सून बाई सून ! - भाग ३

Submitted by अविनाश जोशी on 15 February, 2025 - 05:36

सून बाई सून ! - भाग ३
लग्न तारखेनंतर ५-६ दिवसातच आम्ही आमच्या गावी परतलो. नंतरच्या काळात सूनही आमच्या घरात आली आणि सगळ्यांनाच तिचे ओझरते दर्शन झाले. बऱ्याच ठिकाणी सौ ने लग्नाचा व्हिडीओ दाखवला. त्या व्हिडीओ बरोबरच फुकट स्नॅक्स ठेवल्यामुळे सगळ्यांनाच व्हिडीओ आणि लग्नाचे फारच कौतुक वाटले.
विशाल महिला मंडळात सर्वच जणींनी एवढे भपक्याचे लग्न आणि एवढी सुंदर सून याबद्दल फार असूया वाटली. त्यानंतर महिला मंडळात मंगळागौरीचा कार्यक्रम ठरला. इंदूने साहजिकच मंगळागौरीचे सर्व कार्यक्रम आणि खेळ मायरामध्ये यशस्वीपणे भरून घेतले. तिला मंगळागौरीच्या सणाची पूर्ण माहिती सांगितली.
मंगळागौरीच्या दिवशी ती अतिशय झाकपाक पोशाखात हॉल मध्ये प्रविष्ट झाली. सर्वानी तिचे फारच कौतुक केले. आम्ही व्यवस्थित काळजी घेतली म्हणून बरे झाले होते. त्यामुळे तिच्या प्रणालीत आम्ही तिच्या लहानपणीच्या आठवणी वारंवार झालेल्या वडिलांच्या बदलीमुळे विविध ठिकाणची माहिती, तिच्या कॉलेजमधील माहिती असे विविध ज्ञान तिला दिले होते आणि त्यामुळे तिच्या इतर समवयस्कां बरोबरच्या गप्पा अतिशय रंगल्या होत्या. इंदू मुद्दामूनच सासवांच्या गप्पांमध्ये सामील झाली होती. मायराच्या गप्पा सहजपणे रेकॉर्ड होऊन त्या माझ्यापर्यंत रिमोटली पोहचत होत्या. त्यामुळे ती कुठे चुकायला लागली तर मी इंदूला सूचना देऊन मायराच्या गप्पा तिला पाठवू शकत होतो. पण मला मध्ये जायचे एकही कारण पडले नाही. तिच्या गप्पातले विषयांचे ज्ञान इतरांना फारच कमी असल्याने ती वासरात लंगडी गाय शहाणी ठरत होती. गप्पा नंतर खेळण्याचा मूड आला. त्यात ट्रॅडिशनल असे 'खुर्ची ग खुर्ची , झिम्मा, फुगडी असे कार्यक्रम होते. त्या सगळ्यातच मायरा चमकली. त्या नंतर आधुनिक काळातले अंताक्षरी सारखे लोकप्रिय खेळ सुरु झाले. अर्थातच आम्ही तिच्या प्रणालीत गाणी न घातल्यामुळे तिला या बाबतीत काहीच माहित नव्हते. सततच्या बदलीमुळे आणि तेही सिक्कीम, अंबाला, कुमाऊ, दक्षिणेश्वर अशा भागात असल्यामुळे तिला गाण्यांबद्दल फारशी माहिती नाही असे तिने इतरांना सांगितले . आता महाराष्ट्रातच राहत असल्यामुळे ती गाणी शिकून अंताक्षरी मध्ये पुढच्यावर्षी भाग घेईल असे तिने इतरांना सांगितले. पण तिला शाळेतील कविताही आठवत नसल्यामुळे तिची व आमची फारच पंचायत झाली. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम झाला त्यासाठी मायराने उत्साहाने भाग घेतला होता. अशा रीतीने ९० टक्के मायरा पास झाली आम्हाला दिसलेल्या त्रुटींवर आम्ही संशोधन करून महाशब्देंकडून आम्ही तिला या विषयातही एक्सट्रा प्रणाली बसवून दिल्या. त्यानंतर खरी मजा आली म्हणजे, आमचा मायरा सकट झालेल्या होलोकॅल मुळे जयंत आणि साराला आम्ही मायराची ओळख करून दिली.
'जयंता हि तुझी दुसरी बायको मायरा ' आणि मायरा हा तुझा नवरा जयंत आणि त्याची पहिली बायको सारा.'
