संकटमोचन मंदिर - एक सुंदर अनुभव!

Submitted by छन्दिफन्दि on 12 April, 2025 - 02:48

संकट मोचन मंदिर ..

२४ डिसेम्बरला साधारण दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही निघालो. साधारण एखाद तासाच्या ड्राइव्हवर, सांताक्रुझ पर्वत रांगांमध्ये गिलरॉयजवळ एक हनुमानाचे मंदिर आहे. सात-आठ वर्षांपूर्वी असचं कधीतरी बोलण्याच्या ओघात एका ओळखीच्यांकडून त्याविषयी कळलेलं. काही दिवसांपूर्वी अजून थोडीफार माहिती काढल्यावर समजलं की आठवड्यातून दोनच दिवस शनिवारी आणि मंगळवारी काही तास दर्शनासाठी जाता येत, अर्थातच रिझर्व्हेशन करूनच! आम्हाला साडेचारची वेळ मिळाली होती.
अंतर जरी जास्त नसले तरी रस्ता घाटातला, नागमोडी आहे. ह्या पर्वतरांगा फार उंच नाहीत पण त्यांच्यावर रेडवूड ह्या उंचच उंच सूचीपर्णी वृक्षांची जंगले (दाटी )आहेत. हिवाळ्यामध्ये इकडे पावणे पाचच्या दरम्यान अंधार पडायला सुरुवात होते.. निघताना ऊन होते पण जसजसे वर डोंगर चढायला लागलो तशी संध्याकाळ पडायला लागलेली. त्यामुळे आम्ही पोहोचलो तेव्हा संधिप्रकाश पसरला होता. डोंगरमाथ्यावर देवळाशी पोहोचलो तर समोरचं दृश्य बघून हरखून गेलो.
हवेत छान गारवा होता (८ डिग्री सेल्सिअस), जमीन किंचित ओली होती, उंचच उंच रेडवुडच्या झाडीत ढग जणू लपाछपी खेळत होते, काही खाली दरीत उतरले होते, मंद धुपाचा चंदनाचा वास दरवळत होता, बारीक आवाजात लावलेली भजन, हनुमान चालिसा, सुंदरकांड, मधूनच होणारा घंटेचा नाद, भक्तांची माफक वर्दळ, आणि
समोर दिमाखाने उभं असलेलं भगव्या रंगाच्या कळसाचं ते छोटेखानी देऊळ!
नयनरम्य निसर्ग, मंत्रमुग्ध करणारे वातावरण, शीतल प्रकाशात उजळून निघालेल देऊळ, आसमंतात भरून राहिलेलं पावित्र्य - शांतता, देवळाजवळ तयार केलेल्या लहानशा धबधब्याच्या खळखळीने जाणवणारं चैतन्य आणि त्या सगळ्याच्या मिलाफातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा … देऊन गेला एक विलक्षण अनुभव, अविस्मरणीय अशी संध्याकाळ..!

१९२३ मध्ये अल्मोरा ह्या (सध्याच्या उत्तराखंडातील) गावी जन्मलेले बाबा हरीदास ह्यांनी अगदी लहान वयातच अध्यात्मिक मार्ग स्विकारला. १९७१ साली ते अमेरिकेत आले त्यांच्या प्रेरणेने माउंट मॅडोना केंद्र, शाळा आणि हे संकट मोचन मंदिर उभे राहिले. मंदिराची थोडक्यात गोष्ट अशी की त्यांच्या शिष्यांनी २००१ मध्ये भारतातून मारुतीची एक मूर्ती आणली. बाबांच्या मार्गदर्शनानुसार इष्टस्थळी त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मिळून २००३ मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण केले. येथील सर्व व्यवस्थापनही तेच बघतात. गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर एक गोरा माणूस धोतर, उपरण लेवून सर्व पुरुषांना कुंकुम तिलक लावत होता तर एक गौरांगना, सुती साडी, शाल नेसून स्त्रियांना कुंकू लावत होती.
डोंगरावर असल्यामुळे (असेल) देऊळ आणि परिसर फारसा मोठा नाही अर्थात म्हणूनच बहुदा आगाऊ नोंदणी करूनच इकडे यावे लागत असावे.
येथून पॅसिफिक महासागराचे दर्शनही घडते परंतु आम्ही गेलो तेव्हा ढग खाली उतरल्या मुळे ते आम्हाला मिळाले नाही.
त्या विलक्षण वातावरणात मनातील दडलेले लहान मुल बाहेर नाही आलं तरच नवल.. त्या मनाला वाटून गेलं, द्रोणगिरी उचलून येता येता हनुमानजी काही क्षण इथेच तर नाही विसावले.
अनपेक्षितपणें एक संध्याकाळ (तेही ख्रिसमस इव्ह Happy ) इतकी सुंदर होऊन गेली की त्याविषयी लिहील्यावाचून राहवले नाही.

