"शुभे... माझा रुमाल कुठे आहे? डबा भरलास का?"
मोजे घालता घालता राजनने स्वयंपाकघराकडे बघत नेहमीची हाक मारली.
"कॉटवरच आहे बघ. तुझं पाकीटही तिथेच आहे आणि लोकलचा पास, घराची चावी सगळे घेतले आहेस ना. मला यायला आज उशीर होइल. आज देशपांडेकाकांकडे जायचे आहे ना. सुबोध वाट बघत बसेल माझी. कॉटवरच ती फुलाफुलांची पिशवी पण काढून ठेवलीय. आज येताना दादरला उतरुन भाजी घेवून ये. आणि हो रानडे रोडवरच्या त्या मोतीवाले बंधूंकडे माझा मोत्याचा सर पॉलीश करायला दिलाय, तेवढा घेवून येशील आज?"
शुभाने स्वयंपाक करता करताच उत्तर दिले.
मोजे घातले, रुमाल आणि पैशाचं पाकीट खिशात टाकलं आणि तो आरशासमोर उभा राहीला.
"गार्निअर घेवून येशील का रे आज? तुझे केस फारच पांढरे झालेत. कसं दिसतं ते? "
"बघ ना दोनच वर्षात काळ्याचे पांढरे झाले." राजनने स्वतःवरच विनोद केला.
शुभाचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि डोक्यावरच्या सफेद होत चाललेल्या केसांकडे लक्ष गेलं आणि त्याला एकेकाळचं ते रेशमी वैभव आठवलं. या केसांवर भाळुन तर शुभा त्याच्या प्रेमात पडली होती. ते दिवस आठवले आणि राजन क्षणभर तसाच आरशासमोर रेंगाळला. त्याच्याही नकळत त्याचा हात हळूवारपणे केसातून फिरायला लागला..... डोळे कुठेतरी अज्ञातात हरवून गेले......
"अहो... राजे...., पुन्हा एकदा भुतकाळात शिरलात की काय? जागे व्हा? आणि पळा नाहीतर ७.२० चुकेल. भागो-भागो, जल्दी भागो."
शुभाने हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटत त्याला जागे केले. तसा तो पुन्हा वर्तमानात आला.
"खरेच गं, ते दिवस आठवले की अजुनही नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तुला आठवतं? बरोब्बर एक वाजता, दुसर्या मजल्यावर जिन्यापाशी येवून उभा राहायचो मी आणि राघव. मग थोड्यावेळाने तू तुझ्या मैत्रीणींच्या घोळक्याबरोबर तिथे यायचीस आणि हळूच गार वार्याची झुळूक येवून जावी तशी निघून जायचीस. तुला माहीतेय.... जवळजवळ दिड वर्षे.... म्हणजे एफ्.वाय. ला प्रवेष घेतल्यापासून ते एस.वाय. अर्धे होइपर्यंत रोजचा उपक्रम होता माझा हा. रोज ठरवायचो की आज बोलू... आज बोलू... पण धाडसच नाही झालं कधी. राघ्या शिव्या घालून थकला."
मनाने राजन अजुन तिथेच होता.
"हो रे... पहिले दोन महिने आम्हालाही काही कळालं नव्हतं. पण नंतर मेघनाच्या लक्षात आलं आणि मग तुझ्या नावावरून मला चिडवणं सुरू झालं. मला फारसा रस नव्हता तेव्हा तुझ्यात, पण तुझे रेशमी केस खुप आवडायचे मला....!"
बोलता बोलता शुभाने पुन्हा एकदा राजनच्या केसातून हात फिरवला. आता थोडेसे विरळ व्हायला आले होते, पांढरेही झाले होते. प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर धारातिर्थी पडत चालला होता. पण होते ते अजुनही तसेच मऊसुत होते. तिने केसातून हात फिरवला आणि राजन पुर्णपणे भानावर आला. "ए चल... उशीर होतोय. ७.२० चुकेल माझी. मी पळतो. संध्याकाळी दादर स्टेशनवर वाट बघतो तुझी. नेहमीच्याच ठिकाणी ४ नं. प्लॅटफॉर्मवर ."
"राजा... अरे मला उशीर होइल आज. साडे आठ तरी वाजतील. आज सुबोधकडून 'आसावरी' घोकून घ्यायचाय. गेले दोन शनीवार-रवीवार त्याच्यावरच खपतोय पठ्ठ्या !"
"होवू दे ना मग. मी थांबेन ना! तुझ्यासाठी एवढे तरी नक्कीच करू शकतो मी. किंबहुना सद्ध्या तरी एवढेच करू शकतो गं मी."
बोलता बोलता राजनच्या डोळ्यात पाणी आले... तशी शुभाने त्याच्या पाठीत धपाटा घातला...
"राजे पळा आता, उशीर होतोय. मी कधी तक्रार केलीय का? मग...?"
राजनने एकदा भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहीले आणि भरकन डबा उचलून घराच्या बाहेर पडला.
*******************************************************************************
राजन अरविंद मोहीते. सातार्यापासुन तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका गावातील एका सधन शेतकर्याचा मुलगा आणि आज एका छोट्याशा खाजगी कंपनीत खर्डेघाशी करणारा एक सामान्य कारकून. शुभांगी राजन मोहीते... त्याची पत्नी..... अगदी ऐश्वर्या राय नसली तरी नाकी डोळी निटस.... सुबक ठेंगणी म्हणता येइल अशी. पुर्वाश्रमीची शुभांगी गोडबोले. सातार्यातील ख्यातनाम फौजदारी वकील नानासाहेब गोडबोल्यांचं लाडकं शेंडेफळ. चिरंजीव दिवटे निघाल्यानं त्याच्या सार्या आशा लेकीवर एकवटलेल्या.......
......... सद्ध्या ती देखील एका खाजगी कंपनीत स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होती. त्याबरोबरच दोन विद्यार्थ्यांना गाणेही शिकवायची. सोमवार-मंगळवार ठाण्याच्या निनाद साठ्येंची मुलगी स्नेहा आणि शनिवार रवीवार दादरच्या अनिरुद्ध देशपांडेंचा मुलगा सुबोध. राजन आणि शुभा सातार्याला कॉलेजला शिकत असताना एकमेकाच्या प्रेमात पडले आणि एका विवक्षीत क्षणी लग्नाचा निर्णय घेतला गेला. टिपिकल फिल्मी कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही घरातून विरोध. त्यामुळे घरातून पळुन जावुन लग्न केलेले. स्थीर झाल्याशिवाय अपत्याचा विचार करायचा नाही असे ठरवुन टाकलेले. तेव्हापासुन गेले दोन वर्षे सतत आयुष्याबरोबर झगडा सुरूच होता. पण आहे त्या परिस्थितीत दोघे सुखात होते.
लोकल पुर्ण वेगात सी. एस. टी. कडे धावत होती. ट्रॅकच्या बाजुला असणार्या इमारती, झाडे त्याच वेगाने मागे पडत होती आणि राजनचे मन भुतकाळात घिरट्या घालायला लागले होते.
"राजा, आठवड्याभरात कॉलेज संपेल आणि मग आपल्याला कुठलाही निर्णय घेणे कठीण जाईल."
"शुभे , पण अजुन मला नौकरी नाही. एकदा लग्न केले की आंतरजातीय असल्याने आमचा आग्यावेताळ आपल्याला दारातही उभे करणार नाही. तु अशी सधन घरात वाढलेली......!"
नाही म्हटले तरी त्याच्या शब्दाने शुभा थोडीशी दुखावलीच.
"दिड वर्षात हेच ओळखलेस का मला?"
