कॅमेरा !

Submitted by कवठीचाफा on 1 April, 2008 - 13:48

माझ्या भरगच्च संग्रालयाकडे पहाताना मला माझाच अभिमान वाटला. एक छंद म्हणुन चालु केलेल्या माझ्या संग्रहाने एक विराट रुप घेतले होते. पोष्टाची तिकीटं आणि नाणी जमवणारे कैक जण सापडतात, पैशाला पासरी. पण माझ्यासारखा कॅमेर्‍याचा संग्राहक कुणी पाहीलाय का ? महागडा छंद आहे हा, पण मला त्याने भारुन टाकले होते. गेली आठ-दहा वर्षे मी वेड्यासारखा कॅमेरे शोधत होतो. आगदी जुन्यात जुन्या मॅग्नेशियमची पावडर जाळुन फ़ोटो काढण्याच्या बॉक्स कॅमेर्‍या पासुन ते अत्याधुनीक डिजीटल कॅमेर्‍या पर्यंत असे अनेक कॅमेरे माझ्या संग्रहात आहेत. यातले बरेचसे चालु आहेत म्हणजे आजही त्याने फ़ोटो काढता येतो.
मी अधुन मधुन एकाच दृष्याचे वेगवेगळ्या कॅमेर्‍यातुन काढलेल्या फ़ोटोंमधला फ़रक दाखवण्यासाठी त्यातुन फ़ोटो काढत असे आणि त्यांचेही एक वेगळे प्रदर्शन भरवत असे. या कामात मला माझा एक मित्र मला मदत करत असे दुरान्वये त्याचा माझ्या या छंदाच्या सुरुवातीशीही जवळचा संबंध होता.
या शिवाय यातल्या बर्‍याच कॅमेर्‍यांना स्वःतचा इतिहास आहे, कोणत्या ना कोणत्या एखाद्या महत्वाच्या घटनेचा कोणता ना कोणता कॅमेरा साक्षीदार आहे. अर्थात यासाठी मला फ़ार धावपळ आणि कष्ट करावे लागले त्याचे हे फ़लित होते.

उद्याच्या प्रदर्शनाची तयारी करता करता माझ्या डोळ्यासमोर पुन्हा माझी ती सगळी वणवण आठवली.

मला आठवत तेंव्हा माझ्याकडे एक महागडा स्वयंचलित कॅमेरा होता. पण माझ्यापेक्षा माझा मित्र त्याच्या फ़डतुस हाताने फ़ॉरवर्ड करायच्या कॅमेर्‍याने जास्त चांगले फ़ोटो काढत असे. तेंव्हा माझी आणि त्याची या विषयावरुन नेहमी वादावादी व्हायची की माझ्याकडे महागडा इंपोर्टेड कॅमेरा असुनही माझे फ़ोटो त्याच्याईतके छान का येत नाहीत? यावर माझा मुद्दा नेहमी असे की माझ्या कॅमेर्‍यात काही जुळवणी करण्याची गरज आहे पण ते ईथे शक्य नसल्याने माझे फ़ोटो चांगले येत नाहीत. पण तो नेहमी म्हणायचा
" कॅमे‍रा कसाही असो दोस्त ! फ़ोटो काढणे ही एक कला आहे"
बस्स त्याच भांडणात एक दिवस मी त्याच्यासारखा कॅमेरा विकत आणला. पण माझी फ़ोटोग्राफ़ी जशी होती तशीच राहीली. तरीही त्यामुळे मी हार न मानता आता त्या मित्राचाच कॅमेरा मिळवायचा प्रयत्न चालु केला. यथावकाश तो यशस्वीही केला तरीही माझी फ़ोटोग्राफ़ी नाहीच सुधारली मग मात्र मी माझी चुक मान्य केली. पण आता माझ्याकडे तिन तीन कॅमेरे जमा झाले होते. त्यांच काय कराव हे न कळल्यामुळे ते तसेच पडुन होते.

एक दिवस माझ्या मामाच्या नजरेस हे तिन्ही कॅमेरे पडले आणि त्याने विचारले
" काय रे ? काय संग्रह वगैरे करतोयस की काय कॅमेर्‍यांचा? "
बस्स त्या दिवशी माझ्या डोक्यात असा संग्रह करायचा किडा वळवळला. आणि मी माझ्या संग्रहाला सुरुवात केली. एक इंम्पोर्टेड आणि दोन साध्या कॅमेर्‍यांसहीत.
काळ सरकत राहीला आणि मी माझ्या छंदात आणखी गुरफ़टत गेलो. घरात आर्थीक सुबत्ता होतीच त्याच्याच जोरावर मी वेगवेगळ्या मॉडेलचे वेगवेगळ्या सुविधा असलेले देशी आणि विदेशी कंमेरे जमा करत राहीलो. पण एक दिवस माझ्याकडे जगभरातले जवळपास सगळी मॉडेल जमा झाली आणि मग मला वाटायला लागले नाही ,यापेक्षा आणखी काहीतरी आपल्याकडे असायला हवे.
मग माझा शोध सुरु झाला तो काही खास महत्व असलेल्या कंमेर्‍यांसाठी. सर्वात प्रथम माझ्या डोळ्यासमोर आला तो एका मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा खुन झाला त्यावेळी फ़ोटो घेणारे अनेक जण होते जर त्यातला एखादा कॅमेरा मी मिळवु शकलो तर ? कल्पनेनेच मला अक्षरक्षः वेड लावले. मी झपाटल्यासारखा त्या शोधाला लागलो तब्बल चार महीन्यांच्या अथक प्रयत्नाने मी त्या अनेक कंमेर्‍यांपैकी एक मिळवला त्यासाठी मला भरगच्च पैसा खर्च करावा लागला ती गोष्ट वेगळी.
अशातर्‍हेने मी एका मागोमाग एक असे ऐतीहासीक महत्व असलेले कंमेरे मिळवले. सुप्रसिध्द हॉलिवुड अभिनेत्री ' मेर्लीन मन्रो, चा 'सेव्हन ईयर ईच' चित्रपटातल्या त्या दिलखेचक दृष्याचे स्थीरचित्र घेणारा कॅमेरा हे आणखी एक उदाहरण देता येईल.
हळु हळु या आगळ्या वेगळ्या संग्रहामुळे माझ्या भोवती प्रसिध्दीचे वलय तयार होवु लागले. अनेक नामवंत मला ओळखायला लागले. या गोष्टीचा मला त्रास झालाच पण एक महत्वाचा फ़ायदा देखील झाला. तो म्हणजे आता मला माझ्या कामात जास्त वेळ खर्च करायला लागत नव्हता थोरामोठ्यांच्या ओळखीमुळे ज्या कामाला मला आठ-दहा दिवस लागले असते तीच कामे एका दिवसात व्हायला लागली.
मग कुणितरी सुचवले की तुझ्या या छंदाची एक वेबसाईट तयार कर म्हणजे तुला आणखी उपयोगी माहीती मिळु शकेल. मी ते ही केले आता तर एखाद्या महत्व असलेल्या मग ते ऐतीहासीक असो नाहीतर राजकीय घटनेचे फ़ोटो काढल्या गेलेला कॅमेर्‍यांची माहीती रोजच मिळू लागली. अर्थात त्यातल्या काही जणांनी मला फ़सवण्याचे प्रयत्न केलेही अर्थात पण माझ्या समयसुचकते मुळे म्हणा किंवा चौकस बुध्दी मुळे म्हणा ते अयशस्वी ठरले.