खरंतर मला त्या सगळ्या वातावरणासाठी आणि अनुभवासाठी एकच शब्द सुचला होता - mystic.
पण मराठीत नेमका/के शब्द सापडत नव्हता/ते.. आज शांताबाईंच्या एक लेखात मिळाले... त्यात त्या अशाच वातावरणाच वर्णन करतायत.. गूढ, धूसर, रहस्यमय आणि आर्त ह्यांचा मेळ होऊन भारावलेल असं काहीस..

आज हनुमान जयंती निमित्त इकडे मायबोलीवर पोस्ट केलाय.

PXL_20241225_004518917 - Copy.jpg

---
PXL_20241225_011011559.jpg

---
PXL_20241225_010108579 - Copy.jpg

---

PXL_20241225_010146919.MP - Copy.jpg

---

PXL_20241225_010539383 - Copy (1).jpg
---
PXL_20241225_004344722.MP - Copy.jpg

---
PXL_20241225_004134692 - Copy (1).jpg

---

PXL_20241225_004047227 - Copy (1).jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान . फोटोही मस्त आलेत .
ओशो आणि विवेकानंद यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी भारतीय अध्यात्मिक प्रसार करत होता हे कळले.

फार सुंदर.
>>>>त्या मनाला वाटून गेलं, द्रोणगिरी उचलून येता येता हनुमानजी काही क्षण इथेच तर नाही विसावले.
अहाहा!!
फोटो फार सुंदर आलेत.

सुरेख, प्रसन्न वाटलं वाचून.

मानव, अमेरिकेत अध्यात्मिक प्रसार प्रचार (क्रियायोग) करायला श्री श्री परमहंस योगानंदही गेलेले, ते शेवटपर्यंत तिथेच होते, 1935 ते 1952 बहुतेक. मी योगी कथामृत या पुस्तकात वाचलं आहे, ऑटोबायग्राफी ऑफ योगीचा मराठी अनुवाद.

अतिशय सुंदर फोटो आणि साधाच पण मनःपूर्वक लिहिलेला वृत्तांत....
पुढच्या वर्षी अमेरिकेतील भेटीत जायलाच हवे!!

छान लेख आणि फोटोही! तिकडे राहात असताना कधीतरी वाचले होते पण गेलो नाही अजून कधी.

सांताक्रूज माउण्टन्स मधले थंडीचे वातावरण अनेकदा अनुभवले आहे. पण इथे वरच्या देवळाच्या फोटोमुळे ते आपल्याकडच्या उत्तरेकडचे हिमालयातले/जवळचे वातावरण वाटले Happy

सुंदर लेख...
निसर्गाच्या सान्निध्यात आपण अंतर्मुख होतो. मन शांत होतं आणि देवाशी जवळीक साधतो. तुकोबांनी भंडारा म्हणूनच गाठला. अशा वातावरणाला मी मंत्रमुग्ध करणारं वातावरण म्हणेल. निसर्गाच्या नितळ स्वरूप मंत्राने आलेली मुग्दधता.

आपल्याकडच्या उत्तरेकडचे हिमालयातले/जवळचे वातावरण वाटले>>> Happy हो

निसर्गाच्या सान्निध्यात आपण अंतर्मुख होतो. मन शांत होतं आणि देवाशी जवळीक साधतो. तुकोबांनी भंडारा म्हणूनच गाठला. अशा वातावरणाला मी मंत्रमुग्ध करणारं वातावरण म्हणेल. निसर्गाच्या नितळ स्वरूप मंत्राने आलेली मुग्दधता.>>>> वा! किती छान सांगितलंत. विशेष करून शेवटच वाक्य.

पुढच्या वर्षी अमेरिकेतील भेटीत जायलाच हवे! >>> एक छोटी टीप. ते स्लॉट शनिवारी सकाळी ( बहुदा ९ वाजता) उघडतात आणि काही मिनिटातच (५ मिनिटाच्या आत असे ऐकले आहे) भरून जातात..

झंपी हो.

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

छान लेख आणि फोटो...
आस्तिक नसलो तरी असे शांत, निसर्गरम्य मंदिर परिसर आवडतात
सुरुवातीचे सांताक्रूझ वाचून क्षणभर कन्फ्युज झालो होतो Happy

सुरुवातीचे सांताक्रूझ वाचून क्षणभर कन्फ्युज झालो होतो >>> अनेक वर्षांपूर्वी मी ही झालेले, माझा एक भाचा अमेरिकेत होता तेव्हा तिथल्या सांताक्रूझला होता म्हणून माहिती होतं पण पहिल्यांदा ऐकलं तो सांताक्रूझला असतो तर मी म्हटलं तो इथे परत कधी आला आणि तेही मुंबईत कारण तो मुंबईतला नव्हता.

हो ना..
तरी पुढे पर्वतरांगा वाचल्यामुळे हे काहीतरी वेगळे असावे असे लक्षात आले, अन्यथा पुढे गिलरॉय ऐवजी आपसूक गिरगाव नाहीतर गोरेगाव वाचले गेले असते Happy