गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/

पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये."

धन्यवाद!

--- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती, असा परवाना दिल्याने अथवा न दिल्याने काय काय घडेल तेही सांगाना.

आपण कशाला पाठिंबा देतोय ते कळल्याशिवाय तो द्यायचा कसा?

गुणसूत्रांची भेसळ व्हावी की नको याविषयी मी मत मांडणार नाही.
पण अमेरिकन हितसंबंध आहे किंवा नाही यावरून एखादे संशोधन योग्य की अयोग्य ते ठरविले जावु नये.
गुणसूत्रांची अदलाबदल करुन अनेक अंगाने सक्षम प्रजाती निर्माण करणारे संशोधन पुढे येत आहे.
गुणसूत्रांची अदलाबदल करण्याचे प्रयोग वनस्पतीवर होत असल्याने आणि वनस्पतीचा सबंध थेट शेतीशी असल्याने या विषयावर चर्चा करतांना गंभीरपने चर्चा होणे आवश्यक आहे.

वनस्पतींच्या गुणसूत्रामध्ये बदल हा काही नवा नाही.
हायब्रीड धान्ये, संकरीत ज्वारी, वैशाली टोमेटो, सीडलेस द्राक्षे वगैरे अनेक उदाहरणे देता येतील.
किंबहुना गुणसुत्रात बदल केल्याशिवाय वनस्पती वाढवायच्या तर उपासमारच होईल.
बीटी वांग्यांना होणारा विरोध गैरसमजातून आहे असे वाटते.
यापुर्वीही बीटी कापसाला असाच विरोध झाला होता.

बीटी वांग्यांना विरोध करणारे चार प्रकारात मोडतात.

१ प्रामाणीक गैरसमज/ भिती यामुळे विरोध करणारे.
२ NGO : दिल्ली सारख्या ठिकाणी पॉश वस्तीत कार्यालये असणारे आणी देश विदेशात परिसंवादात भाषणे देणारे. यांना वांगी झाडावर येतात की जमिनिखाली हे ही माहित नसावे पण eco feminism सारखे भारदस्त शब्द वापरण्याची कला.
३ स्वदेशी वाले: यांचा मुख्य ऑडियन्स शहरी मध्यमवर्ग आहे. त्यामुळे त्यांचा स्वदेशी आग्रह हा निवडक वस्तुंनाच असतो. सेलफोन, डिजिटल कॅमेरे, एम पी थ्री प्लेयर्स अशा वस्तुंच्या बेसुमार आयातीवर ते आंदोलने करत नाहीत.
४ जहाल डावे: कधीतरी रशिया पुन्हा एकदा बलाढ्य सत्ता होईल आणी अमेरिकेला धूळ चारेल या आशेवर तग धरून असणारे.

<< बीटी वांग्यांना विरोध करणारे चार प्रकारात मोडतात. >>
पाचवा प्रकार का विसरलेत.?
५) सत्तावादी - कमीशन मिळेल ते ते सर्व चांगले,कमीशन मिळणार नसेल ते ते सर्व वाईट,असे माननारे.:स्मित:

तुम्ही ६ वा प्रकार विसरलात!

६ ) आजच्या घडीला अमेरिकेत जो ऑरगॅनिक चा व्यापक प्रसार चाललाय, त्या अमेरिकेतील नागरिकच बीटी धान्य सोडून ऑरगॅनिकचा आग्रह धरत आहेत. तेही बीटीला विरोध करणार्‍यांमध्येच मोडणार ना? आज त्यांनी बीटीचे तोटे अनुभवले असतील कदाचित, म्हणून विरोध करत असतील, की, तुम्ही वर दिलेल्या कारणांपायी विरोध करत असतील? मी मूळ पोस्ट मध्ये दिलेली वेबसाईट तुम्ही नीट उघडून वाचलीत काय? त्यात सर्व शास्त्रीय कारणे, माहिती व्यवस्थित दिली आहे. त्या माहितीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत वाव मिळण्याइतपत ती अधिकृत आहे.

मी वोट करुन माझा जेनेटिकली मोडिफाईड फुड खाण्याचा अजिबात इरादा नसल्याचे कळवलेय. पण आता हे माझ्या डोक्यावर कोणी लादले तर काय करावे???