असाच एक दिवशी मी वेबसाईट चेक करत असताना तेथे मला एक लक्षणीय नोंद अढळली. त्या अनाम व्यक्तीने आपल्याकडे दुसर्‍या महायुध्दात सगळ्यात लक्षणिय ठरलेल्या जनरल रोमेलच्या अफ़्रीका कोअरचे रणभुमीत असताना घेतलेले फ़ोटो आणि कॅमेरा दोन्ही आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. आज पर्यंत दुसर्‍या महायुध्दातले निदान या वेळचे फ़ोटो तरी प्रसिध्द झाल्याचे मला आठवत नव्हते. त्यामुळे ही व्यक्ती कदाचीत खोटे बोलत असावी या कल्पनेने मी त्याच्या कडे पुराव्यांची मागणी केली. पण आपण ते पुरावे असे जगजाहीर करता येण्यासारखे कुणाच्याच कडे सोपवणार नाही असे त्या व्यक्तीचे म्हणणे होते. परंतु त्याने आपला सैनिकी क्रमांक आणी त्याच्या तुकडीचे नाव म्हणजे तो कोडवर्ड मला मेल केले. ही माहीती तशी सहज मिळवता येण्यासारखी होती त्यामुळे आता शहनिशा करणे भाग होतेच. मी माझ्या उच्चस्थरावरच्या काही मंडळींमार्फ़त या माहीतीच्या सत्यासत्यते बद्दल शोध घेण्याची सोय केली.
काही दिवसातच ती व्यक्ती खरे निदान बॅच नंबर बद्दल तरी बोलत आहे असे कळले तुकडिच्या कोडवर्डला फ़ारसे महत्व नव्हतेच कारण ही सगळी माहीती युध्दानंतर सहज उपलब्ध होत होती. आता त्या व्यक्तीची भेट घेणे अपरीहार्य ठरले.
शक्य तितक्या लवकर मी जर्मनीला रवाना झालो. तिथे गेल्यावर त्या व्यक्तीची भेट घेतली. त्या व्यक्तीचे नाव न लिहीण्याबददल मी वचन दिले असल्याने आणि त्या नावाचा आणि माझ्या निवेदनाचा काही संबंध नसल्याने मी ते लिहीत नाही ईतकेच.......... तर त्या व्यक्तीला भेटुन योग्य ते पुरावे पाहील्यावर आणि त्यांची विश्वासनियता तपासल्यावर भरगच्च किंमत घेउन मी तो कॅमेरा मिळवला ऐन वेळी त्याने मत बदलल्याने फ़ोटो मात्र फ़क्त पहायलाच मिळाले. तिथुन परत निघत असतानाच मला रस घ्यावा असे वाटेल अशी आणखी एक बातमी मला मिळाली.
एव्हरेस्टवर चढाई करण्याचे माणसाचे प्रयत्न फ़ार पुर्वी पासुन चालु आहेत परंतु त्याला यश मिळवण्यासाठी अनेक बलिदाने द्यावी लागली. त्या सर्वोच्च शिखरावर गिर्यारोहण करताना कित्येकांना आपल्या प्राणांची किंमत द्यावी लागली. आणि आजही तेथे अनेक बळी जात आहेत. असाच एक गिर्यारोहक काही वर्षापुर्वी एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी गेला होता. पण दुर्दैवाने त्याच्या शेर्पासहीत तो हिमवादळात गाडल्या गेला. एका वेड्या साहसाचा तेथेच असा दुखःद शेवट झाला. मी हे सांगतोय कारण त्या सगळ्या घटनांमध्ये मला महत्वाची वाटावी अशी गोष्ट होती. माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहणासाठी गेलेल्या आणखी एका तुकडीला त्या दुर्दैवी साहसविराचे कलेवर सापडले आणि त्याच बरोबर त्याचा कॅमेराही आणि हे सर्व तिथल्या उच्चतम शिखरापासुन केवळ काही फ़ुटांवरच. याचा अर्थ तो त्याचे ध्येय गाठू शकला की त्या आधीच त्याच्यावर मृत्युचा घाला पडला हे केवळ त्या कंमेर्‍यात असलेल्या फ़ोटोवरच अवलंबुन होते. अर्थात इतके वर्ष बर्फ़ामुळे जरी त्याचा मृतदेह जरी सांभाळल्या गेला असला तरी कंमेर्‍यातली फ़िल्म सांभाळल्या गेली असेलच असे नव्हतेच. त्यामुळे त्या तुकडीने त्याचा कॅमेरा फ़ार सांभाळुन परत आणला होता. परंतु........ अखेर जे घडू नये असे वाटत होते तेच घडले होते. कॅमेर्‍यातली फ़िल्म अत्यंत वाईट पध्दतीने खराब झाली होती त्यामुळे अखेर त्या दुर्दैवी जीवाच्या अखेरच्या टप्प्याबद्दलची माहीती कधीच पुर्ण होवु शकली नाही. पण........... तो कॅमेरा ?
ती तर माझ्यासाठी महत्वाची वस्तु होती. मी तो कॅमेरा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे मनोमन सज्ज झालो, शेवटी तो एका महत्वाच्या घटनेचा साक्षीदार होता. माझ्या संग्रहात त्याची गरज होती. मी तडक त्या संस्थेकडे धाव घेतली. मात्र हा कॅमेरा मिळवण्यासाठी मला फ़ार म्हणजे फ़ारच धडपड करावी लागली. आधी तो कॅमेरा त्यांच्यासाठी महत्वाचा नसल्याने तो सापडवण्यासाठी दोन दिवस आणि भरमसाठ खर्च केल्यावर एकदाचा तो सापडला. आणि सापडला तेंव्हा त्याची अवस्था फ़ारशी चांगली नव्हती पण ती या मधल्या कालावधीत दुर्लक्ष केल्यामुळे झाली होती किरकोळ दुरुस्ती नंतर तो पुर्ववत करण्यात मला यश मिळाले. आणि एका नव्या संग्राह्य वस्तुची भर मिळाल्यामुळे मी आनंदात घराकडे निघालो.
या यशस्वी सफ़री न.तर थेट घरी जाणे माझ्या नशीबात नव्हते. एका मान्यवर तथाकथीत स्नेह्यांची भेट घेण्यासाठी मला ताबडतोब आसामात रवाना व्हावे लागले. काम तसे महत्वाचे होते पण फ़ारच खासगी स्वरुपाचे असल्याने ते येथे नमुद करत नाही.
माझे काम आटोपल्यावर त्यांच्या बरोबर मी त्यांच्या चहाच्या मळ्यात भटकत होतो. अचानक वातावरण बदलले आणि आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी व्यापले. आणि निसर्गाचा नेहमीचा चमत्कार 'इंद्रधनुष्य' आता दिसायला लागले होते. माझे स्नेही फ़ारच तल्लीन होवुन ते पहात होते. आता चहाच्या त्या हिरव्यागार मळ्याच्या पार्श्वभुमीवर इंद्रधनुष्य फ़ारच अप्रतीम वाटत होते हे मान्य करायलाच हवे. माझे स्नेही माझ्याकडे वळुन म्हणाले
" या वेळी सहसा पाउस पडत नाही पण ईतके सुंदर निसर्गदर्शन कदाचीत आपल्या नशीबात होते म्हणुन आज हे असे अचानक वातावरण बदलले. खरचं या दृष्याचा फ़ोटो काढायला हवा अरे रे ! मी माझा कॅमेरा आणायला हवा होता. "
आणि पटकन माझ्या डोक्यात कल्पना चमकली माझ्याकडे तो आत्ताच मिळवलेला कॅमेरा होता की आणि तो डागडुजी करुन चालुही केला होता.
" तुमची खरच ईच्छा असेल तर तुम्ही फ़ार नशीबवान आहात माझ्याकडे आत्ता एक कॅमेरा आहे जुना आहे पण तुम्हाला फ़ोटो काढायला उपयोगी ठरु शकेल".
" ओऽऽह तो तुमचा संग्राह्य कॅमेरा असणार ना ? मग त्याने फ़ोटो काढलेले चालतील ? "
" का नाही ? नाहीतरी अश्या फ़ोटोंचेही मी प्रदर्शन भरवतच असतो की अधे मधे !"
" ठीक आहे मग काढा पाहू चार-दोन फ़ोटो लवकर कारण हे दृष्य फ़ार वेळ दिसणार नाही".
" माझा छंद जरी कॅमेरे गोळा करणं असला तरी मला फ़ोटोग्राफ़ीत आजिबात गती नाही हे तुम्हाला कदाचीत माहीतच असेल, त्यामुळे हे फ़ोटो तुम्ही आपल्या शुभहस्ते काढावेत असे मला वाटते".
" ओहो, ठीक आहे ! द्या ईकडे तो कॅमेरा " हसतच त्यांनी माझ्या हातातुन कॅमेरा घेतला. आणि त्या सुंदर विहंगम नजार्‍याचे पाच-सहा वेगवेगळ्या कोनातुन त्यांनी फ़ोटो घेतले.
" आता मला एकेक प्रिंट पाठवायला विसरु नका" मी त्यांना कोपरखळी मारली.
"कुणितरी म्हंटलेच आहे की 'कल करे सो आज कर आज करे सो अब', चला आत्ताच आपण फ़ोटो डेव्हलप करुन प्रिंट घेउया. माझ्या ओळखीचे अनेक फ़ोटोग्राफ़र आहेत ईथे ते आपल्याला लगेच आपले काम करुन देतील."
" चला शुभस्य शिघ्रम" असे मी म्हणायला आणि पावसाची जोरदार सर यायला एकच गाठ पडली. आता घरी परत जाण्याखेरीज दुसरे काही करु शकत नव्हतो आम्ही. ते फ़ोटो डेव्हलप करण्याचे काम उद्यावर सोपवुन आम्ही पुन्हा त्यांच्या घरी परतलो.

