वादळ

Submitted by नितीनचंद्र on 1 April, 2010 - 12:22

सचिन लक्ष कुठ आहे ? कशात गढला आहेस येवढा ? प्राची सचिनला हलवत विचारत होती.
अ..? काही नाही ग
ह... काही नाही ग ? ऑफिसमधुन आल्यापासुन पहाते आहे. तु बोलत नाहीस्. काय झालय ? ऑफिसमधे काही घडलय का ?

अ...? काही नाही

हे जरा माझ्याकडे पाहुन म्हण. बावीस वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि त्याच्या आधिची ..... सानिया घरात होती म्हणुन प्राचीने पुढचे शब्द हळु उच्चारत वाक्य तोडल. तु विचारात गढला आहेस हे मला समजत का नाही सचिन ?
नसेल काही सांगायच तर नको सांगु पण काही नाही हे म्हणु नकोस.

सचिन तरीही शांत होता. कुठुन सुरु कराव याची मनाशी जुळवा जुळव करत होता.

प्राची ... आज वसुचा ईमेल आला आहे.

तुला ? तुझा ईमेल आयडी तिला कसा माहीत झाला ?

प्राची ही गोष्ट जास्त महत्वाची आहे की तिचा ईमेल काय आला हे विचारशील ?

सगळच सांग आधी ईमेल काय आहे ते आणि मग तो तुला कसा आला ते.

तिला कॅन्सर झालाय. ल्युकेमिया. प्रायमरी ट्रिटमेंट नंतर ती बरी आहे. पण .... डॉक्टर्स याची खात्री देऊ शकत नाहीत की हे पुन्हा उदभवणारच नाही.

काही सेकंद शांततेत गेले मग प्राची म्हणाली मग ?

वसु भारतात येते आहे. हरीद्वारला एक आश्रम आहे. तिथे कॅन्सरवर ट्रिट्मेंट होते. आयुर्वेदिक व योगीक पध्दतीने. तिने संपर्क केलाय पण त्यांनी अजुन तिला सांगितल नाहीये कधी अ‍ॅडमिट व्हायच ते. तो पर्यत ती आपल्याकडे राहीन म्हणते. आठ एक दिवसांचा प्रश्न आहे.सचिन एका दमात बोलुन गेला.

प्राचीने डोक्याला हात लावला " काय म्हणाव या मुर्खपणाला ? ल्युकेमियासारख्या रोगावर भारतात ट्रिट्मेंट आणि तेही आयुर्वेदीक पध्द्तीने ?

प्राची, हा तिचा निर्णय आहे. यावर आपण का भाष्य करा ? आपल्याला तिला आठ दिवस ठेऊन घेता येणार आहे का नाही ह्यावर मी विचार करतोय.

आधी मला सांग, तुझा ईमेल आयडी तिला कसा मिळाला ?

मी एकदा फेस बुक वर सर्च करत असताना तिचा प्रोफाईल मिळाला. मग अगदी सहज तिला ईमेल केला. प्राची अगदी सहज आणि आज.....

अजुनही ती डोक्यातुन जात नाही तुझ्या ? तुम्हा पुरुषांच वागण हे अस. सुखी संसारात तुम्हाला हे नाही ते सुचतस कस ? प्राचीचा स्वर तापला होता.

प्राची प्राची थांब, सुतावरुन स्वर्गाला जाऊ नकोस. मला सांग मी कधीतरी वसुची आठवण काढली का इतक्या वर्षात ?

मग आताच काय ही तुला अवदसा आठवली ? याच अर्थ इतकाच की तु तिला विसरला नाहीस. या शिवाय हे घडणारच नाही.

हेच हेच तुझ वागण आणि उलटा सुलटा विचार करुन त्रास करुन घेण मला पटत नाही. उदय पर्वा माझ्याजवळ आला. त्याने मला सांगितल त्याचे सगळे मित्र मैत्रिणींना फेस बुक वरुन त्याने शोधुन काढले. मग मला ही वाटल की बघाव काय चाललय वसुच बस. यातुन हाच मी तिला विसरलो नाही हाच अर्थ काढायची काही गरज आहे का?

