'वाट'
दोआ विमानातल्या तिच्या सीटवर सावरुन बसली. नेहमीसारखीच सावध. ती अजुनही निश्चिंत झाली नव्हती. उलट या क्षणी मनात भावभावनांचा कल्लोळ उठला होता. सुटकेचा आनंद, अविश्वास, हुरहुर, अधीरता आणि कुठेतरी थोडी भीती. हे सगळं निरर्थक तर ठरणार नाही नां? खोल श्वास घेत एअर होस्टेसनं आणुन दिलेल्या कॉफीचा सुवास तिनं आतपर्यंत भरुन घेतला.
*********************
"दोआ तू इतकी चवीनं कॉफी घेते आहेस की मला पण आताच कॉफी प्यावीशी वाटतेय." तिची कलीग सना कौतुकानं म्हणाली. सना खर तर दोआपेक्षा काही वर्षांनी मोठी आणि म्हणुनच तिच्यावर ताईगीरी करणारी. दोआ पटापट प्रोमोशन्स घेत तिथवर पोचली. ती अगदी जिनिअस नसली तरी बर्यापैकी हुषार होती. एकुणच आवडीचं क्षेत्र आणि मेहनती स्वभावाची जोड त्या हुषारीला मिळाल्यामुळे प्रमोशनच्या पुढच्या पायर्याही ती लवकरच चढणार होती. त्याच दिवशी तसं झालं. दोआला प्रमोशन मिळालं आणि चीफ इंजिनियर्सच्या गटात तिचा समावेश झाला. इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैन यांच्यासाठी बनत असलेल्या चार खास राजवाड्यांच्या बांधकामाची जबाबदारी असलेले हे लोक. तिच्या वडीलांचा आनंद आणि अभिमान चेहर्यावर मावत नव्हता. दोआला तर आकाश ठेंगणं झालं होतं. तिनं इतकं मोठ्ठं स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं कधी.
नव्या लोकांबरोबर काम करता करता ती रुळत गेली. भरपूर काम, सतत ओव्हरटाईम यात दिवस कसे जात होते कळलंही नाही. प्रोजेक्टमधलं कुठलंही छोटंसुद्धा मोड्युल पुरं झालं की त्यांच्या छोट्याशा गृपची कँटीनमधे पार्टी पक्की. जवळजवळ सहा महिन्यांनी तिच्या लक्षात आलं की सगळ्यांसोबत अगदी सहज वावरणार्या तिला साद शी बोलतांना काय बोलत होतो हेच विसरायला होतंय. तो जवळपास असला की उगाचच छान वाटत राहतं. सगळ्यांशीच तिची मस्त मैत्री होती पण हे जरा स्पेशल काहीतरी होतं.
"आज पार्टी 'सी शेल' मधे करायची आहे. ८ वाजता शार्प. म्हणजे आणखी १ तासात. ओके विथ यू?" साद.
"शुअर. मी घरी निघालेच आहे. सी यू देअर" दोआ.
आठ वाजता तिथे फक्त हे दोघेच.
"बाकी कुणीच येणार नव्हतं आणि मला फक्त तुझ्याशी थोडं बोलायचं होतं."
"हां बोल." वरवर शांत राहण्याचा प्रयत्न करतांना तिला जरा जास्तच कष्ट पडत होते.
"आधी जेवु. भूक लागली आहे खूप."
काम, ऑफीस, कलिग्सबद्दल गप्पा करता करताच जेवण झालं. पार्किंग लॉटपर्यंत चालत जातांना दोघांनाही काही बोलायला सुचलच नाही. मैत्रीतल्या सहजतेला मनातल्या धडधडीची दृष्ट लागल्यासारखं झालं. गाडीजवळ गेल्यावर तिचा हात हातात घेवुन तो म्हणाला, "मला तू खूप आवडतेस दोआ. वुड यू वॉक द रोड ऑफ लाईफ विथ मी हँड इन हँड?" त्याचे डोळे, ती नजर, तो स्पर्श आणि त्या वाक्यांमधल्या प्रामाणिकपणानं ती भारावून गेली. हलकेच हसत तिनं मानेनंच होकार दिला आणि म्हणाली, "वेल लेट अस हिट द रोड!"
एका आठवड्यानंतर एंगेजमेंट झाली आणि ३ महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. घरी पोचताच बाबा म्हंटले, "आज आई हवी होती बेटा." त्यांना खुर्चीवर बसवत दोआ म्हणाली, "तुम्ही आहात बाबा. आई आणि तुम्ही वेगळे थोडेच आहात?" गेल्या ८ वर्षांत आई नाही हे तिला जाणवु नये म्हणुन बाबांनी खरच खूप केलं. एकमेकांना जपत, आधार देत आणि सांभाळुन घेत आपापल्या परीनं दोघंही त्या घावाची हुळहुळ सोसत होते. " मी कुठे दूर जातच नाहीये. ईथेच तर आहे. आपण जवळच राहू." मग लग्न, नातवंडं अशी कितीतरी स्वप्न रंगवत बाबा तिच्याशी उशिरापर्यंत बोलत बसले.
त्यांच्या आवडत्या जागी जातांनाही पोहोचेपर्यंत दोघेही गप्प होते. तिथे बसल्यावर सादनं विषय काढला.
"आज मुनाफसरांना अटक झाली. मिटींगमधुन नेलं त्यांना."
"कळलं मला. काही कारण समजलं?"
"अजून नाही. पण असं म्हणतात ते कुर्दीश आहेत म्हणुन काहीतरी प्रोब्लेम झालाय."
"काहीतरीच काय! तू पण कुर्दीश आहेस, शादाबसर, बाना, जोसेफ आणखी कितीतरी आहेत."
"शादाबसर परवापासून रजेवर आहेत. काल त्यांना कॉल करत होतो तर काहीच उत्तर नाही." आवाज अगदी खाली आणुन तो हळूच म्हणाला, "मला असं कळलय की ते गुपचूप देशाबाहेर गेलेत. समथिंग इज हॅपनिंग. आय डोंन्ट हॅव गुड फिलींग अबाउट इट. "
"सोड नां. आपला काय संबंध? आपण एकमेकांना सोबत आहोत नां? सगळं ठीक होईल"
मग बराच वेळ आपापल्या विचारात अबोलपणानं ते लाटांकडे बघत राहिले. लाटासुद्धा नेहमीसारख्या उचंबळुन अधीरपणे काठाच्या गळ्यात न पडता, उगाच जिवाच्या कर्माला म्हणुन पाय ओढत त्याच्याकडे येत होत्या. शेवटी ते निघालेच तिथुन.
"मला आजच्या आज देशातून बाहेर पडलं पाहिजे." साद ला धाप लागली होती. तो अक्षरशः पळत घरात आला होता.
"काय बोलतोयस तू? किती दिवसांसाठी?" दोआ गोंधळुन म्हणाली.
"नीट ऐक दोआ. खूप भयंकर घडतय सगळं. हे जे काय आमच्या(कुर्दीश ) लोकांबद्दल ऐकलय ते खरच आहे असं दिसतय. मुनाफ सरांना १० दिवसांपुर्वी अटक झाली होती आठवतय? ते अजून घरी परतले नाहीत. त्यांच्या घरातल्यांना कुणी काहीच सांगत नाहीये."
"पण -"
"उद्या ऑफिसात गडबड होणार आहे. प्रत्येक क्षण धोक्याचा आहे. मला आज दुपारीच आतून खबर मिळालीय. मी इथुन जॉर्डनला जाणार आहे. मग पुढचं पुढे."
"केव्हा निघतोयस?"
"आत्ताच."
"ओके. तू परत कधी येशील?" परिस्थितीचा गंभीरपणा अजून तिला बोचला नव्हता.
त्यानं असहाय्यपणे पाहिलं तिच्याकडे. तिचं मन कळवळलं आणि चटका बसावा तसं तिला परिस्थितीचं भान आलं. बधीरलेला मेंदु क्षणात सावध झाला.