त्या रात्री मला निट झोप आली नाही सतत काही ना काही स्वप्नांमुळे झोपमोड होत राहीली. त्यामुळे कदाचीत पण मला सकाळी उठायला उशीर झाला. तोपर्यंत माझे स्नेही कॅमेरा घेउन फ़िल्म डेव्हलप करण्यासाठी निघुन गेले होते असे मला त्यांच्या नोकराकडुन कळले. आता त्यांची वाट पहाण्याखेरीज मला दुसरे काम नव्हतेच. आरामात सगळी आन्हीके उरकुन मी बाहेर व्हरांड्यात नोकराने आणुन दिलेल्या चहाची लज्जत चाखत होतो. सोबतीला वर्तमानपत्र होतेच. ईतक्यात दारात गाडी थांबण्याचा आवाज आला. म्हंटल चला आली एकदाची स्वारी. काम म्हणाल्याप्रमाणे लवकर उरकलेले दिसतेय. पण.................
दारात पोलिसांची जीप उभी होती आणि एक पोलिस अधिकारी मला सांगत होता
" माफ़ करा पण एक दुखःद बातमी आहे आपण ज्यांच्याकडे पाहुणे म्हणुन आला होतात त्यांचे आत्ताच अपघातात निधन झाले आहे "
" पण कसे ? " मी भंजाळुन विचारले. कारण ह्या माझ्या स्नेह्यांचे कुणी नातलग ईथे नव्हते.
" एका फ़ोटो डेव्हलपिंगच्या शॉपमध्ये जात असताना जवळच काम चालु असलेल्या ईमारतीचा एक भाग ढासळला आणि तो नेमका त्यांच्या डोक्यावर पडला त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यु झाला". आपल्या नेहमीच्या निर्विकार आवाजात तो अधिकारी म्हणाला.
आता मला बसलेला धक्का अनावर होता. तरीही धिर करुन मी त्यांच्या पत्नी आणि बंधुंना ही बातमी दिली ते ताबडतोब यायला निघाले.

