नसलेल्या मुलीची गोष्ट
18 जून 1997
शिंदेवाडीतून 13 - 14 वर्षाची श्यामला धावत धावत हुपरीत आली. पुनामियांची अश्विनी तिची वाट पाहत दारात उभी होती. अश्विनीला सर्वजण बबली असे म्हणत असे. अश्विनी आणि शामला एकाच वर्गात होत्या आणि दोघींची फार बिगारीपासून घट्ट मैत्री होती. शामला हुपरी पासून तीन - चार किलोमीटर अंतरावर राहायची. दोघीही सातवीतुन आठवीच्या वर्गात गेल्या होत्या. श्यामला सतत बबलीच्या घरी असायची. दोघीही दिसायला एकसारख्याच होत्या. पुनामियां यांच्या घरी कोणी आलं तर, बिनधास्तपणे सांगायचे मला दोन जुळ्या मुली आहेत. पुनामियां यांचे कुटुंब तसं छोटं होतं. मोठा जयेश हा बी इ ला तिसऱ्या वर्षात होता दुसरा राजेश हा आत्ताच दहावीत गेला होता. सतत बबली च्या घरात राहिल्यामुळे, शामलाला गुजराती पदार्थ आणि गुजराती वागणूक हे अंगवळणी पडले होते बबलीची आई कित्येक वेळा तिला घरच्यांना खायला म्हणून डबे भरून देई.
शामलाचं कुटुंबही तसं लहानच होतं. आई, बाबा, एक भाऊ शरद, बहिण शारदा आणि श्यामला. त्यांची चार-पाच एकर शेती होती आणि घरदार सुखवस्तु होतं. शरदने बारावी झाल्यावर शेतातच लक्ष घालायचं ठरवलं आणि शारदाने दहावी झाल्यानंतर शाळा सोडली. शामलाला शिक्षणात फारच गती होती आणि दरवर्षी तिचा नंबर पहिल्या तीन मध्ये असायचा. त्यांच्या घरी मांसाहार चालत असल्याने ती पुनामियांच्या घरी तसे पदार्थ नेऊ शकत नसे.
नेहमीप्रमाणे राजेश, शामला आणि बबली शाळेत जायला निघाले, इतके दिवस दोघीच जायच्या कारण त्यांची शाळा सकाळची असायची तर, राजेशची शाळा दुपारची. मुलं मोठी होत होती. शामला अडचणीच्या वेळी बिनधास्त बबलीच्या घरी राहायची. अर्थात तिला घरून काहीच अडचण नव्हती. बबली आणि शामला दोघीही दहावी पास झाल्या आणि दोघींनी अकरावी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तोपर्यंत, राजेशने बारावी करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवले होते. कॉलेज अर्थातच कोल्हापूरला होते परंतु तो कोल्हापूरला न राहता हुपरीवरूनच अप डाऊन करायचा.
हुपरी मे २०००.
