मेघे ढका तारा (भाग १)

Submitted by Abuva on 12 April, 2025 - 03:26

"मैं बिभुतीमनोज कर्माकर, लोग मुझे कमल बोलते है."
"हाईईई कमल!"

मिहिरचा थकलेला, मुर्झावलेला चेहेरा लख्खकन उजळला. गेल्या अडतीस-चाळीस तासातला पहिला माणूस ज्याची काही नाही तर नावानं तरी ओळख होती. मुंबई विमानतळावर वडिलांचा काचेपलिकडे दिसणारा चेहेरा बघून किती तास झाले असतील? बारा तास मुंबई ते लंडन. मग तिथे सहा तास. आणि हे आता सोळा का अठरा तास. खूप झाले. तीन खंड ओलांडून आता इथे पोहोचलाय. त्यात आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास. तो हा असा. म्हणजे काय? तर लंडनहून कनेक्टींग फ्लाईट लेट. कुठल्या तरी विमानतळावर झालेल्या अपघातानं सगळ्या युरोपियन विमानतळांची शिस्त बिघडवली होती. जो चार वाजता पोहोचायचा तो रात्री आठ वाजता पोहोचला. इथे पोहोचला तर बॅगा आलेल्या नाहीत! पहिल्याच प्रवासात किती म्हणून ती विघ्नं... बरं, सगळे जणं बोलत इंग्लिश होते, पण कळत काहीच नव्हतं! प्रत्येकाचा ऍक्सेंट वेगळा, वेगळी बोलीभाषा... त्यात विमानतळांची सगळी व्यवधानं पाळताना मिहिरची त्रेधातिरपीट उडली होती. इथे उतरला तेंव्हा त्या टेंशननं जणु आधीच अर्धमेला झाला होता. पण इथे बॅग आल्या नाहीत तेंव्हा त्या एजंटशी बोलताना अक्षरशः रडवेला झाला होता. काही म्हणजे काहीच कळेना एकमेकांचं बोलणं. त्याचं पतवा इंग्लिश आणि याचं सदाशिव पेठी प्राज्ञ इंग्रजी... मग एक बाई मदतीला सरसावली. तिनं संथ, सावकाश, प्रत्येक शब्द सुटासुटा उच्चारून, तो ही जरा उंच आवाजात, माहिती दिली तेंव्हा कुठे मामला सुलझला. कळलं की बॅगा उद्या येतील आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्या जातील. मग नुसतीच खांद्यावरची बॅग सावरत तो एक्झिट मधून बाहेर पडला.
तो बाहेर आला तेंव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. ही येणारी शेवटचीच फ्लाईट होती. आणि त्यातलाही मिहिर हा बाहेर पडणारा बहुतेक शेवटचाच. त्यामुळे कमल आणि मिहिरला एकमेकांची ओळख पटायला काहीच वेळ लागला नाही. चटचट पावलं उचलत, मिहिरच्या दिशेनं येत कमल म्हणाला, "मैं बिभुतीमनोज कर्माकर, लोग मुझे कमल बोलते है.."
