सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं...
२-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...
ठरल्या प्रमाणे शनीवारी सकाळी सुमारे १० वाजता जुन्नरला पोहचलो... जुन्नरहून इंगळूणला जाणारी ९.४५ ची बस चुकली आणि पुढची बस १२.३० ला होती... इतकावेळ बसची वाट बघण्यापेक्षा जीपने प्रवास करुया असं ठरलं... पुरेसे प्रवासी जमा होऊन जीप सुटायला ११ वाजले... जुन्नर सोडून घाटाच्या दिशेने निघालो की भवतालचा प्रदेश फारच सुंदर आहे... लहान-लहान गावांमधून रस्ता काढत साधारण ११.४५ वाजता इंगळूणला पोहचलो... पाटपीशव्या चढवल्या आणि भिवाडे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... भिवाडे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलयं आणि गावापर्यंत डांबरी रस्ता आहे... भिवाडे गावानंतर रस्ता सोडला आणि डोंगरवाट धरली... थोडावेळ चढल्यावर दूरवर उजव्या हाताला ढाकोबा दिसला...
शेळ्या-मेंढ्यांना चरायला सोडून एक आजोबा आंब्याच्या सावलीत निवांत बसले होते... आम्हाला बघून मस्त हसले... त्यांच्याशी इकडच्या-तीकडच्या गप्पा झाल्या आणि आम्ही पुन्हा डोंगर चढू लागलो... गार हवेमुळे दुपारचं उन्ह अजीबात जाणवत नव्हतं... थोड्यावेळात चढ संपला आणि पठारावरच्या आंबे गावात पोहचलो... समोर दूरवर झाडीत लपलेला दुर्ग आता खुणावू लागला... थोडावेळ चालल्यावर हातवीज गावी जाणारा डांबरी रस्ता सोडून उजव्या हाताला वळलो आणि दुर्गवाडीत पोहचलो...
(दुर्गवाडीतून दुर्ग असा दिसतो...)
अजून २० मिनीटं चालून दुर्गच्या पुढ्यात वसलेल्या दुर्गमातेच दर्शन घेतलं...
इंगळूणहून इथपर्यंत चालत पोहचायला साधारण ३ तास लागले... (पर्यायी रस्ता वापरुन जुन्नरहून दुर्ग पर्यंत जीपनं येता येतं... संध्याकाळी (साधारण ५ च्या सुमारास) जुन्नर - हातवीज अशी मुक्कामी बस आहे...)
अगदी वेळेत मुक्कामाच्या जागी पोहचल्यामुळे भरपुर वेळ होता... मग दुर्गच्या मागे कड्याच्या टोकावर जावून बसलो... बसलो होतो त्याच्या डावी कडून एक जरा अवघड वाट कोकणात उतरते... ह्या वाटेला खुटेदार असं म्हणतात... कोकणातून खुटेदाराने वर चढताना जबरदस्त मजा येईल ह्यात काही शंकाच नाही...
सुर्य ढगांच्या मागे लपला होता आणि हवा पण खूप धुसर होती, त्यामुळे वातावरणात जरा आळशीपणा जाणवत होता... पाकोळ्या (Mountain Swallow) आणि काही घारी आकाशात स्वच्छंदपणे तरंगत होत्या... कड्यावरुन बिनधास्त कोकणात झेप घ्यायची, हवेतच लहान किडे पकडून खायचे आणि परत झेप घ्यायची असं पाकोळ्यांच चालू होतं... काय उडतात ह्या पाकोळ्या!!! त्यांना उडताना बघताना आपण इतके अचंबित होतो की दुसरा कोणताच विचार डोक्यात येत नाही... केवळ परफेक्शन आणि एक्सलन्स... देवाची बेजोड कारिगरी...
पाकोळ्यांना उडताना बघून आमचा आळस कमी झाला आणि आम्ही दुर्गच्या माथ्यावर जाणारी वाट धरली... दुर्गमातेच्या देवळापासून १० मिनीटातच दुर्गमाथ्यावर पोहचलो... माथ्यावर दगडांचा सडा पडलाय... कोणत्याही प्रकारच्या बांधकामाचे अवशेष नाहीत... माथ्यावरुन ढाकोबा आणि भवतालचं जंगल असा सुरेख देखावा दिसतो...
(मध्यभागीचा उंच डोंगर म्हणजे ढाकोबा...)