त्या साईटवर असेही वाचले की जर भारत सरकारने बिटी वांग्यांना मार्केटमध्ये आणले तर भारतीय मार्केटमधला हा पहिला मोडिफाईड खाद्यप्रकार असेल आणि जागतिक मार्केटमध्ये आलेली पहिली मोडिफाईड भाजी असेल. आता हे मोडिफाईड प्रकार आपल्या शरीराला कितपत अपायकारक किंवा उपायकारक आहेत ह्याची अजुन चाचणी झालेली नसताना भारतीय बाजारात आणि मुळात भारतीय बाजारातच पहिल्यांदा ते उतरवण्याची एवढी काय गरज????

तशी इथे वांगी भरपुर पिकताहेत (गंगाधर मुट्यांना माहित आहे Happy ) आणि भाजी करताना आम्ही डोळे उघडे ठेऊन किडकी वांगी टाकुन देऊन चांगलीच वांगी घेतो की. (हे मोडिफिकेशन फक्त एकाच किडीपासुन आहे, बाकीच्या किडी लागणारच आणि तेव्हाही वांगी करताना डोळे उघडे ठेऊन किडकी वांगी टाकावी लागणार)

(अवांतर - मी आज डब्यात भरली वांगीच आणलीयेत. Happy )

विजय कुळकर्णींनी सांगीतलेले ४ आणि अरुंधती कुळकर्णींचा ६ वा या सर्व प्रकारांशी मी सहमत आहे.
माझ्या ५ व्या मुद्द्याशी हे दोघे सहमत आहे काय जाणु इच्छितो.

खाली दिलेल्या दोन वेब्साइट्स्वरून 'नवा' जीन एखाद्या पिकात कसा घातला जातो हे कळेल. ह्या दोन्ही वेबसाइट्सवरची माहिती सर्वसाधारणपणे प्रत्येकाला समजू शकेल अशा भाषेत आहे.

ट्रान्सजेनिक (किंवा जेनेटिकली अल्टर्ड्/मॉडिफाइड) पिकाचे दुष्परिणाम समजायला आणि ते ठामपणे सिध्द करायला अजूनही बर्‍याच संशोधनाची गरज आहे.

वनस्पतींमधे नवा जीन अश्या प्रकारे घालतात.

ट्रान्स्जेनिक पिकाबद्दल अजून थोडं..

अजूनही बर्‍याच वेबसाइट्सवर किंवा ज्यांना Nature, Science, Euopean Molecular Biology Organization Journal (EMBO), Procedings of the National Academy of Sciences of USA (PNAS), Plant Cell, Cell, In Planta अशा रेप्युटेड जर्नल्सना अ‍ॅक्सेस असेल त्यांनी त्यातली GM पिकाबद्दलची माहिती जरूर वाचावी. रीसर्च आर्टीकल्स शब्दन् शब्द समजले नाही तरी त्यातल्या त्यासंबंधीच्या बातम्या वाचून कदाचित नाण्याची दुसरी बाजू समजायला मदत होईल.

मुटेसाहेब, पाचवा प्रकार गृहितच आहे हो! त्यात संशय कसला?!!! Sad तेवढी प्रामाणिक, जनहिताची कळकळ असणारी मंडळी सत्तेवर असती तर आज भारत कोठल्या कोठे पोचला असता!!

@ मृण्मयी : तुम्ही दिलेल्या पहिल्या दुव्यातील आर्टिकल मला डोक्यावरून गेले, पण दुसर्‍या दुव्यातील आर्टिकल थोडे थोडे समजले! Happy धन्यवाद! ज्या गतीने किंवा घाईने भारतात जेनेटिकली मॉडिफाईड अन्नधान्य आणण्याविषयी अनेक लोक उत्सुक आहेत ती घाई चिन्ताजनक आहे, कारण अजून ह्या क्षेत्रात पुरेसे संशोधन झालेले नाही, व भारतीय हवामानात, येथील जीवनशैलीत, जमीनीत अशा पिकांचे काय होणार, तसेच त्याचा भारतीयांच्या तब्येतीवर (येथील हवामान, राहणीमान इ. गृहित धरून) काय परिणाम होईल याविषयी अजून संशोधन करण्यास भरपूर वाव आहे.
तसेच एकदा हे असे धान्यबीज बाजारात आले की ह्या अगोदर भारतात अस्तित्त्वात असलेल्या देशी किंवा अन्य धान्य प्रजातींच्या रक्षणाचे व टिकावाचे काय?

