निसर्ग आणि कविता म्हटलं की पहिले आठवतात बालकवी. त्यांच्या निसर्गकविता आपल्या शाळेपासूनच्या सोबती. फुले, वेली, तारे, झरे, पक्षी या सगळ्याचं जणून समूहगान त्यांच्या कवितांत असते. त्या तशा निर्मनुष्य असतात. कुठे माणसांचे उल्लेख दिसत नाहीत. मग मानवी भावभावनाही निसर्गावरच आरोपित करतात. त्यांच्या नंतरच्या कविता पाहिल्या तर कठोर आयुष्याच्या वास्तवाच्या झळा सोसवेनात म्हणून तर ते निसर्गात रममाण होत नव्हते ना ? असा प्रश्न पडतो. जीवनव्यवहाराकडे पाठ फिरवून "पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर"?
बालकवींपाठोपाठ पंचेंद्रियांनी जीवनाचा आणि निसर्गाचा आस्वाद घेणारे आणि पोचवणारे बा. भ. बोरकर आठवतात. रानातल्या, पावसाच्या कविता लिहिणारे ना.धों महानोर आठवतात.
इंदिरा संतांच्या कविता वाचताना निसर्ग हा त्यांचा सोबती आहे असं जाणवलं. दु:ख हा त्यांच्या अनेक कवितांचा सहजभाव. त्यांच्या कवितेतलं दु:ख ट्रॅडिशनल डे पुरतं नऊवारी नेसून तिचा भार पेलवत मिरवत नाही; तर ती रोजच नेसत असल्यासारखं सहज वागवतं. ते टाहो फोडून आक्रोश करत नाही. सहज श्वास घेतं, उसासे सोडतं. हे दु:ख आधी सहचराच्या आजारपणाचं, मग त्याच्या निधनानंतर आलेल्या वियोगाचं- एकटेपणाचं, त्यामुळे एकटीने कराव्या लागत असलेल्या खडतर वाटचालीचं. अशा कवितेतला निसर्ग हा हिरवागार , प्रसन्न कसा असेल? तो रखरखीत , खडकाळ असतो.
इथे त्यांच्या मृगजळ या संग्रहातील कवितांत दिसलेला निसर्ग टिपायचा प्रयत्न केला आहे.
अनेक कवितांत रात्री बिछान्यावर पडल्यावर हे दु:ख, एकाकीपण घेरून येतं. "किती छान तू..." या कवितेत भिंती वाळूचे ढासळणारे ढीग होतात आणि पलंग भुंडा डोंगर होतो. भोवतालची तापलेली हवा जणू खाणीं मधून गिरक्या घेत वर येते.
नाहीस तूं या कवितेत त्याच्या अभावाने अंबर, तारे, धरणी, वारे हे सगळे भरले. त्याच्या बुटाच्या कणखर टाचा कुरुंद झाल्या. आणि क्षणभर त्याचा विसर पडून त्या कुरुंदाच्या कंगोर्यावरच जीव लोभला.
बाकी या कवितेत संपलेल्या नात्याचा हिशोब मांडला आहे. त्यासाठी चंद्र हातचा घ्यावा लागला. नाती कशी बदलतात याचं वर्णन करताना
करड्या चढणीवरुन्ही
हिरवी उतरण घेणे - असा रंगांचा खेळ येतो.
ऊन एकटे या कवितेत निसर्गाचे आणखी वेगळे खेळ दिसतात. आकाश ढगांच्या चित्रविचित्र आकारांनी वाकुल्या दाखवते; हिरवट वारा खाजकुयलीचा झगा घालून ढुसण्या देतो ; हवा धुक्याच्या बुरख्याखालून चरबट बोटे काढून चिमटे घेते ; पाणी मिळेल त्याचा सर्पविषारी चावा घेते. अशा वेळी
ऊन एकटे
सालस मोठे
बाळ गोमटे होऊन
मजेने प्रेमळ हात फिरविते.
स्वप्न तुझे ही सिनेमॅटिक कविता. प्रत्येक क्षण दाहक असेल, तर आयुष्य करपून जाईल. अशा वेळी आठवणीच दवबिंदूचा शिडकावा करून मनाला पोळू देत नाहीत.