समोर पडलेले शव पहाण्याच्या पलिकडे वाईट अवस्थेत गेले होते. आजुबाजुला जमलेले त्या एकेकाळच्या जित्याजागत्या माणसाचे नातेवाईक दुखाःच्या सागरात बुडुन गेले होते. काळजाचा दगड करुन त्यांच्या वडीलबंधुंनी त्यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला.

पोलिसतपास चालुच रहाणार होता त्यामुळे मी पोलिसस्टेशनवर माझा पत्ता आणि फ़ोन नंबर देउन घराकडे निघण्यासाठी गेलो. सर्व सोपस्कार पुर्ण झाल्यावर तो अधिकारी मला म्हणाला.
" त्यांच्या बॉडी जवळच पडलेला एक कॅमेरा मिळाला आहे, परदेशी बनावटीचा, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांचे मत आहे की तो त्यांचा नाही तुम्हाला या बद्दल काही माहीती आहे का? "
" आहे, कारण तो कॅमेरा माझाच आहे मी नुकताच परदेशातुन येताना तो आणला आहे. आणि मुख्य म्हणजे तो माझ्या संग्रहालयाचा एक भाग आहे . जर तो मला परत मिळु शकला तर फ़ार बरे होईल "
" अर्थात तो तुम्हाला नक्की परत मिळेल फ़क्त ज्या कॅमेर्‍यातले फ़ोटो डेव्हलप करण्यासाठी ते ईतक्या सकाळी निघाले होते त्यात नक्कीच काहीतरी महत्वाचे असावे त्यामुळे आम्हाला ती फ़िल्म डेव्हलप करुन पहावी लागेल"
" तसं काही खास नाही त्यात काल चहाच्या मळ्यावर पडलेल्या इंद्रधनुष्याचे फ़ोटो आहेत आणि त्याची कॉपी मला देण्यासाठी ते ईतक्या सकाळी निघाले होते" असे सांगुन मी त्या दिवशीची पुर्ण हकीकत त्या अधिकार्‍याला सांगीतली.

यथावकाश मी तो कॅमेरा मिळवुन पुन्हा माझ्या घरी परतलो. पण एक गुढ मनात घेउनच . पोलिसांनी त्या कॅमेर्‍यातली फ़िल्म डेव्हलप करुन पाहीली पण त्यात त्या दिवशी घेतलेले फ़ोटो आलेच नव्हते. मी पुन्हा कॅमेरा निट पणे एक्स्पर्ट कडुन तपासुन घेतला त्यात काहीही दोष नव्हता मग असे का घडले ?