"हाय कमल!" मिहिरनं दीर्घ निश्वास सोडला. पोहोचलो!
ही त्यांची पहिलीच भेट होती. पण प्रॉजेक्टसंदर्भात फोनवर बरेचदा बोलणं झालं होतं. कमलच्याच घरी मिहिरची रहाण्याची सोय केली होती. एका अर्थानं पेइंग गेस्ट म्हणा. एकंदर या देशातली रहाण्याजेवण्याची सोय, चढी भाडी बघता, प्रत्येक फॅमिली असा एक गेस्ट ठेवणं पसंत करी.
सलामालकीची बोलणी झाली. आणि मिहिरला कर्बवर उभं करून कमल पार्क केलेली गाडी आणायला गेला. विमानतळाच्या एसी हॉल मधून बाहेर आल्यावर मिहिरला गरम जाणवत होतं. पण ती गरमी पुण्याच्या उन्हाळ्याशी नातं सांगणारी होती. हवेतला दमटपणा सांगत होती की समुद्र किनारा जवळच आहे. आजूबाजूचे वृक्ष, फुलझाडं सगळी ओळखीची वाटत होती. हिथ्रोहून गॅटविकला जाताना जी निसर्गाची नवलाई वाटली ती इथे नव्हती. मात्र आजूबाजूची मंडळी वर्णानं पक्की आणि भाषेनं परकी दिसत होती. ही अमेरिकन पिक्चर मध्ये खलनायक म्हणून दिसणारी मंडळी, इथे मात्र बोलकी, हसरी दिसत होती, मानवी वाटत होती! तेवढ्यात कमल आलाच.
एखादा कोकणातला रस्ता असावा तसा समुद्र किनाऱ्यावरून सुरू झालेला प्रवास, नागमोडी वळणं घेत, डोंगर झाडीच्या कडेने शहराच्या दिशेने निघाला होता. मधे तळ्यासारखा समुद्र होता. पलिकडच्या काठावर अंधारात विमानतळाच्या खुणा दिसत होत्या. आणि या काठावर शहराच्या. कुठेतरी गोव्यातल्या पोर्तुगीज वास्तूंशी साधर्म्य सांगणारी घरं, उशीर झाल्यानं बहुतांश रिकामे दोन लेनचे रस्ते, आणि त्यांवर पिवळ्या हेलियमच्या प्रकाशाची पखरण... शिणलेल्या मिहिरला कमलशी संवाद साधताना हे सगळं जाणवत होतं. कमलची बंगाली साज ल्यालेली इंग्लिश मिश्रीत हिंदी, गाडीतल्या कॅसेटवर चालू असलेली मंद स्वरातली हिंदी गाणी त्याला एक सुकून देत होती. या अनवट देशी येण्याचं धाडस अनाठायी नाही हे सांगत होती.