जयेश बी इ झाला होता आणि त्याच्या करता इंदोर होऊन मुलगी सांगून आली होती. सर्व गोष्टी ठरल्यानंतर लग्न इंदोरलाच करायचं ठरलं. वऱ्हाडी मंडळी घरच्या माणसांबरोबर शामला तिचे वडील रामराव आणि आई सीताबाई हेही होते. एका मोठ्या बसने सर्व वरात इंदोरला गेली. त्यांचा राजेशाही सत्कार झाला. शामलाला पण बहुतेक लोक बबलीची जुळी बहीण समजत होते आणि लग्नात बबलीचा आणि तिचा सारखाच मानपान झाला. रामराव आणि सीताबाईंनाही रेशमी कपडे आणि खऱ्या मोत्यांच्या माळा मिळाल्या. सगळा आदरसत्कार पाहून शामलाचे आई-वडील दिपूनच गेले. लग्न आटोपल्यावर परत येताना, राजेशच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली. राजेश आणि शामलाचे लग्न होणार अशी बऱ्याच जणांची कल्पना होती आणि अर्थातच ते खरे ही होते. बरीच वर्षे एकमेकांच्या जवळ असल्याने दोघांचेही नाते जुळण्यात जमा होते. पुनामिया यांच्या घरी काही अडचण नव्हती. बबलीची आई तर कुणालाही सांगायची, एक मुलगी पाठवली तर दुसरी करणार. शामलाच्या घरी अजून जुनाट कल्पना होत्या आणि रामरावांना एकंदर लग्नाला झालेला आदरसत्कार पाहिल्यावर आपल्याला देणंघेणं जमणार नाही. उगीचच उंटाचा मुका घ्यायला कशाला जावे असा विचार होता. त्यातून बारावी झाल्यानंतर शामलाच लग्न उरकायचे आणि तेही शक्यतो आपल्या समाजात आणि परवडेल अशा घरात. त्यांच्या अपेक्षा फार कमी होत्या मुलीच्या घरी शेती हवी, मुलगा नोकरीत हवा आणि त्याला पगार चांगला मिळायला हवा. शामलाला किंवा राजेशला या बेताचा पत्ताच नव्हता. त्यांचे स्वतःचे मनोराज्य सुरू होत.
नोव्हेंबर 2001
श्यामला बी ए च्या दुसऱ्या वर्षात बी ए इतिहास करत होती. मध्यस्थ तिच्या घरी वेगवेगळी स्थळ घेऊन येत होते. परंतु कोणीच शेती, शिक्षण, नोकरी या चौकटीत बसत नव्हता. शेवटी एकाने कुमठे गावच्या बाबू कसबे नावाच्या तरुणाचे स्थळ आणले. मुलाच्या घरी सात- आठ एकर शेती होती. मुलगा एकुलता एक होता. त्याला एका खाजगी ऑफिसमध्ये नोकरी होती आणि त्याला 5000 पगार होता. मुलाचे वय थोडे जास्त म्हणजेच 32 होते. त्यांना वधू कडून दोन्हीकडच्या लग्नाचा खर्च आणि एक लाख रुपयांचे मुलीच्या अंगावर दागिने किंवा एक लाख हुंडा असे हवे होते. सर्वच रामरावांच्या ऐपतीत बसण्यासारखे होते. त्यामुळे त्यांनी चटकन होकार दिला आणि मुहूर्तही दोन दिवसाच्या नंतरचा निघाला. शामलाला या बेताची अजिबात कल्पना नव्हती.
घरी गेल्यावर आईने तिची दृष्ट काढली आणि तिचे लग्न ठरल्याचे सांगितलं. शामला भरपूर रडली परंतु आई-वडील दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. घरच्यांनी तिला बबलीला पण भेटू दिले नाही. मग राजेशची तर बातच सोडा. रामरावने एक खाजगी गाडी घेऊन कुटुंबासहित कुमठ्याला प्रस्थान केले. यावेळी मात्र बबली बरोबर होती दोघींच्या बराच गप्पा झाल्या पण सुटकेचा मार्ग दिसत नव्हता.आई-वडील तर हट्टाला पेटले होते.
कुमठे गावची मंडळी लग्नानंतर शिंदेंना म्हणाली सुद्धा, एवढी चांगली मुलगी सुशिक्षित आणि तिला तुम्ही या वेंधळाच्या गळ्यात का मारले. इकडे या पंचक्रोशीत कोणीही मुलगी देण्यास तयार नव्हते म्हणून त्यांनी मध्यस्तास अमिष दाखवून कोल्हापूर, सांगली, मिरज अशा ठिकाणी पाठवले. आमच् ऐकाल तर मुलीला अशीच परत घरी न्या आणि जमातीच्या पंचांकडून तिला काडी मोड देऊन टाका. रामरावांना मुलगी परत न्यायची असे अजिबात वाटत नव्हते पण जसे लग्न लागले तसे त्यांना लोकांचे म्हणणे खरे वाटू लागले.