ती एक अत्यंत वाईट म्हणता येईल अशी संध्याकाळ होती. मी आजिबात बाहेर पडायच्या मुड मधे नव्हतो. नाहीतर माझी संध्याकाळ माझ्या मित्रमंडळीतच जात असे. आज मात्र मी घरातच टि.व्ही. समोर रिमोटची बटने दाबत चॅनेल बदलत बसलो होतो. आणि माझ्या मित्राचा फ़ोन आला.
" काय यार तु आज आला नाहीस ?"
" सॉरी यार, मुड नाहीये"
' असो मी तुझ्याकडे येतोय जरा तुझी मदत हवीये"
" ये की, मी ही घरात कंटाळतच बसलोय."
" निघालोच" असे म्हणत त्याने फ़ोन कट केला !
आता याचे माझ्याकडे काय काम असावे ? या विचारने मला घेरले. कारण ही वल्ली वाटते तितकी सरळ नाही कायम कसल्या ना कसल्या भानगडीत गुंतलेला असतो. खासगी डीटेक्टीव्ह पडला ना !
दारात गाडी थांबण्याचा आवाज आला. मी उठुन दरवाजा उघडला तर स्वारी धडपडतच आत शिरली.
" का रे ? का ईतका गडबडीत आहेस ?"
" ते नंतर सांगतो आधी मला एखादा कॅमेरा दे लोडेड"
" का बुवा ? काय भानगड काढलिस ?"
" ते सविस्तर नंतर सांगतो तुला पण मला एखादा लोडेड कॅमेरा दे आधी"
आता तरी माझ्याकडे कुठल्या कंमेर्‍यात फ़िल्म आहे ते आता शोधायची गरज होती. तसा माझ्या संग्रहालयातला एखादा कॅमेरा लोड असु शकत होता. पण माझ्या प्रत्येक संग्राहीत कंमेर्‍याच्या पाठीमागे त्याचा कोड नं. असतो त्यावरुन त्याचे काही खास महत्व असेल तर ते माझ्या लक्षात येते तसा एखादा माझ्या संगहालयात नोंद झालेला कॅमेरा मी त्याला देणे माझ्या जिवावर आले. म्हणुन मी ईतर कॅमेर्‍यांची शोधाशोध करत राहीलो आणि एक कॅमेरा मला मिळालाच ज्यात फ़िल्म होती. तो माझ्या त्या ज्युनियर शॅरेलॉकच्या ताब्यात देउन मी त्याला कटवला. आता तो परत आल्यावरच कळणार होते त्याचे माझ्याकडे काय काम होते? आणि ते मला सांगायचे टाकुन तो मधेच कॅमेरा घेउन कुणाचा फ़ोटो काढायला धावला. त्याच्या येण्याची वाट पहाण्यात काहीच अर्थ नव्हता तो आज तरी रात्रीच्या वेळी मला त्रास द्यायला येणे शक्य नव्हते. आता उद्या भेटला की पहीली पार्टी वसुल करु अशा विचारात मी झोपी गेलो.
..... पण तो उद्या उजाडलाच नाही मध्यरात्रीच मला फ़ोन आला. ..... माझ्या त्या डीटेक्टीव्ह मित्राचा अपघात झाला होता. एका रस्त्याकडेला थांबलेल्या धान्य भरलेल्या ट्रकच्या बाजुने जात असताना (कदाचीत तो त्या ट्रकच्या आडोश्याला लपुनही राहीला असेल) अचानकपणे मागे भरलेल्या धान्याच्या गोणीं एकत्र बांधण्याची दोरी तुटुन त्याच्या अंगावर भरलेल्या धान्याच्या गोणी कोसळल्या आणि त्या खाली तो गाडल्या गेला. मी ताबडतोब घटनास्थळी रवाना झालो पहावत नव्हते असे दृष्य होते ते ! शंभर शंभर किलोच्या पंधरा-विस पोत्यांखाली त्याच्या देहाची फ़ार वाईट अवस्था झाली होती. माझ्या मनात आता मात्र संशयाची पाल चुकचुकली. पोलिस घटनास्थळी त्यांचे नेहमीचे कार्यभाग उरकत होते.मृताचा मित्र म्हणुन नाही तर तिथला एक वजनदार माणुस म्हणुन मला त्या ठीकाणी थांबता आले होते. पण माझी नजर दुसरच काहीतरी शोधत होती. आणि मला ते दिसले. ट्रकच्या खाली म्हणजे पुढच्या डाव्या चाकाजवळ एक कॅमेरा पडलेला दिसत होता. आता नक्की काय केले ते सांगण्याची ही वेळ नव्हे पण फ़ार शिताफ़ीने मी तो कॅमेरा पोलिसांच्या न कळत मिळवला. आणि घराकडे रवाना झालो. आता या कॅमेर्‍यात मला फ़ोटो निघालेत का हे पहायचे होते. आणि हे काम कोणीतरी विश्वासातल्या माणसाकडुन करुन घ्यायला हवे होते. न जाणो त्या फ़ोटोत काही अपेक्षार्‍ह्य असेल तर ?

या कामासाठी मी माझ्या फ़ोटोग्राफ़र मित्राची मदत घ्यायची ठरवली आणि फ़ोन करुन त्याला कामाची कल्पना दिली. फ़ोटोग्राफ़ीशी संबंधीत कोणतेही काम असेल तर तो नेहमीच खुष असे. त्यानेही माझी विनंती मान्य करुन ताबडतोब तो कॅमेरा त्यातली फ़िल्म डेव्हलप करण्यासाठी नेला. जाता जाता तो त्या कॅमेर्‍याच्या मेक बद्दल बरेच काही सांगत होता पण माझ्या डोक्यात फ़क्त काळजी होती की त्या फ़िल्ममधे मला नक्की काय दिसणार होते? त्यामुळे माझे तिकडे लक्षही गेले नाही.

