अढळपद

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 February, 2010 - 07:53

************* अढळपद ************

'अहो, जरा माझी धापेची गोळी आणि पाणी देता काय?'

हाक ऐकू आली आणि शांताबाई तंद्रीतून जाग्या झाल्या. 'आले, हं' त्या म्हणाल्या आणि लगबगीने सावरून उठून बसल्या. नाकाच्या शेंड्यापर्यंत ओघळलेला चश्मा त्यानी व्यवस्थीत डोळ्यावर सरकवला. मांडीवरचं पुस्तक त्यानी बाजूला ठेवलं.

पाणी आणि गोळी घेऊन त्या शामरावांच्या जवळ गेल्या. आलेली खोकल्याची उबळ तशीच दाबून शामरावानी गोळी घेतली. धापेचा पंप तोंडात धरून त्याचे दोन स्प्रे घेतले. थोडं बरं वाटताच हाश हुश करत ते म्हणाले, ' काय करत होता आत?'

'गोष्टी वाचत बसले होते. रात्री सायली जेवणापूर्वी गोष्टीचा हट्ट धरणारच. तिचे आई वडील दिवसभराच्या लगबगीने दमलेले असणार. तुम्ही इथे कॉटवर आडवे. मग गोष्ट सांगणार कोण माझ्याशिवाय? सांगते बापडी- येईल तशी- वेडीवाकडी.'

'वेडीवाकडी?' शामराव हसत म्हणाले, 'तुमची गोष्ट, आणि वेडीवाकडी?' अहो, सायलीच काय आम्हीसुद्धा सगळे ऐकत असतो. तुम्ही खरंच गोष्ट छान सांगता. रामाची असू दे- कृष्णाची असू दे- टिळकांची किंवा इंदिरा गांधींची असू दे- मला जर आधीच माहीत असतं, तुम्ही गोष्ट एवढी छान सांगता, तर मीसुद्धा रोज रात्री हट्ट केला असता- गोष्ट ऐकण्यासाठी..'

'इश्श! काहीतरीच तुमचं आपलं!'

'नाही हो. खरंच सांगतोय. तुम्ही गोष्ट सांगता ना तेंव्हा सगळं विसरायला होतं. हा दमा -घरच्या कटकटी-हे परावलंबी जीणं... सगळंसगळं विसरायला होतं बघा.... ' खोकल्याची उबळ पुन्हा आल्यामुळे शामराव बोलायचे थांबले. शांताबाईंनी त्याना पाणी प्यायला दिलं. खोकला थांबल्याचं दिसताच त्या उठल्या.

'चहा आणते तुमच्यासाठी,' त्या उठल्या.

'आणा थोडासा. पण दूध मात्र जपून वापरा बरं. संध्याकाळ आता होईलच. ते दोघे आल्यावर परत काही गोंधळ नको व्हायला.'

शांताबाई किचनकडे वळल्या. गेल्या आठवड्यातील ती घटना आठवून त्या थोड्या अस्वस्थ झाल्या. गेल्या आठवड्यात एक दिवस संध्याकाळी त्यांनी शामरावांना असाच चहा करुन दिला होता. नेमकं त्याच दिवशी सुरेश ऑफिसमधून येताना चार मित्राना घेऊन आला. थोड्या वेळाने सुनितापण आली. कॉफी करायला म्हणून किचनमध्ये गेली , तर दूध कुठे होतं? आयत्यावेळी शांताबाईनाच पळापळ करुन खालून बेकरीमधून दूध आणावं लागलं. एवढ्याश्या दुधाचं प्रकरण- पण नंतर घरात गोंधळ व्हायचा तो झालाच.

