परसेप्शन सत्य सौंदर्य

Submitted by meghdhara on 8 February, 2025 - 03:36

परसेप्शन.. सत्य.. सौंदर्य.

मनालीत पोहोचलो ते मनालासू नदीच्या सतत सोबत करणाऱ्या पात्रासोबत.. आणि सभोवतालात एकजीव झालेल्या तिच्या खळखळाटासोबत. ‘मी आहे .. मी आहे ‘ म्हणत.. जणू ती सतत तिचं असणं जाणवून देत होती..
नुसतं ऐकून आणि बऱ्याचदा चित्रपटात पाहिलेल्या बर्फाच्छादित पर्वतांच्या कल्पनेतल्या रूपाने मनाला गारुड घातलं होतं. अजूनही ‘तसे’ हिमपर्वत दिसले नव्हते.. नाही म्हणायला.. हॉटेलच्या आवारात थोडासा बर्फ, शोभेसाठी गोळा करून ठेवला होता. पण मन एकीकडे खट्टू होत होतं .. शुभ्र ‘म्हणजे चित्रपटात दिसतो, छायाचित्रात बघायला मिळतो.. तसा पांढरा शुभ्र पर्वत, बघायला नाहीच मिळणार का? मनात बरंच काही चाललं होतं. आणि एकीकडे मन .. ‘सबुरी.. सबुरी.. बघुया पुढे काय होतंय ते..’ म्हणत होतं.
आणि दुसऱ्या दिवशी उठून रोहतांग पासला जायला निघालो.
उत्सुकता शिगेला पोहोचली होती. फक्त पर्वतशिखरावर बर्फ असेल का? किती दुरुन किती जवळून पहायला मिळेल? हातात घेता येईल का बर्फ? अगदी लहान मुलासारखी अवस्था झाली होती.
मधलं काहीच आठवत नाही. आठवतोय तो.. समोर बाहू पसरून उत्तुंग उभा असलेला पांढरा शुभ्र पर्वत.. आजूबाजूला दूरदूर पर्यंत दिसणाऱ्या बर्फांच्या डोंगररांगा.
पेराग्लाइडिंग करण्यासाठी मला समोर दिसणाऱ्या पर्वताच्या एका ठरावापर्यंत जायचं होतं. टायरमध्ये बसून बर्फाच्या उतारावरून घरंगळणारी लोकं, आईस स्कीईंग चा सफल असफल प्रयत्न करणारे माझ्यासारखे कित्येक पर्यटक, खर्चाचा अंदाज घेणारे, घासाघीस करणारे, कुटुंबात रमलेले, एकट्यात फिरणारे, जोड्यात रंगलेले.. अशा गर्दीतून वाट काढत माझा प्रवास सुरु झाला.
हो. प्रवासच. एक अद्भुत प्रवास. एक विलक्षण अनुभव.

