विनोदार्थीं भरे मन

Submitted by अतरंगी on 4 January, 2025 - 05:04

विषयाला प्रस्तावना देण्याआधी व स्वतःचे किस्से सांगण्याआधी एका मित्राच्या किस्स्यावरुन सुरुवात करतो.

माझा एक कॉलेजचा मित्र आहे. त्याची स्वतःची पेंट बनवायची कंपनी आहे. त्याशिवाय ईतरही अनेक ऊद्योग आहेत. याचे महिन्याचे उत्पन्न तीन ते चार लाखाच्या घरात अगदी सहज असेल. हा मित्र स्वभावाने अतिशय चांगला व नम्र आहे. कंपनीत सर्वांसोबत मिळून काम करतो. ऑफिसमधे बसून फक्त ऑर्डर्स न सोडता स्वतः शॉप फ्लोअरवर काम पण करतो. तर असाच एके दिवशी कंपनीत काम करत असताना एका व्यक्तीला काही डॉक्यूमेंट्स द्यायची होती म्हणून घाईघाईत काम करत होता त्याच कपड्यांमधे कंपनीतून निघाला. त्या व्यक्तीला डॉक्यूमेंटस देऊन येताना एके ठिकाणी वडापाव खायला थांबला. दोन वडापाव घेतले आणि मग बाजूला येऊन खात उभा राहीला. थोड्यावेळाने त्या हातगाडीचा मालक जवळ आला आणि याला एक एक्स्ट्रा पाव द्यायला लागला. याला पाव नको होता म्हणून याने नकार दिला तर तो लगेच समोरून म्हणाला " घे रे पैसे नाही घेणार" याला कळलेच नाही की हा असे का म्हणत आहे. मग त्या मालकाने सहज पुढचा प्रश्न केला " कुठे काम चालू आहे?" या प्रश्नावर माझ्या मित्राची ट्यूब पेटली तो मालक त्याच्या कपड्यांवरून त्याला पेंटर समजला होता. माझ्या मित्राने हसत हसत त्याचा गैर समज दूर केला आणि त्याला सगळं सांगितलं.

माझ्या मित्राने हा किस्सा मला सांगितला तेव्हा मी फार हसलो आणि हळहळलो. माझ्या मित्राने असा फुल्टॉस आलेला बॉल सोडला होता. माझ्या साठी असे प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण आहेत. माझ्यावर असे प्रसंग आले तेव्हा मी या प्रसंगांचे सोने केले आहे.

विनोद सगळ्यांनाच आवडतात. प्रासंगिक विनोद, शाब्दिक कोट्या, अश्लिल विनोद, टॉयलेट ह्युमर, रोस्ट कॉमेडी, प्रँक्स असे विनोदाचे उपप्रकार करता येतील का? प्रत्येकाला एखादा उपप्रकार असतो जो जास्त रुचतो असे मला वाटते. मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे pranks. बाकी विनोदांवर मी ते ऐकतो, हसतो, एंजॉय करतो व बर्‍याचदा विसरून जातो. पण मला वर्षानुवर्ष जे जोक्स लक्षात राहतात नी जे मी व माझे मित्र आठवून आठवून हसतो ते म्हणजे मी केलेले प्रँक्स....

टिनेज मधे आपल्याला काय आवडेल आणि आपण कशाने ईप्रेस होऊ याचा काही भरवसा नसतो. माझी दहावी झाल्यावर आमच्या घरी केबल आली. आणि त्यासोबत आले भरपुर असे चॅनल्स, त्यातलाच एक चॅनल एम टिव्ही आणि त्यावर यायचा तो शो एम टिव्ही बकरा. माझ्या आयुष्यात मी असले काही पहिल्यांदाच पहिले होते, आणि खळखळून हसलो होतो. मी तो शो आणि त्याचे रिपिट टेलिकास्ट जमेल तितक्या वेळा बघायचो. ते ईतक्या वेळा बघून बघून तसेच काही करायची फार ईच्छा व्हायची. पण त्यावेळेस फार डोके चालायचे नाही आणि थोडेफार झाले की मला किंवा कोणालातरी हसू फुटायचे.

