मी पाहीलेला अवतार!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या बर्‍याच मित्रांनी शिफारस केल्यावर व मिडियामधल्या या चित्रपटाच्या "महानतेच्या" वावड्या उठलेल्या ऐकुन मीही जगातल्या कोट्यावधी प्रेक्षकांसारखा "अवतार-३-डी" चित्रपट बघण्याच्या मोहात पडलो व प्रचंड करमणुक झाली!

हॉलिवुडच्या अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे नाव चक्क... अवतार.. असे अस्सल मराठमोळी असल्यामुळे खर म्हणजे या चित्रपटाबद्दल न बघताच आधीपासुनच आपुलकी निर्माण झाली होती व त्यात या चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन हा असल्यामुळे हाही चित्रपट त्याच्या या आधिच्या.. मला प्रचंड आवडलेल्या.. टर्मिनेटर २ व टायटॅनिक... या २ चित्रपटांइतकाच चांगला असावा असा माझा होका होता.त्यात भर म्हणजे जाणकार समिक्षकांनी असे भाकीत वर्तवले होते की यापुढे हॉलिवुड फक्त ३-डी चित्रपटच काढतील व हा चित्रपट म्हणजे ३ डी- तंत्रज्ञानातला एक हिरा आहे हिरा!

पण कसचे काय आणी कसचे काय! चित्रपट पाहुन झाल्यावर १० डॉलर वाया गेल्याच्या दु:खापेक्षा जेम्स कॅमेरुन या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाने या चित्रपटाची पटकथा नक्कीच काहीतरी स्मोक करत असताना लिहीली असावी या विचाराचे शल्य मनाला जास्त जाचत होते. खर म्हणजे मायबोलीवर फारेंड किंवा श्रद्धा के.. यांचे या चित्रपटाबद्दलचे विवेचन.. अचाट व अतर्क्य चित्रपट.. विभागात.. अजुन आले नाही याचे मला आश्चर्यच वाटते.

तर मंडळी.. तर आता या चित्रपटाबद्दल...

चित्रपटाची कथा इसविसन २१५० च्या आसपासची . कुठल्यातरी पँडोरा नावाच्या परग्रहावर न्हावि(का नाव्ही) नावाची जमात राहात असते. कसा कुणास ठाउक पण त्या ग्रहावर एक अतिशय मौल्यवान खनीज असल्याचा सुगावा अमेरिकेच्या एका लालची कॉर्पोरेशनला लागतो व त्या खनिज प्राप्तीसाठी ती कंपनी एका खाजगी मिलिटरी ब्रिगेडला त्या परग्रहावर अद्ययावत शस्त्र व विमाने घेउन पाठवते. पण हिंसेचा मार्ग अवलंबुन ते खनिज मिळवायच्या आधी सिगोर्नी विव्हरच्या हुशार (?) नेत्रुत्वाखाली एक शास्त्रज्ञांची तुकडी असा प्रयत्न करत असते की पृथ्विवरच्या काही मानवांना त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्यांसारख्या अवतारात रुपांतरीत करायचे व त्या अवतारात मग ते न्हावी-रुपी मानव त्या पँडोरा ग्रहावरच्या खर्‍या न्हाव्यांमधे मिसळुन त्यांच्याशी मैत्री करतील व त्यांचा संहार न करता त्यांच्या ग्रहावरचे ते मौल्यवान खनीज हासील करतील! म्हणजे प्लान अ- मैत्री प्लान! व तो असफल झाला तर प्लान ब.. मिलिटरी प्लान.! आल का लक्षात?

तर आता त्या पँडोरा ग्रहावरचे हे न्हावी कसे दिसतात? तर ते पार्ट चित्ता- पार्ट मांजर.. पार्ट मानव.. तर पार्ट स्टार ट्रेक मधल्या मि. स्पॉक सारखे लांब कान असलेले.. नऊ फुटी.. निळ्या रंगाचे व भली मोठी शेपटी असलेले व टारझन सारखे कपडे(?) घालत असलेले. बर ती त्यांची शेपटी काही साधीसुधी नसते.. त्या शेपटीच्या टोकाला असे वळवळणारे अतिशय संवेदनाक्षम केस असतात. त्या शेपटीच्या टोकावरच्या त्या वळवळणार्‍या केसांचे प्रयोजन आताच सांगत नाही.