आजूबाजूच्या गर्दीचा.. गाड्यांचा.. मॅगीच्या स्टॉल मधील विक्रेत्यांचा.. फोटो काढणाऱ्यांचा .. हसणाऱ्या लोकांचा.. खिदळणाऱ्या मुलांचा ..हाकांचा.. सगळ्यांचा एकत्र होऊन एक आवाज झाला होता.
आणि या आवाजातून मार्ग काढत पुढे निघालेली मी. अचानक.. आत्म्परिक्षणाची.. आत्मानिरीक्षणाची दारं भरभर उघडली गेली होती. वर्तमानातून.. सूक्ष्मात.. अन पुन्हा वर्तमानात.. अशी काहीशी आंदोलनं सुरु झाली होती.
जवळ जवळ दहा एक मिनिट मी चालत होते . मघाचा एक झालेला आवाज आता आणखीन एकजीव झाला होता. त्यातले बारकावे, वैविध्य हळूहळू लोप पावले होते. आता फक्त एक आवाज लांबून आल्यासारखा येत होता. पण तो आवाज स्पष्ट आणि स्वच्छ होता. गर्दी मागे पडत चालली होती. जणू काही सांगत होती.
“हे असेच असते जगणे.. “
थोड्या लांबवर लोकांचा एक ग्रुप दिसायला लागला. बरं वाटलं. वाटलं.. ती गर्दी मागे पडली.. काही हरकत नाही.. समोरही माणसं दिसतायत. मनात आपण बरोबर चाललोय ना? ही शंका आणि धास्ती होतीच. कारण चालताना ज्याला विचारावं त्याने.. समोर बोट दाखवून.. “ सामने जाईये..” असं सुचवलं होतं. मग वाटलं.. “अगं हो.. पुढे असेलच. “ सगळे मिळून कसे दिशाभूल करतील? चांगुलपणा हा गृहीतच असतो. नाही का?
शेवटी त्या ग्रुप जवळ पोहोचले. बघते तर हातात दारूच्या बाटल्या घेऊन बसलेली काही तरुण मुलं होती. भीतीच वाटली. एकदा वाटलं मागे फिरावं. बरीच लांब चालत आले होते.
ड्रींक्सचा उग्र वास, त्यांची आपापसात चाललेली थट्टा मस्करी, आरडा ओरडा.. मला त्यांची कीव आली. आणि त्यांच्या असभ्य(?) वागण्याचा रागही आला. मनात आलं.. “ही काय पद्धत आहे?”
पण.. ‘जाऊ दे’ म्हणत त्यांनाच विचारलं, “पॅराग्लाईडिंगसाठी वरती चढावावर जावं लागतं .. ते कुठून?”
“ये.. यहाँ से” असं म्हणत.. आणि वर.. “ आपके गमबूट फिट है ना? “ असंही त्यातल्या कोणीतरी म्हटलं.
मी जुजबी.. हो हो केलं. आणि चढायला सुरुवात केली.
पायातले गमबूट बर्फात रुतवत, अंदाज घेत मी चढत होते.
एव्हाना सुरवातीच्या गर्दीचा आवाज क्षीण झाला होता. खालच्या मुलांचा आवाज तेवढा येत होता.
हातात घड्याळ नव्हतं पण वाटत होतं बराच वेळ झाला चालायला लागून... अजून कसा येत नाही तो स्पॉट..? आता सुरवातीच्या गर्दीचा आवाज पूर्णपणे ऐकू येईनासा झाला. मी कानोसा घेतला, मुलांचे आवाज अजून ऐकू येत होते. बरं वाटलं. चढणं सुरूच होतं.
तेवढ्यात हातात घेतलेल्या काठीला जमिनीत काहीतरी लागलं. जरा चाचपडून पाहिलं. आजूबाजूचा भुसभुशीत बर्फ बाजूला सारला. आणि सहज काठीने उकरल्यासारखं केलं. चर्रर झालं. बर्फात रुतून बसलेला एक गमबूट होता.
दोन मिनिटं थांबले. नको नको त्या शंका मनात यायला लागल्या. इतक्या वेळ मी ही चढण चढतेय.. कोणीच कसं मला क्रॉस झालं नाही? अजून कोणी इथे पॅराग्लाइडिंग करायला का आलं नाही? हा बूट कोणाचा असेल? मी योग्य मार्गावरून चालतेय ना? झपाझप अंगावर येणारी भीती, अशाश्वतता झटकून टाकायचा प्रयत्न करत मी एक दीर्घ श्वास घेतला.. आणि मागे वळून.. खाली ती मुलं दिसतायत का? त्यांचा आवाज येतोय का? याचा अंदाज घेऊ लागले. मुलं दिसेनाशी झाली होतीच.. आता त्यांचा आवाजही ऐकू येत नव्हता. मधेच आलेल्या वाऱ्याच्या लहरीबरोबर.. अस्फुट.. अस्पष्ट.. माणसांचे.. त्यांच्या लांबवर असण्याचे हलके आवाज येत होते. सुरवातीला बेबंद, असभ्य वाटलेलं त्यांचं वागणं .. बोलणं..हसणं.. मला आत्ता आता पर्यंत किती साथ आणि धीर देऊन गेलं. माणुसपण जवळपास असण्याची चाहूल सतत जाणवत राहावी.. ही गरज इतकी मुलभूत असते?.. हं.!
त्या तशा अवस्थेत समोर वरती पाहिलं. समोर तीनही दिशांना उंचच उंच शुभ्र पर्वत रांगा.. आणि आकाशाकडे झेपावलेली शिखरं दिसत होती. किती विलोभनीय सौंदर्य होतं ते. मेंदूत नोंद झालेल्या कुठल्याशा सिनेमातल्या ,छायाचित्रातल्या चित्रापेक्षा कितीतरी भव्य सुंदर अमर्याद होतं ते.
पण फक्त किती क्षण मला ते सुंदर दिसावं? दोन..? तीन..? पुढल्या क्षणी मेंदुला काय वाटतंय नी काय आकलन झालंय..या पलीकडे जाऊन.. मन टाहो फोडून काहीतरी सांगत होतं.. या एवढ्या सौंदर्याच्या भव्य पसाऱ्यात तू एकटीच आहेस! पूर्णपणे एकटी. मनुष्याच्या कुठल्याही खुणा तुझ्या आजूबाजूला नाहीत. सर्वस्वी एकटी आहेस तू. अतिशय जीवघेणी व्यथा ..दुःख .. मळभ आत आत पाझरलं. पुन्हा कुठूनसा आवाज आला.. ‘हे असेच असते जगणे..

