उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.
------------------------------------------------------------------------------
कठोपनिषद:
बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति
-- कधी मी सर्वोत्कृष्ट, तरी कधी सामान्य असतो. माझ्या असण्यातून काय साध्य होत आहे?
येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये
अस्तीत्येके नायमस्तिती चैके
एतद् विद्यामनुशिष्टस्त्वयाऽऽहं
वराणामेष वरस्तृतीय:
-- माणूस मेल्यावर काही लोक म्हणतात की तो मेला नाहिये तर अस्तित्वातच आहे आणि काही म्हणतात की सगळे संपले. हे यमा, तिसरा वर म्हणुन तू मला हा माणसाला पडलेला जो गहन प्रश्न आहे त्याचे उत्तर दे.
---------------------------------------------------------------------------------
आपण असतो म्हणजे काय? आणि का असतो? असेच का असतो? का जगतो? माणुस मेल्यावर काय होते? तो असतो की नसतो? असला तर कुठे असतो? नसेल तर मग असण्याला अर्थ काय? कठोपनिषदात नचिकेताने यमाला हे प्रश्न विचारुन भंडावून सोडले. प्रत्येकालाच कधी ना कधी पडणारा हा एक खराखुरा वैश्विक प्रश्न आहे जो भाषा, संस्कृती, शि़क्षण ह्यांच्या पलिकडे जाउन प्रत्येकाच्या मनात वावरत असतो. कुणामध्ये ह्या प्रश्नाची तीव्रता जास्त तर कुणात ती अगदीच किरकोळ, कुणास हा प्रश्न अगदी लहान वयातच लख्खपणे दिसतो तर कुणी हा प्रश्न मरेपर्यंत विचारात बांधूच शकत नाहीत (मग शब्दात तर दूरच), कुणी आत्म्याला चिरंतन मानून देवाचे अस्तित्व नाकारतात तर कुणी चिरंतन आत्म्याला अद्वैताच्या आधाराने विश्वाशी एकरुप करतात.
जन्मण्यामागचे कारण, जगत राहण्याचा उद्देश आणि मरणाचे गूढ ह्यावर आदीम मानवापासून आजचे आघाडीचे उत्क्रांतीशास्त्रज्ञ विचार करत आहेत, करत राहतील. अनेक महान साहित्यकृतींनी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा प्रश्नांच्या प्रवासाचा पाठपुरावा केलेला आहे. विहिर हा चित्रपट ज्यांना अर्पण केलेला आहे त्या जी. ए. कुलकर्णींनी आणि आरती प्रभुंनीसुद्धा आपापल्या मार्गाने अनेक कथांमधून/कवितांमधून ह्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला. पण दृक-श्राव्य माध्यमातून ह्या विषयाला थेट हात घालण्याचे प्रयत्न विरळेच झालेले आहेत. उमेश विनायक कुलकर्णी ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने ह्या विषयाला पूर्णपणे प्रामाणिक राहून विहिर ह्या चित्रपटाची निर्मिती केलेली ही फार कौतुकास्पद (आणि खरे तर अवघड) गोष्ट आहे.
