मेघे ढका तारा (भाग ५-अंतिम)

Submitted by Abuva on 13 April, 2025 - 13:00
Image created by Microsoft Designer of a girl looking at cloudy night sky

(भाग ४ - https://www.maayboli.com/node/86621)
मितूनं भल्या पहाटे मिहिरची बेडरूम गाठली. दरवाजा ठोकला. मिहिरनं पेंगुळलेल्या अवस्थेत दरवाजा उघडला. मितू वॉज लुकिंग लाईक अ डिव्हाईन व्हिजन! काळे टाईट्स, त्यावर कलरफुल लॉन्ग स्लीव्ह्ड लेटर्ड, पायांत फ्लोटर्स. तिचा चेहेरा प्रफुल्लित होता, त्यावरून आनंदाचं ओज ओसंडत होतं! "वेक अप, स्लीपी हेड!” करून तिनं शिमगा केला. "हिऱ्या, चल लवकर समुद्रावर जाऊ, सूर्योदयाच्या आत...”
तिचा उत्साह इतका सहजस्फूर्त होता, की मिहिरला तत्काळ त्याचा संसर्ग झाला जणू. "आलोच पाच मिंटात तयार होऊन..”
आलाच तो खाली दडादडा जिने उतरत... मितू चित्रवत स्तब्ध होऊन समोरचं दृष्य बघत होती. समोरचा फेसाळता, उफाळता समुद्र लुप्त झाला होता. तिथे नितळ पाण्याचं शांत तळं दिसत होतं. ते बघून मिहिरही चक्रावला... "काय आहे गं? हे असा कधीच समुद्र पाहिला नाहीये!”
"आश्चर्यच आहे! बरं झालं ना मी तुला लवकर उठवलं?”
दोघंही त्या ध्यानस्थ समुद्राला त्रास होऊ नये अशा बेतानं पाण्यात शिरले. हवेतल्या थंडाव्यापेक्षाही पाणी थंड होतं. निवळशंख होतं. नुकतंच झुंजुमुंजू झालं होतं, पण त्या अंधारातही पायाखालची शुभ्र वाळू, एवढंच काय, पाण्यातल्या छोट्या छोट्या मासोळ्या देखील सुळ्ळकन इकडून तिकडे जाताना दिसत होत्या. वातावरणात एक प्रगाढ शांतता भरून राहिली होती.
एकही शब्द न बोलता, मितूनं मिहिरचा हात धरला, आणि पाण्यातून बाहेर आली. दोन्ही दिशांना विस्तीर्ण पसरलेला पांढऱ्या, सोनेरी वाळूचा तो किनारा तिला खुणावत होता. मिहिरचा होत न सोडता, तिनं एक दिशा पकडून चालायला सुरूवात केली, निःशब्द... आज तिनं ठरवलं होतं, कालच्या घटनांचं सावटही पडू द्यायचं नाही!

