सारीपाट

Submitted by नितीनचंद्र on 23 March, 2010 - 10:43

काय रे प्रवीण, असा शांत, शांत का ? तुझी एखादी कविता होऊ दे.

प्रवीण, संजय, सुशांत, आणि अविनाश यांची मैफिल जमली होती. अविनाशच्या फार्म हॉऊसवर हे चार मित्र नेहमीच जमायचे. मग सार्वजनिक सुट्टीच्या आधिची रात्र रंगायची कधी वाईन तर कधी बिअरच्या संगतीने. कुणी शास्त्रिय संगिताची मैफिल रेकॉर्ड करुन घेऊन आलेल असायच. तर कोणी नुकताच प्रसिध्द झालेला गाण्यांचा अल्बम आणलेला असायचा.

मग आरामात चर्चा , वाद विवाद रंगायचे. सुशांतच बारीक लक्ष असायच. जर एखादा मित्र गप्प गप्प असेल तर चर्चा कधी कधी वैयक्तिक प्रश्नांवर पोहोचायच्या. मग कोण बरोबर कोण चुक याची चर्चा होऊन मित्रांना सल्ले दिले जायचे.

आजची बैठक जरा उशीरा सुरु झाली. गप्पात रंग भरत नव्हता. आज कोणाकडे नवीन काहीच नव्हत. आज प्रविणही गप्प गप्प होता. त्याला सुशांत डिवचत होता. प्रविण अरे बोल ना काय झालय ?

कविता म्हणु का ? प्रवीणने तोंड उघडले.

ही माझी कविता नाही. प्रुथ्वीच प्रेमगीत ही अतिशय प्रसिध्द कविता आहे कुसुमाग्रजाची. जी आपण सर्वांची शाळेत शिकली आहे.

प्रवीण म्हणु लागला.

युगामागुनी चालली रे युगे ही .......

१० कडव्याची कविता त्याला तोंड पाठ होती. ही कविता ऐकताना उरलेल्या तिघांच्या मनात एकच विचार येऊ लागला - भानगड काय आहे.
सुशांतला सोडुन उरलेल्या दोघांना ही कविताच आठवत नव्हती. फक्त इतकच जाणवत होत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत .... याभावनेची ही साधी सुधी कविता नाही.

संजय आणि अविनाश आता सुशांत कडे पहात होत. प्रवीण तल्लीन होऊन कवीता म्हणत होता.

सुशांतने संजय व अविनाशला डोळ्याने शांत रहायला सांगीतले.

नको क्षूद्र श्रुंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
..... म्हणताना प्रवीण या वाक्यावर जोर देऊन म्हणत होता.

गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

कवीता संपली तेव्हा सर्व जण सुन्न झाले होते. काय ही कवीता. आणि प्रवीण सारखा तिशी उलटु पाहत असलेला आपला अविवाहीत मित्र हीच का कविता गातोय ? काही कळत नव्हत.

सुशांतने सर्वांना पुन्हा एकदा शांत रहाण्याचा इशारा केला व म्हणाला
कितवीत होती रे प्रवीण कविता आपल्याला ?

प्रवीण म्हणाला " काही आठ्वत नाही पण दहावीला असावी"
सगळी पाठ आहे अजुनही ? कमाल आहे ?

नाही रे, मुद्दाम पाठ केली येव्हड्यात. समजाऊन घेतोय ही कविता.

हमम... आणि ती कोण आहे रे ? जिला समजण्यासाठी ही कवीता समजाऊन घेतो आहेस. सुशांतने सगळ्यांकडे पहात प्रवीणच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

प्रवीण आपली चोरी प़कडल्यासारखा एकदा सगळ्यांच्या चेहर्‍याकडे पहात शांतपणे मान खाली घालुन बसला.

बिअरचे राऊंड संपुन आता सगळे जेवायला बसले होते.

मान काय रे खाली घालतोस ? कोणा विवाहीतेवर प्रेम बसलय का ?
बोला आणायची का पळवुन. आपली तयारी आहे.

