मभागौदि २०२५- विशेष लेख- वृत्तनिवेदिका ते उद्योजिका: एक महत्वाकांक्षी प्रवास- ReenaAbhi

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 26 February, 2025 - 05:10

"अय्या! इतकं ग्लॅमरस प्रोफेशन सोडून तू हे काय विटा, खडी आणि सिमेंट मध्ये उन्हातान्हाची उभी राहून करत असतेस?"

"....मस्त मोठमोठ्या सेलिब्रिटींना भेटायची संधी, जर्नालिझम, स्टेटस, लाखांनी पगार आणि हे काय चालू केलंस तू?"

या आणि अश्या कितीतरी टोमणेवजा प्रतिक्रिया दिवसागणिक कानावर पडायच्या माझ्या, जेव्हा मी माझा well settled journalism जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला.

नमस्कार मंडळी,
मी सौ. रीना अभिजित म्हात्रे पूर्वाश्रमीची रीना वाळवे. अजूनही बरेच जण याचं नावाने ओळखतात मला. कॉमर्स मध्ये मास्टर्स करूनही एकही दिवस अकॉउंट मध्ये जॉब न करता, केवळ एक आवड म्ह्णून दिलेल्या interview ने मला मिडीया मध्ये करिअर करण्याची संधी लाभली.
तर झालं असं की, दहावी नंतर कॉमर्सला रीतसर ऍडमिशन घेतल, त्या वेळेस काय करायचं काय नाही याची काही अक्कल नव्हती, म्हणजे अजूनही ती आलीय असं वाटत नाही मला. पण असो, केवळ माझी सख्खी मैत्रीण distinction असूनही कॉमर्सला गेली म्हणून मग मी पण तिच्या मागेमागे तेच निवडलं आणि आपलं कॉलेज लाईफ सुरु झाल. पण मला कॉलेज मध्ये अभ्यासापेक्षाही extra curricular activities मध्ये जास्त रस होता.
माझे कॉलेज NKTT, ठाणावाला कॉलेज. शाळेप्रमाणेच इथेही दर वर्षी वक्तृत्व, नृत्य, अभिवाचन, अभिनय, कविता लिखाण, वृत्तपत्र वाचन अश्या कितीतरी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये आमच्या कॉलेजला बक्षीस पटकवून दिली. यामुळेच मला कॉमर्स विभागाची प्रतिनिधी हे पद आमच्या मुख्याध्यापकांकडून देण्यात आले. या सगळ्या प्रवासातच आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. आमच्या शेजारचे एक काका एक दिवस अचानक येऊन माझ्या वडिलांना म्हणाले, "माझा मित्र एक केबल चॅनल काढतोय, त्यासाठी मराठी वृत्तनिवेदिका म्हणुन रीनाला याल का घेऊन स्क्रीन टेस्ट साठी." त्या वेळेस सेटटॉप बॉक्स नव्हते आले. केबल चॅनेलच असायचे. मला हे सगळंच नवीन होते. म्हणजे स्टेजवर जाऊन भाषणबाजी करून येणं वेगळं आणि कॅमेऱ्याला सामोरं जाणं वेगळं.
मग काय, गेले आईसोबत स्क्रीन टेस्ट द्यायला. तेव्हा वय होतं अवघे सतरा वर्षे, इयत्ता बारावी. पण माझे पूर्ण शालेय शिक्षण मराठीतून झाल्याने बऱ्या पैकी मराठीवर प्रभुत्व होते. त्यांनी काही बातम्या दिल्या वाचायला कॅमेऱ्यासमोर. मी वाचल्या धडाधड आणि आले निघून घरी. आठ एक दिवसांनी शेजारचे काका सांगत आले की रीनाची वृत्तनिवेदिका म्हणून निवड झालीय. मी तर याविषयी विसरूच गेले होते. मला खरंच आनंद झाला होता का माहीत नाही पण कॅमेरा समोर जाम भारीच वाटायचे. मनापासून आवडलं होतं ते माध्यम मला. आणि इथून सुरुवात झाली माझ्या पत्रकारितेच्या प्रवासाला. कॉलेज, क्लास सारं सांभाळून तब्बल पाच वर्षे माझे एम कॉम पूर्ण होईपर्यंत मी त्या केबल चॅनल साठी काम केले. आता आजूबाजूला लोकं ओळखायला लागली होती. इतकच काय, दोन चार ठिकाणी तर प्रमुख पाहुणी म्ह्णूनही बोलावण्यात आले मला. अवघ्या एकविसाव्या वर्षी हे सारच स्वप्नवत होत.
त्याच दरम्यान, एका शॉर्ट फिल्मच्या सेमिनारला गेले असता एकाची ओळख झाली आणि त्याच्या कडून राजदीप सरदेसाई NDTV सोडून स्वतःचे चोवीस तास इंग्लिश बातम्यांचे चॅनेल लाँच करतायेत हे कळले. सोबतच मंदार फणसे या पत्रकाराचे व्हिसीटींग कार्डही मिळाले त्याच्याकडून. माझा आत्मविश्वास तर बघा, सरळ त्या व्हिसीटींग कार्डवर असलेल्या नंबर वर फोन केला आणि जाऊन धडकले एम्पायर कॉम्प्लेक्स, लोअरपरेलला. ना चॅनेलच नाव माहीत, ना काय. बघते तर सगळे मिळून ३९ उमेदवार मुलाखतीला आणि जागा एकच.
त्या वेळचे Network 18 आताचे बदललेले नाव, News18 समूहाअंतर्गत २४ तास इंग्लिश न्यूज चॅनेल लाँच होत होते आणि ते चॅनेल होते CNN IBN (CNN या अमेरिकन चॅनेलशी merge करून Indian Broadcasting Network असें CNN IBN) आणि चॅनेलचे सर्वेसर्वा होते नामांकित पत्रकार राजदीप सरदेसाई. पोस्ट होती, Guest Coordinator. म्हणजे चॅनेल साठी वेगवेगळ्या सेलिब्रिटीना आमंत्रित करायचे, त्यांच्या मुलाखती ठरवायच्या.
तिथे आलेले सगळे उमेदवार हे विविध न्यूज चॅनेलचा अनुभव घेऊन, रीतसर पत्रकारीतेचा कोर्स करून, DD, NDTV सारख्या नेटवर्क सोबत काम करून आलेले होते. आणि माझ्याकडे ना कुठलीही पत्रकारितेची पदवी होती किंवा त्यातला प्रोफेशनल अनुभव. फक्त होता एका लोकल केबल चॅनेलचा स्क्रिप्ट रायटर आणि बातमी संवाददाता म्हणुन पाच वर्षाचा अनुभव आणि केवळ गगनचुंबी आत्मविश्वास.
मुलाखत घेणार होते,त्या वेळचे CNN IBN चे आमचे मुंबई Bureau Chief रोहित चंदावरकर सर.
झाल, माझा मुलाखतीसाठी नंबर आला. काय काय बरळले नाही आठवत, पण दुसऱ्याच दिवशी फोन आला की तुझी निवड झालीय, केव्हा जॉईन करू शकशील? आणि अशा तऱ्हेने माझ्या व्यावसायिक मीडियाच्या प्रवासाचा श्री गणेशा झाला,वय वर्ष बावीस आणि पगार १८,००० इन हॅण्ड.
ऐरोली ते लोअरपरळ रोज प्रवास. चॅनेलची आव्हानात्मक नोकरी, अनुभवाची शिदोरी दिवसानिशी अधिकाधिक वृद्धिंगत होत होती. CNN IBN ला काही वर्षे काम केल्यावर आणि दोन बढत्या घेतल्या नंतर NEWS X, UTVI, TV9 असें करताकरता तब्बल नऊ वर्षे फक्त आणि फक्त २४ तास इंग्लिश आणि हिंदी न्यूज चॅनेल साठी काम करून माझ्या मीडिया करिअरला मी २०१२ मध्ये अखेरचा दंडवत ठोकला, माझ्या मुलाच्या जन्मा नंतर. माझे शेवटचं पद होते Associate Producer on Assignment. Second position after Bureau Chief आणि पगार होता १,१०,०००/- gross. वर्ष २०१२.