सारा म्हणाली ' दिसायला सुंदर आहे पण शेवटी सायबोर्गच आहे ना ' शेवटचे वाक्य ऐकून मायराचा चेहरा पडला. तिला त्याबद्दल काहीही बोलणे शक्यच नव्हते
'हो . पण त्यामुळे मी तुझ्यापेक्षा कितीतरी हुशार आहे आणि मला अनेक गोष्टी येतात' मायराचा प्रती टोला.
' हो पण त्याचा काय उपयोग ? शेवटी मी खऱ्या नवऱ्याबरोबर राहणार आणि तू तिकडे २.५ ते ३ लाख मैलावर आणि तू कधीतरी फोनवर बोलणार.'
सारा काही कमी नव्हती. मायरा यावर गप्प बसली कारण तिला माहित होते तिला जयंताला भेटायला कमीत कमी वीस वर्ष अवकाश होता. अर्थात आम्हाला सायबोर्गला कुठल्याही ग्रहाच्या तळावर पाठवणे शक्य नव्हते. याचा अर्थ ग्रहांवर सायबोर्ग नव्हते असा नाही पण त्यांची रचना अतिशय वेगळी असायची. त्या त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण मर्यादेत त्यांचंही काम चालेल अशी व्यवस्था असायची. त्यानंतरच्या ६ महिन्यात इंदुताई अतिशय प्रसन्न दिसत होत्या. मायराने घेतलेला सौंदर्यस्पर्धेचा, पाककृतीच्या प्रदर्षन मध्ये घेतलेला भाग , लिंबू चमचा सारख्या काही मैदानी खेळात घेतलेला सहभाग अशा बऱ्याच ठिकाणी भाग घेऊन तिला मिळालेली बक्षिसे आणि या सर्वांमुळे इतर बायकांना वाटलेला हेवा आणि आपल्या सुनेमध्ये हे सर्व गुण यावे म्हणून त्यांची सुरु झालेली कटकट यामुळे इंदूला फार बरे वाटत होते. आपली सून निवडण्याची कल्पना यशस्वी झाल्याचे पाहून तिला फार बरे वाटत होते.
पण हळू हळू सवयीची झाल्यावर मायराने आपले रंग दाखवायला सुरवात केली. एक दिवस आमच्याकडे म्हैसूरवरून काही कानडी फॅमिली गेस्ट म्हणून आल्या. मायाराला कानडी भाषा उत्तम येत होती त्याचप्रमाणे तिला तामिळ, मल्याळी, गुजराथी, हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषाही शिकवल्या होता. वडिलांच्या झालेल्या बदल्या हे त्याचे एक कारण होते. पाहुणे संद्याकाळी येणार होते आणि मी मायराला भिशीबेल अण्णा सारख्या कानडी पदार्थ करण्यास सांगितले. तिला सांगताना मी आज संद्याकाळी कानडी पदार्थ करण्यास सांगितले. तीन पाहुणे आणि आम्ही दोघे यांचे रात्रीचे जेवण व सकाळची न्याहारी याची जबाबदारी मी तिला दिली. मायराने अत्यंत सुरेख स्वयंपाक केला. त्याच्यात मसालेदार फिश करी, भिशीबेल अण्णा, हॉपर्स आणि अंडा करी असा मेनू होता. डेजर्ट करिता तिने रम ऑम्लेट बनवले होते. आमच्याकरिता काहीच प्रश नव्हता पण पाहुणे पूर्ण शाकाहारी असल्यामुळे ते नुसती आमची तोंडे पाहत बसले अर्थात चूक इंदूचे होती. कारण तिने जेवण शाकाहारी का मांसाहारी करायचे हे सांगितले नव्हते. नंतर इंदूने घाईघाईने उपमा केला आणि बटाटयाची भाजी करून ती हॉपर्स बरोबर पाहुण्यांना दिले. नंतर इंदूने सूचना दिल्या कि जर जेवण कुठले करायचे नाही तर जेवण शाकाहारी करायचे . त्यानंतर इंदूला मेनू सांगताना फारच बंधन येऊ लागली. त्यानंतर आम्हाला फारच काळजीपूर्वक सांगावे लागले. कारण इंदूने मायाराला फारच काटेकोर सूचना देऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर आमचा संवाद खालीलप्रमाणे होऊ लागला.