---

परत यायला त्यांना आठ सहज झाले असतील. काही मंडळी उठली होती. पण बरीचशी अजून गादीतच होती. ब्रेकफास्ट तयार होता. या दोघांनाही सडकून भूक लागली होती. मिहिर आडवा हात मारतोय हे बघितल्यावर मितूनं त्याला जामला, "हिऱ्या, जेट स्की करायचंय आपल्याला. जास्त खाऊ नकोस, झोपशील नाही तर पुन्हा!”
पाण्यात डुंबत असताना मितूला शेजारचं वॉटर स्पोर्ट्स सेंटर उघडताना दिसलं. तिनं लगेच फिल्डिंग लावली. अर्ध्या तासात पहिली जेट स्की फरफरली त्यावर मिहिर आणि मितू स्वार होते. दोघांनीही लाईफ जॅकेट घातले होतं. पाच मिंटं त्या इंस्ट्रक्टरनं सगळे कंट्रोल्स, वळायचं कसं हे त्यांना समजावलं. घड्याळाकडे लक्ष द्या, जेट स्कीत जास्त इंधन आम्ही भरत नाही हे बजावून सांगितलं आणि एक खूण दाखवली. ही लक्षात ठेवा, ही कुठूनही दिसते, इथेच परत या हे सांगितलं...
वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगात जेट स्की सुटली. मिहिर थ्रॉटल पिरगाळत होता. त्याच्या कमरेला पकडून मितू बसली होती. लाटा कापत जेट स्की उसळत होती. किनाऱ्याजवळच्या मोठ्या लाटांवर स्वार होत जेट स्कीचं नाकाड हवेत उचललं जात होतं. समुद्रस्तृप्यंतु होतं की काय वाटेपर्यंत मागचा भाग लाटेवर धडकून नाकाड वेगानं खाली येत पुढच्या लाटेवर धडकायचे, दोन्ही बाजूंना पाण्याचा फवारा उडायचा, अन् पुन्हा नाकाडाचा प्रवास उर्ध्वदिशेनं सुरू व्हायचा. प्रत्येक उर्ध्व ते अधो प्रवासात पोटात एक मोठ्ठा खड्डा पडायचा. मग मितू "हो... आ" करून ओरडायची. दोघंही त्या अनुभूतीत गुंतून गेले होते. जशी जशी जेट स्की किनाऱ्यापासून दूर जायला लागली तसा लाटांचा प्रभाव कमी व्हायला लागला. पायाखालचं पाणी रंग बदलू लागलं. त्या निळ्या रंगाच्या छटा गहिऱ्या होऊ लागल्या. अजूनही जेट स्की किनाऱ्यापासून दूर झेपावत होती. हळूहळू नजरेच्या कक्षेत येणारा किनारा, त्यावरच्या खुणा दिसेनाश्या झाल्या. नजरेच्या टप्प्यात आता पाणीच पाणी होतं. मिहिरनं थ्रॉटल कमी करत करत बंद केला. आता जेट स्की पाण्यावर डुचमळत होती. मिहिरनं मागे वळला, मितूला म्हणाला, "पाणी, फक्त पाणी, चौफेर अथांग पाणी!" मितूनं त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकली, म्हणाली, "अं हं! तू आणि मी, फक्त आपण दोघे! “ मिहिरनं तिच्याकडे नजर टाकली, आणि मुद्दामून म्हणाला "आणि पाणी"
