आत्ताच माझ्या एका फोल्डर मध्ये सापडलेले हे जुन्या मायबोलीतील एक रत्न.
मुळ मजकूर Rahulphatak ह्या आयडी ने Wednesday, March 01, 2006 - 2:23 am ला पोस्ट केला होता.
---------
मायबोलीवर एक C&V होते.. म्हणजे C for ‘चर्चा’ व V for ‘विचारप्रदर्शन’ ! विषय असतो :
'हिंदी चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम'
sakhol:
चित्रपटासारखे प्रभावी आणि प्रभावशाली माध्यम अनेकांच्या मनावर खोलवर परिणाम करते, विशेषत: हिंदी चित्रपट ! दुर्दैवाने आजकाल हिंदी चित्रपटांचा दर्जा खालावला आहे.. हिंसा, अश्लीलता ह्याने थबथबलेले चित्रपट समाजाला कुठे घेउन जात आहेत ? समाजातल्या प्रत्येक स्तर आणि थर ह्यावर त्यांचा अनिष्ट परिणाम होत आहे.. त्याची चर्चा करण्यासाठीच हा BB आहे.
pp20:
हिंदी पिच्चरचा काय परिणाम होतो ? एकतर बोर होतात नायतर मजा येते अजून काय?
ashakya:
'हिंदी' मधे भोजपुरी येतात का ? आजकाल फार परिणामकारक भोजपुरी ट्रेलर्स दाखवत असतात. ‘सजनवा हमार’
sakhol:
मला इथे गंभीरपणे चर्चा करायची आहे.
kishorkumar:
मी ह्यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. सांगलीला माझ्या घराच्या समोरच टॉकीज होते.. पण त्यामुळे शाळेत चोरून पिक्चरला जाता यायचे नाही. कारण पडवीत आमचे आजोबा बसलेले असायचे नाहीतर पिताश्री ! खर म्हणजे हा विषय ‘समाजाचा चित्रपटगृहाच्या गर्दीवर होणारा परिणाम’ असा होईल. माझे पोस्ट बरोबर नसेल तर उडवून टाका.
tatya:
चांगला विषय आहे, चित्रपट हे समाजभिमुख असावेत का ? हा उपप्रश्न आहेच.
jagan:
ते माहीत नाही. प्रेक्षक स्क्रिनभिमुख असावेत.. पण त्यानी चित्रपटांकडे पाठ फिरविली आहे. काय रद्दड पिकचर काढतात हल्ली.
ultimate:
कुनी गोविंदाचा अखियोसे गोलि मारे पाहला का. फूल टाइमपास. आम्ही नवीन आला की पिक्चर पहातोच..
chintan:
कूणी नुकत्याच झालेल्या स्वाहीली महोत्सवातला ‘आयेचा मगारशी’ पाहिला का ? आशय विषय सादरीकरण नेपथ्य सगळ्याच बाबतीत उजवा
bhayan:
नाही पाहिला ! गेलो होतो पण आम्ही पाचही मित्र गाढ झोपलो होतो… अत्यंत रद्दी पिक्चर.
sampatambardekar:
ये जीवन है इस जीवन का यही है हे गाण कुणाकडे आहे का?
pethi:
चित्रपटाला नेपथ्य ? ATN
madhavpethe:
खूपच करुणेचा विषय आहे. माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुलाला झाडाला पाणी घाल म्हटल साध तर तो ‘डाल दूंगा !’ अस म्हणतो.. कुठल्या अर्थाने म्हणतो कुणास ठाऊक.. हे जळजळीत वास्तव पचवायला जड जात आहे.
shikar:
करुणेचा ? तुम्हाला जिव्हाळ्याचा म्हणायचय का ? ATN म्हन्जे काय
sau_joshi:
माझ्या कुत्र्याचे केस गळतात. कुणी उपाय सांगू शकेल का ? मी फॉल व पिको चा व्यवसाय करते. तसेच २ तासात ७ प्रकारे कटाची आमटी शिकवली जाईल. फी १०० रुपये फक्त (घरून कट करुन आल्यास ९० रुपये)
संपर्क : सौ. जोशी, ‘व्युत्पत्ती’ बंगला, प्रभात क्रॉस लेन ३
zimma@hotmail.com
(दुपारी १ ते ३ मधे इमेल करु नये)
asmani:
मला ठोकळे दिसत आहेत.