तसा राजन वरमला...
"ओके...बाबा कान पकडतो, सॉरी डिअर, यापुढे अजुन काही बोलू नकोस? डन....आपण लग्न करतोय.....! फक्त मला एक महिन्याचा कालावधी दे. बर्याच गोष्टी कराव्या लागतील. अगदी राहत्या घरापासुन ते नोकरीपर्यंत. प्लीज एवढा वेळ देच मला."
राजन अगदी अजीजीने बोलला तशी शुभाची कळी खुलली.
"आत्ता कसा योग्य मार्गावर आलास. तु ना राजा, अगदी अस्सा आहेस. सगळीकडे मीच पुढाकार घ्यायचा का? अगदी प्रपोज करण्यापासुन ते लग्नाची मागणी घालण्यापर्यंत.......!"
राजनने आपले दोन्ही कान पकडले. तसा मागुन कुणीतरी त्याच्या पाठीत एक जोराचा धपाटा घातला.....
राजनने मागे वळुन बघीतले तर राघव, सतीश, सुंदर, मेघना, शशी सगळाच गृप उभा होता.
"एकदाचं निर्णय झाला तर. चलो लेट्स पार्टी !" राघवने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये घोषणा केली.
"अबे पार्टी तर करुच पण पुढचं काय? फक्त एक महिना आहे माझ्या हातात आणि सगळ्या तयार्या करायच्यात. आमचा आग्यावेताळ तर घराबाहेरच काढणार बहुतेक मला. मग लग्नाला त्याची काही मदत होण्याचं तर सोडाच."
राजन थोडा चिंताग्रस्त झाला होता खरा. खरेतर त्याचे आई-वडील स्वभावाने खुप चांगले होते. पण शाण्णव कुळीचा जन्मजात ताठा होता. त्यातुनही एकदम "बामणाच्या पोरीबरुबर लगीन" म्हणजे वडील कंबरेत लाथ घालुन घराबाहेर काढणार याची खात्री होती.
"तु नको बे टेन्शन घेवू. आम्ही आहोत ना. हे बघ, कल्याणला खडकपाडयात आमची एक खोली आहे. वनरुम किचन म्हण हवे तर. ती काय आम्ही वापरत नाही. बाबा, भाड्याने द्यायची म्हणत होते. ती तुम्हाला देवू..... भाड्याचे बघू तुला नोकरी लागले की काही तरी टेकवू पिताश्रींच्या हातांवर....., हाय काय आन नाय काय !"
सतीशने महत्त्वाचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करुन टाकला तशी राजाने त्याला कडकडुन मिठीच मारली.
"आता राहता राहीला नोकरीचा प्रश्न तर तुला एखादी चांगली नोकरी लागेपर्यंत माझ्या बाबांच्या फर्ममध्ये पार्टटाईम क्लार्क म्हणुन तुला चिटकवून घेण्याची जबाबदारी माझी. फक्त मग रोज तुला कल्याण ते चर्चगेट असा प्रवास करावा लागेल."
मेघनाने एक जबाबदारी उचलली आणि राजनच्या डोळ्यात पाणीच आले. भरल्या डोळ्याने त्याने शुभाकडे पाहीले तर तिच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच....
"ऑल इज वेल" आणि वर, "बघ किती सोप्पंय सगळं, तू उगीचच काळजी करतो आहेस" असे भाव !
तिने फक्त मेघना आणि सतीशचे हात हातात घेवून घट्ट धरुन ठेवले. तसे सतीशने हलक्या हाताने तिच्या डोक्यावर एक टपली मारली...
"बावळट, आफ्टरऑल वुई आर फ्रेंड्स! "
"बरं चला, आता आधी शिवसागरवर धाड टाकुया आणि तिथे बसुनच काय ते ठरवु पुढचे."
राघवला खादाडीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते आणि स्पॉन्सर नेहमी तोच असायचा त्यामुळे कुणाचीच ना असण्याचेही कारण नव्हते.
मग शिवसागरला पोटोबाची आळवणी करतच पुढचे प्लानिंग झाले.
ठरल्याप्रमाणे शुभाने अगदी शांत राहायचे होते. मेघना, शशी आणि सुंदर शुभासाठीची खरेदी करणार होत्या. तर राघव, सत्या आणि राजन स्वतः बाकीच्या गोष्टी ठरवणार होते. म्हणजे लग्न कुठे करायचे, कसे करायचे, त्यासाठीची सर्व प्रकारची तयारी. आणि हे सर्व करत असताना कमालीची गुप्तता बाळगायची होती. कारण शुभाचे वडील सातार्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील असल्याने त्यांचा चांगलाच वचक होता, त्यात भाऊ वाया गेलेला, गुंडात जमा होणारा. म्हणजे त्या पातळीवर एक वेगळेच युद्ध लढावे लागणार होते.
.............
..................
............................................
दोन दिवसानंतर राघव, सतीश आणि राजन शाहूपुरीच्या चौकात आप्पा मिठाईवाल्याची जिलेबी खात उभे होते.
"राजा, रजिस्टर मॅरेजची कल्पना कशी काय वाटते? कायदा आपल्या बाजुने आहे, तुम्ही दोघेही सज्ञान आहात, भीती नाहीच ती कसली?" इति राघव.
"राघ्या वेडा की काय तू...., शुभाचे वडील फौजदारी वकील आहेत आणि म्हातारा पक्का सनातनी बामण आहे. कुणी चुकून बोलला त्यांच्याजवळ तर सगळेच बोंबलेल, मग शुभाही नाही आणि लग्नही नाही, बसा बोंबलत. तो सणकी म्हातारा फौजदारी वकील आहे. कुठलेतरी चार पाच खोटेनाटे खटले लावुन देइल माझ्या मागे. मग बसतो एक तर बिनभाड्याच्या खोलीत जावून नाहीतर कोर्टाच्या खेट्या मारीत. अहं... काही तरी वेगळा मार्ग शोधायला हवा."
"हे बघ हे इथे जिलेबी खात बसलेत. तिकडे शुभीचे नाना तिचं लग्न पक्कं करुन आलेत. राजा जिलब्या कशाला खातोहेस, महिनाभर थांब... आपण शुभीच्या लग्नाचे लाडूच खायला जावु. काय गं शशे?"
शशी आणि मेघनाने भयंकरच बातमी आणली होती. मेघनाने आपली स्कुटी साईडला पार्क केली आणि त्यांच्याजवळ येता येताच मोठा बाँबशेलच टाकला.
"काहीतरीच काय बोलतेस मेघे? शुभी मला बोलली असती ना?" राजन हबकलाच.
"आता माझ्या तोंडून शुभीच बोलते आहे असे समज. आणि तिला माहीत असेल तर ती बोलणार ना राजा तुला. जी गोष्ट तिलाच माहीत नव्हती, नपेक्षा कालच कळालीय ती तुला दोन दिवसांपूर्वी कशी काय सांगणार होती?"
"ए मेघे नीट सांग काय झालेय ते." राघव मध्ये पडला.
" अरे सकाळी हॉस्टेलवरची माझी रुममेट शुभीची ही चिठ्ठी घेवून आली."
मेघीने हातातली चिठ्ठी पुढे केली. राजन ती चिठ्ठी वाचायला लागला तोवर मेघीने कहाणीचे सुतोवाच केले....