पण ते म्हणतात की अगर कोई चिझ आप शिद्द्तचे चाहो वगैरे वगैरे तसे माझे झाले. हळूहळू माझा आवाजावर व हसण्यावर बराच ताबा आला. त्यानंतर मी प्रचंड मजा केली. नंतर नंतर मला लक्षात आले की ठरवून प्रँक न करता एखादा प्रसंग समोर आला की त्यातून पुढे ते exploit करत त्यातून पुढे जे प्रँक्स करता येतात ते फार मजेदार होतात, वर्षानुवर्ष त्यावर हसता येते.

तर हे सगळे माझे किस्से....

१. हा माझा व माझ्या मित्रांचा सगळ्यात आवडता.....

मी व माझे मित्र एकदा माझ्या नविन गाडीतून शिर्डीला गेलो होतो. मी कामावरून सरळ आलो आणि आम्ही लगेच निघालो. पूर्ण रस्ता गाडी मीच चालवली, शिवाय परत जाताना पण मलाच चालवायची होती. त्यामुळे नाष्टा करून आल्यावर मी मित्रांना म्हणालो "तुम्ही दर्शन घेऊन या. मी जरा गाडीत झोपतो." मी गाडीचे सिट वगैरे अ‍ॅडजस्ट करुन झोपायच्या तयारीतच होतो तेवढ्यात एक जण समोरून आला आणि म्हणाला "पुडी हाय का?" मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही म्हणालो. त्याने लगेच पुढचा प्रश्न केला " काय साहेब लोक दर्शनाला गेल्यात का?" त्याक्षणी माझी ट्यूब पेटली की हा मला ड्रायव्हर समजत आहे. मी हो ना म्हणत पटकन दरवाजा उघडून बाहेर आलो. झोप गेली उडत, हे जास्त महत्वाचे होते. Lol तो माणूस मुंबईवरुन आला होता. श्रीमंत घरात ड्रायव्हर होता. त्याला त्यावेळेस चांगला १२ कि १३ हजार पगार होता. मी ट्रेनी म्हणून काम करत होतो आणि एवढे शिकून मला पण तेवढाच होता :हाहा:. मग त्याने मला विचारलं कि तू काय करतोस. मी त्याला म्हणालो की मी एका सुमोवर कामाला जातो. मग मला घरच्या कशा जबाबदार्‍या आहेत, ट्रिप नसतील, सिझन नसेल तर काम मिळत नाही, मालक कसा हरामी आहे, वेळेत पैसे देत नाही, ते पुरत नाहीत म्हणून मग मी अशा बदली ट्रिप्स मारुन पैसे काढायला बघतो वगैरे माझी दुखभरी कहाणी त्याला सांगितली. त्यानंतर कुठे चांगला जॉब मिळेल, अशा श्रीमंत लोकांच्या घरी काम करताना कसे वागायचे, काय काळजी घ्यायची वगैरे विचारत बसलो. मी त्या माणसाशी जवळ जवळ तीन तास ड्रायव्हर म्हणून गप्पा मारत होतो...
आणि अचानक माझा मोबाईल वाजला.. मी झोप्लो असेन म्हणून मित्रांनी दर्शन घेऊन, थोडावेळ टाईमपास करून फोन केला होता. मी पटकन फोन उचलून "हो सर बोला ना" असे म्हणून कुठे आहेत विचारून मी पटकन झपझप चालत मोबाईलचा विषय निघू न देता गाडीत बसून स्टार्टर मारला.

