माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन.....

Submitted by धुंद रवी on 8 January, 2010 - 03:32

माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन.....

मी एक नशीबवान माणुस आहे. आयुष्यानी मला सगळं सगळं दिलं. प्रेम करणारी बायको... ऐकुन घेणारी मुलगी.... समजुन घेणारा बॉस..... कौतुक करणारे मित्र... सांभाळुन घेणारे सहकारी..... आदर देणारे शेजारी आणि.....

....आणि अजुन काय हवं आयुष्यात? मी तर ढगातुनच चालायचो. जमिनीवर तरंगायचो.... पण मी हे विसरलो होतो की आपल्याला ढगात अढळपद मिळायला आपण काय ध्रुवबाळ नाही. अर्थात तो ध्रुवबाळ जरी पुण्यात खरेदीला आला असता तरी.... असो.

मला फक्त एक लुंगी घ्यायची होती हो... माझ्या विशेष अपेक्षा, आवड-निवड, निकष असलं काहिही नव्हतं... किती वेळ लागायला हवाय एक लुंगी घ्यायला? १० मिनिटं? मलाही असंच वाटलं होतं. एका दुकानात जायचं, लुंगी मागायची आणि पैसे देऊन यायचे.... १० मिनिटं !

....पण सुमारे १० तास लागले आणि दुकानं.... डझनभर !

...... आणि ह्या भयावह अनुभवानंतर काय घालणार मी ती लुंगी ? ती बघीतली तरी किंचाळत डोंगराकडे पळत जातो मी. मला तर लुंगी-फोबीयाच झालाय.... जर मी तिकडं दक्षिणेत रहायला असतो तर एव्हाना आत्महत्याच केली असती.

मी लुंगी खरेदी करायची म्हणुन आप्त-इष्टांना सोबत येणार का म्हणुन विचारलं तर.... प्रेम करणारी बायको तटस्थ झाली, ऐकुन घेणारी मुलगी बहिरी झाली, समजुन घेणा-या बॉसनी अजुन समजुन घेतलं आणि एक दिवसाची पगारी रजा दिली, कौतुक करणारे मित्र गायब झाले आणि शेजारी अजुन आदरानी पाहायला लागले. मग मी मंगल पांडेसारखा त्या शेकडो दुकानदारांसमोर एकटाच उभा राहिलो...

(मला खात्री आहे की तुम्ही मंगल पांडे हा पिक्चर पुर्ण पाहिला नाहीये. कारण हे वाचायला तुम्ही उरलाच नसता. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतरची भारतातली सगळ्यात मोठी दुर्घटना होती ती ज्यात लोक बेशुद्ध पडले आणि परत शुद्धीवर आलेच नाहीत !) ...........असो. उगाच विषयांतर नको. ह्याविषयी पुन्हा कधीतरी लिहिन.

.....तर मी खरेदीसाठी एकटाच रस्त्यावर आलो.

दुकान नंबर १
ह्या दुकानात मालक एकटेच कान कोरत बसले होते. मी काहि बोलायला लागणार इतक्यात त्यांचा चेहरा इतका वाकडा व्हायचा की माझं धाडसंच व्हायचं नाही. एकशेतीस ग्रॅम मळ बाहेर काढल्यानंतर त्यांनी हात झटकला आणि पुन्हा खोदकाम चालु केले.
त्यांच्या मागेच खुप सुंदर सुंदर लुंग्या रचुन ठेवल्या होत्या. त्या पैठणीच्या मोहासाठी जसं वहिन्या आदेश बांदेकर भाऊजींचे अनाकलनीय अबोध असे विनोदाचे बाण सहन करायला तयार व्हायच्या, तसं मी सुद्धा त्या लुंग्यांसाठी कानातली घाण सहन करत तिथंच उभं राहिलो.

हाताला रग लागल्यानंतर जसं त्यांनी हात बदलायला घेतला तसं मी पण पवित्रा बदलला आणि दुकानात झेप घेतली.
मी : मालक, लुंगी हवीये.
दुकानदार : दुकानात माणुस नाहीये.
(मग तुम्ही काय बैल आहत काय ?, हा प्रश्न मी गिळला....)
मी : अहो.... हे काय इथेच तर आहेत, तुमच्या मागे... दाखवा ना !
दुकानदार : दाखवायला माणुस नाहीये.
मी : तुम्ही नुसतं समोर ठेवा. मी माझं बघतो.
दुकानदार : काढायला माणुस नाहीये.
मी : मग मी काढु का ?

मी असं म्हंटल्याबरोबर..... त्यांच्या कानातल्या मळापेक्षा घाण, नापसंतीदर्शक, तुच्छ कटाक्ष त्यांनी माझ्याकडे टाकला. ह्यावरुन मला दोन गोष्टी समजल्या.
०१. दुकानात माणुस नाही.
०२. गि-हाईक माणुस नाही.

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर २
पुढच्या दुकानात सगळी माणसं हजर होती. पण जरा विचित्र उभी होती. दोघं जण गालाला गाल लाऊन आणि तिसरा त्यांच्या डोक्याला गाल लाऊन असे बसले-उभे होते. बहुतेक मालक आले नसतील, त्यामुळे सगळे जण कोंडाळं करुन क्रिकेटची कॉमेंट्री ऐकत बसले होते. आणि गालांच्या मध्ये ट्रांझीस्टर होता.

सकाळ-सकाळी कुणी ते क्रिकेट ऐकत, बघत, बोलत असले ना की डोकंच भडकतं माझं ! इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केल्याचा मला जेवढा राग नाही तेवढा त्यांनी इथे क्रिकेट आणल्याचा आहे. हा एक रिकामटेकड्या नतद्रष्ट लोकांचा दळभद्री खेळ आहे, असं माझं ठाम मत आहे... आधिच माझी क्रिकेटविषयी इतकी तळमळ आणि त्यात कामाच्या वेळेला हि भंकसगिरी.... तरिही मी आत शिरलो.