तिनं त्याला गुद्दा घातला. त्याला गुदगुल्या केल्या. आता तिला काय माहिती की मिहिर सुपरसेन्सिटिव्ह आहे म्हणून! तो ताडकन उडला. उडला तर त्याचा पाय सटकला अन् तोलच गेला. त्याला सांभाळण्याच्या नादात मितूपण त्याच साईडला वाकली. झालं, जेट स्कीचा बॅलन्स गेला अन बघता बघता दोघंही पाण्यात पडले… भरीस भर म्हणून जेट स्की उलटी झाली. त्यातल्या त्यात चांगला भाग म्हणजे, मिहिरच्या हाताला जी की बांधली होती, ती निघाल्यानं जेट स्कीचे इंजिन बंद पडलं. पाण्यात पडल्या पडल्या मिहिरनं हातपाय मारायला सुरूवात केला होती. डुबकी मारून वर आल्यावर मिहिरला लक्षात आलं की लाइफ जॅकेट ये बडे काम की चीज होती है! काहीही न करता तो आरामात तरंगत होता. चला, जीवाची भिती नाही. अरे मितू कुठाय…? त्यानं गडबडीनं आजूबाजूला पाहिलं. शेजारी मितू त्याच्याकडे बघत तरंगत होती. तिला हसू येत होतं.
"तुला इतक्या गुदगुल्या होतात का रे?”
"हो गं, भयंकर होतात”
तिला हसू आवरतच नव्हतं.
"हसतेस काय? चल जेट स्की सुलटी करू”
"थांब रे" म्हणत ती पाठीवर झाली. लाटांवर हेलकावे खात ती आकाशाच्या निरभ्र निळाईत...
"अगं, पाणी घुसलं इंजिनमधे तर..”
"घुसू दे!” ...डोळे गुंफत म्हणाली, "आपण दिसलो नाहीत की येतील शोधत. तू नको काळजी करू,
फक्त आकाश बघ...”
"आणि पाणी!”
"नालायक…" म्हणत ती त्याचा गळा आवळायला निघाली तर हातपाय मारत मिहिर दूर गेला.
"ए, लांब नको जाऊस”
"बरं, चल ती जेट स्की सुलटी करू”
"जाऊ दे रे...”
"आणि शार्क आला तर?”
या वाक्यानं मितू गडबडली, "काही तरी वेडंविद्र बोलू नकोस”
पण ती लगेच जेट स्कीला वेंगली. दोघांनी इकडून तिकडून ती सरळ करण्याचा प्रयत्न केला पण ते प्रकर्ण वाटलं तेवढं सोपं नव्हतं. तेवढ्यात दुसऱ्या जेट स्कीवरून त्यांचा इन्स्ट्रक्टर पोचलाच. जरा बडबड केली त्यानं, पण एक्स्पर्टली जेट स्की सरळ केली. दोघांना न पडता जेट स्की वर चढायला मदत केली, किती वेळ राहिलाय त्याचा हिशेब सांगितला, आणि फरारत गेला...
परत येताना मिहिरनं टेसात दोन फेऱ्या मारल्या व्हिलासमोरून... आता हळूहळू मंडळी बीचवर जमायला लागली होती. मितूनं आल्याआल्या त्यांच्या स्कीवरच्या ऍडव्हेंचरची भरपूर जाहिरात केली. त्यामुळे सगळ्यांनी मिहिरला गुदगुल्या करण्याचा चान्स सोडला नाही, अगदी वहिन्यांनीसुद्धा!

