गाडीच्या खाली काहीतरी मोठा आवाज आला, आणि तो दचकला. भान येऊन त्याने समोर पाहिलं. डावीकडे सरळ जाणारा रस्ता, आणि उजवीकडे पुढल्या मोठ्या चौकात न थांबता सरळ निघून जाण्यासाठी नव्यानेच तयार झालेला फ्लायओव्हर. या दोघांच्या मध्ये लख्ख पिवळ्या रंगात रंगवलेले दगड. सुरुवातीला छोटे, मग मोठे होत जाणारे. मग त्यानंतर रीतसर लोखंडाचे रेलिंग.
तर, झालं असं होतं, की डावीकडे किंवा उजवीकडे न जाता सरळ गेल्याने त्या मधल्या दुभाजक दगडांवर गाडी गेली. मग पुढे आणखी जास्त उंच झालेल्या दगडांवर गाडीचे अख्खे बुड ठेचले गेले. वेगात असल्याने गाडी पुढे जात राहिली, मग शेवटी लोखंडाचे रेलिंग सुरू होत होते तिथे शेवटी नाकावर आपटून थांबली.
आता चौदाशे किलो वजनाचे ते धुड असे आपटले तर मोठा आवाज होणारच. पण त्याच्या मते तो दचकला, ते निशाच्या भयानक ओरडण्यामुळे. बहुतेक गाडीला ठोकर लागल्याच्या आवाजापेक्षा तिचे किंचाळणे मोठ्या आवाजातले असेल.
बाहेर येऊन त्याने बघितले. गाडी सोडावी का इथेच? नको. थोडी रिव्हर्स घेऊन बघू या. इंजिन अन गिअर बॉक्स ठिकाणावर आहे का ते तरी बघावे.
तो परत गाडीत येऊन बसला. त्याने डोळे मिटून इग्निशन ऑन केले. मग निशाकडे बघितले, तर ती भयानक नजरेने त्याच्याकडेच बघत होती. त्याचे डोके गरगरले. अल्कोहोलची धुंदी आता ओसरली होती. राहिली होती फक्त तोंडातली कडूशार चव आणि ढवळून येणारे पोट. त्याला उलटीची भावना झाली. छे. डोळे मिटून फायदा नाही. आणखीच वाईट अवस्था होणार.
मग त्याने सताड डोळे उघडले. फ्लायओव्हरवरच्या सोडियम व्हेपर लँप्सची रांग बघितली. मग सर्वात जवळच्या लँपकडे वर मान करून निश्चयाने दोन सेकंद बघून गाडी सुरू केली. मग रिव्हर्स गियर टाकून गाडी मागे घेऊ लागला. गाडीचे धुड परत त्या दगडांवर विचित्र आवाज करीत घासत गेले. अन त्या आवाजाने निशा पुन्हा किंचाळली. काही तरी वारे डोक्यात घुसल्यागत तो ओरडला, ’फ्फक! विल यु प्लीज शट अप?’
निशाचा आ वासलेला तसाच राहिला. तिच्या डोळ्यांत दु:ख, संताप अन भितीचे मिश्रण झाले होते. ते बघत त्याने पुन्हा मागे-पुढे बघितले अन गाडी मागे घेऊन त्याने नीट रस्त्याला लावली. पुन्हा खाली उतरून गाडीची अवस्था बघितली. बॉनेट ठेचले होते. पुढची ग्रिल निघून कुठेतरी पडली होती. एक हेड्लाईट फुटले होते. बुडाखाली काय काय झाले होते, ते देवच जाणे.
गाडीत बसून पुन्हा गाडी चालू करून त्याने गाडी हलकेच पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पहिला अन दुसरा- दोन्ही गियर्स दोन्ही पडत नव्हते. गियर बॉक्स डॅमेज झाला असावा. तिसरा गियर कसाबसा पडला. बारा किलोमीटर अशी गाडी चालवायची? तीही शहरातल्या या असल्या वाईट ट्रॅफिकमधून?
चकार शब्द तोंडातून न काढता कसेबसे ते घरी आले, तेव्हा त्याचे डोके भयानक चढले होते. काहीच न बोलता दोघे वर आले. दरवाजा उघडून दोघे आत आले अन निशाने बेडवर झोकून देऊन मुसमुसायला सुरूवात केली.
'ओ नो! आता इपिसोड नको, प्लीज..' तिरसटून तो बोलला, ’इनफ इज इनफ. कुठचाही ड्रामा नको. मी हे सारे मुद्दाम केलेले नाही. उपदेशामृत, इसापनीतीचे डोस, तत्वज्ञान यांतले काहीही नको प्लीज..’
ती उसळून बेडवरून उठून उभी राहिली, तेव्हा तो आवेश बघून तो जरा थिजलाच. डोळे रोखून ती आग ओकत ओरडली 'मग काय पाहिजे तुला, नालायक माणसा? किती दारू प्यायलास, तूला माहितीये? पंचवीस वेळा तरी चल म्हणून तूला ओढत होते. पण तू ढिम्म. या असल्या घाणेरड्या पार्ट्या मला अजिबात आवडत नाहीत. तू काय करत होतास, कुणाशी काय नि किती बोलत होतास, तुला शुद्ध होती? घाणेरडे विनोद काय, टाळ्या देणे अन झिंगत मिठ्या मारणे काय. हे सारे कमीच झाले, म्हणून तू बाहेर आल्यावरही हॉटेलच्या त्या मूर्ख रिसेप्शनिस्टशी गप्पा मारत बसलास. मग त्यानंतर पुन्हा लॉबीतल्या काँप्युटरसमोर जाऊन बसलास. कशासाठी ते तुलाच माहित. बाहेर निघाल्यावरही तुझी मूर्ख बडबड चालूच. गाडी तिथेच ठेऊ या म्हटले, तर धुडकावून लावलेस. तिचा आणि काय सत्यानाश करून ठेवला आहेस, कुणास ठाऊक. कसली मस्ती चढली आहे तुला एवढी?’