मी : मला लुंगी हवीय.
दुकानदार : दुकानात मालक नाहीयेत.
मी : मला मालकांची नाही, नविन लुंगी हवीये..... दादा, या इकडे आणि लुंगी दाखवा.
दादा : ---
मी : दादा, लुंगी !
दादा : ---
मी : ओ दादा, जरा लुंगी दाखवा ना !
दादा : दोनच ओवर थांबा. लंच टाईमला देतो.
मी : ओवर म्हणजे काय ? आणि सकाळी १० वाजता लंचटाईम ? लंचटाईमला तुम्ही जेवायला गेल्यावर कशी देणार लुंगी ?
दादा : आमचा नाय हो.... मॅचमधला.
(असं म्हणुन तो, "कशाला येतात मॅचच्यादिवशी येड्यावानी " असं काहीतरी पुटपुटत पुन्हा निघुन गेला.)

माझ्या जीवाचा संताप संताप झाला. मी म्हंटलं की मालकांचा फोन नंबर द्या तर त्या निर्लज्ज माणसानी तो दिला. मी रागारागात फोन फिरवला तर तिथच एकाच्या खिशात वाजला. तो माणुस वेड्यासारखा हसत काय होता... नाचत काय होता.... कपड्यांचा ढिग उडवत काय होता.... (कुणीतरी कुणाला तरी सिक्स मारली तर ह्यांना काय होतं देवालाच ठाऊक...)
मी : उगाच आगाऊपणा करु नका. ह्यांचा नाही मालकांचा नंबर हवाय.
दादा : ह्येच तर आहेत मालक....

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ०३
सदरच्या दुकानात मी सुमारे २० मिनिटे उभा राहिलो पण माझ्याकडे कुणी ढुंकुनही बघितलं नाही. ह्यावेळात एक भिकारी आला तर दुकानाचे मालक "ए हाड...." असं जोरात ओरडले....

तो भिकारी आणि मी..... गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ०४
थोडा वेळ बाजारात फेरफटका मारल्यानंतर एका दुकानात मालकच्या जागेवर मालक आणि सेवक असे दोन्ही वर्ग होते. पण गि-हाईकं नव्हती. मी आनंदाने आत शिरलो.

मी : मालक, मला लुंगी हवीये.
मालक : (माझ्यातुन आरपार बघत त्यांच्या माणसांना) .....ह्यांना लुंगी दाखवा.

मला बघुन एकजण कपड्यांच्या ढिगाखाली घुसला... दुसरा माळ्यावर चढला... तिसरा न आलेला फोन उचलुन बाहेर गेला. पण एकजण गुटखा खाण्यात मग्न असल्याने बरोब्बर जाळ्यात 'घावला'.

मी : नमस्कार. मला लुंगी हवीये.
तो : सॉएब.... टोमाला पोण ऑट्टाच्चाच टॉयम घावोला कारॉव यॉयला... बॉल्लाआट्ता....
मी : तुम्ही जरा तो गुटखा थुंकुन येता का ? मी तुम्हाला नविन घेउन देईन.... (ते त्याचे माझ्या हाता-तोंडाशी आलेले 'तुषारंचे वैभव' पुसत मी म्हणालो.)
तो तिथच पलिकडे 'थुकुन' आणि तिथल्याच एका कापडाला तोंड पुसुन म्हणाला,
तो : बोला साहेब...
मी : मला लुंगी हवीये. एकदम ट्रॅडीशनल हवीये. पांढरी...किंवा लाईट रंगाची. चेक्स किंवा लाईनींग असलेली...
तो : अशी कुणी वापरत नाही साहेब आता.... नविन फॅशनची घ्या...
मी : मला तशीच हवीये... नाहीये का ?
तो : होती... पण मी आत्ताच त्याला तोंड पुसलं राव.... कुणी घेत नाही अशी, खुप दिवस पडली होती म्हणुन....
मी : ठिक आहे. दाखवा आहेत त्या....
सेल्समन : ही बघा... एकदम लेटस्ट डिझाईन.... अजुन बाजारात असा प्रकार यायचाय... (असं म्हणुन त्यानी मला प्लेन हिरवी लुंगी दाखवली.)
मी : कुठाय डिझाईन ?
सेल्समन : डिझाईन सोडा... रंग बघा साहेब... मोराकडे पण असा हिरवा रंग मिळायचा नाही. एकदम फ़्रेश... बाहेर पडलात तर वळुन वळुन पाहाणार लोकं....
(एक तर मी मोराशी कसलिही स्पर्धा करणार नव्हतो आणि लोकांनी वळुन वळुन बघायला मी काय ऑफिसला घालुन जाणार होतो काय.....?)

मी : पण हा हिरवा रंग जरा अंगावर येतोय हो....
सेल्समन : रंगाचं सोडा. कापड बघा साहेब.... एकदम हलकं... लुंगी घातलीये का नाही ते पण कळणार नाही...
मी : ------ !!!! ????
सेल्समन : हात तर लाऊन बघा साहेब.... एकदम ढाक्क्याची मलमल....
मी : हं, मऊ आहे पण किती ट्रान्सफरंट आहे. चुकुन बाहेर गेलो तर लोक वळुन वळुन बघतील. जरा दुसरा प्रकार दाखवा ना...
सेल्समन : ह्याच प्रकारात हिरव्याच्या ऐवजी गुलाबी रंग दाखवु.... ?
मी : गुलाबी ?? छे... काहितरी दुसरं दाखवा ना....
सेल्समन : ............ हे बघा साहेब... एकदम कडक प्रकार.... मार्केटमध्ये कुठही दाखवा असा आयटम आणि फुकट घेउन जा हा..... एकदम लेटस्ट डिझाईन....

