भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या धाग्याची सुरुवात किस्स्याने

आम्ही नेहमीच्या प्रमाणे ग्राउंडवर जायला निघालो, मोपेडवर हा समोर उभा पायात. वाटेत कॅनाल रोडला सिग्नल असतो म्हणजे ट्राफिक वॉर्डन थांबवतात तसं थांबलेलो. शेजारून एक मोपेड आली, आई आणि केजी किंवा पहिली दुसरी च्या वयातली मुलगी, पाठीला दप्तर टाईप सॅक वगैरे, बहुदा डे केअर मधून घरी जात असावेत. ती छोटी पोरगी हातात क्रीम बिस्किटाचा पुडा घेऊन एक खात होती. गाडी बऱ्यापैकी खेटून थांबली आम्हाला. ओडिनला बघताना कन्येने आईला उत्साहात सांगितले ते बघ कसलं भुभु आहे ते.
आईने एकदा बघून न बघितल्यासारखं केलं.
तोवर त्या पोरीला काय वाटलं, तिने तिचे बिस्कीट ओडिन च्या तोंडासमोर धरलं आणि विचारलं खाणार?
आता तिची काय अपेक्षा होती की ओडिन म्हणेल नाही नको माझं जेवण झालंय नुकतंच, किंवा नाही नको तू खा वगैरे.
ओडीच्या नाकासमोर बिस्कीट म्हणताक्षणी त्याने झुपकन ते कधी घेतलं कधी त्याच्या पोटात गेलं कळलंच नाही. त्या मुलीलाही दोन सेकंद काही कळलं नाही आणि मग एकदम तिला स्राईक झालं की आपलं बिस्कीट याने खाल्लं.
झालं तिने एकदम ठणाणा करत रडायला सुरू केलं, सगळेच बघायला लागले.
मला एकदम वाटलं की याचा दात लागला म्हणून रडते का काय, पोटात एकदम धस्स झालं म्हणलं आता होतोय राडा.
पण सुदैवाने तसलं काही नव्हतं एकदम सर्जिकल सफाईने त्याने बिस्कीट काढून घेतलेलं.
ती पाय आपटून रडत म्हणायला लागली डॉगी ने माझं बिस्कीट खाल्लं.
तोवर सिग्नल सुटला तिची आई पण कँफुज की काय आता. मी थोडं पुढे जाऊन थांबलो आणि म्हणालो मी विकत घेऊन देतो थांबा एक बिस्कीट चा पुडा.
पण सुदैवाने आई खूपच समंजस निघाली, ती म्हणे छे हो, त्या कुत्र्याची काय चूक, हिने त्याच्या तोंडासमोर धरल्यावर तो खाणारच ना.
मी म्हनलं दात नाही ना लागला,मला ते बिस्कीटपेक्षा ती धास्ती जास्त. आईने विचारलं तर मुलगी रडत रडत नाही म्हणाली.
आई म्हणे तिला तू दिल त्याने खाल्लं आता नाई रडायचं आणि अक्खा पुडा आहे तुझ्या हातात, तो खा आता गपचूप. असं म्हणत मायलेकी निघून गेल्या
या सगळ्यात ऑड्या कमालीच्या स्थितप्रज्ञ अवस्थेत मस्त निवांत मज्जा बघत होता.
म्हनलं अरे असं बिस्कीट घेतात का कुणाचं, तर म्हणाला तिच्या हातात असताना नाही घेतलं, तिने विचारलं त्यानंतरच मी घेतलं.
आणि ग्राउंड आलं तसा काहीच न घडल्यासारखा निवांत हिंडायला लागला
म्हनलं कर्म माझं Happy

Lol कसला धमाल किस्सा आहे! ओडिनचं काही चुकलं नाही. तिने त्याच्यासमोर धरले तर तो काय करणार Happy फनी सीन असेल एकूण.
आई समजूतदार निघाली हे बरं झालं पण.
* वरचा फोटो कसला कमालीचा गोजिरवाणा आलाय!!

फनी आता वाटतंय तेव्हा माझी तांतरली होती
बरं हे इतक्या फास्ट झालं की अगदी माझ्या डोळ्यासमोर
म्हणजे थोडं जरी वाटलं असतं की ती बिस्कीट पुढे करेल वगैरे तर मी तिला आधीच नाही नको वगैरे म्हणालो असतो
पण तिने अगदीच अनपेक्षितपणे बिस्किटाचा हात पुढे केला
बर दोन गाड्या इतक्या जवळ होत्या की तिने अगदी हात असा खूप लांब वगैरे पण नाही केला, जस्ट असं दाखवायला गेली असावी किंवा काय देव जाणे डोक्यात काय आलं असेल तिच्या
असं तो हातातून बिस्कीट गायब करेल याची तिला बिलकुल कल्पना नसणारे Happy

ओडूचा फोटो एकदम सही… आणि किस्सा तर लै भारी. लॅब आहे तो, खाण्याला कधीही नाही म्हणू नये हि शिकवण त्यांच्या रक्तातच आहे.