ashakya:
होय, इथली चर्चा ठराविक चौकटीत चालू आहेत त्याचच प्रतिक आहेत ते ठोकळे.
bhimsen:
आजकाल आपल्यातली सहिष्णुता संपत चालली आहे का ? त्याच चाकोरीबद्ध चर्चा करुन आपण आपले समाधान करुन घेणार आहोत का ? चित्रपटांच्या घसरलेल्या दर्जावर एक सुंदर लेख आला आहे तो इथे पहा !
pakshimitra:
ATN = ऐकावे ते नवलच. जोशी बाई जागा चुकली. आणि तुम्ही हा मेसेज अजून १५ BB वर टाकला आहे.. this is too much !
kanyaka:
लेख कुठे पाहू ? दिसत नाहीये !
bhimsen:
‘इथे’ ह्या शब्दावर टिचकी मारा
saapeksha:
मी इथे नवीन आहे. मी एक कविता केली आहे ती चांगली आहे असे माझे हितचिंतक म्हणतात. कुठे पोस्ट करु ?
kranti:
समाजाचा चित्रपटावर परिणाम हा होतोच. चित्रपट समाजाचे प्रतिबिंब आणि समाज चित्रपटाचा आरसा असतो ! नट मंडळी काही बेटावर रहात नाहीत समाजाचाच एक भाग असतात. अलिकडे अशी टिका करायची फॅशन आली आहे. हे कधी बदलणार ?
bhimsen:
अहो विषय नीट वाचा वर ! आणि ते बेटाच कुणी म्हटल तरी आहे का?
kranti:
छे छे इथे तरी असभ्य वयक्तिक टिका होईल असे वाटले नव्हते !
bhimsen:
वयक्तिक नाही वैयक्तिक !
kanyaka:
खूप वेळा मारली काहीच झाले नाही
shikar:
तुम्ही कोणाशी आणि काय बोलताय ?
kanyaka:
मी खूप वेळा टिचकी मारली. मॉनिटरची काच फुटायला आली. मायबोलीवर टच स्क्रीन वगैरे केलाय का.. काहीच होत नाहीये प्लिज पुन्हा एकदा सांगा !
jagan:
अहो टिचकी म्हणजे माऊस ने क्लिक करा. चांगले Tax software कुणाला माहीत आहे का?
Anya:
जगन मिरजला होता रे तू ९८ साली ? माझ्या रुममेटचा मित्राला छेड काढल्याबद्दल थेटरात लई मार पडला होता त्याचेही नाव जगनच होते.
Moderator_99:
कृपया टाईमपास नको.
sahi_re_sahi:
आजकाल पिक्चर कम्युनिस्ट झाले आहेत. म्हणजे ज्यात त्यात कोयते घेऊन मारामारी करतात.. काय तो हलचल पिकचर . आणि स्पेलिंग तरी नीट करायचे ना.. hulchul काय ! हुलचुल वाटत ते !
vidvan:
त्यात काय झाल? hulchul काय आणि halchal काय ! सारखच !
sahi_re_sahi:
हो का ? मग तुमच्या पद्धतीने हे लिहा बघू हे रोमन मधे : ‘कल्ले वाढून हनवटीपर्यंत आलेत, कात्रीने कापा’
bachchoo:
सत्तू तुला पूर्ण अनुमोदन
Amolshastri:
hi frends, this is Amol from usa. resently I got in usa liking here but mising india.
sakhol:
अमोल इथे गंभीर चर्चा चालू आहे. तुम्ही वाचून सहभागी होऊ शकता. समाजाची जागरुकता वाढवली पाहिजे.
sahishnu:
चूकीच इंग्लीश लिहिण्यापेक्षा मराठित का नाही लीहित लोक !