ह्यावरही काही डिझाईन नव्हतं त्यामुळे मी डिझाईनचं सोडुन रंग पाहायला लागलो.... छान होता रंग... हलकासा निळा त्यावर पांढ-या रेषा... पण एकदम कडक प्रकार होता... म्हणजे ते मणिपुरी का कुठल्या नृत्य प्रकारात ते चटया घालुन नाचतात ना तसं वाटायला लागलं....

मी : अजुन काय असेल तर दाखवा ना... नाही आवडलं हे पण....
(खरं तर त्यानी मला दोनच प्रकार दाखवले होते पण त्याचा चेहरा मी 'त्याचा मानसिक छळ करुन अदखलपात्र गुन्हा करतोय' असा झाला.)

सेल्समन : हे घ्या... हे सोडुन काहिच नाही आपल्याकडे... एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग.... (असं म्हणुन त्यानी एक लुंगी टेबलावर आपटली.) खरंच एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग... मी तरी कुठे पाहिला नव्हता.... काय वर्णन करु त्या लुंगीचं...
' आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर जर एखादं आजारी मांजर ओकलं ' तर कसं दिसेल, अशा डिझाईन आणि रंगाची ती लुंगी होती.

मी ती पहिली हिरवी लुंगी घेउन त्याला अस्तर लावुन घ्यावं असा विचार करायला लागलो. त्याला किंमत विचारली तर २७० रुपये म्हणाला. ती उभी चटई १९५ रुपायाची होती. माझा चेहरा पाहुन त्याला काय कळायचं ते कळालं....
सेल्समन : " घ्यायची नाही तर बघायची कशाला... परवडत नाही तर............

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ५
आता बराच वेळ झाला होता आणि माझी लुंगी खरेदी अजुन तशीच राहिली होती. एका दुकानात शिरलो तर तिथला माणुस म्हणाला की १ वाजलाय.
मी : मग ?
तो : काय नविन आहात काय पुण्यात ?
मी : काय संबंध ?
तो : हे विचारताय म्हणजे नविन आहात. १ वाजता आमचं दुकान बंद होतं. ४ ला परत उघडतं.
मी : का ?
तो : आम्ही माणसं आहोत. आम्हाला जेवायला लागतं.
मी : तीन तास ?
तो : वामकुक्षी.......
मी : दुपारच्या वेळेला ?
-------(एक हिडीस हास्य) ---------
मी : म्हणजे कामाच्या वेळेला ?
तो : कुणाचं काम ?
मी : कुणाचं म्हणजे ? आमचं !
तो : मग तुम्ही नका झोपु... आम्ही झोपणार...
मी : पण आमचं काम तुमच्याकडे आहे. ते तुमचं पण कामच आहे ना....
तो : असं कोण म्हणतं.... ?
मी : मी...! तुमचं गि-हाईक....
तो : हे कुणी ठरवलं ? समजा तुम्हाला चक्का हवाय तर तुम्ही माझं गि-हाईक कसं...
मी : एक मिनिट.. चक्क घ्यायला मी तुमच्याकडे का येईन ? इथे येउन मी चक्का का मागेन ?
तो : मागितलात तरी मिळणार नाही.
मी : अरेच्चा... कापडाच्या दुकानात येउन चक्का मागायला मी काय वेडा आहे का ?
तो : ते मी कसं सांगु शकेन ?
मी : विषय बदलु नकात. माझा मुद्दा असा आहे की आमचं काम तुमच्याकडे आहे आणि ते तुमचं पण कामच आहेच.
तो : तर मग आमचा मुद्दा असा आहे की आमची कामं आम्ही आम्हाला हवं त्या वेळात करतो. १ ते ४ नाही म्हणजे नाही.

त्याच्याशी बोलणं अशक्य आहे असं वाटत असतानाच माझं घड्याळात लक्ष गेलं तर १२.५५ झाले होते.
मी : पण घड्याळात बघा... एकला अजुन ५ मिनिटं बाकी आहेत.
तो : तुमचं घड्याळ ५ मिनिटं मागे असेल.
मी : पण तुमच्याही भिंतीवरच्या घड्याळात १२.५५ झालेत.

त्या नालायक माणसानी, काच नसलेल्या त्या घड्याळात बोट घालुन काटे फिरवले आणि १२.५५ चा ०१.०० केला आणि म्हणाला ०१.०० वाजला, तुमच्या घड्याळातल्या ३.५५ ला या....

मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ६ व ७
एक नंतरही चालु असलेलं दुकान शोधता शोधता बराच वेळ गेला. पण शेवटी मी एक होजीअरीचं दुकान शोधलंच. ह्यावेळेस मी ठरवलं होतं की मिळेल त्या रंगाची, डिझाईनची, किमतीची लुंगी घ्यायचीच.