पुन्हा सगळी मरगळ, नको तेवढी स्पष्टं झालेली काळोखाची सत्यं झटकून मी मागे वळले. समोर पुन्हा चढावावरचा रस्ता दिसू लागला. पर्वतावरचा अजून अनभिज्ञ असलेला ठराव मला खुणावू लागला. मनाशी पक्कं ठरवलं. आणखीन चढून बघू. आता अर्धवट मागे फिरायचे नाही.

थोडी आणखीन वर आले. जवळच एक काचेची रिकामी बाटली पडलेली दिसली.. मनात आलं.. ‘ वा..! म्हणजे इथून कुणीतरी गेलेलं असावं.’ थोडं बरं वाटलं. बाटली उचलून नाकाला लावली. दारूचा वास येतोय का पाहिलं. छे! कोरडी ठणठणीत होती. म्हणजे ही केव्हाची तरी इथे पडली असलेली असावी. पुन्हा भीती शंका निराशा दाटू लागल्या. आता मला जोरजोरात हाका मारावाश्या वाटू लागलं. म्हणजे कोणीतरी ओ देईल.. मी योग्य चढण चढतेय म्हणेल.. असं वाटायला लागलं.. मी खरंच दोन तीन हाका मारल्या.. अंहं..!!
तो विचार तसाच सोडून देऊन.. मी पुन्हा चढायला लागले. आता वरून बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. माझ्या चालण्याचा वेग अपोआप वाढू लागला. श्वास आपोआप पुरू लागला. मगासपर्यंत जड जड झालेला देह.. जणू एका दिशेने .. नुसत्या चाहुलीने झपाटून जाऊन.. हलका झाला होता..
आणि अचानक एका पावलावर मला वरती वावर दिसायला लागला. झपाझप पावलं टाकत मी वर आले. हो..! मी त्या ठरावावर पोहोचले होते. ‘ मेडम आईये.. सत्वीर ने भेजा ना..? ‘ .. मला धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारावीशी वाटली.
हां.. हां.. !’ म्हणत मी अगदी त्याच्या समोर जाऊन उभी राहिले.
तो काहीसं ओळखीचं हसला.. काहिसं ओळखून ही हसला. म्हणाला.. ‘बैठेये मेडम .. सांस लीजिये..”
आणखीन दोघे माझ्यासारखेच माझ्या आधी तिथे पोहोचले होते. एक टेक ऑफ च्या तयारीत होता आणि एकाला ग्लायडरचे पट्टे बांधणं सुरु होतं..
मी एक मिनिट.. म्हणत मी मागे वळले. मगाशी आले तिथून खाली डोकावून पाहिलं.. वाटलं, ‘ अरे आपण चढून आलो.. तो रस्ता किती शांत.. सुरेख होता. त्यावर उमटलेले ते ठसे किती सुंदर दिसतायत..!” पण मलाच माझ्या या विचारांनी हसू आलं.
आता त्यांनी माझी तयारी करायला सुरुवात केली.
“ मेडम .. ये आपके साथ आएगा. देखीये.. यहां से दौडते हुये उस ढलान तक जाना है. और फिर एकदमसे कुद जाना मेडम. करेंगी ना? डरेंगी तो नही..?”
मी मानेनेच नाही म्हटलं.
“देखिये मेडम एकबार कुदनेके बाद , जमीं को पकडे रखनेकी कोशीश करेंगी तो गलत हो जायेगा. बीचमे ही कही घसीटते रह जाओगे. तो एक करना मेडम, बस कुद जाना. बिना कुछ सोचे..ठीक है..!? डरिये नाही. वेरी गुड मेडम. “
सगळे पट्टे बांधून झाल्यावर मी समोर पाहिलं.. मगाशी .. खाली.. मध्यावरून दिसलेल्या त्या पर्वतरांगा.. आणखीन उंचावरून दिसल्या. अप्रतिम.. अलौकिक दृश्य होतं ते.
आणि आम्ही.. मी आणि प्रशिक्षित चालक, रशीद ..त्या सपाट केलेल्या जागेवरून धावायला सुरुवात केली.. बाजूला ग्लायडरच्या पंखाना पकडुन त्यांच्या पैकीच काही मुलं धावत होती.
ठरावाच्या कड्यावर येताच.. रशीदने “ मेडम जंप sssssss..” जोरात म्हटलं. आम्ही दोघांनी जमिनीवरचे पाय सोडून उडी घेतली. ग्लायडर हवेत ताणलं गेलं. रशीदकडे नियंत्रण होतेच. काही क्षणातच मी पक्षी झाले होते. मी जोरात हाक मारली ..रशीद....! किती तरी वेळ.. अत्यानंदाने मी काहीही ओरडत होते.