" माझी रुममेट दिप्ती, शुभीबरोबर गाण्याच्या क्लासला असते ना ती दात्यांकडे, तिच्याकडे शुभीने ही चिठ्ठी दिली. कसे कोण जाणे पण तुमचे पराक्रम शुभाच्या दिवट्या बंधूराजांना कळले. मला वाटते, कॉलेजमधल्या कुणीतरी चुगली केली असावी. आणि त्याने कधी नव्हे ते इमानदारीत ही बातमी बापापर्यंत पोचवली. तुला तर माहीतीच आहे नानासाहेब किती पझेसिव्ह आहेत या बाबतीत ते. नानासाहेबांनी रातोरात कोल्हापुरला जावून आपल्याच एका मित्राच्या मुलाशी शुभीचं लग्न फिक्स करून टाकलं.
आणि राजन शेवटची बातमी खास तुझ्यासाठी.....
शुभी सद्ध्या नजरकैदेत आहे असे समजायला काही हरकत नाही. अर्थात माझ्यासारख्या जवळच्या मैत्रीणी तिला भेटू शकतात अजुनही. पण शुभीला घराच्या बाहेर पडायला बंदी आहे. कुणी ना कुणी सतत तिच्या बरोबर असतेच. मघाशी मी आणि शशी तिच्याकडे गेलो तर रव्या, तिचा भाऊ हॉलमध्येच ठिय्या मांडून बसला होता. त्याच्या बरोबर त्याचे ते टगे मित्रही होते. बहुतेक नानासाहेबांनी यावेळी लेकाशी सलोखा केलेला दिसतोय.
नालायक, कसा खोदुन खोदुन विचारत होता मला.
" तु ओळखत्येस का त्या मुल्लाल्ला? त्याचे नॅव काय? क्युठ्ये राहत्तो? लुबरा मेला!" बोलताना असा दिसत होता की आत्ता लाळ टपकायला लागेल्...शी SSSSS ! "
मेघनाने एका दमात सगळे सांगून टाकले. रव्याबद्दलचा तिचा सगळा संताप तिच्या शब्दातुन ओसंडून वाहत होता.
"मग तू त्याला राजनची माहिती दिलीस का?"
राघ्याने मुर्खासारखे विचारले तशी मेघी मांजरीसारखी फिस्कारून त्याच्या अंगावर आली.
"एवढी मुर्ख वाटते का मी तुला?"
"आत्ता..., वाटत नाहीस..., पण कुणी सांगावं...? दिसतं तसं नसतं ना... म्हणून तर जग फसतं !".......
राघवने विनोद करून वातावरण थोडं हलकं करायचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
"राघ्या... विनोद नको. आता पाणी डोक्यावरून चाललंय. " राजन गंभीर झाला होता.... काहीतरी करायला हवं."
"पण आपण काय करणार राजन, तिचा भाऊ निव्वळ गुंड आहे. वडील फौजदारी वकील असल्याने पोलीसही त्यांच्या बाजुने असतील. आय थिंक... माफ कर पण मला वाटतं तू विसर आता शुभीला. चांगल्या मित्रांसारखे आपण तिच्या लग्नाला जावू.... शुभमंगल सावधान असे म्हणून अक्षता टाकून मोकळे होवू. तुला कोणी ना कोणी मिळेलच चांगली."
शशी राजनचं सांत्वन केल्या सारखं म्हणाली, पण ती पुर्णपणे गंभीर होती.
"सावधान......!"
इतक्या वेळ शांतपणे जिलेबी खात असलेला सत्या पहिल्यांदाच मध्ये बोलला. तसे सगळे चमकून त्याच्याकडे बघायला लागले.
"सत्या, अजुन वेळ आहे त्याला महिनाभर!"
राघ्या ओरडला तसा सत्या आधी हसला आणि मग गंभीर झाला.
"राजा... पृथ्वीराज बनायची तयारी आहे का? आणणार संयोगितेला पळवून?"
"तुला काय वाटलं? तिचा तो रानगट भाऊ आपलं हार तुरे घेवून स्वागत करणार आहे. आणि समजा आणलं पळवून सातार्याच्या बाहेर पडता येइल का आपल्याला? "
"पुढचं माझ्याकडे लागलं. तू तिला पळवून आणणार का नाही ते सांग?"
"आपली तयारी आहे. त्यासाठी पृथ्वीराजच काय चंबलका डाकु भी बन सकता है हम."
राजन गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार झाला.
"मग झालं तर! मेघे तू काहीही कारण सांगून फक्त एक तासाकरता तिला घराबाहेर काढू शकशील?"
सत्याच्या पाताळयंत्री मेंदुची चक्रे हलायला लागली.
"घराबाहेर काढणं अवघड नाही रे. पण तो बोका असणारच ना तिच्या बरोबर सारखा!"
"त्याचं टेन्शन तू नको घेवू. त्याला कसा येड्यात काढायचा ते मी बघतो. तु फक्त तिला काहीही करून एक तासाभरासाठी कॉलेजवर घेवून ये. काहीही कारण सांग... सगळ्या मैत्रीणी मिळून तिला लग्नाबद्दल पार्टी देताहेत म्हणून सांग. फारतर त्या रव्याला पण आमंत्रण दे. ती फक्त कॉलेजपर्यंत यायला हवी. तिथे त्या रव्याला कसं गुंतवायचं ते मी बघतो. राजा तू माझी बाईक घेवून लायब्ररीच्या मागच्या मैदानात तयार राहशील. शुभी गाडीवर बसली की गाडी सरळ फलटण चौकापर्यंत आणायची. तिथं हा राघ्या सुमो घेवून तयार असेल, सुमो थेट सांगोल्याकडे पळवायची. सांगोल्यात माझा मामा असतो. त्या रात्री त्याच्याकडे मुक्काम करायचा, दुसर्या दिवशी सकाळी पंढरपुरात. तिथे कुठल्यातरी मठात देवू लग्न लावून दोघांचं.
फक्त एक लक्षात ठेवायचं... यदाकदाचीत आपला प्लान फुटला आणि त्याने पाठलाग केलाच तर सांगोला येइपर्यंत गाडी थांबवायची नाही. एकदा सांगोल्यात पोचलास की थेट मामाचं घर गाठायचं. मग तिथे रव्या येवु दे नाही तर आणखी कोणी, आपण कोणाच्या बापाला भीत नाही! दुसर्या दिवशी सकाळी या दोघी बसने पंढरपुरात पोचतील.. काय?"
सत्याने झटक्यात सगळा प्लान ठरवून..., सांगुनही टाकला.
"आज सोमवार आहे. येत्या रवीवारी दुपारी तीन वाजता तु शुभीला घेवून कॉलेजवर येशील मेघे.......! डन? "
सत्याने हात पुढे केला.
"डन...!" मेघी, राजन आणि राघ्याने त्याच्या हातावर हात मारून स्विकृती दिली.
"अरे पण शुभीचं काय? ती तयार होइल का याला?" शशीने महत्त्वाचा प्रश्न विचारला.
"तिला निर्णय घ्यावाच लागेल. तुम्ही दोघी तिला भेटून, योग्य ती संधी साधुन शुभीला कल्पना द्या. मला खात्री आहे, ती तयार होईलच."
सत्या कुठेतरी शुन्यात बघत बोलला.
"ए मला भीती वाटते रे. तो रव्या आणि त्याचे मित्र फारच दांडगट आहेत." शशी थोडीशी घाबरली होतीच.
"हे बघ शशे, एकदा का लग्न लागलं की मग रव्याच काय तिचा तो वकील बापही काही करू शकणार नाही."
"सत्या.... तुझा सांगोल्याचा मामा काय करतो रे?"
राघवने कुतुहलाने विचारले. कारण त्या मामाच्या जोरावर सत्या रव्यासारख्या सातार्यातल्या टग्याशी टक्कर घ्यायला निघाला होता.