मुर्ख, गावंढळ गाववाल्या, जरा गप्प बसशील का ? हातातला घास तसाच ठेवत सुशांत अविनाशवर उखडुन म्हणाला. तुला काय तो सरपंच नाहीतर साखर कारखान्याच्या चेअरमनचा मुलगा वाटला ? सनदी व़कील आहे तो. एका मिनीटात सनद रद्द होईल असली बेकायदेशीर गोष्ट केली तर.

मग हा बोलत का नाही ? जिच्यावर प्रेम करतोस ती स्त्रीच आहे ना ? संजय न राहवुन मध्येच बोलला.

हो हो ती स्त्रीच आहे. शलाका मुजुमदार तीच नाव.

शलाका मुजुमदार ? सोशालिस्ट पार्टीची लिडर ?....... सुशांत

मग काय प्रॉब्लेम काय आहे प्रवीण? अविनाश पुन्हा बोलला.

हमम ... प्रॉब्लेम काय ? अरे आग आहे ती आग. काय भाषण करते माहिती आहे. सोशालिस्ट पार्टीत तिला मुलुख मैदान म्हणतात. हे तोफेच नाव आहे अव्या, गुलाबाच्या फुलाच्या जातीच नाही. सुशांत म्हणाला.

मग काय झाल त्यात ? प्रवीण काय कमी आहे ? आपल्या पेक्षा उंच, भरदार देखणा आहे. चांगला वकिल आहे. प्रॅक्टीस चांगली आहे. क्रिमीनल मधे नाव आहे. यान जामिनाचा अर्ज दाखल केला अन अन खुनाचा जरी आरोप असला तर हा जामिन घेऊनच येतोच.
अव्या, अव्या शारिरीक किंवा बुध्दीमत्ता याची बरोबरी नाही चाललेली ?

मग काय तुझ एकतर्फी प्रेम चाललय का? लेका बोल की घडाघडा. आम्ही काय कोडी सोडवायला आलोय का? संजय म्हणाला.

नाहीरे एकतर्फी नाही. आता हे काय इन्फॅच्युएशन व्हायच वय आहे. प्रवीण म्हणाला. आम्ही भेटलो आहोत बोललो आहोत. आम्ही एकमेकांना आवडतो, हे आड वळणानी नाही तर प्रत्यक्ष बोललोय.

मग आता घोड अडल कुठ ? संजय म्हणाला. तुझी आई आता अश्या मनस्थितीत असेल की तुला अडवणार नाही.

हो रे पण प्रश्न असा आहे तिला लग्नच करायच नाही. रितसर लग्न करणे, संसार करणे,मुल होऊ देणे यावर तिची मत वेगळी आहेत.

तिला वेगळ राहायच आहे का? सुशांतने विचारले.

हो, तिला लग्न करुन तळेगावला येण्यात रस नाही. ती म्हणते आपण लग्न न करताच राहु. मला मुल नकोत. आणि झालीच तर ती माझ नाव लावतील. मी तुझ नाव लावणार नाही.

प्रवीण सोडुन तिघ एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिले. जे काय ते ऐकत होते ते तिघांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते.

हे म्हणजे नवीन काय ते लिव्हींग टुगेदर असच ना ? अविनाश म्हणाला.
हे हे एकदम चुक.

तुला विचारतोय कोण अविनाश? हा त्या दोघांचा प्रश्न आहे. यावर पंचायत बसवायचे दिवस गेले. सुशांत म्हणाला.

अरे पण त्याच्या आईला काय वाटेल ? संजय ने पुस्ती जोडली.

काही म्हणणार नाही त्याची आई, आणि म्हणलीच तर मी समजावेन त्यांना सुशांत म्हणाला. हा पंचविस वर्षांचा असल्यापासुन याची आई याच्या मागे आहे. पण हा लग्न करेल तर शपथ.

याची काय भानगड होती कारे ? मी उशीरा तुमच्या ग्रुप मध्ये आलो संजय म्हणाला. हो रे होती एक भानगड म्हणुन तर लग्नाला उशीर झाला. शेवटी तिन याला लग्नाला नकार दिला म्हणुन महाराज रुसले होते. आता लग्न नकोच अस म्हणत राहीला तसाच. सुशांत म्हणाला.