मुलगा लग्नाला आला तो फुल दारू पिउनच. आता त्याच्या दोन मित्रांनी त्याला अंतरपाटा समोर उभे केले होते. लग्न लागल्यावर सुद्धा त्याने जेवणावेळेस नाना माकड चेष्टा केल्या. जेवताना सुद्धा त्याला दारू हवी होती. शेवटी लग्न कसेबसे लागले आणि रामराव परत आपल्या घरी परतले. दोन-तीन दिवस शामला सासरीच राहिली. तिला हळूहळू कळू लागले की आठ एकर शेती आहे पण तिच्यावर कर्ज काढले आहे आणि सर्व शेती सावकाराच्या घशात आहे. मुलाला हातात तीन हजारच पगार मिळतो पण त्यात त्याने अनेक देणी करून ठेवली आहेत. त्यामुळे त्याला एक तारखेला हातात नऊशे साडेनऊशे रुपये मिळतात. त्यांनी दिलेले एक लाख रुपये तर त्यांची विविध देणी फेडण्यातच जातील आणि झालेही तसेच.
लग्न झाल्यावर तीन दिवसांनी पूजा झाली व शामला तिच्या नवऱ्याकडे राहायला गेली. दहा बाय पंधराच्या खोलीत तो एका चाळीत राहत होता. खोली दुसऱ्या मजल्यावर होती आणि 15 खोल्याकरिता एक कॉमन टॉयलेट होते. खोलीत छोटीशी बाथरूम होती त्याशिवाय खोलीत एका कोपऱ्यात टेबल टाकून त्यावर गॅस शेगडी ठेवली होती. मागील बाजूस असलेल्या लाकडाच्या फळीवर काही डबे पसरले होते. बहुतेक ते रिकामेच असावेत. टेबलाच्या उजवीकडे एक छोटेसे कपाट होते पण त्यात काहीच नव्हते. खोलीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक कॉट होती. कॉटवर गादी आणि बेडशीट व उश्या होत्या परंतु गादी आणि उश्या पेशव्यांनी वापरल्या असाव्या इतक्या मळकट आणि वास येणारे होतं. हे सर्व पाहून शामलाला उलटीच यायची बाकी राहिली होती तरीसुद्धा तिने चादर साफ केली आणि स्वतःची एक साडी गादीवर टाकली. बाबू रात्री साडेअकरा वाजता पूर्ण पिऊनच आला होता. आल्या आल्या त्यांनी गादीवर अंग टाकले आणि तो घोरु लागला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तेच नाटक झाले. शेवटी चौथ्या दिवशी सकाळी तिने त्याला चहा दिला आणि विचारले, आत्ताच आपले लग्न होऊन सुद्धा तुम्ही मला हातही लावत नाही असे कसे? बाबू म्हणाला, अतिशय दारू पिऊन माझी प्रकृती फारच खालावली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी आत्ता कुठल्याही बाईला सुख देण्यास असमर्थ आहे त्यामुळे तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस असे म्हणून बाबू उठून बाहेर गेला.