उशागतीच्या खिडकीच्या उंच गजांमागे कडुनिंबाच्या फांद्या. त्यांच्यामागे मावळतीचा लाल चंद्रमा. त्यांच्यामागे धुकट निळे आभाळ. आणि त्याही मागे - स्वप्न तुझें. ते वाट बघते - नीजबंद डोळ्यांची! आणि या निजेच्या डोहात ती बुडाली, जागेपणाची शेवटची लहरही विरली की या सगळ्यांपलीकडून ते स्वप्न येते. त्याचा येण्याचा प्रवासही तसाच सिनेमॅटिक. ते चंद्रावर उडी घेते. त्याचाच हात धरून जमिनीवर उतरते. तिथून कडुनिंबाच्या फुलांच्या घोसांवरून गजांची मानवंदना घेत तिच्या उशाशी स्तब्ध उभे राहते. ती जेव्हा झोपेच्या डोहातून बाहेर पडते तेव्हा उशागतीला दवात भिजलेल्या शुभ्र धुक्याच्या चार पाकळ्या मिळतात.
मी सुरुवातीला म्हटलं तसं निसर्ग हा तिचा सोबती आहे. ती आपल्या भावभावना त्याला सांगते. त्या निसर्गालाही ते ऐकायचं, समजायचं असतं. इतकंच नाही, तर त्यालाही काही भावभावना असतात, त्या तिला समजून घ्यायच्या असतात. किती दिवस मी या कवितेत यासाठी निसर्ग कोणत्या रूपाने यावा? चक्क दगड!
आपले जीवन या दगडासारखे होऊ दे. उन्हापावसाचा , कशाकशाचा त्याच्यावर काही परिणाम होऊन नये , आपले संवेदन थिजून जावे, असा विचार करीत त्याच्याकडे ती बघत बसली आहे. तो, तो दगडच म्हणतो की मलाही काही चुकले नाही. माझ्यावरही शेवाळाचे जुलमी गोंदण चढते. दगडच तो, त्याच्या वाट्याला हिरवळ कशी येईल? शेवाळच यायचे. पण तेही येईलच. आणि फूल कोणते तर दगडफूल. दगडफुलाचे केविलवाणे प्रसाधन त्याच्या नशिबी. असल्या थिजलेपणापेक्षा तुझे सळसळणारे अन् जळणारे मनच मला त्याहून हवेसे वाटते असे तो दगड तिला सांगतो.
कधी आपल्या भोवतालात अगदी एकटं, परकं वाटतं, इथे कोणी आपल्याला जाणणारं , समजणारं नाही, असं वाटतं हे सांगताना सोबत या कवितेतला निसर्ग -
खुरटी झुडुपें दंग स्वतःशी
खडक पाहतो मज टवकारुन;
मातीला नच पटली ओळख.
"कोण इथे तू? " - टोचतसे तण.
म्हणजे हा निसर्गसुद्धा फुलं , वेली, हिरवळ, झरा, गर्द झाडी असा नाही. उजाड रखरखीत आहे. आणि तरीही तो ओळख नाकारणारा आहे.
अशा वेळी कदाचित बालपणीच्या खेळाच्या आठवणी सांडलेली जागा दिसते.
दिसे अचानक एका जागी
गवत न जेथें, नुसती माती;
दहा खळगुल्या . . . समांतरावर
एकीमध्ये होत्या गाई
-- खडे मूठभर.
विस्कटलेली इथली चुंबळ;
पांच आठळा,
फणसामधल्या.
आपल्या ओळखीचं काही मिळालंय. पण तेही आता एकटंच. किंवा कदाचित तेव्हापासूनच हे एकटेपण सोबतीला आहे.
भरून आले डोळे ... पाहुन
ओळख ती ... ओळख जन्माहुन.
हात फिरविला त्या सर्वांवर;
बसले सोबत मीच तयांना.
निघतांना अन्
ठेवुन आले त्यांच्यापाशी
रुमाल इवला.
किती सुंदर लिहिलंय!
किती सुंदर लिहिलंय!
