बिलंदर : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 March, 2010 - 06:31

पुर्वार्ध : वडीलांच्या मृत्युनंतर गारगोटीचा शिरीष भोसले जगायला, पैसे कमवायला म्हणून मुंबईला राहणार्‍या आपल्या जिवलग मित्राकडे सतीशकडे येतो. इथे त्याची भेट सतीशचा रुम पार्टनर अवधुत कामत याच्याशी पडते. मुळातच दिलखुलास असलेला शिर्‍या काही क्षणातच अवधुतशी देखील मैत्रीचे पक्के नाते जुळवतो. आता पुढे ......

बिलंदर : भाग - १ : http://www.maayboli.com/node/14073

*******************************************************************************

"औध्या, तेवढा सत्याचा ऑफीसचा नंबर देतोहेस ना? फोन करुन कळावतो बाबा त्याला. नाहीतर पुन्हा फुलं पड्त्याल आमच्यावर."

नुकताच स्नान करुन बाथरुममधुन बाहेस पडलेला शिर्‍या डोके पुसत पुसत अवधुतला म्हणाला.

"तु चहा तरी घे मित्रा आधी." चहाचा कप समोर करत अवधुत म्हणाला.

"अहाहा... क्या बात है! असा आंघोळ केल्या केल्या चहाचा कप समोर यायला खरेच भाग्य लागतय बघ. औध्या, तुझी बायको जाम नशिबवान असेल बघ."

"ए साल्या..., बायकोला पण चहा करुन पाजावा लागणार असेल तर आपण लग्नच करणार नाही मग. लग्नानंतर सुद्धा सगळे आपणच करायचे असेल तर मग लग्न कशाला पाहीजे?"

"येडा आहेस औध्या ! अरे महिन्यातुन एक दिवस उठल्या उठल्या बायकोला गरम गरम चहा करुन पाज, पुढचा महिनाभर रोज सकाळी न मागता चहाबरोबर नाष्टापण मिळतो की नाही बघ. आणि त्या चहाबरोबर जर "आज तु कसली छान दिसते आहेस राणी" हे एक वाक्य जर व्यवस्थीतपणे उच्चारलेस तर मग अजुनही काय काय मिळत राहील. बायकोला आणखी काय हवं असतं यार? आपल्या नवर्‍याचे आपल्याकडे लक्ष आहे, त्याला आपली काळजी आहे. एवढी गोष्ट त्यांना खुप सुख मिळवून देते. पुरुषच साले कर्मदरिद्री असताता, कितीही मिळालं तरी आपलं समाधानच होत नाही."

चहा ढोसता- ढोसता शिर्‍याने तत्त्वज्ञान पाजळले.

"जसा काही तुला भरपुर अनुभव आहे, बायकोचा!" अवधुतने टोमणा मारला.

"बायकोचा नाही बायकांचा म्हण ! भरपुर आहे....., फक्त आपल्या नाही तर दुसर्‍यांच्या ! अर्थात प्रत्येक वेळी वरील वाक्यातील शेवटचा शब्द फक्त समोरची व्यक्ती पाहून बदलत राहायचा. राणी च्या ऐवजी काकु, वैनी, ताई, मावशी......! हाय काय आन नाही काय."

शिर्‍याने हसुन अवधुतला डोळा मारला तसा अवधुत हसायला लागला.

"एनी वेज, शिर्‍या तुला सत्याला भेटता नाही येणार सद्ध्या, किमान सहा महिने तरी!"

अवधुतने बाँब टाकला तसा शिर्‍या चमकला.

"काय? म्हणजे? मी नाय समजलो?"