---

बनाना बोट हा तसा निरुपद्रवी प्रकार. एका जेट स्की किंवा स्पीडबोटच्या मागे बनानाच्या आकाराच्या ट्यूबवर बसून समुद्राची चक्कर. त्यामुळे सगळे दादले, काही वैन्या, सगळे तयार झाले. एकूण मंडळींचा आकडा बघून तीन चार बनाना बोटवाले आले. एक एक करत सगळे स्वार झाले. भरलेल्या बोटी सुटल्या. सरोज कमलला हाका मारत होती. तो काही खाली उतरला नव्हता. शेवटी तिनं मिहिरच्या हातात शिशिरचं बोचकं दिलं. तू जाऊन आलायस, आता याला बघ. आणि शेवटच्या बनाना बोटवर चढली. आता ती फरफरत निघणार इतक्यात कमल व्हिला सोडून बीच वर आला. त्याला बघून मिहिरनं ए थांबा थांबा अशी हाकाटी केली. पण ते एकंदर प्रकरण बघून कमलनं साफ नकार दिला. त्याला दोन शेलक्या शिव्या हाणून सरोज ओरडली, "सोड त्याला! शिशिरला दे कमलकडे आणि तू ये, मिहिर”
कमल म्हणाला, "हो, तू जा, मी आहे शिशिरला बघायला.”
मिहिर कचरला, "नको मला, मी जाऊन आलोय...”
सरोजनं परत त्याच्या नावानं शिमगा केला. कमल म्हणाला "अरे खरंच जा, नाही तर सरोज एकटी पडेल.”
हो ना करत मिहिरनं लाईफ जॅकेट घातलं आणि उडी मारून बनाना बोटवर चढला. सरोजच्या मागच्या सीटवर बसला.
पुन्हा एकदा लाटांवर नाचण्याचा अनुभव होता. पण सरोज आणि बाकी लोकांना हा नवा प्रकार असल्यानं लय धमाल येत होती. बनाना बोटवाल्याचं कौशल्य हेच की लोकांना समसमान प्रमाणात भितीही वाटली पाहिजे आणि गंम्मतही. खरी गम्मत पुढे होती. बीचच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आणि परत अशी राईड होती. बीचच्या त्या टोकाला एक न्यूडिस्ट रेझॉर्ट होतं! तसा तो बीच प्रायव्हेट होता. रेझॉर्टवाल्यांशिवाय इतर कोणालाही त्याला ऍक्सेस नव्हता. पण त्याच्यासमोरचा ओपन सी? तिथे कोणाला कशी आडकाठी करणार?!
मग तिथे वळताना बनाना बोटवाले मुद्दाम लोकांना पाण्यात पाडायचे! जरा गम्मत - पाण्यात पडण्याची, आणि बघा काय दिसतंय ते, काही दिसतंय का! चांगली पाचसात मिंटं हा गोंधळ चालू असायचा. लोकं पडायची, चढायला जायची तर घसरायची, काही मुद्दामहून घसरायची, ऐश करून घ्या... या सगळ्याचं त्या न्युडिस्टांना काय वाटायचं काय माहिती! बरं, या मंडळींना कुणी कल्पना दिली नव्हती या न्यूड वगैरे भानगडीची. त्यात सरोज आणि मिहिर होते ती बोट सगळ्यात पाठीमागे होती. तसं बाकी बीचकडे लक्ष असल्यानं पुढच्या बोटींकडे कोणं बघतंय?!
मिहिर कालच्या मितूशी झालेल्या विषयानंतर सरोजपासून जरा चार हात लांबच रहात होता. पण आता दैववशात ते परत एकाच बनाना बोटीवर आले होते. सरोज तिच्या हायस्पिरिटेड मूडमध्ये मिहिरला बीचवर दिसणारं कायकाय दाखवत होती. पण मिहिरचा रिस्पॉन्स जरा सावधच होता. सरोजला काही तरी गडबड वाटली खरं. तिनं एकदा मागे वळून विचारलंही, "मिहिर, झोपलायस का?”, “नाही!” "मग मेलायस का?” तेंव्हा जरा मिहिर हसला.
समोरून वळून येणाऱ्या बोटींवरची मंडळी काही तरी ओरडून सांगायचा प्रयत्न करत होती. पण यांच्या काही पल्ले पडे ना. न्यूड काय?!
मग यांची बोट जेंव्हा पोहोचली, तेंव्हा बोटवाल्यानं बोट करून दाखवलं - हा न्यूड बीच आहे! लोकांच्या माना गर्रकन वळल्या आणि डोळे फाटेपर्यंत मोठे झाले... अजि म्यां ब्रह्म पाहिले..
