एका वाद्यसंगीताचे भेटणे : Mulatu Astatke - Tezeta (Nostaligia)

Submitted by रॉय on 21 January, 2025 - 17:42

उन्हाळ्यातल्या एका शांत निवांत दुपारी तुम्ही सुस्तावलेले असता.
तुम्हाला काहीतरी संथ, निर्मल आणि सुंदर, माफक विनोदी काहीतरी पाहण्याची हुक्की येते.
बीबीसी ची detectorists तुम्ही ऑलरेडी दहा वेळा पाहिलेली असते. मग तुम्ही त्याच जातीची त्याच लोकांची दुसरी एखादी सिरीज शोधून काढता.
Do not forget the driver.
तुम्ही गुंतत जाता आणि हळू हळू शेवटाकडे येता.
नेहमीचा अख्या स्मूथ चवीचा जास्त कडसर नसलेला एखादा लागर भरून घेता. थोडे खारे शेंगदाणे.
सीरीज संपताना शेवटी इथिओपियन जॅझचे सूर हळू हळू तुम्हाला घेरून टाकतात. नावच त्या गाण्याचे Nostaligia असते.
हा नोस्टलिजिया तुमचा नसतो. पण ते सूर काहीतरी विलक्षण जिवंत करतात तुमच्या हृदयात.
तुम्ही ते गाणे नोंदवून ठेवता. मग त्या गाण्याशी रोमान्स सुरू होतो.
तुम्ही प्रत्येक स्वर ना स्वर झिरपू देता. यथावकाश हळू हळू गाणे तुमच्या प्लेलिस्ट मधे खाली खाली जाते.

===

बाहेर भुरूभरू हिमवर्षाव होत असतो. लवकर झालेला अंधार. पण उदासीन नसलेला.
दूरस्थ गावठाणातून ख्रिसमस मार्केटचा कोलाहाल या वर्षावातून तुमच्याशी कुजबुजत असतो.
अनेक घरांवर बुबुळांना थेटपणे न चरचरवणारे उत्फुल्ल लायटिंग केलेले असते.
पिवळे स्ट्रीटलाइट्स हिमकणांची प्रभावळ घेऊन शांत उभे असतात. अंधाराला तेवढ्यापुरते नज करून त्याचे अस्तित्व समजूतदारपणे मान्य करून. अंधाराला ड्यू रिस्पेक्ट देऊन उभे असतात. कुठल्याही प्रकाशकिरणाला खरेतर कशावरही विशेषतः अंधारावर ओव्हरपॉवर व्हायचे नसते.
आणि तुम्ही उबदार दुलईत the bear नावाची एक सिरीज पाहत असता.
अचानक तुम्हाला तेच हिप्नोटाईजिंग स्वर ऐकू येतात. इथेही कुठेही नोस्टलिजिया नसतो. कारण nostaligia प्रवाहित करणारा ऋतू तर वेगळाच होता. तरीही सूर तुम्हाला पुन्हा जाळ्यात ओढतात.

===

तुम्ही नुकताच पेपर टाकलेला असतो. त्यामुळे निवांत असता.
वसंत सुरू होणार असतो. दिवस अजूनही पुरेसा लांबलेला नसतो. बऱ्याच झुडूपांना बाळपल्लवी फुटलेली असते. तुम्ही टीवीवर
इकडे तिकडे उंडारत काहीतरी ट्रेंडी लावता. Mr and Ms Smith.
दुसऱ्याच सिनला पुन्हा तोच परिचित स्वर येतो.

===

आता पानगळ अंतिम टप्प्यात आली असते. सगळी कडे उघडी बोडकी झाडे तुमचा भ्रमनिरास करायला सज्ज होत असतात.
तेव्हा एका वादळी पावसाळी रात्री तुम्ही कुठल्यातरी आडवाटेवरल्या फिल्म फेस्टिवल ला आवर्जून जाता. तिथे एका कुठल्यातरी सिनेमावर बोट ठेवता आणि सरळ तो पाहायला जाता. Nickel Boys.
चित्रपट तुम्हाला आवडतो अमेरिकन असला तरी. तो संपता संपता तुम्ही रेंगाळता. पुन्हा तोच निर्मल सूर मोकळ्या थिएटरभर वाहू लागतो. तुम्ही स्तब्ध होऊन तिथेच थांबता. या स्वरांना खंडित करू नये असे ऑपरेटरला आपोआप कळलेले असते इतके ते पॉवरफूल असतात. थिएटर मधे दोनच माणसे असतात तरीही. ते स्वर्गीय स्वर सगळा आसमंत भारून टाकतात.

तुमी त्या अतिशय गोड हव्याहव्याश्या मूड मधे जाता. खरा खुरा nostaligia पण आठवणी नसलेला. तुम्हाला मग हे गाणे सार्थ नावाचे वाटायला लागते. त्यातल्या माधुर्याने तुम्ही पुन्हा चकित होता.

