मला भेटलेला कसाब आणि त्याची बुलेट …..!

Submitted by वरुण on 1 January, 2010 - 01:29

मला भेटलेला कसाब आणि त्याची बुलेट …..!

An experience by-

डॉ.वरुण रानडे , चिंचवड, पुणे.

indiafivestar@gmail.com

या 25 डिसेंबर ची कडाक्याच्या थंडीची सकाळ......सलग 3 दिवस सुटी असल्याने चिंचवडहून घरी, म्हणजेच सातारला जायला निघालो होतो. नेहमीप्रमाणे लवकर न उठता त्या दिवशी सकाळी उशिरा म्हणजे 8.30 ला उठलो होतो. मग पटापट आवरून Sack मध्ये कपडे नि पुस्तके भरली . ९.00 च्या आसपास बाईक ला किक मारली नि बायपास हायवेने निघालो. नुकताच ढाक – बहिरी किल्ला, कामशेत अशी बाईकने रपेट झालेली असल्याने पेट्रोल केव्हाचे रिझर्वला आले होते. हे माहीतही होते, परंतु निघताना पहिल्यांदा पेट्रोल भरण्याऐवजी सुसाट घरी निघालो. नेहमी घरी जाताना मी नवीन कात्रज बोगद्यापलीकडील शिंदेवाडी जवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतो. कारण तसे काही खास नाही फक्त तो कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असल्याने तेवढेच 2 – 5 रुपये वाचतात ..!

बाईकवरून जसा मी आंबेगावच्या घाटात आलो तसा मनात एक विचार चमकून गेला कि जर का आत्ता पेट्रोल संपले तर….........नाही तिथे, नाही तेव्हा, काटकसर करण्याची काही गरज आहे का......? पण कानातील Hands -Free वरील Red FM ची गाणी, सुसाट वेग आणि उबदार उन यामध्ये तो विचार विरूनही गेला. निसर्गाचे सुंदर रूप पहात मी पुढे निघालो. कात्रज नवीन बोगदा क्रॉससुद्धा केला पण ..... पण पुढे लगेच्याच फ्लाय ओव्हरवर गाडीने पेट्रोल संपल्याचा निषेधयुक्त आवाज काढत राजीनामा दिला .....! मग गाडी रस्त्याच्या कडेने नेत जिथे बंद पडली तिथे उतरलो.

गाडी घेतल्यापासून 3 वर्षात कधीही गाडी ढकलण्याचा प्रसंग आलेला नव्हता पण आज कदाचित माझा नंबर लागला होता. मी गाडी तिरकी करून, मग चोक देवून प्रयत्न केले, परंतु ते सारे व्यर्थ होते. तिथेच समोर एक बोर्ड पहिला ' पेट्रोल 4 किमी अहेड ' . मग 4 किमी गाडी ढकलण्याचे मनोधैर्य करून गाडी ढकलायला लागलो. पुढेच उतार लागला, म्हटले छान .... उतार असल्याने गाडीवर बसूनच जावू... नुकताच गाडीने वेग घेतला होता.

इतक्यात एका माणसाने मला हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला. 28-30 वर्षाचा तो उंचापुरा गोरापान माणूस पत्नी बरोबर रस्त्याच्याकडेला ENFIELD BULLET लावून उभा होता. मी मनात म्हटले आता काय... ????. कसाबसा गाडीने उतारावर नुकताच वेग घेतलाय, नि हा मला थांबवतोय..! एक क्षण वाटले कि याचेही पेट्रोल संपलेले दिसतेय . ( एकादशीच्या घरी शिवरात्र….! ) पण ब्रेक लावून मीही गाडी बाजूला घेतली …. म्हटले काहीतरी मदत हवी असेल नाहीतर रस्ता चुकलेला असेल….. तर करूयात मदत....