आणि तेवढ्यात बोटवाल्यानं करामत दाखवून सगळ्यांना पाण्यात पाडलं... एकच गोंधळ! इकडे बघू का जीव वाचवू... सगळ्या दादा-वैन्यांनी पैल्यांदाच लाइफ जॅकेट घातलेलं, त्यामुळे त्याची जादू कळायला आणि जीवाची भिती कमी व्हायला एखाद मिनिट जावं लागलंच. त्यामानानं, सरोज आणि मिहिर शांत होते, लाटांवर तरंगत होते. पोहत सरोज मिहिरजवळ गेली. बीच वर काही दिसतंय का असं कुतुहलानं तो बघत होता. आता इतक्या लांबून दिसणार काय आणि किती? उगाच आपला आंबटशौकिनपणा... तरी...
सरोजनं त्याचं बखोटं धरलं. विचारलं, "मिहिर, दूर पळतो आहेस का माझ्यापासून?” मिहिरच्या चेहेऱ्याचा रंग उडलेला तिला त्याही परिस्थितीत तिला जाणवला. तेवढ्यात एका वैनीनं हाक दिली म्हणून सरोजला तिच्या मदतीला जावं लागलं. विषय तिथेच थांबला.
---
आता सुट्टी संपत आली होती. ये शाम आखरी! सगळ्यांचं दिवसभर भटकून, खेळून, खाऊन, पिऊन झालं होतं. वैन्यांचं मॅन्डेटरी शॉपिंगही झालं होतं. सुस्तावणारी रात्र उतरली होती. पण ही शाम संपू नये असं वाटत होतं. मध्यरात्रीपर्यंत पीटरच्या शॅकवर बसून मंडळी व्हिलावर परतली होती.
---
सरोजच्या बेडरूमला एक मोठी बाल्कनी होती. तिथे बसायला एक सोफा ठेवला होता. तिथून सागराची अखंड गाज कानावर पडत होती. आणि झाडातून चंद्रप्रकाशात चमकणारा लाटांचा फेस... झोपलेल्या शिशिरवर लक्ष ठेवायला तिथे बसणंच योग्य होतं. सरोज म्हणाली, "मिहिर, मितू या रे इथे बसू.” कमल म्हणाला, "बसा तुम्ही. मी आता झोपतो.” फॉर अ चेंज, तो आज शुद्धीत होता. "मिहिर, ए, एक ड्रिंक आण ना माझ्यासाठी." "माझ्यासाठी पण!”, मितू म्हणाली.
मिहिर गेला. जाताना तो विचार करत होता. सरोज आणि मितू एकत्र. सकाळपासूनची दृष्यं त्याच्या मनःचक्षुंसमोर फिरत होती. मिहिर भलताच कॉन्शस झाला होता...
सरोजला ड्रिंक देऊन मिहिर मितूशेजारी सोफ्यावर बसला. तिचं ड्रिंक दिलं. "सरक रे, जागा दे”, करत सरोज आली, दोघांमध्ये घुसली! "कबाबमें हड्डी", म्हणत स्वतःच खळखळून हसली. जरा वातावरण हलकं झालं. तिनं गळ्यात हात टाकून मिहिरला जवळ ओढलं, दुसऱ्या हातानं मितूला. मितूला म्हणाली, "मितू, तुझा हा दोस्त आज माझ्यापासून दूर दूर का पळतोय गं?”
तो ताण दुपटीनं-तिपटीनं परत आला. अस्वस्थ होऊन मिहिर तिच्याशेजारून उठला. अडखळत म्हणाला, "नाही, तसं काही नै"
सरोजनं एक सिप घेतला. तिचा आवाज बदलला. "काल कमल नशेत त्याच्या मनातली भीती बोलून गेला त्याचं टेन्शन आलंय ना तुला? नको काळजी करूस, मी समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला."
"करेक्ट", मिहिर घाईघाईत म्हणाला. "पण त्याला‌ खरंच जॉब जाण्याची भिती वाटतेय?"
"हो, सांग ना आता हा प्रॉजेक्ट झाला की त्याच्या साठी काही काम आहे का इथे? मग का नाही भिती वाटणार?" मिहिर गप्प राहिला.
"आणि त्याची खरी भिती काय आहे सांगू? माझं त्याच्यावर प्रेम राहिलं नाही ही! त्याला वाटतंय मी तुझ्यावर फिदा आहे!”
मिहिर चपापला, त्यानं चटकन मितूकडे पाहिलं. तिच्या चेहेरा अगम्य होता. त्यानं पुन्हा डोकं दोन्ही हातांत पकडलं आणि गदागदा नकारार्थी हलवलं. दोघींकडे पाठ करून कोपरं बाल्कनीच्या कठड्यावर रोवून तो उभा राहिला.