नचिकेत आणि समीर ही दोन मावस भावंडे पत्रांमधून एकमेकांशी बोलताना चित्रपट सुरु होतो. ह्या नचिकेत आणि समीरचे नाते फारच सुंदरपणे निर्माण झाले आहे. अनेकांच्या बालपणात एक असा मोठा दादा असतो ज्याच्याकडे आपण तो जणु सर्वकाही असल्यासारखे पाहत असतो. समीरचा हा नचिकेतदादा अगदी पुर्णपणे उतरला आहे. पहिल्या थोड्या प्रसंगातून संपूर्ण पार्श्वभूमी (समीरचे कनिष्ट-मध्यमवर्गीय घर, नचिकेतची ब्राह्मणी गरिबी, एक मावशी अजून लग्न रहिलेली असणे वगैरे वगैरे) ठळकपणे उभी राहते. सगळ्यात धाकट्या मावशीच्या लग्नाला सुट्टीत सगळी भावंडे एकत्र येतात. समीर साधारण आठवी-नववीतला तर नचिकेत नुकतीच बोर्डाची परिक्षा दिलेला. आजोबांनी शेतात नुकतीच बांधलेली विहिर, तिथे पोहायला गेले असताना नचिकेतला जगण्याबद्दल, जगाबद्दल, नातेवाईक, त्यांचे परस्पर संबंध, त्यामागची कारणे अश्या आणि इतर अनेक विविध गोष्टींच्या पुढे प्रश्नचिन्हे दिसत असतात ते पुढे येते. त्याचवेळी समीरला मात्र अपेक्षित असणारा, सुट्टीत आपल्याशी खेळणारा नचिकेतदादा काय बोलतोय, असा का वागतोय ते कळेनासे होते. नचिकेत आणि समीर मधले संवाद ह्यातून इथे नचिकेतचा शोध, त्याला पडणारे प्रश्न, त्याचे समीरवर उमटणारे पडसाद आणि ह्या सगळ्याची इतर कुटुंबीयांबरोबर सांगड असे विविध पदर घेत चित्रपट मध्यांतरापर्यंत पोचतो. मध्यंतरात ह्या न समजण्याच्या ताणाने समीर आणि नचिकेतात छोटेसे भांडण होते. माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे उमेशच्या सिनेमात तो आपल्याला एका मुख्य रस्त्यावरुन पुढे नेतो. पण तसे जाताना अधे-मधे ज्या गल्ल्या, रस्ते लागतात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, त्या आड रस्त्यांवर थोडेसे पुढे डोकावून, चाहूल घेउन मग पुढे नेतो.
मध्यंतरानंतर हा चित्रपट नचिकेताचे प्रश्नांच्या मागाने समीरचा प्रवासाच्या मार्गाने जातो. इथून पुढचे मात्र मला शब्दात मांडणे कठिण. ते बघण्यातच खरा अनुभव आहे. तसेच काही लिहिल्यास हा चित्रपट बघण्यार्यांना उगाचच सगळी कथा आधीच सांगितल्यासारखे होईल.
चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. पण समीरचे काम मदन देवधर ह्या गुणी कलाकाराने अचाटच केले आहे. उमेशच्या गिरणी ह्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लघुचित्रपटातला गिरणीशेट म्हणजेच हा मदन. नुकत्याच आलेल्या एक कप च्या ह्या सुमित्रा भावे-सुनिल सुखथनकर ह्यांच्या चित्रपटातसुद्धा त्याचे चांगले काम केले आहे. नच्यादादाबद्दल असलेले ते आकर्षण, त्या वयात तोच एक आदर्श असणे, नच्यादादा मात्र सापडत नाहिये – तो जे वागतोय ते झेपत नाहिये हे थोडंफार कळणं आणि दुसर्या अंकात जो प्रवासाचा वेग समीरने पकडलाय ते अप्रतिम आहे.
समीरची विहिरीतली पहिली उडी ही केवळ अचाट. जो कोणी विहिरीत पोहायला शिकलाय त्याला माहिती आहे की उडी ही पाण्यावर आदळताना येणार्या अनुभवाचे एक साधन आहे. ते खाली येणे, त्यासाठी मनाचा हिय्या करणे हे सगळे पाण्यावर आदळायचा जो अनुभव आहे त्यासाठी आहे. मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे ते विहिरीवर आदळने. तो इसेन्स जसाच्या तसा त्या दृश्यात उतरला आहे. असेच अजून एक प्रभावी दृश्य म्हणजे नाक दाबून जेव्हा समीर जलतरण तलावात बुडण्याच्या अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो ते. पाण्यातून दिसणारे ते त्याचे हालणारे (रिफ्रॅक्टेड) शरीर, त्याच्या हातांची होणारी आणि पाण्याबाहेरून अजून जास्त वेडीवाकडी भासणारी हालचाल सगळे काही सांगून जाते.