हातवारे करत निशा आणखी बरंच काय काय बोलत होती, अन तो तिच्या तोंडाकडे आश्चर्य बघितल्यागत बघत होता. डोळ्यांतनं आग ओकत तिने धाडकन त्याच्या तोंडावर बेडरूमचा दरवाजा लावला, तेव्हा ढणाढणा चालत असलेले एखादे रेडिओ स्टेशन अचानक कुणीतरी बदलल्यागत त्याला वाटले. मग तो हलकेच चालत हॉलमध्ये आला, नि निर्बुद्धपणे टीव्हीसमोर बसून राहिला. हे एवढे घडले? कधी? इतकी शुद्ध हरपून जाईस्तोवर आपण पीत होतो?
पार्टीमध्ये मोठमोठ्याने टाळ्या देत हास्यविनोद करणे, मिठ्या मारण्याइतपत तो दारू कधी पीत नसे. शिवाय, रिसेप्शनिस्टशी अघळपघळ बोलणे मग लॉबीतल्या काँप्युटरवर जाऊन बसणे.. छे, छे! थोड्याच वेळापूर्वी असे काय काय केले, नि आता आठवत काहीच नाही? कमाल आहे! आणि त्यानंतर सरळ डिव्हायडरवर गाडी घातली आपण. पुरती वाट लावली गाडीची..
सोफ्यावर बसून डोके दाबत त्याने डोळे मिटले, तशी दारूची कडूशार चव त्याच्या तोंडात पुन्हा एकदा आली. मग पुन्हा एकदा पोट ढवळून आले. चक्रावत, झोकांडत तो बाथरूममध्ये गेला. मग उलट्या. अख्खे शरीर क्रुरपणे कुणीतरी पिळून काढतेय, पोटात असंख्य सुया खुपसतेय असं त्याला तेवढ्या काही क्षणांत वाटून गेले. अश्रूभरल्या डोळ्यांत वेदना अन घामाने डवरलेला चेहेरा घेऊन तो आरशासमोर उभा राहिला, तेव्हा त्याला स्वतःचीच दया आली..
***
आज खरे तर दिवसच बेकार होता. सकाळी ऑफिसात आल्या आल्या एका क्लायंटशी वाद झाला, अन त्याचा मुडच गेला. यांत्रिकतेने, पडेल चेहेर्याने रोजच्या फॉर्मालिटीज पार पाडत राहिला. मग जॉर्जचा फोन. दोन तीन वेळा. त्याने तो घेतलाच नाही. अर्ध्या तासात जॉर्जच हजर झाला. आता बडबड करून हा डोके उठवणार. फोन घेतले असते तर बरं झालं असतं. जॉर्जला बसल्या जागीच जवळपास नाचत बोलायची सवय होती. बरचसं बोलून अन नाचून झाल्यावर तो बॅगेतून एक इन्व्हाइट काढत म्हणाला, 'सगळ्या बिझिनेस असोसिएट्सना पार्टी आहे सायंकाळी. नक्की ये. आला नाहीस, तर फोन करून बेजार करीन. पाहिजे तर लवकर जा, पण हजेरी लाव. जीएमना तू तिथे दिसायला हवास..'
त्याला खरं तर प्रचंड कंटाळा आला होता. पण जावं लागणार. घरी निशाला फोन करून विचारावे का- येतेस का म्हणून? एकटे जाणे म्हणजे मोठी शिक्षा. आज तरी.
मग फोन केला. निशाने हो म्हटल्यावर त्याला जरा बरं वाटलं.
तोवर पाच वाजलेच. मग खाली कॅफेटेरिया मध्ये जाऊन बसला. चहाचा कप घेऊन म्हटलं तर शुन्यात, म्हटलं तर समोर वाहत्या रस्त्याकडे बघत बसून राहिला. खांद्यावर हात पडल्यावर वळून बघितले, तर जस्मिन. हिचं थर्ड फ्लोअरला ऑफिस आहे. इंटेरियर डिझायनर आहे. बोलणं अन वागणं भयंकर मोकळं. तिला बघत असल्यापासून तिच्या डोळ्यांत त्याला एक प्रकारचं खुलं आव्हान दिसायचं. ते तसं त्यालाच वाटायचं, की सर्वांना ती अशीच दिसायची, की तिचे डोळेच तसे होते- हे काही सांगता यायचं नाही.
खुर्ची ओढून आणत ती शेजारीच बसली तेव्हा पर्फ्युमचा मंद वास आला आणि तो थोडा उल्हसित झाला. कॉफीचा कप बाजूला ठेऊन ती त्याच्या दंडाला हात लावून म्हणाली, 'विश मी. माझा बर्थडे आहे आज.'
'वा! व्हेरी हॅपी बर्थडे. थांब मी पेस्ट्रीज आणतो.'
'नको. शुभेच्छा पुरे. उलट मीच नको का ट्रीट द्यायला?'
'दे की मग. रेडी. एनीटाईम.'
'हं. चल मग घरी. भावाने कितीतरी छान छान वाईन्स आणून दिल्यात मला. त्यांचे नशीब तरी कधी उघडणार?' डोळे मिचकावत ती म्हणाली.
