रान...

Submitted by विमुक्त on 17 March, 2010 - 00:57

"अरं ये अंत्या! कसली धावपळ चाल्लीय इतक्या रातच्याला?" राम्या
"अरं, आपला गण्या सकाळी गुरं चरायला घेऊन गेलता रानात... समंधी गुरं आली, पर गण्याचा काय पत्याच न्हाय अजून... आम्ही चार-पाचजण जरा बघून येतो रानात..." अंत्या

जांभळी गाव जवळच्या शहरापासून किमान १६ मैल दूर... ३०-४० घरांची वस्ती... पावसाळ्यात पोटापुरता भात पीकतो आणि दुध, तुप, रानातला मध असं काहीतरी शहरात विकून गावकरी तिकट-मिठाची सोय करतात... गुरांना चरायला अख्खं रान आहेच... गावाच्या जवळपास लाकुडतोडी मुळं रान जरा कमी झालयं, पण जरा आत शिरलं की एकदम दाट रान लागतं... रानातुन वाहणारी कुकडी नदी म्हणजे रानाची नस... कातळ चिरत कुकडी डोंगरावरुन उडी घेते... कुकडीची दरी खूप खोल... सरळसोट तुटलेले कडे... दरीत डोकवावं तर नजर तळापर्यंत पोहचतच नाही... एकदम दाट झाडी, हे उंच उंच रुख... त्यावर मनगटा एवढ्या जाड वेलींच जणू जाळंच पसरलयं रानभर... दिवसा-उजेडी सुध्दा प्रकाश किरण जमीनीला शिवत नाही, जणू ह्या रानात दिवस उजेडतच नाही... रान एकदम जिवंत... ससे, भेकरं, डुकरं, साप, अस्वल, तरस अशी सगळी जनावरं आहेत... वाघाचा पण वावर आहे... गेली कित्येक युगं हे रान असंच आहे... गावतलं कुणी ह्या रानात अजिबात फिरकत नाही...

सकाळी उठल्यावर राम्याला कळालं, की गण्या अजून सापडला नाही... हात-तोंड धुवून राम्या अंत्याच्या घरी पोहचला...
"अंत्या, काय रं... काय झालं रातच्याला?..."
"लय हुडकलं... पण गण्याचा काय मागमुसच न्हायी... कुठं गेलं काय म्हाईत..."
"आता! रान काय त्याला नवं न्हाय, रोजचच हाये... असं कुठं जाईल?... जनीला काय सांगून गेलता का?"
"हां! जनी म्हनली की पार रानात जानार हुता... अळंबी शोधाया... म्या म्हंतो, आपल्या हीरीच्या मागं आहे की बख्खळ अळंबी!... कश्यापाई जायाचं इतक्या रानात?..."
"म्हंजी पार आत रानात गेलता तर... मग वाघरु तर नसंल?..."
"काय सांगावं आता... पण जंगली जनावरं सोडून मानुस कश्यापाई?..."
"जखमी असंल वाघरु... माणुस म्हणजे आयती शिकार, मग कश्याला जनावरांच्या मागं पळतय वाघरु... नाहीतरी गण्या एकटाच व्हता... साधला असंल डाव त्यानं तवा..."
"असंल बी... आता परत चाल्लोय आम्ही सम्दी... तु पण चल ह्या खेपंला..."

पार अंधार पडे पर्यंत गावकऱ्यांनी रान पालथं घातलं, पण गण्याचा काहीच पत्ता नव्हता... कुठं कुठं म्हणून शोधणार?... आत पार रानात दरी जवळ जायला कुणी तयार होईना... अजून पुढचे दोन दिवस प्रयत्न करुन पण काही कळेना म्हंटल्यावर गावकऱ्यांनी शोध थांबवला... कुणी म्हणालं "कुठं दरीत पडला असणार..." तर कुणी "वाघानं खाल्ला असणार..." पण नक्की काय झालं हे कुणालाच कळेना... एक-दोन दिवस गावात चर्चा झाली आणि मग सगळे रोजच्या कामात व्यस्त झाले... पण वाघाचा विचार काय राम्याच्या डोक्यातून जात नव्हता...