मी : मालक, लुंगी मिळेल का ?
होजीअरीन : काय राव तुम्ही ? होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन विचारताय ? एक वेळ चेन्नईमध्ये मिळणार नाही पण इथे मिळणारच.... हॅ...हॅ...हॅ... !
( मी त्याच्या बरोबर त्या जोकवर हसण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.)
मी : ....नाही दिड वाजतोय म्हणुन विचारलं.
होजीअरीन : मग? दिड वाजता लुंगी विकल्यानी काय अपशकुन होतो का ? हॅ...हॅ...हॅ... !
मी : नाही... बहुतक लोकांचं दुकान १ वाजता बंद होतं. ४ ला परत उघडतं.
होजीअरीन : आम्ही धंदा करायला आलोय झोपा काढायला नाही. हॅ...हॅ...हॅ... !
मी : व्वा.... मग एक लुंगी द्या.
होजीअरीन : कसली पाहिजे ? (इथे तो हसला नाही. म्हणजे त्याला न हसता बोलता येत होतं)
मी : कसलीही द्या.
होजीअरीन : रंग ?
मी : कुठलाही चालेल.
होजीअरीन : चेक्स चालेल ?
मी : पळेल.
होजीअरीन : लुंगी घालुन पळु नका पडाल.... हॅ...हॅ...हॅ...
मी :द्या २ लुंग्या.
होजीअरीन : ठिक आहे. पण इथे नाहीये.
मी : अहो, आत्ता तर म्हणालात की होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन काय विचारताय....
होजीअरीन : म्हणजे ह्या दुकानात नाही आमच्या त्या बाजुच्या दुकानात लुंग्या ठेवतो. इथे फक्त बनियन, अंडरवेअर आणि शेरवानी ठेवतो. लुंग्या तिकडे... तुमचा साईज काय आहे ?
मी : लुंगीचा ?
होजीअरीन : अंडरवेअर-बनियनचा...(हॅ...हॅ...हॅ...) ....आलाय तर घ्या दोन जोडी....
मी : नाही, नको. आधि लुंगी घेतो.
होजीअरीन : आधि लुंगी कशी ? आधि अंडरवेअर-बनियन मग लुंगी. बाहेरुन अंडरवेअर घालायला आपण काय सुपरमॅन नाही. हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ...
मी : कुठय तुमचं बाजुचं दुकान... ?
होजीअरीन : बारक्या, ह्यांना आपल्या शेजारच्या दुकानात टाकुन ये....

दुकानदारांचं 'टाकुन बोलणं' नेहमीचंच पण हे 'टाकुन येणं' जरा नविनच होतं. बारक्या आणि मी त्या बाजुच्याच दुकानाकडे सुमारे १५ मिनिटं चालत राहिलो आणि जाता जाता कुठल्यातरी बारीक बोळात बारकु महाराज अंतर्धान पावले. त्या सातव्या दुकानापर्यंत मी पोहचु शकलो नाही. मग पुन्हा परत ह्याच दुकानात आलो तर शटर डाऊन...
त्यावर लिहलं होतं... दुपारी ०१.३० ते ०५.३० बंद ! (हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ...)

ह्यावेळेस मी गुपचुप दुकानाबाहेरच होतो.

दुकान नंबर ०८

भुकेल्या पोटी तहानेने व्याकुळ झालेलो लुंग्याधिर असा तो मी ४ वाजेपर्यंत वणवण भटकत राहिलो. एक बरं आहे की आशा नेहमी अनुभवावर मात करते त्यामुळे आयुष्य थांबत नाही. मी पण न थांबता पुढच्या दुकानासमोर मानसिक तयारी करत उभा राहिलो. मी माझे तोंड उघडायच्या आतच दुकानातुन एक हाक आली.....

"बोला मालक...."

(.....तुम्हाला सांगतो टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. ते दस्तुरखुद्द दुकानाचे मालक आणि मी एक क्षुद्र गि-हाईक.... माझी पायरी ओळखुन मी त्यांच्या दुकानाची पायरीही चढलो नव्हतो.... ते स्वतः आणि आपण स्वतःहुनच मला हाक मारताहेत...? मला बोलावताहेत, काय हवय ते विचारताहेत....? मला मालक म्हणताहेत...? खुप गहिवरुनच गेलो हो मी.... काय बोलावं सुचेनाच.
मग मी ते मायेचे दोन शब्द कानात भरुन घेतले, ते हर्षोन्मादाचे कढ आवरले, खिशातुन रुमाल काढला आणि डोळे पुसुन आत गेलो.)

दुकानदार : बोला मालक....
मी : मला लुंगी हवीये.
दुकानदार : वर बांधणार का खाली ?

(मी अवाक. वर का खाली म्हणजे काय ? त्यांना कंबरेच्यावर... ढेरीच्याखाली.. असं काही उत्तर अपेक्षित होतं का काय ? किंवा ते आपल्यात मुंजीमध्ये बटु बांधतो तसं मागुन पुढे आणि मग क्रॉस करुन परत मागे नेऊन मानेमागे गाठ असं लुंगी बांधण्याची काहीतरी फॅशन वगैरे आली असणार. पण माझ्या संपुर्ण देहाचा घेर पाहता किमान पावणेदोन तरी लुंग्या लागणार आणि वर आरशात मीच मला दिसायची भिती....)

मी : नाही, वर नाही.... मी खालीच बांधेन... नेहमीसारखी... साडीसारखी गोल गोल.... पण वरती पदर वगैरे घेणार नाही.
दुकानदार : मग खाली मोठ्ठी झालर देऊ का... ब्राईट निळ्याला खाली केशरी रेंगाची ? आणि चंदेरी रंगाची पट्टी असेल एकदम बारीक खाली....
(मी पुन्हा आवाक. एक तर ब्राईट निळी लुंगी... त्यात त्याला मोठ्ठी झालर...त्यात ती केशरी रंगाची ?? चेंदेरी पट्टी ??? मला ओळखणारी आसपासची २६४ माणसं मला बघुन लोळुन लोळुन हसताहेत, असं मला दिसायला लागलं.)

