चुक

Submitted by नितीनचंद्र on 15 March, 2010 - 02:23

ईशा सेमी- प्रायव्हेट रुम मध्ये पेशंट्च्या बेडवर झोपली होती. काही वेळापुर्वी तिची डी.सी. क्युरेटीन करुन तिला रिकव्हरी साठी अ‍ॅडमिट केल होत. खुपच रक्तस्त्राव झाल्याने तिला अशक्तपणा आला होता. सलाईन चालु होत.लोकल अनेस्थिशिया चा अंमल असल्याने वेदना फारश्या नव्हत्या.

दोन पेशंट्च्या बेड मधला पडदे. पेशंट्सोबत रहाणार्‍यासाठीची बाजुची बेड, ट्युब लाईटस, सलाईन चा स्टॅड, पेशंट्च्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठीचे स्टिल चे छोटे टेबल सर्व काही ईशाला पड्ल्या जागेवरुन दिसत होत.

काही तासांपुर्वीचा त्रास, त्यानंतर तिची एकटीची झालेली मानसिक कोंडी. गायनोकोलोजिस्ट डॉ. उषाने दिलेला सल्ला व मानसिक आधार आणि नंतर झालेले क्युरेटीन सगळ्या घटना ईशाला आठवत होत्या.हॉस्पिट्ल मधल्या प्रायव्हेट रुम्स उपलब्ध नसल्याने सेमी- प्रायव्हेट रुम मधे तिला रहावे लागणार होते.

शेजारी उभी असलेली परिचारीका ईशाला म्हणत होती " आता कस वाटतय ? त्रास नाहीना होत काही. थोड्यावेळाने तुम्हाला पाणी द्यायाला हरकत नाही. तुमच्या बरोबर कोण आहे? ईशा या प्रश्नाने आणखिनच खिन्न झाली. तिचा आत्मविश्वास संपुन आता रडु फुटेल की काय भितीन तिन मान दुसर्‍या बाजुला फिरवत म्हणल " थोड्या वेळाने तुम्हीच पाणी आणुन द्या."

घटनाक्रम मोठाच विचित्र होता. मे मध्ये लग्न झाले. सगळ काही ऑलवेल म्हणुन सासु सासरे फॉरेन टुर वर गेले. ईशाचे आई वडील तिच्या मोठ्या बाहिणीच्या बाळंतपणात गुंतलेले. दोनच दिवसापुर्वी गोड बातमी माहित असताना अभिजीत तिचा नवरा प्रोजेक्टसाठी परदेशात गेला होता. जाताना फारच कासाविस झाला होता. तिला म्हणाला हे सग़ळ अस अचानक ठरल. मला टाळता नाही येत आहे. ईशानेच मग त्याला समजावल. आत्ताशी कुठे दोन महिने होऊन गेले आहेत. मला काहिच त्रास होत नाहीये. आठ दिवसांनी तुझे आई वडील येतील.

लग्नानंतरचे काही महिने फारच आनंदाने भरलेले होते. ईशाने अभिजीतशी आधी झालेल्या ओळखीनंतर विचारपुर्वक लग्नाचा निर्णय घेतला होता. पुण्यात एका इंजिनियरींग कंपनीत ईशा आय. टी मॅनेजर म्हणुन काम करत होती.

तिच मुळ गाव कोल्हापुर. शालेय शिक्षण बारावी पर्यत झाल्यावर बारावीच्या मार्क्स वर तिला कॉलेज ऑफ इंजिनीयरींग पुणे इथे काँप्युटर शाखेत प्रवेश मिळाला होता. नव्याने सुरु झालेल्या या शाखेत तिने कायम पहिला - दुसरा क्रमांक राखत या नावाजलेल्या कंपनीत पाच वर्षापुर्वी कँपस मधुन प्रवेश मिळवला होता. कॉलेज मध्ये तिन आपल नाव गाजवल होत. फिरोदिया करंड्क, बोटींग स्पर्धा, सर्व प्रकारच्या स्पर्धा गाजवत तर पहिली मुलगी जनरल सेक्रेटरी ही निवड्णुक जिंकुन तिने इतिहास घडवला होता.

कंपनीत तिच्या धडाडीने उत्तम ईन्क्रिंमेंट्स वेळेच्या आधी प्रमोशन्स मिळवत ती मॅनेजर पदापर्यत पोचली होती. ईशाच्या कंपनीने ई.आर्.पी. साठी अभिजीतच्या आय. टी.कंपनीला जबाबदारी दिली. अभिजीत या प्रोजे़क्टचा त्यांच्या कंपनीतर्फे इनचार्ज होता. ईशा तिच्या कंपनीतर्फे या प्रोजेक्ट्च अभिजीत च्या कंपनीबरोबरचे कोऑर्डिनेशन, तिच्या कंपनीतील वेगवेगळ्या विभांगांबरोबरचे या प्रोजेक्ट्च्या संदर्भातले कोऑर्डिनेशन शिवाय या प्रोजेक्ट्च्या टास्क फोर्स चे नेत्रुत्व अशी जबाबदारी संभाळत होती.