‘राम गणपत वरे’ म्हणजे राम्या... अजिबात कश्याची डर नाही गड्याला... रानाची तर नाहीच... घरी म्हातारा-म्हातारी आणि हा, असे तिघेच... रानावर, झांडांवर, जनावरांवर त्याचा फार जीव... आपल्या पेक्षा हे सगळं वेगळं असं त्याला कधी वाटलंच नाही... खळखळणारे ओढे, वाऱ्यावर डुलणारी झाडं, पक्षी, जनावरं असं सारं रान आपल्याशी बोलतयं असंच त्याला वाटे... राम्याला रानाचं अभय आहे असं सारं गाव म्हणतं...

गावाच्या मागच्या बाजूला हनुमानाचं देऊळ... तिथून जवळच विहिर, मग जरा चढ आणि पुढे सगळं जंगल... पाण्यासाठी अंत्याची बायको सगुणा, तीची शेजारणींन रमा आणि गावच्या पाटलाची पोर राणी अश्या तिघी संध्याकाळी विहिरीवर आल्या... पाणी भरुन हांडे-कळश्या सावरीत गप्पा मारीत सगुणा आणि रमा घराकडे वळल्या... राणी अजून विहिरी जवळच होती... खाली वाकून कळशीत पाणी भरत होती आणि तितक्यात राणीच्या किंचाळण्याचा आवाज आला... सगुणा आणि रमानं मागे वळून पाहिलं तर ढाण्या वाघ राणीला ओरफडत जंगलात घुसत होता... "वाचवा! वाघ वाचवा!" ओरडत सगुणा आणि रमा गावात शिरल्या... लगेचच कोयते, कुह्राडी घेऊन राम्या आणि इतर गावकरी जंगला कडे धावले... विहिरीच्या मागे जंगलात शिरले... गावकऱ्यांच्या ओरडण्यानं सारं जंगल दणाणलं... खुणांच्या मागे धावत गावकरी झुडपात शिरले... तर झुडपात साधारण ३०-४० हात दुर राणीच शरीरं आणि त्याच्या बाजूला बसलेला वाघ दिसला... जिभलीनं मिश्या चाटीत वाघ रागात डुरकत होता... कसलाच विचार न करता राम्यानं कोयता उगारला आणि वाघाकडे झेप घेतली... राम्याच्या मागे गावकरी पण वाघाच्या अंगावर धावले... वाघ अजूनच जोरात गरजला... पण कुणी गावकरी माघार घेईना... मग वाघानेच माघार घेतली आणि लंगडत झुडपाच्या मागे नाहिसा झाला... राणी शुध्दीवर नव्हती पण श्वास मात्र चालू होता... डाव्या खांद्याच्या इथे वाघानं धरलं होतं... खांद्या ऐवजी मानगुट धरलं असतं तर राणी जगली नसती...

"माजलयं जणू!... सारं जंगल कमी पडलं व्हय चरायां?... माझ्या लेकीवर कश्यापाई त्याचा डोळा?..." पाटील
"पाटील, वाघरु जखमी हाये... लंगडत व्हतं... शिकार मिळत नसंल म्हणून गावाकडं फिरकलय..." अंत्या
"गण्याला जावून झालं ना ४-५ दिस?... परत भुक लागली आणि वाघरु गावाकडं वळालं..." राम्या
"आता आजच जातो तालुक्याला आणि साहेबाशी बोलतो... एखादा शिकारी येईल बंदुक घेऊन आणि लांवल त्याचा निकाल..." पाटील

"तालुक्याहून शिकारी येणार आणि सगळ हुणार म्हंजी अजून १०-१५ दिस जाणार... वाघरु भुकेलेलं हाये... इतके दिस थांबून जमायचं न्हाय... आपणच काय ते केलं पाहिजे..." असं राम्या अंत्याला सांगत होता...
दुसऱ्या दिवशी दुपार नंतर एक बकरु घेऊन राम्या आणि अंत्या रानात पोहचले... मोक्याची जागा निवडली... पठार संपून झाडी सुरु होते अशा जागी एका झाडाखाली बकरी बांधून ठेवली... राम्या त्याच झाडावर भाला घेऊन वाघाची वाट बघणार आणि अंत्या शेजारच्या झाडावर... वाघाने बकरीवर झडप घालताच राम्या वरुन भाला घेऊन वाघाच्या मानगुटीवर झेप घेणार... तोपर्यंत अंत्या शेजारच्या झाडावरुन वाघावर मागून वार करणार... असा बेत होता...

