अंगाई गीत - जरा साजरासा...!!

Submitted by अभय आर्वीकर on 9 February, 2010 - 05:21

अंगाई गीत - जरा साजरासा...!!

कसा बाळ माझा? श्याम सावळासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

चांदणे स्वरूपी चंदनाचे अंग
मुख पाहतांना तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली
टिळा देखुनिया दृष्टही पळाली
हसे बाळ माझा, विठू हासरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

ओठी अंगठ्याने करी सुधापान
तया चुंबण्याला लोभावते मन
दिसे बाळ माझा, राम सुंदरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

आली बघा आली, नीजराणी आली
मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा अभय सागरासा
जरासा जरासा, जरा साजरासा...!!

गंगाधर मुटे

..................................................
ही रचना गेय असल्याने समर्पक
चाल योजुन सहज गाता येईल.
..................................................

गुलमोहर: 

चाल - "पहाटे पहाटे" किंवा "परदेशियोंसे ना अखिंया मिलाना"
किंवा तत्सम चालीवर गाता येईल,पण अंगाई गीताशी या
चाली समर्पक नाहीत.
कुणाला दुसरी चाल गवसली तर अवश्य सांगावे.

ही रचना पुर्णतः गेय आणि गीत स्वरूप असल्याने
कवितेचे निकष पुर्ण होते की नाही,शंका आहे.
जाणकारांनी खुलासा केलेला आवडेल.

धन्यवाद गणेशजी,
पण "हसरा नखरा जरासा बावरा" हे गीत मी ऐकलेच नाही.
जरा संदर्भ द्याल का? शोधायला सोपे जाईल.

खुपच गोड आहे.
आली बघा आली, नीजराणी आली
लुकलुक पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा, राम सुंदरासा ...!!
हे जास्त आवडले..