डॉ. माधव गाडगीळ ह्यांचा मध्यंतरी सकाळ मधील लेख वाचनात आला. त्यात त्यांनी लिहिले होते की देशी धान्यबीजात जी नवनवीन किडी, रोग ह्यांच्यावर मात करण्याची प्रतिकारशक्ती दिसून येते ती हायब्रीड बीजात दिसत नाही. बंगालमधील अतिवृष्टीतही टिकणार्‍या तांदळाच्या प्रजातीविषयीही वाचनात आले... ही देशी प्रजात आता हायब्रीड तांदळाच्या फेर्‍यात दुर्दैवाने संपुष्टात आली आहे. पण बंगाल मधील अतिवृष्टीचा पॅटर्न पहाता तिचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे.

आज भारतात पूर्वापार चालत आलेल्या जवळपास १०० प्रकारच्या वांग्यांच्या प्रजाती आहेत. जनुकीय बदल करून निर्माण झालेले अन्नधान्य अशा प्रकारच्या ठेव्याला संपुष्टात आणणार नाही ना, हीदेखील अनेकांची चिंता आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे, म्हणजे येथे ग्राहकाला निवडीला वाव मिळणार का? जनुकीय बदल केलेले धान्य व देशी धान्य यांच्या बाह्य रंगरूपात भेदभाव नसणार म्हणे! मग आपल्याला विकला जाणारा माल आपल्या चॉईस चा आहे हे सांगणारी यंत्रणा भारताच्या भाजीबाजारात अजून तरी विकसित झालेली नाही, त्यामुळे ओळखावे कसे? Sad

शेवटी ते बिटी "वांगं" माणसाच्या पोटातच जाणार आहे ,त्यामुळे पोटावर काय काय परिणाम होतील्,हे तपासुनच "निर्णय" घेतला जावा ,एवढीच विनंती !

अनिलजी,
विष निर्माण केले की त्याची पडताळणी उंदरावर केली जाते.
उंदराचा किती वेळात प्राण जातो त्यावरून त्या विषातिल विषाचे प्रमाण ठरविले जाते.
आता बीटी जनुकाचे मानवी जिवनावर काय परिणाम होतात ते तपासायचे झाले तर जगात भारताव्यतिरिक्त दुसरा कोणता देश तयार होईल हो "उंदिर" बनायला..?

मी तिथे गेलो होतो, पण आमच्या इथुन साईट ब्यान आहे त्यामुळे मला काही करता आले नाही!
तरीही, या अस्ल्या घाऊक प्रयोगान्च्या मी विरोधात आहे! Happy

@अरुन्धती ताई,
आजचा सुधारक या नियतकालिकात या विषयावर छान माहिती आलेली आहे.
भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणी रहाणीमान पहाता बायोटेक शेतीला पर्याय नाही असेच वाटते.
कापसाचे उदाहरण घेतले तर एकंदर लागवडीखालील क्षेत्रात आपला जगात पहिला नंबर आहे पण एकरी उत्पादनात मागे आहोत. बीटी कपसाला जंतुनाशके कमी लागतात हेही चांगलेच आहे ना?
जेनेटिक मॉडिफाईड अन्न पूर्ण अभ्यासानंतरच येइल. पण एखादे फळ जेनेटिक मॉडिफाईड आहे एवढ्याच कारणाने विरोध करणे योग्य नव्हे. सीडलेस द्राक्षे एका अर्थाने जे मॉ च आहेत.
जे मॉ तांदूळ, मका, वगैरे जास्त पौष्टीक करता येतात.
भारतातील तरूण संशोधकांना हे एक नवेच जग पदाक्रांत करता येइल.