"मला माहिती नाही." त्यानं सांगण्याआधीच तिला कळलं होतं.
"आणि आई बाबा?"
"मी बेकायदेशीर जातोय. त्यांना हा प्रवास सहन होणार नाही. त्यांनी लंडनला ताईकडे जायचा प्रयत्न करायचा असं ठरलं आहे. मी सुरक्षीत जागी पोचलो की तुला कॉन्टक्ट करतो."
"मी तुझी वाट पाहीन साद. अनटिल द एन्ड ऑफ द रोड." त्यानं न राहवुन तिला घट्ट मिठी मारली.
हॉर्न ऐकताच तो केव्हड्यांदा दचकला. तिनं मोठ्या कष्टानं मिठी सोडवली आणि त्याचा हात धरुन फाटकाकडे निघाली. आसवांच्या पडद्यापलीकडे दूर जाणार्या गाडीकडे ती बघत राहिली.
दुसर्या दिवशी सकाळी ऑफिसात एकच गोंधळ होता. सगळ्या कुर्दीश कलिग्सना अटका झाल्या होत्या. तिला वेगळं बोलावुन चौकशी सुरु झाली. साद कुठे आहे? तो कधी परत येणार आहे? दिवसभर प्रश्नोत्तरं सुरु राहिली. रात्री ११ वाजता तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली. शरीरानं आणि मनानं ती अगदी गळुन गेली होती. आधीच ठरवल्याप्रमाणे 'तो कुठे आहे/गेलाय?' हा प्रश्न सोडुन इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणानं दिली होती. आता तिला तिच्या बाबांची आणि सादच्या आईबाबांची काळजी लागली होती. बाबांना आदल्या रात्री सगळं सांगितलं असल्यामुळे ते त्याच्या घरी तिची वाट पाहणार होते. ती सरळ तिकडेच गेली. तिथे तिला कळलं कि आईबाबांना दुपारीच पोलीस स्टेशनला नेलय. शेजारच्या एका कुर्दीश कुटुंबातल्या काही जणांसुद्धा नेलं होतं. त्या दिवसानंतर दोआचं आयुष्य प्रचंड एकसूरी झालं. रोज पोलीस स्टेशनमधे जावुन आईबाबांबद्दल काहीतरी माहीती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि 'आम्हाला काहीही कल्पना नाही' हे ऐकून घ्यायचं. ऑफिसात जावुन डिमोशननंतर मिळालेल्या पदावरचं निर्बुद्ध काम करायचं. घरी खचून गेलेल्या बाबांना सांभाळायचं. कधीतरी हे सगळं शांत होईल, साद परत येईल आणि आपलं आयुष्य परत सुरळीत होईल या मनातल्या कोमेजत जाणार्या आशेला जिवंत ठेवणं हे सगळ्यात अवघड झालं होतं.
तीन वर्ष उलटुन गेलीयत हे सनाशी बोलतांना तिनंच म्हंटलं म्हणुन कळलं दोआला. थोडा वेळ गप्पा मारुन ती घरी आली त्यावेळी संमोहनातून नुकत्याच बाहेर आलेल्या माणसासारखं वाटलं तिला. आसपास काय चाललय हे सगळं समजल्या न समजल्याच्या रेषेवर, कुठलाही हेतू, काहीही ध्येय नसलेल्या हालचाली. सगळ्या जगाचं अचानक भान यावं तशी विचारशक्ती जागी झाली. सुरवातीला बावचळली. मग मात्र बुद्धीनं अगतिकतेची झापडं क्षणात काढुन फेकली आणि दोन गोष्टी लख्खपणे तिला जाणवल्या.
एक म्हणजे हे सगळं बदलणार नाहीये उलट दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच बिघडतेय. आणि
दुसरं असं की रस्त्याच्या शेवटापर्यंत सादची वाट पाहणं हा पर्याय उरलाच नाहीये कारण हा रस्ता त्याच्यासाठी कायमचाच बंद झालाय.
आपण तीन वर्ष अशी काही न करता वाया घालवली याची हळहळ, पश्चात्ताप आणि चीड मनात दाटुन आली. विचारांचं वारं बेफाम सुटलं आणि उलट सुलट प्रश्नांच्या पावसात ती भिजत राहिली. आता पुढे काय? इथे राहिले तर साद शिवायच आयुष्य जगावं लागणार. ते शक्य नाही. पण बाहेर जायचं तर कुठे? कसं? आपल्याला जमेल का? जाता येईल का? बाहेर पडल्यावर काय? मग बाबांचं काय? सादच्या आईबाबांचं काय? त्यांच्याबद्दल काही म्हणजे काहीही कळलं नाही अजुन. ते आहेत कि नाहीत याचीही खात्री देऊ शकत नाही आपण. जॉबमधे त्याच त्या डिमोटेड जागेवर आहोत. अजून आपल्याला काढलं नाही हेच एक कोडं आहे. याचा अर्थ बाबा सोडले तर इथे आपण थांबावं असं काही उरलं नाही. मग त्यांच्या सकट जाता येईल का? आपल्याला पुढे काहीच दिसत नसतांना या वयात त्यांची किती फरपट करायची? बराच वेळ हे वादळ मनात घुमत राहिलं.
शेवटी ती एका निर्णयापर्यंत आली. तिनं एका आठवड्याचा प्लॅन केला. आधी एकटीनच ईजिप्तला जावं. तिथे निदान मोकळेपणी फोन करता येतील. सादच्या बहिणीकडुन त्याच्याबद्दल कळेल. तिला इथल्या परिस्थितीची नीट कल्पना देता येईल आणि काहीतरी प्लॅन करता येईल. मग परत येउन बाबांसकट इथुन बाहेर जाता येईल. नुसत्या विचारानीच सुटल्यासारखं झालं तिला. आधीच हे का नाही सुचलं हा विचार परत दुखवून गेलाच पण झालं ते झालं पुढे बघुन चालायचं असं तिनं पुन्हा सांगितलं स्वतःला. बाबा बर्यापैकी सावरले होते. त्यांना सगळं नीट समजावुन सांगितलं.
" तू मला घ्यायला परत येऊच नकोस. मी काय आज आहे उद्या नाही. कसाही राहीन. तू मात्र परस्पर सादला भेट आणि सुखात रहा. मग माझी काळजी मिटेल. तेच मोठ्ठं सुख असेल मरतांना."
"बाबा माझ्याजागी तुम्ही असता तर असं केलं असतं? मी तुम्हाला अशा ह्या परिस्थितीत एकटं सोडणं शक्य आहे का? मला तुम्ही हवे आहात. आता हे असे रडुबाई विचार नाही करायचे. आपण फक्त जिंकायचय यापुढे. आपण दोघं मिळून यातनं बाहेर निघायचय."
दुसर्याच दिवशी दोआनं व्हिजा,तिकीट याबद्दल माहिती गोळा करायला सुरवात केली. चार /पाच महिन्यात ईजिप्तला जाण्याइतपत सगळं जमुन आलं. बाबा आणि दोआ दोघांनाही खरं वाटेना. इतकं सोप्प होतं सगळं? का धास्ती वाटतेय इतकी? एकदा वाटे भीती इतकी रुजलीय मनात कि सहजासहजी काही होईल हेच आपल्याला खरं वाटत नाहीये. या अस्वस्थतेच जायचा दिवस उगवला. एक हँडबॅग एवढच सामान होतं तिचं. बाबांनी तिला सोडलं आणि ठरल्याप्रमाणे तिथेच थांबले. काही प्रॉब्लेम आलाच तर त्यांना ते कळलं असतं. बोर्डिंग पास देणार्या मुलीनं तिला सांगितलं की तिला कुठल्यातरी अधिकार्याला भेटावं लागेल. त्या अधिकार्यानं आधी तिच्या बॅगेची नीट झडती घेतली. लेडी पोलीसकडुन तिचीही संपूर्ण झडती घेतली गेली. " सॉरी मॅम पण तुम्ही आपला देश सोडुन जाऊ शकत नाही." शेवटी तो म्हणाला.