'किती परावलंबी जीणं झालंय आपलं. छोट्या छोट्या गोष्टींवरसुद्धा आपली सत्ता राहिलेली नाही. ' शांताबाई चहा करता करता विचार करत होत्या. त्यानी चहा केला. शामरावाना दिला. चहा घेताच त्यना जरा बरं वाटलं. 'अहो, किती करताय माझ्यासाठी.' ते शांताबाईना म्हणाले. ' माझं आजारपण, मुलाचा अलिप्तपणा, सुनेची धुसफूस कसं सोसता हे सगळं?' शांताबाई गप्पच होत्या. पण मनात खोल्वर ढवळाढवळ व्हायला सुरुवात झालेली होती...

'तुम्ही आहात म्हणून मी....'
'आता काही बोलू नका. शांतपणाने विश्रांती घ्या.' शांताबाई शामरावाना म्हणाल्या,'संध्याकाळ होईलच इतक्यात. मी जरा बाहेर जाऊन येते. देवळात जायचं आहे. तुमची औषधेपण आणायची आहेत.'

सगळं आवरून शांताबाई बाहेर पडल्या. संध्याकाळी पाय मोकळे केले की त्यांना थोडं बरं वाटायचं. पण आज मात्र त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. मनात काहीतरी सलत होतं. पण नेमकं काय सलतय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.

कॉर्नरवरच्या फोनबूथजवळ त्या पोहोचल्या आणि थबकल्याच. बूथशेजारचा गाळा गेले कित्येक दिवस बंदच होता. पण आज तो उघडलेला दिसत होता. आत नवं कोरं काउंटर होतं. त्याच्या आत मोठ्ठाली कपाटं. दारासमोर थोडी गर्दी होती. समोरच्या बाजूला तोरणं आणि फुलांच्या माळा लटकलेल्या होत्या.

नवीनच निघालं वाटतं हे! चष्मा सावरत शांताबाई दुकानावरचा बोर्ड वाचू लागल्या. 'अभिनव मेडिकल्स'

'बरं झालं. घराजवळ नवीन मेडिकल निघालं ते..'

'ओ आज्जीबाई! मध्येच कुठे उभ्या राहिलात? सरका बाजूला. तिथं खुर्च्या मांडायच्या आहेत.' एक मुलगा शांताबाईंवर खेकसला. शांताबाई ओशाळत बाजूला झाल्या. तो मुलगा त्यांच्याजवळ आला. तिथं मध्येच एक मोठा दगड पडलेला होता. पायाने ढकलत तो मुलगा तो दगड बाजूला करु लागला. पायानं ढकलला जाणारा दगड शांताबाईनी पाहिला आणि त्यांच्या मनात कच्चकन काटा रुतला.

रस्त्यावर धुळीत पडलेला दगड- सर्वांच्याकडून लाथाडला जातो. त्याला ना स्वतंचं स्वतंत्र आस्तित्व असतं- ना स्वतःची एक जागा. आपलं तरी कुठं वेगळं आहे? मुलगा-सून्-परिस्थिती-सगळ्यांच्याकडून लाथा खाणं सुरु आहे... मनातला नेमका सल त्यांच्या लक्षात आला आणि त्या अधिकच अस्वस्थ झाल्या.

ना घरामध्ये आपल्याला स्वतंत्र आस्तित्व.. ना समाजामध्ये एक स्थान...

उदघाटनासाठी सजवलेलं नवं कोरं दुकान्-नटून थटून आलेले निमंत्रित.. या भाऊगर्दीत त्यांना एकदम परक्यासारखं वाटू लागलं आणि त्या झपाझप देवळाच्या दिशेने चालू लागल्या. चालत चालत त्या देवळापर्यंत पोहोचल्या. बागेतल्या कृष्णाचं देऊळ्-हे त्यांचं नेहमीचं ठिकाण होतं. देऊळ तसं फार मोठ्ठं नव्हतं. लहानसं पण सुबक होतं- नव्या पद्धतीचं. एक छोटासा मंडप. -त्याच्यासमोर बंदिस्त गाभारा. गाभार्‍यात मुरलीधर श्रीकृष्णाची काळ्या पाषाणाची मूर्ती होती. मूर्तीच्या पायाजवळ भाविकानी टाकलेल्या फुलांचा ढीग असायचा. मूर्तीच्या सौंदर्यासमोर आपली हार मानून फुलानीच मूर्तीच्या पायाजवळ रहाणं मान्य केलं असावं- असंच प्रत्येकाला वाटायचं.

