माझे २०१० साठीचे १४ संकल्प... कारणांसहित...

Submitted by धुंद रवी on 31 December, 2009 - 15:32

मित्र मैत्रीणींनो
माझे २०१० साठीचे १४ संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.

संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
अ. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?
ब. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
क. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ...........................................................
.................................................................................. .
.............................................. .....................
.......................... ...........................असो.... !

संकल्प २. - बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
अ. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
.............................असो.... !

संकल्प ३. - खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
अ. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................असो.... !

संकल्प ४. - दारु पिणार नाही.
कारण -
अ. - तोल जातो.
ब. - पैसे जातात
क. - चव जाते.
ड. - शुद्ध जाते.
ई. - दृष्टी जाते.
फ. - मजा जाते.
ग. - इज्जत जाते.

संकल्प ५. - तमाशा बघणार नाही.
कारण -
अ. - रंभा घायाळकर प्रकरण..... http://www.maayboli.com/node/12770
ब. - पुन्हा रंभा घायाळकर प्रकरण..... http://www.maayboli.com/node/12887

संकल्प ६. - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
अ. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
ब. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....

संकल्प ७. - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
अ. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
ब. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं.
क. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
ड. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
.............................असो.... !

संकल्प ८. - लांबच्या प्रवासात केळी नेणार नाही.
कारण -
अ. - घाटात केळ्याचा असह्य्य वास सुटतो. मळमळतं. कधीकधी ओकारी होते..... ब-याचदा ओकारी होते.... नेहमीच ओकारी होते.
ब. - केळी चुकुन सामानाखाली गेल्यास पिशवीतच शिकरण होतं.
क. - केळीमुळे पोट गच्च होतं.
ड. - केळीचे करपट ढेकर खुप....
.............................असो.... !

संकल्प ९. - घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
अ. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
ब. - १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !! )
क. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.

संकल्प १०. - योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण -
अ. - योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो.... बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा...... असो...
ब. - व्यायाम केला की खुप थकायला होतं.... गळुन जायला होतं.... चक्कर येते..... आजारी पडायला होतं. तब्येत बिघडते.
क. - इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी.....
.............................असो.... !

संकल्प ११. - हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण -
अ. - डीप्रेशन येतं....
ब. - बीपी वाढतं....
क. - डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
ड. - जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
ई. - कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
फ. - भयानक स्वप्न पडतात. भास होतात...
ग. - पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं...

संकल्प १२. - वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण -
अ. - मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
ब. - झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, "वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत" अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
क. - परवा मी १०५ रुपयाचा उसाचा रस प्यायला. आता पी वन...पी टु... बघायचं ठरवलय.
ड. - घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला....
.............................असो.... !

संकल्प १३. - ऑफिसमध्ये साहित्यलेखन करणार नाही. विशेषतः मायबोलीवर टाकायचे विनोदी लेखन....
कारण -
अ. - त्या प्रसुति वेदना होत असतानाच्या कळा ऑफिसात देता येत नाहित.
ब. - वेगवेगळ्या पात्रांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्याकडे तटस्थपणे पाहताना... हसताना विचित्र आवाज येतो. बाकीचे लोक 'काय यडं आहे' अशा नजरेने बघतात.
क. - काही लिहुन झालं की समोरच्याला वाचुन दाखवावसं वाटतं. एकदा समोर क्लायंट होता आणि एकदा बॉस..... (प्रतिसाद म्हणुन मेमो मिळाला....!)
ड. - मायबोलीवरच्या मित्र-मैत्रीणींचे झकास प्रतिसाद वाचले की तिथेच बॉसच्या तोंडावर राजीनामा मारावासा वाटतो....

आणि सगळ्यात महत्वाचा संकल्प....

संकल्प १४. - मायबोलीवरचे इतर मित्र-मैत्रीणींचे लेख सिरीयसली घेणार नाही.
कारण -

अ. - अश्विनीमामींचा लेख वाचुन एक कुत्री घरी आणली. जाम धुडगुस घातला तिनी... काय तिला इंजक्शन वैगेरे देणार, तिच मला चावली आणि मलाच घ्यायला लागली इंजक्शन्स.... तिनी कपडे फाडले.. बुट खाल्ले.... नखं मारली आणि भरीत भर अजुन पिलावल वाढवली... शिवाय तिच्यामुळे गल्लीतली बरीच कुत्री माझ्यावर डुख धरुन आहेत...