"काही स्पेसिफिक कारण?" उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
"तुम्ही प्रेसिडेंशिअल पॅलेसच्या बांधकामामधे सहभागी होतात. ४ महत्वाच्या पॅलेसच्या. तुम्हाला त्यांची खडानखडा माहिती आहे. येत्या काही वर्षात युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या, प्रेसिडेंटच्या आणि खरतर तुमच्याही सुरक्षीततेच्या दृष्टीने तुम्ही देशाबाहेर जाण्यात धोका आहे. या कारणासाठी तुम्हाला आणखी काही काळ देशाबाहेर कुठेही जायला परवानगी नाही. होप यू अंडरस्टँड अँड विल कोऑपरेट विलींगली."
"पण मी फक्त नातेवाईकांना भेटायला जातेय."
"आय अॅम सॉरी." मग आपला देश, आपले राष्ट्राध्यक्ष कसे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. किती सैनिक त्यांच्यासाठी प्राणपणाला लावून उभे आहेत. त्यामानानी तिनं नातेवाईकाच्या भेटीचा त्याग करणं ही किती छोटीशी गोष्ट आहे वगैरे सांगून आणि तुमच्या नातेवाईकांनाच इथे बोलवुन घ्या असा सल्ला देवुन त्यानं तिला घरी जायची परवानगी कम ऑर्डर दिली. निराश मनानं ती बाबांबरोबर घरी परतली. अगदी अनपेक्षित नव्हतंच ते. मनात मागे कुठेतरी हे सगळं वाटतं, दिसतं तितकं सोपं नाही हे पक्कं कळल्यामुळे ती अगदी खचून गेली नाही. बर्याच लोकांना देशद्रोह आणि पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विमानतळावर अटक केल्याचं ऐकलं होतं. त्यामुळे ती सुखरूप परत आली हेच बाबांना मोठं समाधान होतं.
घरी पोचल्यावर दोघेही आपापल्या विचारात होते पण खरंतर ते एकच विचार करत होते. याच घरात तिच्या प्रमोशनची पार्टी केली होती त्यांनी. सगळेच किती खूष होते. ज्यासाठी इतके कष्ट घेतले ते प्रमोशन, ती पोझिशन आपल्याला कधीतरी नकोशी होईल, आपल्या दुखा:चं मूळ होईल असं वाटायचं काही कारणच नव्हतं. आतातर ती पोझिशनही हिरावली गेली होती. आयुष्यात कधी पुन्हा प्रमोशनची शक्यता नव्हती. नोकरीतून तिला न काढण्यामागचं कारण आज तिला कळलं. तिच्यावर नजर ठेवणं सोपं व्हावं म्हणुनच अजूनही तिचा जॉब सुरळीत सुरु होता.
मग ती परत विचारांत गुरफटून गेली. यापुढे काय करता येईल? याबद्दल आणखी कुठे माहिती मिळेल? काय पर्याय आहेत? त्यांत किती रिस्क आहे? आपण कितपत रिस्क घेवू शकतो? कुठुन संधी मिळेल? काय तयारी करावी लागेल? एक मात्र नक्की कळलं होतं. आपण सतत सावध असायला हवं. डोक्यात काय शिजतय हे बाहेर कुणाला कळु नये. आपण नॉर्मल होतोय असं सगळ्यांना वाटायला लागेल असं वागायला हवय. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे जे करायचय ते थोड्या कमी वेगात झालं तर हरकत नाही पण घाई करता अजिबात कामा नये. स्वतःला फिट ठेवणं, बाबांनाही शक्य तितकं सुदृढ ठेवणं, त्यांना आशादायक वाटत राहील असं वागणं हे ही न कंटाळता सतत करत राहयचं. त्यांना हे सगळं योग्य वेळीच सांगायचं नाहीतर ते नुसती काळजी करत बसतात आणि प्रयत्न अयशस्वी झाला की त्यांचा धीर सुटतो. असं बरचं काही त्या मंथनातून ठरलं.
हळूहळू दोआनं मैत्रिणींबरोबरचं शॉपिंग, सिनेमे, शेजार्यांकडे, नातेवाईकडे जाणं येणं सुरु केलं. 'फार घाई करायची नाही' हे सतत लक्षात ठेवुन नीट ठरवून सगळं पूर्वीसारखं सहज होईपर्यंत बराच काळ जाणार होता. त्याच वेळी हवी असलेली संधी कुठून आणि कशी मिळतेय ह्याची शोधाशोधसुद्धा जोरदार करायची होती. दिवसाचं एकेक पान उलटत काळ पुढे जात राहीला.
आज बरोब्बर दोन वर्षांनी आपण ठरवलेलं सगळं व्यवस्थित जमवलय आणि ते आता सहज व्हायला लागलय या आनंदापेक्षाही जबरदस्त खूष करणारी एक गोष्ट तिला कळली होती. बगदादच्याच युनिव्हर्सिटीत Phd च्या फायनल परिक्षेच्या एक महिना आधी तीन दिवस जॉर्डन युनिव्हर्सिटीत रेफरन्स ट्रीप बक्षिस मिळते. दोन्ही वर्षांत तोपर्यंतच्या सगळ्या परिक्षा, चर्चासत्र, परिसंवाद या सगळ्याच्या कसोट्या पार करणार्या पहिल्या तीन जणांना हे बक्षिस मिळतं असं तिला कळलं. विचारांना दिशा मिळाली. विरुद्ध बाजुला दोन गोष्टी होत्या. एकतर तिला आधी मास्टर्स करावं लागणार होतं. म्हणजे आणखी तब्बल चार वर्षांनी तिला हवी असलेली संधी मिळणार होती अर्थातच पहिल्या तीनात असण्याच्या अटीवरच. दुसरी बाबांची प्रकृती वयोमानानुसार जरा खालावत चालली होती. तसं बघितलं तर त्या दिशेनी जायला काहीच हरकत नव्हती कारण या क्षणी दुसरा काहीच पर्याय तिच्याजवळ नव्हता. या काळात दुसरी संधी मिळाली तर ती घेता आलीच असती. मास्टर्सच्या प्रवेशासाठी अजून ६ महिने अवकाश होता. तिला तिचे विषय रिवाइज करता येणार होते. पुढच्या अभ्यासाचा आढावा घेणं शक्य होतं. बाकीचेही काही मुद्दे विचारात घेवून ते तिनं पक्क करुन टाकलं. बाबांना इतकचं सागितलं की नुसताच वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी शिकेन आणि दुसरी चांगली नोकरी मिळायला ते फायद्याचं होईल. त्यांनाही बरं वाटलं की पोरगी कुठेतरी मन रमवतेय. पुढचा काहीतरी विचार करतेय.
पुढचे सहाही महिने तिनं स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. आधीचे मार्कस आणि मुलाखत यातून तिचा प्रवेश सहज पार पडला. जॉब, अभ्यास, बाबांची देखभाल, आलागेला, शेजारी, मैत्रिणी, इतर संधीचा शोध या सगळ्यात दिवसाचे तास पुरे पडत नव्हते तिला. मास्टर्सच्या पहिल्या वर्षाचे रिझल्टस जाहीर झाले. दुसरा नंबर मिळाला आणि तिनं जरा हुश्श केलं. एक मोठा टप्पा पार झाला होता. बाबांनी छोटासा केक मागवुन हा रिझल्ट साजरा केला.
"बाबा अजून बरीच मजल मारायची आहे."
"त्यातला पहिला भाग यशस्वीपणे पार पाडलायस इतक्या कष्टानं. त्याचं कौतुक नको करायला? मी खूष आहे."
बाबांना सगळं सागितलं नाहीये याबद्दल खूप अपराधी वाटलं तिला. पण पुन्हा मन घट्ट करुन ती ही त्यांच्या आनंदात सहभागी झाली.