"पण माणसाचा वास लागल्यावर वाघरु जवळ येईल का?.." अंत्या.
"तं काय झालं... गावकडं नाही का फिरकलं?... सोपी शिकार नाही सोडणार त्यो..." राम्या

राम्या आणि अंत्या आपापल्या जागेवर तयार होते... हळूहळू सुर्य कलू लागला... जंगलात फार लवकर अंधारुन येतं... सुर्य मावळताच पक्ष्यांचे आवज बंद झाले आणि रातकिड्यांच्या आवाजानं रान घुमु लागलं... काळोख पडताच बकरीचं मेमणं वाढलं... जमीनीवर साप-सरड्यांची हालचाल सुरु झाली... राम्याचं सारं ध्यान भवतालच्या हालचालींवर होतं... जरा जरी कुठं आवाज झाला की राम्याच्या छातीची धडधड वाढत होती... भाल्यावरची पकड घट्ट होत होती... उडी घ्यायला राम्या सज्ज होत होता...
मग अचानक झाडाच्या मागे झुडपात थोडी हालचाल झाली... राम्याचं ध्यान तिथं गेलं... हालचाल जरा वाढली आणि लगेचच फडफड असा पंखाचा आवाज झाला... घरटं सोडून शिकारी साठी रातवा बाहेर पडला होता...
मधूनच कुठूनतरी तरस, भेकरं, कोल्ह्यांचा आवाज होत होता... तेवढ्या पुरता आवाज व्हायचा आणि मग परत किर्रर्र्र शांतता... मध्य रात्र उलटून गेली... बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती... आणि एकदमच बकरीच मेमणं वाढलं... सारं लक्ष एकवटून राम्या भवतालचा अंदाज घेऊ लागला... थोड्या दूर झाडीत हालचाल झाली... दोन डोळे चमकू लागले... राम्याच्या कपाळावर घाम साठलां, आठ्या पडल्या आणि घामाचे थेंब नाकावरुन खाली टपकू लागले... हलक्या पावलांनी ते दोन डोळे पुढे सरकले... बकरु धडपडू लागलं जिवाच्या आकांतानी ओरडू लागलं... राम्याच अंग जरा कापू लागलं... त्याला काहीच ऐकू येईना झालं, सारं ध्यान त्या दोन डोळ्यांवर एकवटलं होतं... पुढच्याच क्षणी वाघानं बकरीवर विजेप्रमाणं झेप घेतली... वाघाच्या जबड्यातून निसटण्यासाठी बकरीनं शेवटची धडपड केली आणि तितक्यात राम्यानं वाघाच्या मानगुटीवर उडी घेतली... वाघानं प्रचंड मोठी डरकाळी फोडली... वार एकदम अचूक बसला... भाला वाघाच्या मानेतून आरपार गेला, रक्ताच्या धारा वाहू लागल्या... वाघ वेदनेमुळे केवीलवाण्या आवाजात डुरकू लागला... जखमी अवस्थेत पुढच्या पंजांनी वाघ राम्यावर झेपावला... राम्या भाल्यानं वाघावर वार करतच होता आणि तेवढ्यात अंत्या पण वाघावर वार करु लागला... राम्याच्या छातीतून, दंडातून रक्त ओघळू लागलं... राम्याचं आणि वाघाचं रक्त मिसळू लागलं... वाघ आणि राम्या झगडत होते... वाघाच्या पंजानी राम्याच्या मनगटाचे, खांद्याचे पार चिंध्या केल्या तरीपण राम्या वाघावर वार करत होता आणि तेवढ्यात अंत्यानं पुन्हा एकदा वाघाच्या मानेतून भाला आरपार केला... वाघानं शेवटची डरकाळी फोडली आणि शरीर जमीनीवर भिरकावलं... तडफडला आणि शेवटचा श्वास सोडला... राम्या त्याच्या बाजूलाच पडला होता... वाघरासाठी राम्याच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली... ‘जनावरांवर राम्याचा भलता जीव... हा तर जंगलाचा राजा... जखमी झाला आणि गावाकडं फिरकला... गावतल्या लहानग्यांवर हल्ला केला... मारला नसता तर गावकऱ्यांच्या जिवाला धोका होता...’