माझा रागाचा स्वर पाहुन आता प्राची नरमली होती.

आपल्याकडेच रहायला यायची काही गरज आहे का ? प्राचीचा स्वर तुसडा होता. इथे येऊन ती काय करणार मला माहित आहे. ती कशी सुखात याच वर्णन करणार. आपण तिच्या इतके हुशार नाही हेच पुन्हा पुन्हा ती उगाळणार्.टोमणे मारणार. कॅन्सर झाला म्हणुन तिच्या स्वभावात फरक पडणार नाही. उलट इतक्या वर्षांच राहिलेल बोलाणार.

इतकी कशी ग तु निर्दयी ? आपल लग्न झाल हा भाग सोडला तर आपण तिघ चांगले मित्र होतो हे ही विसरायच का? तरी बर ती तुझीच लहान पणापासुनची मैत्रीण होती. वसु कॅन्सर सारख्या महाभयानक रोगाशी सामना करते आहे. जर तिला बर वाटणार असेल आपल्याला भेटुन, तर काय हरकत आहे?

ममा मी बाहेर चालले. सानियाने तिच्या बेडरुम मधुन मास्टर बेडरुम मधे डोकावत आवाज दिला. प्राचीने मान डोलावली.

हे काय ममा ? नेहमीचे प्रश्न नाहीत ? कुठे चालली आहेस ? कुणाबरोबर चालली आहेस ? जेवायला येणार आहेस ना ? सांगुन जात जा बाई, येव्हड अन्न उरत आणि टाकुन द्यायला लागत .... ममा काय झालय ? सानिया प्राचीच्या तोंडाकडे पहात म्हणाली.

तु जा बेटा. तु काळजी कराव अस काही नाही. मी सानियाला म्हणालो.

एक विचारु ? रागावणार नसाल तर सानिया पुन्हा उत्सुकतेच्या स्वरात विचारत होती. नाही..... आज लव्ह बर्डस भांडणार आहेत का? अस असेल तर मी जातच नाही बाहेर. कित्ती दिवसांनी हा सिन बघायला मिळणार आहे. मला वाटत माझ्या आयुष्यात समजायला लागल्यापासुन प्रथमच.

सचिन आणि प्राची या सानियाच्या चेष्टेला उत्तर द्यायच्या मुडमधे कोणीच नव्हते. जाउदे, ममा मी परत आल्यावरयेव्हडच सांग की माघार कुणी घेतली. आपल्या सखुबाईच्या नवर्‍यासारख पपा तुला झोडपणार नाहीत खास. म्हणुन, नाहीतर थांबावच लागल असत घरात.

सानिया गेली, दोघेही गप्प गप्प...... काही वेळ तसाच गेला.

सचिन बोलला, प्राची, मला तिच्या ईमेल ला उत्तर द्यायच आहे. आपण तिला बोलावु शकतो की नाही याच. त्यावर तिचा पुढचा प्रोग्रॅम ठरणार आहे.

नाहीच काही उत्तर दिल तर ? प्राची शांतपणे उत्तरली.

सचिनला तिच्या बोलाण्यातला रोख समजला. यावर चर्चा वाढवण्यासारख काही राहील नव्हत.

सचिन उठला, लिव्हींगरुम मधे जाऊन त्याने टि.व्ही. ऑन केला. न्युज चॅनलवर ब्रेकींग न्युज होती. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकण किनार्‍याला चक्री वादळाचा धोका. हे वादळ गेल्या ३०-४० वर्षातल सर्वात मोठे वादळ असेल जे मुंबईसह कोकण किनारपट्टी कडे येण्याची शक्यता असुन असे घडल्यास मोठा उत्पात घडेल.

त्याने टि.व्ही. बंद केला. इथेही वादळ तिथेही वादळ काय कराव काही सुचत नव्हत. परत जाऊन प्राचीशी बोलाव वाटत होत पण प्राची रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीत होती.