"शिर्‍या अरे झालं असं की गेल्या आठवड्यात अचानक सत्याला बाहेर जावं लागलं. तुला तर माहीती असेलच त्याची कंपनी फॅशन वर्ल्ड मध्ये आहे. ते वेगवेगळ्या जाहीरात कंपन्यांना मॉडेल्स पुरवतात. गेल्या आठवड्यात अचानक सत्याला आउट ऑफ इंडीया जावं लागलं. जगभरात त्यांच्या कंपनीने काही टॅलेंट हंट शोज आयोजीत केले आहेत, नवीन मॉडेल्स मिळवण्यासाठी. सत्या तिथे इव्हेंट मॅनेजर म्हणुन आहे, त्यामुळे त्याला पण बाहेर जावे लागले. आता त्याला परत यायला किमान ३-४ महिने तरी जातील असे म्हणाला होता, कदाचीत सहा महिनेही लागु शकतील.......!"

" आयला म्हंजे प्रॉब्लेमच झाला की रे. त्याच्या भरवशावर तर मी इथे आलो होतो. पण ठिक आहे, कुछ तो रास्ता निकालेंगे हम ! बाकी सत्याच्या माघारी मी इथे या खोलीत राहीलो तर तुझी काही हरकत तर नाही ना?"

"बस्स का राव? आता तु माझा अपमान करतो आहेस शिर्‍या. आता तु फक्त सत्याचाच नाही तर माझाही मित्र आहेस. मुळात म्हणजे तु खरोखर सत्याचा मित्र आहेस हे मला माहीत आहे. तेव्हा तुला नकार देण्याचा तसाही मला अधिकार नाही कारण ही जागाच मुळी सत्याच्या मालकीची आहे."

अवधुत थोडा दुखावला गेला, ते पाहुन शिर्‍याला एकदम शरमल्यासारखे झाले.

"सॉरी यार, मला तसे म्हणायचे नव्हते. आणि एक मित्र या नात्याने इथल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा इक्वल अधिकार आहे. ठिक आहे, नशिबाने मुंबईत आल्या आल्या दणके द्यायला सुरूवात केलीय तर. पण मी त्याचे दणके खात खातच लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे ती फिकीर नाही. पण आश्चर्य याचे वाटतेय की सत्याने मला कळवले कसे नाही?"

शिर्‍या थोडा विचारात पडला होता.

"अरे सगळेच फार घाई घाईत झाले. त्याला पुरेसा वेळही मिळाला नाही. पासपोर्टदेखील तत्कालमध्ये अर्ज करुन घ्यावा लागला म्हणे. एक दिवशी संध्याकाळी ऑफीसमधुन त्याचा फोन आला की आतल्या कपाटात माझी बॅग भरुन ठेवलेली असेल, ती ऑफीसचा एक माणुस येइल त्याच्याबरोबर पाठवून दे. तो स्वतः घरीदेखील आला नाही. तशी सत्याची एक बॅग कायम भरुन तय्यारच असायची कारण त्याचे कामच मुळी फिरतीचे होते. त्यामुळे त्याच्या ऑफीसचा माणुस आला आणि बॅग घेवुन गेला. त्यानंतर एकदा एअरपोर्टवरुनच सत्याचा फोन आला होता..निघालोय म्हणुन! तो शेवटचाच फोन. त्यानंतर त्याचा फोनही नाही, अगदी पोहोचल्याचाही फोन केला नाही. लंडनला उतरल्यावर करतो म्हणाला होता पण बहुतेक विसरला. अर्थात हे त्याचे नेहेमीचेच आहे म्हणुन मी ही निर्धास्त राहीलोय. येइल त्याचा फोन जरा रिकामा झाला की. देशाबाहेर गेल्यानेच बहुदा मोबाईलही उचलत नसावा."

अवधुतने उत्तर दिले तसा शिर्‍या निर्धास्त झाला.

"चल मला बाहेर पडायचेच आहे ऑफीससाठी, जाता जाता मेसमध्ये तुझी सोय करुन टाकतो. तुला मेसही दाखवुन ठेवता येइल."

"चल्..निघुया ! कोण चालवतो रे ही मेस? घरगुती आहे की....? आणि मंथली चार्जेस काय आहेत?"

कपडे घालता घालता शिर्‍याने विचारले.