"भेटशील तेव्हा मामालाच विचार की?" सत्याने डोळे मिचकावले.
"ठिक आहे मी सुमो ठरवतो." राघू म्हणाला.
" आजच ठरव.... आणि शक्य असेल तर त्या गजानन ट्रॅव्हल्सची गाडी ठरव. नाही...नाही... गजाननचीच गाडी हवी आपल्याला."
"त्याला पक्के सांग आपल्याला राजा आणि त्याच्या होणार्या बायकोला, रव्याच्या बहिणीला घेवून जायचेय म्हणुन. तो गजानन दोस्त आहे आपला. मीही बोलतो त्याच्याशी. तो लागेल ती सगळी मदत करेलच. जाताना गजाला तीन-चार पोरंही घ्यायला सांगु बरोबर."
सत्या खुसखुसत बोलला...
"तुझी न त्या गजाची कशी काय दोस्ती रे? त्याच्यात आणि त्या रव्यात काय फरक आहे?"
राजन प्रथमच मध्ये बोलला. त्याचा सुर शंकेचा होता.... तसा सत्या कुजकटासारखा हसला.
"आपली दोस्ती नाय लेका गजाशी, पण रव्याची दुश्मनी आहे ना त्याच्याशी... या केसमध्ये रव्याची बहीण आहे हे समजले की गजा आपल्याला वाट्टेल ती मदत करायला तय्यार होईल. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त ! काय....?
ए पोरींनो तुम्ही सुटा..कामाला लागा.आणि ही बातमी सुंदरला पण द्या. नाहीतर ऐनवेळी ती काहीतरी घोटाळा करायची. मेघे, शशीला सोडल्यावर मला जुन्या राजवाड्यापाशी भेट."
"ठिक आहे.....!" दोघी स्कुटीवर बसुन निघून गेल्या.
"दोस्तांनो, एक छोटासा बदल आहे योजनेत....!"
सत्याच्या सुपीक डोक्यातुन एकामागुन एक किडे वळवळायला लागले होते.
त्याने पुढची योजना त्या दोघांना सांगायला सुरूवात केली तशी दोघांचे चेहरे खुलायला लागले.
"डन यार... सत्या !" भन्न्नाट आयडीयेची कल्पना आहे. त्या दोघींनाही सांगायला हवे." राजन खुशीत आला.
"ते काम मी करेन, तु नको टेन्शन घेवू. फक्त एक लक्षात ठेव राघ्या... एकदा का दोघांना घेवून गाडी सुटली की सांगोल्यात मामाचं घर येइपर्यंत थांबायचं नाही. घरी पोचला की रव्याचा देवसुद्धा तुला टच करु नाय शकणार. त्याच्याआधी जर का त्याच्या हातात सापडलास तर रव्या तुझी भगर करेलच पण आपला सगळा प्लान पण फिसकटेल. या दोघांचं लग्न मग कधीच नाही होवू शकणार लक्षात ठेव."
सत्याने इशारा दिला.
"तु बघच बे सत्या... हा राघू काय करतो ते?" राघुने उत्साहाच्या भरात बाईक काढली आणि निघून गेला.
"चला नवरदेव तुम्हाला तुमच्या रुमवर सोडतो. आजची रात्र काय तो आराम करा, उद्यापासुन बरीच कामं आहेत."
सत्यानं बाईकला किक मारली, मागे बसता बसता राजनने विचारलं...
"सत्या तुझं डोकं एवढं भन्नाट कसं काय चालतं रे?"
"हड रे... आपल्याला कुठे एवढं डोकं आहे. आपण माकडांचे वंशज आहोत... विसरला का? आपलं काम , आपला धर्म.... अनुकरण करणे!"
सत्या खदखदून हसला.
"अनुकरण?" राजनच्या चेहर्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.
तशी सत्याने मागे वळून त्याच्या डोक्यात एक टपली मारली.
"सुशि झिंदाबाद !"
गाडी चालवता चालवता राजनच्या चेहर्यावर उमटलेलं संभाव्य प्रश्नचिन्ह इमॅजिन करुन सत्या जोरजोरात हसायला लागला.
************************************************************************
ठरल्याप्रमाणे मेघना आणि शशी शुभीच्या घरी पोहोचल्या.
"हे बघा काही पार्टी बिर्टी नाही करायची. महिनाभरावर तिचं लग्न आलय. मला आता आणखी रिस्क घ्यायची नाहीय."
नानासाहेबांनी सरळ एक घाव दोन तुकडे करुन टाकले.
"काका असं काय करता. प्लीज येवु द्या ना तिला. आम्ही सगळ्या मैत्रीणी मिळून शेवटचेच भेटणार आहोत. एकदा कॉलेज संपलं की प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात गुंतून जाणार. मग कुठे भेट होआणार आहे. प्लीज शुभीला परवानगी द्या ना तुम्ही. हवेतर रवीदादाला पण येवू द्या आमच्याबरोबर म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तो सांभाळुन घेइल रवीदादा !"
बोलताना मेघीने दादा या शब्दावर जरा जास्तच भर दिला, तसा रव्या उचकला.
"ए आपल्याला एक बहीण आहे तेवढी पुरेशी आहे. अजुन नकोत सतराशे साठ."
"असं रे काय करतोस दादा. मला कुठे सख्खा भाऊ आहे. तुझ्या रुपात एक भाऊ मिळतोय म्हणुन मी खुश होत होते तर तुझं हे असं..... ठिक आहे.... माझ्या नशिबातच नाही भावाचं सुख. आम्ही आपलं मनातल्या मनातच म्हणत राहायचं....
"भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना....."
मेघीच्या डोळ्यातुन पाणी यायचेच काय ते बाकी राहीले होते. शुभी, नानासाहेब तिच्याकडे बघतच राहीले.
"ठिक आहे गं पोरी, आणि तुला रे काय प्रॉब्लेम आहे रव्या. केवढी गोड पोरगी आहे, भाऊ मानतेय तुला. जरा सुधरा आता...! ठिक आहे गं पोरी, पण एक तासभरच आणि रव्या येइल तुमच्याबरोबर."
"थँक यु वेरी मच, काका !"
मेघनाने आनंदाने उडी मारायचीच काय ती बाकी ठेवली होती. शुभी तिच्याकडे वेड्यासारखी बघत होती, काय चाललेय ते तिला कळायला मार्गच नव्हता. मेघीने हळुच तिला डोळा मारला. तशी तिची ट्युब पेटली. नक्कीच काहीतरी शिजत होतं. नंतर एकांतात मेघीने आणि शशीने तिला सगळे काही समजावून सांगितले.
"मेघे पण रव्याने विचारलं की पार्टी कुठे आहे तर? त्याला काय सांगणार? कारण प्रत्यक्षात तिथे कुठलीच पार्टी नसणार आहे."
शशीने शंका काढलीच.
"कोण म्हटले पार्टी नाही म्हणून... आपली लाडकी मैत्रीण लग्न करुन सासरी चाललीय. तिला निरो द्यायला नको. आपण पार्टी तर देणार आहोतच. पार्टीही असेल अन सगळ्या मैत्रीणीही असतील. आता तिचं सासर नानासाहेबांनी ठरवलेल्यापेक्षा वेगळं असेल हा भिन्न मुद्दा आहे. पण पार्टी तर होणारच."
मेघीनं डोळे मिचकावले.
*******************************
ठरल्या दिवशी रव्या शुभीला घेवून पार्टीच्या ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या हॉस्टेलवर पोहोचला.