रोजच्या रुटिन मधे आज गोधळ झाला होता अन्यथा संध्याकाळी रोजच्या गप्पा किचन मधे होत. आज काय घडल माझ्या ऑफिस मधे, तिच्या कॉलेज मधे काय घडल. तिच्या लेक्चरला कुठल्या मुलाने काय टवाळी केली. मग आज जेवायला काय बनवायच याची चर्चा. प्राचीला रात्रीच जेवण बनवताना छोटीशी मदत. मग टि.व्ही पहात पहात रात्रीच जेवण.

काय झाल असेल प्राचीला येव्हड चिडायला वसुच्या बाबतीत ? आम्ही दोघांनी घेतलेला लग्नाचा निर्णय. त्या आधीच वसुच एम. एस. करायला परदेशात जाण आणि स्थायिक होण हा सगळा कालखंड माझ्या डोळ्यासमोर होता.

खरतर वसुने रागवायला हव होत, चिडायला हव होत आम्ही लग्न करतोय कळल्यावर. पण यावर वसुची प्रतिक्रीया सौम्य होती. आम्ही लग्न करायचा निर्णय पत्राने तिला ती परदेशात गेल्यावर कळवला होता. त्यावर तिच पत्र ही आल होत. मनात काय होत ते फारस कळल नव्हत निदान मला तरी. पण पत्राची भाषा अभिनंदनाची होती. मी तिला सोडुन प्राचीशी लग्न करतोय याचा खेद कुठेही नव्हता.

मी, प्राची आणु वसु एकाच कॉलेज मध्ये सायन्सला पाहिल्या वर्षाला होतो. वसु दिसायाला सर्व साधारण पण स्कॉलर होती. बारावी पर्यत आपटे प्रशाला सारख्या नावाजलेल्या शाळेतुन ती एच.एस.सी. बोर्ड परिक्षेत मेरीट मध्ये आलेली होती. पुढे काय शिक्षण घ्यायच याचा निर्णय झालेली आमच्या तिघांच्यात एकटी होती. कॉलेज लाईफ एंजॉय करणे या विचारापासुन दुर होती.

प्राची तिच्याच वर्गात पहिलीपासुन होती. फार अभ्यास न करता पास होणे तिला अवघड नसायचे. पण तिन कोणाशीच स्पर्धा म्हणुन कधीही अभ्यास केला नाही. शाळेत पाहिल्या दहा मध्ये सुध्दा तिचा नंबर नसायचा. प्राचीच्या घरचे तिला वसुशी मैत्री कर म्हणुन तर नंतर टिकवुन धर म्हणुन माग असायचे. कारण एकच, की वसुच्यानादाने प्राची अभ्यास करेल.

ही मैत्री फार गाढ नव्हती हे मला उशीरा म्हणजे मी जेव्हा वसुचा सोडुन प्राचीचा विचार करु लागलो तेव्हा कळल. याची कारण अनेक होती. दोघींची मैत्री व्हावी असा समान धागाच नव्हता. प्राचीला वाचन, नाटक, सिनेमा मेकअप याची आवड तर या उलट वसुधा अभ्यास, सायन्स एक्सिबीशन्स आणि त्याच्या संदर्भातल इतर म्हणजे सायन्स मॅगझिन्स वाचणे या बाहेर तिचे छंद नव्हते. मग त्याला साजेस तिच वागण, कपडे असायचे.

मी का तिच्याकडे आकर्षीत झालो हेच कळाल नाही. कदचित तिच ठाम निर्णय घेण. हव तेच करण हे मनाला भावल ? अस काहीच नसाव. इन्फॅच्युएशन दुसर काय असणार. पण एकमेकांबरोबर अनेक वर्ष राहिल्याने, सहवासाने जो स्नेह निर्माण होतो तो असा कपडे झट़कल्यासारखा तर नाही ना झटकता येत ? प्राचीला हेच समजवायचा मला प्रयत्न करायचा होता.प्राचीला तर ती डोळ्यासमोरच नको होती.