"अरे अग्निहोत्री म्हणुन आहेत. नागपुरचे आहेत.... गेली दहा-पंधरा वर्षे इथेच आहेत. भला माणुस आहे. थोडा किरकिरा आहे फक्त."

अवधुत आणि शिर्‍या दोघेही मेसमध्ये पोहोचले तेव्हा सकाळचे १०.३० वाजुन गेले होते.

"औध्या, मर्दा...तुझं ऑफीस टायमिंग काय आहे? कुठे आहे ऑफीस तुझं?"

"अरे माझं ऑफीस ठाण्याला आहे. मी एक मामुली कुरीअर बॉय आहे यार. आज तसाही थोडा उशीर झाला होता आणि त्यात तु आलास म्हणुन थोडा उशीरा जाईन, कळवलेय तसे ऑफीसात. नाहीतर ७-७.३० वाजता निघावे लागते मला."

"वॉव.... बाईक मस्त आहे रे!"

मेसच्या दारात उभ्या असलेल्या एका बाईककडे पाहात शिर्‍या म्हणाला.

"त्यात मस्त काय दिसलं तुला? गेली दिड दोन वर्षे तशीच गंज खात पडुन आहे ती. तात्यांचीच आहे, मेसचे मालक रे!"

"आपण करु रे तिला तंदुरुस्त, आधी हातात तर येवु देत. तात्या..., म्हणतात काय तुझ्या मेस मालकाला! नोटेड....!"

शिर्‍याने बाईककडे बघत मनाशी कसलीतरी नोंद केली आणि दोघेही आत शिरले.

"नमस्कार तात्या!"

काउंटरवर बसलेल्या एका म्हातार्‍याकडे बघत अवधुतने हात जोडले. त्या म्हातार्‍याला बघीतले आणि शिर्‍यातला बिलंदर पुन्हा जागा झाला.

"तात्या, हा शिरीष भोसले... सतीष देशमुखांचा मित्र आता आमच्याच ब्लॉकवर राहणार आहे......

"नमस्कार करुन राह्यलो तात्यासाहेब ! "

अवधुतचे बोलणे अर्ध्यावरच तोडत शिर्‍याने तिथेच तात्याला वाकुन नमस्कार केला. तात्या आणि अवधुत दोघेही डोळे फाडुन शिर्‍याकडे बघताहेत......

"वा मस्त वाटलं बघा तात्या तुमाले भेटून. आसं आपल्या गावाकडचं कुनी भेटले ना मग कसं जिवात जिव आल्यासारखं वाटुन रायते ना बाप्पा. मले तं वाटाले लागलं व्हतं कि हडे आपल्या जेवणाचं काय होणार देवच जाणे बाप्पा. माज्या मायला तर भल्ली चिंता वाटुन रायली होती राव. आता तीले कळवुन टाकतो की आपल्याकडल्या सारकंच जेवण इथं पण मिळुन रायलं म्हणुन. भल्ली खुश होवुन जाईल बघा."

अवधुत डोळे वासुन शिर्‍याकडे बघतोय, कुणाच्याही नकळत फक्त त्यालाच दिसेल अशा पद्धतीने शिर्‍याने एक डोळा बारीक केला.

"अरे वा, एकदम बहार आली ना भौ. तुमी पण नागपुरचेच काय?" तात्या खुश...!

"तसा मी वर्ध्याचा बाप्पा! पण शिकायले नागपुरात होतो ना राव. आन नागपुर काय नं वर्धा काय? या कमर्‍यातुन दुसर्‍या कमर्‍यात गेल्यासारखंच नाही का?"

शिर्‍याने उत्तर दिले.

"सह्ही बोल्ला ना भौ तुम्ही. दिल खुश झाला बघा तुम्हाले भेटुन." तात्याला घरचा माणुस भेटल्याचा आनंद झाला.

"ते जावु द्या ना तात्या, किती रोकडा भराले लागते सुरवातीले तुमच्या मेससाठी...? तेवढा आकडा सांगुन टाका ना बाप्पा."