'थँक्स. पुन्हा कधी तरी नक्की. आज एक मीट आहे बिजनेस टुडेची. जावेच लागेल.'
आणखी जवळ सरकून तिने त्याच्या डाव्या खांद्याला स्पर्श केला. मग तसाच तिचा तळवा खाली सरकत त्याच्या बोटांपर्यंत येऊन थांबला. हात हातात घेऊन ती म्हणाली, 'अॅ'म सिरियस. खरंच करते आहे तुला इन्व्हाइट. टाळण्याइतकी वाईट आहे मी?'
ओ, नो.. तिचे डोळे..! त्याला खरेच कष्ट पडले तिच्या डोळ्यांतून नजर काढून घेताना. कसाबसा तो म्हणाला, 'नाही, नाही.. टाळायचा प्रश्नच नाही. पण प्राईडला जावे लागणार. आधीच कबूल करून बसलोय.'
क्षणभर त्याच्याकडे रोखून बघत, मग खळखळून हसत उठून ती म्हणाली, 'क्के! सी यु टुमारो. टेक केअर..'
***
उलट्या झाल्याने अगदीच गळून गेल्यासारखे वाटत होते. प्रचंड थकून जाऊन खांदे पाडत, खाली मान घालून तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला.
दिवस वाईट. त्याचा शेवट पण वाईटच. गाडीची अवस्था आठवल्यावर त्याला आता आणखीच वाईट वाटू लागले.
खरे तर हा दिवसच उगवायला नको होता. किंवा उगवला आहेच तर विसरला तरी जावा लवकर. पण खरं तर असे दिवसच जास्त लक्षात राहतात. पण किती दिवस लक्षात राहील? काही तास, काही दिवस मागे जाऊन झालेल्या चूका दुरुस्त करता आल्या तर?
हॉलच्या भिंतींकडे तो पाहत राहिला. ती त्रिमितीय जागा त्याला हळूहळू मोठी होतेय असा भास झाला. भिंती एकमेकांपासून दुर सरकत गेल्या. अनंतापर्यंत. मग भली मोठी पोकळी. ही अनेकमजली इमारत तयार व्हायच्या आधी काही वर्षे इथे, याच जागेवर होती तशी. या थ्री-डायमेन्शन्सच्या व्यतिरिक्त अजून काही तरी आहे तर. फोर्थ डायमेन्शन. टाईम अॅक्सिस.
तो अगतिक झाला. हे काही खरं नाही. वेडे होऊ आपण. मागे जायला हवे. चूक दुरूस्त करायला हवी..
एका हाताने डोके गच्च धरत दुसर्या हाताने त्याने डीव्हीडीचा रिमोट कंट्रोल उचलला. अन त्याची बटणे चाचपू लागला.
कुठे आहे तो टाईम अॅक्सिस? 'प्रिव्हियस', 'बॅकवर्ड' कुठे आहे? कुठे आहेत ही बटणे?
सापडली. त्याने तावातावाने ती स्क्रीनकडे रोखून दाबायला सुरूवात केली, तर तो स्क्रीन काळ्याशार, थंड नजरेने याचे हे सारे चाळे, खेळ पाहत होता.
गॉड! आपण खरेच वेडे होणार. टीव्ही बंद. डीव्हीडी बंद. अन वेड्यासारखी बटणं दाबतोय. त्या नतद्रष्ट पार्टीला जायलाच नको होते मुळात. गेलो, तरी निशाचे ऐकायला हवे होते.
तो थबकला. त्याने हाताची बोटे बघितली. जीव खाऊन बटणे दाबल्याने लालबुंद झाली होती ती. कुठून मंदसा गंध आल्याची त्याला जाणीव झाली. त्याने नकळत पुन्हा रिमोट हातात घेतला. त्यावरच्या बॅक.. प्रिव्हियस या बटणांवरून हात फिरवू लागला..
निशाचे ऐकायला हवे होते, की जस्मिनचे?
***
आज दिवस बेकार. कारण सकाळीच एका क्लायंटशी वाद झाला.
मग नको ते, कंटाळवाणे फोन आले. त्यातच एक जॉर्जचा.
बरोबर. कंटाळवाण्या दिवशी अशाच लोकांचे फोन येणार.
एकदा. दोनदा. तीनदा. उचललाच नाही.
मग तो स्वतःच आला. साल्याला बसल्याजागी नाचत बोलण्याची सवय. बोअर.
म्हणाला, 'देअर इज अॅन इन्व्हाइट. असोसिएट्सची मीट आहे प्राईड एक्झिक्युटिव्हला. यु मस्ट. जीएम वाँट्स यु देअर.'
त्याला वाटेस लावलं, अन कंटाळा झटकण्यासाठी तो खाली कॅफेटेरियात आला.
तर तिथं जस्मिन.
ती जवळ येऊन बसली. हात डाव्या खांद्यावर ठेवत, मग तसाच खाली आणत मनगट, मग तळहात हातात घेऊन ती म्हणाली, 'विश मी. माय बर्थडे!'
त्याने मनापासून तिला शुभेच्छा दिल्या. मग खळखळणार्या पाण्यागत ओसंडून वाहत तिने गप्पा केल्या. मग एकदम त्याचा हात पकडून म्हणाली, 'कम विथ मी. माझ्या घरी. ए ट्रीट फॉर माय बिग डे. मस्त वाईन आणि कबाब. व्हाट्से?'
त्याने तिच्याकडे बघितले, तर ती डोळे रोखून त्याच्याकडे बघत होती. गॉड! या डोळ्यांतून नजर काढून घेणं शक्य नाही..!