कोण होती रे "ती" ?

कोण काय आमच्या वर्गातली उज्वला. तेव्हा याच्या घरात दोन बाहिणी लग्नाच्या आणि हा दिवटा शिकत होता एल.एल.बी. तिच्या घरुन तगादा लग्न कर लग्न कर. हा म्हणत होता थांब थांब पण ती थांबली नाही. किती दिवस थांबणार ? तिचे वडील म्हणत अ‍ॅफिडेव्हीट करुन काय होणार ?घर कस चालणार ? हा क्रिमीनलचा किडा होईला याची खात्री देता येत नव्हती.

याच्या वडीलांच छोटस दुकान, दुसर उत्पन्नाच साधन नाही. काय म्हणुन याच्या घरचे तरी तीच्या घरी जाऊन सांगणार. शेवट उज्वला तिच्या वडीलांनी ठरवलेल्या स्थळाला होकार देऊन मो़कळी झाली.

हमम.. एकंदरीत काय तुझ हे नशीब अस आहे तर. निर्भेळ संसार सुख तुझ्या नशिबी कमीच लिहीलेल दिसतय विधात्याने. संजय पुटपुटला.

काय म्हणते याची जन्मपत्रिका संजय ? अविनाश बोलला.

काय म्हणणार सुखाच स्थान बिघडलय. पत्नीच्या स्थानी हर्षल आणि शुक्र पडलाय शनीच्या राशीला. याला दिर्घकाळ वैवाहिक सुख नाही. मिळालच तर अल्प काळ मिळेल. मागच पहिली मी याची पत्रीका, तोंड पाठ आहे मला.

मलाच हे अजुन निट पसंत पडल नाहीये. पण मला तिची बाजुही माहीत आहे. हे सर्व ती फॅड म्हणुन करत नाहीये. ती म्हणते तिच्या पक्षाची ती पगारी नोकर आहे. हेच काम करायच तिच ध्येय आहे. उद्या पक्षाने दिल्लीला जायला सांगितल तर तिथ जाऊन काम कराव लागेल. मग संसार मुल बाळ, बाकिच्या जबाबदार्‍या नकोत. सुस्कारा टाकत प्रवीण बोलला.

काय रे प्रवीण तुझी तिची ओळख कशी झाली ? अविनाश ने विचारले.

मी एका केस च्या कामसाठी मुंबईला गेलो होतो. कोर्टात तिथ हिला आणल होत पोलिसांनी. कोर्टात हजर केल्यावर तिला जज नी विचारल तुमचे वकील आले आहेत का ? हिला त्यांच्याशी संपर्क करता आला नव्हता. मी समोर होतो. तिने माझ्याकडे बोट दाखवल. मी फारसा विचार न करता पुढे झालो. कोर्टाला जेवणाची सुट्टी झाली तेव्हड्यात मी कागद तयार केले. तिच्याशी बोललो आणि जामिन मिळवुन दिला.

केस नेमकी काय होती ? संजय म्हणाला.

शलाकाने महाराष्ट्रात शेतमजुर, असंघटीत कामगार, वनवासीभागात मोठ्च काम उभ केल आहे. यासर्वांचा मोठा मोर्चा विधानसभेवर येणार होता अनेक मागण्यासाठी. जेव्हा पोलिसांना साधारण दोन चार लाख लोक येणार असा अंदाज आल्यावर त्यांनी या मोर्चाची हवा काढुन घेण्यासाठी सभेला बंदी हुकुम बजावला. यावेळेला विरोधी पक्ष सुध्दा सरकारला सामिल होते.