सुधिर पलसाणेने – सिनेमॅटोग्राफरने - कमालच केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील हा भाग अगदी जिवंत उभा केला आहे त्याने. आणि कुठेही उगाचच केलेल्या चमत्कृती नाहियेत. एक दीर्घकथा उलगडत वाचावी त्याप्रमाणे त्याने हा चित्रपट आपल्यासमोर उघडलाय. संपूर्ण चित्रपटभर कॅमेरा प्रवासाला निघाल्यासारखा फिरतो. शेवटी शेवटी तर जो वेग येतो तो अगदी मस्त पकडलाय.
चित्रपटाच्या कलाटणीच्या प्रसंगात कुठेही अति-नाट्यमयता न आणल्यामुळे ती घटना केवळ एक घटना होते. चित्रपटाचा संदर्भबिंदू (सेंटर) होत नाही. त्यामुळेच जवळच्या व्यक्तिचा मृत्यु, त्याचा बसलेला धक्का, त्यामुळे कोलमडलेले भावविश्व आणि त्यातून सुरु झालेला प्रवास एव्हड्याच पुरता हा चित्रपट मर्यादित राहत नाही, मानसशास्त्रावरची डॉक्युमेन्ट्री होत नाही. तसा तो होवू शकला असता. समीर, सिनेमाचा नायक – मध्यवर्ती विचार (फोकस)– व्हायचा धोका होता. पण चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका (फोकस) ही ते प्रश्न, त्यातून निर्माण झालेला प्रवास हीच राहिली आहे. आणि माझ्या मते हा खरा मास्टरस्ट्रोक आहे.
बाकी सगळ्या कलाकारांनी अतिशय नैसर्गिकपणे, साधा अभिनय केलाय. ज्योती सुभाष, डॉ. आगाशे, गिरिश कुलकर्णी आणि इतर छोट्या कलाकारांनी आपापल्या भुमिका चपखल निभावल्या आहेत. नचिकेतच्या आईने दारुड्या नवरा असलेली, घर चालवणारी पण मनातून पार पिचलेली बाई सुरेखच उभी केली आहे. लपंडाव, पत्ते, कानगोष्टी ह्या खेळातून सगळेच मस्त उभे राहिलेत. अश्विनी गिरी तर मस्तच. मी ह्या अभिनेत्रीच्या प्रेमातच पडलेलो आहे. वळुमध्ये हिची छोटीशी भुमिका होती. पण ’एक कप च्या’ आणि आता ’विहिर’ ह्या दोन चित्रपटात मात्र तिने अफलातून काम केलेले आहे. एका प्रसंगात ती साडी नीट करता करता फोनवर बोलत असते तो म्हणजे नैसर्गिक अभिनयाचा सुंदर नमुना आहे.
काफ्काचा के, दस्तोयव्हस्कीचा रास्कालनिकॉव्ह, कुठल्यातरी एका प्रखर क्षणी बंदिस्त झालेला बळवंतमास्तर, निराशेच्या टोकाला पोचलेला चांगदेव – कित्येक उदाहरणे आहेत जिथे मृत्यु आणि जगण्याच्या उद्दिष्टांच्या वा त्यांच्या गाभ्याच्या शोधात होणारा प्रवास हा रुढार्थाने अपयश-निराशा आणि दुर्दैवाच्या मार्गावर जाउन पोचतो. अगदी असे वाटावे की असा प्रवास हा निराशेतच संपणे हे स्वाभाविकच आहे. दुसर्या टोकाला ज्ञानेश्वर, विवेकानंदांपासून घरबार सोडून जाणार्या संन्याश्यांपर्यंत सर्वजण एका अतिशय व्यक्तिसापेक्ष (आणि म्हणुन शास्त्रीय व तार्कीक कसोट्यांवर पडताळून न पाहता येण्याजोग्या) पण कदाचित काल्पनिक (सेल्फ-डिसिव्ह्ड) सुखाच्या मागे लागून सर्वच सोडून देतात. हा चित्रपट मात्र पॉझिटिव्ह नोटवर येतो. माझ्या मते सती भावे आणि गिरिश कुलकर्णींच्या पटकथेचे हे सगळ्यात मोठे यश आहे.