कमल त्याला इथे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत, कोणकोण कुठल्या प्रोजेक्टवर कामं करतात, ऑफिस कुठे आहे, जाण्यायेण्याची सोय वगैरे बाबींची जुजबी माहिती देत होता. रस्त्यात लागणारे छोटे-मोठे लॅन्डमार्क्स दाखवत होता. सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर ते घरी पोहोचले.
दुमजली, बैठ्या घरांचा तो कॉम्प्लेक्स वनराजीत दडला होता. कॉरीडॉर आणि पॅसेज पिवळ्या दिव्यांनी उजळले होते. मधोमध असलेला निळ्या रंगात उजळलेला स्विमींग पूल पाहून मिहिरला शालेय अभ्यासक्रमात वाचलेल्या ब्ल्यू कारबंकलची कोण जाणे उगीचच आठवण आली.
लाकडी दारावर टकटक केल्यावर "कमिंग" असा आतनं प्रतिसाद आला. कमलची बायको दरवाजा उघडताच म्हणाली, "या, या, चांगलाच उशीर झाला रे तुम्हाला! मी कधीची वाट बघते आहे."
आत येताच कमलने त्यांची ओळख करून दिली - "ये मेरा वाइफ सरोज ऍन्ड ये मिहिर है"
"हाय मिहिर! कैसा था सफर, थकला असशील ना, किती लेट झाली फ्लाईट.."
कमल म्हणाला, "चार घंटा, साला मै बोर हो ग्या येरपोर्ट पे. सांगतही नव्हते किती लेट आहे ते..."
"मग चहा हवा का तुला आत्ता का तू कॉफी पितोस?"
"नको. आत्ता तसं काही नकोय खरं..."
कमलनं विचारलं, "तो क्या लोगे? रम किंवा बीअर हवीये? मी आता रम घेणार आहे. वैतागलोय मी वाट पाहून पाहून!" त्यानं व्हरांड्याकडे जात एका कॅबिनेटकडे निर्देश केला.
मिहिर बावचळला. क्षणभर त्याला काय बोलावे कळलं नाही. कुणाच्या घरी ड्रिंक्सची ऑफर मिळण्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग होता. कमलच्या पाठोपाठ मागे गेलेल्या त्याच्या दृष्टीला तो लिव्हिंग रुम लगतचा व्हरांडा, त्या पलिकडचं छोटसं लॉन आणि शोभेची झाडं मंद पिवळ्या प्रकाशात दिसली. घराच्या सुबकपणाची जाणीव मनाला झाली.
सरोज पाणी घेऊन किचनमधून बाहेर येत होती. तिनं मिहिरचा गोंधळ जाणला.
"कमल, आतेही तुम उसको तंग मत करो. मिहिर, तू अंघोळ करून घे पहिल्यांदा. तुला एकदम फ्रेश वाटेल."
"कमल, पहिल्यांदा त्याला रूम तो बताओ..."
कमलचा मूड आता बनला होता. त्याला इंटरप्शन नको होतं. "यार, तुम दिखा दो ना, तिथेच तर उभी आहेस..."
सरोजनं मान हलवली, "कम मिहिर, अब कमल नही मानेगा!"
"अरे! तुझं सामान कुठाय?", इतका वेळ तिच्या लक्षातच आलं नव्हतं.
मग मिहिरनं ती कथा सांगितली.
"पण आत्ता तुझ्याकडे आहेत का कपडे बदलायला? का देऊ?"
असं ती म्हणेपर्यंत मिहिर घाईघाईत म्हणाला, "नको! आहेत माझ्याकडे. आम्हाला निघतानाच सांगितलं होतं, एका दिवसाचे कपडे हॅन्ड लगेजमध्ये घेऊन जायला..."
सरोज हसत म्हणाली, "वहां सुब्बुसर है ना! फिर तो कोई टेन्शनही नही है! त्यांचं म्हणजे सगळं काम परफेक्ट असतं." सरोजच्या तोंडून सुब्बुसरांचं कौतुक ऐकून मिहिर सुखावला.
त्याच्या खोलीचं दार उघडून सरोज आत गेली. तिनं त्याला कपाट, बाथरूम सगळं दाखवलं.
बाथरूम उघडून त्याला थंड-गरम पाणी नीट दाखवलं.
"आपली मेड उद्या सकाळी येईल. तिला सगळे कपडे धुवायला दे. तू आत्ता धुवत बसू नको बरं का! ती वॉशिंग मशीनमध्ये धुवेल." सरोजनं सूचना दिली. मिहिरला सगळे कपडे मधल्या सगळ्यावर तिनं दिलेला किंचित जोरही जाणवला.
"ये पटकन, मी तोवर जेवण गरम करते", असं म्हणून ती जाताना दरवाजा ओढून गेली.