आता मात्र शामलाला आपण पुरे फसलो असे वाटून गेले तिचे डोके चालेनासे झाले. प्रथेप्रमाणे पुढच्या दिवशी तिला माहेरी जायचे होते. तिचे आई-वडील पण दुःखातच होते. आपण घाई करून लग्न केले याचे त्यांना फार दुःख झाले आणि पोरीचे काय होणार हेही त्यांना कळेना. श्यामला घरी सांगून दोन दिवस बबलीकडे गेली. बबलीने तिची थट्टा सुरू करताच तिला रडू कोसळले व तिने तिला सर्व कहाणी ऐकवली व बबलीच्या आई-वडिलांना व राजेशलाही हकीकत सांगितली. तिला मदत कशी करायची यावर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. बबलीच्या आई-वडिलांनी आणि राजेशने तिला सर्व सपोर्ट करायचे मान्य केले. राजेशने, आई-वडिलांना सरळ विचारले की त्याने जर श्यामलाशी लग्न केले तर त्यांची काही हरकत आहे का? त्यांनी सांगितले की, कायद्याचा कुठल्याही भंग न करता कायद्याच्या कचाट्यात न सापडता जर त्याने हे लग्न केले तर त्यांनाही मान्य आहे आणि ते सुद्धा त्यांच्या बाजूने सर्व उपाय करतील. पहिली गोष्ट म्हणजे राजेशने कर्नाटकच्या एका खेडेगावातून तिच्या जन्मतारखेची पत्रिका करून घेतली. पत्रिकेवर नाव तेजश्री प्रसाद रानडे असे होते. तिचा जन्म तारखेच्या आधारे त्याने खेड्याच्या एका गावातच एका शाळेतून तिचा जुना नववीचा बंडल दाखला मिळवला. त्यानंतर त्याने ऑफिशिअली चेंज इन नेम शामल रामराव शिंदे ते तेजश्री प्रसाद रानडे असे गॅजेट मध्ये नोटिफिकेशन दिले. हे सर्व होत असताना शामल नवऱ्याकडे जातच होती. आता तो दारूच्या नशेत पैशाकरता तिला मारहाणही करू लागला होता. त्याशिवाय माळावर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये हवेत अशी त्याची मागणी सुरू झाली. त्यामुळे शामला जास्त वेळ माहेरीच राहू लागली. तिला त्याच्या जवळ जाणे जवळजवळ नकोच वाटायला लागले होते. राजेशने वडिलांना सांगून इंदोरला दुकान उघडले आणि धंदा सुरू केला यात त्याला जयेशच्या सासर्यांची पूर्ण मदत होती. गॅझेटमध्ये नाव प्रसिद्ध झाल्यावर याचा दुसरा टप्पा सुरू झाला. इकडे बाबुने पैसे आण नाहीतर तुला विद्रूप करतो असे म्हणून तिच्या तोंडावर ऍसिड टाकले.
तिच्या नशिबाने ऍसिड एका गालावर आणि हनुवटीवर पडले आणि त्याच्यावर पाणी ओतल्याने तिचा चेहरा कमी विद्रूप झाला. ती तारीख होती 19 सप्टेंबर 2002 शामला तिथून उठून लगेचच आई-वडिलांकडे गेली आणि तुमच्यामुळेच हे सगळे झाले आहे आता मला कुणाचाच भरोसा नाही, आता मी जीव देते असे म्हणून निघून गेली. हा प्रकार तिच्या पत्त्यावरच पडला, शामला पुनामिया यांच्या घरी गेली. सर्व पुनामिया कुटुंबांनी तिला धीर दिला. त्यानंतर राजेश, शामला, बबली आणि तिचे वडील सर्वजण इंदोर गेले. इंदोर मध्ये फॅमिली डॉक्टर ला दाखवून त्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्यावेळी तिचे नाव तेजश्री रानडे असेच नोंदवण्यात आले. तीन चार दिवसांनी इंदोर मध्ये डॉक्टर कामत या प्रसिद्ध प्लास्टिक सर्जनने त्यांनी सांगितले की कुठल्याही अपघाताची चेहऱ्यावर खुण राहणार नाही परंतु कमीत कमी एक वर्ष हॉस्पिटलमध्येच राहावे लागेल. कोणाची त्याला काही हरकत नव्हती. डॉक्टरनी मॉडेलवर तयार होणारा चेहरा दाखवला त्यावेळेस चेहरा नेहमीच्या चेहरा पेक्षा जास्त वेगळा तयार होणार होता. त्यामुळे श्यामलाचे सौंदर्य ही वाढणारच होते. मेहता कुटुंबीयांनाही तेजश्रीची कौतुक वाटून त्यांनी तिच्याकडे बघण्याचे मान्य केले.