"दादा, पार्टी पहिल्या मजल्यावर आहे. तु वर नको येवुस. सगळ्या मुलींना ऑकवर्ड वाटेल. तु इथे खालीच थांबना प्लीज."
रव्याच्या मनात वर पार्टीच्या ठिकाणी यायचे होते खरे तर. पण मेघीने 'प्लीज'वर दिलेला जोर पाहता त्याच्या हातात चरफडण्याशिवाय फारसे काही राहीले नाही.
"ए भावड्या, एक एकशेवीस तीनशे लाव रे." रव्या खालच्या पानपट्टीवर येवून उभा राहीला.
"च्यामारी.... आजकाल बहिणीची रखवालदारी करायला लागला बघ हिरो!"
"पर्याय नाही बाबा, गेली कुणाचा तरी हात धरुन पळुन म्हणजे?"
"ए साल्या, कोण बे तू? दात आले का?" रव्या त्या दोघा पोरांवर भडकला.
"ए हिरो, रागपट्टी कुणाला देतो? गजाभाऊच्या माणसांना. हाडं न्हायीत र्हायची जाग्यावर.आपल्या बहिणीला संभाळ आधी."
त्यातल्या एका छाडमाड हिरोने रव्याला आवाजी दिली तसा रव्या अजुनच भडकला.
"तुज्या तर, रत्तलभर वजन नाय तुजं, तु रव्याला आवाजी देतो. थांब तुला दाखवतोच."
रव्या तावातावाने त्याच्यावर तुटून पडला. त्यांची चांगलीच जुंपली. या मारामारीच्या नादात शुभी कधी उतरुन खाली आली आणि कॉलेजच्या मागच्या बाजुला निघुन गेली हे त्याच्या लक्षातच आले नाही.
थोड्याच वेळात मेघी आणि शशीही गपचुप खाली उतरल्या. मेघीने स्कुटीला किक मारली.
"ए शशे, बस लवकर!"
"मेघे तु निघ, मला एक छोटंसं काम आहे स्टँडपाशी. मी रिक्षाने जाते. उद्या ठरल्याप्रमाणे पंढरपुरातच भेटू."
मेघी तिच्याकडे बघतच राहीली.
इकडे लायब्ररीच्या मागे राजन सत्याची बाईक घेवुन शुभीची वाटच बघत होता. शुभी येताना दिसली आणि त्याने गाडीला किक मारली. फलटण चौकात राघ्या वाट बघत होता सुमो घेवुन. गाडीत गजाननची आणखी चार-पाच पोरं होती. जर वेळ आलीच आणि रव्याने पाठलाग केलाच तर त्याच्याशी सामना करायला कोणीतरी हवे ना. स्टिअरिंगवर स्वतः गजाच होता.
"गजाभाऊ... थेट सांगोल्याकडे निघायचं. पण आपण सांगोल्याकडे निघालोय हे त्यांना कळायला नकोय. दोन तीन तास तरी निदान फिरवत ठेवायचं बघा त्यांना."
राघुने सुचना केली.
"पण राघवभौ, त्यांना आपण सांगोल्याकडेच पळणार आहोत हे कसे कळणार. मुळात रव्याला आपली बहीण पळाली आहे हे कळायलाच अजुन तासभर जाईल. तो येडा बसला असेल पार्टी संपायची आणि त्याची बहीण खाली येण्याची वाट बघत. आन त्याची बहीण हितं आपल्याबरोबर सांगोल्याला चाललीय. लै भारी प्लान हाये देवा!"
गजाला नुसत्या कल्पनेनेच गुदगुल्या होत होत्या. रव्याशी दुश्मनी काढायला तो नेहमीच तयार असायचा आणि ही तर नामी संधी होती. त्याने गाडी सुसाट काढली.
"नाही गजाभौ..., त्याला आत्तापर्यंत कळलेदेखील असेल. कदाचीत तो आणि त्याची गँग सांगोल्याकडे जाणार्या रस्त्यावर आपली वाट बघत असतील. आजकाल भिंतीबरोबर हवेलाही कान असतात गजाभाऊ!"
राघव खुसखुसत बोलला तसा गजा त्याच्याकडे बघायला लागला.
"कायबी असो, आपल्याला काय त्याचं? पण रव्या भेटावाच वाटेत.... लै दिवस झाले हाताची खाज भागवून..!"
गजाचे हात शिवशिवायला लागले.
"हां... हां... गजाभौ... तुम्हाला जे काय करायचे ते करा पण आम्हाला सांगोल्याला पोचवल्यावर."
राघुने पुन्हा एकदा खबरदार केले गजाला.
"बरं बाबा, सांगोल्यात गेल्यावर तर आणखीन बरं व्हईल."
"राघु... सगळं होइल ना रे व्यवस्थीत?"
राजनकडे बघत शुभीने विचारलं तसं राघु नुसताच हसला.
"काळजी करु नकोस शुभे... बोला पुंडलिक वरदा हारी विठठल.... उद्या पंढरपुरात यावेळे पर्यंत तुम्ही नवराबायको झालेले असाल."
राघुची शंका खरी ठरली, रव्या त्याच्या गँगसकट पोचला होता. पण गजासारखा कसबी ड्रायव्हर असताना भीती कशाची? गजाने सरळ अॅक्सेलरेटरवरचा जोर अजुन वाढवला. त्याने गाडी सरळ सातार्यात पुन्हा घुसवली. तसा राघु चमकला....
"काळजी करु नको दादा, गजाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. थोडं खेळवु या ना रव्याला सातार्याच्या गल्ली बोळातुन मग निवांत लागु सांगोल्याच्या रस्त्याला. माझ्यावर सोड मर्दा."
गजाने हमी भरली तसा राघु आश्वस्त झाला. गजाने गाडे गल्ली बोळातुन फिरवायला सुरुवात केली. रव्या आणि त्याचे मित्रही त्यांचा पाठलाग करतच होते. शुभी कमालीची भेदरली होती. त्या भेदरण्याने ती राजनला अजुनच चिकटली. तिचा तो स्पर्ष ......
जर दुसरी वेळ असती तर.......
पण सद्ध्या तिला धीर देत राहणे हेच राजनच्या हातात होते. आणि ते तो इमाने इतबारे करत होता.
तिकडे मेघी सत्याकडे पोचली.
तिला एकटीलाच येताना पाहून सत्या स्वतःशीच हसला.
"मला माहीत होतं तू एकटीच येणार ते."
"म्हणजे....?"
"सोड ते.....नंतर सांगेन सगळं. बस गाडीवर..."
मेघीने तिची स्कूटी पार्क केली आणि सत्याच्या बाईकवर बसली. सत्याने गाडीला किक मारली.......
**************************************************************************
"थांब साल्या. रव्याच्या बहिणीला पळवणं एवढं सोपं वाटलं होय रे."
"गजाभाऊ... रव्याच्या हातात गुप्ती आहे."
राजन घाबरलाच होता.
"काळजी करु नको राजनभौ, आपण पण काय अगदीच चिंधी नाय हाय. हे बघ....!"
राजनच्या शेजारी बसलेल्या गजाच्या एका माणसाने सिटखाली लपवलेली तलवार दाखवली. तशी शुभी रडायलाच लागली.
"काळजी करु नको ताई. वकीलाच्या पोरावर तलवार चालवायला आमी काय येडे नाय. पण अगदीच जीव वाचवायची वेळ आली तर असावी म्हणुन जवळ ठेवलेली आहे."
गजा समजावणीच्या सुरात बोलला तसा शुभीच्या जिवात जिव आला.
