माझे २०१० साठीचे १४ संकल्प... कारणांसहित...

Submitted by धुंद रवी on 31 December, 2009 - 15:32

मित्र मैत्रीणींनो
माझे २०१० साठीचे १४ संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.

संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
अ. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?
ब. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
क. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ...........................................................
.................................................................................. .
.............................................. .....................
.......................... ...........................असो.... !

संकल्प २. - बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
अ. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
.............................असो.... !

संकल्प ३. - खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
अ. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................असो.... !

संकल्प ४. - दारु पिणार नाही.
कारण -
अ. - तोल जातो.
ब. - पैसे जातात
क. - चव जाते.
ड. - शुद्ध जाते.
ई. - दृष्टी जाते.
फ. - मजा जाते.
ग. - इज्जत जाते.

संकल्प ५. - तमाशा बघणार नाही.
कारण -
अ. - रंभा घायाळकर प्रकरण..... http://www.maayboli.com/node/12770
ब. - पुन्हा रंभा घायाळकर प्रकरण..... http://www.maayboli.com/node/12887

संकल्प ६. - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
अ. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
ब. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....

संकल्प ७. - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
अ. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
ब. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
क. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
ड. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
.............................असो.... !

संकल्प ८. - लांबच्या प्रवासात केळी नेणार नाही.
कारण -
अ. - घाटात केळ्याचा असह्य्य वास सुटतो. मळमळतं. कधीकधी ओकारी होते..... ब-याचदा ओकारी होते.... नेहमीच ओकारी होते.
ब. - केळी चुकुन सामानाखाली गेल्यास पिशवीतच शिकरण होतं.
क. - केळीमुळे पोट गच्च होतं.
ड. - केळीचे करपट ढेकर खुप....
.............................असो.... !

संकल्प ९. - घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
अ. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
ब. - १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !! )
क. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.

संकल्प १०. - योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण -
अ. - योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो.... बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा...... असो...
ब. - व्यायाम केला की खुप थकायला होतं.... गळुन जायला होतं.... चक्कर येते..... आजारी पडायला होतं. तब्येत बिघडते.
क. - इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी.....
.............................असो.... !

संकल्प ११. - हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण -
अ. - डीप्रेशन येतं....
ब. - बीपी वाढतं....
क. - डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
ड. - जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
ई. - कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
फ. - भयानक स्वप्न पडतात. भास होतात...
ग. - पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं...

संकल्प १२. - वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण -
अ. - मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
ब. - झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, "वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत" अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
क. - परवा मी १०५ रुपयाचा उसाचा रस प्यायला. आता पी वन...पी टु... बघायचं ठरवलय.
ड. - घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला....
.............................असो.... !

संकल्प १३. - ऑफिसमध्ये साहित्यलेखन करणार नाही. विशेषतः मायबोलीवर टाकायचे विनोदी लेखन....
कारण -
अ. - त्या प्रसुति वेदना होत असतानाच्या कळा ऑफिसात देता येत नाहित.
ब. - वेगवेगळ्या पात्रांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्याकडे तटस्थपणे पाहताना... हसताना विचित्र आवाज येतो. बाकीचे लोक 'काय यडं आहे' अशा नजरेने बघतात.
क. - काही लिहुन झालं की समोरच्याला वाचुन दाखवावसं वाटतं. एकदा समोर क्लायंट होता आणि एकदा बॉस..... (प्रतिसाद म्हणुन मेमो मिळाला....!)
ड. - मायबोलीवरच्या मित्र-मैत्रीणींचे झकास प्रतिसाद वाचले की तिथेच बॉसच्या तोंडावर राजीनामा मारावासा वाटतो....

आणि सगळ्यात महत्वाचा संकल्प....