एवढ्या पगाराची नोकरी सोडताना एकच ध्यास आणि जिद्द होती की, आता स्वतःसाठी काम करायचं फक्त. बस्स.
मध्यंतरी दोन वर्षाचा ब्रेक घेऊन, मुलगा दोन वर्षाचा झाल्यावर २०१४ मध्ये शासनमान्य GST Practitioner म्हणुन प्रॅक्टिस सुरु केली, जी आजतगायत चालू आहे.
तरीही काही म्हणावं तसं समाधान होतं नव्हतं माझ, सतत वाटत राहायचं आपण आपल्यातल्या गुणांना आणि 'अव'गुणांनाही पाहिजे तसा वाव देत नाहीये.
आणि २०२० मध्ये लॉकडाउन लागलं, सर्व जगच थांबलं. माझा GST Consultancy business ही पूर्ण ठप्प झाला. नवरा ही सुरुवातीचे 3 महिने घरीच होता. त्याच दरम्यान, आम्ही नवीन घरही घेतलं होत, लॉकडाऊनच्या काहीच वेळ आधी त्याचे EMI ही चालू होते. कसबसं सेविंग मधून घर, EMI याचा ताळमेळ सांभाळताना माझी तारेवरची कसरत होत होती. अनिश्चित भविष्य. सुरुवातीचे तीन महिने खुप हालाखीत गेले.
हळूहळू गाडी रुळावर यायला सुरुवात झाली. नवरा construction मध्ये जॉबला असल्याने त्याच्या साईट्स चालू झाल्या. माझेही काम घरूनच पण हळूहळू चालू झालं आणि गाडी रुळावर आल्यावर,आम्ही एक दिवस नवऱ्याच्या मित्रांसोबत फार्महाऊस साठी जागा पाहायची म्हणून खोपोलीला पोहचलो. चक्क माझे पत्रकारीचे कार्ड गळ्यात अडकवून, गाडीवर प्रेस लिहिलं असल्याने आणि माझे प्रेस कार्ड दाखवल्याने लॉकडाऊनमधेही आम्हाला घराबाहेर पडता आले.
एक लहानसे सेकंड होम असावं, हे नवऱ्याचं स्वप्न होत खूप आधीपासूनच. झालं, जागा आलो पाहून आणि लॉकडाऊनचा फायदा घेऊन अतिशय वाजवी दरात सौदा पण पक्का केला. पण पैसे कुठून आणायचे? हा यक्षप्रश्न होताच. मग काय घरातलं सोनं गहाण ठेऊन जमीन विकत घेतली आणि म्हणता म्हणता आम्ही जमीनदार झालो. दहा गुंठे जमिनीचे मालक.
पण एवढ्या वरच थांबेन ती मी कसली. या डीलच्या निमित्ताने आमचे आताचे पार्टनर आणि तेव्हाचे डेव्हलपर मोहिते साहेब यांच्याशी भेट आणि चर्चा व्हायची. त्यातून जमीन व्यवसाया विषयी माहिती, त्यातले फायदे, अडथळे कानावर पडत होते. याच दरम्यान त्यांच्या नवीन प्रोजेक्ट विषयी कळले आणि ठरवलं आपणही याच व्यवसायात उतरायचं. मीडियाच्या नोकरीच्या पगारातून कामोठे, नवी मुंबई इथे एक दुकान घेऊन ठेवलं होत मी लग्नाच्या आधीच, त्याचा बऱ्या पैकी भाव वाढला होता. आता ते दुकान विकलं, काही Mutual fund, Equity market मध्ये गुंतवणूक होती. हे सारं तोडून मोहिते डेव्हलपर सोबत काही एकर जागा खरेदी केली. आज पाच वर्षानंतर या निर्णयाचा मला नेहमीच अभिमान वाटतोय. कारण पहिल्या तीन वर्षातच आम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर उत्तम परतावा येऊन आमची इन्व्हेस्टमेंट शून्य झाली आणि आलेला परतावा पुन्हा त्यांच्याच दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये रिइन्व्हेस्ट करता आला. सोबतच त्यांच्या मार्केटिंगचे काम सुद्धा मी सांभाळतेय.
यातूनही वेळ मिळाला की स्वस्थ बसणे हे काही माझ्या पिंडातच नाहीय. मध्यंतरीच्या काळात Real Estate & Property Management या विषयात MSME अंतर्गत डॉक्टरे्ट केले त्यामुळे मी "डॉक्टर" रीना वगैरे आहे बर का. रिअल इस्टेट सेक्टर हे माझे आवडीचं, त्यामुळे त्या विषयी अजून जाणून घेता यावे म्हणून हा खटाटोप.