>>सीडलेस द्राक्षे एका अर्थाने जे मॉ च आहेत.
सीडलेस द्राक्ष हे निसर्गतः तयार झालंय. ते ट्रांन्सजेनिक किंवा मानवनिर्मित जेनेटिक मॉडिफिकेशन नव्हतं. जेनेटिक म्युटेशनमुळे (अचानक डीएनए मधे होणारा आणि पुढल्या पिढीकडे दिल्या जाणारा बदल) पहिल्या सीडलेस द्राक्षात बियांना असणारं कठिण कवच तयार होऊ शकलं नसावं (stenospermoscarpy) असा अ.न्दाज आहे. त्यापासून अत्यंत काटेकोरपणे ब्रिडींगने सीडलेस द्राक्ष तयार करायला वेलींवर प्रयोग केले गेले.

आजकाल मात्र जीन ट्रान्स्फरचं तंत्र वापरून फळाची वाढ जलद करणारे हॉरमोन्स झाडातच तयार करून परागीकरणाशिवाय फळं मोठी तयार करता येतात. अशाप्रकारे परागीकरणाशिवाय तयार झालेल्या फळात बीजधारणा होऊ शकत नाही.

@ अनिलजी व गंगाधर मुटे : भारतात बीटी धान्योत्पादन करण्याअगोदर त्याविषयी तपशीलवार व प्रदीर्घ संशोधन करून त्या धान्याचा आरोग्यावर व भारतातील शेती, शेतजमीन व पर्यावरणावर कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही ह्याची खात्री करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता येथे बीटी धान्याला खुला वाव देणे म्हणजे अनारोग्य व प्रदूषणालाच निमंत्रण दिल्यासारखे होईल ना? आज शास्त्रज्ञही एकमताने ह्यावर ठामपणे सांगू शकत नाहीत की बीटी धान्याचा मानवी शरीरावर व पर्यावरणावर कोणताही गैर-परिणाम होणार नाही म्हणून! फ्रान्स, जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांतील नागरिकांचा बीटी धान्याला कडाडून विरोध आहे. त्याच्यावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. एवढी वादग्रस्त पार्श्वभूमी असताना लोकांच्या आरोग्याशी खेळले जाऊ नये असेच वाटते.

@ विजय कुलकर्णी : आजचा सुधारक मी नक्की पाहिन. पण आपल्या शेतकर्‍यांच्या भवितव्याचा व अन्नधान्योत्पादनात वाढ होण्याचा जो दावा केला जात आहे तो जर सर्वांच्या आरोग्याच्या बदल्यात झाला तर ते किती महागाचे जाईल ह्याचाही विचार व्हावा. भारतीयांचा 'प्रयोग' करण्यासाठी वापर होऊ नये.
मागे डी.डी.टी. सारख्या जंतुनाशकांविषयीही शास्त्रज्ञांनी त्याचा जीवाला अजिबात धोका नसल्याचे निर्वाळे दिले होते. पण ते फोल ठरलेच ना? मग सामान्य माणसाने आपल्या जीवाशी खेळ होण्याचा धोका असणार्‍या बीटी धान्योत्पादनाला का म्हणून अनुमोदन द्यावे?

आज भारताच्या सरकारी गोदामांत हजारो क्विंटल धान्य सडून/ उंदरांनी खाल्ल्याने किंवा अन्य कारणांनी वाया जाते. किंवा वाया घालवले जाते!! भाज्यांना रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी त्यांना अक्षरशः सडण्यासाठी सोडून देतात. आणि ह्या सर्वांमागे आर्थिक डावपेच भरपूर असतात. अशा वातावरणात कितीही हजार टन धान्य उत्पादन केले तरी ते लोकांच्या मुखी पडेल का? भाव खाली येतील का? [अर्थात हा सर्वस्वी वेगळा विषय आहे.... परंतु त्याचा बीटी वांग्यामागील अर्थकारणाशीही घनिष्ट संबंध आहे!]

@ मृण्मयी : तुम्ही पुरवित असलेल्या उपयुक्त शास्त्रीय माहितीबद्दल आभार! Happy

>>मागे डी.डी.टी. सारख्या जंतुनाशकांविषयीही शास्त्रज्ञांनी त्याचा जीवाला अजिबात धोका नसल्याचे निर्वाळे दिले होते. पण ते फोल ठरलेच ना?