अधिवेशन सुरु होत पण विरोधीपक्ष नेता गप्प राहिला. यादडपशाहित सामिल झाला. कुणालाही या सोशालिस्ट पक्षाला मोठ होऊ द्यायच नव्हत किंबहुना शलाका मुझुमदारला मोठ होऊ द्यायच नव्हत. मग काय, हिची गाडी सभेच्या चार दिवस आधी पोलिसांनी अडवली. चेक करुन त्यात दंगलीत वापरायच सामान मिळाल म्हणुन तीला अटक केली. शलाका मोठी वस्ताद, ती पोलिसांना एकच गोष्ट सांगत होती मला कोर्टात न्या. ४८ तासांच्या आत आरोपीला कोर्टाच्या समोर हजर करणे कायद्याने आवश्यक असते.

तिचे कार्यकर्ते लक्ष ठेऊन होते. त्यांचा नेहमीचा व़कीलही तयार होता. पण पोलिसांनी यासार्‍यांना गुंगारा देत दुसर्‍याच मार्गाने शलाकाला कोर्टात आणले. मग मी वकील पत्र घेतले. मी तीन मुद्दे बोललो. हिच्या गाडीत सापडलेल्या वस्तूवर हिचे किंवा हिच्या ड्रायव्हरचे ठसे आहेत का ? पंचनाम्यासाठी बोलवलेले पंच कोर्टात आणा. तिसरा व महत्वाचा मुद्दा दंगल घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारे शलाकाने असे भाषण याकाळात केले आहे का ?

मग काय झाल पुढे ? सशांत म्हणाला.

काय होणार, ठसे मिळाले नाहीत कारण ही ह्त्यार पोलिसांनी किंवा त्यांच्या हस्तकांनी गाडीत टाकली असावित. यावरुन मी शलाकाला गुंतवण्यासाठी पोलिसांनी हा पुरावा निर्माण केला आहे असा मी युक्तीवाद केला. पंच पोलिस आणु शकत नव्हते कारण असा पंचनामाच झाला नव्हता. पंचनाम्याचे कागद फक्त तयार केले होते. शलाकाने दंगल घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारे भाषण कोर्टापुढे आणता आले नाही. मग काय कोर्टाने जामिन दिला. पोलिस कस्टडी टळली. पुढे मोर्चा होऊन जागा बदलुन सभा ही झाली.

इतक्या सहजा सहजी ? अविनाश आश्चर्यचकित होत म्हणाला.

छे तुला काय वाटल हे इतक्या सहजासहजी झाल असेल ?

माझा युक्तीवाद झाल्यानंतर कोर्ट अर्धातासाच्या सुट्टीवर गेल. मला जजसाहेबांनी त्यांच्या चेंबर मध्ये बोलावल. म्हणाले फार प्रेशर आहे माझ्यावर. तु सांग मी काय कराव ? मी म्हणालो सर तुम्ही करियरचा विचार घेऊन प्रेशर घेतायना? मी पण माझ करीयर पणाला लावतो. माझा माणुस हैबियस कॉपर्सचा अर्ज घेऊन वरच्या कोर्टात उभा आहे. माझा एक इशारा मिळताच तो अर्ज दाखला होईल. तुम्हाला माहित आहे हा अर्ज कोणीही दाखल करु शकतो. त्यासाठी वकिलच पाहिजे अस नाही. जे तुम्हाला प्रेशर देत आहेत त्यांना सांगा. केरळ मध्ये अश्याकेस मध्ये एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. जजसाहेब विचारात पडले. मला बाहेर पाठवल. नंतर चेंबरमध्ये काय झाल माहीत नाही पण मात्रा लागु पडली आणि शलाकाचा जामिन झाला.

हैबियस कॉपर्स म्हणजे काय ? संजयने विचारल ?
पोलीस कोणालाही पुराव्याशिवाय जास्त काळ कस्ट्डीत ठेऊ शकत नाहीत असा अधिकार कायद्याने प्रत्येक व्यक्तीला आहे. भारतीय घटनेने जे मुलभुत अधिकार दिले आहेत त्यातल्या संचार म्हणजे हव तिथे, हव तेव्हा जाण्याच्या मुलभुत ह्क्काचा संकोच झाल्याने कोर्टात याविरुध्द दाद मागता येते.