राणीवर हल्ला करणारा वाघ मारला गेला म्हणून गावकरी जरा निर्धास्त झाले... पण गण्याला ह्या वाघानंच मारलं का?...

एका आठवड्यात राम्याच्या जखमा भरु लागल्या... एका दुपारी राम्या घराच्या पडवीवर निजला होता... राम्याचा म्हातारा सकाळीच गुरं चरायला घेऊन जंगलात गेलता... गुरं चरायला लावून म्हातारा झाडाखाली थोडावेळ आडवा झाला... उठल्यावर आवाज देऊन गुरं जमवली तर एक कालवड दिसेना... आवाज देत रानात शिरला... बरंच आत गेल्यावर कालवड दिसली... रानात गोंधळल्या मुळं केवीलवाण्या आवाजात हंबरत होती... तीला हाकत परतताना म्हाताऱ्यांन काहीतरी ऐकलं... तो दचकला आणि भलत्या घाईनं सगळी गुरं घेऊन घरी पोहचला... म्हाताऱ्याला अस्वस्थ बघून राम्यानं विचारलं...

"काय रं बा... काय झालं?... इतका कश्यापाई दचकलाईस्?..."
घडलेल्या घटने बद्दल म्हाताऱ्यानं राम्याला सांगीतलं, पण म्हातारा खूपच अस्वस्थ वाटत होता...
"कसला आवाज?... इतका का घाबरलाईस्?..." असं बरच काही राम्या विचारु लागला...
म्हातारा काही बोलला नाही... नुसती नकारार्थी मान हलवून पडवीच्या कोपऱ्यात जावून बसला... राम्यानं पुन्हा-पुन्हा विचारलं तरी म्हातारा काही बोलेना... ह्यापुर्वी देखील असंच काहीतरी घडलं होतं... त्यावेळी सुध्दा तो काहीच बोलला नव्हता... ‘असं काय आपल्या बानं ऐकलं की त्यो इतका घाबरलाय’ हे राम्याला जाणून घ्यायचं होतं...

दुसऱ्या दिवशी सकाळीच कोयती कंबरेला अडकवून राम्या रानाकडं निघाला... पाच-सहा तास चालल्यावर तो दरी जवळ पोहचला... दरी भोवतीच्या रानात गच्च झाडी, वेली, काटेकुटे, पालापाचोळा ह्यामुळं एक-एक पाऊल मोठ्या जिद्दीनं टाकावं लागत होतं... पावलोपावली अंग खरचडत होतं... रानाशी झगडत राम्या भटकत होता... मधेच विचार आला की दरीत उतरुन बघायला हवं, पण ते शक्य नव्हतं... कारण दरीत उतरायला वाट नव्हती... असणार तरी कशी? अजून पर्यंत कुणीच दरीत उतरलं नव्हतं... जंगली जनावरांचे वेगवेगळे आवाज रानभर घुमत होते... बरेचसे आवाज राम्याला देखील नविन होते... कोयतीनं वेली, झुडपं छाटीत राम्या पुढं सरकत होता... वेगळीच शांतता राम्याला जाणवू लागली... तिथल्या रानव्यानं त्याला भुल घातली... वेळेचं भान त्याला राहिलं नाही... काळोख पडू लागलां तसं तो भानावर आला आणि झपाझप रान कापीत गावाच्या दिशेने चालू लागला... तसं पाहिलं तर राम्या म्हणजे रानातलंच पाखरु पण हे रान निराळं आणि अंधारल्यामुळे जणू सारं रान खायला उठलं होतं... रान तुडवीत राम्या गावाकडं सरकत होता आणि तितक्यात एकदमच त्याला शीळ ऐकू आली... राम्या जागीच घट्ट झाला, शीळेच्या दिशेने पाहू लागला, पण काहीच हालचाल दिसेना... शीळ खूप दिर्घ आणि खोल होती... कोण्या पक्ष्याची असणं शक्यच नव्हतं... पुन्हा तशीच शीळ राम्याच्या कानी पडली... अंधारल्यामुळे राम्याला स्पष्ट दिसेना तरी तो शीळ येत होती त्या दिशेने चालू लागला... परत शीळ ऐकू आली... ह्या वेळेस फारच जवळून कुणीतरी शीळ घालत होतं... तेवढ्यात राम्याला पायाजवळ हालचाल जाणवली... काही कळायच्या आतच राम्याचे पाय वेटोळ्यात अडकले... राम्याची धडपड सुरु झाली, पण काहीच फायदा झाला नाही... विजेच्या गतीनं वेटोळ्यांनी राम्याला छाती पर्यंत जखडलं... राम्याला श्वास घेता येईना, त्याची शुध्द हरपू लागली आणि तेवढ्यात राम्याला त्याचं प्रतीबिंब समोरच्या दोन डोळ्यात दिसलं... वेटोळ्यांची पकड वाढली... ते दोन डोळे राम्याच्या डोक्यावर स्थीरावले आणि तोंड संपुर्ण फाकवून नागीणीनं राम्याला गीळायला सुरुवात केली... राम्याचं डोकं नागीणीच्या जबड्यात होतं आणि हळूहळू राम्याच अख्खं शरीर नागीणीनं गीळलं आणि नागीण तिथंच पडून राहिली...