संकल्प १४. - मायबोलीवरचे इतर मित्र-मैत्रीणींचे लेख सिरीयसली घेणार नाही.
कारण -

अ. - अश्विनीमामींचा लेख वाचुन एक कुत्री घरी आणली. जाम धुडगुस घातला तिनी... काय तिला इंजक्शन वैगेरे देणार, तिच मला चावली आणि मलाच घ्यायला लागली इंजक्शन्स.... तिनी कपडे फाडले.. बुट खाल्ले.... नखं मारली आणि भरीत भर अजुन पिलावल वाढवली... शिवाय तिच्यामुळे गल्लीतली बरीच कुत्री माझ्यावर डुख धरुन आहेत...

ब. -

क. - 'मी केलेला वेंधळेपणा' हा लेख वाचुन वाचुन जो वेंधळेपणा मी करत नव्हतो तो करायला लागलोय. अजुन थोड्या दिवसांनी फक्त माझ्या वेंधळेपणाचा एका धागा चालु करायला लागेल.

ड. - नानबाचं 'वाचुन तर पहा काय असतं हे थायारॉईड प्रकरण' हा लेख वाचला आणि पुढील त्रास होताहेत असं सारखं वाटतं. - १. थकवा २. एनर्जी, उत्साहाचा अभाव ३. नैराश्य ४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ ५. कोरडी त्वचा ६. चेहरा सुजणे ७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे ८. स्नायू दुखणे, आखडणे ९. सांधेदुखी १०. प्रचंड झोप येणे.

ई. - डॉ.शीतल ह्यांची 'स्त्रीत्व' ही प्रकाशचित्र पाहिली आणि मी पण बायकांचे फोटो काढायला एका गावात कॅमेरा घेउन गेलो. चेह-यावर एकदम नैसर्गिक भाव मिळावेत म्हणुन त्यांना न सांगता फोटो काढले आणि........... असो....

फ. - रुनी पॉटरचं 'मातीचे प्रयोग' वाचुन एक चाक आणालं आणि भांडी करायचा प्रयत्न केला. अमुर्त आकाराची अनावृत्त भांडी तयार झाली. अनन्यसाधारण राडा झाला घरात. मग ती सगळी माती आणि शिल्पं एका कुंभराला २०० रुपयात विकली. (खुप चांगला होता तो कुंभार.... २०० च घेतले त्यानी, नाहीतर सगळे ५०० च्यावर मागत होते.)

ग. - बी चं 'ताडी आणि नीरा' हा लेख वाचला आणि प्यायलो ताडी. पण त्यात त्यानी नर झाड आणि मादी झाड कसं ओळखायचं हे दिलं नाहिये. त्यामुळे बहुतेक मादी झाडाची प्यायली आणि मग.... काय माहिती पुढं काय झालं. पण बरिचशी लोकं हल्ली ओळख देत नाहीत. जागोमोहनप्यारेचं ऐकलं की ताडीच्या झाडाखाली बसून ताक पिऊ नये अशी म्हण आहे. ( कारण लोक ताडीचाच संशय घेतात. चांगली वस्तू वाईट स्थळी असली तरी लोक तिला वाईट म्हणतात, असा अर्थ.) मग मी ताकाच्या दुकानाबाहेर बसुन ताडी प्यायली पण तरिही लोकांना काय पितोय ते कळालंच....

ह. - 'असंबद्ध गप्पा' ह्या लेखानी तर माझी मतीच गुंग केली आहे. काल बायकोनी विचारलं की जेवायला काय करु तर म्हणालो की माका पवूक येणां नाय गो, माका मॉप आवडता पवूक, भागो तुका जमात काय गो पवूक? खंय पवतंस तू? टँकात, नदित, तलावात्... ?

य. असे आणखी सुमारे १५ लेख ज्यांवर सविस्तरच लिहायला लागेल.... ............असो.... !

मायबोलीकरांनो, तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठिशी असतील तरच हे संकल्प पुर्ण होतील...

तुमचाच...
धुंद रवी.

गुलमोहर: 

Happy
रवी, pdf मध्ये वरती हेडर टाकून त्यात तुझं नाव वगैरे टाकत जा..
आणि नुसत्या मेल मधून पाठवू नकोसच कुणाला...