तिच काम, तिचे संवाद साधण्याचे कसब, तिची धडाडी यावर अभिजीत खुश असायचा. तिच्या बॉसशी बोलताना म्हणायचा " ईशाला हा प्रोजेक्टच्या कामातुन बाजुला करु नका. ती असेल तरच हा प्रोजेक्ट वेळेच्या आधी संपेल.

दोघांना दिवस दिवस एकत्र काम करायची संधी या निमीत्ताने मिळायची. यातुनच दोघांची मैत्री वाढत गेली. हि तिचा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने अभिजीत ने तिला टास्क फोर्स च्या कार्यपध्द्ती समजाऊन सांगीतली होती. काही दिवसांकरीता वेगवेगळ्या विभागातील लोकांना एकत्र करुन त्यांना कोणत्याही फॉर्मल रिलेशन शिवाय काम करण्यास प्रोत्साहित करणे अत्यंत किचकट आणि सहनशक्तिची परीक्षा पहाणारे काम होते.

अभिजीत ने ईशाला एका ट्रेनिंग प्रोग्राम ची योजना सांगितली. या टास्क फोर्स च्या सदस्यांचे आपापसात चांगले वैयक्तिक संबंध वाढुन संघभावना वाढीस लागावी यासाठीचा ट्रेनिंग प्रोग्राम अभिजीत ने सुचवला होता. ह्याची अधिक माहिती घेऊन जेव्हा ईशाने हा प्रस्ताव मॅनेजमेंट पुढे मांडला तो लगेच मंजुर होऊन याबाबत चांगली काँप्लिमेंट तिला मिळाली.

मधेच काही तांत्रीक अडचणिने हा प्रोजेक्ट आठ दिवसाकरीता संथ होणार असे दिसताच तिने सगळ्या टिमला टीम बिल्डींगच्या ट्रेनिंग प्रोग्रामला बेंगलोर येथे नेले. अभिजीत त्याच वेळेला दुसर्‍या प्रोजेक्टच्यासाठी बेंगलोरलाच होता. यासंधीचा फायदा घेत कामच्या वेळेशिवाय दोघे रोज भेटु लागले. मध्येच म्हैसुर - उटीची ट्रीप ही झाली. तिला हळुहळु जाणवु लागले की बर्‍याच वेळा अभिजीत काही गोष्टी मुद्दाम घडवुन तिच्या जवळ येऊ पाहतोय. मग तिलाही तो आवडु लागल्याने तिचा प्रतिसाद वाढु लागाला.

तिच्याच कॉलेजचा पण मे़कॅनिकल इंजिनियर सागर सुध्दा याच टिम मध्ये होता. सागर टास्क फोर्स मधे मटेरिअल विभागाचा प्रतिनीधी होता.सागर उत्क्रुष्ट टेबल टेनीस खेळायचा. सागर फारच मागास अश्या औरंगाबाद भागातुन आल्याने जरा बुजरा राहिला होता. मुलिंशी संवाद साधणे त्याला कॉलेज काळाततर जमायचेच नाही. त्यातुन ईशा डॅशींग असल्याने सागर तिच्याशी बोलायच्या भानगडित पडायचा नाही.

या टिम मधले वयाने व अनुभावने मोठे असणारे पर्चेस ऑफिसर नवलेंच्या हि गोष्ट लक्षात येताच ते सागरला प्रोत्साहन देऊ लागले. ईशाशी बोलत रहा हा त्यांचा सल्ला. बोलता बोलता एक दिवस तुझ्या भावना व्यक्त कर. जर बोललाच नाहीस तर ईशाला कळणार कस तुला काय वाटतय.

या प्रोजेक्ट्च्या निमित्ताने तो आता मोकळेपणाने ईशाशी बोलु लागला होता. त्याच्याही भावना हळु हळु तरल होऊ लागल्या होत्या. एक दिवस या प्रोजेक्ट्च्यासंदर्भातली एक मिटींग ईशा घेत होती. आत्ता आपण या प्रोजेक्ट्च्या कोणत्या पायरीवर आहोत आणि कुठे पोचायचे आहे हे दाखवणारे प्रेझेंटेशन ती दाखवत होती. बोलताना तिला गरगरतय अशी भावना झाली. सागरने ते टिपल. ईशाने तरी सुध्दा सावरत प्रेझेंटेशन पुढे चालु ठेवल. पुढच्या क्षणाला ती धाडदिशी खाली पडली. सागर पुढे झाला. दोन्ही हातांनी तिला उचलुन त्याने कंपनीच्या डिस्पेंन्सरीकडे धाव घेतली.

ईशाला जेव्हा शुध्द आली तेव्हा ती कंपनीच्या डिस्पेंन्सरीत होती. कंपनीचे डॉक्टर तिला विचारत होते आता कस वाटतय?
मला काय झालय ? तिने डॉक्टरना प्रश्न विचारला "
हिमोग्लोबिन खुपच कमी झालय. तुम्हाला पुढ्चे काही दिवस फक्त विश्रांतिची गरज आहे. सागरने मला सांगितल या प्रोजेक्ट्साठी तु रोज १२- १४ तास काम करती आहेस. त्यात खाण्यापिण्याकडे लक्ष नाही यामुळे हे होत.