मी : नाही हो... असलं काही नको. एकदम साधी. पांढरी आणि सोबत बरा रंग.. चेक्स वगैरे दाखवा किंवा...
दुकानदार : चालेल आणि एक काम करु... .
(तो महान इसम मला काय हवंय हे न ऐकताच चालुच झाला होता....)
एक काम करु.... ....खालुन चुण्या घेऊन घट्ट बांधु आणि वर ओपनच ठेऊ... असा व्ही शेप....

(मी वच्याक... मला पुन्हा ते भयानक दृश्य दिसायला लागलं.... माझ्या पायाला खालुन लुंगी घट्ट बांधली आहे आणि वरुन ओपनच आहे. पण पडु नये म्हणुन मी दोन टोकं धरुन उभा आहे. पाऊस पडतोय आणि 'दिनवाणा मी' लुंगीत गारा वेचतोय..............)

केवीलवाणा मी : मालक तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कशी बांधायची मी बघेन....
दुकानदार : दिवसा का रात्री ?
रडवेला मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कधी बांधायची मी बघेन मालक....
दुकानदार : तुमच्यासाठीच का पावण्यांसाठी ?
हताश मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा हो प्लीज.
दुकानदार : बर किती दिवस ठेवणार ?
निराश मी : अहो... तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज. मला दोन लुंग्या हव्यात. माझ्यासाठीच. रात्री घालायला. किती दिवस ठेवणार, ह्याच काय उत्तर देऊ मालक ?.... फाटेपर्यंत ठेवेन... म्हणजे जवळ ठेवेन. अंगावरुन रोज सकाळी काढणार..... तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज.
दुकानदार : बर.. ठिक आहे. तुमचं नशिब जोरावर आहे राव. आजच नविन माल आलाय. तिनंच लोकांनी वापरलाय... जवळजवळ ब्रॅंड न्यु !!
(जवळजवळ ब्रॅंड न्यु.... हे शब्द कानात घुमायला लागले. माझीच लुंगी आधि वापरलेले तुळु, पंजाबी आणि मद्रासी असे पुर्ण, अर्ध्या आणि पाव लुंगीतले तीन जण मला दिसायला लागले.) मी त्या दुकानातुन बाहेर पडणार इतक्यात.... शक्य तितक्या हिडीस आवाजात मालक हंबरले...
मालक : ए सोपान्या.... गि-हाईक बघ....

गि-हाईक बघ.................? गि-हाईक बघ म्हणजे मग इतका वेळ काय चाललं होतं ? हा प्रश्न मला पडणार इतक्यात मालकांनी कानाचा ब्लु-टुथ काढला आणि फोन बंद केला.... ! ते ब्राईट निळी, खालुन चुण्या, किती दिवस ठेवणार हे सगळं दुस-याच कोणाला तरी होतं.... मी गुपचुप सोपानरावांसमोर झोळी पसरुन उभा राहिलो....

सोपानराव : हं.... ?
मी : मला लुंगी हवीये.
सोपानराव : असले लुगेसुंगे आयटम आमी इकत न्हाइ.
मी : ??
सोपानराव : चष्म्याचं दुकान सम्होर आहे.
मी : ????
सोपानराव : आम्ही निस्त मंडपाचं कापड, ड्येकोरशन, मांडव असले आयटम इकतो.
मी : अहो पण, बाहेर तर तुम्ही त्या बोर्डावर एका लुंगी घातलेल्या माणसाचं चित्र लावलय.
सोपानराव : हा मंग... आमचे मोठ्ठे मालक हेत ते... अन शेजारच्या रेनकोट-छत्रीच्या दुकानावर एका साधु म्हाराजांचा फोटु लावलाय म्हनजे त्यांनी काय लंगोट इकायचे काय ?

त्या अशुद्ध माणसाच्या तर्कशुद्ध बोलण्यानी बेशुद्ध होऊन.... मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ९
मी दिसेल त्या दुकानात डोकाऊन समोरचा माणुस माझा किती अपमान करेल ह्याचा अंदाज घेत हिंडत होतो. इतक्यात एका दुकानात मला एक मारवाडी भाभी बसलेल्या दिसल्या. मी आत शिरलो.

मी: भाभी, मला एक लुंगी हवीये.
तर एकदम.... आगीचा बंब जाताना जसा ठणठणाट होतो तसाच पण जरा जास्तच गंजलेल्या घंटेचा असा बसका आवाज झाला. मी इकडे तिकडे पाहिलं तर ती गाडी दिसलीच नाही. मग कळालं की भाभी बोलताहेत.

भाभी : थे एमएसईबीरो बील देवाने आया हो काई.... ?
(माझी भंबेरी उडाली. जिथं मी हिंदीचीच चिंधी करतो तिथं ही बया तर मारवाडी का राजस्थानी बोलत होती.)

मी : हिंदी बोलेंगे क्या ? गुजराती, राजस्थानी मेरे पल्लु नही पडती....
भाभी : (तिनी एक राजस्थानी कलाकुसर केलेली साडी हातात ठेवली आणि म्हणाली...) गुजराथनी साडीमाटे राजास्थानरी कलाकुसरकराडा पल्लु !
मी : आपका कुच गैसमज होगयला हय.. मेरे को घरमे डालने के लिये एक, दो लुंग्या चाहिये थ्या....

ती आत गेली आणि सतरंज्या घेउन आली. मग आम्ही दोघं 'डम्ब-शरात्स' खेळायला लागलो. मी तिला खाणाखुणा करुन सांगायला लागलो की असं पोटाभोवती बांधायचं, कंबरेइतक्या उंचीचं असं... वगैरे...
चनीयाचोळी, सिलेंडर, केरसुणी, छ्त्री, पोतं असे वेगवेगळे ट्राय मारल्यानंतर ती मान हलवत 'ह्यां ह्यां ह्यां' असं रेकत दुकानाबाहेर गेली आणि १० मिनिटांनी शेजारच्या दुकानातुन माझ्या कंबरेच्या उंचीचा पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम घेउन आली.