२. मी व माझा मित्र कम बिझनेस पार्टनर एका नविन शाखेसाठी भांडी घ्यायला मंडईतल्या नेहमीच्या दुकानात गेलो होतो. या दुकानातले सगळे कामगार आम्हाला चेहर्‍याने ओळखतात व आम्ही त्यांना नावाने. माझा मित्र आत काही तरी घेत होता व मी पाय दुखत आहेत म्हणून दुकानाच्या बाहेर एका स्टूल वर टेकलो होतो. तेवढ्यात समोरुन एक मध्यमवयीन कपल, लोअर मिडलक्लास कपल आलं नी मला विचारलं "तुमच्या कडे कढई आहे का? " मी लगेच तत्परतेने पुढे झालो नी म्हणलो हो आहे ना. मग त्यांना विचारलं की "तुम्हाला किती नंबरची कढई हवी आहे नी कशाला हवी आहे?" त्यांना बटाटेवडे तळायला कढई हवी होती. त्यांना कढईचा साईझ सांगता येईना, मला म्हणाले की तुम्ही कढई दाखवा मग आम्ही सांगतो. त्यांना आहे ती कढई कमी पडत होती, म्हणून ते नविन पहायला आले होते. मग मी त्यांना तुम्ही तासाला किती वडे सोडता वगैरे विचारुन घेतलं. त्यांना कढईचा साईज वाढला की तेल कसे वाढते, मग कोणत्या कढईत किती वडे निघतात हे सगळे समजावले. मग मी हिशोब करुन दुकानात आवाज दिला " निरंजन यांना २६ नंबरची कढई दाखव" त्या निरंजनला पण दोन मिनिटे कळले नाही की एवढ्या अधिकारवाणीने त्याला कोणी ऑर्डर सोडली. आणि मग मी अगदी नम्रपणे वाकून त्या काका काकूंना आत जायची खूण केली, नी लगेच मित्राला त्याच दुकानात सोडून तिथून पसार झालो.

३. मी मधे मुंबईच्या क्राईम वर्ल्डवरची बरीच पुस्तके वाचली होती. त्याच दरम्यान गावातल्या मित्रांसोबत कोकणात ट्रिपला गेलो होतो व एका होम स्टेमधे थांबलो होतो. जायच्या जस्ट काही दिवस आधीच 'डोंगरी ते दुबई" वाचून झाले होते. तिथे पिऊन गप्पा मारता मारता कसे काय माहित नाही गुन्हेगारी जगताचा विषय निघाला की मी बळेच स्वतःकडे असलेली माहिती शो ऑफ करायला तो तिकडे वळवला. मी आणि माझा एक मित्र त्यावर बराच वेळ बोलत होतो. बाकी जण अधून मधून कमेंटस टाकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथला मालक आला सहज गप्पा मारत बसला. मारता मारता त्याने हळूच विचारले “तुम्ही सगळे क्राईम ब्रांचला आहात का?” मी फटकन सांगितले “सगळे नाही.” मग एका मित्राकडे बोट दाखवलं नी म्हणलं “ फक्त तो आणि मी”. दुसऱ्या एकाकडे बोट दाखवलं नी म्हणलं तो ब्लॅक कॅट कमांडो आहे( हा खरेच होता), दुसऱ्याकडे बोट दाखवून म्हणालो की तो मिलिटरी मधे आहे (हा मिलिटरी मधे आहे पण ॲाफिस स्टाफ आहे). अजून बाकी असेच ईतर डिपार्टमेंट सांगितले….. मग त्यांना मी त्या पुस्तकांमधून मिळालेली वेग वेगळ्या गँग्स, त्याचे एक्मेकांशी संबंध, कोणाचे वैर कोणाशी कसे तयार झाले ही आणि अशी अनेक माहिती सांगितली. नंतर तो मालक गेल्यावर आधी सगळ्यांना गोळा केलं आणि जे झाले ते सांगितले. सगळ्यांना सांगितलं की आता दोन दिवस कॅरेक्टर मधे रहा. बेअरिंग सोडू नका. दोन दिवस आम्हाला अतिशय चांगली सर्व्हिस मिळाली. आजही आमच्या अनेक ट्रिप्स ला या किश्श्याची आठवण निघते.