शिर्‍याने खिशाला हात घातला.....

"अरे राहु दे रे पोरा, महिना संपला की मग देवुन टाक. आता तुझं नाव नोंदवून घेतो मी."

"व्वा ह्ये तं भल्लं भारी काम झालं ना बाप्पा. ठिक आहे तात्यासाहेब, मग जेवायला बाराच्या नंतर आलो तर चालेल ना?, आज काय घरीच असेन. उद्यापासुन नोकरीच्या मागं लागाले लागतं ना. आजचा दिवस आराम करीन म्हणतो."

"चालेल, चालेल... एक - दिड वाजेपर्यंत कधीपण ये ना भौ."

"बरं नमस्कार....! येतो"

शिर्‍या अवधुतबरोबर मेसच्या बाहेर पडला.... आणि काहीतरी आठवल्यासारखे करुन परत आत शिरला.

"तात्यासाहेब, ती बाहेर उभी असलेली यामा तुमचीच काय?"

"अरे खराब झालीय ती. मेकॅनिक जादा पैसे मागतोय. म्हणुन वर्षभर पडुनच आहे."

"आस्सं..., बघु जरा माझं नोकरीचं मार्गी लागु देत. मग बघतो तिच्याकडे. झाली स्वस्तात दुरुस्त तर तुमचे काम होवून जाईल. कस्सं?"

शिर्‍याने गळ टाकला आणि मासा गळाला अडकला.

"अरे काढुनच टाकायचीय ती. पण खराब असल्याने किंमत खुप कमी येतेय म्हणुन ठेवलीय."

"आता खराब झालेली दिसुन तर रायली मलेपण. पण बघू. बघू लागली नोकरी चांगली लवकर तर मीच घेवुन टाकेन अशीच."

"तसं असेल तर घेवुन जा ना बाप्पा आत्ताच. तशी पण पडुनच आहे ती. जेव्हा जमेल तेव्हा पैसे देशील. आता तु आमच्या सतीशरावांचा दोस्त , त्यात कामतसाहेबांबरोबरच राहतोयस म्हणल्यावर काहीच हरकत नाही. जमेल तसे दे पैसे. नंतर निवांत बसुन ठरवू योग्य ती किंमत तिची."

भंगारात जाण्याच्या लायकीच्या गाडीला येत असलेलं गिर्‍हाईक सोडायला तात्या काही मुर्ख नव्हते. अवधुतचं नाव घेवुन त्यांनी आपला गॅरेंटर पण तयार केला होताच. त्यांच्या दृष्टीने त्यांना एक मुर्ख सापडला होता. त्या भल्या माणसाला कुठे माहीत होतं की आपली गाठ एका महाचालू माणसाशी पडलीय.

"शिर्‍या, तुझा विचार काय आहे? साल्या गाडी घेवुन तु होशील फुर्रर्र.... आणि हा तात्या माझ्या खनपटीला बसेल."

"डोंट वरी...य्यार. हम है ना, फिकर नॉट. दुपारीच घेवुन जातो गाडी."

"अरे त्या खटार्‍याचं काय करणार आहेस."

तसा सत्या आत्मविश्वासाने हसला.

"अरे भली भली बिघडलेली माणसं वळणावर आणतो मी, ये गाडी किस झाड की पत्ती है. तुला माहिती नाही But shirya is the world famous two wheeler mechanic in gargoti."

"world famous in gargoti? शिर्‍या तु खरेच ग्रेट आहेस. त्या तात्याला कसला भारी गुंडाळलास रे. वर्ध्याचा म्हणे. धन्य आहात प्रभु."

अवधुतने हसत हसत कोपरापासुन हात जोडले.

"चल मी निघतो आता. संध्याकाळी भेटूच."

अवधुत स्टेशनकडे वळला आणि शिर्‍या कल्याणची खबरबात घ्यायला निघाला.

*******************************************************************************

"काय शिरीशभौ, मग आज कुठे दौरा?"