मी खचलोच. मला पडलेले यक्षप्रश्न असे -
१. मला पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम हवा जरी असता तरी मी कपड्यांच्या दुकानात का येईन ?
२. कपड्यांच्या दुकानात आलोच तर माझ्या पोटाकडे हात दाखवुन ड्रम का मागेन ?
३. मी चेह-यावरुन एमएसईबीचं बील द्यायला आलोय, असं वाटतं का ?
४. काही बायकांचे आवाज पुरषांसारखे का असतात.... ?
५. काही पुरुष मंडळी, मराठी किंवा हिंदी न येणा-या बायकांना दुकानावर का बसवतात ?

अनुत्तरीत मी : भाभी, आपका मिस्टर बाहेर गया है क्या..? ये दुकान मे कोई दुसरा मर्द वगैरा नही है क्या..? आप अकेले हो क्या ?

तिनी त्याचा काय अर्थ काढला काय माहित पण तिनी कोणलातरी फोन केला. अचानक तिचा नवरा आला आणि तिनी त्याला काहितरी कळवळुन सांगितलं. तो गरगरीत मारवाडी माझ्याकडे जळजळीत नजरेनी पाहायला लागला. ते तप्त वारं माझ्या दिशेनं वाहतय हे पाहुन मी......

....मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर १०
आता बास झालं असा विचार करुन घरी जाणार होतो पण इतक्या अपमानानंतर मी साधि लुंगी घेऊ शकलो नाही हा अपमान मला सहनच होईना. सहज घड्याळात पाहिलं तर ०३.५५ वाजुन बराच वेळ झाला होता म्हणजे त्या दुकान नं ५ मधल्या 'माणसा'ची वामकुक्षी झाली असणार.

खरं तर ते दुकान खुप लांब होतं पण मी डगमगलो नाही. डोळे फिरलेले पण नजर शाबुत, डोकं फिरलेलं पण विचार काबुत.... पाय बोंबलत होते पण दुकान बोलावत होतं... अंग ठणकत होतं पण ध्येय खुणवत होतं.... शेवटी मी त्या दुकानात पोहचलोच...

मी हश्श हुश्श करत तिथल्या एका स्टूलवर बसलो. खुप घामाघुम झालो होतो म्हणुन त्या वाद घालणा-या इसमाला पंखा लावायला सांगितला तर म्हणाला की आम्ही संध्याकाळी ५ नंतर पंखा लावत नाही. मी कारण विचारलं नाही, वादही घातला नाही. चुकुन मिळालंच तर बघावं म्हणुन पाणी मागितलं...

मी : जरा पाणी मिळेल का ?
तो : ए छोटु... जरा दोन स्पेशल कोकम सरबत घेऊन ये. (म्हणजे पाणी पण मिळणार नव्हतं तर...)
मी : आता तरी दुकान उघडं आहे का ?
तो : हे तुम्ही बाहेरुन विचारलं असतं तर 'हो' म्हणालो असतो, पण तुम्ही आत बसुन विचारता आहात. हे म्हणजे..
मी : मी तुमची माफी मागतो ह्या प्रश्नासाठी. पण मला लुंगी हवीये. दाखवता का ?
तो : आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो. लुंगीच कापड देऊ शकलो असतो पण त्याची किरकोळ विक्री आपण करत नाही. तागाच्या तागा तुम्हाला घ्यायला लागेल.
मी : मला काय सगळ्या सोसायटीला लुंग्या वाटायच्या नाहीयेत. आणि हे सांगितलं का नाही मला ?
तो : मग मी हे काय करतोय असं तुम्हाला वाटतय ?
मी : म्हणजे मगाशी का नाही सांगितलंत ?
तो : कधी ?
मी : मी आलो होतो तेंव्हा. १२.३० ला...
तो : तुम्ही ०१.०० वाजता आला होता !
मी : हं... तेच ते... तेंव्हा का नाही सांगितलंत ?
तो : कारण तेंव्हा तुम्ही माझं गि-हाईक नव्ह्ता. दिसेल त्याला "आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो." असं सांगत बसायचं का आम्ही ?
मी : दिसेल त्याला नाही पण निदान जो दुकानात येईल त्याला तरी ?
तो : मग सांगितलं की तुम्हाला आत्ता...
मी : आत्ता नाही हो... तेंव्हा...
तो : तेंव्हा ०१.०० वाजला होता...

मी गर्भगळीत होऊन बसुन राहिलो. मी पुन्हा एकदा वादविवादात हरलो होतो. पुन्हा एकदा पदरी निराशाच पडली होती. इतक्यात छोटु दोन कोकम सरबत घेऊन आला. मग त्या दोघांनी सरबत पिलं आणि....

...आणि मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.