हॅन्डबॅगेतून कपडे काढायला मिहिर क्षणभर खाली बसला. आणि त्याच्या अंगातली शक्तीच संपल्यासारखा ढेपाळला. दोन दिवस आणलेल्या उसन्या‌ अवसानाची ही परिणती होती! इथेच असंच झोपावं अशी तीव्र उर्मी त्याला झाली. पण नाही... दोन चार दीर्घ श्वास घेऊन त्यानं बॅग उघडली. कंगवा, दाढीचं सामान सगळं काढून बाथरूममधल्या बेसिनवर ठेवलं. परत येऊन कपडे बॅगेतून काढले, बेडवर मांडून ठेवले. कपाटातला टॉवेल घेऊन तो बाथरूममध्ये गेला. बऱ्याच काळानं त्यानं आपला चेहेरा आरशात पाहिला होता. थकलेल्या चेहेऱ्यावर वाढलेली खुंटं, चुरगाळलेले कपडे, विस्कटलेले केस... मिहिरला आपण इतके गचाळ दिसतो आहे याची लाज वाटली. काय झालं असेल त्या दोघांचं आपल्याविषयी फर्स्ट इंप्रेशन? त्यानं झटकन दाढी करण्याचं ठरवलं...

सरोज कमलपेक्षा एखाद इंच उंचच असेल नै आणि त्याच्या मानानं यंग वाटतेय. बुटका, पोट सुटलेला, जाड काचांचा नाकावरून घसरणारा चष्मा, अन्  गबाळ्या ढगळ कपड्यातल्या कमलच्या मानानं, घरीच होती तरी सरोज टापटीप दिसतेय. खेळाडू असावी. म्हणजे तसं स्ट्रक्चर आहे, नै? कमल पितो हे तर सगळ्या कंपनीला माहितीये. त्यांच्या पार्ट्यांच्या कथा फेमसैत. त्यांना मुलगाय ना? झोपला असेल. बाहेर गेल्यावर विचारू. नाही तर वाईट दिसेल.
घरी कसं कळवायचं? जाऊ दे, ऑफिसातून कळवतील. - मिहिरचे विचार चालू होते.

गरम पाण्याच्या शॉवरनंतर त्याला जरा तरतरी आली. बाहेर येऊन कपडे बघतोय तर घरी घालण्याचा टीशर्ट विसरलेला! झक मारली तिच्यायला... आता? दुसरा शर्ट आहे तो उद्या ऑफिससाठी लागेल. त्याआधी काही सामान येणार नाही. मग आता? मागा कमलला...

त्यानं दरवाजा उघडला. समोरच हातात पुस्तक घेऊन सरोज बसली होती. दरवाज्याच्या हालचालीनं तिचं लक्ष गेलं. आपण नुस्त्या शॉर्टवर बाहेर आलोय आणि सरोज तिथे आहे हे लक्षात आल्याबरोबर मिहिर गर्रकन फिरून आत आला. त्याला तसा पाहताच सरोज चमकली, अन् गडबडून उठली.  टॉवेल दोन्ही खांद्यांवरून घेउन मिहिर परत बाहेर आला.
"चलो खाना लगाती हूं..."
पण मिहिरला कमल कुठेच दिसे ना. तो तसाच उभा राहिला. सरोजला त्याची दुविधा लक्षात आली. तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं.
"मी नं घरी घालायचा टीशर्ट विसरलोय... एखादा आहे का..." अडखळत, लाजत मिहिर म्हणाला.
"देते ना..." असं म्हणत सरोज त्यांच्या बेडरूममध्ये गेली. 
तिनं कमलचं कपाट उघडायला हात घातला. तिच्या डोळ्यांसमोर पावणेसहा फूट उंच मिहिर आला. नुकतेच अंघोळ केल्यानं चमकणारी काळीभोर बेगुमान झुल्पं, गोरा वर्ण, एखाद्या खेळाडूसारखं कातीव शरीर, ऐन विशीतला तजेला...  अचानक विचार बदलून तिनं आपलं कपाट उघडलं, आणि उचकपाचक करून स्वतःचा एक नवा कोरा टीशर्ट शोधून काढला. 'त्याला माझा टीशर्ट बरोबर येईल...' आणि ती स्वतःशीच खुदकन हसली.
ती खोलीतून बाहेर येण्यापूर्वी कमल आत आला होता. मिहिरला पाहताच म्हणाला, "हो गया तैयार?!"
मिहिरनं सांगितलं की त्यानं सरोजला टीशर्ट मागितलाय.
हे बोलणे होई पर्यंत सरोज आलीच. तिनं मिहिरला टीशर्ट दिला. "हा घे". तो घेऊन मिहिर आत वळला.
सरोज कमलला उद्देशून म्हणाली, "माझाच दिलाय, बरोबर येईल त्याला. तुझा दिला असता तर त्यात बेंगरूळ दिसला असता!"
कमल काहीच बोलला नाही. तो ग्लास भरून घेऊन परत बाहेर गेला.

सरोजनं डायनिंग टेबलवर सगळं मांडलं. सगळे जेवले. जेवताना कमल गप्पच होता. त्याला थोडी जास्त झाली असावी हे कळत होतं. सरोजनं त्याला त्यावरून छेडलंही. पण तो कळण्यापलिकडे गेला होता. यांची जेवणं आटपण्याआधीच तो गुड नाईट करून नाहीसा झाला होता.