बाथरुममधून बाहेर पडलेल्या अवधूतने टॉवेलने डोके पुसत पुसत विचारले.

"आज वरळीला चाललोय बघ, साधना नायट्रोकेम मध्ये जागा आहेत म्हणून कळालेय. तुला सांगतो औध्या, आता जाम कंटाळा आलाय यार या इंटरव्ह्युजचा. आपण आपलं टाय बीय बांधून, इस्त्रीचे कपडे घालून जायचं. त्या लोकांनी चार प्रश्न विचारायचे आणि शेवटी नेहमीचाच राग आळवायचा. आमचा निर्णय झाला की लवकरच तुम्हाला कळवू! भें..... साले, हे पालूपद आलं की समजायचं... तुमची कन्नी कटली म्हणून. हा आपला शेवटचाच इंटरव्ह्यु बरं का. यानंतर नाही. च्यामारी बुटं झिझायला लागली माझी."

पायातल्या बुटावर फडका मारता मारता शिर्‍या वैतागलेल्या आवाजात म्हणाला.

"मग काय करणार आहेस बाबा?"

"बघू... काहीतरी धंदा करेन. भाजी विकेन स्टेशनवर... काहीपण करेन... पण हे मात्र बास आता."

"आणि त्यासाठी भांडवल कुठून आणणार?"

"बघु रे ...! त्याने पोट दिलेय ना? तो करेल काहीतरी व्यवस्था? अशीही दुनियेत मुर्खांची काही कमी नाही. दुनिया झुकती है प्यारे..झुकानेवाला चाहीये. अगदीच नाही जमलं काही तर शेवटी रतन खत्री झिंदाबाद."

"म्हणजे मटका? तुझं काही सांगता येत नाही बघ शिर्‍या, काहीही करशील. तुला योग्य वाटेल ते कर. फक्त कायदेशीरपणे कर. आजचा इंटरव्ह्यु किती वाजता आहे."

"दुपारी चार वाजता बोलावलेय. बघु जेवण झाल्यावर पडेन बाहेर."

"काय रे शिर्‍या, एक विचारू?"

"बोल ना मर्दा."

"तु दिसतोस असा एखाद्या पैलवानासारखा पण नेहमी फक्त डोकेच वापरताना दिसतोस. तुझ्या ताकदीचा कधी वापर केलाहेस का रे?"

"लै वेळा.... आधी बापाबरोबर शेतात राबताना कधी कधी बैलाला कंटाळा आला की बापाला माझी आठवण यायची. नंतर कॉलेजात असताना एकदा केला होता. पण त्यानंतर आमच्या या येड्या सत्याने शपथ घातली की पुन्हा कुणावर हात उचलणार नाहीस म्हणुन. साला तेव्हा पहिल्यांदाच भेटला होता मला, पण पहिल्याच भेटीत एवढा पटला की माझ्यासारख्या माणसाला त्याला नाही म्हणण्याची डेअरिंगच झाली नाही."

"असं नक्की काय झालं होतं रे शिर्‍या." अवधूतने उत्सुकतेने विचारले तसा शिर्‍या रंगात आला.

"नुकताच कोल्हापूरात कॉलेजला प्रवेश घेतला होता. तिथल्याच हॉस्टेलवर राहायला. साधारण आठवड्यानंतर एकदा असाच रात्री १२.३० च्या दरम्यान कुठलातरी हिंदी पिक्चर बघून परत आलो होतो....

"असं रात्री उशीरापर्यंत बाहेर राहणं अलाऊड असतं?"

शिर्‍याने एकदा अवधूतला आपादमस्तक न्याहाळलं...

"बाळा तुम्हाला नसतं अलाऊड पण आम्हाला असतं. समजलं...?" तसा औध्या गोरामोरा झाला.