सरोज हलकेच हसली. सोफ्यावरनं उठली, आणि त्याच्या शेजारी बाल्कनीच्या कठड्याला पाठ देऊन उभी राहिली. दरवाजाच्या काचेतून आत झोपलेले कमल आणि शिशिर दिसत होते. संवादात खंड पडला.
हलकेच ती म्हणाली, "मलाही तसंच वाटत होतं!”
तिच्या आवाजात गांभीर्य होतं. वातावरणात कमालीचा ताण होता.
तिनं मान वळवली, मिहिरकडे बघायला लागली. "पण काल संध्याकाळी त्या समुद्राने मला सांगितलं, दॅट वॉज ऍन इन्फॅच्युएशन! जस्ट अ पासिंग फेज... यू केम इन माय लाइफ ऍज अ फ्रेश ब्रेथ. आमच्या संसाराच्या कोंडीत तू नवा सुगंध आणलास. त्या मायाजालात मी पण वहावले. कमलला त्याचा अंदाज लागला. तुझा कामातला वरचष्मा, घरात मी खुळावलेली, शिशिरला लागलेला तुझा लळा, त्याची पाचावर धारण बसली. घाबरला बिचारा. त्यात नोकरी जाण्याची टांगती तलवार.”
आता मितू उठून मिहिर शेजारी उभी राहिली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून, आधाराला.
"खरंच काय दिवस होते ते...”
सरोजच्या आवाजात खेळकरपणा परतला, ”पण आता नाही... हेय गाईज, लायटन अप" तिनं मिहिरला खेचला, "ही तुला हिऱ्या म्हणते ना तू आहेसच हिरा. यू शुड बी प्राऊड की इतक्या मुलींना तू आवडतोस! वैन्यांसुद्धा..” मितूपण हसली. मिहिरनं तोंड वर केलं. आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं.
सरोजनं त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. ती पुन्हा सोफ्यावरती जाऊन बसली. तिनं एक सिप घेतला. परत तिचा आवाज बदलला होता. "मी एक नवीन उद्योग सुरू करते आहे. तेच तुम्हाला सांगायचं होतं म्हणून बोलावलं होतं. तुझ्यामुळे मी डॉक्युमेंटेशन करायला लागले. कमलची परिस्थिती पाहून मला हात पाय हलवायची गरज होतीच. ते करताना मला गेल्या दोन-तीन महिन्यांत वेगवेगळी लोकं भेटली. त्यांच्याकडून मला आता कामं मिळतायत! एवढंच नाही, तर मी तीन आयटी ट्रेनर्स ओरिसाहून इथे आणायचं काम घेतलंय.”
"काय सांगतेस??” मिहिर वेडा झाला होता! "कॉन्ग्रॅट्स गं, सरोज", मितू तिच्याशी हात मिळवायला गेली. "चीअर्स!" मितू म्हणाली. मिहिर धावत आपला ग्लास घ्यायला गेला, "थ्री चिअर्स फॉर सरोज, हिप हिप हुर्रे...”
त्या आवाजानं म्हणा पण कमल उठून बाहेर आला. "शाला लोग चीअर्स कोर रहे है ओर मेरे पाश ग्लाश नोही हाय...” सगळे हसले. सरोजनं आपलं ड्रिंक त्याला दिलं. त्यानं तिच्या गळ्यात हात घातला. आता त्या चौघांनी मिळून चीअर्सचा गजर केला. सरोजनं मिहिरला जवळ ओढला. "थॅन्कस फॉर गिव्हींग माय यूथफुल एनर्जी बॅक, माय यंग फ्रेंड... आज मी आणि कमल, खूप वेळ बालत होतो सकाळी, या बाबतीत, आणि खूप गोष्टी. मी त्याची... माफी मागितली. ऍन्ड ही अंडरस्टॅन्ड्स, माय लव्हली हजबंड..” कमल स्मितला, त्यानं दुसऱ्या बाजूनं मितूलाही जवळ घेतलं. तो मिहिरला म्हणाला, "मैने बोला था ना, नेव्हर डाउट युवर वाईफ!” जगात सगळं आलबेल होतं...
"व्हॉट आय वॉज सीकींग इन यू वॉज माय ओन यंग डेज, द बबलिंग एनर्जी, द झेस्ट फॉर लाइफ... द नीड टू कॉम्पीट, द ड्राईव्ह टू विन... आणि ते आता मला गवसलंय...” एवढं बोलून सरोज थांबली. चौघांच्याही डोळ्यांत पाणी होतं. माथ्यावर आलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशात लाटांचं गूज चालूच होतं...