===
चारही सीजन मधे मला हे गाणे वा वाद्यसंगीताचा तुकडा अनपेक्षितपणे भेटला. हा दैवी संकेत असावा अशी पक्की खात्रीच झालीय माझी.
===

हे संगीत जणू सकाळच्या सूर्यकिरणांसारखं वाटतं. लगेचच मन कृतज्ञ आणि भावनिक होतं.

Mulatu Astatke यांनी 1970 च्या दशकात ड्यूक एलिंग्टन आणि इतर जॅझ संगीतकारांसोबत काम केलं आहे. ते एक वायब्राफोन नावाचे अप्रतिम वाद्य वाजवतात. यांना इथिओपन जॅझ चे जनक मानले जाते.

अधिक शोध घेता Gétatchèw Mèkurya यांचे याच गाण्याचे एक अफाट कवर सुद्धा सापडले.

tezeta ने मला इथिओपन jazz संगीताची गुहा खोलून दिली.

तर सादर आहे : Mulatu Astatke - Tezeta (Nostaligia) : https://youtu.be/dgmiYFLbn6U?si=Z_F_e_E6n57F6xcC

Gétatchèw Mèkurya : https://youtu.be/xxoFqNk7w9g?si=kf4PbASjiEJgp7tS

धन्यवाद धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मूड आणि संगीत फीड ईच अदर.

कोण्याही व्यक्तीने (मैत्र), त्यांना आवडलेले संगीत माझ्याबरोबर शेअर केले की माझ्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते कारण इट इज लाईक अनव्हेलिंग अ पिस ऑफ युअर सोल टु मी.
तुम्ही उधृत केलेले संगीत ऐकले. सुंदरच आहे. माझ्या युट्युब चॅनलच्या 'इन्स्ट्रुमेंटल' प्लेलिस्टित नोंदवले आहे.
लेख खूप आवडला.

खुप सुंदर तरल लिहिले आहे. आवडले.

नोस्टल्गिआ ऐकले. जाझ फारसे ऐकले नसल्याने त्यातली गंमत कळत नाहीय पण जे आहे ते कानांना खुप
गोड लागतेय.

शेअर केल्याबद्दल मनापासुन आभार!!

इंटरेस्टिंग!

अगदी अलीकडेच जॅझ संगीतात रस निर्माण झाला आहे. (ऑड वाटेल, पण त्याला निमित्त ठरलं बॉश ही वेबसीरीज) जॅझसाठी कान तयार करण्याची इच्छा आहे. म्युझिक अ‍ॅपवर रॅन्डम जॅझ शोधून ऐकते. ते सुद्धा अगदी नियमित नाहीच होत. अजून खास आवड किंवा अमुक एक कलाकारच, असं डोक्यात तयार झालेलं नाही.
हे नक्की ऐकणार.
मला मुळात शास्त्रीय गायनापेक्षा वाद्यसंगीत जास्त आवडतं.

सामो धन्यवाद.

>> कोण्याही व्यक्तीने (मैत्र), त्यांना आवडलेले संगीत माझ्याबरोबर शेअर केले की माझ्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते कारण इट इज लाईक अनव्हेलिंग अ पिस ऑफ युअर सोल टु मी. <<
हे अगदी पटले.

>> जाझ फारसे ऐकले नसल्याने त्यातली गंमत कळत नाहीय पण जे आहे ते कानांना खुप
गोड लागतेय. <<

कानांना गोड लागते हीच गंमत आहे, साधना!

>> जॅझसाठी कान तयार करण्याची इच्छा आहे. म्युझिक अ‍ॅपवर रॅन्डम जॅझ शोधून ऐकते <<

ललिता प्रीती, लेट मी सजेस्ट समथिंग अवर्स.

हे बंगाली गाणे ऐका. https://youtu.be/zD9OQb-knwA?si=HPiUohzuE3PyZlG3

रवींद्र संगीत आहे. त्याचे लिरिक्सदेखील तुम्हाला आपोआप कळतील. टागोरांचे शब्द आहेत. पण शब्दांना संगीताने ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्याला तोड नाही. कासावीस झालेली नुकतीच प्रेमात पडलेली व्यक्ती, तिच्या जागी स्वत:ला ठेवून पाहा. तिच्या लेखी या शब्दांना केवळ गाणे म्हणून महत्व नाही, तिची सगळी असोशी शब्दांत उतरली आहेच पण संगीतातून ती तळमळ तर अगदी टोकाला पोचते आहे आणि त्या तळमळीच्या लाटा सुरांना लपेटून येताहेत. जॅझची ही आपली आपल्या मातीतली जादू.