"तर काय सांगत होतो, रात्री उशीरा परत आलो हॉस्टेलवर. तर आपल्या रुमच्या बाहेरच्या बाजुला एकजण व्हरांड्यातच पथारी टाकून वाचत बसला होता. हातात चक्क फिजिक्सचं पुस्तक. कॉलेज सुरू होवून आठवडा झाला नाही तोवर अभ्यास करणारा हा प्राणी पाहून अंमळ गंमत वाटली मर्दा. पण हा रात्री असा रुमच्या बाहेर का बसलाय? माझी उत्सुकता चाळवली आणि त्याला विचारलं, तर उत्तर आलं."

"माझी रुम सिनिअर्सना हवीय झोपण्याकरता, म्हणुन त्यांनी मला बाहेर झोपायला सांगितलेय."

"मी त्याच्याकडे पाहातच बसलो...., अबे पण तु पण पैसे भरलेत ना हॉस्टेलचे?"

"ते चार-पाच जण आहेत मित्रा, पुन्हा इथले सिनिअर्स...! त्यांच्याशी वाकडे कोण घेणार?"

आपलं टाळकं सटकलं.....

"कुठली रुम रे तुझी? दाखव मला...

"जावू दे ना मित्रा ! मी सतीश देशमुख... तुझं नाव काय? कुठला आहेस?"

"ते सगळं नंतर सांगेन. मित्र म्हणतोस ना मला, मग चल. च्यामायला भडव्यांच्या......."

तो नको नको म्हणत असताना त्याला बरोबर घेवून त्याच्या रुममध्ये शिरलो. एकेकाला असा काय चोपलाय म्हणुन सांगतो... एकेक हाड ना हाड खिळखिळं करून टाकलं. वर हाग्या दम भरला... पुन्हा जर आपल्या दोस्तांच्या वाटेला जाल तर गाठ आपल्याशी आहे."

"मग पुढे काय झालं? त्या लोकांनी तक्रार केली असेल ना."

"ते कसली तक्रार करतात रे. असा हाणला होता एकेकाला. पण त्यानंतर या येड्याने काय करावं. तशा रात्री रिक्षा आणुन , कुठुन आणली कोण जाणे पण आणली आणि त्या लोकांना दवाखान्यात पोचवलं. परत आल्या आल्या आमच्यावर बाँब टाकला."

"माफ कर मित्रा, पण आपलं नाय जमायचं. मला हा असला हिंसाचार अजिबात पसंत नाही. आपल्याबरोबर मैत्री करायची असेल तर हे नाही चालणार."

"तुला खरं सांगतो औध्या, तोपर्यंत कधी बापाचं पण ऐकलं नव्हतं...पण या माणसाने काय जादू केली कुणास ठाऊक... पहिल्याच भेटीत त्याला सांगून टाकलं चल दोस्ता यापुढे तु सांगेस्तोवर कुणावर हात उचलणार नाही. तेव्हापासुन जी सत्याची आणि माझी दोस्ती जमली ती थेट आत्तापर्यंत कायम आहे. सत्यासारखी दोस्त शोधून सापडणार नाही राव. तुला सांगतो तोपर्यंत आपलं रेकॉर्ड होतं... कधीच पास क्लास सोडला नव्हता आपण. साला या सत्याच्या नादाला लागलो आणि घाण केली....

"बी.एस.सी. ला चक्क डिस्टिंक्शन घेतलं.......!"

औध्या मनापासून हासला. हासत हासतच त्याने शिर्‍याला कोपरापासुन हात जोडले, पायात बुट चढवले आणि दाराबाहेर पडला.

दुपारी साधारण एक्-दिडच्या सुमारास अवधूतचा मोबाईल वाजला.

"औध्या, मी शिर्‍या बोलतोय. मला सत्याच्या ऑफीसचा पत्ता हवाय, लगेच.. आत्ताच्या आत्ता. तुझ्याकडे आहे? निदान फोन नंबर तरी दे. मी काढेन पत्ता शोधून. इट्स वेरी अर्जेंट!"

तसा अवधूत चमकला.

"का रे? तुला अचानक सत्याच्या ऑफीसचा पत्ता कशाला......