दुकान नंबर ११
थोडा वेळ शांत डोळे मिटुन बसलो एका दुकाना बाहेर. मग उठलो आणि नविन जोमाने लुंगी शोधायला लागलो. शेवटी मला ते दुकान सापडलंच. तिथे लुंग्यांचा एक वेगळा सेक्शन होता. मी जाऊन उभा राहिलो तर त्या सेल्समननी मला तिन वेगवेगळ्या रंगांच्या, त्यातल्या प्रत्येकातल्या वेगवेगळ्या तीन डिझाईन्सच्या आणि त्यात वेगवेगळ्या तीन किमतीच्या अशा सुमारे २६-२७ लुंग्या दाखवल्या.
मला २ पसंत पडल्या आणि मी भाव विचारला तर तो म्हणाला की.....
"नववर्षाची सूट वजा करुन दोन लुंग्यांचे ९० रुपये." मी आनंदाने नाचुन पाकीटातुन ९० रुपये काढुन त्या दुकानदाराला दिले तर.....
......तर त्याच्या डोळ्यात पाणी ! मग तो भिकारी मला म्हणाला की "देव, तुमचं भलं करो. आज काल कोण देतय ९० रुपयांची भीक ? "
मी खडबडुन जागा झालो. अजुनही त्याच दुकानाबाहेर होतो. पण खुप उशीर झाला होता. फाटकी का होईना पण तो लुंगी घातलेला भिकारी दूर गेला होता.... माझे ९० रुपये घेऊन.

स्वप्न फुकट असतात हि गोष्ट आज खोटी निघाली. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं, लुंगी मिळाली नाही ह्याचा त्रास होत होता. आता एक शेवटचं दुकान बघायचं, नाहीतर 'ते' करायचंच असं ठरवलं.... त्यात खुप मोठी रिस्क होतीच पण आता प्रश्न इभ्रतीचा होता......


दुकान नंबर १२

मी रस्त्याच्या ह्या बाजुला होतो. ते कपड्यांचं शेवटचं दुकान त्या बाजुला होतं. मध्ये रस्ता आणि रस्त्यावर गाड्यांची, विक्रेत्यांची आणि माणसांची तुफान गर्दी... घड्याळात पावणेनऊ झाले होते म्हणजे अजुन १५ मिनिटांनी ते सगळे 'माणुस' असल्यामुळे जेवायला, झोपायला जाणार....
मी विजय दिनानाथ चौहानसारखं 'अग्निपथ अग्निपथ' असं म्हणत त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत शेवटी त्या दुकानापर्यंत पोहचलोच. तिथंच त्या दुकानाबाहेर पदपथावरुन त्या जोखमीच्या पण खुप कामाच्या वस्तुची खरेदी करुन आत शिरलो.

आयुष्याविषयी कमालीची विरक्ती वाटावी असे सगळ्यांचे चेहरे होते. कुणीही माझी दखल घ्यायला तयार नव्हते. मी आत गेलो. एकच प्रयत्न करावा आणि मगच 'ते' करावं असा विचार करुन काऊंटरवर जाऊन उभा राहिलो....

मी : मला लुंगी हवीये.
माणुस : उद्या या... आजची वेळ संपलीये.
मी : अहो पण ०८.५० झालेत आणि अजुन १० मिनिटं आहेत.
माणुस : हो... पण तो वेळ ह्या कपड्यांच्या घड्या घालायला लागतो. तुम्ही मदत केलीत तर ३ मिनिटात होईल आणि मग ७ मिनिटं उरतील.

मी घड्या घालायला घेतल्या. किती वेळ घालत होतो कुणास ठाउक पण तो माणुस म्हणाला, आता बास करा. ०९.०० वाजले. बाकीच्या घड्या उद्या करु.

आता मात्र माझी सहनशक्ती संपली. माझ्या संतापाचा ज्वालामुखी फुटला आणि मी तांडव करत माझे तिसरे नेत्र उघडले. 'ते' करण्याची वेळ आलीच होती.... रौद्रावतारात नृत्य करत मी दुकानाचे शटर खाली ओढले आणि नुकताच विकत घेतलेली ती जोखमीची पण खुप कामाची वस्तु बाहेर काढली.

.....................तो एक कोयता होता...!

चटकन उडी मारुन मी काऊंटरच्या पलिकडे गेलो आणि तो कोयता मालकांच्या मानेवर ठेवला.... आणि गरजलो...

" हरामखोरांनो.... किती छळणार रे नराधमांनो...? बास आता... खुप झालं. गुपचुप एका रांगेत कान धरुन उभं रहा नाहीतर तुमच्या मालकाचा गळा कापुन ठेवेन. मालक, खबरदार जर पैसे बाहेर काढाल तर... आत टाका सगळे पैसे नाहीतर हिशोबाची वही फाडुन टाकीन तुमची..."

(मग मालकाला एक गुद्दा घालुन त्यालाही त्या कामगारात उभा केला. अजुन माझा राग शांत झाला नव्हता...)

" काय समजता तुम्ही मला.... ? एमएसईबीची बीलं वाटणारा शिपाई ? नालायकांनो... गि-हाईक म्हणजे मातापिता. पण त्यांच्यासमोर एकेकटे कोकम पिता तुम्ही ? १ नंतर दुकान बंद ठेवता.... ५ नंतर पंखा बंद ठेवता होय.... एका लुंगीसाठी १२-१२ दुकानं फिरवता काय मला ? १२ उठाबशा काढा आणि स्वतःभोवती १२ वेळा फिरा...."

(कोयत्याच्या भितीनी कामगारांनी पटापटा तसं केलंही पण मालकांना एकही उठाबशी निट काढता येईना.. म्हणुन शेवटच्या ९ उठाबश्यांना मी सूट दिली आणि फे-या वाढवल्या.. अर्थात त्यानंतर सगळे पडलेच होते. पण मी उभाच होतो... त्वेषात... जोशात...)