"दोआ बेटा तुला एक विचारायचं आहे."
"हं"
" काल क्लबमधे मुसा म्हणत होता की त्याच्या ......त्याचा झैद आणि तू ...म्हणजे.... तुझी तयारी असेल तर....तो चांगला मुलगा आहे."
"बट आय अॅम ऑलरेडी एंगेज्ड!" ती चकीतच झाली. असं काय बोलतायत हे? या गोंधळाआधी आत्ताच तर झाली नां एंगेजमेंट? ....ओह! आत्ता तर म्हणता म्हणता सात वर्ष होउन गेली?! बाबांच्या चेहर्यावरची वेदना तिच्या मनाला बोचकारुन गेली.
" बाबा, चला झोपायची वेळ झालीये." त्यांना औषधं देउन तिनं पांघरुण घातलं आणि त्यांचे पाय हलकेसे दाबायला सुरवात केली. अचानक खूप म्हातारे दिसायला लागले ते. बाबांनी तिचा हात हातात घेतला. 'लेकरा काय रे हे होउन बसलय! माझ्या गुणी बाळाच्या वाट्याला का हे आलय? तुझ्या मनातलं उमजतय. जरासं पटतय. पण असं आयुष्य नसतं गं पोरी. जीव तुटतो तुझ्याकडे बघतांना.' हे सगळ त्यांच्या डोळ्यात वाचलं तिनं. मग दुसर्या हातानं हळुवार थोपटत राहीली. ओलावलेले डोळे त्यांनी मिटुन घेतले. जरा वेळानं गाढ झोप लागली.
दोआनं ठरवलं उद्या बाबांना सगळं सांगुन टाकायचं. मास्टर्स, रिसर्च, बक्षिसाची ट्रीप सगळं सगळं. मग खूप शांत वाटलं तिला. उद्या सना ला भेटायला जायचय. तिला उद्याच्या उद्या पार्टी हवीय म्हणाली. तिलाही जराशी कल्पना द्यायची असं पक्क केलं आणि तीही झोपली.
दुसर्या दिवशी पार्टीच्या नावानी काहीबाही खाऊन झालं. पंधरा मिनीटांवरच घर होतं. मग नदीकाठी फिरायला जायचं ठरलं. तिनं सना ला सगळी कल्पना दिली आणि तीन वर्षात जॉर्डन, तिथुन सादच्या बहिणीशी बोलुन पुढे ठरवणार हे सगळं सागितलं. सना ला भरुन आलं. मग येणार्या दिवसांच्याबद्दल बोलत बोलत त्या दोआच्या घरी पोचल्या. बाबांनी पिझ्झा मागवला होता. तिघं मिळून थोड्या वेळानं खाऊ असं ठरवुन ते व्हरांड्यात गप्पा मारायला निघाले आणि एकाएकी बाबांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अॅम्बुलंस बोलावुन त्यांना हॉस्पिटलमधे नेलं. ते बेशुद्ध होते. डॉक्टरांनी त्यांना ताब्यात घेतलं. उद्यापर्यंत सगळं ठीक होईल म्हणाले.
कशीबशी ती रात्र एकदाची मावळली आणि दुसर्या दिवशी बाबा शुद्धीवर आले. "पंधरा दिवस कमीत कमी हॉस्पिटलमधे ठेवायला हवय. त्यांना त्रास होईल, एक्साइटमेंट होईल असं काही बोलु, वागु नका. अजून प्रकृती नाजूक आहे." डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिला आपलं गुपित तसंच ठेवावं लागलं. हळूहळू करता बाबा जरा बरे दिसायला लागले आणि एक दिवस अचानकच त्यांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलमधेच असल्यामुळे फार धावपळ झाली नाही पण केस गुंतागुंतीची झाली आहे. आशा आहे पण इथेच ठेवायला हवय असं डॉक्टरांच म्हणणं पडलं. तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त बाबा ठीक व्हायला हवे होते.
सगळ्या व्यापांमधूनही दोआ नं उत्तम मार्कांनी मास्टर्स पूर्ण केलं. Phd चं ही एक वर्ष संपत आलं. मधल्या काळात झालेल्या एकाच चर्चासत्रात ती भाग घेऊ शकली. तिनं सादर केलेल्या वेगळ्या विषयावरच्या प्रबंधाचं खूप कौतुक झालं होतं. आधी गोगलगायीच्या वेगानं सुधारणारी बाबांची प्रकृती समाधानकारक झाली होती. जेवणासाठी ते बिछान्यावरच पण उठुन बसायला लागले होते. डॉक्टरांना ते पुन्हा पूर्वीसारखे हिंडुफीरू शकतील याची खात्री नसली तरी त्यांच्या तब्येतीविषयी आणि प्रगतीबद्दल ते समाधानी होते.
त्या दिवशी बाबा बरेच उत्साहात होते. तिनं ठरवलं की आता त्यांना कल्पना द्यायला हवी कारण त्यांनाही सोबत यायचं होतं. या बातमीमुळे ते लवकर बरे होतील असा तिला विश्वास वाटला. तिनं त्यांना बक्षिसाच्या ट्रीपबद्दल सागितलं. " आता पासून एका वर्षात फायनल आहे बाबा. म्हणजे आणखी अकरा महिन्यांनी जॉर्डनला जाता येईल. डॉक्टरांशी बोलुन हवापालटासाठी म्हणुन तुम्हालाही घेवुन जायचं. तिथुन ईजिप्त आणि मग गुल!" बाबा फारच आनंदले. दोघेही खूप खूप खूष झाले.
एकदाच बाबा म्हंटले, "तू माझ्यात अडकु नकोस बेटा. एकटीच असलीस तर सुटकेची जास्त शक्यता आहे."
"बाबा दु:खाच्या काळात आपण एकमेकांना जपत सोबत केली. आनंदाच्या दिवसात मला तुमच्या शिवाय कसं राहवेल? मी सुखी असतांना मला बघावसं नाही वाटणार तुम्हाला? आता तर आपल्याला हे करुनच दाखवायचय."
"ठीक आहे. तुला साद पर्यंत पोहोचवण्यासाठी मला शक्य असेल ते मीही करीन."
" 'आपण' सादपर्यंत पोचण्यासाठी."
"येस. डन!" म्हणत गेल्या दोन वर्षात पहील्यांदाच बाबा मोकळेपणानं हसले.
अगदीच कुणाच्या लक्षात येवु नये अशा तर्हेनी २-३ दिवस बेत आखाले जात होते आणि बरोब्बर पाचव्या दिवशी दोआला सकाळीच घरी फोन आला. "सॉरी मिस दोआ. तुमचे बाबा गेले." ती हॉस्पिटलमधे धावली. पण सगळच संपलं होतं. डॉक्टर म्हंटले, " गेल्या दोन आठवड्यात त्यांची प्रकृती झपाट्यानं सुधारत होती पण दिवा विझण्याआधी ज्योत मोठी होते तसं होतं ते बेटा. खूप गुंतागुंत असल्यामुळे ते पूर्ण बरे होणारच नव्हते. आय अॅम सॉरी. यू बी ब्रेव्ह." बी ब्रेव्ह? ती मनातुन उन्मळुन पडली. बाबांच्या चेहर्यावरचं प्रसन्न हसू मात्र जराही मलूल झालं नव्हतं.