डी डी टी ची ही पहा दुसरी बाजू.

http://www.heartland.org/custom/semod_policybot/pdf/15940.pdf

हे सगळे उलटेसुलटे वाचुन काहीच कळत नाही कोण खरे बोलतेय आणि कोण खोटे बोलतेय. मी गेले कित्येक वर्षे डीडीटी वाईट म्हणुन समजत होते. अगदी गरुडासारख्या पक्षाच्या पैदाशीवर डीडीटीचा परिणाम झालाय असे वाचलेय. पण 'जर्नल ऑफ अमेरिकन फिजीशियन आणि सर्जन' मध्ये एका पिएचडी धारकाने याच्या उलट लिहिलेय म्हणजे कुठेतरी काहीतरी काळेबेरे आहेच ना?

एकुण आज माणसे स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यावधी माणसांचा बळी द्यायला तयार तर होतातच पण त्यांच्या स्वतःच्याच पुढच्या पिढीवरही त्याचा परीणाम झाला तरीही त्यांना त्याचे काहीच वाटत नाही... (कोणीतर जग हे मिथ्या आणि ब्रम्ह हेच सत्य हे भारतीय तत्वज्ञान पटवा त्यांना Happy )

(या संदर्भात मायबोलीवरच प्रकाशित झालेल्या 'दे कॉल मी इ. झेड' ची आठवण झाली)

फ्रान्स, जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांतील नागरिकांचा बीटी धान्याला कडाडून विरोध आहे. त्याच्यावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. एवढी वादग्रस्त पार्श्वभूमी असताना लोकांच्या आरोग्याशी खेळले जाऊ नये असेच वाटते.

मुटे जी,अरुन्धती जी,साधना जी !
याचप्रमाणे "इन्डोसल्फान" यावर सुद्धा बरयाच देशात गेल्या कित्येक वर्षापासुन बंदी आहे, पण भारतामध्ये अजुन ही ते मोठया प्रमाणात वापरलं जातय .....

वर डिडिटी ची दुसरी बाजू वाचल्यावर इंडोसल्फान चीही दुसरी बाजू असेल असे वाटायला लागले Happy

सगळा पैशांचा आणि व्हेस्टेड इन्टेरेस्ट्स चा खेळ आहे. जिथे बंदी घातलीय तिथे ती का घातलीय त्याची खरी कारणे कधी बाहेर येणार नाहीत, आणि जिथे बंदी नाहीय तिथे अजुन का नाहीये तेही कधी कळणार नाही. तसे अनेक ड्रग्ज असतिल जे युएसमध्ये बॅन असतिल आणि इथे मिळत असतिल..

असं म्हणतात की दुसरया महायुद्धानंतर अमेरिकेजवळ खूप मोठ्या प्रमाणात विषारी रसायन शिल्लक राहीलं, तेच पुढे इंडोसल्फान च्या नावानी भारताला पुरवलं गेल , आता जशी स्वाईन फ्लु ची लस पाठवली जातेय ...

वरील सर्व रसायने कधीनाकधी, कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या शरीरात प्रविष्ट झाली असतील.
नक्को वाटते हे आक्रमण! सेंद्रीय शेतीचा मार्ग सुखाचा......
भारताने भरमसाठ लोकसंख्या वाढविली (किंवा वाढवू दिली गेली) आणि आता अन्नधान्य पुरेल किंवा नाही ह्या चिन्तेत बाहेरून पुरेसे संशोधन न झालेले बीज, धान्य मागवणार.
लोकांच्या जीवाशी व निसर्गाशी खेळ!

डी डी टी प्रकरणातूनच या पर्यावरणवाद्यांच्या भूमिकेवर हसावे की रडावे ते कळत नाही. 'सायलेंट स्प्रिन्ग' हे पुस्तक तर पर्यावरणवाद्यांचे बायबल आहे.
मलेरिया डासांमुळे होतो आणी मलेरिया निर्मुलनासाठी डासांना मारून टाकणे हाच सोपा, साधा सरळ उपाय आहे. अमेरिकेतून मलेरियाचे पूर्ण निर्मूलन ( डी डी टी च्या मदतीने) झाल्यानंतर अमेरिकेला डी डी टी मुळे गरुडांच्या अंड्यांची कवचे पातळ होतात हा बादरायण शोध लागला आणी अमेरिकेने डी डी टी वर बंदी आणलीच, पण ते वापरणार्‍या अन्य गरीब देशांना मदत न देण्याचे जाहीर केले. त्यामुळे मलेरिया जगातून जवळ जवळ गेला होता तो परत आला.