मला स्वत:ला त्या़काळात काय आवडायच हे ऩक्की नसायच. मी कोणाच्याही बरोबर कोणत्याही विषयात वहावत जायचो. प्राची बरोबर सिनेमाला, वसु बरोबर सायन्स एक्सिबीशन्सला, दुसर्‍याच मित्रांच्या ग्रुपबरोबर ट्रेकींगला, मला माणस लागायची अवती भवती. मग ती माणसे मला त्यांच्या निर्णय प्रक्रियेत सामिल करुन घेतात किंवा नाही याचा फारसा विचार नसायचा. अभ्यासातली माझी गती सामन्यापेक्षा थोडी जास्त होती पण मी स्कॉलर नव्हतो.

एफ.वाय.सायन्सला आणि त्यातुन पुण्याच्या फर्गसन कॉलेजला प्रवेश म्हणजे एक मनातली सुप्त इच्छा पुर्तीच समाधान होत. काय ती फॅशनेबल मुल मुली, वैशाली हॉटेलचा डोसा, नटराज मधला सिनेमा सगळ काही अनुभवायच होत. बारावी नंतर इंजिनियरीगला जायच अस मनात सुध्दा न आणल्याने इथेच आणि जायच हे पक्क होत.

पहिल्या वर्षात गेल्यावर मला नवीन मित्र मिळाले. मैत्रीण फक्त वसुधा. याच कारण मोठच गमतीच होत. तिच्या स्वत: बद्द्लच्या कल्पना वेगळ्याच होत्या. ती समजत होती की तिचा बारावीच्या मेरीट लिस्ट मध्ये नाव व फोटो आला म्हणजे तिला सगळे ओळखतात. मग आपण जर क्लास रिप्रेझेंन्टेटीव्ह च्या निवडणुकीला उभ राहिलो तर नक्की निवडुन येणार.

झाल मनात आल आणि वसुने निवडणुकीचा अर्ज भरला देखील. मला ती उभी राहिली याचीच गंमत वाटली. मग मी मुद्दाम ओळख दिली. आणि पाठींबा सुध्दा. आपल्याच शाळेतल्या, एकाच बाकावर बसणार्‍या प्राचीशी किमान चर्चा करावी हे देखील वसुच्या मनात नाही आल. मग काय होणार, आपटली बिचारी. फक्त तीन मत मिळाली. एक स्वत:च, दुसर प्राचीच आणि तिसर माझ.

खुप रडली निवडणुक हरली त्या दिवशी. मी आणि प्राची समजुत घालायला होतोच. मग माझी प्राचीशी ओळख झाली.

माझ्या सहानभुतीचा अर्थ वसुने काय लावला माहित नाही. मग तिच्याशी गप्पा सुरु झाल्या. होता होता छान मैत्री झाली. सुरवातीला प्राची आमच्यात येत नव्हती. जसे प्राचीचे पहिल्या टर्मचे मार्क्स समजले, प्राचीला जुनी दोस्ती टिकवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

माझी आणि वसुची मैत्री आता आमच जमलय अशी शंका इतरांना येण्याइतपत गाढ झाली. वसु आणि मी चहा प्यायला, डोसा खायला एकत्र येत होतो. यात प्राची नसायची, किंबहुना वसु तिला टाळायची. आम्ही तिघ असताना वसुधा माझ्यावर अधिकार दाखवायची. प्राचीने सिनेमाला जायचा विषय काढताच आमचा बी.सी.एल. ला पुस्तक बदलायला जायचा प्लॅन आहे अस म्हणायची. मी फक्त तिचा मित्र आहे हे दाखवण्याचा तिचा कल असायचा.

हळु हळु वसुच्या यावागण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता तसा तिच्या उपक्रमांचा सुध्दा. सायन्सची पुस्तक, मॅगझिन्स, सायन्स एक्सिबीशन्स ह्यात काही रमण्यासारख नाही हे समजायला मला वेळ लागला पण नंतर वसुला नाही कस म्हणायच म्हणुन मी जात रहिलो. प्राची भेटली की माझी चेष्टा करत असे, अर्थात मला एकट्याला पाहुनच. वसुकडुन नोट्स मिळवण, काही न समजलेला भाग समजाऊन घेण यासाठी वसुवर अवलंबुन असल्यामुळे प्राची तिच्यासमोर माझी चेष्टा करणे टाळत असे.