मायबोलीकरांना पण मी याचा प्रसाद दोन वेळा दिला आहे. २०२३ च्या वविला हर्पेनदा व योकुला टि शर्ट्स साठी. त्याचा किस्सा हर्पेनदाने त्या वविच्या धाग्यावर लिहिलाच आहे. हा त्याच्याच शब्दात.... "मी माझ्या स्टॉप वर पोचलो तेव्हा योकु त्याच्या लेकाला घेऊन आधीच हजर होता. मागोमाग अतरंगी सकुसप आलाच. त्याचे येणे माझ्याकरता अगदी महत्वाचे होते. संयोजक म्हणून नव्हे तो तर योकु आलाच होता. पण माझा आणि योकुचाही माबो टी शर्ट त्याच्याकडे होता. मला खात्री होती की तो टी शर्ट आणेलच पण योकुला नव्हती त्यामुळे त्याने लगेच्च विचारले तू आलास ठीक आहे पण टी-शर्ट आणलेस का अर्थातच लगेच हो म्हणून सांगीतले तर तो अतरंगी कसा! त्याने साभिनय, अर्रे आणायचे म्हणून वर काढून ठेवले आणि नेमके विसरलो बघ असे सांगीतले. मला खरे वाटले यात नवल नाही पण योकुलाही ते खरे वाटले. त्यामुळे याठिकाणी अभिनयाचा सर्वोच्च पुरस्कार त्याला देण्यात यावा म्हणून मी शिफारस करत आहे. (टंकताना शिफारसचा तीन वेळा शिफार्स झाला. काव्यगत न्याय म्हणतात तो हाच काय) तितक्यात लगेचच गाडी आल्याने अतरंगीला जास्त वेळ अभिनय करता आला नाही. "

२०२४च्या वविला सगळ्यांना पूल मधे खेळायला बॉल हवा होता तेव्हा मी सगळ्यांना सांगत होतो कि बॉल अमॅझॉन वरुन ऑर्डर केला आहे. डिलीव्हरी टाईम १२.३० दाखवत आहे. अनेकांना ते खरे वाटले. पण रिनाला पण तेच उत्तर दिले तेव्हा कविन तिच्या शेजारी उभी होती, मी उत्तर दिल्यावर ती माझ्याकडे रोखत बघून म्हणाली "नाही गं चेष्टा करतोय हा" आधीच्या वविमुळे तिला कळले असावे की मी किती आगाऊ आहे ते.

अजूनही मी माझ्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक प्रँक्स करत असतो. बायको व मुले तर हक्काचे बकरे आहेत. लग्नाला १४ वर्षे झाली पण अजूनही काही काही वेळेस बायकोला फसविण्यात यश येते व एक वेगळाच असुरी आनंद मिळतो....

अजून एक दोन किस्से आहेत ते ऊद्या परवा वेळ मिळाल्यास टंकतो...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझे दोन मित्र मॉलला खरेदी करायला गेलो होतो. दसऱ्याच्या दिवशी कायतरी ट्रॅडिशनल घालायचा प्लान होता. दोन मित्र होते त्यांनी सेम पिंक कलरचा फुल शर्ट घातला होता. कपडे खरेदीच्या दुकानात गेलो तिथे बाकीचे लोकं या दोघांना सेल्समन समजायला लागले. एक मित्र हसण्यावारी नेत होता पण दुसरा वैतागला होता, शेवटी तर एक माणूस दोनदा विचारायला आला त्याच्यावर हा खेकसला पण.

आवडल्या अतरंगी चेष्टा..
पण हा लेख तरी सत्य घटनांवर आहे ना? Happy
मला करता येईल का बघतो असे काही अगदी नगण्य रिस्क घेऊन. शुभेच्छा ध्या मार खाऊ नये म्हणून. Happy

तू असाच असशील कल्पना आली होतीच. Lol मस्त लिहिलं आहेस. कॉलेजात असे प्रकार केले आहेत. लिहितो जरावेळाने.

अरे देवा Lol नक्की मिथुन रास. मी फार घाबरुन आहे या राशीला. प्रँकस्टर्स आहेत ही लोक.