पुढे नातेवाईक, शेजारी यांनी जबाबदारी घेवुन सगळं व्यवस्थित केलं. दोआच्या मनाला अपराधीपणाच्या काळ्याकुट्ट ढगांनी वेढून टाकलं. गेले पंधरा दिवस तिनं स्वतःला घरात कोंडुन घेतलं होतं. सुरवातीला सतत रडल्यामुळे लाल झालेले डोळे आता जागरणानं खोल गेले. अश्रु संपले तरी रडणं संपलंच नव्हतं. ती आठवणीत पुन:पुन्हा ते चार पाच दिवस जगत होती. न जाणो कदाचित ती बाबांना काही सांगण्यापासून स्वतःलाच थांबवु शकेल आणि घडलेलं परतवु शकेल. आजही शेजारणीनी दिलेलं जेवण तसच होतं. "तू माझ्यात अडकु नकोस" "मला शक्य असेल ते मी करीन" "एकटी असलीस तर सुटकेची जास्त शक्यता आहे" बाबांचे शब्द सारखे आठवुन तिला पुन्हा वाईट वाटत होतं. कशासाठी सांगितलं त्यांना आपण? न सांगता नेलं असत की. सांगायलाच नको होतं. आज ते आपल्याजवळ असते. आपल्याला मोकळं करण्यासाठीच ते गेले. 'आपल्याला मोकळं करण्यासाठीच ते गेले.' हा विचार मात्र ढगांच्या तटबंदीतून सुटून आलेल्या चुकार चंद्रकिरणासारखा तिच्या मनात आला आणि मग ते काळेकुट्ट ढग निवळत राहीले आपल्याच गतीनं चांदण्याला वाट देत. तिनं ठरवलं आजवर सादपर्यंत पोहोचणं हे तिचं ध्येय होतं आजपासून मात्र ते कर्तव्य आहे.
महिनाभरापूर्वी तिनं ऑफिसला यायला सुरुवात केली होती. मन जरासं स्थिर झालं होतं. अभ्यासाला पूर्ण जोमानं सुरुवात झाली होती. "दोआ आज मला आपल्या जागी भेट ऑफिसनंतर." सना नं ऑफिसात आल्या आल्या तिला फोन केला होता.
"बोला. काय बातमी आहे?" त्या दोघी भेटल्यावर दोआ म्हणाली.
"तुझा विश्वासच बसणार नाही अशी बातमी आहे. माझं लग्न ठरलय."
"कम ऑन सना! तू इतकी काही 'ही' नाहीयेस. अभिनंदन! कोण आहे? काय करतो? फोटो आहे?"
"दोआ तो जॉर्डनला असतो. 'जॉ र्ड न'. कळतय का काही?"
"ओ माय गॉड!" दोआ शहारलीच!
"हे बघ तो माझ्या वडीलांच्या मित्राचा मुलगा आहे. झायद नाव आहे. पुढच्याच महिन्यात लग्न आहे. तू हा त्याच्या घरचा फोन नंबर घेवुन ठेव. तिथे आलीस की मला फोन कर. आम्ही सगळेच जॉर्डनला शिफ्ट होतोय. इथली परिस्थिती काही ठीक नाही. वरवर सगळं ओके असलं तरी आतल्या आत ढवळून निघतोय देश. " नंतर सगळा वेळ सनाचं लग्न, झायद, त्याच्या घरातले लोक वगैरे बद्दल गप्पागोष्टी होत राहील्या.
घरी आल्यापासून हा एकच विचार होता डोक्यात. तिचा नंबर पहीला नसला तरी पहील्या तिनांत नक्की असणार याची खात्री होतीच. फक्त आठ महिने! सना असणारच तिथे. त्यामुळे पुढची फारशी काळजी नाही. तिची मदत होईल. इथला मात्र विचार करायला हवाय. घराचं काय? काय करायचं? विकणं हा पर्याय नव्हताच. कायद्याच्या कुठल्याही भानगडीत तिला पडायचं नव्हतं. बराच विचार केल्यावर एकतर स्टॅंप पेपेरवर ते कुणाच्या तरी नावानी ठेवायचं किंवा घर चक्क तसच सोडुन जायचं. यापैकी जे जास्त बरोबर वाटेल ते करायचं. मग प्रश्न आला पैश्यांचा. बाबांच्या आजारपणात बाबांनी जमवलेले आणि तिच्या पगारातले बरेचसे पैसे खर्च झाले होते. शिल्लक खूप अशी नव्हती. ती आठवण म्हणुन वापरत असलेली आईची अंगठी होती. पंधरा तारखेला पगार मिळत असल्यामुळे आणखी सातच महिन्यांचा पगार हातात येणार होता. सात महिन्यांचा घरखर्च, तिच्या शिक्षणाचा म्हणजे फी, पुस्तकं वगैरेचा खर्च. ती परतणार नसली तरीही रीटर्न तिकीटच घ्यावं लागणार होतं. ट्रिप बक्षिस असली तरी येण्याजाण्याचा खर्च तिलाच करायचा होता. कारण देशाबाहेर जाण्याची परवानगी, जॉर्डन युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीला अॅक्सेस, त्यांच्या हॉस्टेल मधे लॉजिंग आणि तिथलीच मेस हे सगळं बक्षिसात येत होतं. जॉर्डन नंतरच्या प्रवास, निवासा साठी काहीतरी रक्कम हाती असणं गरजेचं होतं. असती तरी इतकी रक्कम सोबत घेवुन ती देशाबाहेर पडु शकेल का? हा देखील मोठाच प्रश्न होता. एकुणात मेळ जमणं जरा अवघडच होतं. पण जमवता येण्यासारखं होतं. गाडी गरज नाही म्हणुन एका दूरच्या नातेवाईकाला विकली. ते पैसे सनाकडे देउन ठेवले. मग मात्र तिनं अभ्यासाला जुंपून घेतलं.
सना आणि फॅमिली निघुन गेले. तसं तिला जरासं एकटेपण जाणवायला लागलं. पण तिला भरपूर काही करायचं होतं. ऑफिसात 'एकदा Phd झाले की मग कसं प्रमोशन मिळत नाही ते बघतेच. एकदा डिग्री हातात येऊ दे फक्त. नाही दिलं प्रमोशन तर दुसरी १० पट चांगली नोकरी मिळवेन' वगैरे हवा पसरवायची होती. नातेवाईक, शेजारी, इतर मैत्रिणी सगळ्यांना 'ह्या डिग्रीनं हिला पार झपाटून टाकलय' हा विश्वास वाटावा असं वागणं अशा बर्याच बारीक सारीक गोष्टी होत्या. तिनं केसांचाही घट्ट पोनीटेल बांधायला सुरुवात केली. एकाच एक हेअरस्टाइलमधे बघण्याची सवय झाली की अचानक बदललेल्या हेअरस्टाइल मधे माणूस ओळखायला वेळ लागतो.
आणि तो दिवस उजाडला. तिला 'ती' ट्रीप बक्षिस मिळाल्याचं पत्र तिच्या हातात होतं. विचार करता येईल त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेउन निरवानिरव झाली होती. दुसर्या दिवशी पहाटे निघायचं होतं. घर दूरच्या नात्यातल्या एका नवर्यानं सोडुन दिलेल्या बहीणीच्या नावानं करुन ते पेपर्स पाकीटबंद करुन तिचा पत्ता त्यावर घालुन तयार होतं. उद्या निघतांना ती ते पोस्ट करणार होती. आई, बाबा आणि ती असा एक फोटो फ्रेम मधुन काढून सोबत ठेवला होता. रॉकिंग चेअरवरच बसल्या बसल्या कॉफी घेत लहानपणापासूनच्या ह्या घरातल्या सगळ्या आठवणींनी तिला गराडा घातला. त्या आठवणींच्याच कुशीत, घरच पांघरुन घेउन ती केव्हातरी झोपली.
अलार्म वाजल्यावर सवयीप्रमाणे जाग आली पण लगेच त्या दिवसाचं वेगळेपण जाणवून ती पटापट कामाला लागली. आवरून, तयार होवुन तिनं घरासमोरच्या छोट्याशा बागेत एक फेरी मारली. सगळ्या झाडा, रोपांचा आणि घराचा निरोप घेवुन ती बगदाद विमानतळाकडे निघाली. इतर दोघी आणि एक प्राध्यापिका सगळ्यांनी तिथेच भेटायचं ठरलं होतं.