आतापर्यंत शुभी आणि राजन पळाल्याला दिड तास होवून गेला होता. गजाने गाडी सांगोलारोडला काढली. रव्या आणि त्याची गँग पाठलागावर होतीच. पण सुदैवाने त्यांचाकडे गजासारखा कसबी ड्रायव्हर नसावा. गजाने सुसाट वेगात गाडी काढली. दोन- अडीच तासात गाडी सांगोल्यात प्रवेश करत होती. रव्याची गाडी पाठीमागे होतीच.
"आता काय करायचं रे राघु ? तुझ्या त्या मामाचं घर कुठे आहे ते सांग, म्हणजे गाडी तिकडे घेतो."
"अहं आंणखी थोडा वेळ गाडी अशीच फिरवीत राहा भाऊ."
राघुच्या मनात काही वेगळेच चालले होते.
"असं काय करतो राघु, गाडी घेवु दे ना सरळ मामाच्या घराकडे. आठवतं ना सत्या काय म्हणाला होता ते.. एकदा मामाकडे पोच्लं की मग रव्याचा देव पण हात नाही लावु शकणार आपल्याला."
"काय करु रे भाऊ?"
सांगोल्याच्या गल्ल्यातुन गाडी फिरवताना गजाने विचारले.
"मला एक सांग गजाभाऊ. तुला काय बघायला आवडेल. रव्याचा पराभवाने एवढासा झालेला चेहरा की त्याचं मार खाऊन सुजलेलं शरीर?"
गजा विचारात पडला.
"माराचं काय? त्याला मी कधीही ठोकू शकेन... पण मला त्याचं हारलेलं, एवढंसं झालेलं थोबाड बघायला आवडेल."
गजाने विचार करुन उत्तर दिलं. असंही त्याला रव्यावर मात करण्यात स्वारस्य होतं. रव्याला मान खाली घालायला लावण्यात जी मजा होती ती मारामारीत थोडीच येणार होती.
"राजन किती वाजले?"
राघवने विचारलं......!
"सात्-साडे सात झाले असतील....; का रे?"
गजाभाऊ गाडी साईडला घ्या. आपण सरेंडर करणार आहोत. तसा गजा चमकला.
"काय? हल बे... आपण अशी हार नाय मानणार. हाणु साल्याला.....!"
"गजाभाऊ प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हार रव्याचीच होणार आहे. नाहीतरी विनाकारण मारामारी करुन नंतर तुरुंगात जाण्यापेक्षा गपचुप बसुन मजा बघणं जास्ती चांगलं नाही का."
राघव बोलला तसा गजा अजुन बुचकळ्यात पडला.
"आपल्याला कायपण कळत नाय बग भौ.....!"
"माझ्यावर विश्वास ठेवा, गजाभौ..... रव्याचं एवढंसं झालेलं थोबाड बघायचं ना तुम्हाला."
राघुने हसुन खात्री दिली तशी गजाने एका साईडला घेवुन गाडी थांबवली. लगेच त्याचे सगळे पंटर हत्यारं काढून तय्यार झाले. तशीच वेळ आलीच तर फुकट मार का म्हणुन खा?
रव्याची गाडी मागे येवुन थांबली आणि रव्या त्याच्या गँगसोबत खाली उतरला. सगळे जण तावातावातच सुमोकडे आले तशी गजा आणि त्याचे पंटर हत्यारासकट खाले उतरले. तसा रव्या चमकला. गजा इथे असेल अशी त्याने अपेक्षाच केली नव्हती. त्याने पोरांना सबुरीचा इशारा दिला. इथे परक्या गावात राडा करण्यात धोकाच होता नाहीतरी.
"हे बघ गजा, आपली दुश्मनी आहे आणि ती तशीच चालत राहणार. पण इथे प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. तेव्हा गुपचुप तिला आमच्या स्वाधीन कर. आपलं भांडण आपण नंतर बघु."
गजा काही बोलायच्या आतच राघु गाडीतुन खाली उतरला.
"हे बघा दादा..., तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथे तुमची बहिण नाहीये. आम्ही सगळे पंढरपुरला चाललोय दर्शनाला. सांगोल्यात माझा मामा राहतो म्हणुन जाता जाता थोडा वेळ त्याच्याकडे थांबणार होतो."
"मग हा गजा तलवारी घेवुन काय विठोबाच्या पायावर वाहायला निघाला होता का?"
"हत्यारं आपल्याकडं न्हेमीच असत्यात. तु पाठलाग करत होतास. देवाला निघालो होतो म्हणुन आधी चुकवायचा प्रयत्न केला म्हणलं देवदर्शनात राडा नको. पण तु पिच्छा सोडायलाच तयार नाहीस म्हणुन जाब विचारायला थांबलो. मारामारीच करायची असेल तर आमीबी काय बांगड्या न्हायीत भरलेल्या."
गजा गुरगुरला तसा राघु पुढे झाला.
"ओ दादा, हवी तर तुम्ही गाडीची तपासणी करा... बघा तुमची बहीण सापडते का?"
तसा गजाने आ वासला. राजन आणि ती रव्याची बहीण गाडीत अजुनही असताना हा येडा असा काय करतोय? राघुने त्याला हळुच डोळा मारला. गजाला काहीही समजत नव्हते... मेंदुच्या बाबतीत तो पक्का गुडघा होता. शेवटी जे होइल ते बघायचा निर्णय त्याने घेतला आणि पोरांना इशारा केला.
रव्या गाडीकडे गेला. आत बसलेल्या सगळ्यांना त्याने खाली उतरवलं.
गाडीतुन उतरणार्यांकडे त्याने एकवार पाहीलं आणि राघुकडे वळला.
"ए राघ्या, नाटकं बास झाली. तुला काय वाटलं तुझ्या नाटकांना फसेन होय मी. मला सगळा प्लान माहीत आहे तुमचा. गपगुमान सांग्..शुभी आन तो राजा कुठाय?"
गजा टकामका एकदा त्याच्याकडे, एकदा राघुकडे तर एकदा नुकतेच गाडीतुन उतरलेल्या राजन आणि शुभीकडे बघायला लागला. च्यायला हे काय झेंगाट?
ही पोरगी जर रव्याची बहीण... शुभी नाही, तर मग कोण आहे?
"कुणी रे... तिनं सांगितलं तुला. राघ्याने रव्याच्या गाडीत मागच्या बाजुला बसलेल्या त्या व्यक्तीकडे इशारा केला. तशी शशी गाडीतुन खाली उतरली.
"अरे ही तर 'सुंदर' आहे आणि हा आमच्या कॉलेजचा शिपाई... संभाजी. मग राजन आणि शुभी कुठे आहेत?"
शशी बुचकळ्यात पडली.
"वा शशे चांगली मैत्री निभावलीस. तुझ्यासारख्या मैत्रीणी असतील तर शुभीला शत्रुंची काय गरज आहे."
राघु शशीवर चांगलाच संतापला होता. शशीने काही न बोलता मान खाली घातली.
"म्हणजे सत्याचा संशय बरोबरच होता तर. तुझं आणि या रव्याचं काहीतरी आहे हे त्याला माहीत होतं. ठरलेली प्रत्येक गोष्ट तुझ्याकडुन रव्याला कळणार याची त्याला खात्री होता. म्हणुनच त्या दिवशी तु आणि मेघी निघुन गेल्यानंतर त्याने प्लान बदलला. अर्थात मेघीला आतापर्यंत कल्पना आली असेलच याची.