संमोहित झाल्यागत तो तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिला, तसं ती पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली, 'नाही म्हणू नकोस प्लीज. भुतागत एकटे जेवणे आज तरी फार जड जाईल बघ मला. वाढदिवस साजरा-बिजरा करणे दुरच..'
तिच्या डोळ्यांत किंचित दुखरी छटा आता आली होती होती. तिच्या कुटूंबाची झालेली परवड त्याला माहितीच होती. पण जॉर्जला हो म्हणून बसलोय. काय करावे?
ती पुन्हा म्हणाली, 'हॅलो, काय झालंय? हो म्हणणं जड जातं आहे का? कुठे जाणार आहेस दुसरीकडे? की घरीच? निशाला कुठे नेण्याचं कबूल केलंस का?'
'नाही, नाही.' भानावर येऊन तो म्हणाला, 'तसं काही नाही, पण एक बिझनेस पार्टी होती. तशी कंटाळवाणीच. जाऊ दे. फोन करून सांगतो काहीतरी कारण. मी येईन जेवायला तुझ्या वाढदिवसाचं..!'
मग ती पुन्हा खळाळत्या पाण्यागत ओसंडून वाहिली. 'सो स्वीट! थँक्स! सात वाजता निघू या. माझी गाडी इथेच ठेवेन. तुझ्या गाडीतनं जाऊ या. जेवून तसाच घरी जा मग. चालेल?'
तो 'हो' म्हणाला, तशी तिने पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मग दंडावरून तसाच सरकवत खाली मनगट अन बोटांपर्यंत आणला. मग 'सी यु लॅटर' म्हणून ती गेली.
तो तसाच बसून राहिला. तिच्या कॉफीच्या मगाकडे बघत. मग आपलाच डावा खांदा, दंड, मनगट अन बोटे चाचपत.
***
'ओह! अमेझिंग टेस्ट! नुसती वाईनचीच नाही, तर तुझ्या घरातल्या प्रत्येक वस्तू निवडण्या-ठेवण्यातली तुझी टेस्ट..' तो म्हणाला.
'खरंच? तसं असेल, तर ती मॉमची देणगी. तिनंच माझी ही टेस्ट डेव्हलप केली, असं म्हणायला हरकत नाही. ती खरं तर माझ्यापेक्षा चांगली डिझायनर होऊ शकली असती बघ..'
'किचनमध्ये बघू या का, काय चाललंय तुझ्या गॅसवर?' तिच्या डोळ्यांत पुन्हा दुखरी छटा पाहून त्याने पटकन विषय बदललायचा प्रयत्न केला. आज तिचा वाढदिवस. आज तरी तिला नको त्या आठवणी काढू देऊ नये.
त्याचं ते विषय बदलणं जाणवून ती हसून म्हणाली, 'नाही काढणार विषय. दुसरंच बोलू या चल.'
'हो. ठीक आहे. राजा-राणीची गोष्ट सांग मग!'
पुन्हा खळखळून हसत ती म्हणाली, 'माझ्या आईचा विषय बंद करून तुझ्या आईचा सुरू केलास वाटते? मागे बोललेलास ना, तिला अशा गोष्टी सांगायला खुप आवडतात म्हणून.'
'हो, पण आता कुणाला सांगणार ती? नातवंडं तर नाहीतच अजून.' डोळे मिचकावत तो म्हणाला.
'तुच ऐकत जा की मग. लहान मुलापेक्षा फार वेगळा नाहीस तू!' पुन्हा मोठ्याने हसत, आणि वाईनचे रिकामे झालेले ग्लासेस पुन्हा भरत ती म्हणाली. तेवढ्यात रेडिओवरून कानावर रफीचे 'अभी ना जाओ छोडकर' चे तलम, रेशमी सुर. 'अ लिटल चॅप! त्या देव आनंदसारखा..!'
'ओह नो! देव आनंद आणि लिटल चॅप?' तो न राहवून खदाखदा हसत सुटला.
'का? तुला आवडत नाही तो?'
'नो! क्रेझी गाय, ही इज!' तो चटकन म्हणाला, 'ते डोळे, तो कोंबडा, ते खुळे हात. अर्रर्र. अशक्य माणूस होता तो!'
'होता नाही, आहे. अँड, यु नो समथिंग? त्याचे हात लांब होते. या गुढग्यापर्यंत आलेल्या हातांचं काय करावं, म्हणून तो हात खुळे ठेवायला शिकला- ते आजतागायत!'
'बाप रे! बरीच महत्वाची माहिती जमवलेली दिसतेय. सांग बरं आणखी काहीतरी, पामराला त्या महान देवाबद्दल.'
मग ती भरभरून बोलत राहिली. त्या देवाबद्दल, गाण्यांबद्दल. तिच्या आईवडिलांबद्दल, तिच्या लहाणपणाबद्दल. तिच्या सवयींबद्दल, तिच्या इंटेरियर डिझाईन्सबद्दल, तिच्या क्लायंट्सबद्दल. आणि बरंच काही.
तो तिच्या डोळ्यांकडे पाहत सारं काही लक्षपूर्वक ऐकू लागला. हे एक बरंच झालं. आपण मुलखाचे मुखदुर्बळ. काय बोलावं हा आपल्याला नेहेमीच प्रश्न पडतो. वाईनची मस्त चव जीभेवर आणि जस्मिनचं ते प्रसन्न होऊन खळाळत बोलणं. त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. हे संपू नये असं त्याला वाटत होतं.