मायरा उद्या ब्रेकफास्टला मला ब्रेड ऑम्लेट आणि चहा दे असे नुसते सांगून चालत नव्हते , जर असे सांगितले तर मला टोमॅटो ऑम्लेट आणि ब्रेड आणि चहाची पावडर मिळू लागली . त्यामुळे ब्रेकफास्ट ची मायरा बरोबर होणारी चर्चा खालीलप्रमाणे असे.
मायर मला एग ओमलेट, ब्रेड टोस्ट आणि चहा करून दे '
अंडे कुठले वापरू ? ' मायरा
'कोंबडीचे अंडे शक्यतो सगुणा किंवा योजना या ब्रँडचे, नसल्यास सात दिवसापूर्वीच आहे अशी खात्री करून घेणे
'पण अंडे कशाचे ? मायरा
‘कोंबडीचे’
‘ब्रेड कुठला पाढंरा, ब्राऊन, मल्टिग्रेन ' मायरा
ओव्हनफ्रेश, ब्रिटानिया याचा सॅन्डविच ब्रेड ज्याची एक्सपायरी झालेली नाही .
टोस्ट कसा असावा ? मायरा
ते मला माहित नाही , त्याला ब्राउनिश कलर आला आणि तो कडक झाला कि काढावा
एवढे संभाष झाले तरी दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला मला साधारणतः दहा अंड्याचे झालेले एक ऑम्लेट, अठरा टोस्ट असा ब्रेकफास्ट यायचा. कारण मी तिला किती अंडांचे ऑम्लेट आणि किती ब्रेड चे टोस्ट सांगितले नव्हते त्यामुळे ती असलेली सर्व अंडी आणि असलेल्या सर्व ब्रेडचा वापर करायची. न सांगितल्यामुळे फक्त अंड्याचे ऑम्लेट असायचे त्याच्या मिरची, मीठ, इतर काहीही नसायचे, ऑम्लेट सुद्धा चौकोनी, त्रिकोणी, गोल अशा कुठल्याही प्रकारात व्हायचे.
याच्या पेक्षा जास्त सूचना देणे शक्य नसायचे. त्यामुळे हळू हळू आम्ही तिला स्वयंपाक करण्याचे बंद केले . महाशब्दयाना बोलून आम्ही तिच्या प्रणाली बदलून घेतल्या.
त्यानंतर तिला कुठलेही काम सांगण्याची आम्हाला भीतीच वाटू लागली. ती आज्ञांचे तंतोतंत पालन करायची अर्थातच तिच्या स्वभावात असल्यामुळे ती त्या आज्ञा पाळण्यात सासूला जास्त त्रास कसा होईल हे पाहायची.
एके दिवशी मार्केट मधून वस्तू घेण्यासाठी तिला इंदूने एक यादी दिली. आणि बघून वस्तू घेण्याची सूचना ही तिला दिली. यादी खालील प्रमाणे होती.
दोन काढेपेट्या (पावसाळ्यात काढेपेट्या सादळतात नीट बघून घेणे.)
एक डझन केळी
सहा पेरू
कस्टर्ड पावडर एक पुडा
द्राक्षे शरद सीडलेस एक किलो
साखर दोन किलो
अस्सल काश्मिरी केसर पाच तोळे
तिला इंदूने सूचना दिली यातील शक्य तितक्या वस्तू आण
दोन तासांनी मायराने आणलेल्या वस्तू पाहून इंदूने कपाळावर हात मारून घेतला .
यात काडेपेट्या आणल्यावर त्यातील एकही काडी पेटेना. त्याला मायाराचे उत्तर होते की प्रत्येक काडी पेटवून बघितली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे .
एक डझन केळीच्या ठिकाणी मायराने बारा चंद्रबाळे केळी आणली होती. वजन सुमारे तीस किलो . मायराचे उत्तर आम्ही तिला कोणती केळी हे सांगितले नव्हते. त्यामुळे तिने चांगली मोठी केळी आणली होती.
पेरू मात्र अल्हाबादी छान आणले होते.
कस्टर्ड पावडरही बरोबर होती.
द्राक्षे एक तर लहान होती आणि आंबलेली होती.
दोन किलो खडीसाखर आणली होती.