किती वेळ गेला कुणास ठाउक कदाचीत रात्रीच्या जागरणामुळे माझा डोळाही लागला असेल ........ फ़ोनच्या रिंगने मला जाग आली. तो माझ्या मित्राचाच फ़ोन होता त्याने फ़िल्म डेव्हलप केली होती पण त्यात कोणतेही फ़ोटो आले नव्हते फ़िल्म डिस्पोज झालेली होती.
" कदाचीत कॅमेरा चुकुन उघडला गेला असेल" माझा मित्र मला सांगत होता." मि एकदा निट चेक करतो कॅमेरा चालेल ना ?"
"अं...... हो ! तु चेक कर पण या आधीही तो एकदा तपासुन झालाय". मी आपलं सांगायचं म्हणुन सांगितलं पण आता माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार येत होते.
" मी तुला नंतर फ़ोन करतो" असे सांगुन मी फ़ोन ठेवला.
मला नक्की काय खटकत होते? मी सुसुत्रपणे विचार करायला सुरुवात केली.
सर्वात आधी तो गिर्यारोहक, त्याच्याकडे हा कॅमेरा होता. त्याने कदाचित तो नविनही घेतला असेल, त्यातुन फ़ोटो घेतले असतिल पण ती दुर्दैवी घटना घडली आणि तो काळाचा बळी ठरला त्याने काढलेले शेवटचे फ़ोटोही पहाता आले नाहीत.
त्यानंतर माझे स्नेही जे इंद्र धनुष्याची कमान टिपायला गेले आणि त्यांच्या आयुष्याची दोरी तुटली.
आणि आता माझा तो डिटेक्टीव्ह मित्र..... तो ही असेच काहीतरी महत्वाचे कंमेर्‍यात टिपायचा प्रयत्न करत होता आणि तो ही प्राण गमावुन बसला.
या सगळ्यांवर मृत्युने का अचानक घाला घातला असावा ? त्यांनी हा कॅमेरा वापरला म्हणुन ? मग हा कॅमेरा शापित तर नाही? की अभद्र की काय म्हणातात तसा तर नाही ? असे असेल तर मी आजपर्यंत हा कॅमेरा हाताळत होतो माझ्या बाबतीत का काही अक्रीत घडले नाही ? एक ना अनेक प्रश्नांनी माझ्याभोवती फ़ेर धरला.
आणि अचानक मला आठवले मी सोडुन उरलेल्या सगळ्या जणांनी काहीतरी महत्वाचे अपुर्व असे कॅमेर्‍यात बध्द करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात मला फ़ोटोग्राफ़ीतले फ़ारसे काही कळत नसल्याने मी मात्र तो अश्या काही कारणासाठी वापरला नाही कदाचीत त्यामुळे मी बचावलो होतो का ? की माझा धोका अजुन कायम होता ? एका प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना आणखी प्रश्नांई माझा पाठलाग सुरु केला. आता यापुढे ?.....................
......... यापुढे तो कॅमेरा नोंद करुन संग्रहालयात सामिल करुन घ्यालला हवा त्याचा वापर होता कामा नये. आणि हजारो वॅट्सचा झटका लागावा तसे वाटले माझा तो फ़ोटोग्राफ़र मित्र? तो तर अक्षरशः वेडा आहे फ़ोटोग्राफ़ीचा आणि आत्ता ह्या क्षणी कॅमेरा त्याच्या ताब्यात होता. जर त्याला तो वापरायची दुर्बुध्दी झाली तर ? झटक्यासरशी माझा हात टेबलावरच्या फ़ोन कडे गेला. पटापट बटणे दाबत मी त्याला फ़ोन केला पण 'कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे' अश्या ठोकळेबाज उत्तराखेरीज रिप्लाय मिळत नव्हता. ताबडतोब त्याच्या घरचा नंबर फ़िरवला. "ते मघाशीच घरातुन बाहेर गेलेत कुठे जातो ते सांगुन नाही गेले" असे उत्तर ऐकुन मी फ़ोन डिसकनेक्ट केला आणि पुन्हा पुन्हा त्याचा फ़ोन ट्राय करत राहीलो. अखेर गाडी बाहेर काढुन त्याच्या शोधात निघायच्या तयारीला लागलो. इतक्यात माझ्या फ़ोनची रिंग वाजली, एकाच झेपेत मी फ़ोन गाठला. ज्याचा मी मघापासुन शोध घेत होतो तो माझा मित्र मला आत्ता फ़ोन करत होता.
" का बाबा इतकी तहान का लागली तुला माझी ?" अजुन संकटात असल्याची जाणिव नसल्याने तो विनोद करण्याच्या मुडमध्ये होता.
" असशील तिथुन निघुन ये" इतर काही न बोलत बसता ईतकेच म्हणालो.
" अरे, पण का ?" तो ऐकण्याच्या तयारीत दिसत नव्हता.
" माझ ऐक आता तु कुठे आहेस ?" मी घाईघाईत विचारले. चटकन काहीतरी विपरीत बोलल्याने केंव्हा केंव्हा त्याचेच परीणाम वाईट घडतात.
" आपल्या शहरा बाहेर, इथल्या अभयारण्यात आज एका दुर्मिळ जातीचे फ़्लेमिंगो आलेयत. ते कधीच इकडे येत नाहीत आणि या सिझनला तर मुळीच नाही तुला सांगतो .......... "
" तु माझा सकाळी दिलेला कंमेरा घेतलायस का फ़ोटो काढायला? " ताडकन त्याचे वाक्य मधेच तोडत मी म्हणालो.
" हो पण मी तो सुखरुप परत आणीन तु काळजी करु नको" त्याला माझे बोलणे लागले असावे.
" माझं ऐक, ताबडतोब परत फ़िर" मी पुन्हा एकदा ठणकावले. मैत्री पणाला लागत होती.
" अरे? तुला काय झालेय तुला माहीताय? माझ्याकडच्या कॅमेर्‍यापेक्षा हा कॅमेरा दुरचे फ़ोटो काढायला जास्त उत्तम आहे". तो बाजु मांडत राहीला.
" तु त्याने फ़ोटो काढू नको..................... " माझे वाक्य मध्येच तुटले कारण त्याच्या मोबाईलचे नेटवर्क गेले होते. पण तो नक्की कुठे आहे ते मला आता कळले होते मी ताबडतोब गाडीत बसुन शक्य तितक्या वेगाने गाडी शहराबाहेर अभयारण्याकडे सोडली.
शहराच्या ट्रॅफ़ीकमधुन वाट काढत बाहेर पडणे सोपे काम नव्हते एक हात हॉर्नवर ठेउनच मी गाडी चालवत होतो. शहराबाहेर पडायलाच मला बर्‍यापैकी वेळ घालवावा लागला. मात्र बाहेर मोकळा रस्ता मिळताच मी शक्य तितका वेग वाढवुन वाया गेलेल्या वेळाची भरपाई करण्याचा प्रयत्न सुरु केला.
त्या अभयारण्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला फ़ार वेळ लागला नाही. त्याच्या प्रवेशद्वारशीच मित्राची गाडी पाहून मनोमन माझी चिंता थोडी कमी झाली आता कदाचीत काही मिनीटातच मी त्याच्यापर्यंत पोहोचु शकत होतो. प्रवेशद्वाराच्या गार्डला मी विचारणा करताच त्याने मला तो नेमका कोणत्या भागात असु शकेल ते सांगीतले.
" आणि साहेब ! त्यांच्या पाठोपाठ वनरक्षादलाची लोकंही गेली आहेत ते पक्षी पहायला" त्याने आणखी खुलासा केला.
आता दडपण आणखी कमी झाले कारण कुठे ना कुठे तरी ही मंडळी त्याला भेटलीच असणार त्यामुळे कदाचीत तो सुरक्षीत राहील ? गाडी आत जाणे शक्य नव्हते नाहीतर त्या गार्डची पर्वा न करता मी गाडी अभयारण्यात घातली असती. पण पुढे चालत जाण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता.
आत शिरल्यावर मात्र मी तिथले सगळे नियम धाब्यावर बसवुन जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. जेणे करुन माझ्याकडे लक्ष वेधल्या जाईल. परंतु प्रतीसाद मिळत नव्हता. आणि मी हाका मारत आणखी आत जात राहीलो.