मग केव्हातरी ती किचनमध्ये गेली. रफीचे तलम सुर कानाजवळ गुंजन करत काही शब्द मेंदूपर्यंत पोचवत होते, तर काही तसेच ओघळून जात होते. पण तेही बरं वाटत होतं. एखादे गाणे उगीचच शिक्षा दिल्यागत लक्षपूर्वक काय ऐकायचे? तो बेसिनजवळ गेला आणि थोडे पाणी तोंडावर मारले. आरशात बघितले तर जस्मिन मागे उभी. तिथल्या दिव्याच्या उजेडात ती त्याला एखाद्या इजिप्शियन राजकन्येसारखी भासली. तो मग आरशातल्या तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिला. तिने मागूनच त्याच्या दोन्ही दंडांवरून तिचे दोन्ही हात हलकेच फिरवले, मग आणखी जवळ येत त्याच्या मनगटांपर्यंत, मग तळव्यांपर्यंत नेले.
तो वळला, तसे तिचे तेच जीवघेणे डोळे त्याच्यावर अक्षरशः आक्रमण करून आले. आता ते दुखरे पण तरीही बेभान वाटत होते. हे डोळे खरं तर जवळून बघायला हवेत. आणखी जवळून. तिच्या गालाला हात लावत तो तिच्या चेहेर्यावर झुकला तसे तिने बेभान होऊन त्याला घट्ट मिठीत घेतलं..
ओह, नो..! डोळे!! डोळे..!!! त्याने किंचित अलग होऊन दांडगाईने तिचे केस उजव्या मुठीत पकडले, अन तिचा चेहेरा त्या बेसिनच्या दिव्याकडे फिरवला. तिची अस्फुटशी किंकाळी त्याच्या लक्षात आली नाहीच. भान हरवून तिच्या डोळ्यांमध्ये पेटलेले लाखो दिवे तो पाहू लागला.
जस्मिनने न राहवून डोळे मिटले तसा तो अनावर झाला. हे डोळे मिटू नयेत. अनंतापर्यंत. त्याने पुन्हा तशीच दांडगाई करीत तिचे केस पकडले, आणि तिच्या डोळ्यांजवळ ओठ आणत तिला झुकविले. हे सारे सहन न होऊन ती जवळपास कोसळलीच जमिनीवर. आता तिला त्याचे हात हातात घेता आले. त्याच्या खांद्या-दंडापासून ते मनगटा-बोटांपर्यंत तिने बेभान झाल्यासारखे तिने तिचे ओठ फिरवले.
मग हवालदिल होत, ते लक्ष दिवे पेटलेले डोळे शोधण्यात हरवून जात तिचे सारे शरीर तो त्याच्या डोळ्यांनी, ओठांनी शोधत राहिला. ते केव्हा दिसले, ते त्याला कळलेच नाही.
जेव्हा कळले, तेव्हा पाय प्रचंड दुखत होते.
किंवा पाय भयानक दुखू लागल्यावर त्याला कळले.
काहीच न समजल्यासारखा तो उठून बसला. ती हलकेच उठली, अन त्याच्या डोळ्यांत बघत, मग कानात कुजबूजत म्हणाली, 'स्वीट! यु आर ए स्वीट लव्हर!!'
***
त्याने मोबाईल मध्ये बघितले, तर तेरा मिस्ड कॉल्स, निशाचे.
नको. आता, या सेकंदाला तरी घरी नको.
त्याने गाडी हायवेला घेतली, आणि चारही खिडक्या उघडल्या. वारा भरून घेत त्याने गाडीचा वेग वाढवला. त्याला आता घरात आल्यासारखं, थोडं उबदार-सुरक्षित वाटलं..
"आय ऑल्वेज लुक अॅट द आर्म्स.. लाँग आर्म्स!!"
त्याने वेग वाढवला. स्टिअरिंग व्हील वरच्या स्वत:च्याच हातांकडे पाहिले. लाँग आर्म्स! त्याला कळलंच नव्हतं आजपर्यंत. निशाही कधी म्हणाली नाही या हातांबद्दल..!
जीव खाऊन त्याने अॅक्सिलरेटर वाढवला. त्याने अर्ध्या उघड्या असलेल्या खिडक्या पुर्ण उघड्या केल्या, तसा वारा एकशे ऐंशीच्या स्पीडने भणाणत आत घुसला.
"आय डोन्ट बिलीव्ह माचो-मॅन! आय लुक अॅट द लाँग आर्म्स..!!’ जस्मिन पुन्हा त्याच्या कानात त्या भणाणत्या वार्यातून कुजबूजली.
जस्मिनचं घर इथंच कुठेतरी आहे. आपण जीव तोडून तिच्या डोळ्यांत बघत राहिलो आणि त्यानंतर कितीतरी वेळाने आपल्या शेजारी शांत पडून राहिली असताना ती म्हणाली, ’लव्ह यु.’ ती म्हणाली, 'किस माय इयर्स.’ ती म्हणाली, ’यु पुट मी ऑन द फायर.’ मग आपण डोळे मिचकावत विचारलं, ’मी तुला काय, माचो-मॅन वाटलो की काय!’
मग ती म्हणाली, 'डॅम इट! त्या माचो-मॅन वगैरे कल्पनेवर माझा विश्वास नाही. आय ऑल्वेज लुक अॅट द आर्म्स.. लाँग आर्म्स!!’
लॉन्ग हॅन्ड्स. धिस हायवे हॅज लॉन्ग हॅन्ड्स.. जस्ट टू लॉन्ग.. नेव्हर एन्डिंग! संपतच नाहीयेत..