सगळ्या भूभूंच्या फोटोचा कोलाज करून लावला पाहिजे या धाग्यावर.

धमाल किस्सा Lol तिला अनेक्पेक्टेड असणार, जसं लहान मुलांबरोबर मोठी लोक म्हणतात ,तुझा खाऊ दे पण खात नाहीत .
धाग्यातला फोटो गोड आहे ओडिनचा Happy

बिस्किटसारखाच गोड ओडू!

काल एक रिल पाहिलं.. भलामोठा लॅब एस्केलेटरवरून खाली जायला घाबरत होता. हटूनच बसला, मग क्यूट पद्धतीने कडेवर घे असं त्याच्या मालकाला सांगितलं बहुतेक. एवढं धूड घेऊन त्याचा मालक मग सरकत्या जिन्यावरून खाली गेला. एवढं हसू आलं मला... म्हटलं कितीही वाढले तरी हे बेबीजच राहतात जन्मभर.

>> आता तिची काय अपेक्षा होती की ओडिन म्हणेल नाही नको माझं जेवण झालंय नुकतंच, किंवा नाही नको तू खा वगैरे.>> Lol किस्सा मस्तच.

भारी किस्सा आणी गोड फोटो आहे ओडिनचा!
मला सेम रिल आठ्वल बघितल्याच त्यात पण ते बेबी कुकि देवुन टाकत आणि डॉगिने खाल्ल्यावर त्याच्या लक्षात येत..मग काय मोठ्याने भोक्काड

हाहा ओड्या गोड्या...
मागच्या धाग्यावर मस्त फोटो होते एक एक प्रतिसाद द्यायचा राहिलेला..

सगळ्या भूभूंच्या फोटोचा कोलाज करून लावला पाहिजे या धाग्यावर.>>>

मला करून पाठवा, माझा लॅपटॉप अगदीच डबघाईला आलाय
त्यावर हे कोलाज वगैरे जमणार नाही
मी हेडर मध्ये टाकतो
आधीच करायला हवं होतं, सगळ्या बाळाचा एकत्रित फोटो

भलामोठा लॅब एस्केलेटरवरून खाली जायला घाबरत होता.>>

हे होतं आमच्याकडे पण, एकदम वरच्या गच्चीवर जायला लोखंडी जिना आहे, पट्ट्या मारलेला, त्यावरून चढून जातो पण येताना घाबरतो आणि तिथंच कुई कुई करत रडत बसतो. म्हणलं येता येत नाही खाली तर जातो कशाला
दोन चार वेळा उचलून आणला खाली. इतकं धूड त्या बारक्या जिन्यावरून आणणे ही मोठी कसरत आहे, आपणच तोल जाऊन पडायची भीती. मग एकदा पेशन्स संपला आणि त्याला दिलं ढकलून खाली. कडमडत कसातरी आला मग कळलं त्याच त्यालाच की उतरता पण येतं. तरी अगदी हळूहळू सावकाश अंदाज घेत घेत उतरतो.
अजून इस्क्लेतर पहिला नाहीये त्याने, काय करेल माहिती नाही पण एकंदरीतच जीवाला जपून असल्याने नसते धाडस करणार नाही

bhubhumau.jpg
हा पहा मी प्रयत्न केला आहे कोलाज चा.

हरितात्या- तो अ‍ॅडमिन (समीर) चा भुभू आहे "सिलू अ‍ॅटिकस" असं भारदस्त नाव आहे. तो दिसतोय ही तसाच Happy
आशूचँप : हे कोलाज आता या धाग्याच्या हेडर मधे वापरता येईल का? - तुम्हाला कॉपी पेस्ट करता येईल ते.

कोलाज मस्त!
कोकोनट एकदम नाहु-माखु घालुन आणल्यासारखा तजेलदार दिसतोय.

कोकोनट अगदी खोबर्‍याच्या वडीसारखा दिसतो आहे Happy
त्या पाण्याजवळच्या फोटोत तर चेहर्‍यावरचे भाव बघण्यासारखे आहेत.

Pages