तीन-चार दिवस गेल्यावर बाबुने पोलिसांकडे बायको मिसिंग असल्याचा रिपोर्ट दिला. बायको माहेरी जाऊन परत निघून गेली होती हे त्याला कळले होते. बायकोने सुसाईड केली असावी असा त्याला दाट संशय होता म्हणून तो सतत पोलिसांना बायको बद्दल विचारत होता. कर्नाटकात एक प्रेत सापडल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु त्या प्रेताबरोबर असणाऱ्या चिठ्ठी मुळे तो अडचणीत आला असता. परंतु नंतर सीबीआय चौकशीत ती चिठ्ठी बनावट असल्यामुळे बाबूला हायसे वाटले होते.
एक वर्ष बघता बघता निघून गेले आणि तेजश्री रानडे पण बीएची परीक्षा उत्तम मार्काने पास झाली होती. ह्या सर्व इंदोर मीटिंग मुळे मेहतांच्या मुलाचे आणि बबलीचे लग्न ठरले होते. राजेशचे आणि बबलीचे लग्न एकाच मांडवात करावे असे दोघांनी ठरवले. लग्नाला तेजश्रीकडून कुणीही येणार नव्हतेच. लग्नाला जाताना फक्त पुनामियांची फॅमिली, रामराव आणि त्यांच्या बायकोला घेऊन इंदोरला गेले. पुनामियांनी रामरावाना तेजश्री चे कन्यादान करण्याची गळ घातली. त्यांना समजावून सांगितले की तेजश्री ही निराश्रीत आहे आणि तिला जवळचे नातेवाईक कोणीही नाही. तेजश्री उर्फ शामला आता वेगळी आणि जास्त सुंदर दिसत होती. अखेर रामरावांनी नकळत स्वतःच्या मुलीचे कन्यादान केले. लग्न समारंभात रामराव आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली.
राजेश आणि तेजश्री सुखाने राहू लागली. बबलीही इंदोरमध्ये असल्यामुळे पूर्वीची मैत्री अधिकच घट्ट झाली. रामराव आपल्या मुलीचे आपण वाटोळं केलं अशा ब्रह्मात राहिले. पुनामिया आता तेजश्रीलाच मुलगी माना असा सल्ला रामरावांना देऊ लागले.
अशी ही नसलेल्या बोटाची गोष्ट आणि नसलेल्या मुलीची गोष्ट .
कमाल आहे. खरी कथा आहे का? आई
कमाल आहे. खरी कथा आहे का? आई वडील कधी कधी किती विचित्र निर्णय घेतात मुलांच्या आयुष्याचे.
माझेमान +१ कमाल आहे !!
माझेमन +१
कमाल आहे !!
तुमच्या दोन्ही कथा छान आहेत
तुमच्या दोन्ही कथा छान आहेत
पण लेखन शैली एखाद्या केस रिपोर्ट सारखी वाटते
ह्या खरोखर सत्य कथा आहेत की मुद्दाम अशी लेखन शैली वापरली आहे
एकच लेखन शैली मुद्दामून केस
एकच लेखन शैली मुद्दामून केस रिपोर्ट सारखी ठेवली आहे या तिन्ही गोष्टी खरोखर घडल्या आहेत. अर्थात नाव -गाव बदलून. लेखन शैली बघायची असेल तर माझ्या खालील कथा वाचाव्यात आणि आपला अभिप्राय कळवावा.
- सावंत माझी लाडकी
- सून बाई सून
सून बाई सून ह्या आधी वाचली
सून बाई सून ह्या आधी वाचली होती
त्यामुळे ह्या कथांची शैली वेगळी वाटली
तुम्ही खुलासा केल्या बद्दल धन्यवाद. अशा कथा, अशी शैली सुद्धा वाचकाला खिळवून ठेवते
सवत माझी लाडकी खूप गोड कथा आहे
तुमचं बाकीच लिखाणही वाचतोय
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
दोन्ही कथा छान आहेत.
दोन्ही कथा छान आहेत.
राजेशचे आईबाबा आधीच तेजश्रीच्या आईबाबांशी बोलले असते व फक्त मुलगीच द्या सांगितले असते तर पुढचे सगळे टळले असते. असो. सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत व अकल्पनिय असते.