सुरवातीची पर्यटकांची गर्दी, रंगीत छोट्या छोट्या, हलणाऱ्या लांबट ठिपक्यांसाराखी दिसू लागली. सभोवताली.. खाली.. पांढरा शुभ्र कॅन्व्हास.. त्यावर पांढऱ्या रंगाच्या अनेक छटा असलेल्या रांगा.. पर्वतांचा उतार.. शिखरं रेखणाऱ्या , शुभ्राच्या काही हलक्या रेषा.. खालचे आकार बदलणारे , रंगीत लांबट ठिपके ... अशक्य अवर्णनीय जगणं होतं ते ..
काही क्षण मग शांततेत खालच्या ठिपक्यांच्या हालचाली बघत गेले. मी त्यातलीच एक होते. पण वेगळी होऊन आत्ता त्यांच्याकडे.. सगळीकडे पहात होते. जाणीवेच्या शक्य तेवढ्या दारातून जगणं भरून घेत होते.. वेळ काळाचा हिशोब केव्हाच मागे पडला होता..
वाऱ्याचा इतका सुखद सहवास पहिल्यांदा अनुभवत होते.
मग वाऱ्याच्या त्या आवेगी स्पर्शासोबत हळूहळू आम्ही खाली उतरलो. जमिनीला पाय लागले.. नियंत्रण रशीद कडे होतं .. तरी मलाच काहीतरी असामान्य केल्यासारखं वाटत होतं.
पट्टे मोकळे केल्यानंतर, रशीदचे हात घट्ट पकडून त्याचे खूप मनापासून आभार मानले. वरच्या मुलांनाही माझा निरोप दे असं सांगितलं.
एकदा वाटलं, त्या पायथ्याशी बसलेल्या तरुण मुलांनाही थॅन्क्स म्हणून यावं. पण नाही गेले.
परसेप्शन .. सत्य.. सौंदर्य यांनी भरलेली अद्भुत कुपी मनात घेऊन हॉटेलवर पोहोचले. “मी आहे.. मी आहे “ म्हणत मनालासू वाट पहात होतीच.

- मेघा देशपांडे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अनुभव सुंदर शब्दबद्ध केलाय. आधी बर्फ/ स्नो वरचा मुक्तपीठीय लेख आहे वाटून सोडून देणार होतो.
आपला दृष्टीकोन किती बदलतो ना!

फार सुंदर लिहिले आहे. आवडीची गोष्ट मिळाल्यावर एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच टिपता येतो तितकेच सहजपणे आपला आनंद पोहोचला आपल्या लिखाणातून..

वॅाव, सुंदरच अनुभव आणि त्याहीपेक्शा सुंदर लिहिले आहे. आम्ही अनुभव न घेताही आनंद पोचला.

वॅाव, सुंदरच अनुभव आणि त्याहीपेक्शा सुंदर लिहिले आहे. आम्ही अनुभव न घेताही आनंद पोचला.>>>>+१

फारच छान लिहिलंय. रिलेट झालं.
अमरनाथ ट्रेकला शेषनाग पासून पुढे पंचतरणीला जाताना एका स्पॉटला माझा ग्रूप आणि माझी चुकामूक झाली. मला बरं वाटत नसल्याने एका चढापुरता घोड्यावरून प्रवास केला होता. त्यामुळे भरभर पुढे पोचले होते. दूरवर कोणीही दिसत नव्हतं. रस्ता चुकले की काय कोणाला विचारणार? मग एक-दोन माणसं दिसली. त्यांच्या दिशेने चालत राहिले. ग्रूपमधलं कोणी तरीही दिसेना. मग दोन मुलं दिसली. माझ्याएवढीच असतील बहुतेक. त्यांनी असंच मॅडम - मॅडम म्हणत चौकशी केली, धीर दिला. त्यांच्या सोबतीने पुढे चालत राहिले. खूप भीती वाटत होती. पण काय करणार होते? त्या भोलेनाथावर विश्वास ठेवला आणि चालत राहिले. त्या विश्वासानेच सुखरूप पंचतरणी कँपपर्यंत पोचवलं त्या दिवशी. ज्यांची भीती वाटली होती तेच मला व्यवस्थित आमच्या टेंट साईटपर्यंत घेऊन गेले. आमच्या ग्रूपमधला एक मुलगा तिथे पोहोचला होता नशीबाने, तो मला भेटल्याची खात्री करून मगच ते दोघं पुढे गेले. देव कुठल्याही रूपात आपल्याला भेटू शकतो याची प्रचिती आल्यासारखं वाटलं त्यादिवशी.