---

उपोद्घात:
‘आता आजच्या समारंभाचे मुख्य पाहुणे, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. अमुक तमुक यांच्या हस्ते या सहनिवासातील प्रथम रहिवासी सौ सरोज व श्री बिभूतीमनोज कर्माकर यांना ताबा देण्यात येईल. मी अर्क एल्डर केअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री मिहिर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिकात्मक किल्ली माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातात द्यावी.’
सरोज आणि कमलनं एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी भुबनेश्वरमध्ये उभारली आणि नावारूपाला आणली. त्या कंपनीची सरोज सीईओ होती. ती नुकतीच रिटायर झाली आहे. नवीन सीईओ शिशिरनं आता ती कंपनी अमेरिकेत शिफ्ट करायचं ठरवलं आहे. मिहिर एका मोठ्या कंपनीचा सीईओ होता. त्यानं आता हा नवीन स्टार्टअप एल्डर केअर या सेक्टर मध्ये सुरू केला आहे. सरोज त्याची को-फाउंडर आहे. कमल आता पंच्याहत्तर वर्षांचा झाला आहे, आणि अनेक व्याधीउपाधींनी ग्रासलेला आहे. कमलनं ह्या स्टार्टअपसाठी मिहिरला एक सबळ कारण दिलं, "कोभी मैने ऑर सोरोजने तुम्हारा बेबी सिटींग किया, आता तुझी पाळी आहे...”!!!

(समाप्त)

(पुराण काळी दूरदर्शनवर इतर भाषांतले पिक्चर रविवारी दुपारी लावायचे. त्यात पाहिलेला मेघे ढका तारा (दि.- ऋत्विक घटक) हा अप्रतिम पिक्चर. जडणघडणीच्या काळात एकदाच पाहिलेल्या त्या पिक्चरनं आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन घडवला. ते ऋण आयुष्यभर बाळगलंय. त्या ऋणातून अंशतः उतराई व्हायचा हा प्रयत्न)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती सुंदर, प्रवाही, खिळावून ठेवणारी कथा.
खूपच छान लिहिता बुआ तुम्ही! Happy
मला तर शेवट खूप आवडला. सरोजची मॅच्युरिटी, कमलचा समजूतदार पणा आणि मिहीर ची भावनिकता .. किती छान रंगवले आहे.
लिहीत रहा.
मितू नसती इंट्रोड्यूस केली तरी चालले असते...खरे तर. एखादा मुलगाच आला तिच्या जागी असे....
Happy जस्ट अ थॉट !

लिखाण खूप आवडले.
भावनिक गुंता आणि तो हळूवारपणे सोडवणे छान पद्धतीने कथेत उतरले आहे. अन् कुणालाही नकारात्मक न ठरवता. मस्त! पुलेशु..

अमेझिंग लिहिलंय. सगळे भाग एका दमात वाचून काढले इतकं गुंतायला झालं.

शेवट गोड केला हे जास्त आवडलं.
मितूला आणलं हा मास्टरस्ट्रोक. नाहीतर कन्फ्युजन कसं निर्माण झालं असतं. शिवाय सरोज त्याच्या प्रेमात पडलीये हे एका तरूण ( आणि इंटरेस्टेड? ) मुलीने मिहीरला सांगणं यामुळे वेगळा अँगल मिळाला.