बर ते दिसतात कसे ते तुम्हाला कळले. पण ते त्या ग्रहावर दिवसभर करतात तरी काय? त्याचे उत्तर थोडक्यात म्हणजे काहीही नाही! त्या ग्रहावर एक प्रचंड मोठे झाड असते( साधारणपणे मैल दोन मैल उंच व मैल दोन मैल रुंद) ज्याला असंख्य फांद्या असतात. हे सर्व न्हावी लोक त्या झाडावर व त्या झाडाच्या पायथ्याशी वस्ती करुन असतात. दिवसभर या झाडांच्या फांद्यांवरुन वर खाली व इकडुन तिकडे उगाचच विहार करत राहायचे हा यांचा उद्योग! बर मग झाडांच्या फांद्यांवर बागडायचा कंटाळा आला तर त्या ग्रहावर एकशिंगी व विचित्र दिसणारे अवाढव्य घोडे(?) असतात. त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्याला एक एक घोडा असतो. बर घोड्यावर बसुन रपेट मारायची इच्छा झाली तर मग आपला आपला घोडा कसा ओळखायचा? तर मंड़ळी.. तिथे मग या न्हाव्यांच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस उपयोगी पडतात! कारण या घोडारुपी प्राण्याच्या शेपटीच्या टोकालाही तसेच वळवळणारे संवेदनाशील केस असतात. व मग प्रत्येक न्हाव्याने मग आपली शेपटी व घोडारुपी प्राण्याची शेपटी जवळ आणायची. जर तो घोडारुपी प्राणी त्या न्हाव्यासाठी राखुन ठेवला असेल तर त्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस व त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेले वळवळणारे केस....एकमेकात मिसळुन त्याची एक घट्ट गाठ तयार होते व तसे त्या घोडारुपी प्राण्याबरोबर बाँडींग झाले की मग तो घोडारुपी प्राणी खिदळत तुम्हाला त्या ग्रहावरची एक वाइल्ड राइड देतो.

बर कोणाला जर घोड्याची राइड आवडत नसेल तर तश्या न्हाव्यांसाठी मग त्या ग्रहावर डायनोसोअर्/गरूडरुपी पक्षीही विहार करत असतात. आता तुम्ही चतुर असाल तर ओळखल असेलच की त्या डायनोसोअर्/गरुडरुपी पक्ष्यावर राइड हवी असेल तर त्याच्याही शेपटीच्या टोकावर तेच वळव़ळवळणारे केस असतात व त्या ग्रहावरच्या प्रत्येक न्हाव्यासाठी एक गरुडरुपी डायनोसोअर राखुन ठेवला असतो की ज्याच्या शेपटीच्या टोकावरचे वळवळणारे केस त्या त्या न्हाव्याच्या शेपटीच्या टोकाला असलेल्या वळवळणार्‍या केसांशी घट्ट गाठ बांधतात. मग अशी घट्ट गाठ तयार झाल्यावर मग ते न्हावी सर्व ग्रहभर वाइल्ड राइड घेत विहार करतात. म्हणजे ती गाठ बहुतेक प्रुथ्वीवरच्या कारमधे असलेल्या सिट बेल्टचे काम करत असावी बहुतेक.. पडु बिडू नये म्हणुन! आणी एक... जर चुकुन एखादा न्हावी भलत्याच गरुडरुपी डायनोसोअरवर आरुढ व्हायला गेला तर तो गरुडरुपी डायनोसोअर.. त्या न्हाव्याचा जिव घ्यायलाच अंगावर येतो बर का... ते बघुन मला अशी कल्पना आली की प्रुथ्विवर सुद्धा आपल्या कार असे करु लागल्या तर? मालकाव्यतिरिक्त जर कोणी कारमधे बसायला गेले तर गाडी चवताळुन चालु होउन त्या चोराच्या अंगावर वेगात चालुन गेली तर कार थेफ्टचा प्रश्नच मिटेल!असो.

तर आता मुख्य प्रश्न असा की पृथ्वीवरच्या मानवाला त्या पँडोरा ग्रहावरच्या न्हाव्याचा अवतार कसा द्यायचा? इथे सिगोर्नी विव्हररुपी शास्त्रज्ञाची हुशारी दिसुन येते. तिने एक अद्ययावत शवपेटिका बनवली असते. त्या शवपेटीकेच्या आत असंख्य बटने,लाइट व वायर्स असतात. बाहेरही काही बटने असतात. पँडोरा ग्रहावर एका वातानुकुलीत व ऑक्सिजनयुक्त अश्या बंदिस्त लॅबमधे असलेल्या शवपेटीकेत मानवाने जाउन मग झोपायचे. मग बाहेरुन ती शवपेटीका बंद केली जाते व काही बटने दाबली व वरखाली केली की आतला मानव न्हावीरुपी अवतारात पँडोरा ग्रहावर.. त्या लॅबच्या बाहेर.. अवतिर्ण होतो! वाला! बर गंमत अशी की तिथल्या प्राणवायु नसलेल्या वातावरणात न्हाविरुपी मानवाच्या अवताराला प्राणवायुची जरुरी लागत नाही! पण जर का त्या शवपेटिकेच्या बाहेर असलेल्या बटनांची उघडझाप जर केलीत तर तात्काळ तो न्हावीरुपी मानव बाहेर त्या ग्रहावरच्या ऑक्सिजन विरहीत वातावरणात बेशुद्ध(का मरुन?
) होउन पडतो!