बाय द वे, रव्या ..... आत्तापर्यंत सातार्याच्या राम मंदीरात राजन आणि शुभीचं लग्न लागलं असेल. लग्नात तु काही गोंधळ घालु नयेस म्हणुन तुला तीन चार तास सातार्याच्या बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती, ती मी पार पाडली. त्यात हा संभा आणि सुंदर या दोघांबरोबरच गजाभाऊंची पण चांगलीच मदत झाली. अर्थात मुळ प्लान काय आहे ते फक्त मी , राजन आणि सत्या आम्हालाच माहीत होतं.
माफ करा गजाभाऊ, तुम्हाला अंधारात ठेवलं आम्ही पण ते गरजेचं होतं. रव्या, आता तु मला मार, हाण नाहीतर काहीही कर, आपल्याला पर्वा नाही. दोस्तीखातर एवढं करणं शक्य होतं मला मी ते केलं. त्यांचं लग्न आतापर्यंत लागलं असेल, आता तु काहीही करु शकत नाहीस. माझं जे होइल ते होइल....आता पुढे इश्वरेच्छा."
राघव शांतपणे हाताची घडी घालुन उभा राहीला.
रव्याला काहीच सुचेनासं झालं. सालं या टिनपाट पोरांनी त्याला पद्धतशीरपणे बनवलं होतं. त्याला सातार्याच्या बाहेर काढुन त्याच्या बहिणीचं लग्न सातार्यातच लावुन दिलं होतं. या सगळ्या प्रकरणात त्याचा मात्र पद्धतशीरपणे मामा करण्यात आला होता. त्याचं ते पडलेलं थोबाड बघून गजा खदखदुन हसायला लागला.
"राघु भौ, मानलं राव तुमाला आणि तुमच्या त्या सत्याला. कसला भारी चु...... बनवलात या रव्याला. जबरा प्लानिंग होतं राव. लै भारी. सॉलीड मजा आली राव. ए रव्या.. जा...जा सातार्याला परत आता....! निदान बहिणीला सासरी जाण्यापुर्वी एखादी भेट तरी होइल."
गजा आणि कंपनी जोरजोरात हसायला लागली.
रव्याने रागारागाने गाडी स्टार्ट केली. तशी शशी आणि त्याची सगळी दोस्तकंपनी गाडीत बसुन निघुन गेली.
गजाने राघुला कडकडुन मिठी मारली.
"जबरा राव... लै भारी . चार तास तुमाला घेवुन फिरतोय. शंका पण आली नाही की गाडीत बसलेली माणसं कुणी दुसरीच आहेतं. चला आपण पण जावु सातार्याला. त्यो रव्या तिथं काही गोंधळ घालायला नको. चला.....!"
आणि गजाभौनी गाडी सातार्याकडे वळवली.
"राघुभाऊ निदान सतीशरावांच्या मामाकडं एकेक कप चहा तरी घेतला असता ना?"
संभाने न राहवुन विचारलं तसा राघु खुसखुसून हसायला लागला.
"संभा येड्या.... अरे सत्याला कोणी मामाच नाही? त्यानं रव्यालाच मामा बनवला!"
संभा आणि गजा दोघेही त्याच्याकडे आ वासुन बघायला लागले.
***************************************************************************
राजन दादरला चार नंबरवर वाट पाहात होता. साडे सात आठच्या दरम्यान क्लास आटपुन शुभी आली.
"सॉरी राजा, तुला खुप वाट बघायला लागली असेल ना?"
"काही होत नाही गं त्याने. माझी अर्धी कादंबरी वाचुन झाली तोपर्यंत."
राजनने पुस्तक बंद करुन खांद्यावरच्या बॅगेत टाकले.
"कुठलं वाचतोयस?"
"हृदयस्पर्ष.... सुशिचं!"
"ओहो लौकीक आणि मैत्राली.... बरोबर ना? पारायणं केलीत मी त्या पुस्तकाची. तुला कुठे मिळालं आज हे पुस्तक?"
"अगं सत्या भेटला होता सकाळी चर्चगेटला. त्याने दिलं... म्हणाला आजच्या दिवशी या सारखी दुसरी कुठली भेट नसेल तुझ्यासाठी."
"अय्या सत्या, त्याला घरी यायला सांगितलेस की नाही मग? किती दिवस झाले नाही भेटुन?"
"हं आमचाही तोच विषय झाला आज. बहुतेक येत्या रवीवारी भेटायचे ठरतेय. कळवतो म्हणालाय. बघु... राघु आणि मेघीशी देखील बोलु. जमल्यास एक छोटंसं स्नेहसंमेलन करू."
"वाव किती मज्जा येइल ना?"
"शुभे, आज चौपाटीवर जावु या? बाहेरच कुठेतरी जेवण करुया आज. छान रात्री उशीरापर्यंत फिरू आणि शेवटची लोकल पकडून जावु घरी."
"काय राजे, आज भलत्याच मुडमध्ये दिसताय? ठिक आहे जशी आपली आज्ञा."
दोघेही फिरत फिरत चौपाटीवर पोहोचले. चौपाटीवर आज थोडी जास्तच गर्दी होती. दोघे हातात हात घालुन मनसोक्त भटकले. चौपाटीवर भेळ, पाणीपुरी खाल्ली. शेवटी दमुन एका ठिकाणी बसले.
"शुभे, एक विचारु?"
"विचार ना?"
"तु सुखी तर आहेस ना? माझ्याबरोबर पळुन येवून लग्न केल्याचा पश्चाताप तर होत नाहीये ना तुला?"
"असं का विचारतो आहेस, राजा? मी कधी कुठल्या गोष्टीबद्दल तक्रार केलीय? हा निर्णय आपण विचार करुनच घेतला होता ना? आणि हे दिवस कायम का राहणार आहेत? आयेंगे मेरी जान... हमारे भी दिन आयेंगे. एक दिवस आपण आपल्या कारने इथे येवु. आणि खरं सांगु...? या क्षणी तु माझ्याबरोबर आहेस, फ़क्त माझा आहेस हे माझ्यासाठी खुप आहे. बाकी गोष्टींची पर्वा आहे कुणाला. जाना दो यार...! "
शुभाने हळुच आपला एक हात राजनच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या आणखी जवळ सरकली. राजनने तिच्या खांद्यावर टाकलेला आपला हात हळुच काढुन घेतला. बॅगेतुन एक छोटीशी पुडी काढली. ती उघडुन तिच्यातला मोगरीचा गजरा बाहेर काढला आणि हळुवारपणे शुभीच्या केसात माळला.
"राजन........."
"शु... काही बोलु नकोस... जस्ट फिल इट....
अँड....
हॅप्पी वॅलेंटाईन्स डे माय स्वीट हार्ट.....!"
शुभी आवेगाने त्याला बिलगली. राजनने आपला हात तिच्या गळ्यात टाकला आणि बघता बघता दोघेही समोर दिसणार्या त्या अथांग समुद्राच्या सहवासात जगाला विसरून गेले.
समाप्त.
****************************************************************************
तळटिप : यातील मुलीच्या भावाला वेड्यात काढून लग्न करायची कल्पना माझ्या एका मित्राने मला सांगितली होती. त्याच्या मते ती बहुदा सुशिची एखादी लघुकथा असावी. मी काही ती कथा वाचलेली नाही, पण ती कल्पना मात्र इथे वापरलीय. कथावस्तु, स्थळ, पात्रे, संवाद सर्वकाही माझे आहे. पण मुळ कल्पना जर खरोखर सुशिंची असेल तर त्याचे श्रेय सुशिंना मिळायलाच हवे. जर कथा जमली असेल तर ते श्रेय सुशिंचे आहे, जर बिघडली असेल तर तो माझा दोष आहे. माझी ही पहिली वहीली प्रेमकथा त्या माझ्या आवडत्या लेखकाला कै. सुहास शिरवळकर यांना सादर समर्पित.