केशर अर्थातच आणले नव्हते कारण तिला केशर अस्सल काश्मिरी आहे असा कोणताच पुरावा केशराबरोबर मिळला नव्हता. त्यादिवशी इंदूला छोटेसे फ्रुट सलाड करायचे अर्थातच आणलेल्या पदार्थातून ते करणे शक्य नव्हते. त्यानंतर पहिल्या सहा महिन्याचा समजूतदारपणा सोडून ती अशा तर्हेने वागून हळू हळू कामाची टाळाटाळ करू लागली. आणि अशा परिस्थितीही ती सायबोर्गच्या सर्व नियम काटेकोर पानाने पाळत असल्याने आम्हाला तिच्या विरुद्ध काही बोलताही येत नव्हते. गेल्या वेळेला झालेल्या गोंधळामुळे एक दिवशी सकाळी तिला बारा वस्तूंची एक निश्चित यादी दिली आणि सर्व वस्तू एकदम आणायला सांगितल्या. त्या नंतर ती जी घराबाहेर पडली ती तीन दिवसांनी परत आली. आल्यावर तिने यादीत कुडाळची आमसुले असे लिहिल्यामुळे ती कुडाळ ला जाऊन २५०ग्राम आमसूल घेऊन आली होती. आणि तिचे एकंदर बिल १२४५२ युसी झाले होते त्यात ४५२ युसी पदार्थांच्या किमती चे तर १२००० युसी कुडाळ ला जाऊन यायचा कॅबचा खर्च. अर्थात काहीही बोलणे शक्य नव्हते कारण तिने पदार्थांची यादी दिली होती. अशा सर्व गोष्टी मी लांबून पाहत होतो पण त्यात डायरेक्ट कुठेही भाग घेत नव्हतो. हे प्रकरण हळू हळू वाढतच गेले. एकतर मायरा घरात आरामात बसून राहायला लागली. तासनतास सासू - सुनांची भांडणे रंगू लागली. त्यानंतर प्रत्येक घरच्या सासू सुनांच्या भांडण सारखी रंगू लागली. अर्थातच प्रत्येक वेळी मायराचाच विजय होतो . इंदू हल्ली फारच विचारात गढून राहू लागली. तिला परत देऊन टाकावी आणि आपली सून चंद्र शिक्षणाकरिता गेली असे सांगावे असे इंदूला वाटू लागले. परंतु मायरा खऱ्या शिक्षणाकरिता जाणार नसल्यामुळे तिचे अस्तित्व नाहीसे कसे करावे यावर इंदूचा विचार सुरु झाला. माणसाला इजा करण्यापेक्षा सायबोर्गला इजा करणे कठीण होते. समाज तुम्ही सायबोर्गचा गळा दाबला तर दहा मिनिटात सायबोर्ग ती इजा सेन्स करून त्याचे परिणाम बघत असे. आणि परिणाम गंभीर असल्यास अर्ध्या तासाच्या आत तुमच्या घरी सायबोर्ग पोलीस हजर होत असे. शेवटी मायरा घरात जास्ती दिसू लागली. आणि आता हाताशी कमळाही नसल्यामुळे इंदूचे डोकेदुखी भरपूर वाढली. शेवटी इंदूने मायाराला परत देण्याचा विचार केला पण महाशब्दयाने त्याला स्पष्ट नकार दिला कारण त्यांनी परत न देण्याच्या बोलीवर विक्री केली होती. तसेच त्यांनी तिच्या स्वभावात पुणेरी सदाशिव पेठ असल्याचे बजावले होते. आता मात्र इंदू खरंच गलितगात्र झाली. सून तर घरात होती. तिचे सगळीकडे मिरवने झाल्यामुळे ती कुणाला दाखवायची नव्हती. आता इंदूला खऱ्या सुनेसारखी तिच्याकडून कामे करून घ्याची होती आणि तिथेच घोडे नडत होते. तसेच मायरा सायबोर्ग करिता असलेले तिन्ही नियम अचूकपणे पाळत असल्यामुळे तिच्या विरुद्ध काही तक्रार करणे शक्य नव्हते. आता इंदूच्या डोक्यात पूर्वीच्या सासू सारखे सुनेला