चित्रपटाची लांबी काही जणांना अधिक वाटेल तर काहींना तो संथ वाटेल. मला काही प्रसंगात त्या प्रसंगांतील भावनांची घनता/गंभिरता काही कलाकरांना पेलत नाहिये की काय असे वाटले. पण ही सर्व चर्चा चित्रपट बघितल्यावर सगळेजण करतीलच. माझ्या परीने मी मूळ कथेबद्दल वा प्रसंगांबद्दल कमीत-कमी लिहायचा प्रयत्न करीत मला काय वाटले ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे परिक्षण नक्कीच नाहिये आणि हा विषय मला जवळचा असल्याने मी पार्श्यालिटी अंपायर झालो असण्याची शक्यता आहे.
तर चू.भू.दे.घे.
केवळ अप्रतिम लिहिलं आहेस
केवळ अप्रतिम लिहिलं आहेस टण्या!!! विहिर मी सुद्धा पाहिलाय आणि तो अनुभव शब्दात उतरवणं किती कठिण आहे ते त्यामुळेच माहीत आहे. उद्या चित्रपट येतोच आहे तेव्हा अजून काही लिहित नाही पण तु लिहिलेल्या सर्वाला माझे संपूर्ण अनुमोदन.
हुम्म्म पाहिला पहिजे
हुम्म्म![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पाहिला पहिजे विहीर.
टण्याला आवडलाय म्हणजे 'मुळ्ळीच' न आवडलेले एक दोन 'समीक्षकी ' चेहरेही दिसू लागलेत...
टण्या, सुरेख लिहिलं आहेस..
टण्या,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख लिहिलं आहेस.. 'विहीर' पूर्ण बघितला नाहीये, फक्त काही दृश्यं मागे बघितली होती.. आता चित्रपट बघताना तुझं परीक्षण लक्षात राहील.
विहिर चित्रपटाची वेबसाईटः
विहिर चित्रपटाची वेबसाईटः www.vihir.com
वेबसाईटही मस्त आहे
वेबसाईटही मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयबीएन लोकमत या वाहिनीवर काल
आयबीएन लोकमत या वाहिनीवर काल आणि आज या चित्रपटाच्या निमित्तने दिग्दर्शक, पटकथाकार, संगीतकार, छायालेखक यांच्या मुलाखती झाल्या.. पार्श्वसंगीतात नॅन्सी कुलकर्णी यांनी केलेला चेलोचा वापर, किंवा चित्रपटाचा विषय दिग्दर्शकाच्या बालपणाशी निगडीत असणं अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. हाच कार्यक्रम आज रात्री बहुतेक परत प्रक्षेपित होणार आहे. शक्य असल्यास जरूर बघा.
ऑल इज 'वेल' .... बघून घेतो
ऑल इज 'वेल' .... बघून घेतो मीपण...
मी मुद्दामुन आत्ता वाचत
मी मुद्दामुन आत्ता वाचत नाहीये.
परवा डायरेक्ट बघणारच आहे.
वॉव बघायचाय हा पिक्चर. एक
वॉव बघायचाय हा पिक्चर. एक म्हणजे खरंच चांगला वाटतोय. आणि दुसरं म्हणजे तो जो नचिकेत आहे, 'आलोक राजवाडे' त्याला मी अगदी तो ३-४ थी मधे असल्यापासून ओळखतीय. त्याची अॅक्टींग पाहायची संधी मिळेल.
छान लिहिलय.. बघितलाच पाहिजे
छान लिहिलय..
बघितलाच पाहिजे चित्रपट!
मस्त परीक्षण टण्या! एकूण जरा
मस्त परीक्षण टण्या! एकूण जरा जड प्रकार दिसतोय. बघायला पाहिजे तरीही.
आश्विनी गिरी यातही आहे का? तसेच गिरीश कुलकर्णी सुद्धा? हे दोघेही मला आवडले त्यांच्या एवढ्यात पाहिलेल्या चित्रपटांत.
वेबसाइट मस्त आहे, ट्रेलर व
वेबसाइट मस्त आहे, ट्रेलर व छायाचित्रांवरून छायाचित्रणाचा उच्च दर्जा जाणवून येतो.