अनेक ठिकाणी थबकायला झालं.
अगदी सलामीच्याच बालकवींबद्दलच्या निरीक्षणापासून! हे सूत्र काही माझ्या लक्षात आलं नव्हतं याआधी - आता तू लिहिल्यावर ऑब्व्हियस वाटतंय!
'मृगजळ' संग्रह मी वाचलेला नाही. पण हा लेख वाचल्यावर संग्रहाचं नावही किती समर्पक आहे हे जाणवलं.
'उशागतीच्या खिडकीच्या उंच गजांमागे कडुनिंबाच्या फांद्या' - किती चित्रदर्शी वर्णन आहे! खिडकी उंच म्हटलं नाहीये, गज उंच आहेत! खिडकीआडचा जीव जणू बंदिवासात आहे!
दगडाच्या रूपाने आलेल्या निसर्गाबद्दल वाचताना 'आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला' म्हणणारे आरती प्रभू आठवले, आणि 'माझ्या मना, बन दगड' म्हणणारे विंदाही.
खुरटी झुडुपे, खडक, माती, टोचणारं तण - नुसता अर्थच नाही, नादही (फोनेटिक इफेक्ट) किती कठोर आहे या शब्दांचा!
आणि सर्वात हृद्य अखेरचा 'बसले सोबत मीच तयांना' हा क्षमाशील स्वीकार!
मला इंदिराबाई आणि निसर्ग म्हटल्यावर 'माझे घर चंद्रमौळी आणि दारात सायली', 'असेच काही द्यावे घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा, देता-घेता त्यात मिसळला रंग मनातिल त्याहुन हिरवा', रक्तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण', अगदी ग्रीष्मसुद्धा 'ग्रीष्माची नाजूक टोपली - उदवावा कचभार तिच्यावर' अशा ओळी आठवत होत्या. हे अगदी निराळं दर्शन घडलं त्यांचं!
हा संग्रह मिळवायला हवा आता!
अवांतर:
>>> त्याच्या बुटाच्या कणखर टाचा कुरुंद झाल्या
यातलं कुरुंद म्हणजे लाल दगड असं गूगलबाबा म्हणतो आहे - हा शब्द ऐकला नव्हता. मला फक्त गाव (कुरुंदकर आडनावामुळे) माहीत होतं.
खुप सुंदर ओळख! मीही हा कविता
खुप सुंदर ओळख! मीही हा कविता संग्रह वाचलेला नाही.
हे दु:ख आधी सहचराच्या आजारपणाचं, मग त्याच्या निधनानंतर आलेल्या वियोगाचं- एकटेपणाचं, त्यामुळे एकटीने कराव्या लागत असलेल्या खडतर वाटचालीचं. अशा कवितेतला निसर्ग हा हिरवागार , प्रसन्न कसा असेल? तो रखरखीत , खडकाळ असतो.>>
मातीला नच पटली ओळख.
"कोण इथे तू? " - टोचतसे तण.
म्हणजे हा निसर्गसुद्धा फुलं , वेली, हिरवळ, झरा, गर्द झाडी असा नाही. उजाड रखरखीत आहे. आणि तरीही तो ओळख नाकारणारा आहे. >>> हे फार भिडलं!
फार आवडलं. स्वप्न तुझे मधली
फार आवडलं. स्वप्न तुझे मधली सिनेमॅटिक रात्र डोळ्यासमोर आली.
रंग, निसर्ग, आणि त्याची मनाशी गुंफण तुम्ही छान उलगडून दाखवली आहे. कवितासंग्रह मिळवून वाचेन.
सुरेख!
सुरेख!
कविता कळत नसल्याने मुद्दामहून वाचल्या गेल्या नाहीत.
सुंदर..
सुंदर..
सुंदर ओळख. निसर्गाबद्दलचा हा
सुंदर ओळख. निसर्गाबद्दलचा हा दृष्टिकोन वेगळा पण तेवढाच प्रभावी, आणि वाचल्यावर स्वाभाविकही वाटला. कविता संग्रह वाचला तसेच इंदिरा संतांच्या अगदीच मोजक्या कविता वाचल्या असतील. आता हा संग्रह वाचावासा वाटतोय.