माझी एक मिथुन चंद्र व तूळ सूर्य मैत्रिण होती. तिलाह असेच प्रँक्स आवडत. उदा - एखाद्याचा डबा पळवून खाणे. कोणाला खाणे नाही मिळाले की आम्हा कर्क लोकांचे आतडे तुटते. त्यामुळे मी लगेच त्या डबा जातकाला सावधान केले. झाले तो प्रँक फसला आणि ती चिडली Happy

कर्क रास इमोसनल अत्याचार करते ते असे. Wink

एकेक किस्सा फार आवडला.

मस्त, आमच्या ग्रुप मधे ही असा एक जण आहे, पण झालयं असं की त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टींवर आता कुणी विश्वासच ठेवत नाही...गेल्या वर्षी रबाळेला कुठेतरी बाईक वरून पडून त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आणि दुसऱ्या हाताला लागलेलं, त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लास्टर केला आणि ग्रूपवर फक्त प्लास्टर केलेल्या हाताचा फोटो टाकला, तर कुणी विश्वासच ठेवला नाही शेवटी त्याने तिथल्या स्टाफला सांगून फुल साईज फोटो पाठवला तेव्हा सगळ्यांना खात्री पटली. Biggrin

किस्से छान आहेत पण लोक असे खोटे का बोलतात, लपवाछपवी का करतात समजत नाही..

पण असो, आता धागा काढला आहे तर माझेही किस्से लिहावेच लागतील

२०१४-२०१५ च्या सुमारास मी एका प्रतिथयश कंपनी मधे कामाला होतो. कामाचे स्वरूप असे होते की कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ऑईल वेल्स आणि Gas And Oil Separation Plants मधे जाऊन त्यांची कंडिशन बघुन अ‍ॅनेलेसिस करुन रिपोर्ट्स बन्वावे लागत. आमच्या कंपनीचा एक जुना प्लँट बाकी प्लँटस पासून बराच लांब होता. तो जुना असल्या कारणाने बराच छोटा होता. तिकडे आमच्या ब बाकी सगळ्याच डिपार्ट्मेंट्सच्या विझिट्स कमी होत असत.

तर एके दिवशी मला दिवसभरात अनेक कामे होते, त्यातच या प्लँटची पण एक काम होतं. ते काम लवकर उरकावं म्हणून मी सकाळी लवकर तिथे पोचलो. जाऊन कार्ड पंच केले तर ते होईना. तेवढ्यात सिक्यूरिटी गार्ड बाहेर आला. माझ्याकडून माझं कार्ड घेतलं. त्याने पंच करुन बघितलं तरी होईना. मला गाडी व्हिझिटर्स पार्किंग मधे लाऊन त्याने ऑफिस मधे यायला सांगितलं आणि तो निघून गेला. मी आपला साशंक मनःस्थितीत गाडी पार्क करुन त्याच्या ऑफिस मधे गेलो. तो एकटाच होता. गेल्या गेल्या त्याने मला सांगितलं की माझं कार्ड ब्लॉक आहे. काहीतरी सेफ्टी ईश्यू दाखवत आहे. माझी जाम फाटली. आम्ही काम करतो त्या कंपन्यांमधे एक वेळ कामात चूक झाली तर ती सहन केली जाते पण सेफ्टी आणि ईथिक्स मधले छोट्यातले छोटे ईश्यूज पण नोकरी जायला पुरेसे असतात. आणि एका मोठ्या कंपनीमधून या कारणाने तुम्हाला काढलं तर सगळ्यांना ते कळतं आणि दुसरीकडेही कुठेही नोकरी मिळणे अवघड होते.

