रज्ञही नव्हती. खरंतर तिला कुणाकडून काहीही नको होतं. अगदी शाब्दिक सहानुभूतीसुद्धा! तिला फक्त आपल्या आत गुदमरणारा विषण्णतेचा, संतापाचा लाव्हा शब्दातून मोकळा करायचा होता. ते कुणी लक्ष देऊन ऐकावं आणि आपल्याबद्दल आस्था व्यक्त करावी अशी तिची अपेक्षाच नव्हती. तिला फक्त बोलायचं होतं... काळजातली गरळ ओकून मनाचं आभाळ मोकळं करायचं होतं. ही छोटीशी गरज पूर्ण करण्यासाठी तिला 'नेट-चॅटींग' साऱखं म्हटलं तर अप्रत्यक्ष आणि म्हटलं तर थेट संपर्क माध्यम तिला सोईस्कर आणि सुरक्षित वाटलं. अर्थात इथे येणारे सगळेच अनुभव काही मोठे सुखाचे नव्हते. तिथे भेटणारे बहुतेक जण तिच्याशी गप्पा मारण्यापेक्षा तिला 'बघण्यात' अधिक रस घेणारे असायचे. हे 'बघणं'ही तितकंच किळसवाणं; जितका तिच्या दिराचा वखवखलेला स्पर्श!

अर्थात एखादा अपवादही तिला क्वचित भेटायचा. हजारो मैलांवरून निर्जीव यंत्राच्या सहाय्याने साधलेला हा संवाद तिच्या दु:खाच्या खाईत पोळणार्‍या आयुष्यावर सुखद संवेदनांचा शिडकावा करून जायचा. अर्थात त्यासाठी उठ सूट आपल्या आयुष्याच्या रडगाण्यातले वेगवेगळे स्वर सतत न आळवण्याची काळजीही ती घ्यायची. खरं तर अशा 'इ-मित्रां'शी केवळ हवा-पाण्याच्या गप्पा मारणंसुद्धा तिच्यासाठी आनंददायक असायचं; कारण इतका सहज-सोपा संवादही तिच्या वाट्याला कधी आला नव्हता. पुढे पुढे तर हे 'चॅटींग' इतकं सुखाचं झालं की तिच्यासारख्यांच निसर्ग, काव्य, संगीत प्रेमींचं छानसं मित्रमंडळ जमलं. तिच्या रखरखीत आयुस्यात एक भासमान का होईना; एक नंदनवन फुलू पहात होतं. फोटोंच्या, कवितांच्या, भटकंतीतल्या अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून तिच्या कॉम्युटरच्या स्क्रिनवर पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत वसलेलं; तिचं 'आपलं' राज्य आकार घेत होतं. पण...

... पण आज मात्र तिने 'चॅट-रुम'मधे 'लॉग-इन' केलं ते अशा मोजक्या मित्रांचा निरोप घ्यायला! अखेरचा निरोप! आज हे छोटंसं आभासी सुखही तिच्यापासून हिरावलं जाणार होतं. 'चॅट' करताना ती अश्लील गप्पा मारते आणि 'वेब्-कॅम'वर देहप्रदर्शन करते असा जॉनचा आरोप होता. 'वेब-कॅम'ची केव्हांच वाट लाऊन झाली होती. आज तो कॉम्प्युटरही घरातून नाहीसा करणार होता...
सो...! बाय...!! बाय फॉर एव्हर...!!!

गुलमोहर: 

उत्तम कथा आहे श्री. ही कथाही सत्यकथा आहे की काय?

तिलकश्री, डोळे भरुन आले. ही सत्यकथा नसु देत अशी अपेक्षा.

रमणी;
दुर्दैवाने ही देखील सत्यकथाच आहे.

टिळक्,तुमच्या सत्यकथा हादरवुन सोडतात्.अजुन येउ देत

तिलकश्री पुन्हा एकदा तसेच. विश्वास बसणार नाही अशी सत्यकथा. मन सुन्न होते असे काही वाचल्यावर. परंतू इसाबेलचे पुढे काय? परत सगळा अंधारच.

विचार करायला लावणारी कथा आहे...