सागरने ईशाला आपल्या गाडीतुन ती राहत असलेल्या ठिकाणी सोडल. वडीलांच्या मदतीने व स्वत:च्या कमाईतुन तीने हा नुकताच फ्लॅट घेतला होता. जाताना सागर तिला म्हणाला मी परत टिफीन घेऊन येतो घरुन.
ईशा म्हणाली अरे, मी मागविन समोरच्या रेस्टॉरंट मधुन. फोन केला की मिळत सगळ.
तो म्हणाला "पण घरच ते घरच. मी रोज घरुन टिफीन आणतो म्हणुन फिट आहे."
सागर अरे एक दिवस आणशिल पुढे काय ? मला रोज कंपनी कॅन्टीन नाहीतर रेस्टॉरंट.

सागर काहिच बोलला नाही. तो गेला आणि ईशा त्याचाच विचार करत राहिली. संध्याकाळ झाली दरवाज्याबरोबरची बेल वाजली. ईशा पाहातच राहिली. समोर सागर होता. दोन टिफीन घेऊन. त्याने तिच्या किचन मधुन प्लेट्स आणल्या. जेवण वाढुन म्हणाला "चला मॅडम, जेवण तयार आहे."

पुढचे पंधरा दिवस रोज सागर दोन टिफीन आणत होता. बोलाताना तिला त्याच्या घरची माहिती समजत होती. सागरने त्याच्या आई वडिलांना गावहुन त्याच्या फ्लॅटवर कायमचे बोलावले होते. गावी जी काय शेती होती ती आता दुसर्‍याला करायला देऊन ते इकडेच कायमचे स्थायीक झाले होते.

ईशा म्हणाली " सागर तुला आई विचारत नाही की रोज डबा कुणासाठी नेतोस ? सागर हसत म्हणाला पहिल्याच दिवशी सांगितल माझे साहेब आजारी आहेत. हे नाही सांगितल त्या बाईसाहेब आहेत. ती हसत म्हणाली मी काय बॉस आहे ? नाहिस म्हणुन काय झाल होशिल एक दिवस तुझी प्रगती पाहता. पण तेव्हा विसरु नकोस. त्याच्या जोकवर ती पण हसत राहिली.

नवले वेळ मिळेल तेव्हा सागरला चिडवायचे लग्न झाल्यावर पुर्वी बायकोला उचलुन मारुतीला प्रदक्षिणा करावी लागे. नव्या जमान्यात मुली नवर्‍यापेक्षा जरा जास्त वजनाच्या आणि क्वचित जास्त वयाच्या असल्याने हे थांबले. पण तुला लेका प्रश्न नाही तिला कस उचलु. मग आता लग्नाच विचार कि तिला. तो अभिजीत बघ कसा गोंडा घोळत असतो सारखा.

सागर हसण्यावारी न्यायचा कारण योग्य वेळच मिळत नव्हती. आज ती आली. सकाळी आल्या आल्या ईशाने सागरला संध्याकाळी जेवायला बोलावले. म्हणालि माझे हिमोग्लोबिन आता नॉर्मल झाले आहे तुझ्या घरच्या टिफीन खाऊन त्यातुन तुझ्या आईची रोज तिळाची चटणी खाऊन. आज मी कुक करणार आहे. सागर हसत म्हणाला "डेट" ? ती म्हणाली येस "डेट विथ ट्रीट"
तुला कुक करता येत तर ? सागर तुला भिती वाटते का ? माझ्या हातच जेवायला ? नाही, पण कशाला त्रास घेतेस ? त्यापेक्षा बाहेरच जाऊ
तिलाही ते आवडल. ईशा म्हणाली माझी कार घेऊन येते. मला आवडत ड्राईव्ह करायला पण या प्रोजेक्ट्मुळे वेळच होत नाही.

संध्याकाळी ईशा जेव्हा त्याच्या घरापाशी पोहोचली तेव्हा बाल्कनीत सागर उभा होता. पांढरा पायजमा, पांढराच लांब शर्ट घातलेले डोक्यावर गांधी टोपी असलेले आणखी कुणीतर त्याच्या शेजारी उभे होते. तिन सागरला मोबाईल वर मेसेज केला. त्याबरोबर तो खाली आला. आजचा सागरचा शर्ट मस्तच होता. त्यावर कॉमेंट करत तीन कार पुढे घेतली. त्याला सिट बेल्ट लावायला सांगत ती म्हणाली " कोण तो नविन मिनिस्टर आलाय ना तेव्हापासुन हे नविन सुरु झालय पुण्याला. पैसे खायला नाविन मार्ग."

ईशा "यु आर वाईझ. या असल्या कॉमेन्ट्स तु देण म्हणजे" हा त्याला काय लागत ? हे ओपन सिक्रेट आहे. महाराष्ट्राची मिनिस्ट्री बनायला का वेळ लागला माहित आहे ? या असल्या खात्यांचे वाटप हा इश्यु होता. सगळी स्टोरी आली होती पेपर मध्ये, ट्रॅफिक पोलिस रोज किती मिळवतो आणि मिनीस्टर ला कोण किती आणि कस पोचवतो याची. कधी कधी वाटत गोळ्या घाल्याव्या साल्यांना"
होल्ड, होल्ड, ईशा कुणाला आणि किती गोळ्या घालशिल? सिस्टीमच खराब झाली आहे.