शांताबाई देवासमोर उभ्या राहिल्या. डोळे मिटले. मनोभावे हात जोडले. क्षणभर मनात विचारांचा उद्रेक झाला. अशांत अस्वस्थ विचार मनाच्या खोल डोहातून वर येऊन उसळी मारू लागले. दु:ख वेदनांचे आवेग गरगरू लागले. हृदय धडधडू लागलं. कृष्णा... केशवा.. नारायणा... अंतर्मन आर्तपणे साद घालू लागलं आणि गढूळ पाण्यात तुरटीचा स्फटिक फिरावा तसा चमत्कार झाला. विचारांचा एकेक कण तळाशी बसू लागला. अंतर्मनाचं पाणी स्वच्छ आणि नितळ होऊ लागलं. आनंदमय लहरींचा मनोहारी नृत्यखेळ सुरु झाला.

ठण्ण!

घंटचा नाद कानात घुमला आणि शांताबाई भानावर आल्या. त्यांनी मागं पाहिलं. कुणीतरी एक भाविक उभा होता. शांताबाई मंडपाच्या बाहेर आल्या. देवळासमोर एक छोटीशी बाग होती. सभोवती हिरवंगार गवत. लहानमोठी झुडपं आणि फुलझाडं. बागेतल्या एका बाकावर शांताबाई विसावल्या. संध्याकाळी देवळात भक्तीगीतं लागायची. एखाददुसरं गाणं ऐकलं की त्याना बरं वाटायचं. रात्र पडू लागली की गाणी बंद व्हायची. आरती व्हायची. पण आरतीसाठी शांताबाई बहुधा थांबत नसायच्या. एखादं भक्तीगीत ऐकून त्या नेहमी उठायच्या. पण आज त्यांचं कशाकडेच लक्ष लागत नव्हतं. मधाशी-क्षणभरासाठी अनुभवलं, ते काय होतं? त्या विचार करत होत्या. स्वच्छ निळाशार समुद्र- त्या आनंदलहरी - हे सगळं कुठं आहे? आपल्या डोळ्यात?
अं हं. मग आपल्या मनात?
मग इतके दिवस हे का दिसलं नाही? तो निळाशार रंग त्यांना आठवला आणि त्या भावविभोर झाल्या. वार्‍याची एक मंद झुळुक आली आणि अंगावरती मोरपीस फिरावं तसं त्यांना वाटलं. नजरेमध्ये पंचप्राण आणि पंचेन्द्रिये गोळा झाली. शरीराचं धुकंधुकं होऊ लागलं. केशवा.. नारायणा.. एक साद मनामध्ये घुमली . ज्योतीनं तेजाकडे आकर्षित व्हावं, निर्झरानं समुद्रात समर्पित व्हावं-तशी दिव्य भावना त्यांच्या मनात जागी होऊ लागली. निर्झर आणि समुद्र यांचा संवाद सुरु झाला, संवाद्-पण नि:शब्द.

शब्देविण संवादु/दुजेवीण अनुवादू//
हे तव कैसे निगमे/परेही परते//
बोलणे खुंटले/विखरी कैसेनी सांगे//

शब्द मुके झाले. उरल्या फक्त आनंदलहरी. निळ्याशार पाण्यामधून तेजाचा एक प्रचंड लोळ बाहेर आला. सूर्यासारखा तेजस्वी तरीही चंद्रासारखा शीतल. शांताबाई भान हरपून पहात होत्या. चंदनाचा मंद गंध सगळीकडे दरवळला . मुरलीचे स्वर कानात घुमले आणि शांताबाईंचं भान हरपलं. अतीव आनंदाने त्यानी डोळे मिटले.