ढगांमुळे सुर्यास्त आणि संधीप्रकाश असं काहीच अनुभवायला नाही मिळालं... काळोख पडायच्या आत दुर्गमातेच्या देवळा जवळ उतरलो... देवळा ऎवजी देवळापासून जवळच असलेल्या समाज-मंदिरात मुक्काम करायचं पक्क केलं... थोडं बांधकाम आणि पत्र्याची शेड असं ते समाज-मंदिर आहे... मुक्कामासाठी एकदम आदर्श जागा... इथून पाण्याची विहिरपण जवळच आहे... चुल उघड्यावरच मांडली आणि लाकडं गोळा केली... ह्यावेळेस मी सोबत फ्लींट (Flint) आणला होता आणि त्यानेच ठिणगी पाडून चुल पेटवायची होती (Man vs Wild मधे Bear Grylls करतो तसंच)... वाळलेलं गवत जमा केलं आणि ठिणगी पाडायला सुरुवात केली... ठिणग्या पडत होत्या मात्र गवत काही पेट घेत नव्हतं... जरा जास्त ठिणग्या पाडल्यावर गवताने पेट घेतला... पेटलेलं गवत चुलीत टाकलं आणि आग वाढवायचा प्रयत्न केला, पण वाढायच्या ऎवजी आग विजली... हा प्रकार ३-४ वेळा केला तरी चुल पेट घेत नव्हती... जवळ-जवळ अर्धा तास ठिणग्या पाडून हात दुखायला लागले... काळोख पण वाढला... सोबत काडेपेटी आणि केरोसीन किंवा कापूर असं काहीच नव्हतं आणलं... गरम-गरम खिचडी तोंडात पडणार की नाही अशी परिस्थीती आली... मुक्कामाच्या जागे पासून दुर्गवाडी साधारण १५ मिनीटांवर होती, मग गावात काडेपेटी आणि केरोसीन मिळतयं का? हे बघायला ऋशी गेला... अजितचा ठिणगी पाडून आग पेटवायचा प्रयत्न चालूच होता... मी अजून वाळलेली लाकडं गोळा केली, पण तरीही चुल पेटत नव्हती... शेवटी काडेपेटी आणि केरोसीन घेऊन ऋशी आला आणि एका फटक्यात चुल पेटली... आगेची संकल्पना माहिती असून सुद्धा, लहानपणा पासून आग बघत असून सुद्धा एवढ्या कष्टा नंतर पेटलेली आग बघून फार काही मिळवल्याची अनुभुती झाली... आदिमानवाने पहिल्यांदा आग पेटवल्यावर त्याला काय वाटलं असेल? असा विचार डोक्यात आला...
काळ्याकुट्ट अंधारात पेटलेली चुल बघून उत्साह प्रचंड वाढला... अजितने चुलीवर मस्त खिचडी तयार केली... मग पापड, बटाटे आणि कांदे भाजून घेतले...
मेणबत्ती पण नव्हती आणली, मग अंधारातच गरम खिचडी, पापड, रोस्टेड बटाटे आणि कांदे यांचा आस्वाद घेतला... भरपूर गप्पा झाल्या... प्रचंड शांतता, गुडूप काळोख, दाट जंगल आणि आम्हा तिंघा व्यतीरिक्त कोणीच नाही... एकदम मस्त अनुभव होता... साधारण रात्री ९.३० ला झोपी गेलो... पहाटे ढगांमुळे सुर्योदय दिसला नाही... चुल पेटवून कोरा चहा केला... त्यात लिंबू पीळून मस्त लेमन-टी प्यायलो... गरम maggy चा नाश्ता केला...
सगळं सामान आवरलं आणि ढाकोबाला जायच्या आधी दुर्गमातेच दर्शन घेण्यासाठी देवळात गेलो... देवळा जवळच्या झाडावर शेकरु (Giant Squirrel) एका फांदी वरुन दुसऱ्या फांदी वर उड्या मारत बराच वेळ खेळताना पाहिलं...
दुर्गचा निरोप घेऊन ढाकोबाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... दुर्ग ते ढाकोबा प्रवास बऱ्यापैकी फसवा आहे... जंगल आणि सारखे येणारे चढ-उतार ह्यामुळे बरोबर वाट शोधणं जरा अवघडच आहे...
दुर्ग सोडल्यावर थोड्याच वेळात एका दरीच्या काठावर आलो... दरीत न उतरता काठानेच चालत साधारण १ तासात एका ओढ्यात पोहचलो... ओढ्यातलं पाणी खूप नितळ आणि गार होतं... संपूर्ण वर्षभर ह्या ओढ्यात पाणी असतं... पाण्यानं ओढ्यातल्या दगडांवर फार सुंदर कारिगरी केली आहे...