---

गुड नाईट‌करून मिहिर खोलीत गेला खरा, पण त्याला धड झोप लागलीच नाही. जेटलॅगचा हा त्याचा पहिलाच अनुभव! कसाबसा तळमळत पाच साडेपाच पर्यंत गादीवर पडला होता. मग मात्र फटफटलं हे पाहून उठला. आटपून बाहेर आला‌ आणि लॉनकडे बघत उभा राहिला. तसा अंधार होता. लॉनकडेची शोभेची झाडं अगदी कंपौंडच्या भिंतीपर्यंत टेकली होती. एक छान आडोसा म्हणा, कोपरा म्हणा तयार झाला होता.
चाहूल लागून त्यानं मागे पाहिलं तर सरोज बेडरूममधून बाहेर येत होती. तिच्या हातात शिशिर होता. तिनं मिहिरला बघण्याआधीच मिहिरनं गुड मॉर्निंग घातला. ती जरा दचकलीच. "अरे! गुड मॉर्निंग मिहिर, इतक्या लवकर उठलास?"
"झोपच नाही आली धड..." मिहिर करवादला.
"बरोबर, जेट लॅग ना!" ती म्हणाली.
"बरं बस, शिशिरकडे बघशील? तू काय घेशील? मी सकाळी चहा घेते."
"हो, मी पण!"
शिशिरला बॅसिनेटमधे टाकून ती किचनकडे वळली.
मिहिर शिशिरशी खेळायला लागला. लवकरच त्यांची गट्टी जमली. पाच-सात मिनिटांत शिशिर खिदळायला लागला. चहा-बिस्किटं घेऊन आलेली सरोज ते बघत उभी राहिली. "घे चहा.."
चहा घेता घेता ती विचार करत होती. "मिहिर तू आणखी अर्धा तास शिशिरला बघशील?"
"हो!"
"मी‌ खूप दिवसांत मॉर्निंग रनला गेले नाहीये. आज तू आहेस तर जाऊन येते!"
"हो जरूर"
ती‌ पटकन आत जाऊन ट्रॅक सूट चढवून आली.
"मी कॉंप्लेक्सलाच राऊंड मारतेय. हे इथून समोरूनच. त्यामुळे काळजी नाहीये. आणि तरी‌ काही वाटलंच तर कमलला आवाज दे. ठीकै?"
"अगदी.."
झटकन स्नीकर्स चढवून ती‌ गेलीच.
थोड्याच वेळात ती लॉन पलिकडून धावत गेली. जाताना ती हात हलवून हसली. मिहिरला‌ आश्चर्यच वाटलं. तिची स्ट्राईड, तिची गेट, तिचा धावण्याचा वेग,... आयला, ही तर प्रोफेशनल रनर वाटतेय! त्याची‌ नजर दूर जाणाऱ्या, पाठमोऱ्या सरोजवर खिळली होती. तिच्या पाठीवर पोनीटेल डौलात नाचत होते.

बॅसिनेटमधे शिशिर तोंडांत अंगठा घालून शांत पडला होता. शेजारी बसल्याबसल्या मिहिरवर झोपेचा अंमल चढत होता.

सरोज परत आली तेंव्हा मिहिर बॅसिनेटवर डोकं‌ टेकवून खुर्चीतच गाढ झोपला होता! आणि शिशिर? ते शहाणं बाळ,‌ अंगठा चोखत  तिची‌ वाट‌ पहात होतं...

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा, अजून एक IT onsite आणि भावना यांची मेळ घालणारी उत्कट कथा..
फक्त काही ठिकाणी ती कमल आणि तो सरोज असे झाले आहे. तेवढे संपादित करा.
उदा: सरोजनं मान हलवली, "कम मिहिर, अब सरोज नही मानेगा!"

धन्यवाद धनवन्ती! पोस्टायच्या आधी चार वेळा तरी वाचली होती, पण हे गफले कसे रहातात कळत नाही! म्हणजे खरं वाचन नसतंच ते..

धन्यवाद केकू!
सॉरी, या वेळी जास्तच चुका झालेल्या दिसताहेत.