तोही हेल्मेट मध्ये आणि मीही हेल्मेट मध्ये, त्यातून माझ्या कानात Hands- Free आणि गाणी. काही ऐकू येत नव्हते. मी खुणेनेच विचारले " काय ?" त्याने मग मोठ्या आवाजात अस्खलित मराठीत विचारले, " पेट्रोल हवे आहे का ? " मला काही कळेना...पोटात खरेतर आनंदाच्या उकळ्या फुटल्या पण क्षणभर वाटले मी स्वप्नात तर नाही ना ..? तोवर आम्हा दोघानीही हेल्मेट आणि इतर आयुधे ! उतरवली होती... मी म्हणालो, " होय ! पेट्रोल संपलाय...! " क्षणाचाही विलंब न लावता त्याने बुलेटच्या डिक्कीमधून पेट्रोलचा पाईप नि बाटली काढली. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न सहजता, त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद नि त्याच्याविषयीचे कौतुक मला थक्क करत होतं.... इतक्यात त्याने तो पाईप त्याच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत घातला....तोंडाने हवा भरून झटकन सायफन सुरु केले नि बाटलीत पेट्रोल काढू लागला. मी म्हणालो, " 100 – 200 ml पुरे झाले कारण पुढे चारच किमी वर पेट्रोल पंप आहे." पण त्याने अर्धा लिटरहूनही जास्त पेट्रोल काढून दिले. आणि वरून मलाच म्हणतोय " किती लांब जावे लागेल नक्की माहित नाही, तेव्हा असू देत !" जो प्रसंग माझ्याबरोबर घडत होता, खरे तर माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. मग त्याने दिलेले पेट्रोल मी माझ्या गाडीत भरले नि टाकीचे झाकण बंद करता- करता त्याला म्हटले, "साहेब अगदी देवदूतासारखे भेटलात. तुमच्या उपकाराची परतफेड कशी करू? म्हणजे याबद्दल तुम्ही पैसे घेणार, कि पुढे जावून तुम्हाला पेट्रोल परत देवू ? "

तो म्हणाला " मीही बुलेट वरून खूप फिरलोय आणि अजूनही फिरतो. पेट्रोल संपलेली गाडी ढकलणे किती त्रासदायक आसते ते मला माहिती आहे. माझ्याही बाबतीत असे बरेचदा होते. म्हणून मी हि पाईप आणि बाटली बरोबर घेवूनच फिरतो. गरजेच्या वेळी मलाही काहींनी मदत केली आहे तर काहींनी नाही केली . त्यामुळे मी जे पेट्रोल तुला दिले आहे ते माझे नव्हेच … मलाही ते अडचणीच्या वेळी कुणीतरी दिलेले आहे, ते मी तुला दिले. बस्स इतकेच .... " तो पुढे म्हणाला, "आता परतफेड करायची असल्यास, असा कोणी रस्त्याने जाताना पेट्रोल संपल्यामुळे गाडी ढकलताना दिसला तर त्याला असेच पेट्रोल देवून टाक म्हणजे झाले ....!" त्याचे विचार ऐकून मी कोलमडण्याच्या बेतात होतो.... खरेतर त्याचे पाय धरावेसे वाटत होते. मग त्याला विचारले, " साहेब ,तुम्ही कुठे राहता ,तुमचे नाव काय ? "

" मी पुण्यातच राहतो. माझे नाव अरुंदल. पण आडनाव विचारू नका, कारण ऐकलत तर घाबराल..!" तो मिश्किलपणे म्हणाला. मला वाटले, 'वाघ' नाही तर 'वाघमारे' असे काहीतरी सांगेल. पण पुन्हा विचारले तसा तो म्हणाला, " कसाब ". मग आम्ही तिघेही अर्थपूर्ण आणि मनमुराद हसलो. 'तो' आणि 'ती' पटकन बुलेटवर बसले. किक मारून हात हेलावून दिसेनासे झाले.

मी मात्र स्तंभित अवस्थेत तिथेच उभा होतो. कलियुगातही उरलेला निस्वार्थ चांगुलपणा मला एका कसाबच्याच रूपाने अनुभवायला मिळाला. मनात आले 26/11 च्या घटनेस जबाबदार क्रूरकर्म्याचे नावही कसाब आणि 25/12 च्या नाताळच्या दिवशी माझ्या सुखद अनुभवास कारण बनलेल्या देवदूताचे नावही कसाबच ... केवळ नावातच साम्य नव्हे, तर अजूनही योगायोग म्हणजे दोघांकडेही " बुलेट " होती. परंतु वेगळेपण होते ते........... ती चालवणार्याच्या मानसिकतेत !