विशाल कुलकर्णी.
वा! अजुन वाचलेलं नाहीये. पण
वा!
अजुन वाचलेलं नाहीये. पण भारीच असेल. तुर्तास पैला प्रतिसाद आप्ला हाय भौ!
वाचुन परत लिवतोच... पन बिलंदर कडं पन लक्श र्हाउद्या हो!! :p
आ. न.
वाह! >माझ्या आवडत्या लेखकाला
वाह!
>माझ्या आवडत्या लेखकाला कै. सुहास शिरवळकर यांना सादर समर्पित
कथा सुरु झाली तेव्हापासुन आणि हे वाचेपर्यंत या कथेच्या हाताळणीवर, ओघावर सुहास शिरवळकरांचा प्रभाव जाणवला. लिखाण तुमचंच आहे, पण तुम्ही एकदम जातीनं त्यांचे फॅन दिसता:) शैली एकदम उतरली आहे! वाह!
बाकी त्यांना समर्पित केली हे छान केलंत.
एकुणात एकदम मस्त वाटली कथा.
@जियो & लिहो!
छान आहे.
छान आहे.
शुभांगी राजन आसावरी! ह्म्म..
शुभांगी राजन आसावरी! ह्म्म.. ही पात्रं ओळखीची वाटताहेत
मस्तच आहे.. खुप आवडली..
मस्तच आहे.. खुप आवडली..
मला लव्ह-ईष्टोर्या लय बोअर
मला लव्ह-ईष्टोर्या लय बोअर होतात जनरली..
पण ह्याला खास "विशाल" टच आहे! मस्त जमली आहे!
आवडली. एकदम वेगवान आहे
आवडली. एकदम वेगवान आहे (नेहमीप्रमाणे )
विशाल, जबरदस्त वेगवान....
विशाल, जबरदस्त वेगवान.... मस्तच. आवडली, रे.
वा विकु वा ...
वा विकु वा ...
विशालभाऊ,लय झ्याक,आवडली
विशालभाऊ,लय झ्याक,आवडली
विशाल सही रे ! काय जबरदस्त
विशाल सही रे ! काय जबरदस्त वेग आहे ! त्या गजा अन रव्या बरोबर आम्हाला पण गरगर फिरवलसं
लै लै ठांकु दोस्तांनो....! या
लै लै ठांकु दोस्तांनो....!
या कथेमुळेच खरेतर बिलंदरला उशीर होतोय. ती लिहीता लिहीता मध्येच ही सुचली. पुन्हा डोक्यातुन निघुन जायला नको म्हणुन आधी ही पुर्ण केली. आता स्वस्थ मनाने बिलंदरच्या मागे लागता येइल.
पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद.
विशाल मस्तच कथा
विशाल मस्तच कथा
रुयामभौ.... फॅन नाय व्यसन आहे
रुयामभौ.... फॅन नाय व्यसन आहे म्हणा सुशिचं, मुळात लिहायला सुरूवात केली तिच सुशिंपासुन प्रेरणा घेवून. त्यामुळे सुशिंचा प्रभाव जाणवणे अपरिहार्यच आहे. तुम्ही इथे नवीन आहात अन्यथा माझ्या कथा वाचणारे सर्व माझ्या सुशिवेडाशी परिचीत आहेत. बाकी पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार.
विशाल : त्या रहस्यकथातनं
विशाल : त्या रहस्यकथातनं प्रेमकथांतही आलात हे झ्याक केलत...
इतरांप्रमाणेच मलाही पेस आवडली कथेची....
गुड वन... चिअर्स !!!
विश्ल्या, हे सगळं ईतकं
विश्ल्या, हे सगळं ईतकं जमण्यासाठी कुठलं "रसायन" घेतोस ?
मराठीतले शब्द संपल्यामुळे "सही है भिडू !"
कथेतला सस्पेन्स शेवटपर्यंत
कथेतला सस्पेन्स शेवटपर्यंत टिकलाय. मस्तच झालीये. पण त्या बिलंदर ला पण मुक्ती द्या लवकर आता.
कॉलेजच्या काळात मी पण एकदम सुशि फॅन होते. एकही पुस्तक नसेल सोडलेलं. पण गेल्या कैक वर्षात वाचलं नाहीये. ही आयडिया दुनियादारी मध्ये तर नव्हती. ते पुस्तक कॉलेजजीवनावर होतं म्हणून विचारतेय.
आऊटडोअर्स भाऊ खरे सांगायचे तर
आऊटडोअर्स भाऊ खरे सांगायचे तर ही कल्पना खरोखर सुशिची आहे की नाही हे मलाही माहीत नाही. माझ्या मित्राच्या मते असावी. त्यामुळे मी श्रेय सुशिंना दिलेय. कारण निदान मी तरी सुशिच्या कुठल्याही कथेत हे वाचलेले नाहीय.
दुनियादारीत एक अशी प्रेमकथा होती. डीएसपीची गॆंग पुढाकार घेवुन कॊलेजमधल्या एका जोडीचे लग्न लावुन देते पण नंतर त्या मुलाचा नेभळटपणा लक्षात आल्यावर लग्नाचं (देवळातुन) घेतलेलं सर्टिफ़िकेट फ़ाडुन मुलीला तिच्या आईवडीलांच्या हवाली करते (अर्थात तिची इच्छा आहे हे कळल्यावरच) अशी काहीशी कथा होती. पण तो प्रकारच वेगळा होता.
असो.. आभार !
साठेदादा... सुशिची नशा ज्याला लाभली त्याला इतर कुठल्या रसायनाची गरज लागत नाही
गिरीशजी तुमचेही आभार.
चांगली आहे.
चांगली आहे.
मस्त आहे कथा..
मस्त आहे कथा..
जमलेय मस्त
जमलेय मस्त
मस्त रे विशाल....
मस्त रे विशाल....
कवे, मंजे, मेधे आणि रेशम
कवे, मंजे, मेधे आणि रेशम सगळ्यांना धंकू !
मस्त
मस्त
सगळं चित्र अगदी डोळ्यांसमोर
सगळं चित्र अगदी डोळ्यांसमोर आलं विशाल दादा..काय मस्त कथा आहे..खुप सही
ती सुशिंची कथा बहुतेक
ती सुशिंची कथा बहुतेक 'दुनियादारी' नावानेच एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. मस्त धमाल कथा होती ती.. त्या कथेची बरीच पारायणे केल्यामुळे, कथेतली सगळीच वळणं ठाऊक असल्यामुळे ही कथा वाचताना फारशी मजा वाटली नाही. असो.
मंजु आणखी थोडे डिटेल्स देवु
मंजु आणखी थोडे डिटेल्स देवु शकशील का? मला वाचायचीय ती कथा. मला पण पाहु दे सुशिंचा कितपत प्रभाव आहे माझ्यावर ते.
मस्त
मस्त
मस्त वेगवान, आवडली.
मस्त वेगवान, आवडली.
विशालभाऊ कथा खुपच छान जमलीयं
विशालभाऊ
कथा खुपच छान जमलीयं अगदी सुशिँची मुळ कथा न वाचताही.
सुशिंची ही कथा अगोदर कुठल्यातरी दिवाळी अंकात आलेली आहे नंतर ती पुस्तकरुपाने प्रकाशित झाली होती मला पुस्तकाचे नाव नक्की आठवत नाही पण बहुतेक ते "सावधान" असावे.
जरा बिलंदर लवकर पुर्ण करा की.
Pages