त्याने पुन्हा वेग वाढवला. पण आपण पुढे जातोय की मागे? थांबायला हवे. नुसते थांबायलाच नाही, तर मागे जायला हवे. हे मूर्ख लांब हात नको आहेत आपल्याला. त्याने उजवा खांदा गच्च पकडला. मग दंड. मनगट. मग तसाच उजवा हात. काही तरी चाचपल्यागत. झटकून टाकायचा प्रयत्न केल्यागत.
आपण सुसाट पुढे चाललोय, हे काही खरं नाही.. पुढे नाही, मागे जायचे आहे. आपण मागे जायला हवं. काही तरी करून. रिव्हर्स गियर टाकू या का? आपल्या लांब हातांनी रिव्हर्स गियर टाकला तर, पटकन मागे जाता येईल का? मागून भयानक वेगाने असंख्य गाड्या येताहेत. पुन्हा वळण आलेय. किती वळणे घेतोय आपण. किती मागे जायचेय अजून. ओके, आता लास्ट. अँड ओव्हर.
मग त्याला दूरवर रिफ्लेक्टर्स दिसले. सूचनांच्या पाट्याही. इथे यु टर्न आहे. हा टर्न पकडायला हवा. ही एकच संधी आहे मागे जायची. त्याने मग ब्लिंकर्स चालू केले. सगळ्या खिडक्या बंद केल्या. समोरच्या आणि मागच्या गाड्यांचा अंदाज घेऊन वेग फारसा कमी न करता यु टर्न घेतला.
दोन्ही हात त्याने आखडून, अगदी जवळ आणत स्टिअरिंगवर ठेवले. बरंच पुढे आलो होतो आपण. बहुतेक अनंतापर्यंत. ते सारे अमानवी- भयानक वाटतेय. वेदना देणारे, खोटे वाटतेय. आता मागे जावे, माणसांत. निशाकडे.
***
अशा वेळी चिडायचं नाही. दिवसच वाईट, त्याला कोण काय करणार? सकाळीच एका क्लायंटने डोकं फिरवलं, पण तो आकडे मोजत गप्प बसून राहिला. मग थोडा वेळ मोबाईल बंदच करून टाकला. पुन्हा चालू केल्या केल्या जॉर्जचा फोन. हा एक कंटाळवाणा माणूस. आज तरी याच्याशी बोलणे नको. म्हणून फोन घेतलाच नाही.
पण तो जॉर्ज स्वतःच ऑफिसात हजर झाला. नाचत नाचत काहीतरी बडबड करू लागला. त्याच्या बर्याच बडबडीनंतर त्याला कळले, की जॉर्जच्या कंपनीने बिजनेस असोसिएट्सची पार्टी ठेवली आहे. आणि त्याला आमंत्रण आहे. त्याला पार्टीचा कंटाळा आला होता, पण जॉर्जची आणखी बडबड याक्षणी तरी त्याला नको होती. येतो, म्हणून त्याने जॉर्जला वाटेस लावले.
मग यांत्रिकपणे काहीबाही करत राहिला. कंटाळा आला म्हणून खाली आला, तर तिथे जस्मिन. तिने नेहेमीप्रमाणे त्याच्या खांद्या-दंडाला धरून खाली बसवले. तसाच हात खाली आणत त्याचा तळहात हातात घेतला. ही नेहेमी असंच करते. एकेकाची स्टाईल. ती त्याला पेस्ट्रिज आणि कॉफी ऑफर करत म्हणाली, 'विश मी. माय बर्थडे.' मग दिवसातून पहिल्यांदाच हसत त्याने तिला विश केले. मग अनेक विंड चाईम्स एकत्र वाजल्यासारखे ती हसत, बोलत राहिली. शेवटी मान तिरकी करत म्हणाली, 'कम विथ मी. लेट्स सिलेब्रेट. माझ्या घरी जेवायला येतोस?' तिच्या डोळ्यांकडे बघत तो म्हणाला, 'खरं तर मीच ट्रीट द्यायला हवी. पण आज नको. एक बिजनेस मीट आहे. जायलाच हवं.' एक सेकंद त्याच्याकडे रोखून बघत, मग ती खळखळून हसत म्हणाली, 'ओक्के. नो प्रॉब्लेम. एन्जॉय. मी जाते चल.' असं म्हणून तिने तसाच नेहेमीप्रमाणे खांद्याला, दंडाला स्पर्श करत निरोप घेतला.
पुन्हा जॉर्जचा फोन. मागल्या दोन वेळेस टाळले होते. आज जावेच लागणार. मग त्याने निशाला फोन केला. 'येशील का?' विचारायला. ती तयार झाली. मग त्याला थोडं बरं वाटलं.
पार्टीत जॉर्जच्या जीएमने त्याचं स्वागत केलं. भरपूर अघळपघळ गप्पा केल्या. निशाने अनेक वेळा 'बस्स, आता उशिर झालाय. निघू या.' असं म्हटल्यावर तो निघाला.
परत येताना एका फ्लायओव्हरच्या ठिकाणी गोंधळ झाला. खरं म्हणजे त्याला काही दिसलंच नाही. कळलं तेव्हा निशा ओरडत होती, अन दुभाजकाच्या मोठ्या दगडांवर गाडी चढून गेली होती. मग फ्लायओव्हर सुरू होतो, तिथंच लोखंडी रेलिंगला मोठा आवाज करत आपटली होती.
त्याने भान येऊन गाडी मागे घेतली. तशीच दगडांवर घासत, आवाज करत कशीबशी ती मागे आली. त्याने पुन्हा खाली उतरून बघितले. पुढच्या बाजूचे बारा वाजलेले, पण इंजिन जागेवर होतं, चालू होतं. ऑइल चेंबर लीक झाले असावे. पहिले दुसरे गियर्स पडत नाहीयेत. तो निश्चयाने गाडीत बसला आणि तिसर्या गियरमध्ये हळूहळू गाडी चालवत घरी आला.