चल जाऊ दे. मला या हिमोग्लोबिन मुळे अशी चिडचीड होते बहुतेक. ऑफिस मध्ये ज्यांना चिडता येत नाहीना ते अस करतात सागर म्हणाला. खर आहे रे, तो प्रॉडक्शनचा विशाल एक सॅपल आहे. काय बोलतो काही कळत नाही. गैरसमजातुन चुका करतो. साधे कन्सेप्ट समजत नाहीत. पुढ्च्या वेळेला असा काही प्रोजेक्ट आला ना तर मी टेस्ट घेऊनच टिम मेंबर सिले़क्ट करणार आहे.

दोघ बंजारा हिल्स नावच्या रेस्टॉरंटवर पोहोचले. तिन मेन्यु कार्ड त्याच्या पुढे केल. "मॅडम ट्रीट तुम्ही देणार आहात जे मागवाल ते खाऊ" सागर म्हणाला. जन्मभराच कॉट्र्क्ट करायला मी तयार आहे हे वाक्य त्यान आतच दाबल. तिला नाही आवडल तर जेवणाचा मुड नको जायला.

तुझ्या बरोबर बाल्कनीत कोण उभ होत मी आले तेव्हा ? माझे वडील अजुन कोण ?
काय करतात ते ? शेती करत होते. आमची दहा एकर शेती आहे औरंगाबादजवळ सिल्लोड्ला. मी लहानाचा मोठा तिथेच झालो. माझा एन. डी. ए जॉईन करायचा प्लॅन होता बारावी नंतर, पण सिलेक्ट नाही झालो. मग इंजिनियरींग तुझ्या बरोबर.
काय पोर टरकायची तुला कॉलेज मध्ये ? ईशाला ह्सु येत होत.
मी तर तुझ्याशी बोलायला टाळायचो. सागर एका दमात बोलला.

माझ्या आई वडीलांनी मला स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायला लावले यातुन माझी डेव्हलेपमेंट झाली. त्यातुन आमची शाळा बेस्ट होती. आम्हाला मुल - मुली अश्या वेगळ्या ट्रिट्मेंट नव्हतीच त्यामुळे बोल्डनेस आला. मी तर शाळेतच ईव्हेंट मॅनेज करायला शिकले. ईशा बोलत होती सागर ऐकत राहिला होता.

डिनर संपताना सागरने तिला प्रपोज केल म्हणाला यावर विचार कर आणि सांग. मला घाई नाही. मी अस म्हणणार नाही की मी तुझ्याशिवाय जगुच शकणार नाही पण तुझ्याबरोबर आयुष्यभराची साथ करायला मला आवडेल. तु मला नाही म्हणालीस तरी चालेल. हे बोलण आवश्यकच होत्.अन्यथा तुला कस समजल असत ? ईशाने काही बोललीच नाही. हे सर्व तीला अपेक्षीत नव्ह्त. काय बोलाव हे समजत नव्हत.

सोमवार उजाडलाच तो मुळी घाईचा. अभिजीतन ईशाच्या बॉसला तिला बेंगलोरला पाठवायला सांगितल होत काही वर्कींगसाठी. त्यावर तिच्या बॉस ने तीच ईमेल फॉर्वड करत ईशाला प्लेन ने जायला सांगीतल. सकाळी ठरल संध्याकाळी ती बेंगलोरला पोहोचली. दोघ जेवायला गेल्यावर जेव्हा कामच डिस्कशन झाल तेव्हा तिला कळल कामाच्या द्रुष्टीन काहीच अर्जंट नव्हत. तिन डायरेक्ट विचारल हे काय ? या फालतु कामासाठी का बोलावलस ?

तो तिचा हात हातात घेत म्हणाला रागावलीस ? काय करु तुझी खुप आठवण येत होती. मी दुसर्‍या प्रोजे़क्ट्साठी बेंगलोरला आहे अजुन महिनाभर तरी. तिच्या डोळ्यांकडे पहात तो म्हणाला मी तुझ्याशिवाय राहु शकत नाही.
हे काय ? त्यासाठी कंपनीच नुकसान ?
अभिजीत म्हणाला " एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अ‍ॅज वेल इन प्रोजेक्ट." आपल्या हसण्याने आपला होकार त्याच्या पर्यंत पोहोचतोय हे समजायच्या आत ईशा हसली.
"ग्रेट" म्हणजे मी बॅट्ल जिंकल म्हणायच लेटअस सेलिब्रेट वुईथ शॅपेन मोठ्या उत्साहात अभिजीत म्हणाला.

त्याचा उत्साह पाहात ती म्हणाली पण मी अजुन हो म्हणाले नाही. पण नाही तरी कुठे म्हणालिस ? अभिजीत हसत म्हणाला " आजच सेलिब्रेशन त्याच आहे. मला कोणी काँपेटीटर नाही." तिच्या डोळ्यात पुन्हा पाहत तो म्हणाला."हो म्हणशील तेव्हा पुन्हा करु सेलिब्रेट काय ? तीन मान हलवली.

