मी (वय वर्ष १८, पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी):
तो जोश्या भडवा कोल्हापुरी चप्पल घालून हरिश्चंद्रगडावर आला होता. रॉक पॅच उतरताना तंतरली ना त्याची! त्याला हात धरून खाली उतरवला. त्याची सॅक माझ्याचकडे! त्यात एक तास गेला. माळावर एकदा माझ्यामुळे रस्ता चुकला. काय माहिती मी दगडांची खूण कशी चुकलो ते? झक मारली तिच्यातला. त्यात आणखी एक तासभर वाया गेला. मग अर्ध्या रात्री अंधारात ठेचकाळत कसे तरी मढ गावी पोहोचलो होतो. आता इतक्या रात्री कुठे कोण जेवायला देणार? आणि चूल तरी कशी पेटवणार? बरं, कोणाला होता एवढा उत्साह?! तसाही शिधा संपायलाच आला होता. मग जे काही बिस्कीटं-फिस्कीटं, चिवडा-लाडू उरलंसुरलं होतं तेच खाल्लं. मुक्कामी एस्टी उभी होती. पण मास्तरांनी स्पष्ट नकार दिला गाडीत झोपायला. परवानगी नाही म्हणाले. मग तिथेच पारावर बसलो होतो कुडकुडत रात्रभर. चांगल्या तळपत्या उन्हाळ्यात, भर मे महिन्यातसुद्धा रात्रीचं वारं झोंबरं होतं. सकाळी तिथून आळेफाटा आणि मग नाशिक गाडीनं शिवाजीनगर अशी यात्रा झाली. नशीब माझं की पद्मावती बस समोरच होती. मग लक्ष्मीनारायणला उतरून वन-टू, वन-टू करत घरी. अडीच-तीन झाले होते. पोटात काही नाही, डोक्यावर तळपतं ऊन आणि तीन दिवसांचा ट्रेक चार दिवस चालल्यानं आलेला शीण.
घरी आलो, दरवाज्यात उभा होतो. जोडे काढत होतोच तर आईची सरबत्ती सुरू झाली.
का उशीर झाला? कुठे होतात एक दिवस? घरच्यांची तुम्हाला काही फिकीरच नाही. कुठे शोधायचं तुम्हाला? आणि झालं असतं काही बरं वाईट तर? आम्ही काय केलं असतं? मेली, आमची कोणाला कदरच नाही. सांगितल्या दिवशी यायला काय झालं होतं. काल त्या पांडेच्या घरचे संध्याकाळी येऊन गेले. तूही नाहीस म्हटल्यावर त्यांना जरा धीर आला. नाही तर ती रडकुंडीला आली होती.
तुला सांगितलं होतं वेळेवर ये म्हणून. माहितं होतं ना की आज कुरडया घालायच्या आहेत? सकाळपासून मेली मी एकटीच मरतेय... जा आता वरती जाऊन कुरड्या पलटवून ये.
आता त्या काळी वाळवणं करणं हे दर उन्हाळ्याची काम होतं. आणि सगळ्यात किचकट प्रकार म्हणजे कुरड्या... असेल पण..
पाठीवरची सॅकही उतरवली नव्हती तर एवढं ऐकावं लागलं. तिच्या बरोबरीला शेजारपाजारच्या दोन काकवा होत्या. तशीच सॅक फेकली. धाडधाड तीन जिने चढून गच्चीवर गेलो. एक दिवस उशीरा आलो ही काय माझी चूक होती का? सगळ्यांना सांगत होतो, पांडेचा पहिला ट्रेक आहे. वेळेत परत जाऊ. पण कोणी ऐकेल तर शपथ. त्या भडव्याला तरी कुठे अक्कल. शेवटी घरी शिव्या कोणाला, मलाच ना?
डोक्यावर मरणाचं ऊन, खाली पाय पोळतायत. अशात चार किलोच्या कुरड्या पलटवल्या.
दोन-दोन पायऱ्या उतरत खाली आलो. श्वास फुलला होता. मनात काहूर उठला होता. अपमानाची चीड, थकवा, भूक,..
आई त्या बायकांशीच फालतू काही तरी बोलत बसलेली, साबुदाणा निवडत. उद्याच्या पापड्यांची तयारी.
अशी तिडीक गेली डोक्यात. समोर आमच्या डायनिंग टेबलची खुर्ची होती. उचलली आणि आपटली, एकदा, दोनदा... नाकातून तीव्र ऊष्ण फूत्कार निघत होते. डोळ्यात वेडाची झाक दिसत असावी. आतून कुठून तरी निःशब्द आक्रोश उठत होता.