पाण्यात मस्त डुबून घेतलं, ताजे झालो आणि पुन्हा ढाकोबाच्या मार्गी लागलो... दाट झाडीतून चढून गेल्यावर पठारावर पोहचलो... इथून ढाकोबा अगदीच जवळ जाणवत होता...
ह्या पठारावरची उजव्या हाताची वाट ढाकोबाच्या देवळात जाते... देवळाकडे न जाता आम्ही सरळ ढाकोबा कडे जाणारी वाट धरली... अजून एका चढा नंतर ढकोबाच्या सोंडेवर पोहचलो... अतीशय उभा चढ चढून शेवटी दुपारी १ वाजता ढाकोबाच्या माथ्यावर पाय ठेवला... माथ्यावर उन्हाचे चांगलेच चटके बसत होते, पण इथून जो नजारा दिसतो त्याला तोड नाही... खाली सरळ १ कि.मी. खोल कोकणात डोकावता येतं...
उजव्या हाताला दाऱ्याघाट, जीवधन, नानाचा अंगठा आणि नानेघाट असा देखावा दिसतो... खोल कोकणात सरळ उतरणारे कातळकडे बघून वेगळाच रोमांच अंगात संचारतो...
ढाकोबाच्या माथ्यावर अनेक मधमाश्या मध गोळा करण्यात मग्न होत्या...
माथ्यावरुन दिसणारा नजारा डोळ्यात साठवला आणि उतरायला सुरुवात केली... थोडं उतरल्यावर एक ओढा लागला.. हा ओढा थेट आंबोली पर्यंत उतरतो... मागे एकदा ह्या ओढ्यातूनच उतरलो होतो, पण वाट फार काट्याकुट्यातून जाते... सोबत बरंच सामान होतं म्हणून ह्या वाटेने न जाता पर्यायी वाटेवर चालायला लागलो... ही वाट सुरुवातीला दाट कारवीच्या रानातून पुढे सरकत होती... कारवीच्या रानात दिशेचं भान राहिलं नाही तरी पण आम्ही चालत राहिलो... थोड्या वेळात पठारावर आलो आणि मस्त मळलेली पायवाट लागली... मागे वळून ढाकोबाकडे पाहिल्यावर काहीतरी चुकतयं असं वाटलं कारण मागच्या वेळेस आंबोलीहून वर चढताना ढाकोबा असा कधीच दिसला नव्हता, पण पायवाट इतकी मळलेली आहे म्हंटल्यावर गावात जाईलच असा समज करुन आम्ही डोंगर उतरतच गेलो... बरंच उतरल्यावर एका धनगराचं घर लागलं... तीथे चौकशी केल्यावर कळालं की आम्ही चांगलेच भरकटलोय... समोर दाट रान आणि दरी होती...
"हा समोर डोंगर दिसतोय ना, त्याच्या मागच्या डोंगराच्या मागे मीना नदीच्या खोऱ्यात आंबोली गाव आहे... आलात तसे परत वर जा... पठारावरुन उजव्या हाताला बरंच चालल्यावर आंबोलीला उतरणारी वाट लागेल..." अशी माहिती मिळाली...
बरेच दमलो होतो, पण वेळेत आंबोलीला पोहचणं फार आवश्यक होतं... नाहीतर आंबोलीहून जुन्नरला जाणारी बस चुकेल अशी भिती होती, मग दम न खाता परत चढायला लागलो... साधारण पाऊण तास चालल्यावर आंबोलीत उतरणारा ओढा लागला... जरा पाणी प्यायलो, दम खाल्ला आणि उतरायला लागलो... ह्या पुढची वाट ओळखीची होती... एका तासात आंबोली गावाच्या लहानश्या बसस्टँड वर पोहचलो... वाटेत कांडेसर (White-necked Stork) पक्ष्याची जोडी दिसली... ४.१५ ची जुन्नरला जाणारी शेवटची बस मिळाली...
बस मधे बसल्यावर डोंगरातल्या त्या धनगराची आठवण झाली... इतक्या दाट रानात एकटंच कुटूंब कसं काय नांदत असेल?... वीज नाही, रात्री त्यांना भिती नसेल का वाटत?... कधी काही घडलं तर वाहतुकीचं वाहन मिळायला किमान १.५ तास तरी जंगलातून चालावं लागत असेल... का बरं हे इतक्या जंगलात राहात असतील?... त्यांची लहान मुलं कोणा बरोबर आणि काय खेळत असतील?... असे अनेक प्रश्न मनात आले... ह्या सगळ्या प्रश्नांच एकच उत्तर मिळालं आणि ते म्हणजे "हिच खरी निसर्गाची लेकरं आणि रानाची पाखरं ..."