चारएक महिन्या पूर्वीच द्रोणागिरी, नवी मुंबई इथे अधिपती इन्फ्रा या बिल्डर कंपनी सोबत टायअप करून G+7 Residential + Commercial प्रोजेक्टचा श्रीगणेशा केलाय.
बघता बघता बांधकाम व्यावसायिक कधी झाले कळलंच नाही. I always say "Never settle down in life" and i follow that. I always go with the flow. जसजश्या संधी येत गेल्या तसतश्या मी त्या संधीचा लाभ घेत गेले.
बरेचदा मला बोललं जातं की, या क्षेत्रात स्त्रिया कमी आहेत वगैरे. पण मला यामुळे कधीच काहीच वेगळं वाटलं नाही. सध्या हे प्रमाण कमी असलं तरी येणाऱ्या काळात हे वाढावं अशी अपेक्षा आहे कारण, आपण स्त्रियांच तर घराचं आणि वास्तूच महत्व जास्त जाणतो ना. घर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. काही वेळेला मला माती, खडी, सिमेंटमध्येही उभं राहावं लागत. दोन्हीही ठिकाणी आमचे पार्टनर असले तरीही ज्या ठिकाणी आपला hard earned पैसा गुंतलेला आहे, तिथे स्वतः उभं राहून काम करुन घेणं यात काही कमीपणा नाहीये. सारेच करतात. त्यामुळे मला माझे काहीही विशेष कौतुक नाहीये.
छान वाटतंय हे काम करताना. लोकांच्या चेहऱ्यावर त्यांची स्वतःची वास्तू बुक करतानाचा आंनद पाहिला की आपण योग्य त्या व्यवसायातच आहोत याचं समाधान मिळत. नफ्यासाठी तर आपण सगळेच काम करतोय, पण सोबत आनंद वाटण्याची जी ही संधी लाभली आहे ती तर सोन्याहून पिवळी.
आमची प्रति युनिटची किंमत ही ३०-४० लाख असल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या अवाक्यातली आहे.
आता सध्या मी खोपोलीला आमचे दोन सेकंड होम लँड प्रोजेक्ट आणि द्रोणागिरीला पहिली G+7 बिल्डिंग यावर काम करतेय.
खुप असे काही प्लॅनिंग वगैरे नाही करत मी. फक्त आलेला क्षण हा छान जगायचा आणि चालून आलेली संधी वाया घालवायची नाही.बाकी प्रवाहाच्या विरुद्ध चालायला आवडते मला. त्यामुळे सुरुवातीपासूनच हटके करिअर निवडत आलेय मी, आणि देवाच्या कृपेनें तश्या संधीही चालून आल्यात वेळोवेळी माझ्याकडे.
स्त्री उद्योजिका म्हणून काही भारी कौतुकास्पद नाहीय. कारण प्रत्येक स्त्रीचा आपला असा एक संघर्ष असतोच, फक्त प्रत्येकीची लढाई वेगळी असते. आणि मुळात स्त्री म्हणून जास्त लाड करत बसत नाही. मी स्वतःच एकदा ठरवलंय, या क्षेत्रात उतरायचंय तर मग केवळ एक उद्योजक म्हणून खंबीरपणे उभं राहायचं. दिवसभरात खूप जणांशी बोलणं होते व्यवसायानिमित्ताने, विविध प्रकारची माणसं जवळून जाणून घेता येतात.
Labour, contractor, आमचे competitor, clients त्यामुळे जनसंपर्क नक्कीच वाढला. या साऱ्यांमुळे प्रगल्भ आणि तटस्थ विचार करायला लागलेय.
मराठी भाषिक खुप जण आता व्यवसायात उतरले आहेत, माझ्या मित्र परिवारातले ही बरेच जण नोकरी सोडून विविध व्यवसायात यशस्वीरित्या पाय घट्ट रोवून उभे आहेत.
येणारा काळ हा नक्कीच आपला असेल. मराठी माणसात असलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा यामुळे येत्या काळात बरेचसे अजून मराठी उद्योजक घडतील यात यत्किंचित ही शंका नाहीय मला.