अरे, अरे काय झालं?! करत सगळ्या बायका उठल्या तोपर्यंत मी ती खुर्ची तोडली होती.
ताडताड आतल्या खोलीत गेलो आणि गादीवर आडवा झालो. कोपऱ्यात तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागलो.
----
आमचे कुलदीपक (वय वर्षे १८, एवढ्यातलीच गोष्ट):
च्यायला, तिडीकच गेली डोक्यात.
चार दिवस संडासला जायचे वांदे झाले होते. साठ-सत्तर मुलांना, ते ही तेरा-चौदा वर्षांच्या, चार दिवस कंट्रोल करायचं, बिझी ठेवायचं, काय गंमत आहे? कोणाकडे मोबाईल नाहीत, कॅमेरे नाहीत, तिथे रेंजही नाही अशा ठिकाणी? आजच्या दिवसांत? जस्ट इमॅजिन!
बस ठरवा. पैसे गोळा करा. त्यांना खायला घाला, चहापाणी बघा, नाश्ता, झालंच तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... बारा हजार रुपयांचा स्टॉक घेऊन गेलो होतो - कणीक, तेल ते मिरच्या-कोथिंबीर न् मोहोरी. चार दिवस गेले त्यात.. झालंच तर त्यांच्या तब्येती सांभाळा. कुणाला लागलंय, खरचटलं, ते बघा. नशीब थंडी जरा कमी होती. पण कुठे कुणाला खोकला तर कुणाला क्रोसिन. माझी स्लीपिंग बॅग त्या खोकणाऱ्या मुलाला देऊन मी पेपर वर झोपलो एक नाईट. पुण्यात आल्यावरही दोन तास थांबून होतो. सगळ्यांचे पेरेंट्स येऊन घेऊन गेले तेव्हा सुटलो.
आणि ही, ही आई त्या ताटल्या आणि वाट्यांची काळजी करतेय... अरे तिथे कोणी गेस्ट आले तर त्यांना जेवायला कशात द्यायचे? म्हणून घरून घेऊन गेलो होतो. शेवटच्या दिवशी नव्हती माझ्यात एनर्जी त्या डिशेस शोधायची अन् परत आणायची, जस्ट नो.
एका डिशमध्ये तर तो बसचा ड्रायव्हर जेवताना दिसला होता. पण नाही मी त्यांच्या मागे धावलो.
तर बाकी सगळं सोडून हिचं आपलं -
तुला पैशाची किंमतच नाही, घरच्या ताटवाट्यांतसुद्धा भावना गुंतलेल्या असतात, त्याची कदर नाही. एवढे क्लासचे पैसे भरले, काय उपयोग झाला? एवढी पुस्तकं आणून दिली, उघडलीस तरी का?
व्हॉट नॉनसेन्स? काय टॅंजन्ट चाललंय हे सगळं? वर्क फ्रॉम होमची चिडचिड माझ्यावर काढतेय का?
त्या बाबांचं वेगळंच काही तरी -
रिकाम्या पिशव्या परत का नाही आणल्या? सांगितलं होतं ना बजावून?
किती इरिटेटिंग आहेत हे... त्यांना ताट-वाट्या-पिशव्यांची काळजी?
आणि माझी काळजी? नो वन बॉदर्स.. बुलशिट
तसाच ताडकन उठलो, बाईकची किल्ली घेतली, आणि चालू लागलो. खड्ड्यात गेलं जेवणबिवण.. कशाला यायचं घरी, ह्यांना काही किंमत नाही तर?
----
चक्रनेमिक्रमेण... पिढ्यान् पिढ्यांची कथा. कोणाला चुकलंय ते...
सहीये.
सहीये.
दोन्हींचा पार्ट-२ सुद्धा लिहा.
खरंच खूप छान.
खरंच खूप छान.
तरीही हल्ली पन्नाशी अन त्या आतली पिढी समजून घेतेय मुलांना.
अस्सल आहे. खूप आवडलं.ललि
अस्सल आहे. खूप आवडलं.ललि म्हणतेय तसं पार्ट २ किंवा सिरीज वाचायला आवडेल.
+ 1
+ 1
सिरीज होईल ही छान.
Like the vibe.
छान लिखाण
छान लिखाण
मस्त लिहिलंय, आवडलं.
मस्त लिहिलंय, आवडलं.