शलाका येव्हडी खुश झाली माझ्यावर, मला मी मागितली त्याच्या दुप्पट फि दिली आणि आमची दोस्ती झाली. ती म्हणाली माझ्यासाठी तु खरच सर्व ज्ञान पणाला लावलस. माझ्यासाठी तु कायम काम कर.

मग पुढे काय झाल ?

तिन मला परत मुंबईला बोलावल. बर्‍याच गोष्टींवर चर्चा करायला. आणखी काही केसेस देऊ केल्या, त्यांच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लावलेल्या आणि रात्री तिच्या फ्लॅटवर जेवायला बोलावल.

काय रे भटा, मासे झोडले वाटत तीच्या हातचे ? अविनाश ने मुड मधे येत विचारले.

तीला चहा बनवता येतो. अजुन छोटस काहीबाही. जेवण तिची मेड बनवते. त्या दिवशी मेडनच जेवण तयार केल. माझ्या आवडीची वाईन आणि मासे . मज्जा आली प्रवीण म्हणाला.

हरामखोरा रात्री कुठे झोपलास ते सांग ? अविनाश ने पुन्हा प्रश्न केला.

अरे काय झाल, जेवताना गप्पा झाल्या मग त्यात तिला कळल मी अविवाहीत आहे मग तिनच आग्रह केला थांबायचा. गालात हसत प्रवीण बोलला.

हो, हो तु फार साजुक नाही का ? . एक रात्र राहिलास ना ? आता का नाही म्हणतोस ?

मला गिल्टी वाटतय, असच लग्न न करता कस राहायाच. माझे संस्कार मला अस वागु देत नाहीत. हा माझा झगडा आहे मित्रांनो. प्रवीण म्हणाला.

अरे पण ती काय अजाण अल्पवयीन मुलगी आहे ? चांगली सुशिक्षीत एखाद्यावेळी वयाने तुझ्या पेक्षा मोठीच असेल. तीला तु काय फसवत नाहीयेस.
सुशांतने त्याला समजवण्यासाठी स्टॅड घेतला. आता तर महाराष्ट्र सरकार याला कायदेशीर स्वरुप देतय. मग नैतिकतेचाही प्रश्न उरत नाही.

अजुन एक प्रश्न आहे मित्रांनो. हा सहवास किती दिवस राहिल हे माहित नाही. उद्या तिचा माझ नाही जमल तर मला तिला सोडाव लागेल. मग काय भातुकलीचा खेळ मांडु ? मनात आला की बंद करायला ?

समजा अस काहीच झाल नाही तरी शलाका उद्या आमदार होईल, खासदार होईल. आज ती मला तळेगाव सोडुन मुंबईला रहायला बोलावते आहे. आमच अजुन काही काळ चांगल जमल आणि तीला पार्टीच्या कामासाठी दिल्लीला जाव लागल तर काय मी तिच्या माग दिल्लीला जाऊ ? माझ अस स्व:ताच काय अस्तित्व राहिल? मला ती कविता याच साठी समान वाटते. प्रुथ्वी जर सुर्याला भेटली तर प्रुथ्वीच स्वत:च अस्तीव रहाणार नाही. माझी अवस्था अशीच होईल. आंधी सिनेमा आठवतोय ? मला वाटत त्या पेक्षा लांब रहाव. ती म्हणते ते मान्य करु नये. होईल त्रास थोडे दिवस, पण तो परवडेल.

सगळ्यांची जेवण आटोपली होती. जेवणाची जागा सोडुन आता सर्व जण निवांत गप्पा मारण्यासाठी ठेवलेल्या वेताच्या सोफ्यावर बसले.

फिलोसॉफर आता बोला. संजय सुशांतकडे पहात म्हंणाला. आम्ही यावर उत्तर देऊ शकत नाही.

सुशांतने एक दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाला त्या आधी मला शलाकाची मानसिकता समजाऊन घ्यावी लागेल. प्रवीण मला सांग शलाकचे आई वडिल काय करतात ?