बगदाद ते अम्मान जेमतेम दीड तासाचा प्रवास. विमानतळावरुन त्या जॉर्डनच्या युनिव्हर्सिटी होस्टेलला ७.३० वाजता पोचल्या. तिथल्या रेक्टरनी त्यांचं स्वागत केलं. ती त्यांची वाटच बघत होती. कागदपत्रांचे सगळे सोपस्कार झाले. त्यांचे सगळ्यांचे पासपोर्टस जमा करुन घेवुन ते कुलूपबंद केल्यावर तिनं त्यांची रूम दाखवली. ती म्हणाली, "तुम्ही जरा फ्रेश व्हा. साडे आठला आपण माझ्या ऑफिसात भेटू. मेसमधे ब्रेकफास्ट घेऊ. मी तुम्हाला कॅंपस, लायब्ररी, इतर फॅसिलिटीज दाखवीन. मग आपण सोबत लंच करु आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागा. चालेल नां?" कुठेही जातांना अगदी स्वच्छतागृहाकडे ही जातांना इतर तिघींपैकी कुणाला तरी सोबत न्यायचं, एकटीनं फिरायचं नाही असा नियम रेक्टर आणि त्यांची प्राध्यापिका यांनी घालुन दिला.
रात्री मेसमधे जातांना दोआ थोडी नाणी आणि सनाचा नंबर घेवुनच गेली. तिथे फोन असल्याचं सकाळीच तिनं बघितलं होतं. इतरजणी गप्पांबरोबरच जरा पटपट जेवण उरकत होत्या. ती मात्र लक्षात न येईल अशी रेंगाळली होती. "दोआ तू-"
"तुम्ही निघा मी हे संपवून आलेच."
"पण एकटी?"
"मी जेवून लगेच येते. इथुन सरळ, १ ल्या डाव्या बाजूची तिसरी रुम. माझ्या नीट लक्षात आहे. डोंट वरी. निघा तुम्ही."
"ओके. नाहीतर १० मिनीटांत मी येते. तू इथेच थांब."
"मी येईन मॅम." त्या बाहेर गेल्यावर काही क्षणातच तिनं फोन गाठला.
"हलो मी दोआ बोलतेय. सना आहे का?"
"ओह दोआ! जरा थांब हं बेटा." झायदची आई असावी. काही सेकंदातच सनानं फोन घेतला.
"दोआ इथे आलीस तू? गूड! उद्या सकाळी ९.३० ला युनिव्हर्सिटीच्या मेन गेट समोर यायला जमेल?"
"हो."
"ठीक आहे. भेटू उद्या. बाय." तिला बाय म्हणायचही भान राहीलं नाही दोआला. फोन ठेवुन ती झपाट्यानं रुमकडे निघाली.
तिथे उद्याच्या अभ्यासाचं प्लॅनिंग सुरु होतं. काय झेरॉक्स करता येईल? कुठच्या डॉक्युमेंटस झेरॉक्स करायला परवानगी नाही. असंच काही तरी. तिनंही मनापासून त्या चर्चेत भाग घेतला. "मला वाटतं आज आणलेलं पुस्तक चाळुन काही महत्वाचे पॉइंट्स मिळाले तर बघू. लवकर झोपू आणि उद्या लायब्ररी उघडण्याच्या वेळीच तिथे पोहोचु म्हणजे लायब्ररीच्या कामाच्या वेळाचा पूर्ण उपयोग करुन घेता येईल." सगळ्यांनाच ते पटलं. "जरा पोट दुखल्यासारखं होतय." असं दोआनं म्हंटल्यावर "इतकी पुस्तकं मिळणार या आनंदात जास्त हादडलस तू. पोट नाही दुखलं तर नवल!" असं म्हणुन तिला चिडवत, गंमतीतच तो विषय संपला.
उद्या काय करायचं याचा आराखडा मनाशी तयार करुन शक्याशक्यतेचा विचार करत ती बिछान्यात पडुन राहीली. लायब्ररीतून उजवीकडे बाहेर पडल्यावर सरळ जायचं होतं फक्त. इमारत संपल्यावर १५ पावलांवरच मेन गेट! सनाशी चुकामुक झाली तर टॅक्सीनं विमानतळावर जायचं आणि मग सनाला फोन करायचा. अनिश्चिततेच्या झोक्यावर झुलत झुलत मन शेवटी बधीर झालं आणि दमुन ती झोपली. दुसर्या दिवशी लवकर उठुन सगळ्यांनी पटापट आवरलं. दोआ मेसमधे गेली पण पोटात गडबड आहे म्हणुन काही न खाता बसून राहीली. निघतांना एकदा जावुन येते म्हणुन सगळ्यांना थांबवलं तिनं. ८.३० ला त्या लायब्ररीत पोचल्या. आपापल्या विषयाची पुस्तकं काढुन एकाच टेबलभोवती अभ्यास सुरु झाला. ८.४५ च्या आसपास दोआ हळूच म्हणाली, "मॅम प्लीज सोबत चला नं." स्वच्छतागृह लायब्ररीपासुन जरा दूर होतं. ९ च्या आसपास पुन्हा, "मॅम प्लीज!"
"तू ठीक आहेस नं दोआ?"
"हो. जरा त्रास आहे पण होईन ठीक. कितीतरी अभ्यास उरकायचा आहे." ९.१५ ला तिनं पुन्हा तिच्या प्राध्यापिकेला टोकलं. यावेळी मात्र लायब्ररीच्या दारापर्यंत गेल्यावर दोआ म्हणाली, "जायची गरज नाही. परत जाऊ." ती बाई चांगलीच त्रासलीच होती पण सांगते कोणाला? तिनंच एकटं जायचं नाही असं सांगितलं होतं. इतर दोघींना डिस्टर्ब कसं करणार?
९.२५ ला दोआनं तिला सांगितलं, "मॅम मी जाते. तुम्ही नाही आलात तरी चालेल."
"बरं पण नीट जा. हरवु नकोस." बस्स्स! हेच आणि इतकच हवं होतं. दोआ लायब्ररीबाहेर आली. तिनं चालतांनाच केस मोकळे सोडले. घोळदार स्कर्टच्या खिशातला तिचा आईबाबांबरोबरचा फोटो चाचपला. पोटात खरोखर खड्डा पडलेला, हातापायांना जराशी थरथर सुटलेली. कुणी आपल्यामागे तर येत नाहीये नां? आपल्याला हाक मारत नाहीये नां? प्रचंड भितीनं जीव दडपुन गेलेला असतांना चेहरा, हालचाली जितक्या नॉर्मल ठेवु शकत होती तितक्या ठेवत, स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकत ती गेटपर्यंत पोहोचली आणि बापरे! ...समोर मोठ्ठा पार्किंग लॉट होता. सना आली असेल नां? तिला उशीर तर नसेल झाला? तिला मी दिसेन का? मी तिला कसं शोधू? काही क्षण युगांसारखे गेले आणि समोर आलेल्या कारचं दार उघडलं गेलं. सनाला बघताच झपकन आत बसून तिनं दार बंद केलं. भयातिरेकानं ती हुंदके द्यायला लागली. सनानं तिला कुशीत घेतलं आणि पाठीवरुन हात फिरवत तिला मोकळं होऊ दिलं. जरा वेळात ती सावरली.
"झायद ही दोआ. दोआ हा माझा झायद." त्या दोघांचं हाय हलो झालं. सनानं तिला एक सँडविच दिलं. खरंतर तिला गेलं नसतं पण सनापुढे इलाज नव्हता. सनानं शांत आणि स्पष्ट आवाजात सुरुवात केली. "आर यू ओके?" दोआनं हो अशी मान हलवली. "मी इथे आल्या आल्या सादच्या बहीणीशी बोलले. तिनं माझा नंबर सादला कळवला. लगेचच सादशी आम्ही बोललो. तो दुबईत आहे. ठीक आहे. सुरक्षीत आहे. तुझी वाट पाहतोय. आपण आता विमानतळावर जातोय. १० मिनीटांत पोहोचु. एका तासात दुबईला जाणार्या विमानात तुझं बुकींग केलय. हे तिकीट आणि हा पासपोर्ट. खोटा आहे. माझ्या सेंडऑफ पार्टीतला तुझा फोटो घेवुन झायदच्या मित्रानं बनवुन आणला. काहीही प्रोब्लेम येणार नाही. इथे २-३ तास ते कँपस मधेच शोधत राहतील. तोवर तू बाहेर गेलेली असशील."