नानबा, इथून कॉपी करून मेल फॉरवर्ड करतात लोकं पण मूळ लेखकाचं नाव मात्र कॉपी करत नाहीत जेणेकरून वाचणार्‍याला वाटावं की पाठवणार्‍यानेच लिहिलं आहे. त्यामुळे फॉरवर्डेड मेलमधून आलेलं कुठलंही लिखाण आपण आधी कुठे वाचलं असेल तर त्याचा उगम आणि मूळ लेखकाचं नाव लिहून मेल पाठवाणार्‍याला पाठवावं, मूळ लेखक आणि लेखाला श्रेय देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून....

सगळ्यांचे मनापासुन आभार...
जरा काळजीच घेतली पाहिजे आता... Happy

कुणाला कॉपीराईट विषयी काही माहिती आहे का ?

आजच हे सगळे संकल्प ऑफीसच्या इमेल आय डीवर फॉर्वर्ड एमेल द्वारे आले. परत एकदा वाचले
हे आपल्या लेखनाचेच यश आहे असे म्हणावे लागेल.
आपले अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा

अमोल केळकर
---------------------------------------------------------------
मला इथे भेटा

रवी, मलाही आले होते फॉर्वर्ड मधून. मी सगळ्यांना परत मेल पाठवलय तुमचं नाव लिहून. वैयक्तिकरित्या जेव्हढ करता येईल तेव्हढ तर करुयाच...

जे ब्बात! रवी सहीच रे! तो १४व्या संकल्पातला य पटकन घे बघु लिहायला. (मग तू पुन्हा धुतला जाशील आणि आम्ही तुला उचलुन धरायला (हसत हसत) आहोतच. :P)
असं सुरेख खुप लिही रे. नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

मला पण आलं आज..
मी खालचा रिप्लाय टाकला..

This article is written by Dhund Ravi.
Original article can be read at http://dhundravi.multiply.com or at http://www.maayboli.com/node/13028

http://dhundravi.multiply.com has many more hillarious articles and beautiful- serious- light poems.
Njoy these articles - however I request all of you to include Dhund ravi's name and the source detail to whomever you will forward it/ whomever you receive it from. It wont even take a minute to forward/attach my message to this article.
When you do this author will not get any money - but let the author njoy at least the repsonses of his readers.. What say guys? Lol

hey... Thanks a TON नानबा....
बरं वाटलं हे वाचुन.... Happy

भन्नाटच.. ह ह पुरेवाट... घरातले येऊन बघत होते.. झालय तरि काय हिला.. Happy
रवी साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आता.. हेहेहे Happy

हा लेख चोरुन आपल्या ब्ल्ओग वर प्रसिध्द केलाय हळदणकर नावाच्या इसमाने. त्याची लिंक इथे देतोय. बरं या व्यतिरिक्त पण बरेच मायबोलीकरांचे लेख त्याच्या ब्ल~ओग वर सापडतील..
http://mannmajhe.blogspot.com/2010/01/blog-post_08.html

माझ्या पण ब्ल्~ओग वरचा एक लेख तिथे सापडला. "क्रेडीट कार्ड वाली कन्या ". तसेच बर्याच लोकांचे लेख /कविता त्याने चोरलेल्या आहेत.. बघा काही करता येइल तर. मी तर माझ्या ब्ल्~ओग वर एक लेख लिहिणार आहे त्याच्या या सव्ई बद्दल..

खरचं अशा लोकांना चोपलं पाहिजे.
admin काही होउ शकतं का कि माबो वरचं काही कॉपी करता येणार नाही..

ह हळदणकर इसम जरा यडाच दिसतोय...
त्यानी चो-या तर केल्याच आहेत पण काय वाट्टेल ते लिहुन्टाकतोय ब्लॉग वर...

त्याची एक कविता..

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.
(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी.....

त्याला शोधुन ठोकल पाहिजे....

<<< त्याला शोधुन ठोकल पाहिजे....

विक्षिप्त खरच रे. फारच वेडा दिस्तोय..
मी पण त्याच्या ब्लोग वर पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण नाही होतय..