परत येताना तिची सागर आणि अभिजीत यांच्यात तुलना चालु होती. पण प्रोजेक्ट संपेपर्यत कोणताच निर्णय घ्यायचा नाही हा मात्र निर्णय तिन घेतला. अभि़जीत तर एकटी असतामा स्वीट हार्ट शिवाय हाक मारत नव्हता. सागर मात्र त्याच्या मुळच्या स्वभावाने संयमित वागत होता. हा विषय वाढवत नव्हता. अभिजीत व ईशाच्या वागण्यातुन त्याला कल्पना येतच होती.

प्रोजेक्ट संपत आला तेव्हा अभिजीतच्या पुण्यातल्या घरच्या वास्तुशांती निमीत्त असलेल्या जेवणाला त्याने तिला घरी बोलावले. आई- वडीलांशी ओळख करुन देताना म्हणाला हिला या घरी कायमची बोलवायचा प्लॅन आहे. बघुया ही काय करते. ईशाला अभिजीतचे आई- वडील चांगले वाटले. दोघही शिकलेले. नोकरी केलेले त्यामुळे त्यांचे विचार तिला खुपच पुढारलेले वाट्ले. सागरच्या तुलनेत ही पण एक जमेची बाजु होती. सागरचे आई वडील त्या मानाने कमी शिकलेले शेती करणारे आपल्याला काय समजाऊन घेतील हा विचार तिच्या मनात येत होता.

प्रोजेक्ट गो -लाईव्ह सक्सेसफुल झाला. या प्रोजेक्टवर काम करणार्‍यांना आता स्पेशल लिव्ह मिळाली आणि ईशा कोल्हापुरला आई वडिलांकडे आली. आईचा सारखा ससेमिरा होताच काय ग कुठे जमवलस का ? यावेळेला तिच्या चेहेर्‍याचे रंगच तिच्या आईला सांगुन गेले. अग सांग तरी कोण आहे तो ? आता पर्यत ईशाचा निर्णय झाला होता. संयमी लाजरा बुजरा सागर पेक्षा तिने अभिजीतला पंसंत करताना तो आपल्याच फिल्ड मधला, प्रेम करणारा आणि सुशिक्षीत आई वडिलांचा म्हणुन एकुलता एक म्हणुन जास्त विचार केला.

ईशाचा विचार ऐकुन तिच्या आई वडिलांना आनंद झाला. लगेचच तिघे अभिजीतच्या आई वडिलांना भेटायला पुण्याला आले. दोन्ही आई वडीलांनी एकमत करुन लग्न नक्की झाले. ईशाची आई अभिजीत च्या आईला म्हणाली आम्ही दोन्ही मुलिंना मुलासारखे वाढवले. निशा माझी मोठी मुलगी आता लग्न झाल्यावर बेळगाव ला असते. ईशा माझी फारच स्मार्ट, सगळ काही मुलांसारख हिच.हा आमचा जणु मुलगाच आहे. सगळे निर्णय पण तिचे तिच घेते.
"हो हो आम्हाला पण अशिच सुन हवी होती " अभिजीतचे आई वडील म्हणाले
"मला मात्र विचार करायला हवा "अचानक अभिजीतने बोलुन सगळ्यांना धक्का दिला. सगळे अभिजीतच्या पुढ्च्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले. ईशातर रागाने अभिजीतकडे पाहु लागली. रागाऊ नको ईशा आत्ता तुझी आई म्हणाली कि तुझ सगळ पुरुषांसारख आहे. सुप्रिम कोर्ट ने जरी गे मॅरेजला परवानगी दिली तरी मला नाही करायच गे मॅरेज. जोरात हसत अभिजीत म्हणाला. ईशा त्याला मारायाला धावली. त्याच्या जोकवर एकच हास्यकल्लोळ झाला.

ज्या दिवशी अभिजीत च्या वडीलांनी ईशा व अभिजीतला मलेशिया - सिंगापुरच्या ट्रीपचा प्लॅन सांगितला त्याच दिवशी यादोघांनी गोड बातमी त्यांना दिली.

खरतर ईशा व अभिजीत दोघांनी प्लॅनिंग केल होत पण काहितरी चुकल होत. अभिजीत पेक्षा ईशानेच कंटिन्यु करण्याचा निर्णय घेतला होता. अभिजीत म्हणत होता, आत्ताच आपल लग्न झालय पुढे विचार करु. ती ठाम होती कंटिन्यु करण्यावर. मग दोघांनी एकमताने कंटिन्यु करण्याच ठरवल. याबातमीवर अभिजीतच्या आई- वडीलांनी फार प्रतिक्रीया दिली नाही. यात त्यांचा तुटकपणाच जास्त दिसला.