पहिल वर्ष संपल.आधीच ठरवल्याप्रमाणे वसुने मायक्रोबायलॉजी विषय घेतला. मी आणि प्राची फिजिक्स घेऊन मो़कळे झालो. मायक्रोबायलॉजीसारखा किचकट आणि अवघड विषय घ्यायचा पेशन्स माझ्यात आणि प्राचीत तर त्याहुन नव्हता.

दुसर्‍या वर्षापासुन माझ्या व प्राचीच्या आणि वसुच्या बॅचेस वेगवेगळ्या झाल्या. मग प्राचीला मला चिडवायला जास्त जास्त संधी मिळु लागली. मग काय आता कधी जाणार बी.सी.एल. ला ? ती मला विचारत असे. मग मी तिला म्हणायला लागलो, चल पि़क्चरला जाऊ मला काही प्रॉब्लेम नाही. होता होता हे जुळुन आल आणि तिच्या बरोबर मी ग्रुपमधे पिक्चरला गेलो. प्राची मुद्दामच माझ्या शेजारी बसली होती. ही बातमी वसुला कळावी आणि ती जळावी या उद्देशाने.

वसु बातमी कानावर जाऊनही चिडली नाही म्हणुन प्राची पेटली. दुसर्‍याच आठवड्यात सगळ्या ग्रुपला सांगुन ती फक्त मला घेऊन पिक्चरला नेण्याचा प्लॅन करुन आली. मी संभ्रमात होतो. जाव की नाही ? दोस्त म्हणाले लकी आहेस साल्या, ती तुला विचारते आहे तुला काय प्रॉब्लेम ? आम्हाला मुलींना विचारायची सोय नाही.

पिक्चर पण झकास होता. आम्ही रमलो होतो पिक्चर पहाण्यात. मग हॉटेलमधे काहीतरी खायला गेलो. मी प्राचीला विचारले " हे काय चाललय ?" ती म्हणाली सचिन तु विचार करु नकोस. लहानपणा पासुन अभ्यासात वसुन मला मदत केली हे मी नाकारत नाही पण या मदती बरोबरच जे टोमणे मारले त्याच उट्ट मला फेडायचय.

मी म्हणालो हे अस ?

प्राची म्हणाली " माझ्या बरोबर येण आवडत नसेन, मी आवडत नसेन तर राहुदे." मी म्हणालो तस नाही ग पण तिला काय वाटेल ? प्राची म्हणाली " काय प्रेमात तर नाहीना पडलास तिच्या ?"

मी म्हणालो छे ग पण तरी सुध्दा वसुला आपण कट करतोय अस नाही वाटत ?

सचिन तुमच्या दोघात जेव्हडी मैत्री आहे किंबहुना ओळख आहे या पेक्षा जास्त तिची माझी आहे. अस असताना, वसुन मला पहिले काही महिने तुझी साधी ओळख करुन दिली नाही. हा पझेसिव्ह विचार ती करु शकते तर तिला कट करायला मला काय प्रॉब्लेम आहे. शिवाय आता तिचे विषय वेगळे माझे वेगळे. मला घरचे आता फोर्स करु शकत नाहीत तिची मैत्री कायम ठेवायला. आणि अभ्यासात तु माझ्यापेक्षा हुशारच आहेस. मदत लागलीच अभ्यासात तर तु आहेसच.

मी निरुत्तर होतो. किंबहुना उघड वाईट्पणा घ्यायला प्राची तयार होती जे माझ्या स्वभावात बसत नव्हत. हे असुन आम्ही वसुशी निट बोलत होतो. प्राची सुध्दा एखाद्या वेळेसच, ते ही माझ्या बाबतीत जर वसुचा पझेसिव्हनेस उफाळुन आलाच तरच झटका द्यायची. दुसरही वर्ष असच निघुन गेल. आम्ही तिघही पास झालो तर वसु त्यांच्या वर्गात नेहमी प्रमाणे पहिली आली होती.