इजा करण्याचे अथवा तिला जाळून मारून टाकायचे विचार सुचू लागले. परंतु सायबोर्ग करीता असलेल्या सेंट्रल कॉम्पुटरमुळे तिला पूर्वीच्या सुनांप्रमाणे कुठलीही शिक्षा देण्यास असमर्थ होती. शेवटी तिने शरणागती पत्करून माझ्याकडे धाव घेतली. मी तिला विचारले मायरा कधीही तीन नियमांचे उल्लंघन करत नाही. तिच्या देखतच मी मायरा ला बोलाविले. मायाराला मी विचारले 'मायरा तू रोबोटिक्सच्या नियमांचे पालन करतेस ही चांगली गोष्ट आहे पण तुझ्या दृष्टीप्रमाणे दुसरा नियम महत्वाचा का पहिला नियम महत्वाचा ? दुसऱ्या नियमाप्रमाणे रोबोने पहिला नियम पळून त्याला स्वःताला इजा होत नसल्यास दुसऱ्या नियमाचे तंतोतंच पालन करावे. पहिल्या नियमाप्रमाणे त्यातील कुठल्याही आज्ञेचे पालन करताना मानवाला त्याच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वर्तणुकीमुळे कुठल्याही मानवाला त्रास किंवा इजा होईल असे वर्तन करू नये'. मॅकपा तुमचे म्हणे बरोबर आहे आणि मी त्याच प्रमाणे वागते आणि जर तुमच्या आज्ञा चुकीच्या असतील तर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यात माझी काय चूक आहे? मायरा
' तुझी चूक आहे कारण प्रत्येक मनुष्याच्या बोलण्यात एक अर्थ दडलेला असतो. बोली भाषेत कोणताही माणूस तंतोतंत आज्ञा करू शकत नाही. हे लक्षात ठेव. तुझ्या तंतोतंत आज्ञा पाळल्यामुळे इना ला असतीशय त्रास होतो व मलाही फार वेदना होतात. त्यामुळे तू बोली भाषेतील अर्थ समजावून घे . एखादा अर्थ विचित्र वाटला तर आम्हाला विचार. आम्ही बोली भाषेत म्हणतो पायात बूट घाल पण कृती करताना आम्ही बुटात पाय घालत असतो. किंवा चहा कर असे म्हंटले तर चहा नावाचे पेय आम्हाला हवे असते. चहाचे उत्पादन नको असते. तू जरा तुझ्या बरोबरच्या मुलींमध्येमिसळून बोली भाषा समजावून घे. आणि त्याप्रमाणे घरात वागायचे धोरण ठेव. लक्षात ठेव. कुठलाही मनुष्य यंत्रमानवाच्या इतके तंतोतंत बोलू शकत नाही. तुझ्यात असलेल्या विशाल शृंखलांचा उपयोग करून तू तुझ्या कृतीवर ताबा ठेव. नाहीतर तू बोलीभाषेचा सखोल अभ्यास करून त्याचा अर्थ समजावून घेत जा.
सात बाराची बस पकडायची आहे त्या बस ला पकडून ठेवणे असा अर्थ नसून त्या बस ने प्रवास करायचा असा अर्थ होतो. बोलीभाषेची चुकीचा अर्थ लावल्यामुळे जर तुला त्रास झाला तर त्याला आम्ही मानव जबाबदार नाही हे निश्चित लक्षात ठेव आणि आम्ही केव्हांच तुझ्या आडमुठे वागण्याकरिता अर्ज करून तुला शिक्षा देण्याची परवानगी मिळवली आहे . इतर सुना प्रमाणेच आमच्या आज्ञेचा अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे वर्तन कर. शंका आल्यास आम्हाला विचार. अशी मायाराला तंबी देऊन आम्ही तिचे विचार थोडेसे ताळ्यावर आणले. त्या नंतर आमच्या प्रत्येक आज्ञेबरोबर तिचे चार पाच तरी प्रश्न आमच्याकडे येऊ लागले. त्यानंतर एकदा तिला तंबी देऊन मी म्हणालो 'हे बघ तेच तेच प्रश्न परत परत विचारत जाऊ नकोस. तसेच त्या प्रकारच्या इतर प्रश्नांची उत्तरे तशीच असतील अशी लक्षात ठेवत जा. '