"तुला पत्ता दे म्हटले ना. उगाच फालतू प्रश्न विचारून डोके फिरवू नको. संध्याकाळी भेटल्यावर सांगेन सगळे. आता आधी पत्ता दे."

शिर्‍या सॉलीड भडकलेला होता.

अवधूत चमकलाच. शिर्‍याचे हे रुप त्याला नवीन होते. हा माणुस त्याच्या उभ्या आयुष्यात कुणावर चिडला असेल यावर विश्वास ठेवणेच कठीण होते. आणि तोच शिर्‍या आज चक्क अवधूतवर डाफरत होता. अवधूतने त्याला सत्याच्या ऑफीसचा पत्ता दिला.

"संध्याकाळी लवकर ये रे रुमवर."

"हं....!"

अवधूतला आता मात्र काळजी वाटायला लागली होती. शिर्‍याचे नक्कीच काहीतरी बिनसले होते. अन्यथा शिर्‍यासारखा थंड डोक्याचा माणुस एवढा चिडतो ..... याचा अर्थ काय?

संध्याकाळी अवधुत रुमवर पोहोचला तेव्हा रुमला कुलूप होते.

हळु हळु रात्र व्हायला लागली. शिर्‍याचा अजुन पत्ता नव्हता, तशी अवधूतची चिंता वाढायला लागली. एरवी उशीर होणार असला की शिर्‍या आठवणीने फोन करायचा. पण आज फोनही नाही.

साडे दहा - अकराच्या दरम्यान कधीतरी शिर्‍या घरी परत आला. त्याच्याकडे बघितले आणि अवधुतच्या शरीरावर काटाच आला. शिर्‍याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. चेहर्‍यावर बँडेज होते. पँट गुडघ्यावर फाटलेली....

अवधूत घाबरून पुढे झाला.

"शिर्‍या, अरे अपघात वगैरे झाला की काय तुला? कुठे पडलास का? इंटरव्ह्यु कसा झाला?"

शिर्‍याने मान वर करून अवधूतकडे पाहीले. ती नजर.... शिर्‍याची ती नजर नेहमीची मिस्कील नजर अजिबात नव्हती. त्यात एक कमालीचा थंडपणा होता. शिर्‍याने काहीही न बोलता खिशात हात घातला आणि एक मुडपलेले पाकीट बाहेर काढले. अवधुतच्या हातात दिले.

अवधूतने पाकीट उघडलं, आत काही कागदपत्रे आणि काही क्रेडिट कार्डस आणि एक डेबिटकार्ड होते......डेबीट कार्डवर छापलेले नाव वाचले आणि अवधूत हादरला....

सतीश देशमुख !

अवधुतने लगेच सारी क्रेडीटकार्डे देखील पाहीली ... त्यावरही नाव होते.... सतीश देशमुख !

अवधूतने सारी कागदपत्रे काढली.... ते म्रुत्युपत्र होते.... सतीश देशमुख अर्थात सत्याचे. त्या द्वारे सत्याने आपली सारी स्थावर्-जंगम मालमत्ता शिर्‍याच्या नावाने केलेली होती. अवधूत डोळे फाडून फाडून ती कागदपत्रे पाहायला लागला.

"या सत्याने एवढ्या लवकर आपले म्रुत्युपत्र का बनवून ठेवलेय? आणि हे सगळे तुला कुठे मिळाले?"

तसा इतका वेळ शांत असलेला शिर्‍या ढासळला. इतका वेळ जमा करुन ठेवलेला त्याचा धीर संपला आणि शिर्‍या एखाद्या लहान मुलासारखा अवधूतच्या गळ्यात पडुन रडायला लागला. अवधूतला काहीच कळेना.

"औध्या......... माझा दोस्त गेला रे. मारला त्या भडव्यांनी त्याला."

अवधूतला हा जबरद्स्त शॉक होता. तो मटकन खालीच बसला.

"शिर्‍या.....