किती वेळ चालत राहीलो मलाच आठवत नाही. एका ठीकाणी जमलेली गर्दी बघुन मी तिकडे धाव घेतली ते वनरक्षक होते कदाचीत त्या पक्ष्यांचे ठिकाण ते हेच असावे. मी तिकडे आता चक्क धावायला सुरुवात केली. दाट जंगलातुन धावताना दिवसाही फ़ार मोठा आवाज होतो त्या कारणाने असेल पण त्या लोकांचे लक्ष माझ्याकडे गेले. मी तेथे पोहोचतो न पोहोचतो तोच मला समोरच्या दृष्याने जागीच खिळवुन टाकले. अभयारण्य असले तरी तेथे काही ठरावीक काळात काही निरुपयोगी झाडे तोडली जात असत याची माहीती बर्‍याच जणांना होती. अश्याच तोडलेल्या झाडांच्या ओंडक्यांचा ढीगारा समोर आडवा तिडवा पसरला होता. आणि सगळेजण आता तिकडेच पहात होते. पण त्यांच्यात माझ्या मित्राचा चेहरा दिसत नव्हता. माझ्या मनात एक वाईट शक्यता चमकुन गेली. कदाचीत..........
" साहेब या ओंडक्यांखाली कुणीतरी आहे." त्यातल्या एकाने माहीती दिली.
" पण..... हे सगळे..... कसे" माझ्या तोंडातुन शब्द फ़ुटणे कठीण झाले होते.
" तोडलेल्या झाडांचे ओंडके इथे रचुन ठेवलेले होते एकावर एक असे"
" मग ते आता खाली कसे?" कुशंकेचे ढग आता दाटायला लागले.
" इथे एकजण त्यांच्यावर उभा होता फ़ोटो घेत होता त्या फ़्लेमिंगोचे "
" पुढे काय झाले ते काही निट कळले नाही पण अचानक तो ओंडक्यांचा ढिगारा कोसळला. कदाचीत त्यांच्या खालची उटी निघाली असेल."
" मग त्या फ़ोटोग्राफ़रचं काय ? तो माझा मित्र आहे" मी अधिर होत विचारले कदाचीत जखमी होवुन हॉस्पिटलात नेला असेल ! कारण ढीगार्‍याखाली काही असेल असे वाटत नव्हते.
" साहेब, तो माणुस या लाकडांखाली चिरडला गेलाय"
" क्क्कायऽऽ ते कसे शक्य आहे? इथे तर काहीच दिसत नाही" माझी सहनशिलतेची हद्द संपली.
" या ईथे समोर एक लहानसा चर आहे साहेब, तो त्या चरात पडलाय आणि वर सगळे ओंडके कोसळलेत, हा बघा इथे त्याचा कॅमेरा घेतलेला हात बाहेर दिसतोय" असे म्हणत त्याने मला त्या ढीगार्‍याच्या दुसर्‍या बाजुला नेले. हातातला कॅमेरा बघितल्यावरच माझ्या लक्षात आले की आपला मित्र आता आपल्यात नाही त्या शापित कॅमेर्‍याने आपला पुढचा बळी घेतला होता.
त्याच्या मृतदेहाची अवस्था फ़ारच भयावह होती. माझ्या नजरेसमोर आधी बळी गेलेल्यांचे मृतदेह तरळुन गेले. त्यांच्या सारखाच हा ही एका अपुर्व अश्या दृष्याचा फ़ोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि काळाचा कदाचीत या शापित कॅमेर्‍याच्या बळी ठरला.

अपेक्षेप्रमाणेच फ़ोटोच्या फ़िल्ममधे काहीही फ़ोटो आले नव्हते. हे सगळे का घडत होते? हा कॅमेरा त्याच्या मुळ मालकाबरोबर प्रवासात होता त्याच प्रवासात त्याच्या मालकावर काळाचा घाला पडला. न जाणे किती काळ तो त्या पार्थीवाबरोबर पडून होता. त्याचा काही परीणाम तर नसावा ना ?

हे आणि असले अनेक प्रश्न चौफ़ेर फ़ेर धरुन असताना मी तो कॅमेरा आता नोंदणी करुन माझ्या संग्रहालयात जमा करुन ठेवलाय.त्याच्यामधे आता कधीच फ़िल्म नसते रिकामाच ठेवतो मी त्याला. पण तरीही तो वेगळ्या बंदोबस्तात असतो काही खास महत्वाच्या कॅमेर्‍यांसोबत जे आजच्या काळात केवळ करोडोंत तोलल्या जातील अश्यांचा सोबत. अमुल्य नव्हे तर त्याचा आणखी कुणी बळी पडू नये म्हणुन.

भुतकाळातुन जागा होत मी प्रदर्शनाच्या पुढच्या तयारीकडे वळलो. आता फ़क्त तिजोरीतले तेवढे महत्वाचे कॅमेरे आणुन ठेवले की रचना पुर्ण होणार होती. माझ्या असिस्टंटला योग्य त्या सुचना देउन मी तिजोरीकडे वळालो. चावी फ़िरवुन दार उघडताच रिकाम्या तिजोरीकडे मी हडबडून पहातच राहीलो. माझे कॅमेरे, माझी इतक्या वर्षाची मेहनत, खर्च सोसुन जमा केलेले माझे कॅमेरे चोरीला गेले होते. गात्रे थंड पडत चालल्याची जाणिव मला व्हायला लागली. आणि अचानक मला 'त्या ' कॅमेर्‍याची आठवण झाली ईतर कॅमेर्‍यांसोबत तो ही चोरीला गेला होता. त्याचे परीणाम लक्षात येताच माझ्या काळजातुन एक कळ उठली.

दोनच दिवसात तो चोर सापडला पण त्याच्याकडे तो कॅमेरा मिळाला नाही. आणि त्यालाही त्या बद्दल काही सांगता येत नाहीये.

कदाचीत, कदाचीत त्या चोराने आता पर्यंत तो कॅमेरा फ़ेकुनही दिला असेल किंवा मिळेल त्या किंमतीला विकलाही असेल आणि हेच फ़ार धोकादायक आहे.