ठरल्या प्रमाणे अभिजीतचे आई वडील मलेशिया - सिंगापुरच्या ट्रीपला गेले. त्याची ट्रीप १५ दिवसांची होती. पाठोपाठ अभिजीत अचानक अमेरिकेला गेला. मधे एकच दिवस गेला आणि तीला पोटात दुखु लागल. डॉ. उषानी तिला आराम करायला सांगुन आणखी काही टेस्ट करायला सांगितल्या. सायंकाळी तिच्या वेदना वाढल्याने ती परत डॉ. उषाच्या हॉस्पिटल मधे आली. डॉ. उषाला सगळी लक्षणे मिसकॅरेजची दिसत होती. डॉ. उषा तिला तपासणार तोच जे घडायचे ते घडले.

मग क्युरेटीन होऊन ती आता विश्रांती घेत होती. जरा झोप लागणार तोच पलिकडच्या बाजुला आवाज येऊ लागले. नवीन पेशंट आला होता. यात एक पुरुषाचा आवाज ओळखीचा वाटत होता. मग एक वयस्कर बाई म्हणत होत्या मी रात्री इथच राहाते. मला डबा आणुन द्या. मग दोन्ही पुरुष गेले. थोड्यावेळाने ड्बा आणुन देऊन पुन्हा गेले. रात्रीचे साधारण १० वाजले होते.

शेजारच्या वयस्कर बाई तिच्या बाजुला आल्या. ईशाला जेवलात का म्हणुन विचारले. ईशा नाही म्हणाली. वाट पाहते आहे मला कोणी आणुन देईल का याची. मी एकटीच आहे. जास्त चव़कशी न करता त्यांनी तिला त्यांच्या डब्यातुन पोळी भाजी आणुन दिली. ईशा संकोचली तेव्हा त्या म्हणाल्या त्यात काय. हा धर्मचा आहे. मग त्यांनी त्यांच्या सुनेलाही हेच झाल्याचे सांगीतले. दोघींना जेवायला देऊन त्या जेवल्या. त्या जाग्या राहुन पाणी विचारत होत्या. दोघींना सारखीच काळजी घेत होत्या.

सकाळी जेव्हा दुसर्‍या दिवशी शेजारच्या पेशंटचा नवरा तिला भेटुन गेला तेव्हा ती झोपली होती. मग पेशंटचे सासरे आले. पायजमा, लांब शर्ट, गांधी टोपी. त्यांनी त्यांचा परिचय करुन दिला तेव्हा तिच्या लक्षात आले की ते सागरचे वडिल आहेत. त्यांच्या बोलाण्यावरुन हे तिच्या लक्षात आले की सागरने आपल्याबद्द्ल काहीच घरी सांगीतले नाही. यामुळे तिला बर वाटले. हे आठ्वत होत की आपण टाळतोय हे पाहुन सागरने तिचा नाद सोडुन लग्न केल. त्याच लग्न आधी झाल. दोघांनीही एकमेकाला लग्नाला बोलवायच टाळल होत.

जेव्हा तिने ती पण सागरच्याच कंपनीत आहे सांगितल त्यानंतर तर आपल्या जवळ कोणी नाही ही भावना संपेल इतकी जवळीक सागरच्या आई वडीलानी दाखवली. सागरचे वडील दोघींना म्हणाले. हा निसर्गाचा नियम आहे. जो गर्भ दोषपुर्ण आहे तो निसर्ग वाढु देत नाही. पण दु:ख करु नका. उन्हाळा झाला की पावसाळा येतोच. पुढच्या वेळी सर्व ठीक होईल. चांगल खा -प्या. हे एक प्रकारच बाळंतपण आहे. पुन्हा शक्ति भरुन यायला हवी.

आता सागरच्या घरुन चांगल्या तुपातला शिरा आला होता. सागरची आई दोघींना जबरदस्तीने एक घास,एक घास करुन खायला लावत होत्या.

दुपारच्या जेवणात जेव्हा तिळाची चटणी आली, त्या म्हणाल्या तीळान रक्त भरुन येत बर का. चटणी घरी गेल्यावर रोज खा. तिला रडु कोसळले. सागरची आई प्रेमाने जवळ येत म्हणाली बाळ का रडतेस. इतका वेळ एकटीन सोसलस आता का धीर सोडतेस ? सकाळचा चहा, नास्टयाला शिरा, जेवण आणि दोन दिवस राहीलीस तरी मी डबा पाठवते हा आग्रह. सर्वकाही जणुकाही ईशा त्यांची जवळची असल्याच्या प्रमाणे चालल होत. अगदी मनापासुन, आणि कोणीही न सांगता.

सागरच्या वडिलांनी त्यांची सुन प्रेग्नंट आहे म्हणुन वर्षानुवर्षाची आषाढ वारी खंडित केली. कारण घरात काही जास्तीची काम करावी लागली तर करण्यासाठी. सागरची आई सांगत होती की सागरच्या वडीलांची पंढरीच्या पांडुरंगावर फार श्रध्दा. गेले पंचविस वर्ष त्यांची आषाढ वारी चुकली नाही. यावेळेला त्यांचा सुनेची बातमी ऐकुन ते म्हणाले अश्यावेळी घरच्या लोकांकडे न पाहता वारीला गेलो तर पांडुरंग पावेल का ? सागरची बायकोतर त्यांच्या काळजी घेण्याने समाधानी होती. माहेरच्या लोकांना घडलेले सावकाश कळवु म्हणत होती.