मग निशाचा बंध न राहवून सुटलाच. दु:खसंतापानं ती त्याला बोलू लागली. तिच्या म्हणण्याप्रमाणे आज त्याचा ताबा राहिला नव्हता. खुप पिणे, बोलणे, बडबड करणे वगैरे. तिने त्याला अनेक विनंत्या करून बाहेर काढले, तर हा त्या लॉबीतला काँप्युटरवर ठाण मांडून बसला. कशासाठी? तर देव जाणे!
तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागला. निशाचं आणखी बरंच काय काय बोलून झाल्यावर तिने धाडकन बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. तो गळून गेल्यासारखा बाहेर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसला.
पिणे वगैरे काही आजचे नाही आपले. कॉलेजपासूनचे. पण असं कधी झालेलं आठवत नाही. शुद्ध हरपेपर्यंत पिणे- हे तर दुरच. आजच काय झाले मग? आता त्याला त्या फ्लायओव्हरच्या ठिकाणी मोठा आवाज करीत धडकलेली गाडी आठवली, आणि दारूची कडूशार चव त्याच्या तोंडात पसरली.
मग पोटात प्रचंड ढवळून आले, तसा भेलकांडत तो बाथरूमकडे धावला. उलट्या होताना सारे शरीर अक्षरशः पिळवटून निघाले. अंगभर वेदना अन डोळ्यांत अश्रू घेऊन तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला.
पण आता जरा बरं वाटत होतं. मोकळं झाल्याने असेल कदाचित. डीव्हीडीचा रिमोट घेऊन त्याने ऑन केला. स्क्रीनवर 'बॅक टु द फ्युचर'ची अक्षरे झळकली. काल थोडासा बघितलेला. मग नंतर झोप आल्याने बंद केला होता. चला ठीक आहे. झोप लागेपर्यंत हेच बघू या. चालेल.
पहिल्यापासून बघू या का पुन्हा? त्याने क्षणभर रिमोटच्या 'बॅक' वर बोट ठेवलं. आता वीज चमकावी, तसं त्याला एकदम आठवलं, त्या हॉटेलच्या लॉबीत बसून आपण ती आपल्याला मेलमध्ये आलेली, पण अर्धवट वाचायची राहिलेली 'फोर्थ डायमेन्शन' नावाची कथा वाचली.
नको. उगीच का पहिल्यापासून बघायचे..? त्याने 'बॅकवर्ड' वरचं बोट काढलं. आणि तो रिलॅक्स होत पुढचं पाहू लागला.
त्याला गंमत वाटली. निशा एवढं सांगते आहे- आपल्या पराक्रमांबद्दल. आपल्याला काहीच आठवत नाही. आणि आता ते 'फोर्थ डायमेन्शन' कसं काय आठवलं?
छे.. आता विचार करणं बंद करायला हवं. नाही तर वेडे होऊ आपण. शांत व्हायला हवे.. रिलॅक्स.
आता एकेक दिवसच असा उगवतो, त्याला कोण काय करणार?
***
***
संपूर्ण
***
साजिरा आधी रिपिटेड वाक्य
साजिरा आधी रिपिटेड वाक्य वाचुन वाटल की ८ वाजल्यानंतर कथा पब्लिश केलीस की काय??


मग लक्षात आल नाय नाय प्रत्येक वेळी वेगळ आहे. (थोडस व्हॅन्टेज पॉइन्ट सारख आहे. फक्त प्रत्येक वेळी परस्पेक्टिव्हऐवजी वेगळे ऑप्शन कथानायकाने निवडलेत)
परत एकदा वाचुन मगच सांगतो काय ते.
वाचली रे.
आवडली कथा.
मी खरच सांगु का.. मला काही
मी खरच सांगु का.. मला काही कळलच नाही आहे.
नक्की काय आहे कोणी सांगेल का ?
साजिरा, छान, मस्त! मस्त लिहलय
साजिरा,
छान, मस्त!
मस्त लिहलय तु. पण त्या दिवशी नक्की काय झाल?
म्हंजे, पार्टीत ठा होऊन निशु सोबत असतांना गाडी डिव्हायडरवर चढवली कि, जस्मिनसोबत तिच्या घरी वाईन पिऊन आणि मस्ती केली आणि यु टर्न घेतला?
पण आवडल, मस्तच!
<<<<तशी दारूची कडूशार चव त्याच्या तोंडात पुन्हा एकदा आली. >>>>
<<<आय डोन्ट बिलीव्ह माचो-मॅन! आय युज टु लुक अॅट द लाँग आर्म्स..!!’ >>>>
व्वा! छान, मस्त! म्हणजे खुप मस्त!!:)
असच लिहत राहा राजा!:)
'फोर्थ डायमेन्शन'>>>> म्हनजे
'फोर्थ डायमेन्शन'>>>> म्हनजे दोन्ही घडलं असं म्हनायचयं का??
आवडली कथा...
चला.. माझ्यासारखे न कळणारे पण
चला.. माझ्यासारखे न कळणारे पण आहेत तर.
पुन्हा वाचते आता.. शैली सुपर्ब आहे, खोट बहुदा माझ्या डोक्यात असावी.
ही एक विज्ञानकथा आहे असं
ही एक विज्ञानकथा आहे असं समजून वाचा लोकहो. कदाचित पटकन उलगडा होईल.