An experience by-

डॉ.वरुण रानडे,चिंचवड,पुणे

indiafivestar@gmail.com

गुलमोहर: 

माणसंच पण माणसातील माणुसकी किती वेगवेगळ्या प्रकारची असते, ते या प्रसंगातुन दिसुन आलं.. या कसाबने खुप छान धडा घालुन दिला. अडचणीच्या वेळी यमरुपी कसाब च्या ऐवजी देवतारुपी कसाब दिसुन आला.. छान अनुभव Happy

पेट्रोल संपलेली गाडी ढकलणे किती त्रासदायक आसते ते मला माहिती आहे. माझ्याही बाबतीत असे बरेचदा होते. म्हणून मी हि पाईप आणि बाटली बरोबर घेवूनच फिरतो. गरजेच्या वेळी मलाही काहींनी मदत केली आहे तर काहींनी नाही केली . त्यामुळे मी जे पेट्रोल तुला दिले आहे ते माझे नव्हेच … मलाही ते अडचणीच्या वेळी कुणीतरी दिलेले आहे, ते मी तुला दिले. बस्स इतकेच ....
========================================
माझ्याही बाबतीत असे बरेचदा होते. Happy
गरजेच्या वेळी मलाही काहींनी मदत केली आहे.

छान लिहिलेय अगदी प्रसंग जसाच्या तसा लिहिलात....
१५ दिवसांपुर्वीची गोष्ट, शिर्डीवरुन परत येताना २-३ वेळा मध्ये गुरुद्वारा लागला. मी आईल २-३ वेळ दाखवुन हा बघ गुरुद्वारा असे म्हणुन पाय पडले... आई बोलली सरदारनी झालीस का गं ?? सारखे आपले गुरुद्वरा दाखवत आहेस? मी बोलले "धर्म कधीच वाईट नसतो, त्या धर्मातली माणसं वाईट असतात.." बस्सं तिच एकदम भरुन आले...

वरूणजी ! नमस्कार
नवीन वर्षाच्या सुभेछ्या.
छान लिहिलत. मी गाडी ढकलत नेण अनुभवल आहे. अशा वेळी मदत करणारा हा देवदूतच असतो.

"कलियुगातही उरलेला निस्वार्थ चांगुलपणा "
""दोघांकडेही " बुलेट " होती. परंतु वेगळेपण होते ते........... ती चालवणार्याच्या मानसिकतेत !""
"त्यामुळे मी जे पेट्रोल तुला दिले आहे ते माझे नव्हेच …"
वा!

केवळ नावातच साम्य नव्हे, तर अजूनही योगायोग म्हणजे दोघांकडेही " बुलेट " होती. परंतु वेगळेपण होते ते........... ती चालवणार्याच्या मानसिकतेत ! >>>> केवळ अप्रतिम Happy

केवळ नावातच साम्य नव्हे, तर अजूनही योगायोग म्हणजे दोघांकडेही " बुलेट " होती. परंतु वेगळेपण होते ते........... ती चालवणार्याच्या मानसिकतेत ! >>>> खूप छान

वा मस्त लिहिलाय अनुभव..

सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त रंजक(?) असते असे महणतात......
जनावरे मारणार्‍याला कसाब म्हणतात, अन मुंबईमध्ये माणसांना जनावरांपेक्षा ही निर्दयतेने मारणार्याचे नावही कसाब असावे? काय हा योगायोग! Sad

जनावरे मारणार्‍याला कसाब म्हणतात, अन मुंबईमध्ये माणसांना जनावरांपेक्षा ही निर्दयतेने मारणार्याचे नावही कसाब असावे? काय हा योगायोग!
<<< कसाब आणि 'कसाई' चा एकच अर्थ आहे का ?

हो

केवळ नावातच साम्य नव्हे, तर अजूनही योगायोग म्हणजे दोघांकडेही " बुलेट " होती. परंतु वेगळेपण होते ते........... ती चालवणार्याच्या मानसिकतेत ! >>>>>> मस्त लिहिलंय ....