बालकवींचे निरीक्षणही छान आहे.
सुंदर लिहिलेय.
सुंदर लिहिलेय.
शांतपणे वाचण्यासाठी राखून
शांतपणे वाचण्यासाठी राखून ठेवला होता. इंदिरा संत खूप आवडतात म्हणून.
फारच सुंदर लिहिलं आहे तुम्ही भरत...
अतिशय सुंदर लिहिले आहे. मलाही
अतिशय सुंदर लिहिले आहे. मलाही 'कुरुंद' शब्द माहीत नव्हता. दगडावरचा परिच्छेद फार भावला. बालकवींवरचे निरीक्षणही चपखल, निर्मनुष्यच वाटतात त्यांच्या कविता. काही तरी हललं आत, हा लेख वाचून.
खूप सुंदर लिहिलं आहे भरत.
खूप सुंदर लिहिलं आहे भरत. Insightful.
फार सुरेख झालाय लेख.
फार सुरेख झालाय लेख.
फारच सुंदर लिहिलं आहे.
फारच सुंदर लिहिलं आहे.
दु:ख हा त्यांच्या अनेक
दु:ख हा त्यांच्या अनेक कवितांचा सहजभाव. त्यांच्या कवितेतलं दु:ख ट्रॅडिशनल डे पुरतं नऊवारी नेसून तिचा भार पेलवत मिरवत नाही; तर ती रोजच नेसत असल्यासारखं सहज वागवतं. ते टाहो फोडून आक्रोश करत नाही. सहज श्वास घेतं, उसासे सोडतं>>> आवडलं
लेख छान आहे. आवडला.
शाळेत असताना ही एक त्यांची कविता होती ..
त्यावेळी प्रश्न उत्तर संदर्भात सही स्पष्टीकरण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, खूप आवडून लक्षात राहिलेली.
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…
फार छान लिहिलंय.
फार छान लिहिलंय.
फारच सुरेख लिहिलंय.
फारच सुरेख लिहिलंय.
खूप छान लिहिल आहे. एक वेगळा
खूप छान लिहिल आहे. एक वेगळा दृष्टिकोन.
इंदिरा संत आवडत्या कवयित्री.
तुम्ही छान उलगडून लिहिल आहे.
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे.... माझीही आवडती कविता.
छान लेख. वेगळा दृष्टिकोन
छान लेख. वेगळा दृष्टिकोन आवडला. ग्रीष्मातल्या दुपारीवर कविता आणखी कुणी केली आहे का माहीत नाही. इतका रखरखीत विषय असूनही त्यांची कविता आवडते.
सुंदर आवडला लेख
सुंदर
आवडला लेख
फार छान लिहिलेय.
फार छान लिहिलेय.
कविता वाचायला आवडतात ,थोड्याफार कळतात, उलगडून सांगितल्या तर समजतातही.जसा हा सुंदर लेख.
@ छंदिफंदी तुमच्या प्रतिसादातली "निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे "ही कविताही छान .या अशा कविता लक्षात ठेवणाऱ्या आणि पाठ असणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं.
खूपच सुंदर.लिहिले आहे भरत.
खूपच सुंदर.लिहिले आहे भरत.
माझा हा लेख वाचायचा राहूनच गेला होता..
आता अवचित पुढे आला, आणि रखरखत्या दुपारी जीवाला अगदी गारवा देऊन गेला!
या म भा गौ दि मध्ये अशी अनेक रत्ने मिळाली आहेत!
मला फार आवडते इंदिरा संतांची कविता.
उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे , तुजला ध्यावे.
.
हे वर्गातील इतर मुली तुजला द्यावे ....असे वाचीत..तेव्हा त्यांना ते ध्यावे आहे असे सांगताना...नकळतपणे ही प्रेमकविता आहे याचा साक्षात्कार झाला होता !!
किती सुंदर लिहिले आहे तुम्ही.
किती सुंदर लिहिले आहे तुम्ही. कविता संग्रह काही वाचलेला नाही. पण तुमचे हे लेखन मनाला भिडते अगदी.