मग त्याने मला विचारायला सुरुवात केली की काल कुठे कुठे गेला होतास काय काय काम केलं वगैरे. मी त्याला सगळं प्रामणिकपणे सांगितलं. मग तो म्हणाला कि मी सिक्यूरिटी सुपरवायजरला कळवलं आहे तो थोड्यावेळाने कॉल करेल तोपर्यंत तू ईथेच थांब. एक दोन मिनिटे गेल्यावर त्याने मला चहा ऑफर केला, मला वाटले औपचारिकता म्हणून म्हणत असेल आणि मी नको म्हणालो, पण त्याने परत आग्रह केल्यावर मी कॉफी बनवली आणि त्याने चहा बनवून घेतला. चहा घेता घेता त्याने मला सहज भारतात कुठे राहतोस, घरी कोण कोण असतं, मुलं किती मोठी आहेत वगैरे जनरल गप्पा मारल्या. थोड्यावेळाने पर PC वर जाऊन ईमेल चेक केले, मग माझ्याकडे येऊन मला कार्ड दिलं आणि म्हणाला की जा तुझं कार्ड अनब्लॉक केलंय. मी एक मोठा सुस्कारा सोडला आणि पटकन तिथून निघालो. अगदी दारापर्यंत गेल्यावर त्याने मला हाक मारली आणि म्हणाला " तुझ्या कार्ड मधे काही प्रॉब्लेम नव्हता, काही सेफ्टी ईश्यू पण नव्हता, मला आज चहा प्यायला सोबत कोणीच नव्हतं म्हणून तुला बोलावलं...."
एवढं बोलून त्याने परत गर्र्कन खुर्ची वळवली आणि फोन मधे मान घातली.

मी या किस्स्यावर ईतक्या नंतर ईतक्यावेळा हसलोय, जबरदस्त प्रँक होता, आणि त्या गार्ड्ने ज्याप्रकारे सगळं केलं ते प्रचंड convincing होतं.

मी ईतके प्रँक्स करत असतो, माझ्यावर पण छोटे मोठे प्रँक्स होतच असतात. पण हा बेस्ट होता, पोटात खड्डा पडणे, जीव भांड्यात पडणे वगैरे सगळ्या म्हणी त्यादिवशी मला अनुभवायला आल्या......

आता जरा सावध राहायला हवं>>>
तू तर जास्तच... तू अनेक फुल्टॉस देत असतेस. पण आत्तापर्यंत तरी मी सगळे सोडले आहेत....

पण हा लेख तरी सत्य घटनांवर आहे ना>>>

हो पूर्णपणे.... Happy

अमित, ऋन्मेऽऽष,
तुमचे किस्से नक्की लिहा....

मला करता येईल का बघतो असे काही अगदी नगण्य रिस्क घेऊन>>>

असे प्रँक्स करायला शुभेच्छा, ईतक्या वर्षात कळलं आहे ते थोडक्यात सांगतो. कोणत्याही फिल्डची एक भाषा असते. त्यांचे त्यांचे शब्द असतात, त्या शब्दांकडे लक्ष द्या, तुम्ही त्या फिल्ड मधले आहात कि नाही हे त्या शब्दांवरून कळते. ड्रायव्हर लोकांची, दुकानातल्या शेठ लोकांची, कामवाल्या बायकांची प्रत्येकाचा एक स्वतःचा शब्दकोश आहे. ते शब्द आपल्या बोलण्यात आले की character मधे convincing येते.

दुसरे म्हणजे आपला चेहरा कोरा ठेवता यायला हवा, जर अ‍ॅक्टींग जमली तर सोने पे सुहागा, पण काहिच नाही जमले तरी चेहरा कोरा ठेवता यायला हवा. चेहर्‍यावर मिश्किल अथवा विनोदी भाव नकोत...

भेटलास तेव्हा साळसूद वाटलास रे बराच>>>>

हा पण एक ऑनगोईंग प्रँकच आहे..... Lol

बोकलत, फार्स विथ डिफरंस मस्त किस्से.....