डोळे उघडले. समोर पाहिलं. आणि त्याना आश्चर्याचा धक्का बसला. समोर साक्षात विष्णु भगवान्-नारायण उभे होते. शांताबाईंच्या तोंडून क्षणभर शब्द फुटले नाहीत. मग अस्फुटपणे त्या म्हणाल्या..'देवा, तुम्ही!' नारायण मंदपणे हसले. 'होय, तुमची आर्त हाक ऐकली आणि राहवलं नाही. बोला, काय हवंय?' शांताबाई गोंधळल्या. काय मागायचं? दीर्घायुष्य्-संपत्ती-अपार वैभव.... काय मागायचं? त्याना प्रश्न पडला. घरातलं परावलंबी जीणं-लाथा खाणारा दगड्-सगळं गर्रकन त्यांच्या नजरेसमोर फिरलं. भांबावलेल्या नजरेनं त्यांनी वर पाहिलं. अढळ-निश्चळ ध्रुवतारा-त्यानी पाहिला आणि त्या उद्गारल्या. 'देवा, मला अढळपद दे. अशी जागा - जिथून मला कुणीही हलवू शकणार नाही. तिथं वर ...आकाशात.'

वर पहात नारायण प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणाले..'तिथं? वर? आकाशात?'

'होय. सगळ्या विवंचनेतून, जाचातून सुटका तरी होईल.'

'जाच विवंचना या तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. त्याला क्म्टाळून प्रत्येकजण जर आभाळात तारा होऊन बसायला लागला तर सगळं आभाळ चांदण्यांनीच गच्च भरून जाईल आणि सगळी पृथ्वी ओस पडेल.'

'मग-धृवाला कसं अढळपद दिलं..आकाशात?' शांताबाईंनी विचारलं. नारायण मंदपणे हसले आणि म्हणाले,'मी धृवाला अढळपद दिलंय ते माझ्या मनात..लोकांच्या मनात . इथं आकाशात नव्हे. आपली निरागसता-जिद्द्-तपश्चर्या यांच्या बळावर धृवानं अढळपद मिळवलय ते आपल्या सर्वांच्या मनात. तेच खरं अढळपद.' शांताबाईंना ते पटलं. पण तरीही ते स्वीकारणं त्यांना जड जात होतं. निराश स्वरात त्या म्हणाल्या,' मग माझं अढळपद कुठं आहे?' त्यांचा प्रश्न तसाच राहिला. भगवंतांच्या चेहर्‍यावर मंद स्मित तरळत होतं. रामाचं गूढ , पावक हास्य आणि कृष्णाचं खट्याळ हसणं या दोघांचं मिश्रण त्या हास्यात होतं. शांताबाई त्या हसण्याचा अर्थ लावू पहात होत्या आणि अचानक सगळं धूसर झालं. भगवंतांचा निळा रंग-निळंशार पाणी-आकाशाची निळाई सगळं एकरूप होऊन गेलं.

आता कोठे धावे मन/
तुज चरण देखिलिया//

देवळातून अभंगवाणीचे स्वर कानात पडले आणि शांताबाई भानावर आल्या. भगवंतांचं दर्शन झालं- या आननंदात पं. भीमसेन स्वर आळवत होते. पण शांताबाई बेचैन झाल्या होत्या. आयुष्याचं सार हातात येता येता अचानक हातून निसटून जावं, तसं त्याना वाटत होतं. संध्याकाळ काजळू लागलेली होती. शांताबाई अस्वस्थपणे घरी निघाल्या.

चालत्चालत कॉर्नरच्या बूथपर्यंत त्या आल्या. नवीन दुकान प्रकाशानं उजळून निघालेलं होतं. मघासचा प्रसंग त्याना आठवला आणि त्या दुर्लक्ष करुन घराकडे निघाल्या. तेवढ्यात फोनबूथवाल्या माणसानं त्याना हाक मारली,' आज्जी, पलीकडच्या दुकानाचं आताच उद्घाटन झालंय. तीर्थप्रसाद घेऊन जा.'