मुजुमदार मुळचे बंगाली. मध्यप्रदेशात अनेक बंगाली आले त्यात एक मुजुमदार फॅमिली. आई - वडीलांची एकुलती एक मुलगी कारण नंतर आई- वडीलांचा घटस्फोट झाला. हिच बहुतेक आयुष्य हॉस्टेलवर गेल. वडीलांनी कायम पैसा पुरवला आजही पुरवतील मागीतला तर पण आई वडील यांच प्रेम तिला मिळाल नाही . घर, नाती जबाबदार्‍या त्यातला आनंद हिला काहीच माहीत नाही. यामुळे विवाह या विधीवर, कुटुंब संस्था यावर तिचा फारसा विश्वास नाही. अस ती स्पष्ट म्हणत नाही. मला सांगताना पार्टीच कारण सांगते.

शलाका शिकण्यासाठी मुंबईत आली. समाजशात्र विषयातली पदवी घेतली. मग सोशालिस्ट लिडर शोभा नाईक यांच्याशी तीचा परिचय झाला. त्या पण अविवाहीत आहेत. त्या देव मानत नाही. धर्म मानत नाही. हेच संस्कार शलाकावर आहेत. पुढे शलाका शोभा नाईक यांची मदतनीस म्हणुन राहिली. हा व्याप वाढ्ला व ती पुर्ण वेळ कार्यकर्ती झाली. शोभा नाईक आता थकल्या आहेत. शोभा नाईक हेच तिच आराध्य दैवत आहे.

पार्टीने शलाकाला वेगवेगळ्या जबाबदार्‍या दिल्या त्या तिन पार पाडल्या. मग पार्टीने तीला पुर्ण वेळ कार्यकर्ती म्हणुन एक फ्लॅट दिला. एक मदतनीस दिली. घरात एक नोकर बाई आहे. शलाका आता महाराष्ट्राची संघटक आहे.

अस आहे तर, मग बरोबर आहे तिच. तिचे विचार तिच्यावर झालेल्या संस्काराला साजेसे आहेत. पण विचार बदलुही शकतात. विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेघ थोडीच असते ? तु तिच्या सहवासत राहीलास की तुझ्या विचारांचा प्रभाव तिच्यावर पडेलच ना ? समजा नाही पडला तर काय फरक पडणार आहे ? ती एक सुशिक्षीत तरुणी आहे. तुला तुझ्या मताप्रमाणे वागण्याच स्वातंत्र्य नक्कीच देईल. सुशांतच्या डोक्यात आता जे बोलायच त्याची आखणी पुर्ण झाली होती. एक ग्लास पाणी पिऊन त्याने पुढ बोलायला सुरवात केली.

तुझ जे म्हणण आहे, माझ अस्तित्व काय राहील हेच एका चुकीच्या गुहीतकावर आधारीत आहे. काय माहित उद्या शलाकाला राजकारणाचा उबग येईल, ती पार्टी सोडुन देईल. समजा तिला पार्टीच्या कामसाठी दिल्लीला जाव लागल तर दिल्लीला कोर्टतर आहेत. तु तिथ प्रक्टीस कर. तिन तुला मुंबईला घरगडी म्हणुन थोडी बोलावल आहे ? तु तुझा व्यवसाय करणार आहेस, ती तिचा करणार आहे. तुझ्यामुळे रुपाने तिला भक्कम आधार आहे. कोणतीही भावनीक गुंतवणुक नसताना तु तिला पेचातुन बाहेर काढलस. तिचा तुझ्यावर विश्वास आहे. ती तुला खेळण म्हणुन पाहत नाही नक्किच.

सुशांत ने संजय आणि अविनाश कडे पाहिल. ते दोघही त्याला सहमत आहेत अस दिसल. सुशांत प्रवीण कडे पहात म्हणाला.

नाहीतरी तु तिला सहजासहजी सोडु शकत नाहीस येव्हडा गुंतला आहेस. हा सारीपाटाचा डाव सोडुन पळण्यापेक्षा दान टाक. कोणास माहित कदाचित हव ते दान पडेल. पुढे ती तुझ्यामनाप्रमाणे लग्नाला तयार होईल. आणि नाही पडल हव तस दान तर तुलाही तारूण्यसुलभ भावना आहेतच की ? तु काय ब्रम्हचारी रहाणार आहेस ? शेण खाण्यापेक्षा हे सहजीवन काय वाईट ? अगदी वाईट म्हणजे तुमच फार काळ नाही जुळल तर काही काळ तर सुखाचा जाईल.