अतिशय सुंदर वॄतांत आणि फोटो.
अतिशय सुंदर वॄतांत आणि फोटो.:स्मित:
व्वाव ! सुंदर फोटोज अन वर्णन
व्वाव ! सुंदर फोटोज अन वर्णन . पहिल्या पातेल्यात चहा आहे का ?
पहिल्या फोटोतील नकाशावरुन
पहिल्या फोटोतील नकाशावरुन काही आकलन झाले नाही पण चुलीचा ( चहाचे पातेले) अन ओढ्याचा फोटो फारच सुंदर!
वर्णनही छान दिलेय! पण एकुण कोणी माहीतगार बरोबर असल्याशिवाय जाण्याची हिम्मत होणार नाही हे कळतय!
मस्तच. विमुक्त तुम्ही हे ललित
मस्तच.
विमुक्त तुम्ही हे ललित मध्ये लिहायच्या ऐवजी माझे दुर्गभ्रमण या ग्रूप मध्ये लेखनाचा नवीन धागा काढत जा, म्हणजे बाकीच्या साहित्य प्रकारात हे लेखन हरवणार नाही आणि सगळ्यांचे दुर्गभ्रमणाचे अनुभव एकाच ठिकाणी मायबोलीकरांना वाचायला मिळतील.
काय छान लिहितोस रे तू
काय छान लिहितोस रे तू विमुक्त!!!!!! कशाला काय म्हणतात, कुठला शब्द योजावा हे खूप छान माहिती आहे तुला.
मी तुला संपर्कावरुन एक मेल केली आहे. ती मिळाली का? असेल तर उत्तर दे कृपया. मी वाट पहात आहे.
मस्तच. केवळ अफलातून
मस्तच. केवळ अफलातून
जळव साल्या ..... कसलं मस्त
कसलं मस्त लिहीतोस रे....., नशिबवान आहेस लेका. सालं लग्न झाल्यापासुन आमचं फ़िरणं जवळ जवळ बंदच झालेय
आवडलं वर्णन ! रुनी ला अनुमोदन !
>>>नशिबवान आहेस लेका. सालं
>>>नशिबवान आहेस लेका. सालं लग्न झाल्यापासुन आमचं फ़िरणं जवळ जवळ बंदच झालेय
रेशनिंग कर्...जरा ऐकावे लागते... पण तसेही ते ऐकायलाच लागेल
मस्तच ! वर्णन आणि ट्रेक पण
मस्तच ! वर्णन आणि ट्रेक पण !
छान माहीती दिलीत.. !
सुंदर. एक सो एक असतात तुमचे
सुंदर.
एक सो एक असतात तुमचे वृत्तांत.
वॉव ! मस्त फोटुज नि तितकेच
वॉव ! मस्त फोटुज नि तितकेच सुंदर वर्णन ! खुप छान !
किप इट अप !!
मस्त आहे वर्णन आणि फोटो!
मस्त आहे वर्णन आणि फोटो!
विमुक्त, तुला एक सुचवू का? तू फोटोंसाठीच्या लिंका पिकासावरुन दिल्या असशील, तर त्या लिंकांध्ये तुला फोटोंचा साइज दिसेल. आत्ता तो आकडा बहुधा s800 असा असावा, तो s640 करुन पहा, म्हणजे फोटो व्यवस्थित दिसतील.
सुंदर फोटो आणि मस्त वर्णन.
सुंदर फोटो आणि मस्त वर्णन.
विमुक्ता... लग्ना आधी जेव्हढे
विमुक्ता... लग्ना आधी जेव्हढे हिंडायचे ते हिंडून घे...
तुझे वृत्तांत आणि फोटो पाहून मन प्रत्येक वेळी सह्यकड्यावर जाऊन पोहचतं... मस्तच
क्लाSSSSSSSSSSSस...
क्लाSSSSSSSSSSSस...
विमुक्ता..सुंदर फोटो आणि मस्त
विमुक्ता..सुंदर फोटो आणि मस्त वर्णन.
पातेल्याला माती लावाकि राव्..........ए काडी पेटी देवळात पाय्जे होती ना?
सुंदर वृत्तांत व छायाचीत्रे.
सुंदर वृत्तांत व छायाचीत्रे.
विमुक्त मस्त वर्णन व फोटोही
विमुक्त मस्त वर्णन व फोटोही साजेसे.
विमुक्त मधमाशी आणि फुलाचा
विमुक्त
मधमाशी आणि फुलाचा फोटु लय झाक १०० पैकी १००० मार्क.
झकास.....:)