आता प्राचीने मला तिच्या घरी नेण्याला सुरवात केली होती. बर्‍याच वेळा तिचा सकाळी फोन यायचा तिची सायकल पंचर असायची. मग रास्तापेठेतुन घेऊन मी माझ्या स्कुटरवर तिला कॉलेजमध्ये न्यायचो. जाताना घरी सोडायचो. मग ती घरात बोलावल्या शिवाय रहायची नाही. मी आढेवेढे घेत घरी जायचो. तिची आई छान गप्पा मारायची, काहीतरी खायला द्यायची. हळु हळु मला तिच्या बरोबर असण्याची आणि वसुच्या नसण्याची सवय होत गेली.

शेवटच्या वर्षाला असताना वसुने एम. एस. करायचा निर्णय घेतला होता. हा निर्णय तिने आम्हा दोघांना हा निर्णय सांगीतला. प्राचीने काहीच प्रतिक्रीया दिली नाही. मला मात्र असे वाटत राहीले की आपण आधी वसुला प्रोत्साहन दिले नंतर कट केले याचा तर परिणाम नाही. एकदा वाटले ती करीयरवाली आहे, जे काय घडतय यात आपला काहीच दोष नाही. आम्ही तिघही बी. एस. सी. झालो. मी नोकरीला लागलो. प्राचीला एम.एस.सी. करुन लेक्चरर म्हणुन काम करायचे होते त्यामुळे ती त्याच्या मागे लागली. वसु मात्र ठरल्याप्रमाणे एम. एस. करायला यु.के. ला गेली.

जाताना मला एकट्याला गाठुन तिने सांगीतले की मी तिला अजुनही आवडतो. मला तुझ्या शिवाय रहाता येणे शक्य आहे. पण तुझ्या तशाच भावना असतील तर मला सांग.मी एम. एस. झाल्यानंतर मी याचा विचार करीन. माझ्या मनात आता ती एक मैत्रीण या पेक्षा जास्त काहीही नव्हते.
मी फार कोरडेपणा न दाखवता येव्हडेच म्हणले. आता कुठे आपले स्वत:चे जीवन सुरु होतय. मी अद्याप पुढचा विचार केलेला नाही. तु कदाचित नसताना मला हे जाणवल तर मी नक्की तुला सांगीन.

कॉलेजच्या सुरवतीच्या दिवसात कोणी मुलगी आपल्या बरोबर बोलते. काही शेअर करते. आपल्या एकट्याबरोबर फिरायला येते याच फार अप्रुप वाटायच. या दिवसात तिचे विचार, आवडी निवडी किंवा अपेक्षा आपल्याबरोबर जुळतात का नाही याचा विचार न करता फार जवळीक दाखवण्याचा हा परिणाम होता. नशीब माझ की वसु याला प्रेम न समजता जीवनाच्या एका ट्प्प्यावर फक्त सहजीवनाची अपेक्षा धरुन होती.

मग प्राची आणि मी एकमेकांच्या प्रेमात गुरफटलो. प्रेम व्यक्त झाल आणि लग्न करायच हे ही ठरल. यथावकाश घराच्यांच्या संमतीने हा विवाह झाला. जाताना वसु मला काय म्हणाली हे प्राचीला कधीच सांगीतल नाही. लग्नाला बावीस वर्ष झाल्यानंतर वसुशी बोलुच नये आणि संबंधच ठेवु नये अश्या प्राचीच्या भावना असतील हे मात्र मी अपेक्षील नव्हत.

प्राचीन मला जेवायला बोलवल. आम्ही न बोलता जेवलो. सानिया बाहेरुन जेऊनच आली होती. नेहमीप्रमाणे तिच्या चिवचिवाटात रस घ्यायला आम्ही दोघही मुड मध्येच नव्हतो. रात्री तो विषय परत काढावा अस वाटत असतानाच प्राची झोपली की झोपण्याच सोंग घेतल हे समजल नाही. स्त्रीयांच्या मनातल्या भावना समजणे महाकठीण त्यातुन ज्यांच्या सहवासात आपण रहातो त्यांच्याही भावनांचा अंदाज न लागणे हा माझ्या द्रुष्टीने अत्यंत वाईट क्षण होता.

