एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणारी बीड जिल्ह्यातील इन्फन्ट संस्था.

Submitted by Srd on 9 April, 2025 - 21:17

एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणारी बीड जिल्ह्यातील इन्फन्ट संस्था.

लेखक दत्ता बारगजे यांनी "फकिरी
- एक अनघड प्रवास" (-राजहंस प्रकाशन, जानेवारी २०२४.) या पुस्तकात एड्सग्रस्त मुलांसाठी सुरू केलेल्या इन्फन्ट या संस्थेची माहिती दिली आहे.
लेखक स्वतः गरीबीतून वर आला. पॅथालॉजीचं शिक्षण घेतले. सरकारी नोकरीत 'चहापाणी' खर्च करू न शकल्याने दूरवर भामरागड येथे बदली दिली. तिथून आदिवासी,गोंड लोकांशी संबंध आला. एड्सग्रस्त मुलांशी संबंध आला. त्यांच्या हाल अपेष्टा, अपमानित जिणं कळलं.

डिसेंबर १९९९ मध्ये बाबा आमटे यांच्याशी बोलणं झालं. समाजसेवेचं खूळ डोक्यात शिरलं होतं. बाबा म्हणाले " त्या काळी कुष्ठरोग ही समस्या होती आता एचआइव्ही एड्स आहे. पण याल नैतिकचेही जोड आहे." ठरलं हेच काम करायचं पण २००६ पर्यंत काहीच झालं नाही. नोकरीत असतानाच बाल समितीमधून काम सुरू केलं. रक्तदान शिबीर आयोजित केलं. एका एड्सने मेलेल्या मुलांच्या बापाकडून दहा लाखांची जमीन डोंगरावर घेतली.
बायको संध्या हिच्या सहकाऱ्याने या मुलांसाठी संस्था काढली. इन्फन्ट. जिल्हा बीड. तिथे ना पाणी ना आसरा. तरीही तात्पुरती सोय केली. दूरवरून नदीवरून पाणी मुलंच आणायची. शाळेसाठी खालच्या गावातल्या शाळेत पाठवलं तर गावकऱ्यांनी विरोध केला. इथेच त्रासाला सुरुवात झाली. ही मुलं आली तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. सर्वांनी मुलांना काढून घ्यायचे अर्ज केले. मालकाने जागा विकली तरी गाववाल्यांच्या नादी लागून त्रास देऊ लागला.मारहाण करून अट्रोसिटी केस टाकली. शाळेत शेतातून जाण्याच्या वाटेवर तिथले शेतकरी काटेकुटे टाकून मुलांना जाऊ देईनात. हा त्रास अजूनही दोन वर्षांपर्यंत सुरूच होता. प्राथमिक शाळा डोंगरावर काढली. पण पुढे मोठ्या शाळेत गावकरी येऊ देईनात.
तर दुसरीकडे यांचे काम पाहून विविध समाजोपयोगी संस्था मदतीला धावल्या. त्यांनी शाळा बांधून दिली. चांगले संडास बांधून दिले. वस्तीगृह दिले.काही सरकारी अधिकारी डॉ तसेच मंत्री यांनीही वेळोवेळी मदत केली. अय्यर साहेबांची भेट हा एक मजेशिर किस्सा आहे. स्टँप ड्यूटी फी दोन लाख छत्तीस हजार रुपये भरण्यासाठी अय्यर साहेबांनीच चेक दिला. दत्ताची तीन मुलंही इकडेच शिकली आणि मदतीला आली. जी मुलं पूर्वी आली होती ती आता तरुण झाली होती. प्रश्न लग्नाचा होता. मग एड्सग्रस्त मुला मुलींची लग्न करवून दिली. त्यांना मुलं झाली ती मात्र एड्स निगेटिव निघाली. अशी आता दहा बाळं आहेत.
बीड जिल्हा सध्या वेगळ्याच कारणास्तव गाजत आहे पण हा इतिहास वेगळा आहे. समाजाचा रोष कायम आहेच. एड्सग्रस्त मुलांकडे सहानुभूतीने पाहात नाहीत. जगभरातील, महाराष्ट्रातील परोपकारी संस्था, लोक यांच्या मदतीने इन्फन्ट संस्था जोरात चालली आहे . सरकारी मदत नाही.
पुस्तकात भरपूर फोटोंसहीत दत्ता बारगजे यांनी सगळी कहाणी मांडली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! पुस्तक चांगलं असेल. दत्ता बारगजेंना भेटलो होतो. एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवास केला होता पुणे- बार्शी- बीड- लातूर- नांदेड- अकोला- परभणी, त्यावेळी. चांगलं काम आहे त्यांचं. त्याबद्दल लेखही लिहीला होता.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

दत्ता बारगजे यांना (त्यांच्या बायकोलाही) दंडवत खरोखर. ह्या क्षेत्रात एवढ्या अडचणी पार करून काम करणे हे विचारशक्तीच्या पलीकडे आहे.

एच आय व्ही ग्रस्त म्हणतात बहुतेक. भरत यांचे बरोबर वाटतं.