ईशा विचार करत होती. अल्पशिक्षीत, मागास भागातले, शेतकरी म्हणुन ज्यांचा विचार आपण टाळला ते माणुस म्हणुन उजवे निघाले. या उलट तिचे सासु सासरे यांनी त्यांचा प्रोग्रॅम रद्द करु का असे विचारले ही नाही. जणु त्या गावचेच नसल्यासारखे ते निघुन गेले. एका घटनेने कुणाला चांगले वाईट ठरवता येत नाही पण ती घटना पुढे काय घडणार याची चुणुक मात्र दाखवते. सागर आणि अभिजीत यात माणुस म्हणुन डाव उजव करण्यायेव्हड अंतर तिला दिसल नाही. त्यांची माणस, त्या माणसांची सामाजिक परिस्थीती, शिक्षण याला फार महत्व देत आपण निर्णय घेतला तो चुक तर नाहीना ठरणार ?

गुलमोहर: 

ओह्ह्ह्ह्ह्ह्
आधी मला कळलच नाही की हे माझ नाव वापरल आहे
हे खरतर मी वेंधळेपणात लिहाय्ला हव

माझी रॊयल्टी? नाव वापरल्यावद्दल?

आता त्या जगप्रसीद्ध् सुधाकर, तळीराम वगैरें सारख माझ पण नाव मराठी साहित्यात घेतल जाइल का?
e.g. नितीन यांच्या लेखात ला अभिजित वगैरे????

आणि हि क्रमशः आहे का?
तस असेल तर पुढचा भाग लवकर येउ द्या
आणि जर क्रमशः नसेल तर काहितरी राहुन गेल्यासारख वाटतय.

चांगली लिहीलिये.

एका घटनेने कुणाला चांगले वाईट ठरवता येत नाही पण ती घटना पुढे काय घडणार याची चुणुक मात्र दाखवते<<< तथ्य आहे.

पु. ले. शु Happy

छान आहे आणि अगदी सहज आपल्या आजुबाजुला घडण्यासारखी.
पण अरेंज मॅरेज मधे माणसाने निर्णय घ्यावा तरी कसा? सगळं कसं अध्ह्यारुत असतं.
असो कथा आवडली पु.ले.शु Happy

चांगली लिहीलिये.

एका घटनेने कुणाला चांगले वाईट ठरवता येत नाही पण ती घटना पुढे काय घडणार याची चुणुक मात्र दाखवते<<< तथ्य आहे. Happy

"एका घटनेने कुणाला चांगले वाईट ठरवता येत नाही पण ती घटना पुढे काय घडणार याची चुणुक मात्र दाखवत"..खूप छान लिहिली आहेस कथा..पॅरेग्राफ्स पण छान सुटसुटीत ,छोटेछोटे आहेत त्यामुळे वाचायला सोपं जातयं .
अभि.. ही कथा आहे रे नितीन ची, टी व्ही सीरिअल नाय काय.. उगीच आपले काही बाही प्रसंग निर्माण करून,लांबण लावून चांगल्या कथेची वाट लागते ना!!! माणसाची पारख नसल्यामुळे अश्या चुका घडून येतात आणी मग आयुष्यभर त्या चुकेसकट वाटचाल करणारी असंख्य माणसे समाजात आढळून येतात.

खूप आवडली.
>अल्पशिक्षीत, मागास भागातले, शेतकरी म्हणुन ज्यांचा विचार आपण टाळला ते माणुस म्हणुन उजवे निघाले.><
कटुसत्य!
या चुका अशाच होत राहाणार कां?

फारच विस्कळीत झालीये कथा... चूक असलीच तर ती फक्त दैवाचीच असू शकेल.

सगळ काही ऑलवेल म्हणुन सासु सासरे फॉरेन टुर वर गेले. ईशाचे आई वडील तिच्या मोठ्या बाहिणीच्या बाळंतपणात गुंतलेले.

ईशानेच मग त्याला समजावल. आत्ताशी कुठे दोन महिने होऊन गेले आहेत. मला काहिच त्रास होत नाहीये. आठ दिवसांनी तुझे आई वडील येतील.

ही वाक्ये आणि ही वाक्ये:

या उलट तिचे सासु सासरे यांनी त्यांचा प्रोग्रॅम रद्द करु का असे विचारले ही नाही. जणु त्या गावचेच नसल्यासारखे ते निघुन गेले.

परस्पर विरोधी नाहीत का?

आणि आता इथे लिहिण्याचा सराव झाला असेल तर शुद्धलेखनाच्या चुकाही टाळायला हव्यात.

मंजू.. तू दिलेली वाक्यं जरी परप्सर विरोधी असली तरी ती वेगवेगळ्या वेळेची आहेत. पहिले वाक्य नवरा अमेरिकेला जायच्या वेळचे आहे. आणि दुसरे वाक्य मिस कॅरेज झाल्या नंतरचे आहे..