ब. -

क. - 'मी केलेला वेंधळेपणा' हा लेख वाचुन वाचुन जो वेंधळेपणा मी करत नव्हतो तो करायला लागलोय. अजुन थोड्या दिवसांनी फक्त माझ्या वेंधळेपणाचा एका धागा चालु करायला लागेल.

ड. - नानबाचं 'वाचुन तर पहा काय असतं हे थायारॉईड प्रकरण' हा लेख वाचला आणि पुढील त्रास होताहेत असं सारखं वाटतं. - १. थकवा २. एनर्जी, उत्साहाचा अभाव ३. नैराश्य ४. अवाजवी व सतत होणारी वजनवाढ ५. कोरडी त्वचा ६. चेहरा सुजणे ७. कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढणे ८. स्नायू दुखणे, आखडणे ९. सांधेदुखी १०. प्रचंड झोप येणे.

ई. - डॉ.शीतल ह्यांची 'स्त्रीत्व' ही प्रकाशचित्र पाहिली आणि मी पण बायकांचे फोटो काढायला एका गावात कॅमेरा घेउन गेलो. चेह-यावर एकदम नैसर्गिक भाव मिळावेत म्हणुन त्यांना न सांगता फोटो काढले आणि........... असो....

फ. - रुनी पॉटरचं 'मातीचे प्रयोग' वाचुन एक चाक आणालं आणि भांडी करायचा प्रयत्न केला. अमुर्त आकाराची अनावृत्त भांडी तयार झाली. अनन्यसाधारण राडा झाला घरात. मग ती सगळी माती आणि शिल्पं एका कुंभराला २०० रुपयात विकली. (खुप चांगला होता तो कुंभार.... २०० च घेतले त्यानी, नाहीतर सगळे ५०० च्यावर मागत होते.)

ग. - बी चं 'ताडी आणि नीरा' हा लेख वाचला आणि प्यायलो ताडी. पण त्यात त्यानी नर झाड आणि मादी झाड कसं ओळखायचं हे दिलं नाहिये. त्यामुळे बहुतेक मादी झाडाची प्यायली आणि मग.... काय माहिती पुढं काय झालं. पण बरिचशी लोकं हल्ली ओळख देत नाहीत. जागोमोहनप्यारेचं ऐकलं की ताडीच्या झाडाखाली बसून ताक पिऊ नये अशी म्हण आहे. ( कारण लोक ताडीचाच संशय घेतात. चांगली वस्तू वाईट स्थळी असली तरी लोक तिला वाईट म्हणतात, असा अर्थ.) मग मी ताकाच्या दुकानाबाहेर बसुन ताडी प्यायली पण तरिही लोकांना काय पितोय ते कळालंच....

ह. - 'असंबद्ध गप्पा' ह्या लेखानी तर माझी मतीच गुंग केली आहे. काल बायकोनी विचारलं की जेवायला काय करु तर म्हणालो की माका पवूक येणां नाय गो, माका मॉप आवडता पवूक, भागो तुका जमात काय गो पवूक? खंय पवतंस तू? टँकात, नदित, तलावात्... ?

य. असे आणखी सुमारे १५ लेख ज्यांवर सविस्तरच लिहायला लागेल.... ............असो.... !

मायबोलीकरांनो, तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठिशी असतील तरच हे संकल्प पुर्ण होतील...

तुमचाच...
धुंद रवी.

गुलमोहर: 

संकल्प १४.* - ह्या संकल्पात उल्लेख केल्या गेलेल्या मित्र-मैत्रीणींची खिल्ली उडवायचा माझा उद्देश नाही. खरं तर मी स्वतःचीच खिल्ली उडवली आहे. मायबोलीवरच्या मित्र-मैत्रीणींचे सदरचे सर्व लेख हे खरच सुंदर असुन त्यांच्याविषयी चेष्टा करणे माझ्या मनातही येणार नाही.