प्रवीण लक्षपुर्वक सारे मुद्दे ऐकत होता. मग सुशांत पुढे बोलता झाला.

समजा वर्ष दोन वर्षांनी अस जाणवल की तुमच एकमे़कांशी जमत नाहीये तर तुम्ही थोडीच आयुष्यभराचा विचार करुन एकत्र येताय ? कोणीच कुणाला फसवत नाहीये. यामुळे अपेक्षा भंग, प्रतारणा यासारखी दु:ख व्हायच कारणच नाही. प्रवीण रोज सकाळी उठ्लास की हाच विचार कर आजचा दिवस सहजीवनाचा बोनस दिवस आहे. क्रुती मात्र या उलट कर. जे गुण तिच्यात नाहीत त्याची कमी तु भरुन काढ. तिच्यावर कधीही हक्क गाजवु नकोस पण जे जे काही तिच्यासाठी करता येईल ते कर. तिला ज्यांच्या बाबत आदर आहे त्यांच्या बाबत तु आदराने वाग.

प्रवीण, मला शलाका तुला सहजीवनासाठी बोलावते यात गैर, चुकीच काहीच वाटत नाही. तु बिनधास्त रहा. याला तुझ्या जवळचे, नातेवाईकांचा पाठींबा, आशिर्वाद मिळणार नाही. पण तुला तुझ ह्क्काच माणुस मिळेल. नाती निर्माण करायला ग्रह तारे मदत करत असतील. ती टिकवायला विशेषतः कठीण प्रसंगी टिकवायला मात्र मनोनिग्रहच लागतो. हा मनोनिग्रह कर पुढ्च देवावर सोड. संकल्प चांगला केला तर फळही चांगलेच मिळेल.

अरे स्त्रीयांना त्यांची माणस, करीयर, संस्कार स्वत:च पहिल नाव सुध्दा सोडुन पतीच्या घरी जाव लागत. तुला यातल काहीच नाही सोडायच. मग येव्हडा विचाराचा गुंता कशाला ?

समजतय ना तुला मला काय म्हणायचय ते ? सुशांत प्रवीणला विचारत होता.
बहुदा त्याला ते पटला असाव. पुर्वेला आता तांबड फुटु लागल होत. या प्रकाशात प्रवीणचा उजळलेला चेहेरा त्याला दिसत होता.

गुलमोहर: 

उत्तम विषय, सुंदर मांडणी आणि ओघवती शैली. यातली विरोध करणारी बाजू अजून ठळकपणे मांडली जावी अशी विनंती.

वा ! छान कथा .काळाला अनुसरून सुस्पष्ट विचार ,कुठेही पाल्हाळ नाही ,आणि विषेश म्हणजे
कथेची मांडणी अगदी मुद्देसूद .पु.ले.शु.

खूप छान हाताळलायस हा आजचा प्रश्न. खूप मुद्देसूद मांडलयस. या सब्जेक्ट ला टॅबू न बनवता, याचे विशेष कौतुक!!

नितिन, अजुन एक वेगळ्याच विषयावरची कथा.. छान लिहितोयस. बर्‍याचश्या गोष्टींचं ज्ञान तुझं या कथेतुन दिसुन येतय... वाचनिय आहे कथा. Happy

छान आहे..मुद्देसुद आणि ओघवती...
पण इथे माझं असुदेला अनुमोदन आहे. दोन्ही बाजु स्पष्ट व्हायला हव्यात.

स्वत: प्रवीण या नात्याकडे कुठल्या भुमिकेतून पाहतोय? त्याची तिच्यामध्ये जर १००% इनव्हॊल्व्हमेंट असेल तर दोन वर्षांनी तिचा निर्णय बदलणे त्याला मानवेल का? साहवेल का?