"सना मी .. कसं .. थँक्स!"
"प्लीज डोंट. तुला काहीतरी मदत करता आली याचाच आम्हाला आनंद आहे. चला पोहोचलोच आपण." झायद.
दोघींनी हात घट्ट धरले. "याशिवाय दुसरं काही सुचणारच नाही गं. थँक्यु सो मच."
"दोआ तू नीघ आता. नंतर बोलुच." झायद म्हंटला.
चेक इन आणि पुढे सगळे सोपस्कार पार पडले आणि एकदाची विमानानं आकाशात झेप घेतली.
*********************
कॉफी संपवुन ती जरा मोकळी बसली. डोळे मिटुन शांत बसावसं वाटत होतं पण न जाणो डोळे उघडल्यावर हे फक्त स्वप्न असलं तर? ते मिटायला तयारच नव्हते. दहा वर्ष! कसे राहीलो आपण? साद कसा दिसत असेल आता? आपल्याही डोक्यावर सिल्व्हर इस्टेट जमा व्हायला लागलीय. कसं सांगायचं किती आठवण आली तुझी? कसं सांगायचं वाटेवरचे काटे दूर करतांना कितीदा रक्ताळले हात? कितीदा ठेचाळलं? किती दमछाक झाली? कसं सांगायचं स्वतःला सांभाळुन घेतांना किती कष्ट पडले? विमान जमिनीवर विसावे पर्यंत दोआ विचारातच गुंतून राहिली.
सनानं 'तो' पासपोर्ट, काही दिर्हाम आणि टीश्यु पेपरचा छोटा पॅक घालुन दिलेल्या छोट्या हँडबॅगे शिवाय काही सामान नव्हतच तिच्याकडे. सगळे सोपस्कार पार करुन ती फिरत्या जिन्यानं खाली येत असतांना २५ ते ३० पावलांवर असलेल्या काचेपलीकडे घ्यायला आलेले लोक होते. तिची नजर त्याला शोधत होती. तो .. तोच होता. बराच बदललेला, पूर्वी कपाळावर रुळणारे केस टाळुपर्यंत मागे गेलेले, पोटाचा घेर वाढलेला, चष्मा लावलेला, उंच केलेल्या हाताच्या मुठीत धरलेला कोट वेड्यासारखा गरगर फिरवत हसत असलेला तो सादच होता. पुढचं अंतर तिनं नकळत पार केलं.
ती बाहेर आली. एकेका पावलानं दहा वर्षांचं अंतर कापत ते जवळ आले. हातात हात घट्ट धरुन एकमेकांना डोळे भरुन बघितलं. काही सेकंदच असेल पण सगळी भीती, अनिश्चितता, दुरावा दोघांच्याही आसवांतून वाहून गेलं. 'कसं सांगु' ची गरज पडलीच नाही. या मानाचं त्या मनाला ते आपोआप पोहोचलं.
....वाट बघणं संपलं होतं.
हातात हात घालुन ते निघाले, आयुष्याची वाट शेवटपर्यंत सोबत चालण्यासाठी!
समाप्त.
तळटीपः
१) या कथेतल्या सगळ्या व्यक्ती (नावं अर्थातच बदलुन), घटना, त्यांचा क्रम खर्या आहेत. शब्द, संवाद, मांडणी याची (काही उणं अधिक असल्यास) जबाबदारी संपूर्ण माझी आहे.
२) चार वर्षांपूर्वी मी कॉर्पोरेट ट्रेनिंगमधे जॉब करत होते. एका ट्रेनिंग सेशनमधल्या चर्चेत एकानं म्हंटलं, "आता काय हाल चाल्लेत इराकमधे. अमेरीकेनी वाट लावुन टाकली त्यांची. यापेक्षा सद्दाम होता ते काय वाईट होतं?"
तेव्हा नुकताच अमेरीकेनी इराकवर हल्ला केला होता. मी म्हंटलं," असं आपण इथे बसुन कसं म्हणायचं? ज्यांनी ते अनुभवलय त्यांनाच ते ठरवण्याचा हक्क आहे." इथेच 'दोआ' ची आणि माझी तार जुळली असावी. कारण नंतर तिनं मला कॉफीसाठी इनव्हाइट केलं. "आज पहिल्यांदाच आणि तुलाच सांगावसं वाटतय" असं म्हणुन तिनं तिची गोष्ट सांगितली.
"मी ही गोष्ट माझ्या फ्रेंडसना सांगितली तर चालेल?" मी
" नक्की सांग. लेट देम नो हाऊ बॅड रेसिझम अॅंड वॉर इज." दोआ
तेव्हाच ही कथा लिहुन ठेवली होती. काही घटना खूप पर्सनल असल्यामुळे यात नाहीत. उत्कृष्ट लेखनासाठी असावी लागते तेवढी प्रतिभा माझ्याकडे नाही याची जाणीव असल्यामुळे अगणित वेळा लिहीत पुसत(पुसतच जास्त ), माझ्यातल्या वाचकाचा कौल घेत समाधानकारक वाटल्यावर तुमच्यासमोर ठेवली आहे.
पुढे काय झालं.....
दुबईतच दोआ आणि साद नी लग्न केलं. तिनं जॉब मिळवला. यथावकाश त्यांना जुळी मुलं झाली. त्यानंतरच आम्ही (२ मधे सांगितलेल्या) ट्रेनिंगमधे भेटलो. मग अधुन मधुन ३-४ महीन्यांतून एकदा बोलणं होई. मधल्या काळात मी जॉब सोडला. मुलाचं संगोपन, घर, रुटीन सुरू राहीलं. एकदा दोआचा फोन आला. खूष होती. म्हंटली, " आम्ही ऑस्ट्रेलियाला मायग्रेट करतोय."
" अभिनंदन. माझा नंबर, मेल आयडी आहेच तुझ्याकडे. वाट्टेल तेव्हा काँटॅक्ट कर." मनात म्हंटलं, "Have a good life!"
खूप इच्छा असुनही तिचा मेल आयडी विचारलाच नाही. तिला द्यायचा नसावा असं वाटलं. आपल्या सुखाच्या, प्रगतीच्या दिशेत आनंदानं निघालेल्याला मायेच्या, मैत्रीच्या कसल्याही धाग्यानं अडकवुन ठेवू नये असं मला वाटतं. मैत्रिण दिसली, भेटली नाही तरी मैत्री असणारच! माझ्या शुभेच्छा नेहमीच तिच्यासोबत आहेत. दोआच्या बाबतीत तर,
" जो घरों को छोड के है चले, उन्हे क्या डराएंगे फासले.... उन्हे क्या डराएंगे फासले ..........."
डोळ्यासमोर घडली कथा. फारच छान
डोळ्यासमोर घडली कथा. फारच छान लिहिली आहेस.
दोआ खूपच नशीबवान गं.. साद आणि सनाशिवाय हे तिला शक्य झालं असतं का? आज तिथे अडकलेल्या स्त्रीयांसाठी मात्र चुटपुट लागून राहिली फार
>>उत्कृष्ट लेखनासाठी असावी
>>उत्कृष्ट लेखनासाठी असावी लागते तेवढी प्रतिभा माझ्याकडे नाही >> खूप सुरेख लिहिलं आहेस श्रुती! तुझ्या म्हणण्यानुसार तू सराईत लेखिका कदाचित नसशील, पण अत्यंत आत्मीयतेने लिहिलं आहेस, दोआवरच्या प्रेमाने लिहिलं आहेस, हे जाणवलं. तीच तुझ्या लिखाणातली ताकद. दोआ, सना आणि अश्या अनेक जणींची व्यथा जिवंत केलीस!