नेटवर टाकलेला लेख कुठून कूठे जाईल ते सांगता येत नाही. माझा काका लंडनला असतो या ख्रिसमसच्या सुट्टीत २-३ वर्षांनी भेटल्यावर तो मला 'आणि आम्ही सोलापूरकर' लेखाची वाक्ये ऐकवून 'काय भारी,काय भारी' करु लागला, हा लेख मीच लिहीलाय हे सांगितल्यावर कन्फ्युज झाला.त्याला तो असाच फिरतफिरत कोणत्यातरी वेगळ्याच नावाने मेलवर आला होता .
हळदणकराचा सगळा ब्लॉगच अस्ल्या वाह्यात कविता व उचली लेखांनी भरलाय कायनाय तर सरळ पुलंचे लिखाण लिहीलयं नशीब त्याला तरी स्वत:च्या नावावर खपवले नाहीए.

मस्त आहे लेख. पितळे मिठाईवाल्यांच्या १ ला बंद ह्या नियमामुळे रिकाम्या हाताने मुंबईला परतायला लागल्याने मीही बरेचदा शिव्या मोजल्यात. आज त्या "बंद" मागचं कारण कळलं.

रवी रे रवी Proud हे संकल्प कुठे कुठे फिरतायत, किती जणांनी मला पाठवला, मी विचार करत हते की कुणी लिहिला असेल! अभिनंदन

हळदणकराला काही प्रतिसाद पण देता येत नाही Sad खुप वेळ मोठा प्रतिसाद टायपत बसलो आणि पोष्ट करताना गेलाच नाही Sad

त्याने Posts RSS च्या खाली असं लिहीलय काहीतरी ..

प्रिय मन माझे वाचक,

‘मन माझे’वर प्रकाशित केलेले लिखान हे मित्र परिवार, लेखक, कवि आणि मराठी वाचकांनी पाठविलेले आहे. संबधित लिखान ज्या व्यक्तिने पाठविले आहे अथवा ज्या ज्ञात व्यक्तिचे आहे त्यांचे नाव संबधित लिखानाखाली दिले आहे. जे लिखान लेखकाच्या नावाशिवाय प्रकाशित केले आहे, असे लेखन लेखकाच्या नावाशिवाय मिळाल्यामुळे ते तसेच लिहिले आहे . मात्र, अशा लेखनाचा व लेखकांचा आम्ही आदर करुन त्यांचे आभार मानतो. येथे प्रकाशित कोणतेही लिखान आम्ही स्वतःचे वा मालकीचे मानत/ समजत नाही. आम्हांस लेख पाठविणा-या व्यक्तिंचा आणि लेखकांचा आम्ही आदर करतो व आभार मानतो.

ह्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेल्या गोष्टींशी webmaster सहमत असेलच असे नाही तसेच ब्लॉगवरील सर्व नोंदींचे हक्क हे ज्या त्या नोंदीच्या मुळ लेखक-निर्मात्याच्या हातात असून "मन माझे" फ़क्त असे सर्व साहित्य ब्लॉग च्या रुपाने एकत्रित करून लोकांसमोर आणते.

कॄपया या संकेतस्थलामगिल प्रमाणिक हेतु फक्त मराठी भाषेचा प्रसार व्हावा आणि मराठी लेखनाचा साठा – वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा – द्यावा हाचआहे
जय महाराष्ट्र !!

आभार,
’मन माझे’

सुन्या... बरं झालं लिहलंस हे...
नाहीतर आपल्यातल्याच कुणीतरी धरुन ठोकला असता ह्याला... काल मी त्याला एक मेसेज पोस्ट करु शकलोय... पाहु....

तूम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोट केलीत का ? ह्या मेलवरुन येणार्‍या संकल्पात १० च आहेत फक्त. मायबोलीचा उल्लेख / रेफरन्स अस्णारे संकप्ल गाळल्येत आणि म्हणून टायटल मधला १४ चा आकडा पण उडवलाय. याचाच अर्थ हे लेखकाला क्रेडिट न द्यायच काम चूकून न होता मुद्दामहून केलं गेलय.

Pages