तरी चुकुन मी कुणाला दुखावले असल्यास किंवा कुणाचाही आक्षेप असल्यास कृपया तसे कळवावे, मी लगेच सदरचा उल्लेख माझ्या लेखातुन वगळुन टाकेन.

कुणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या लेखांचा उल्लेख केल्यामुळे क्षमस्व... !

तुमच्यातलाच एक मायबोलीकर...
धुंद रवी.

रवी Lol
आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !! >>> ह्या पितळ्यांचं काय करावं .
समस्त मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा .
रवी आम्हाला तुझं विनोदी लेखन असचं वाचायला मिळो .

संकल्प क्रमांक १,२,६,९,१०,१२,१३ आणि १४ विशेष आवडले ... तडीला जाणं जरा कठीणच वाटतं Wink

क. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.
>>>>>>>>> मस्त झाली नविन वर्षाची सुरुवात Lol

अरे कोणीतरी त्या पल्लवी जोशीला माझा निरोप द्या रे.
कोणाच्याही 'स्म्रुतीमधे' नाही तर 'स्म्रुतीनिमित्त' टाळ्या वाजवून घे ग बाई.
हिन्दीचा प्रभाव कधी नाहीसा होणार देवा?

ह. - 'असंबद्ध गप्पा' ह्या लेखानी तर माझी मतीच गुंग केली आहे. काल बायकोनी विचारलं की जेवायला काय करु तर म्हणालो की माका पवूक येणां नाय गो, माका मॉप आवडता पवूक, भागो तुका जमात काय गो पवूक? खंय पवतंस तू? टँकात, नदित, तलावात्... ?>>>>

मग बायकोने कसली धुंदी चढलीय ते विचारलं का नाही?

रवी, लिहीत रहा बाबा, आपले विनोद सगळ्यानांच आवडतील असं नस्तं. (हे मी सिरीयसली लिहीतोय, टोमणे मारायला नाही) कारण वाचणारा कुठच्या मनस्थितीत असतो हे आपल्याला लिहीताना थोडच माहिती असत ?

कुणीसं म्हंटलय ते खरय "शब्दावरची लेखकाची मालकी फक्त लिहून होण्यापुर्वीच असते" कारण वाचणारा त्याचा कसा अर्थ घेईल हे वाचणार्यावर अवलंबून असेल...

सही!!!

मीही एक संकल्प केलाय
धुंद रवी यांचे लेख ऑफिसात आजीबात वाचायचे नाही !!
कारणं अनेक आहेत..पण महत्वाची सांगतीये
अ. ऑफिसमधे अफाट विनोदी गोष्टीवर मनमोकळं हसता येत नाही. हसण्यावर कर लावल्यासारखं हसावं लागतं. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !! )
>>>ऑफिस मधे वाचत होते आणि जोरजोरात हसु आलं..नशीब लंच टाईम ...लोकांचं लक्ष फक्त जेवणाकडे होतं Proud
ब.देशी दारु चे दुकान आणि रंभा घायाळकर सारखे लेख वाचण्यासाठी मन पुन्हा पुन्हा शिवशिवतं..वेळ आणि स्थाळाचं भान न ठेवता.

as usual अप्रतीम !!

य. असे आणखी सुमारे १५ लेख ज्यांवर सविस्तरच लिहायला लागेल.... ............असो.... >>>>
Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy Happy
==========================
येऊ द्या की पार्ट २ ... अगदी सविस्तर ...

Happy मस्तच !!

रवी तुमचा १३ नं चा संकल्प पूरा न होवो. Happy जेव्हा सुचेल तेव्हा लगेच लिहित रहा. आम्हाला लवकर लवकर वाचायला मिळेल.

Happy

मी पण एक संकल्प केला आहे ऑफिसात विनोदि लेख वाचनार नाही कारण नॉन
मराठी लोकाना मी का हसलो हे समजुन नाही सान्गु शकत

ती लोक कधीच असे लेख वाचुन हसत नाहीत. (कदाचीत कधीच हसत नाहीत ... )
बिच्यार्यान्कडे मायबोली सारखे काहीच नसते
(they all kind of feel jealous including all americans I work with, since I am only maharashtrian in my team of two indians and 5 americans Proud )

Pages