कुणास ठाउक आज तो कॅमेरा कुठे आहे? तुमच्याकडे एखादा कॅमेरा आहे ? असेल तर जरा तपासुन पहा कारण त्या कॅमेर्‍यामागे माझ्या संग्रहालयाचा लोगो म्हणुन एक स्टिकर लावलेला आहे आतल्या बाजुला डाव्या कोपर्‍यात. किती केलं तरी तो मात्र कुणाच्याही नजरेतुन चुकेल. आणि जर तसा स्टिकर तुमच्या कॅमेर्‍यावर असेल तर कृपया त्याने कोणत्याही अभुतपुर्व घटनेचा किंवा वस्तुचा फ़ोटो घेण्याचा प्रयत्न करु नका.

सावध !

गुलमोहर: 

थरारकथा.... चाफा? गुढकथा आहे ही. मला तुमच्या या छंदाची काहीच माहिती नाही. तशीच तुमची ओळखही नाही. कुठे भरले आहे तुमचं प्रदर्शन. माफ करा व राग मानु नका परंतु लेखाची तारीख बघितल्यावर माझ्या मनात आले आपण एप्रिल फुल तर नाही झालो. मी सावध असेल व शक्य तितक्या इतरांनाही सावध करेल. खासकरुन जे या क्षेत्रात आहेत.

तू लिहिणार ती भयकथा/ गूढकथा असणार हे इतकं ठरून गेलंय की आता कुठे बरं क्रक्स असेल हे आपण आपसुकच शोधायला लागतो त्यामुळे मग तेवढा परिणाम होत नाही जेवढा पहिल्या गोष्टीचा झाला होता.
चु भू दे घे!

किशोरभाउ ! तुम्हाला कुठला छंद म्हणायचाय ? आहो कथा आहे ही !

आणि आजुक्का त्याला माझा नाईलाज ना ! पण तरी हि कथा चांगल्या दोन विनोदि कथांनंतर टाकलेय |:)

कळाले.... तरीच म्हटले छान एप्रिलफुल केले. जय्यत तयारी केली होती लेखनाची. असो छान केलेत लिखान. असेच वरचेवर आम्हाला घाबरवत रहा.

माझंही मत्त अगदी अज्जुकासारखेच आहे!

ओव्हरॉल चांगली आहे, पण आधिच्या कथांसारखा जोर का झटका नाही वाटला.
अपेक्षित शेवट....

अगदी पाश्चात्य धर्तीची वेगवान थरारकथा आहे ही :))

मस्तच रे भाव. :))

सॉलिड जमलीये... नेहमीसारखीच...

चाफ्फा, छान वेगवान कथा. पण आता खरेच शेवटाची कल्पना यायला लागली. कदाचित आता दुसर्‍या कथाप्रकाराला हात घालायची वेळ आली असेल.

अरे आमचा कॅमेरा विकायचाय... घेणार का विकत? (आलेल्या पैशत भर घालून मस्त डिजीटल कॅमेरा घेता येईल.:P)

असो.... कथा छान.

सॉलिड जमलीये... नेहमीसारखीच...

Malapan adhi satyakathach vatali hi....................
Chaffa........kharach mastach lihita tumhi

छान जमलीये गूढकथा. पण अशाच टाईपची गोष्ट मागे कुठेतरी वाचली होती. कॅमेर्‍‍याऐवजी मेंदीच्या पुस्तकातल्या डिझाईनचा संदर्भ होता त्यात.त्यामुळे पहिल्या मृत्यनंतर अंदाज आला पुढच्या गोष्टीचा.

चाफ्या
लेका तुला फोटु काढता येत नाहीत म्हणुन ही कॅमेर्‍यावर कथा लिवलीस ना?????? Lol
जमली आहे पण मेंदी च्या कथेत आणि ह्यात सारखेपणा वाटला थोडासा.
शेवटच्या चार ओळी धमाल. साधा कॅमेरा हातात घेतला की त्यावर स्टिकर दिसतो का हे घाबरत घाबरत पाहिल जाइल आता Happy
झाड, मेंदिच डिजाइन, आता कॅमेरा अशा सगळ्याच गोष्टीची भिती वाटु लागल तस कस रे. Happy

छान आहे कथा. शेवटाची कल्पना यायला लागलिये तुझी कथा असेल तर. या नंतर duplicate id वापरून कथा टाक बरं Happy

धन्यवाद पुन्हा एकदा ! झकासभाव, आता शेवटाची कल्पना येणे स्वाभाविकच झालेय हो ! ( हिंदी चित्रपटांसारखं )पण मेहंदीच्या कथेसारखा शेवट आहे हे मान्य ( हा शोध मलाही आत्ताच लागलाय Happy )
मेग्गी duplicate ID वापरुन Happy Happy भन्नाट कल्पना पण त्यातुनही माझे लेखन शोधुन काढणारे नक्की असणार ( वर duplicate ID बनवायचा ताप घ्या Happy नकोच ते ! )

छान आहे रहस्यकथा

चाफा,
अगदी सही लिहीलीस कथा... मस्तच!
सुरुवात थोडी धीमी झाली पण शेवटी उत्कंठा ताणुन धरली आहेस.
शब्दरचना आणि वेग एकदम सही!
Happy
चाफ्या, छान लिहीतोस...आणखी येऊ दे रे...
Happy

अतिशय आवडली कथा .. अप्रतिम

छान आहे कथा. गूढकथा हे माध्यम फार थोडे जण वापरतात.

सुरुवातीला जेंव्हा मायबोलीवर आलो तेंव्हा चाफा यांच्या कथा वाचणे हा एकमेव कार्यक्रम असायचा. Happy
आता कुठे हरवला आहे चाफ्याचा सुगंध. Sad
:चाफा कथांचा पंखा असलेला बाहुला:

सुरुवातीला जेंव्हा मायबोलीवर आलो तेंव्हा चाफा यांच्या कथा वाचणे हा एकमेव कार्यक्रम असायचा

जिप्सी सेम पिंच!!!!!!!!

थरारक