"त्यातल्या एकाला तर आजच संपवलाय मी. या माझ्या हातांनी त्याची मान मोडलीय मी. त्यातल्या एकाला पण सोडणार नाहीय मी. एकेकाला रक्त ओकायला नाही लावले तर नावाचा शिर्‍या नाही. पण त्याच्या आधी ज्या कामासाठी माझ्या दोस्ताचा जीव गेला ते काम पुर्ण करणार आहे मी."

शिर्‍याच्या एकेका शब्दात अंगार भरलेला होता जणु.

"शिर्‍या तु काय बोलतोयस मला काहीही कळत नाही. अरे सत्या तर परदेशात गेलाय ना....?"

अवधूतचा स्वर रडवेला झालेला होता. गेल्या तीन वर्षात सत्याशी खुप घट्ट मैत्री जमली होती त्याची. त्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सत्या सख्ख्या भावासारखा त्याच्या पाठीमागे उभा राहीला होता ठामपणे. तो जिवाभावाच मित्र आता या जगात नाही ही कल्पनाच त्याला मान्य होत नव्हती.

जरा वेळाने शिर्‍या शांत झाला आणि हळु हळू बोलायला लागला.....

"या सगळ्या गोष्टीला साधारण सहा महिन्यापुर्वी सुरूवात झाली. सत्याला इव्हेंट मॅनेजर म्हणुन प्रमोशन मिळाले आणि..............

*****************************************************************

क्रमशः

विशाल कुलकर्णी.

गुलमोहर: 

विशाल भाऊ,तुमच्याविरुद्ध तक्रार करायला हवी अ‍ॅडमीन कडे आता क्रमशः बद्दल.
लवकरात लवकर पुर्ण करा बरं कि गोष्ट.
बादवे,लय भारी. Happy

अरे काय???? परत क्रमशः:: Angry

त्याला पुरेसा वेळही मिळाला नाही. विसादेखील तत्कालमध्ये अर्ज करुन घ्यावा लागला म्हणे. >>>>व्हिसा की पासपोर्ट???? व्हिसा तत्काळमध्ये मिळतो हे पहिल्यांदाच ऐकतेय.

आईची कटकट... आला का हा क्रमशः परत....
विशाल सिरीयल पहात असल्यासारखे वाटू देऊ नकोस बरका... उत्कंठा वाढवत न्यायची आणि धाडकन क्रमशःचा बोर्ड लावायचा... सारख सारख चालणार नाही हे..

सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

आऊटडोअर्स चुकीबद्दल क्षमस्व आणि चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. आता चुक सुधारलीय. Happy

एक मात्र खरं.... तुम्हीही लय(च) बिलंदर आहात. ओघवती आहे कथा...

विनंती: - जास्ती दिवस लावु नका (क्रमशः) च्या पुढचं टाकायला....

एकुण: - मस्त. एकदम झकास! ए-वन. लिहा~~~

विशाल भाऊ,तुमच्याविरुद्ध तक्रार करायला हवी अ‍ॅडमीन कडे आता क्रमशः बद्दल.>>>>>> खूप मोदक!
प्लीज लवकर पूर्ण कर रे.

परत क्रमशः .:( एक तर किती दिवसांनी हा भाग आला आहे. किती ठरवलं होतं पूर्ण गोष्ट आल्याशिवाय वाचायची नाही पण विकू नाव बघून रहावत पण नाही वाचल्याशिवाय Happy लवकर पुरी कर रे बाबा

मस्त रे विशाल ! कथेचा फ्लो अगदी मस्त आहे. Happy
मी काही नाही बोलणार क्रमशः विषयी , कारण कामातनं वेळ काढुन एवढी मोठी कथा लिहायची म्हणजे वेळ लागणारचं .

विशल्या, साल्या मानल तुला...
नादखुळा तुझा... मी पहिला भाग वाचला न्हवता [माबो ला अक्सेस न्हवता तेव्हा] त्यामुळे आता सलग २ भाग वाचून काढले...
तुला फोन करू का रे? मला सांग ना पुढ्ची कथा...
क्या करे कंट्रोल नही होता...

लय लय भारी...

Pages