घरी राम्याची म्हातारी वाट बघत होती... रात्र उलटून गेली तरी लेकरु आलं नाही म्हंटल्यावर म्हातारा-म्हातारीचा जीव कासावीस झाला... म्हातारीचं रडणं सुरु झालं कारण आज पर्यंत त्या जंगलात रात्र काढून कुणीच परत आलं नव्हतं... म्हातारा स्वतालाच शिव्या देऊ लागला...
"म्या त्याला समंद सांगाया हवं होतं... आता रातीच्या येळी त्या वंगाळ रानात त्याचा निभाव कसा लागायचा... म्या काल शीळ ऐकली... ती नागीणीचीच व्हती... हा त्यांचा विणीचा काळ... विणीच्या काळात नर-माद्या शीळ घालून एकमेकांना शोधीत्यात... ह्या काळात त्यांची भुक पण वाढते... पण हे समंद त्याला सांगीतलं असतं तर त्यो रानात गेला असता... त्यानं रानात जाऊ नये अन् काई घडू नये म्हणून म्या गप्प व्हतो... तर समंद इपरीतच घडलं..."

पहाट होताच जंगलात ऊब वाढली आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला... हळुहळू राम्या शुध्दीवर येऊ लागला... सारं अंग चिकट झालं होतं... त्यातुन फारच उग्र वास येत होता... भानावर येताच राम्याला जाणवलं की पोट चिरुन मेलेल्या नागीणीच्या देहावर तो पडलाय... कालच्या रात्रीचं त्याला आठवलं, पण आपण जिवतं कसे हे त्याला उमगेना आणि ह्या नागीणीला कुणी मारलं? हे ही कळेना... जरा जमीनीचा आधार घेत राम्या उभा राहिला... त्याचं लक्ष कमरेवरच्या कोयती कडे गेलं आणि आपण का जगलो हे त्याला उमगलं... नागीण राम्याला गीळत असताना कमरेला अडकवलेल्या कोयतीनं नागीणीच पोट चिरत गेलं आणि राम्या वाचला... राम्याला रानाचं खरच अभय होतं...

गावाच्या दिशेने राम्या चालू लागला... घडल्या प्रकारा बद्दल तो फारच अचंबित होता, पण ‘नागीण शीळ घालते?... म्हाताऱ्यानं हीच शीळ ऐकली होती का?... ह्या रानात अजून काय काय असेल?... गण्याचं काय झालं?... वाघनं खाल्लं की नागीणीनं गीळलं?...’ अश्या अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात जन्म घेतला...

समाप्त
(कथा पुर्णपणे काल्पनीक आहे...)

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

गुलमोहर: 

छाने

मस्तच आहे. विषय आणि शैली दोन्ही छान! गण्याच काय झाल? पुढच्या भागात टाकाल अस वाटल तर कथा समाप्त झाली अस दिसल.

मस्तच कथा!!! रानाचं आणि तिथल्या वातावरणाचं वर्णन अतिशय उत्तम रित्या जमलं आहे. खुप आवडली..लिहीत रहा!! शुभेच्छा Happy

ह्या कथेचा पुढचा भाग अजूनतरी डोक्यात तयार नाही, म्हणून समाप्त असं लिहिलयं... नीट सुचलं तर नक्की लिहितो पुढचा भाग...