त्यानंतर तिचे बरेच प्रश्न कमी झाले परंतु काही बाबतीत आडमुठेपणा दिसू लागला. थोडक्यात नाकापेक्षा मोती फारच जड होऊ लागला. त्यानंतर काही काळ आम्ही तिला घराच्या बाहेर ठेवण्याच्या आज्ञा देण्यास सुरवात केली. १० हजार उठाबशा काढ, २० हजार दोरीवरच्या उड्या मार. त्याच्यात मायरा सतत बिझी राहू लागली पण तिला घेऊन मिरवण्याचा मुख्य इंदूचा उद्देश सफल होत नव्हता. आम्ही महाशब्दयांकडे जाऊन या तिच्या वर्तुणुकीची चर्चा केली. महाशब्दे म्हणाले याच तिच्या वागणुकीमुळे ती परत आली आहे. आता तुमच्या बाबतीत तेही अशक्य आहे. तिच्यात कोणताही मानसिक बदल करणे आम्हाला शक्य नाही. तिला तुम्ही काही प्रचंड वेळ जातील अशी कामे द्या. उदा. तुम्ही तिला बारा जोतिर्लिंगाची पायी प्रदक्षिणा करून यायला सांगा. त्या त्या ठिकाणचे आणि वाटेतील बऱ्याच मोठ्या शहराचे तिला फोटो काढून यायला सांगा. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या अनुभवाचे तिला लिखाणही करायला सांगा. अशा प्रकारच्या अज्ञानामुळे एकतर ती बरेच दिवस बाहेर राहील आणि त्यामुळे तिला आणि तुम्हाला बरीच प्रसिद्धी मिळेल. हा मार्ग चांगला वाटल्यामुळे आम्ही महाशब्देनी सांगितल्याप्रमाणे तिला आज्ञा दिली. आज्ञा देताना दोन महत्वाचे बदल केले. एक म्हणजे रोज साठ किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करायचा नाही आणि साठ किलोमीटर च्या अंतरात जे मोठे गाव किंवा शहर लागेल तेथे एखाद्या हॉटेल मध्ये रात्रीकरिता थांबायचे. अन्य कोठेही रस्त्यावर झोपायचं नाही. तसेच नकाशाचा योग्य तो अभ्यास करून आम्ही मायराला राहण्याची दीडशेहून अधिक ठिकाणे निश्चित केले. प्रवासातील खर्चाकरिता तीला आम्ही एक क्रेडिटकार्डही दिले तसेच रोज कपडे बदलण्याची आज्ञा केली. रोजचे ठिकाण थांबल्यावर तिथून आम्हाला एक चित्रासह व्हाट्सअप मेसेज टाकायला सांगितले. अर्थात तिला फोन देण्याचा प्रश्नच नव्हता कारण तिच्या देहताच तिचा सेल फोन दडलेला होता. महाशब्दयांची ही कल्पना प्रमाणाबाहेर यशस्वी ठरली. या कल्पनेला आम्ही वर्तमानपत्रातून बरीच प्रसिद्धी दिली. तिच्या निघण्याच्या वेळेला प्रचंड समारंभ करून तिला मानाने रावना केले. या प्रसंगी पहिले दहा किलोमीटर जवळ जवळ आठ हजार लोक तिच्याबरोबर होते. तिच्या यात्रेची बरीच ठिकाणे आणि अपेक्षित तारखा आम्ही प्रसिद्धीला दिल्या होत्या. त्यामुळे वातावरणात मायराचा आणि तिला उत्तेजन देऊन त्या कल्पनेचा आणि तिचा पाठपुरावा करणाऱ्या इंदूचाही बराच गवगवा झाला होता. मायाराची अपेक्षित यात्रा पाच महिन्यात पूर्ण होणारी होती त्यामुळे इंदूला पाच महिनेतरी डोकेदुखीही राहणार नव्हती.