सध्या तरी हे इतकंच.. थांबूया आता..नाही नाही म्हणता खुपच लांबलाय की हो लेख..

रीना

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहिलंय रीना,
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!

खुप छान लिखाण!

पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

ग्रेट!
पुढील वाटचालीस व भरभराटीस शुभेच्छा.

छान लिहिलंस रीना.
कोणत्या तरी न्यूज चॅनेल मध्ये काम करत होतीस इतकेच माहीत होते. हल्लीची प्रगती अचानक कळाली.
प्रवास आज समजला.
असेच उत्तुंग यश मिळुदे.
डॉ रीनाचेही गूढ उलगडले.

खूप छान लिहिलं आहे रीना.
अगदी समोर बसून गप्पा मारल्यासारखं वाटतंय.
तुमची जिद्द आणि परिश्रम प्रशंसनीय.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

खुप छान लिखाण!
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.>>>>> + १००००

सर्वांचे खुप आभार तुम्ही दिलेल्या प्रोत्साहन पर शब्दांसाठी. आणि वेळात वेळ काढून एवढा मोठा लेख वाचल्या बददल ही.

रीना यांचा प्रवास कौतुकास्पद आहे! >>>>खरंय आणि धाडसी पण. नवीन व्यवसाय सुरू करायला हिंमत लागते.

एक शंका>>>

प्रेस पास किंवा कुठलेही ओळखपत्र नोकरी सोडताना परत करायला लागत नाही का?

पण संयोजक, याचा मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांशी संबंध नाही लक्षात आला>>.

हा भाग १ असावा

दुसऱ्या भागात लेखातील सर्व इंग्रजी शब्द हुडकून त्यांना जमतील तसे / जमले तर पर्यायी मराठी शब्द सुचवावे असा एखादा भाग २ मध्ये उपक्रम काढायचा असू शकतो.

अतिशय छान लिहिले आहेस, रीना. प्रेरणादायी. हे किती जणांना जमत असेल खरंच?
तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा!

ग्रेट!!
हे इतके माहीत नव्हते तुझ्याबद्दल..
मी असले काही विचार सुद्धा केला नसता...
पण येस.. जिथे passion आहे तेच फोलो करावे..
ते करून दाखवले याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.. Happy