मला झोप लागत नव्हती. मी पुन्हा लिव्हींग रुम मध्ये येऊन टी.व्ही. लावला. आता वादळाच्या बातम्या आणखी विस्त्रुत येत होत्या. वादळ अद्याप कोकण पट्टिवर धडकल नव्हत पण येत्या चोविस तासात ते केव्हाही धडकणार असा अंदाज होता. बातम्या ऐकता ऐकता मी सोफ्यावर आडवा झालो आणि झोपलो.

सकाळ झाली आम्ही दोघही आवरत होतो पण कुणीच कोणाशी बोलत नव्हत. मग काय लिहु मी वसुला ? शेवटी मी प्राचीला प्रश्न केला.

"माझ्या कालच्या आणि आजच्या उत्तरात काही फरक नाही. सचिन मला वाटत हा विषय संपवावा. वसुच्या बाबतीत इतक हळव होण्याची गरज नाही. काल तिला तुझा ईमेल आय.डी. मिळाला त्या आधीपासुनच तिचा भारतात यायचा प्लॅन होता. म्हणजे आपल्याकडेच येऊन राहणे हा एकमेव पर्याय तिला उपलब्ध आहे अस नाही. शहाणी असेल तर समजेल तिच तिला, की मला तिच्या बद्द्ल काय वाटत. आणि जर फोन नंबर देऊन ठेवला असशील तर तुझ तु ठरव काय उत्तर द्यायच. मला वाटत ही वेळ येणार नाही. बायकांना काही गोष्टी न बोलाताच समजतात. तिलाही समजतील."

इतक तिखट आणि जळजळीत ऐकुन मी ऑफिसला गेलो. माझ्या मागे प्राचीही कॉलेजमध्ये गेली असणार. दिवसभर मी बेचैन होतो. संध्याकाळी घरी आलो. आवडीच संगीत ऐकल पण बर वाटेना. काय विचार करत असेल वसु आता तिला अशा प्रसंगात धीर देईल अस कोणी असेल का ? तिचे पुण्यात असलेले नातेवाईक आता कुठे असतील ? एक ना दोन. प्राची मात्र नेहमीसारखीच शांत स्थिर होती. यावादळाच दणका जणु काही मलाच बसणार या भावनेन मी अस्वस्थ होतो.

तिसरा दिवस उजाडला. सकाळीच वसुची मेल दिसली. तिन लिहील होत
" प्रिय सचिन,
मला माहित नाही, माझ्या तुमच्याकडे येऊन रहाण्याच्या मेल ने काय घडल असेल. ज्या अर्थी लगेचच उत्तर नाही आल त्यावरुन अंदाज येतो की तुम्हाला काही अडचण असावी. ही विनंती अगदी सहज होती. यानिमीत्ताने तुम्हा सगळ्यांची भेट व्हावी. हे लिहीताना मलाच अंदाज नाही आला मी किती त्रासात तुम्हाला टाकणार आहे. असो, आता मी विचार रद्द केला आहे. मी आता परस्पर हरिद्वारला जाणार आहे. माझ आता पुण्यात कोणीही नाही त्यामुळे मी पुण्याला येणार नाही. प्राचीला सांग मी तिच्या बाबतीत चुकले असेल तर मला माफ कर.

वसुधा."

ईमेल वाचुन मला सुन्न व्हायला झाल. प्राची म्हणत होती तस वसुने आम्ही काहीही न लिहिता हे ओळखल की काही अडचण आहे. खरच, स्त्रीयांना हे वरदान असत का? जे पुरुषांना सांगुन समजत नाही ते स्त्रीया न बोलता समजु शकतात का ?