टण्या- पिक्चरचं माहित नाही
टण्या- पिक्चरचं माहित नाही अजून, पण तू लिहीलं आहेस ते अतिशयच सुंदर. तुझ्या शब्दात फार सामर्थ्य आहे, आणि भाषा तुला उत्तरोत्तर अशीच प्रसन्न राहो.
पिच्कर पाहीनच आता. अश्विनी गिरीही पाह्यचीच आहे. फारेंडनी लिहील्यापासून एक कप च्याचीही उत्सुकता लागली आहे.
मस्त लिहिलं आहेस टण्या.
मस्त लिहिलं आहेस टण्या. नक्कीच बघणार आहे हा चित्रपट.
टण्या, शब्द शब्द उत्तम
टण्या, शब्द शब्द उत्तम मांडलायस! विहीर नक्की बघणार रे.
रैना तुला मोदक. टण्या, खूप
रैना तुला मोदक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टण्या, खूप छान परीक्षण लिहीले आहेस. वाचून सिनेमा बघावासा वाटतोय. कधी मिळतोय बघायला, कोणास ठाऊक? पण नक्की बघणार.
ट्ण्या, असे सुंदर लिहून, आमची
ट्ण्या, असे सुंदर लिहून, आमची आगतिकता वाढते, एवढे खरे. आता कधी ती सिडी येणार, त्या नंतर कधी आमची भारतवारी होणार !!!
मराठीत खरेच चांगले चित्रपट येत आहेत. त्याला प्रेक्षकही लाभोत.
मस्त लिहिलंयस. कधी बघायला
मस्त लिहिलंयस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कधी बघायला मिळणार हे सगळं!
असे लिहिलयस कि वाचून बघायलाच
असे लिहिलयस कि वाचून बघायलाच हवा असे झालय.
टण्या, उत्तम लिहिलं आहेस.
टण्या, उत्तम लिहिलं आहेस. पिक्चर नक्की पहाणार.
मस्त लिहिलंयस. 'फुटकळ' वरुन
मस्त लिहिलंयस. 'फुटकळ' वरुन एकदम इतका गंभीर कठोपनिषदापर्यंत, चौफेर लिखाण आहे तुझे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल टी व्हीवर प्रोमोज मध्ये
काल टी व्हीवर प्रोमोज मध्ये वर उल्लेखलेला विहीरीत उडी मारण्याचा सीन पाहिला. खरंच्,छान घेतला आहे.
आज बघितला विहिर. कोरं राहून
आज बघितला विहिर. कोरं राहून बघायचाय, म्हणून मुद्दाम हे वाचलं नव्हतं, ते आता वाचलं. अत्यंत सुंदर लिहिलं आहेस.
हा अनुभव शब्दांत मांडणे केवळ अशक्य आहेच. पण जमेल तसं लिहिन या बीबीवर.
सुरेख लिहीलयस टण्या. मिळाला
सुरेख लिहीलयस टण्या. मिळाला तर नक्की बघणार
टण्या, मस्त लिहिलं आहे रे
टण्या, मस्त लिहिलं आहे रे परिक्षण. खरंच, वाचून चित्रपट पाहिलाच पाहिजे असे वाटले.
फार छान लिहिलं आहेस. बघितला
फार छान लिहिलं आहेस. बघितला पाहिजे विहिर.
टण्या... मला विहीर बघायला
टण्या... मला विहीर बघायला जमेल किंवा नाही हे माहीत नाही ,पण यापुढे तुझे सर्व लेख नक्की वाचणार... जियो मेरे शेर...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अत्यंत सुन्दर लिहिले आहे.
अत्यंत सुन्दर लिहिले आहे. अश्या लेखनाचीच आम्ही वाट बघत असतो. सीडी घेउन का होइना नक्की बघणार.
विहिर बघितला... स्टोरी न्हाई
विहिर बघितला... स्टोरी न्हाई कळली........
..... शेवटी त्या मुलाचे भूत होते का? बघायला छान आहे पिक्चर पण कळायला कठिण ........... ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ज ब री लिहिलं आहेस. असला
ज ब री लिहिलं आहेस. असला चित्रपट जीए आणि आरती प्रभूंना अर्पण करणे अगदी संयुक्तिक वाटले.
Pages