तर अश्या रितीने चित्रपटाचा नायक.. पॅंडोरा ग्रहावर.. न्हावीरुपी अवतार घेउन त्यांच्याशी मैत्री करायला जातो. पण तिथल्या एका न्हावी मुलीशी त्याची जरा जास्तच जवळची मैत्री होते व त्याचे ह्रुदयपालट होते. ज्या भाडोत्री मिलिटरीने त्याला त्या ग्रहावरच्या न्हाव्यांचे सिक्रेट काढायला पाठवले असते.. की बाबा ती लोक राहतात ते झाड कोती मोठे आहे त्याची पाळमुळ किती खोलवर आहेत.. ते खनीज त्या झाडाच्या किती खाली दडलेले आहे.. इत्यादी आवश्यक माहीती काढायच्या ऐवजी हा हिरो त्या न्हावी लोकांमधे एवढा मिसळुन जातो व त्या लोकांच्या घोडारुपी प्राण्याच्या राइडला व गरुडरुपी डायनोसोअरच्या वाइल्ड राइडवर व अर्थात सर्वात मुख्य म्हणजे त्या न्ह्वावीलोकातल्या एका सुंदरीवर तो इतका भाळतो की तो स्वतःला न्हावीच समजायला लागतो!

आणी मग सर्वात शेवटी कॅमेरुनच्या वाइल्ड इमॅजिनेशनचा कहर म्हणजे ह्रुदयपालट झालेला हा नायक.. त्या ग्रहावरच्या न्हावी लोकांना पृथ्वीवरुन आलेल्या भाडोत्री मिलिटरीशी लढाई करायला सज्ज करतो! त्या लढाइत मग २१५० मधल्या पृथ्विवरच्या मॉडर्न बॉन्बर्स व इतर अद्ययावत मिलिटरी शस्त्रास्त्रांचा मुकाबला मग तो नायक व न्हावी लोक त्या ग्रहावरच्या गरुडरुपी डायनोसोअरांची मदत घेउन करतात. त्या घनघोर युद्धात मग चक्क ते गरुडरुपी डायनोसोअर त्या मॉडर्न बॉन्बर्सना आपल्या पायात पकडुन.. हलवुन हलवुन.. त्यांचा बॅलंस बिघडवुन खाली पाडतात. अशी विजयश्री खेचुन आणल्यावर हा हिरो मग त्याचे स्पिरिट्(आत्मा?) त्याच्या अवताररुपी न्हाव्यामधे धारण करुन त्यांच्यातलाच एक न्हावी म्हणुन तिथे त्या ग्रहावरच त्यांच्यात विलीन होतो व त्याचा अवतार अवतार न राहता तो खराच न्हावीरुपी अवतार बनतो!

कसले जबरी व ग्रेट इमॅजिनेशन आहे जेम्स कॅमेरुनचे! मानल पाहीजे!( मला वाटते त्याने त्याच्या ४-५ वर्षाच्या नातवाला वगैरे हाताखाली घेउन ही कथा लिहीली असावी किंवा काहीतरी स्मोक करत असताना तरी ही महान कथा त्याने लिहीली असावी किंवा साठाव्याच वर्षात त्याचा बुद्धीभ्रंश झाला असावा अशी मला दाट शंका येते! )

( आता या वाइल्ड इमॅजिनरी कथेमधे अहिंसा, एकोपा,पिसफुल स्पिरिट,मानवाची ग्रिड्,हिंसा,प्रेम वगैरे वगैरे प्रतिकाम्त्मक रित्या दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे पण मला तर या चित्रपटात फक्त (तर्कशुन्य! माइंड यु!) वाइल्ड इमॅजिनेशनच दिसले Sad )

हे वाचल्यावरही जर का कोंणाला हा चित्रपट बघायचा असेल तर एक व्हिडिओ गेम बघायला जात आहोत असे समजुन फक्त ३-डि मुव्हीच बघा. तेवढेच स्पेशल इफेक्ट्स बघीतल्याचे समाधान तरी लाभेल. साध्या पडद्यावर बघण्याच्या लायकीचा हा चित्रपट नाही असे माझे मत आहे. या उप्पर तुमची मर्जी!

