मागे वळून पाहताना

Submitted by रेव्यु on 29 March, 2025 - 02:49

मागे वळून पाहताना

nnn_0.jpg

झाली चौदा वर्षं निवृत्त होऊन
विश्वासच बसत नाही
कारण आधीपेक्षा
अधिक व्यस्त अन आनंदी आहे

बोलणारे आणि लिहिलेले शब्द
माझे साथी अन सोयरे झालेत
माझी पुस्तके
माझे आवडते सवंगडी झालेत
अनेक दशके ते माझी
वाट पाहत होते

देश अन विदेशातील
गायक अन गीतकार
जणू माझ्याच साठी
गाताहेत अन रचना करताहेत
माझे जीवन समृध्द करताहेत

मी देश विदेशात
स्वच्छंद हिंडतोय
माझ्या प्रियेसह
अन मला प्रचिती झालिये
हे विश्वच माझे घर आहे
मानवी स्वभावात
जिव्हाळा व्यापून राहिला आहे

अनेक पाककला
अन चविष्ट अन्न चाखलंय
अन मी त्यांच्याही प्रेमात पडलोय
इतक्या भिन्नतेत देखील
आपपर भाव जणू नष्ट झालाय

माझे विद्यार्थी
मला खूप शिकवून गेलेत
आव्हान देत राहिलेत
त्यांच्या संगतीत पैलतीर
दिसेनासा झालाय

वाटतं कधी कधी विषण्ण
पण ते गतकाल विव्हलतेने असतं
क्षणैक असतं
अन मी पुन्हा वाटसरू बनतो

खूप देश पहायचे आहेत
बरंच संगीत वाट पाहतंय
अनेक पर्वत, दर्‍या, मंदिरे
चर्चेस अन मशिदी साद घालताहेत
त्यांच्या संस्कृती खुणावताहेत

या आतुरतेत
सभोवतालचे क्रौर्य, कोलाहल
आप्पलपोटेपणा क्षुद्र वाटू लागतो
जे भव्य पाहिलंय, जे थोर अनुभवलय
अन जे अजून राहिलंय
ते मला आशावादी बनवतंय

कारण मला ठाऊक आहे
आनंद आहे कुतुहलात
थोडे मूर्ख बनण्यात
उपकृत राहण्यात, निरागस राहण्यात

मग हजारो वर्षाचे जीवन देखील अपुरे वाटेल
कारण निरागस बाळाचे स्मित
अन वृध्देचे थरथरत्या हाताने दिलेले आशिर्वाद
पुढे जाण्यास प्रेरणा देईल

आज मी काहीसा पती आहे, वडिल अन भाऊ आहे
काहीसा कवि आहे,
पण त्याहून अधिक मी अधिक चांगला
माणूस बनू शकलो आहे
आणि म्हणूनच
या जगण्यावर, या जन्मावर
शतदा प्रेम करतोय

शेवटी आयुष्य म्हणजे
उगवत्या सूर्याची किरणे,
मावळत्या संध्याछाया
दवबिंदु अन शीतल चांदणे
मनातले अन बाहेरचे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Sundar.

सुंदर पॉझिटिव्ह कविता . खूप आवडली
असं जगायला पाहिजे नाहीतर काहीजण आयुष्याचा उत्तरार्ध वाया घालवतात .
पुढील वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.