<<काय माहित उद्या शलाकाला राजकारणाचा उबग येईल, ती पार्टी सोडुन देईल. >>> हे ती तिच्या कामाकडे राजकारण म्हणुन पाहतेय की , आयुष्याचे ध्येय म्हणुन पाहतेय त्यावर अवलंबून आहे. एकंदर तिचा स्वभाव पाहता मला तर ही गोष्ट अशक्य वाटते.

धन्यावाद, दाद आणि विशाल

जरुर विचार करतो. पण याच कथेत त्याचा अंतर्भाव करणे अवघड आहे. कथेची बांधणी बिघडेल असे वाटते. दुसरा मुद्दा या माध्यमात कथेची लांबी पण महत्वाची आहे. पण हि कथा क्रमश केल्यास याचा अंतर्भाव करणे शक्य आहे. बघुया मुळ कथेला कसा प्रतिसाद मिळतो.

नितीनचिंचवड
27 March, 2010 - 01:50
आपल्याला शलाका मुजुमदारची बाजु म्हणायच आहे का? माझ्या डोक्यात तर आता संपुर्ण कादंबरी घोळु लागली आहे.

खिळवुन ठेवणारी कथा आहे .
सुरुवातीलाच आंधीची आठवण आली . (त्यातली गाणी फारच सुंदर आहेत )

विषयाची हाताळणी, मांडणी, स्गळे विचार नेहमीप्रमाणे उत्तम!! पण माझंही विशाल दादाला अनुमोदन.
प्रवीणच्या मनातली तगमग आणि त्याचे विचार आणखी स्पष्ट व्हायला हवेत.

बाकी कथा सुरेख Happy

ठिक वाटली कथा. मांडलेले मुद्दे एकदम योग्य आहेत पण. माझ्यामते लग्नापेक्षा
लग्न न करता एकत्र राहण्यासाठी कमिटमेंटची जास्त गरज असते. Happy

कथेचा विषय निश्चितच वेगळा आहे. लिखाणाचा बाजही ओघवता राहिला आहे. पण संवादात आलेली बाकीची पात्रे घुसडल्यासारखी वाटतात. म्हणजे पात्रांची संख्या मर्यादित असावयास हवी होती. काही संवाद अनावश्यक वाटतात यामुळे मुळ विषयावर अगदीच तोकडे भाष्य केले गेले आहे. वास्तविक पाहता सदरचा विषय कांबरीचाच व्हावा. एवढ्या तोकड्या शब्दांत हा विषय मांडणे तितके सोपे नसते. तरीही कथा हा प्रकार लक्षात घेता ती ठिकठाक झाली आहे, असे म्हणता येईल.

मस्त बांधलेय कथा! खूप आवडली..आणि त्या मित्रांसोबत आपण कथानायकाच्या निर्णय प्रक्रियेत कधी गुंतून पडतो कळत नाही..हा विषय हाताळण्याची नाजुक पद्धत अभिनंदनीय आहे.

काय माहित उद्या शलाकाला राजकारणाचा उबग येईल, ती पार्टी सोडुन देईल.>>>>>
हे नाहि पटलं जे काहि अयोग्य नाहि ते तिनी का सोडावं?
काय माहित, उद्या शलाकाला लग्नाची ईच्छा होईल, अस वाक्य म्हणु शकता हवं तर Happy
मांडणी छान आहे, असेच लिहीत रहा.

सुरेख विषय हाताळलायस मित्रा. प्रविण अजून थोडा यायला हवा होता. सुशांतचा सल्ला जरी 'जर्-तर' मध्ये मोडत असला तरी चांगला आहे. शिवाय इतर दोन पात्रे चर्चेसाठी वापरली असती तर या विषयावर अनेक प्रवृत्तीचे भाष्य मांडता आले असते. थोडा व्याकरणातल्या चिन्हांचा वापर केला तर कथा चांगली दिसेल.

वेगळा विष, पण लग्नाशिवाय एकत्र रहाण्याचे तिच्या बाजुचे बरेच मुद्दे पटले (एरवी पटत नाहीत मला). कादंबरी करायची कल्पना चांगली.