कथा छान आहे. पण एक मनापासून सांगू का.. या कथेचा शिर्षक "चुक" याशिवाय दुसर काहि देता येईल का? म्हणजे नक्कि मला नाहि सांगता येणार , पण .....

बरी वाटली. राखण आणि बोलकाच्या मानाने एवढी भावली नाही. मनाची पकड घेणारी नसली तरी पण विचारप्रवर्तक आहे मात्र.
आणि हो आता जरा शुद्धलेखन सुधारलं तर तुझ्या कथा वाचताना खडे टोचणार नाहीत.
शीर्षक `चूक' बरोबरच वाटतंय.
ईशाचा भूतकाळ आणि वय लक्षात घेता, तिच्या मनात भविष्याबद्दल साशंकता निर्माण होणं स्वाभाविकच आहे.
पण एखाद्या घटनेवरून आजूबाजूच्यांविषयी, स्वतःच्या निर्णयांविषयी एवढं साशंक होणंही बरोबर नाही. होत होता डोळ्यांवर काळी काच चढली की आजूबाजूची मंडळीही मग विनाकारण काळी दिसायल लागतात, ती असतातच असं नाही.
पण विचार करायला लावणारी कथा आहे एवढं नक्की.
भविष्यातल्या एका दिगंत कीर्तीच्या लेखकाच्या घडणीचे आम्ही साक्षीदार तर नाही ना आहोत!

हिमस्कूल्स, दुसरं वाक्य मिस कॅरेज झाल्या नंतरचे असलं तरी सासू सासरे आधीच निघून गेलेत ना - त्यांना कळायला आणि यायला काही तरी वेळ लागेलच ना?
(ठरल्या प्रमाणे अभिजीतचे आई वडील मलेशिया - सिंगापुरच्या ट्रीपला गेले. त्याची ट्रीप १५ दिवसांची होती. पाठोपाठ अभिजीत अचानक अमेरिकेला गेला. मधे एकच दिवस गेला आणि तीला पोटात दुखु लागल. : हे पहा)

ऑव्हरऑल कथेमध्ये, ती आधीपासूनच अभि कडे अ‍ॅट्रॅक्ट झालेली हे सूचित होतं.. मग त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय स्वाभाविक नाही का? त्यात चूक कसली?

सागर आणि अभिजीत यात माणुस म्हणुन डाव उजव करण्यायेव्हड अंतर तिला दिसल नाही.
>> नवरा चांगला आहे ना? मग बाकीच्यांचा चांगलेपणा बोनस समजावा!

हिंदी चित्रपटांनी 'श्रीमंत हिरॉईन-गरीब हिरो' च्या कथा प्रमोट केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली आयुष्यभराकरता पस्तावल्या - अजूनही पस्तावतात! वास्तव आणि स्वप्नातला फरक कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
माझ्या काही मित्र/मैत्रिणींच्या घरी नवर्‍याला अहोजाहो करणे, सासरी डोक्यावरून पदर घेणे, नणंदा लहान असल्या तरी त्यांच्या पाया पडणे वगैरे प्रकार 'कम्पल्सरी' गटात मोडतात. एखाद्या मुलीच्या हे डोक्यातही जाऊ शकतं! पण एकदा लग्न केल्यावर मग सहन करणे/संघर्ष करणे येवढाच पर्याय रहातो.
(काही गोष्टींमधे आपण तडजोड करू शकतो, काही गोष्टींमध्ये ती शक्यच नसते (व्यक्तीव्यक्तीनुसार)!)
त्यामुळे जेवढी तफावत कमी तेवढा संघर्ष कमी होण्याची शक्यता असेल तर तफावत कमी असलेलं निवडण्याचाच निर्णय सुज्ञपणाचा! (अर्थातच ह्याबरोबर मनाचा कौल ही महत्त्वाचा!)
लग्न हा खूप मोठा निर्णय आहे! तो पटेल त्यानुसारच घ्यावा! नवरा चांगला असेल तर बाकीचं सगळं सोडून द्यावं.

मला कथा मनापासुन आवड्ली.
चुक हे शिर्षक हि मस्त आहे.
कारण खरच जेव्हा ति गरोदर आहे कळल तेव्हा इशा चे सासु सासरे घरी राहण भाग होत.
तिला या परिस्थीत एकट सोडुन जाण, नाहि पट्ल मला.
या उलट सागर च्या वडिलानी पन्ढरपुरची वारी चुकवलि यावरुनच त्यान्च प्रेम आणि आपुलकि सिद्ध होते.
ते म्हण्तात ना की,
गरिबाची भाकरी बरी पण श्रीमन्ताची चाकरी नको. हेच खर.

कथा छान आहे .कुठलाहि माणुस निर्णय हा त्यावेळेच्या परिस्थितिप्रमाणे घेतो. त्यामुळे तो चुकिचा कि बरोबर हे नंतरच समजते.

चूक हे शीर्षक नाही बरोबर वाटत . खर सांगायचं तर सासरची माणस कशी निघतील हे कधीच सांगता येत नाही, पण आपण मात्र आहे ती परिस्थिती स्वीकारायची असते कारण काळ हे वाईट परिस्थिती साठी उत्तम औषध असत .