खूप आवडली
खूप आवडली कथा.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता वगैरे किती गोष्टी आपण इथे आणि या परिघात जन्माला आल्यामुळे गृहित धरतो.
आपल्या सुखाच्या, प्रगतीच्या दिशेत आनंदानं निघालेल्याला मायेच्या, मैत्रीच्या कसल्याही धाग्यानं अडकवुन ठेवू नये असं मला वाटतं>>
असं आपण इथे बसुन कसं म्हणायचं? ज्यांनी ते अनुभवलय त्यांनाच ते ठरवण्याचा हक्क आहे>>> अगदी अगदी.
श्रुती, अप्रतिम झालीये कथा.
श्रुती, अप्रतिम झालीये कथा.
जी उत्कंठा 'नॉट विदाऊट माय डॉटर' वाचताना लागली होती, तशीच ही कथा वाचताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत उत्कंठा टिकून राहिली होती. त्या देशातली लोकं त्यांचं रोजचं जीवन कसं आणि कोणत्या ताणाखाली जगत असतील तेच जाणोत.
गुंतत गेले कथेत. छानच लिहीली
गुंतत गेले कथेत. छानच लिहीली आहेस. दोआला सलाम!
आवडली कथा, तुझी शैलीही.
आवडली कथा, तुझी शैलीही.
खुप सुरेख उतरवलयस.
खुप सुरेख उतरवलयस.
छान जमली आहे कथा.. आणि
छान जमली आहे कथा.. आणि लेखनाची शैली पण
श्रुती छान लिहीलयस की गं.
श्रुती छान लिहीलयस की गं. मला पण नॉट विदाउट माय डॉटर ची आठवण झाली.
प्रचन्ड आवड्ली ही कथा.. खलिद
प्रचन्ड आवड्ली ही कथा.. खलिद होसेनी च्या Thousand Splendid Suns ची प्रकर्षाने आठवण आली.
उत्कृष्ट लेखनासाठी असावी लागते तेवढी प्रतिभा माझ्याकडे नाही >> कोण म्हणतं असं? तुमची शैली फार सुरेख आहे!
छान लिहीली आहेस कथा. अगदी
छान लिहीली आहेस कथा. अगदी डोळ्यासमोर घड्त आहे अस वाट्त होत.
आवडली कथा, तुमची शैली पण छान
आवडली कथा, तुमची शैली पण छान आहे.. कुठल्या कुठल्या परिक्षांमधून जात असतात्..आपण आपल्या एव्हढ्याशा खरचटण्याला च कुरवाळत बसतो..सलाम धैर्याला..सलाम चिकाटीला..
अतिशय सुंदर श्रुती. दोआच्या
अतिशय सुंदर श्रुती. दोआच्या चिकाटीला नी साहसाला सलाम.
अप्रतिम कथा! >>असं आपण इथे
अप्रतिम कथा!
>>असं आपण इथे बसुन कसं म्हणायचं? ज्यांनी ते अनुभवलय त्यांनाच ते ठरवण्याचा हक्क आहे.
ह्यातच तू जिंकलस श्रुती. मायग्रेशन, रेसिझम आणि 'घर सोडणे' काय असतं, हे ज्याचं जळतं फक्त त्यालाच कळतं. पोचली कथा! पु.ले.शु,
छान लिहीली आहेस. कुणाला काय
छान लिहीली आहेस. कुणाला काय भोगावं लागेल काही सांगता येत नाही.
अतिशय सुंदर कथा, नकळत गुंतत
अतिशय सुंदर कथा, नकळत गुंतत गेले आणि भिती वाटत होती की काय होइल शेवट म्हणुन.
सत्यकथा म्हण्जे खरेच काय सोसावे लागत असेल याची कल्पनाही आपण करु शकत नाही.
श्रुती, अप्रतीम!!! तुझ्या
श्रुती, अप्रतीम!!! तुझ्या दोआला मनापासून शुभेच्छा! अशा असंख्य दोआंना आयुष्यात मुक्तीचा काही मार्ग मिळो ही सदिच्छा!!
मस्त जमलीये कथा !!!! ""नॉट
मस्त जमलीये कथा !!!! ""नॉट विदाऊट माय डॉटर"ची आठवण झाली..
लिहित रहा अजून...
छान लिहिली आहेस कथा
छान लिहिली आहेस कथा श्रुती..
दोआ पुन्हा कधी भेटली तर तिला माझा 'सलाम' सांग!
मस्त आहे कथा.. आवडली...
मस्त आहे कथा.. आवडली...
श्रुती, मस्त जमलिये कथा...
श्रुती, मस्त जमलिये कथा... सुरवात केली आणि पूर्ण वाचूनच थांबले...
खरंच कुणा-कुणाला काय दिव्य करावं लागतं आणि ते प्रत्येकजण कसं निभावतं! सलाम त्या दोआ आणि सादला आणि त्यांच्या एकमेकावरच्या विश्वासाला..
खूप टचिंग लिहीलेस. दोआने दहा
खूप टचिंग लिहीलेस.
दोआने दहा वर्ष कशी काढली असतील, कल्पना नाही करवते.
खरच सलाम दोआला. एवढ्या
खरच सलाम दोआला. एवढ्या ताणतणावातून तावून सुलाखून बाहेर पडली ती.
श्रुती छान जमलेय कथा.
श्रुती खूप छान झाली आहे कथा.
श्रुती खूप छान झाली आहे कथा. शेवटपर्यन्त खिळवून ठेवणारी. दोहा खरच नशिबवान आहे.
सुंदर लिहिली आहेस कथा श्रुती.
सुंदर लिहिली आहेस कथा श्रुती. वेगळया जगात घेऊन गेली.
छान कथा. तिथले वास्तव वाईट
छान कथा. तिथले वास्तव वाईट पण. दोआला शुभेच्छा.
छानच जमली आहे कथा! दोहा
छानच जमली आहे कथा!
दोहा नशिबवान आहे!!
चांगलं लिहिलंय. आपण किती
चांगलं लिहिलंय.
आपण किती सुरक्षित वातावरणात जगतो, इतकंच नाही तर ते किती गृहित धरून चालतो हे पुन्हा जाणवलं.
>> >>असं आपण इथे बसुन कसं म्हणायचं? ज्यांनी ते अनुभवलय त्यांनाच ते ठरवण्याचा हक्क आहे.
खरं आहे.
अप्रतिम! तुझ्याकडे प्रतिभा
अप्रतिम! तुझ्याकडे प्रतिभा नाही असं का म्हणतेस? "आपल्या सुखाच्या, प्रगतीच्या दिशेत आनंदानं निघालेल्याला मायेच्या, मैत्रीच्या कसल्याही धाग्यानं अडकवुन ठेवू नये असं मला वाटतं." -- तू लिहीलेल्या शेवटच्या चार ओळी वाचून डोळ्यांत पाणी आलं. भारावून टाकणारी कथा आहे दोआची. या धाडसाचा आणि ध्यासाचा काही अंश माझ्यात आला तरी मी स्वतःला धन्य समजेन. तिला सलाम आणि मनापासून शुभेच्छा. आपण विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य किती गृहीत धरून चालतो आणि किती लहानसहान समस्यांनी खचून जातो हे प्रकर्षाने जाणवलं ही कथा वाचून.
बापरे,काय काय कठीण प्रसंग
बापरे,काय काय कठीण प्रसंग येतात एखाद्याच्या आयुष्यात आणि आपण लहान-सहान गोष्टी मनाविरुध्द्ग घडल्या कि चिडचिड करतो.
कथा उत्तम जमली आहे .खिळवून ठेवणारी शैली आहे तुझी.पुलेशु!!
Pages