अखेर पाच महिन्यांनी मायरा परत आली. दमने वगैरेरे काही प्रश्नच नव्हता. या प्रवासात तिच्या ज्ञानात फारच भर पडली. विविध प्रदेश त्यांचा भूगोल, त्यांचा इतिहास त्यांच्या भाषा हे सर्व ज्ञान तिने आत्मसात केली. आल्याबरोबर अनेक ठिकाणी तिचे सत्कार समारंभ झाले. महिला मंडळातील सर्व बायकांचा फारच जळफळाट झाला. एवढी धाडसी सून मिळाल्याबद्दल इंदूचीही बऱ्याच जणींनी प्रशंसा केली. तिची प्रसिद्धीमुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. अर्थात आम्ही सर्व ऑफर्स नाकारल्या. तरीसुद्धा निर्लज्य निर्मात्यांनी सरळ तिच्याकडे धाव घेतली. अर्थात इंदूने तिला बजावून ठेवली होते. कि तिने कुठल्याही पिक्चरचे, नाटकाचे अथवा समारंभाचे निमंत्रण इंदूने हो म्हटल्याशिवाय स्वीकारायचे नाही. तसे केले तर इंदू जीव देईल. रोबोटिकच्या पहिल्या नियमाप्रमाणे ही आज्ञा दिल्यावर मायरा कोणतेही निमंत्रण स्वीकारणे अशक्य होते. तिचे नकार ऐकून सुद्धा निर्मात्यांनी आमच्या घरावर जागता पहारा ठेवला. एक दोन महिन्यातच त्यांचा उत्साह ओसरला आणि आम्हाला बाहेर येणं जाणं सुलभ झाले. मायराला बिझी ठेवण्याकरिता आमच्याकडे बऱ्याच लिस्ट तयार होत्या.
१. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहणे , त्याचे फोटो घेणे, त्यांचा इतिहास जाणून घेणे आणि मिळाले तर त्या किल्ल्याचे नकाशे आणणे. वेळ अंदाजे पाच वर्षे.
२. महाराष्ट्रातील सर्व गणपतींची मोजदाद करणे असे गणपती सन २००० पूर्वी स्थापन झालेले असावे. प्रत्येक गणपतीची माहिती, त्याचे गूगल लोकेशन फोटोग्राफ्स आणि इतर माहिती गोळा करणे. वेळ सुमारे दहा वर्षे.
असे बरेच प्रकल्प तिला बिझी ठेवण्यासाठी आमच्याकडे होते. पण असे प्रकल्प राबवण्यात इंदूला गम्मत वाटत नव्हती. आपल्याला एक सून असावी, तिने आपल्याला घरकामात मदत करावी आणि योग्य ठिकाणी तिचे माफक प्रदर्शन करता यावे एवढेच तिचे उद्दिष्ट होते. पण आता सून इतकी प्रसिद्ध झाली होती कि लोक इंदूला मायाराची सासू म्हणून ओळखायला लागली होती. अखेर तिने मायाराला बोलावून तिला विचारले की सर्व सामान्य सुनेसारखे ती कशी वागेल ? मायराचा प्रश्न तयारच होता. म्हणजे इतर सुना वागतात तशी. असे नको मला निश्चित उदाहरण द्या .
'आपल्या शेजारी राहणाऱ्या गोखलेंच्या सुने सारखी' म्हणजे मी इतर मित्रानंबरोबर सतत बाहेरगावी जाऊ का? ' चल ग तुझं आपलं काहीतरी. हे बघा वसंत देशमुख बरोबर गेल्या महिन्यात सहा रात्री, अशोक पाटोळे बरोबर नऊ रात्री आणि अनंत देशमुख बरोबर तीन रात्री बाहेर राहिली होती. वाटल्यास मी तुम्हाला बरीच माहिती देऊ शकते. तुला ग काय माहिती. इना माझा मेंदू सेंट्रल कॉम्प्युटरला जोडलेला आहे. तुम्ही प्रश विचारण्यापूर्वी मला कदाचित काही माहित नसेल पण प्रश विचारल्यावर क्षणार्धात लिंक वरून सर्व माहिती मला मिळते.