मनार थोडं दडपण घेऊनच शांताबाई दुकानात गेल्या. त्यांनी देवदर्शन घेतलं. तीर्थप्रसाद घेतला. जवळच्या कोपर्‍यात त्यांचं लक्ष गेलं आणि त्या क्षणभर हसल्या. तोच दगड. शूचिर्भूत होऊन, हळद कुंकवाचे टिळे लेवून तो दगड कोपर्‍यात विसावलेला होता. बहुधा नारळ फोडण्यासाठी त्याचा वापर झाला असावा. त्याच-संध्याकाळच्या मुलानं- त्यांना सरबत दिलं. सरबत पिऊन झाल्यावर शांताबाईंनी पर्स उघडली. एक चिठ्ठी बाहेर काढली आणि मालकाला दाखवत त्या म्हणाल्या,' ही औषधं हवी होती. द्याल काय?' त्यानं चिठ्ठी पाहिली. त्याप्रमाणे औषधे काउंटरवर ठेवली. शांताबाईंना नाव विचारलं आणि बिल करताना तो म्हणाला,'दुकानाचं औपचारिक उद्घाटन मघाशी झालं. पण तुम्ही 'खर्‍या' उद्घाटक. पहिल्या ग्राहक.' आजूबाजूची माणसं शांताबाईंकडे कौतुकाने बघत होती. त्यांनी बिल दिलं, कॅरीबॅग घेतली आणि औषधं घेऊन त्या बाहेर पडल्या.

घराकडे निघाल्या. अंधार पडायला लागला. जायला हवं. याना औषधं द्यायला हवीत. सायलीला गोष्टपण सांगायची आहे.. आज्जीची गोष्ट ऐकल्याशिवाय पोर जेवणार नाही... आणि, अचानक त्या थबकल्या.

'तुम्ही आहात म्हणून मी आहे.' शामरावांचा चेहरा त्यांच्या कानात गुणगुणला. 'गोष्ट सांगायची तर आज्जीनंच!' सायलीचे चिमणे पण हट्टी बोल त्यांच्या कानात शिरले आणि शांताबाईंना गहिवरून आलं.

;ह्यांच्या' मनात असलेलं आपलं स्थान... सायलीच्या चिमुकल्या मनात असणारं गोष्ट सांगणार्‍या आज्जीचं स्थान... हे काय? अढळपदच की! शांताबाईंच्या मनात लख्ख उजेड पडला. भराभरा चालत त्या अपार्टमेंटच्याजवळ आल्या. खाली जिन्याजवळ जोश्यांचा अमित खेळत बसलेला होता. त्यांच्याकडे बघून तो हसला. त्याचं गोड हसणं....

कुठं बरं हे गोड हसणं पाहिलं आपण? शांताबाई विचार करत होत्या, तेवढ्यात तो म्हणाला... 'सायलीच्या आज्जी , उद्या संध्याकाळी आमच्या घरी याल काय? उद्या माझा वाढदिवस आहे. माझे सगळे मित्र येणार आहेत आणि आम्हाला तुमची गोष्ट ऐकायची आहे.. सायली सारखी सांगत असते तुमच्याबद्दल... याल ना?'

शांताबाईंनी मानेनेचं होय म्हणून सांगितलं. अमित पुन्हा हसला. तेच निरागस हास्य.. आपण कुठं पाहिलं होतं, ते शांताबाईंना आठवलं आणि त्या एकेक पायरी चढू लागल्या.

त्यांच्या मनावर अतीव सुखाचं प्रचंड ओझं होतं. पण तरीसुद्धा त्यांना मोरपिसासारखं हलकंहलकं वाटत होतं. आनंदसोपानाच्या एकेक पायर्‍या चढत त्या वरवर जात होत्या. आज त्या खूपच आनंदात होत्या. कारण सायलीला आज त्या धृवबाळाची गोष्ट सांगणार होत्या!

**********************************************

उत्तमकथा, २००३ मधील एका अंकात पूर्वप्रसिद्धी.

गुलमोहर: 

छान.

Pages