$भाय - परत एकदा वाचली - वेगळीच वाटली तरीही !
मस्त जमलीये कथा. फ्लो अगदी
मस्त जमलीये कथा. फ्लो अगदी जबरदस्त . दर वेळी दिवसाचं वर्णन थोडं थोडंच वेगळं आहे तेही खास .
हॅरी पॉटरच्या दुसर्या ( की तिसर्या ) भागात शेवटी हॅरीला तलावापलिकडे वडिलांचा पॅट्रोनस दिसतो त्याची आठवण आली !
हॅरी पॉटरच्या दुसर्या ( की
हॅरी पॉटरच्या दुसर्या ( की तिसर्या ) भागात शेवटी हॅरीला तलावापलिकडे वडिलांचा पॅट्रोनस दिसतो त्याची आठवण आली !>>>>>> तिसर्या भागात... हे असं time machine सारखं आहे का??
मला वाटलं नारायण धारपांच्या कोनत्यातरी पुस्तकात त्यांनी लिहिलय ना, की आपल्यापुढे जेवढे पर्याय असतात त्यातला आपन एक निवडतो, पण दुसरे पर्याय निवडले असते तर काय घडलं असतं ते त्या वेळेस समांतरपणे दुसर्या जगात (?, इथे मला नीट आठवत नाहिये) घडत असतं... आणि कधितरी ह्या वेळेला घडी की काय पडुन थोडफार ह्या जगात बदल होवु शकतात.. हे सर्व काल्पनीकच आहे म्हना...पण मला वाटलं होतं की ही कथा त्या धर्तीवर आहे म्हनुन........
कथा आवडली. म्हणजे कथेची
कथा आवडली. म्हणजे कथेची मांडणी खूप आवडली. ओघ आवडला. पण तरीही कथा नीट कळली नाही असं वाटतंय. थोडा गोंधळ होतो आहे डोक्यात.
मलाही नाही समजली
मलाही नाही समजली
साजिर्या.. परत वाचावी नाही
साजिर्या.. परत वाचावी नाही रे लागली.. .त्याच्या आधीच जरा नीट विचार केल्यावर कळली... काल रात्री घरी जाताना गाडी चालवतानाच ट्यूब पेटली.. तुला नक्की काय म्हणायचे आहे त्याची...
फार भारी जमली आहे कथा..
ह्म्म्म्म मस्त !! मला निकोलस
ह्म्म्म्म मस्त !!
मला निकोलस केजच्या नेक्स्ट ची आठवण आली होती मधे....पण ही जरा वेगळी आहे. आवडली.
साजिरा भारी रे मला 'बटरफ्लाय
साजिरा भारी रे
मला 'बटरफ्लाय इफेक्ट' आठवला ...
अश्रूभरल्या डोळ्यांत वेदना अन
अश्रूभरल्या डोळ्यांत वेदना अन घामाने डवरलेला चेहेरा घेऊन तो आरशासमोर उभा राहिला, तेव्हा त्याला स्वतःचीच दया आली..
ह्या वाक्यापर्यंत अनुभव किंवा कथा प्रॉमिसिंग होती. नंतर नेहमीचेच.
साज्या.. वाचताना मस्त
साज्या..

वाचताना मस्त वाटली...
पण खर सांगु मला पण नाही कळली..
हिम्या माझी पण टयुब पेटवतोस का रे..............
कमी घेत जा रे .. नाय झेपत तर
कमी घेत जा रे .. नाय झेपत तर कशाला प्यायची इतकी
दादा इतक छान ल्हितो व्वा
दादा इतक छान ल्हितो व्वा आवडली रे
मीनु बै नळावर जा
मीनु बै नळावर जा
साजिरा! कथेची धाटणी छान...
साजिरा! कथेची धाटणी छान... नक्की काय झाले ते शेवटपर्यंत कळत नाही....
दोस्ता... अशक्य कंसेप्ट आहे!
दोस्ता... अशक्य कंसेप्ट आहे! खास! शैली पण जबरदस्त!
गिल्ट खूप खोलवर आत गेलं की असल काहीतरी व्हायला होत असाव अस वाटतय.. अन खरच 'जर अस झाल असत तर...' ही बाजू सुद्धा अस्तित्वात असते आपल्यासकट अस मानल तर मात्र ती काही वळणांवर शोधायचा मोह अनावर होतोच. दुभाजक... हम्म्म्म!
क्लास कथा..खुप आवडली...लॉंग
क्लास कथा..खुप आवडली...लॉंग आर्म्स चा कंसेप्ट एकदम खास!!!
मस्त!!
आवडली.
आवडली.
आवडली (कारण बहुतेक कळली)..
आवडली (कारण बहुतेक कळली).. 'रन लोला रन' सारखा प्लॉट वाटतोय (IMO)
मनीष - तशीच काहिशी कन्सेप्ट
मनीष - तशीच काहिशी कन्सेप्ट आहे.
खुपच्च छान!! आवडली आणी
खुपच्च छान!!
आवडली आणी समजलीसुध्धा
मस्तच.. वेगळीच..!!
मस्तच.. वेगळीच..!! "जर........ तर" .मधुन बाहेर पडुन.. 'बॅकवर्ड' वरचं बोट काढुन रिलॅक्स होत पुढे जाणच महत्वाचं . .
छान!
छान!
(No subject)
अचाट अशक्य अतर्क्य अनाकलनीय
अचाट अशक्य अतर्क्य अनाकलनीय डोक्यावरुन गेली
साजिरा.. जबरदस्त!!
साजिरा.. जबरदस्त!!
Pages