बरं मेहंदळेंच्या सुने सारखी , शी तिच्यारखे तर मला होताच येणार नाही. तिला विचार तिच्या दोन पोरांच्या बापाची नावं काय आहेत, तिलाच सांगता येणार नाहीत. आणि तुम्हाला माहित आहे कि मला मुलबाळ होणं शक्यच नाही. अशा रीतीने इंदूचे सर्व बाण फुकट गेले. मग मायराच इंदूला म्हणाली इना मला काही उत्तर द्या. राधा कृष्णाची बायको होती का ? नाही. मग सर्वत्र राधा कृष्णाची मंदिरे का असतात. तसेच कृष्ण विवाहित गोपिकांबरोबर रास क्रीडा करत असे अशा कृष्णाचे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवायचे का? कुंतीलाही नवऱ्यापासून मूल न होता , सूर्य, यम, वायू आणि इंद्रापासून मुले झाली. हे सर्व व्यभिचार नाहीतर काय आहे ? आपण त्याचेच आदर्श बाळगायचे का ? या सरबत्तीवर इंदू निर्रुतर झाली आणि या संधीचा फायदा घेऊन मायरा लगेच बाहेर सटकली. इंदूला कुठून ही ब्याद घरात आणली असे झाले पण आता ती दूर करण्याचे मार्गही तिला दिसेनात . हळू हळू महिला मंडळातील तिचा सुनेचा दिमाख दाखवणे कमी झाले. हळू हळू बायकांची कुजबुज सुरु झाली. 'काय हो मायरा एवढी सुरेख आणि कर्तृत्वान आणि नवऱ्याशिवाय सून म्हणून राहायला कशी तयार झाली. नक्कीच काहीतरी भानगड असावी. कोणती मुलगी अशी सून म्हणून राहायला तयार होईल. हो ना मायरात काहीतरी प्रॉब्लेम असावा किंवा पैशाच्या जोरावर तिला खरेदी केले असावे. 'काही म्हणा पण काहीतरी भानगड आहे हे निश्चित ' कुजबुज हळू हळू वाढत जाऊन तिची वाढती कुजबुज इंदूच्या कानावर येऊ लागली. अगदी मायारा हि स्त्री नसून हि नंपुसकलिंगी आहे अशी कुजबुज होऊ लागली. या सर्व चर्च्यांचा इंदूला अतिशय त्रास होऊ लागला. तिने महाशब्दयांची परत भेट घेतली. महाशब्दे अर्थातच मायराला परत घेणार नव्हते, मग तेच म्हणाले तुम्हाला मायरा नको आहे ना मग पूर्वीच्या सासुप्रमाणे तिला मारून टाका. पण महाशब्दे तुम्हाला एक सायबोर्ग नष्ट केल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागेल कारण तरच जयंताला नवीन सायबोर्ग घेता येईल. पण तिला मारणार कसे ? महाशब्दे म्हणाले आम्ही विकलेल्या प्रत्येक सायबोर्ग करीत आम्ही त्याला नष्ट करण्याचे एक प्रोब बाळगतो. तो तुम्हाला देणं तसे कायद्याविरुद्ध आहे पण परिस्थिती अशी आहे कि तुम्हाला तो द्यावाच लागेल. सकाळी अगदी पहाटे हा प्रोब वापरा कि मायरा मृत्यूवत होईल. कुठल्याही डॉक्टर ने तिला तपासले तर तो मेल्याचे सर्टिफिकेट देईल. त्यानंतर तुम्ही तिला देहदानाकारीता पाठवून द्या मात्र देहदानाची शववाहिका माझ्याकडे येईल असे बघा. दहा पंधरा दिवसांनी एका सकाळी पहाटे मायरा मरण पावली. सात -साडेसात ला आलेल्या डॉक्टरनी तिचा हार्ट फेल झाल्याचे सर्टिफिकेट दिले. मंडळात बातमी पसरताच आमच्या बंगल्यावर गर्दी उसळली शेवटी सुरक्षेकरिता तिचे प्रेत मंडळाच्या हॉल वर नेण्यात आले. मायराचे प्रेत फुलांनी सजवलेले होते. त्यामुळे ती सायबोर्ग असल्याची कुठेही शंका येणार नव्हती. बहुसंख्य स्त्रियांनी वर वर तरी शोक व्यक्त केला. अनेक वार्ताहरांना तर एक भन्नाट बातमीच मिळाली. मायरा इतकी प्रसिद्ध झाली होती कि CM नाही तर PM कडून संदेश आले. अकरा वाजता एक शववाहिका येऊन मायराला उचलून घेऊन गेली. ती यथाशक्ती संद्याकाळपर्यंत महाशब्दयांकडे पोहोंचली. महाशब्दयांनी तिचे सर्व भाग वेगळे करून एक सिबोर्ग असंख्य चुका वाढल्यामुळे निष्कामि केल्याचा दाखला दिला. नंतर आठ -दहा दिवस इंदूच्या मुलाखती कुठे ना कुठे येत राहिल्या. तिच्या नावावर मायरा सून नव्हे मुलगीच असे पुस्तक ही बाजारात आहे आणि ते तडाखेबंद खपले. साधारणतः एक महिन्यांनी मी इंदूला विचारले मायरा तर गेली आता दुसरी सून आणायची का? इंदू काही न बोलता आत निघून गेली. मी हसतच माझ्या अभ्यासिकेकडे गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users