आताही अमेरिकेतील बहुतेक मका, कापूस, सोयाबीन हे जी एम आहेत. असे असताना काही अतिउत्साही आणी आक्रस्तळ्या आंदोलकांचे ऐकून आपण बी टी वांग्याना परवानगी न देणे चुकिचे ठरेल. बी टी कापसाला आधीच परवानगी दिली असती तर शेतकर्‍यांच्या काही आत्महत्या तरी टाळता आल्या असत्या.

भारतातून ऑरगॅनिक कॉटनला जर्मनीसारख्या देशांतून मोठी मागणी असतानाही? बाहेरचे देश आज भारतातून बीटी कापसाची मागणी करतात की ऑरगॅनिक कापसाची?

अरुन्धती जी , तुमच्याशी मी सहमत आहे
.... नक्कोच हे आक्रमण! लोकांच्या जीवाशी व निसर्गाशी खेळ! सेंद्रीय शेतीचा मार्ग नेहमी आणि नक्कीच सुखाचा......

ट्रान्सजेनिक (किंवा जेनेटिकली अल्टर्ड्/मॉडिफाइड) पिकाचे दुष्परिणाम समजायला आणि ते ठामपणे सिध्द करायला अजूनही बर्‍याच संशोधनाची गरज आहे...........

अजुन १०० वर्ष सशोधन केले तरी ते १००% ठामपणे सिध्द करता येणार नाही

नक्को वाटते हे आक्रमण! सेंद्रीय शेतीचा मार्ग सुखाचा......

नुस्ता सेन्द्रीय शेतीचा मार्ग आमलात आणला तर, भारताच्या भरमसाठ लोक स्न्ख्या ला कस खाऊ घालणार, थोडी महागाई वाढली की मोर्चे निघतात...... आन्दोलने होतात, सरकार बदलतात.......

भारतातून ऑरगॅनिक कॉटनला जर्मनीसारख्या देशांतून मोठी मागणी असतानाही? बाहेरचे देश आज भारतातून बीटी कापसाची मागणी करतात की ऑरगॅनिक कापसाची?

मागणी आणि बी. टी कॉटन चा दुर दुर सबन्ध नाही........ बी, टी कॉटन ऑरग्यानिक पद्धतीने पण घेऊ शकतात......

विरोध करणारे फक्त विरोध करतात, पण genetically modified crops ने नेमके कुठले आजार/ दुषपरीणाम होणार आहेत के कोणीच सान्गत नाही.......

काळाच्या ओघात निसर्गतः होणारी उत्क्रांती,बदल कोणीच रोखू शकत नाही.
तसेच मानवनिर्मित संशोधने फार काळ रोखून धरता येणार नाही.
पण ही संशोधने अंमलात आणतांना "जिवघेणी" ठरणार नाही, याची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे.

काळाच्या ओघात निसर्गतः होणारी उत्क्रांती,बदल कोणीच रोखू शकत नाही.
तसेच मानवनिर्मित संशोधने फार काळ रोखून धरता येणार नाही.
पण ही संशोधने अंमलात आणतांना "जिवघेणी" ठरणार नाही, याची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे >>>>>>>

अगदी बरोबर......

अनेकजणांच्या प्रयत्नांनंतर, वेगवेगळे शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, संस्था, राज्ये, सामान्यजनांच्या विरोधासमोर सरकारने तूर्तास तरी बीटी वांग्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी संशोधन प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा सल्लाही दिला आहे. योग्य व प्रदीर्घ संशोधन करून जर बीटी वांगे भारतीय माणसाच्या आरोग्याला व पर्यावरणाला कोणतीही हानी पोचविणार नाही हे पुराव्यासकट सिद्ध झाले तरच बीटी वांगी भारतात येतील असा निर्वाळा तूर्तास देण्यात आला आहे.
आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार! Happy

पण तरी ही सरकारने बीटी वांगे याला पुर्ण विरोध,बंदी हा शब्द वापरला नाही, त्यांना जे करायचं ते ते लोक,मेडिया जरा शांत झाले की मान्य करुन टाकतील ...शेवटी आताचं जगच हे डालर पुढे झुकणारे आहे ...असं वाटतं !

Pages