बाकी सगळ्यांना धन्स.... Happy

कसलं भारी आहे हे Lol
सगळेच किस्से function at() { [native code] }अरंगी आहेत. Happy

तुम्ही युट्यूबवर प्रँकचा चॅनल सुरू करा.
I will be the first to subscribe Happy

कढईचा नंबर कसा सांगितला ? चुट्पुट लागली ना.
बोकलत यांचे प्रतिसाद बघता ते सुद्धा चांगले प्रँक्स करत असतील. त्यांनी पण लिहीलेले वाचायला आवडेल.:)

>>>>असे प्रँक्स करायला शुभेच्छा, ईतक्या वर्षात कळलं आहे ते थोडक्यात सांगतो. >>>>अतरंगी धन्यवाद टिप्स साठी पण घरातल्या लोकांसाठी चेहरा निर्विकार एवढंच पुरेसं पडेल? थोडंसं इमोशनल व्हायला लागेल.

अतरंगी - हा धागा वाचून नंतर देसी ग्रोसरीमधे गेलो. थंडीमुळे डोकेबिके पूर्ण कव्हर केलेले. दुकानातील आईलमधे दुकानातले लोक लोडिंग करत असल्याने मधेच बरेच क्रेट्स ठेवलेले होते. मला जे हवे होते ते काढताना ते माझ्या मधे येत असल्याने ते क्रेट्स हलवत होतो. तेव्हा एक बाई येउन मला कोणत्यातरी ब्रॅण्डचा आटा कोठे आहे विचारू लागली. मला कळाले नाही की ती जनरल विचारत आहे की तिला मी तिथलाच "माणूस" वाटलो. आधी मी तिला सांगितले की बाजूच्या आईल मधे - जेथे आटा होता तेथे- असेल पण नंतर विचार करत होतो की प्रँक करावे का. थांबा, मागे स्टॉक मधे आहे का बघून येतो वगैरे सांगून Happy

Lol मस्त धागा आणि प्रतिसाद!
गजानन डबलघोडा काढ Lol
माझ्या बाबतीत कुणी काही प्रँक केल्याचं मला आठवत नाही. पण माझी एक मैत्रीण अशा बाबतीत फार हुशार होती. ती सफाईने करू शकायची हे. आम्ही फर्स्ट इयरला असताना आमचे एक सर ( जे एकदम तरुण होते) आणि एक मॅडम ( ज्या चाळीस-पंचेचाळीसच्या असतील) यांचं आडनाव सारखं होतं. म्हणजे मॅडमचं माहेरचं आडनाव. तर हिने एकदा अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आवाजात सांगितलं होतं की मॅडम समीर सरांच्या आत्या आहेत! आम्हाला उगाचच ते खरं वाटलं होतं. त्यामुळे कुणाला काही फरक पडत नव्हता पण आमचा उगाचच तो एक गैरसमज झाला होता Lol

Lol
माझ्या भोळ्या स्वभावाचा प्रॅन्क करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
म्हणून मीच करणारे आता प्रॅन्क्स, जमला तर इकडे गुरुदक्षिणा म्हणून चहा देईन

हेहेहेहे डबल घोडा.
मी पण किल्लीच्या जुडग्यात, आपलं बोटीत. मला कोणीही सहज बनवू शकतं.

छोट्या छोट्या पण छान किश्यांचा धागा...!!

एका मित्राबाबत आम्ही मुद्दाम केले होते. एके दिवशी आम्ही सर्व बसमधून जात असताना खाकीच्या जवळपास जाईल असा शर्ट एका मित्राने घातला होता. त्याला छळायला म्हणून आमच्यातल्या काहींनी त्याच्याकडे तिकीट मागितले. जरा बर्‍यापैकी गर्दी होती व मुळ कंडक्टर जरा लांब होता. त्यामुळे इतर पॅसेंजरचा पण गैरसमज होऊन काहींनी त्याच्याकडे बसचे तिकीट मागितले. फार हसलो होतो आम्ही. या मित्राने नंतर ओशाळून आम्हाला सांगितले की काही दिवसांपुर्वी एका बसमध्ये हाच शर्ट तो घालून गेला असताना असेच घडले होते. आता या नंतर तो हा शर्ट कधीच घालणार नाही.

Pages