माझ्या मनातल वाद्ळ संपल होत. आता वादळामुळे झालेली पडझड दुरुस्तीच काम बाकी होत. आज मन हलक झाल होत. घरी आलो. टि.व्ही. लावला. वादळान झालेल्या हानीच्या बातम्या दिसत होत्या परंतु आश्चर्यकारक रित्या कोकणाच्या बाजुला सरकलेल्या वादळाचा जोर वादळ जमिनीवर आल्याने थंडावला होता व मोठ्या हानीपासुन समुद्र किनारा वाचला होता.

गुलमोहर: 

उ त्त म...!
घरात अशी छोटी मोठी वादळे नेहेमी होत असतात, चहाच्या पेल्यातलीच असतात..पण तेव्हा जी काही उलथापालथ होते ती भयंकर असते, छान मांडलीये कथा....हेवा, मत्सर करणारी आणि नवर्‍याबाबत पझेसिव्ह प्राची खूपच खरीखुरी वठली आहे.

मस्त झाली आहे कथा! सर्व पात्रे खरीखुरी, जिवंत उभी केली आहेत! पुरुषाच्या मनातही अशा प्रसंगात कशी घालमेल होऊ शकते, रोजच्या आयुष्याचा सूर बिनसल्यावर जे काही होतं त्याचं छान चित्रण झाले आहे.

छान.

खूप आवडली.. सर्व प्रसंग खरेखुरे वाटतात. 'जे पुरुषांना सांगुन समजत नाही ते स्त्रीया न बोलता समजु शकतात का ?'- हो Happy
तुझ्या प्रत्येक कथेचा विषय नेहमी वेगळाच असतो .. याचे विशेष कौतुक

मस्त आहे कथा, मला वाटलं वसू येणार आणि प्राचिच्या मतांमधे परीवर्तन होणार मैत्रिचे बांध पुन्हा जुळणार असं काहिसं पण हे प्रॅक्टिकल होतं आणि बरचसं खरं!

प्राची आणि सचिन ही दोन्ही पात्रे अगदी जिवन्त वाट्ताय्..शेवट पात्रांच्या विचारसरणीशी सुसंगत वाट्तो..उगाच करण जोहर टाइप नाही Happy

माझ्या कथा नेहमीच वाचणारे आणि प्रतिसाद देणारे, माझ्या लेखनात सुधारणा सुचवणारे, कथा आवडली नाही अस लिहणारे, यांचे तसेच ज्यांनी प्रथमच प्रतिसाद दिला, अरे हो जे अधुन मधुन प्रतिसाद देतात या सर्वांचेच आभार. माबो माध्यमामुळे हे सर्व शक्य होतय.

पुर्वी म्हणजे या प्रकारचे माध्यम उपलब्ध नसताना कथा लिहीणार्‍यांना आपल लेखन प्रसिध्द होण एक मोठी वेळ खाऊ प्रक्रिया, मग वाचकांचा प्रतिसाद आणखी एक मोठी वेळ खाऊ प्रक्रिया, यातुन बोध घेऊन आपली शैली सुधारणे यात किती वेळ जात असावा ? अनेक नवोदित लेखकांची उमेद संपत असावी.

कल्पना करा की यात अनेकांना लिखाणाची उर्मी असेल पण लेखन प्रसिध्दच झाल नसेल असे कितीतरी चांगले लेखक निराश झाले असतील. पुढच्या गोष्टीतर लांबच राहिल्या. अर्थात जे कथा लेखक म्हणुन त्या त्या काळात गाजले त्यांच्या कथा उत्तमच होत्या.

मायबोलीची ज्यांना कल्पना सुचली आणि ज्यांनी ज्यांनी ती जोपासली, त्या पडद्या आडच्या लोकांचे धन्यवाद. माबोवाचक, माबोलेखक, माबोसमिक्षक असे तिन कथा/ कादंबरी विभागात तर माबोकवी, माबोगझलकार,............ कितीतरी नवोदितांचे दिवस/रात्र आनंददायी करण्याच मोठ्ठ काम आपण करता आहात. मी तरी नक्कीच सुखावलो.

छान