विषय: 
प्रकार: 

नानबा, तुम्ही 'महाकाव्य', 'saga of humanity' वगैरे लिहीले आहे. मला ते एखाद्या चित्रपटाचे अतिउदात्तीकरण वाटले, म्हणून थोडी कठोर प्रतिक्रिया दिली (मला तरी वाटत होते की त्या सिनेमात तो हिरो त्या नाव्हीशी लग्न करतो म्हणजे सिंबॉलिकली कॅमेरूनने आंतरजातीय विवाहाचा प्रश्न हाताळलाय असे कोणीतरी म्हणेल. पण कोणी म्हटले नाही.. Proud )

जशी अरभाटची पोस्ट आवडली हे सांगितले तसेच तुमची का आवडली नाही हे सांगितले. वैयक्तिक काही नाही.

दिनेशदा, अहो एखाद्याने परिक्षण लिहील्यावर त्यावर लोक मतं व्यक्त करणारच आणि त्याच्यावर उलटसुलट चर्चा होणारच. त्यात मायबोली स्टाईल काय आहे? माझा मित्रांबरोबरही असाच वाद होतो. बर्‍याच जणांचा होत असावा. असो.

सिंबॉलिकली कॅमेरूनने आंतरजातीय विवाहाचा प्रश्न हाताळलाय>>> सचिन मला वाटतं त्याने आंतरजातिय नाही तर आंतरप्लॅनेटिय आणि आंतरधर्मिय लग्न करुन विश्वशांतीचा प्रश्न हाताळला आहे. Happy

पण हे जुने झाले कारण आमच्याच ज्ञानदेवाने विश्वाचा विचार आधिच केला होता. ( हो पुढे हा मुद्दा कोणीतरी नको घ्यायला की विश्वशांती बिंती अमेरिकन डिरेक्टरने पिक्चरमध्ये प्रथम दाखविली. Happy ) आता ह्या आंतरधर्मिय विवाहात होणारी संतती ही कॅथलिक असेल की नावि हा मोठा प्रश्न उरला आहे तो चर्चेला घेऊयात ! मी तर असे म्हणेन की मिशनर्‍यांनी हे घडवुन आणले, धर्मप्रसारासाठी एकाला पुढे पाठवून नंतर हळूच रोमचे पैसे घेउन हे लोक नाव्यांना कॅथलिक करतील.

*

मला पिक्चर आवडला. ष्टोरी खरीतर काहीच चांगली नाही, सादरीकरण अत्यंत उत्कृष्ठ आहे. मी कुठलाही विचार करुन पिक्चर पाहीला नाही. ( कॅमरुनचा असला तरी) निसर्गाच्या जवळ जा हा संदेश (!) आवडला.
तो द्यायला ६०० मिलीयन खर्च करावेत का? तर हेच बघाना की विश्वशांती संदेश देण्यासाठी अमेरिका इराक अन अफगाण सोबत उघड अन अन्य काही देश (कोरिया, इराण) ह्यांचा सोबत छुपे युद्द खेळत आहे मग ६०० मि. किस झाड की पत्ती !

तुरुक मख्ताव हा आयडी कोणी कसा काय घेतला नाही अजून?

तर हेच बघाना की विश्वशांती संदेश देण्यासाठी अमेरिका इराक अन अफगाण सोबत उघड अन अन्य काही देश (कोरिया, इराण) ह्यांचा सोबत छुपे युद्द खेळत आहे मग ६०० मि. किस झाड की पत्ती !>> अगदी अगदी.

मला अवतार फारसा आवडला नाही..... एक तर त्याची लांबी मला जास्त वाटली.

तो रिलिज झाला होता तेव्हा एक मजेशीर लेख वाचला होता 'डिएनए' या वृत्तपत्रात.
लेखकाच्या आईने हा चित्रपट पाहिल्यावर म्हटले की यांनी तर सरळ सरळ एका मल्याळी चित्रपटाची कथा चोरलीय. त्या चित्रपटात मोहनलाल हा व्हिलनच्या पार्टिचा मेम्बर असतो. व्हिलनला एक जागा बळकावायची असते. त्या जागेवर एक वस्ती असते. मग मोहनलालला वेशांतर करून त्या ठिकाणी पाठवले जाते, तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी. परंतू, मोहनलालचा विश्वास ते लोक संपादन करतात, तो तिथल्या मुलीच्या प्रेमात पडतो इ. इ. Happy

कुणी काही का म्हणेणा... जे काही समोर पडद्यावर घडते ते खिळवुन ठेवते... त्यातच चित्रपटाचे यश आहे..

हाहाहाहा, दाक्षिणात्य भाषेत अवतार आला तर...
रजनीला निळ्या रंगात पाहून नावी लोक सोडाच समस्त पृथ्वीवासीय आणि रोबोट सुद्धा शरण आले असते...
घोडा आणि उडते डायनॉसोर किस झाड कि पत्ती

Pages