bachchoo:
सत्तू लेका मेसेज डिलीट केलास आता माझा अनुमोदनाचा मेसेज डिलीट करता येत नाहीये.
jagruk:
हा या बिबीचा विषय नाही. पण आमच्याशेजारचे मोठ्या आवाजात टिव्ही लावतात नवीन पिक्चर आणला की. आमची जागरुकता शब्दश: वाढत आहे. काल २ वाजेपर्यंत हैदोस चालला होता. पुण्यात ध्वनिप्रदूषणाची तक्रार कुठे करायची ?
pethi:
तुम्ही पुण्यात कुठे रहाता ?
jagruk:
नाही मी इचलकरंजीला असतो. सहज चौकशी केली. पुण्यात कदाचित बदली होणार आहे.
ashakya:
शेजाऱ्यांची पण का ?
ponkshe:
समाजाच मन इतक म्हणजे इतक बथ्थड होत चालल आहे की त्यावर कशाचाच परिणाम होत नाही.
aundhati_nagpurkar:
आमचा भाजीवाला दर वेळी वजनात मारतो आता हे त्याने कुठल्या मुव्ही मधे पाहिल असेल ? वाईट माणस वाईटच वागणार आणि चांगली माणस चांगलीच वागणार.
leela_jamenis:
आज मटार स्वस्त आहेत, पण कांदे काही उतरत नाहीत. लालू प्रसादला चौकात मारल पाहिजे.
sakhol:
कृपया विषयाला धरुन बोला.
sweekar:
शश्ठी मधला श कसा लिहायचा ? विषयाला सोडून असेल तर कृपया हा संदेश काढून टाका.
ashakya:
अहो तुम्ही ष लिहिला आहे की ! तुम्हाला ह्या बीबीवर षष्ठी का लिहायच आहे ? बच्चन ला ६० पूर्ण होऊनही बराच काळ झाला.
babugenu:
मला वाटत भ्रष्टाचाराच्या नवनवीन आयडिया पिक्चरमधून मिळतात.
leela_jamenis:
माझ्या ओळखीत एका मुलीने एका मुलाला तो गोविंदासारखे कपडे घालतो म्हणून लग्नाला नकार दिला. अस सामाजिक भान असणाऱ्या मुली किती आहेत ?
leela_jamenis:
जोशी बाई, मी सोसायटितल्या चार जणी घेउन आले तर डिस्काउंट देता का ?
Moderator_99:
चर्चा भरकटल्यामुळे हा बीबी बंद करण्यात आला आहे.
समाप्त !
हा संवाद इमॅजिनरी आहे असं
मजा आली वाचायला. जोशी बाईंची पोस्ट खास आहे.
V&C म्हणजे views and comments होतं ना?
अगागागागा..
अगागागागा..
मध्ये ते बेफिकीर यांनी मायबोलीकरांचे काल्पनिक प्रवासवर्णन कम काल्पनिक ट्रेक वृत्तांत लिहिला होता त्याची आठवण झाली. उडता गरुड आणि काहीबाही आयडी होते त्यात.
https://www.maayboli.com/node/34460
माबोवर रोमात राहायचा प्रयत्न करते आहे पण काय एकेक बीबी हाणून पाडतात !!
हा हा हा.... कायच्या काय !
हा हा हा.... कायच्या काय ! 😂
हे मस्तय षष्ठी पर्यंत
हे मस्तय षष्ठी पर्यंत येईपर्यंत इतक्या वेळा हसले गोविंदा पर्यंत फुटलेच . भारी आहे संभाषण असं गंभीर संभाषण आताही झालं पाहिजे.
धमाल आहे नुसती....
धमाल आहे नुसती....
हो.
हो.
हा धागा मायबोली v.1.0 मधल्या V & C बद्दल v.2.0 मध्ये पोस्ट करण्यात आला होता.
हा मजकुर v3.0 मध्ये पोस्ट करण्याचा उद्देश फक्त "मायबोलीतील चर्च्या मध्ये मागच्या 28 वर्षात फार फरक पडला नाही हे पुराव्याने शाबीत करणे हा आहे".
धमाल आहे.