" गलिच्छ माणसांनो... तुमच्या जन्माच्या वेळेस त्या नर्सनी आंघोळ घातल्यानंतर कधी कान धुतला होता का नाही तुम्ही? त्या तुमच्या घाणेंद्रियात गोम कशी घुसत नाही ? लाज वाटली पाहिजे तुम्हाला दुपारी झोपताना... आणि खबरदार जर बायकोला मराठी येत नसताना दुकानात बसवाल तर.... ड्रम मध्ये कोंबुन मारेन... केरसुणीने झोडपेन.... सतरंजीसकट धुवुन काढेन तुम्हाला.... अरे... अंडरवेअर आणि शेरवीनी ठेवता येते तुम्हाला पण लुंगी नाही काय... भामट्यांनो.... "

(माझ्या वेडेपणाची झांक मला त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. गुंडांपेक्षा लोक वेड्यांना जास्त घाबरतात हि नविनच माहिती मला कळाली. हळुहळु माझ्या रागाची जागा दुःखानी घेतली आणि माझ्या हातातला तो कोयता गळुन पडला. मग डोळ्यातुन आसवं गळायला लागली..... )

"...भिकारी समजता तुम्ही आम्हाला.... १२.५५ दुकान बंद करता आणि एक वाजलाय म्हणता.... एकेकटे कोकम पिता..... गुटखा खाऊन तोंडावर उडवता.... "

मला लहान मुलासारखं रडताना पाहुन सगळे माझ्याभोवती गोळा झाले. एकानी मला पाणी दिलं. मालक माझ्या पाठीवरुन हात फिरवयला लागले. त्यांनाच मिठी मारुन बराच रडल्यावर त्यांनी हातात एक गिफ्ट पॅक केलेली पिशवी ठेवली.

"लुंगी आहे....!" - ते म्हणाले.

माझा विश्वासच बसेना. त्यांचे आभार मानुन मी तडक घराकडे पळत सुटलो आणि घरी आल्यावर ते पॅकेट उघडुन लुंगी पाहिली. तीच ती....
' आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर आजारी मांजर ओकलेली '

...हल्ली कुठं लुंगी दिसली की मी किंचाळत डोंगराकडे पळत जातो आणि चार-चार दिवस येत नाही. तिथं इतकं शांत वाटतं की इकडे यावंसं वाटतंच नाही. तिथे कायमचं सेटल व्हायचा विचार करतोय....

..........तसंही तिथं वल्कलं विकत घ्यायला लागत नाहीत....!

धुंद रवी.
dhundravi.multiply.com

गुलमोहर: 

Rofl Rofl Rofl इतक्या जोरात खदाखदा हसल्याचा आवाज ऐकून शेजारी सुद्धा धावत आले असते पहायला.. ई..तोंड आणी पोट जाम दुखायला लागलं हसून हसून..

आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर आजारी मांजर ओकलेली ' >>

Rofl Rofl Rofl Rofl

Rofl Rofl Rofl Rofl Rofl

एकदम फाइव्ह स्टार कॉमेडी.
एवढ वेड्यासारख मायबोलीवर फक्त दोघांचच लिखाण ऐकुन हसलोय.
एक त्या दादच विनोदि लिखाण आणि दुसर विनोदि तुझ लिखाण.

Rofl __/\__ Rofl

एक नंबर..:) हे वेड आहे..:)
>> दुकानाचे मालक "ए हाड...." असं जोरात ओरडले
आता मला कळलं कुलुंगी कुत्रं असं का म्हणतात ..:)

रव्या, येड्या कसला पेशन्स आहे रे तुझ्याकडे...!
त्यापेक्षा बायकोची एखादी कॊटनची साडी फ़ाडायची नाहीस. तीन तीन लुंग्या झाल्या असत्या. वर पुण्याच्या दुकानदारांना सहन करण्यापेक्षा बायको परवडली. Wink

आता मी तरी काय बोलू.. नविन वर्षाचा आजचा दिवस सार्थकि लागला...
ते हसण्याचे चिन्ह कसे द्यावे सांगाल का ...

<<गलिच्छ माणसांनो... तुमच्या जन्माच्या वेळेस त्या नर्सनी आंघोळ घातल्यानंतर कधी कान धुतला होता का नाही तुम्ही? त्या तुमच्या घाणेंद्रियात गोम कशी घुसत नाही ? लाज वाटली पाहिजे तुम्हाला दुपारी झोपताना... आणि खबरदार जर बायकोला मराठी येत नसताना दुकानात बसवाल तर.... ड्रम मध्ये कोंबुन मारेन... केरसुणीने झोडपेन.... सतरंजीसकट धुवुन काढेन तुम्हाला.... अरे... अंडरवेअर आणि शेरवीनी ठेवता येते तुम्हाला पण लुंगी नाही काय... भामट्यांनो.... ">> काय हे हसून हसून पुरी वाट..

रवी पावणं , अक्षी झ्याक लिवलया बगा , हसुन हसुन पार मुरकुंडी वळायची पाळी आणलीयसा रावं Rofl

रवी Rofl
<<< भाभी, मला एक लुंगी हवीये. >>>
<<< भाभी, आपका मिस्टर बाहेर गया है क्या..? ये दुकान मे कोई दुसरा मर्द वगैरा नही है क्या..? आप अकेले हो क्या ? >>> रवी ,प्रसंग जसाच्या तसा नजरेसमोर उभा राहीला , नशीब नंतर मुघल धोपटला नव्हता Lol

>दोघं जण गालाला गाल लाऊन आणि तिसरा त्यांच्या डोक्याला गाल लाऊन असे बसले-उभे होते.
>मोर
>कुठे बांधणार?
...
...
एकापेक्षा एक भारी! लय भारी बघा!

@ह.ह.पु.वा.
शुभेच्छा!!

Lol
रवी सही ..असल्या भन्नाट आयडीया तुला कश्या सुचतात...
तो दुकान क्र. ५ वाला संवाद एकाम खतरा. मायबोलीवरच्या बर्‍याच बीबी वर असा संवाद झडतो आणि मग तो बीबी नंतर बंद पडतो.

Pages